माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -६

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
25 May 2016 - 11:31 pm

भाग सहावा -

हा भाग टाकायला सुद्धा जर उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व !! सर्व वाचकांचे मनापासून आभार :)

वीकांत असल्याने आज जरा निवांत चाललं होतं. आज ग्रीनिच ला जाणार होतो. नाश्ता करून घराबाहेर पडलो. ग्रीनिच ला जाण्यासाठी आपल्याला स्टेशन बदलून जावं लागतं म्हणून सर्वप्रथम आम्ही बँक स्टेशनवर आलो जिथून DLR लाईन जाते. हीच लाईन पुढे ग्रीनिचला जाते. हा प्रवास खूप छान झाला कारण त्याचं एक वैशिष्ठ्य होतं ते असं की या लाईन वरून जाणाऱ्या काही ट्रेन्स या बिना चालकाच्या आहेत. आपणच चालक असं समजून पुढे बसायचं. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यात पुढची जागा पटकावली. आणि ही स्वयंचलित ट्रेन निघाली. २५ मिनिटांचा प्रवास असेल. आपण शहराच्या बाहेर आलो आहोत की काय असं वाटतं हा प्रवास करताना. इतकी विहंगम दृश्ये पाहायला मिळत होती न .ट्रेन खूप हलत होती त्यामुळे फोटो काढता आले नाहीत आणि जे काढले ते नीट आले नाहीत :(

आंतरजालावरील फोटो.. D L R ट्रेन

ग्रीनिच स्टेशन मधून बाहेर पडल्यावर आम्हाला तिथे पोहोचायला २० मिनिटे लागली. खाली पार्क आहे आणि वर royal observatory आहे. थोडं चढून जावं लागतं वरपर्यंत. वर गेल्यानंतर खालचे दृश्य खूपच छान दिसते. लंडनची स्कायलाईन तर झकास दिसते. इथे भरपूर फोटो काढले आणि वर आलो. तुम्हाला observatory बघायची असेल तर त्यासाठी तिकीट आहे. आम्ही Royal Observatory आणि Cutty Sark चे एकत्र तिकीट काढलं. साधारण १८ ते २० पौंड माणशी भरावे लागले. आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे काही गोष्टी पाहता आल्या नाहीत. वेगवेगळ्या प्रकारची सोलर घड्याळ, जुन्या काळचे रेडिओ तंत्रज्ञान या गोष्टी पाहिल्या. आणि आता मुख्य आकर्षण म्हणजे ग्रीनिच मेरिडिअन लाईन. या लाईन वर वेगवेगळ्या देशाची/शहरांची नावे त्यांच्या टाईम झोन सकट लिहिलेली आहेत. बऱ्याच देशांमधून लोक आले होते इथे आणि प्रत्येक जण आपआपल्या देशाच्या /शहराच्या नावावर बोट ठेऊन काढत होते. आम्ही सुद्धा असे फोटो काढले. या observatory मधून एक लेसर लाईन पण जाते जी रात्रीच्या वेळीच नीट दिसते. आणि चांगलं हवामान असेल तर ३६ ते ४० मैलापर्यंत ही लेसर लाईन दिसू शकते.

  /

ग्रीनिच कडे जाण्यचा रस्ता

ग्रीनिच वरून दिसणारी स्काय लाईन

Royal Observatory

मेरिडिअन लाईन - फोटो आंतरजालावरून साभार

लेसर लाईन


सोलर क्लॉक

ग्रीनिच पार्क

तिथून आम्ही कटी सार्क नावाचं जहाज बघायला गेलो. ग्रीनिच पार्क मधून थोडं खाली चालत गेल्यावर लगेचच दिसतं हे जहाज . हया जहाजाची नोंद एक ऐतिहासक जहाज म्हणून केली आहे. आता हे जहाज एक संग्रहालय म्हणून पर्यटकांसाठी खुले आहे. काही वर्षांपूर्वी या जहाजाला खूप मोठ्ठी आग लागली होती त्यानंतर त्याचे नुतनीकरण गरजेनुसार केले आहे. ह्या जहाजाच्या खाली एक छोटेसे Restaurant आहे. अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे हे जहाज जमिनीपासून काही फुटांवर उचललेले आहे. १८६९ मध्ये या जहाजाचे बांधकाम पूर्ण झाले. भारत आणि चीन मधून लंडन मध्ये मुख्यत्वे चहा च्या आयात आणि निर्यातीसाठी या जहाजाचा ब्रिटीश लोक वापर करत असत. जहाज इकडून ३ मजल्यांवर विभागले आहे. पहिल्या टप्प्यावर गेलो आणि जहाजाच्या आत गेल्यावर एक छोटीशी फिल्म दाखवली यामध्ये या जहाजाची सगळी माहिती सांगितली. ही फिल्म पाहिल्यावर आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. हा भाग त्यांनी संग्रहालय बनवलेला आहे. तिथे लहान मुलांसाठी जहाजाशी संगडीत काही खेळ ठेवले आहेत. आम्ही पण खेळलो त्यातले काही खेळ. जहाजामध्ये बसल्यावर कसं वाटतं,हे एका बाकावर बसून समजतं. त्या बाकावर बसल्यावर समजतं की जे लोकं जहाजावर असतात त्यांच्या पोटात कसं डचमळत असेल. दुसऱ्या मजल्यावरचा भाग बघून आम्ही डेक वर गेलो. इथे कप्तानाची खोली , त्याचं केबिन , जहाजावर काम करणाऱ्या लोकांच्या खोल्या, ते कसं राहत होते हे सगळं पाहता आलं. तोपर्यंत खूप अंधार झाला असल्याने इथले फोटो पण काढता आले नाहीत. एवढं मोठं जहाज मी पहिल्यांदाच पाहत होते. खूप छान अनुभव होता. आम्हाला डेक वर अजून थांबायचं होतं पण तिथली वेळ संपत आली म्हणून निघावं लागलं

