डिसेंबर मध्ये नवीन सायकल घेतली, ती थोडी घाबरतच. एवढी महाग वस्तू घेणार, ती आपण नियमितपणे वापरू कि नाही याची फार शंका होती. डोळ्यासमोर कित्येक मित्र-नातेवाईकांची घरी पडून असलेली सायकल होती. पण कायप्पा वरील मिपाकर सायकल ग्रुप, तसेच ऑफिस च्या सायकलिंग ग्रुप मधून वेगवेगळ्या अनुभवी आणि हौशी सायकलबाज (हो, 'बाज' - एकदा चटक लागली कि सुटणं कठीण) मंडळींशी ओळख झाली. strava सारख्या माध्यमांतून एकमेकांना प्रोत्साहित करत-करत असताना सायकलिंगची चटक लागली.
या सगळ्या अनुभवी लोकांकडून सायकल वापर व दुरुस्ती, आहार यांची माहिती मिळत होती आणि जमेल त्या प्रमाणे ती अमलात आणत होतो. आठवड्याला सरासरी १०० ते १५० किमी सायकलिंग करण्याचा प्रयत्न चालू होता.
कधीमधी काही मोठे दौरे झाले. त्यातील विशेष म्हणजे मार्च च्या सुरुवातीला केलेला पुणे-महाबळेश्वर दौरा.
एप्रिल च्या पहिल्या विकांताला पुण्यात २ स्पर्धा झाल्या, गम्मत म्हणून दोन्हीतही भाग घेऊन पहिला.
एकूणच सायकलिंग करण्याचा सराव व आत्मविश्वास वाढू लागला.
असेच एकदा सायकलिंग च्या ग्रुप मध्ये गप्पा मारताना BRM (Brevet des Randonneurs Mondiaux) या वेगळ्याच स्पर्धेचे - खरेतर आव्हानांचे बद्दल माहिती मिळाली.
BRM मध्ये २००, ३००, ४०० आणि ६०० किमी अशी वेगवेगळी आव्हाने असतात, जी अनुक्रमे १३.५, २०, २७ आणि ४० तासात पूर्ण करायची असतात. आणि मुख्य म्हणजे या आव्हानादरम्यान सायकलस्वार स्वावलंबी असला पाहिजे. आव्हान पूर्ण करण्यासाठी लागणारी सर्व कामे त्यानेच करायची, सर्व सामान त्यानेच घेऊन फिरायचे. त्यामुळे थोडेफार खाणे-पाणी, सायकलच्या जुजबी दुरुस्तीचे समान, दिवे, इ. सोबत असावे लागते. मध्ये रसदीची व्यवस्था स्थानिक हॉटेल-दुकानातून त्यानेच बघायची.
जरी BRM ची मुख्य संस्था फ्रांस मध्ये असली तरी, हि आव्हाने विविध देशांत स्थानिक रँडोनीयर क्लब कडून आयोजित केली जातात.
आव्हान पूर्ण करण्यासाठी सायकलस्वाराने दिलेल्या कालमर्यादेत आधी ठरलेल्या कंट्रोल्सवर पोहचून तेथील कार्यकर्त्याकडून आपल्या ब्रेवे कार्ड वर वेळेच्या नोंदीसह सही शिक्का घ्यायचा असतो (पुरावा म्हणून). कधीकधी काही कंट्रोल मानवरहित असतात, अशा कंट्रोल वर वेळेचा सुयोग्य पुरावा घेऊन आपल्या ब्रेवे कार्ड ला जोडावा लागतो उदा. ATM ची पावती अथवा स्थानिक हॉटेलची वेळेसहित छापील पावती.
एकूणच नवख्याला तशी कठीणच पडणारी स्पर्धा.
कायप्पा ग्रुप तसेच अन्य चर्चानुसार बऱ्याच पुणेकर सायकलस्वरांनी २०० किमी BRM हि पुणे-महाबळेश्वर-पुणे या मार्गाने पूर्ण केली होती. आणि महाबळेश्वर चा दौरा झाल्याने आपल्यालाही प्रयत्न करायला जमेल असा आत्मविश्वास देखील वाटला. म्हणालं BRM पहावी करून!
पण पुढील २०० किमी BRM चा मार्ग घोषित झाला नव्हता. तारीख माहित झाली होती १४ मे.
विचार केला एवढ्या उनात कोण एवढी सायकल चालवणार! जाऊदेत सप्टेंबर मध्ये पुण्यात पुढची BRM आयोजित होईल तेव्हा बघू..
पण मे च्या सुरुवातीला ग्रुप वरून खबर मिळाली कि १४ मे ची स्पर्धा हि रात्रीची आहे. तीपण पुणे-कापूरहोळ-लोणावळा-पुणे या तशा सोप्या मार्गावर. उनाचा त्रास नाही, घाटाचा पण नाही - उत्तम. नोंदणी करून टाकली.
नंतर चर्चा करताना लक्षात आले कि रात्रीची सायकलिंग सोपी गोष्ट नाही - पत्ते खेळायला बसलं तरी ४ वाजता झोप येऊ लागते, इकडे तर शारीरिक कष्ट आहेत रात्रभर. शिवाय BRM ला नेहमी लागणाऱ्या सामानात भरपूर सामानात दिव्यांची भर पडते. तसेच रात्री हॉटेल उघडी असतील - नसतील म्हणून खाण्याचे समान आणि जास्तीचे पाणी घेऊन फिरावे लागते. रात्रभर झोपेशिवाय सायकलिंग आणि समोरून येणाऱ्या गाड्यांच्या दिव्यांमुळे डोळ्यांना येणारा शीणवटा.
हे सगळं कसं जमवायचं याबद्दल मोदक दादा, केदार इ. अनुभवी लोकांकडून माहिती घेतली. आणि नेहमीच्या सायकलिंगच्या सामानाखेरीज हे सर्व कसबसं सायकलवर बसवलं.
१४ मे ला संध्याकाळी घरून ७:३० ला निघून, ८:३० ला युनिवर्सिटीला पोहचलो. सायकल चेकिंग आणि आवश्यक सूचना मिळाल्यावर ९ वाजता सायकलिंग सुरु झाली.
तसा माझ्याबरोबर ओळखीच्या ३-४ सायकलस्वारांनी भाग घेतला होता. पैकी मी आणि हरीश तसे नवखे आणि आरामात सायकल चालवणारे. आधी केलेल्या मोठ्या दौऱ्यातून एक अनुभव होता कि, आपल्याला झेपेल तेवढ्या वेगानेच सायकल चालवायची. उगाच जीव खाउन सायकल चालवली कि पायात गोळे येणे, दमछाक होणे, अति तहान वगैरे येतात आणि लांबवर सायकल चालवणे विसरून जावे लागते. त्यामुळे आम्ही दोघांनी स्वतःच्या वेगाने जायचे आणि अधून-मधून मध्ये थांबून सिंक होत राहायचे ठरवले.
त्याप्रमाणे आम्ही युनिवर्सिटीहून निघून पाषाण रोड ने चांदणी चौकात येईपर्यंत तसे एकत्रच होतो. सकाळीच होऊन गेलेल्या हलक्या पावसाने हवेत थोडा दमटपणा होता. त्यामुळे सुरुवातीपासून घाम भरपूर येत होता. तेव्हाच लक्षात आले कि भरपूर पाणी लागणार.
चांदणी चौक-वारजे-नऱ्हे हा ९-१० च्या दरम्यान तसा रहदारीचा. शहराच्या ट्राफिक बरोबर एसटी बसेस, ट्रक-टेम्पो वगैरे चालू होते. पण रोज पुण्याच्या रस्त्यांवर सायकल चालवायची सवय असल्याने हरीश तसा मागे राहिला.