Cutty Sark ( अंधार असल्याने फोटो नीट आला नाही आहे )

खाली येउन पाहिलं तर दिव्यांच्या लखलखाटात खूप छान दिसत होती Cutty Sark. इथेही फोटो काढले. हे पाहून झाल्यावर समोरच थेम्स नदी आहे आणि पलीकडे लंडनची स्कायलाईन. खूप छान दिसत होती. आता अंधार आणि चांगलीच थंडी पडली होती त्यामुळे इतक्या थंडीत कुडकुडत चालत स्टेशन वर जायचं जीवावर आलं होतं पण पर्याय नव्हता म्हणून परत जायला निघालो तेवढ्यात एक भुयारी मार्ग दिसला जिथून बरेच लोकं ये जा करत होते. आम्ही थोडं विचारल्यावर कळलं की हा रस्ता नदीच्या पलीकडे जातो. मग आम्ही हा रस्ता घ्यायचं ठरवलं. थेम्स नदीच पात्र इतकं मोठं आहे की हा नदीच्या खालून जाणारा रस्ता चालत जायला आम्हाला २० मिनिटे लागली. एका ट्युब स्टेशन च्या बरोबर बाहेर निघाला हा रस्ता. त्या स्टेशन च नाव आठवत नाहीये आता.

स्कायलाईन (हा समोर दिसणारा भाग म्हणजेच कॅनरी व्हार्फ )

इथून पुढे आम्ही ट्रेनने कॅनरी व्हार्फ ला उतरलो. हे लंडनचे Financial Hub. केवढ्या मोठ्या इमारती आहेत इथे. इथल्याच इमारतींची स्कायलाईन दिसत होती मगाशी ग्रीनिच आणि cutty sark च्या इथून. हा भाग पण फिरलो आणि इथून निघालो. आणि आजच्या दिवसाची भटकंती संपली.

आज रविवार. सकाळी उठून बाहेर पाहतोय तर काय जोरदार पाऊस. आता काय करणार? घरीच थांबलो मग, इतक्या पावसात कुठे बाहेर जायची सोय नाही. बराच वेळ पडत होता पाऊस. थोडा पाऊस कमी झाल्यावर निघालो. अर्धा दिवस वाया गेल्यामुळे जरा वाईट वाटलं कारण एक तर आधीच आमच्याकडे दिवस कमी आणि त्यात पाऊसाने गोंधळ घातला. काल ठरवलेल्या सगळ्या गोष्टींपैकी आत्ता काहीच करता येणार नव्हतं. एकतर अर्धवट वेळ होती आणि इथे अंधार लौकर होत असल्यामुळे दिवस लौकर संपतो. म्हणून थोडा वेळ Hyde Park फिरलो. बाहेर पडून थोडी खरेदी करायचं ठरवलं. खरेदी केली आणि Tower Of Lodnon आणि The Shard पाहायला गेलो पुन्हा. आज जरा जास्तीच ढगाळ असल्याने अंधार सुद्धा लौकर पडला त्यामुळे वेगळं कुठलं प्रेक्षणीय स्थळ नाही पाहता आलं. संध्याकाळी माझ्या नवऱ्याची कॉलेज मधली एक चीनी मैत्रीण आहे इथे लंडन मध्ये स्थायिक झालेली तिला भेटलो आणि घरी आलो. आज खराब हवामानामुळे कुठे जाता नाही आलं याची रुखरुख लागून राहिली.

द शार्ड!!

Tower Bridge (खूप लांबून काढला आहे फोटो त्यामुळे क्लिअर नाही आहे )

क्रमश:

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

26 May 2016 - 12:21 am | राघवेंद्र

३ ऱ्या फोटोतील ग्रीनिच वरून दिसणारी स्काय लाईन ही "नमस्ते लंडन" चित्रपटातील शेवटच्या सीन मध्ये आहे.

मस्त फोटो आहेत. The NIght Tube नि प्रवास केला का ??

मेघना मन्दार's picture

26 May 2016 - 12:55 pm | मेघना मन्दार

धन्यवाद !! the night tube मधून प्रवास नाही केला.

थेम्स नदीच पात्र इतकं मोठं आहे की हा नदीच्या खालून जाणारा रस्ता चालत जायला आम्हाला २० मिनिटे लागली. एका ट्युब स्टेशन च्या बरोबर बाहेर निघाला हा रस्ता. त्या स्टेशन च नाव आठवत नाहीये आता.

त्या स्टेशनचं नाव आयलंड गार्डन्स.

बादवे, त्या थेम्सखालच्या "ग्रीनिच फूट टनेल" मध्ये भूत आहे अशी एक बोलवा आहे ;)

मेघना मन्दार's picture

26 May 2016 - 12:58 pm | मेघना मन्दार

आयलंड गार्डन्स !! आत्ता आठवलं.. धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल :)

हो का !! आम्हाला नै बाई भूत बित दिसलं ;)

मस्त फोटू व भटकंती. शेवटचा फोटू पाहून बरेच काय काय आठवले. छान आलाय तो!

प्रीत-मोहर's picture

26 May 2016 - 2:11 pm | प्रीत-मोहर

छानच फोटो मेघना

पद्मावति's picture

26 May 2016 - 2:19 pm | पद्मावति

खूप छान.

पुभाप्र.

मेघना मन्दार's picture

27 May 2016 - 10:23 am | मेघना मन्दार

सर्वांचे खूप आभार :)