नर्ह्यानंतर कात्रज घाटाचा चढ सुरु होतो आणि मिट्ट काळोख. हळूहळू सायकल दामटत कात्रज बोगद्याच्या आधी येउन थांबलो. वेळ बघितला तर १०:१५ झालेले. हरीश साठी थांबलो. पाणी पिउन, एकदोन चीक्क्या खाऊन घेतल्या, तोवर हरीश आलाच.
ह : असच चढायचं आहे का रे अजून ?
मी: नाही रे, आता बोगदा संपला कि उतारच उतार.
ह: आतापर्यंत जेमतेम २० चा स्पीड पडलाय. वेग वाढवायला हवा.
मी: हो, आता मध्ये ब्रेक नको, सरळ कापूरहोळ चा कंट्रोल गाठायचा.
कात्रज चा बोगदा सुरु झाला. हलका चढ आणि दमट-कोंडलेली हवा. बोगदा संपल्यावर मात्र जो स्पीड घेतला कि मध्ये २-३ दुचाकी-कार ना पण मागे टाकता आले. अधूनमधून काही दुचाकीस्वार जवळ येउन चौकशी करत होते.
"सायकल घेऊन कुठे?", "रेस आहे का?", "किती जण आहात?", "रात्री पण एवढी सायकलींग करता ?! भारी. ऑल द बेस्ट"
टोल नाका आला. मागे पुढे १-२ BRM वालेच सायकलिस्ट दिसत होते. पण हरीश परत मागे पडला होता. मी पण पाणी जवळ जवळ संपवले होते. दमट आणि उबलेल्या हवेत घामाने सगळा शर्ट भिजला होता. अधेमध्ये मागून येणारे ट्रक, बसेस आणि जोडीच्या सर्विस रोड मुळे सायकल जपून चालवत होतो.
हे फ्लायओवर एकदा पूर्ण झाले कि सायकलिंग बरेच सोपे होईल.
कापूरहोळ जवळ आले होते, सारखा डावी-उजवीकडे दिसणाऱ्या हॉटेल जवळ सायकलिस्ट दिसताहेत का बघत होतो. कंट्रोल जवळ नक्की ५-१० ब्लिंकर लावलेल्या सायकल असणारच. इतक्यात एका स्वयंसेवकाने हाक मारून, उजेड दाखवून कंट्रोल तिथे असल्याचे सांगितले. कंट्रोल सापडला.
सायकल आत उभी केली. ब्रेवे कार्ड स्वयंसेवकांकडून सही करून घेतले. वेळ : ११.२०
आत हॉटेल मध्ये गणेश-मनीष इ. ओळखीची मंडळी भेटली. त्यांना इथे पोहचून बराच वेळ झालेला, हॉटेल ला त्यांनी व्यवस्थित जेऊन घेतले होते. मी जेवणाबद्दल चौकशी केली, पण थाळी संपली होती. मग मेदुवडा-इडली मागवली. ओर्डर येईपर्यंत केळी संपवत बसलो.
एवढ्यात हरीश आला. चांगला दमला होता, घामाघूम. त्याने पण कार्ड वर सही शिक्का घेतला, आणि मिसळीची ओर्डर दिली.
ह : वाट लागली राव. फार घाम येतोय आज. सगळ पाणी संपवलं
मी: हो राव. आता भरपूर पाणी पिउन घेऊ आणि बाटल्या भरून पण घेऊ. नंतर हॉटेल मिळतील का नाही काय माहित..
ह : वाटत नाही कि लोणावळा झेपेल. मी बहुतेक घरी जातो आता
मी: नाही रे. आरामात जमेल. भरपूर वेळ आहे. मध्ये एकदा पाणी मिळायला हव फक्त देहूरोड जवळ.
ह : आत्ता फक्त ४५ किमी झालेत. अजून १५५ बाकी आहेत. कसं जमणारे काय माहित!
मी: ते आहेच. बघू, मी पाणी आणतो.
हॉटेलवाल्याने सांगितलं कि त्याच्याकडच्या बिसलरी संपल्यात. शेजारी विचार.
मग शेजारी जाउन पाहतो तर वाईन शॉप. तिथे अजून ३-४ जण पाणी घ्यायला उभे. अन्य ग्राहक आम्हा वाईन शॉप मधून फक्त पाणी घेऊन जाणाऱ्या येडछाप लोकांकडे पाहत होती. :)
४ बाटल्या पाणी घेतलं. २ हरीशला दिल्या. मी एक बाटली मध्ये इलेकट्रोल आणि दुसऱ्या बाटलीत साधं पाणी भरून घेतलं. उरलेलं पिउन टाकलं.
हरीश ने परत नकारघंटा वाजवली, "मी जातो रे घरी".
मी : अरे काही नाही, भरपूर पाणी पी आणि आरामात सायकल चालवत ये. ६-६:३० पर्यंत लोणावळ्यात पोचलो तरी चालतंय. ३-३:३० पर्यंत देहूरोड ला जाउ, थोडी विश्रांती आणि स्ट्रेचिंग करून जाऊ पुढे. अजून ३ तास आहेत देहूरोडला.
ह : हम्म
मी : चल अरे, आपल्यात जेमतेम १० मिनिट फरक पडतोय जास्त नाही. जमतंय तुला. चल आवर. पुण्यात पोचल्यावर कुठेही पाणी मिळालं लर पिउन घे आणि बाटल्या पण रिफील करत राहू. चल. देहूरोड ला मी तुझ्यासाठी नक्की थांबलोय अर्धा तास.
कापूरहोळ हून परत फिरलो. आता कात्रज बोगाद्यापर्यंत हलका हलका चढ. वेग कमी राहतोय हे समजतंय पण वाढवतच येत नाहीये. कंटाळा पण येतोय. सगळी दुकाने बंद झालेली दिसताहेत फार ट्राफिक नाही, एखादा सायकलिस्ट मागे पुढे दिसतोय. कंटाळा येऊ लागला आहे.
"हरीश टांग देतोय बहुतेक"
सारखी तहान लागत होती. टोल नाक्याच्या पुढे आलो तोपर्यंत अर्धी बाटली पाणी संपलं पण.
पॅडल मारत राहा, ३ वाजता देहूरोडला पोहचायचय. डावा-उजवा, डावा-उजवा.
मध्येच एक दारूड्यांची टोळी रस्त्याशेजारी गप्पा मारत होती. उगाच झोल नको. स्पीड थोडा वाढवला. त्याच स्पीड मध्ये बोगाद्यापर्यंत आलो. वेळही बघायला थांबलो नाही.
आता मस्त उतार लागला. पायांना विश्रांती. वेगामुळे थोडा थंडावाही वाटतोय.
"रम्बलर लक्षात आहेत ना ?"
आधी वाचलेल्या सायकलिंग ब्लॉगवर रम्बलर वर कंट्रोल न झाल्याने सायकल अगदी उलटी-पालटी होऊ शकते हे समजल होतं. वेग कंट्रोल मध्ये आणला.
आता दुकाने कुठे उघडी आहेत का ते बघायच. जमेल तिथे पाणी फुल करत राहायचं.
दारीपूल-नऱ्हे-सनसिटी-वाकड. सायकलिंग चालू आहे. अति ट्राफिक नाही, दुकाने सगळी बंद. पाणी संपणारे लवकरच. कोणी सायकलिस्ट पाणी भरायला कुठे थांबलेत का हे अगदी कसून पाहतोय. कोणी नाही.
"जाऊदे, जातो घरी. देहूरोड पर्यंत पाणी नाही मिळालं तर मग नक्की"
१:३०-१:४० वाजला असेल. चांदणी चौकात चहावाल्याच्या दुकानावर सुट्टा घेऊन कॉलेजकुमारांची गर्दी होती, पण पाणी नाही. चौकाच्या बस स्टोप ला एक सायकल दिसली आणि ३-४ लोकं. वाटलं पाणी मिळत असेल. थांबलो तर विश्रांती साठी थांबलेल्या एका सायकलीस्टला २-३ दारू पिऊन आलेली मुलं उगाच त्रास देत होती,
"सायकलला गिअर किती हो तुमच्या?"
"कशाला चालवताय सायकल?"
मी आल्यावर त्यातल्या त्यात शुद्धीत असलेल्या मुलाने इतर दोघांना आवरलं. मग ते दुसरे सायकलिस्ट आणि मी पुढे निघालो. दोघांच्या वेगात तसा फार फरक नव्हता. ते पुढे आणि मी १००-१५० मी मागे.
बाणेर-पाषाण-वाकड पूल. भूमकर चौक आला पण पाणी नाही. हॉटेल उघडी दिसेनात. पाणी संपलय आता.
"च्यामारी ते २४ तास प्यासा नि २४ तास मेडिकल इकडे का नाही सुरु करत?!"
पुढे एका ओवरब्रिज जवळ ते सायकलिस्ट थांबले होते. मी पण थांबलो.
मी: २४ तास हॉटेल असतात का इकडे उघडी? देहूरोड नंतर पाणी मिळणं कठीण आहे.
ते : रावेत जवळ बहुतेक हॉटेल उघडी असतील. प्रायवेट बस थांबतात तिकडे.
थोड्या गप्पा झाल्या. मी त्यांच्याकडून थोडं पाणी घेतल, त्यांना एक एनर्जी बार दिला. त्यांच नाव कौस्तुभ.
पुढे १५-२० मिनिटातच एक हॉटेल उघडं दिसलं. दोघंही थांबलो. चहा-पाणी पिउन, पाणी भरून पुढे निघालो.
देहूरोडला सिक्रेट कंट्रोल होता. दिव्या ताटे आणि अन्य BRM स्वयंसेवक तिथे सँडविच आणि आईस-टी घेऊन थांबले होते. येणाऱ्या सायकल चेक करून, रायडर नंबर ची नोंद करून घेणे सुरु होते. त्याचबरोबर स्वयंसेवक रायडर्स ची आपुलकीने विचारपूसही करत होते.
आम्ही इकडे पोचलो तेव्हा ३-३:१५ झाले असतील. इथे थांबून सँडविच आणि आईस टी चा समाचार घेतला. स्ट्रेचिंग करून आधी ठरल्याप्रमाणे हरीश साठी थांबायचं ठरवलं. कौस्तुभ पण थांबले. अजून गप्पा मारता-मारता अजून सायकल दौरे, सायकल क्लब्स इ. बद्दल चर्चा झाली. कौस्तुभ नी काही काळापूर्वीच कोकणमार्गे पुणे-गोवा दौरा केला होता.
३.४५ झाले तरी हरीश आला नव्हता. बहुतेक घरी गेला. आम्ही पुढे निघालो. आत्ता निम्म्यापेक्षा थोडं जास्त अंतर कापलं असेल. अजून किमान ९०-९५ किमी सायकलिंग बाकी आहे. सायकल चालवतोय पण आताच खाऊन सुद्धा एनर्जी संपल्यासारखे वाटत होते. टोल नाका-सोमाटणे फाटा झाला. तळेगाव खिंडीच्या चढात उजवा गुढघा थोडा वेगळा जाणवायला लागला.
आता मिट्ट काळोख परत सुरु झालेला.
"नाईट सायकलिंग हा विषय घेऊन मस्त भयकथा लिहिता येईल"
स्वतःशीच हसलो.
हळूहळू सायकलिंग चालू होते. कौस्तुभ चा वेग थोडा जास्त होता, पण गुढघा दुखतोय का काय अशा भीतीने मी वेग वाढवायचे टाळले. वडगाव च्या जवळ परत येणारे काही सायकलीस्ट दिसले.
"एवढ्यात !!"
कौस्तुभ म्हणला - अरे मी ओळखतो यांना. क्लब मधलेच आहेत. येडी लोकं आहेत.
कान्हेफाटा मागे टाकला, कामशेत च्या चढा अगोदर थोडावेळ थांबलो. सायकलच्या हेडलाईट ची चार्जिंग संपत आलेली. दुसरा दिवा लावला. ४.३० वाजून गेलेत. वेळेत आहोत.
१० मिनिटे विश्रांती झाल्यावर पुढे निघालो. चढ चढून जाईपर्यंत गुढघ्याच दुखण नक्की झालं. त्रास देणार. पुढे चढ-उतार जास्त नाहीत. आता थेट लोणावळा. लोणावळ्याजवळ येऊ लागलो तसे परत जाणारे सायकलीस्ट दिसू लागले. टोल नाका-राजमाची रस्ता-मगनलाल चिक्की-पेट्रोल पंप-चेकपॉईंट.
मूळ सूचनानुसार हा इथे आम्हाला ATM पावती घ्यायला सांगितलेली. पण इथेही स्वयंसेवक थांबले होते. त्यांच्याकडून ब्रेवे कार्ड सही-शिक्का करून घेतले. ५:३०.
चिक्की संपवली. एनर्जी ड्रिंक होत, ते संपल. शेवटचा एनर्जी बार पण संपवला. अजूनही थकवा होता. गुढघाही चिवचिव करत होता. आता शेवटच्या ६० किमी साठी आउट नाही व्हायचं.
कौस्तुभ निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेला होता. माझा वेग असाही फार कमी पडत होता त्याच्याबरोबर सायकल ठेवायला. स्वयंसेवकाला सांगून मी निघालो. ६.०० वाजलेले. हळूहळू सुर्यनारायण क्षितिजावर येऊ लागले तशी हेडलाईटची गरज संपली.
टोल नाक्यापुढे ३-४ किमी आलो तोवर लोणावळ्या कडे जाणारे BRM सायकलीस्ट दिसत होते. त्यांना हात करून पुढे जात राहिलो. गुढघा फारच दुखू लागला तेव्हा मार्गी साहेबांची आठवण झाली. कोणत्याशा दौर्यावेळी त्यांना पण असा गुडघ्याचा त्रास झालेला, तेव्हा त्यांनी बहुतेक टाच वापरून पेडलिंग चा कोन बदलला होता. म्हणलं बघावं करून.
सायकल वरून उतरलो. सीट ची उंची थोडी बदलली. थोडा आराम पडला.
कामशेत च्या चढा आधी कंपनीच्या सायकल क्लब चे काही सदस्य गाडीला MTB सायकल लाऊन राजमाचीला निघाले होते, ते भेटले. पुढच्या दौऱ्याची टेस्ट राईड. एकमेकांना गुडलक करून पुढे निघालो.
आता जमेल तेवढे दुखऱ्या गुडघ्याकडे दुर्लक्ष करायचे. गाणी पुटपुटायला सुरुवात केली.
जय जय महाराष्ट्र माझा - बाहुबली पासून अभंग-चित्रपट गीते जे तोडके मोडके शब्द लक्षात होते ते स्वतःशीच गात होतो. रस्त्यावर लक्ष होतं पण डोक्यात फार विचार नव्हते. सायकलिंगच्या समाधीत पोचाल्यासारखी अवस्था होती. गिअर पण जास्त बदलले नाहीत कामशेतचा चढ मागे पडल्यावर. कान्हे फाट्याजवळ एक सायकल पंक्चर झाली होती. तो सायकलस्वार आणि त्याचे साथीदार दुरुस्त करत होते. थांबावे वाटले पण सेट झालेलो तर सायकल वरून उतरायची इच्छा होत नव्हती. थांबलो तो थेट तळेगाव नंतर खिंडीत. ७.३०.
थोडं स्ट्रेच करून परत सायकलवर टांग टाकली. आता गुडघा संपला होता. पावलाच्या सगळ्या भागांनी पेडल करून कसाबसा सायकल हाकत होतो. आता सकाळी फिरायला-सरावाला निघालेले सायकलस्वार दिसत होते. एक रोड सायकल ग्रुप देहूरोड आधी भरधाव पुढे निघून गेला. जाता जाता हातानेच "बेस्ट लक" सांगून गेला. थोडा उत्साह वाढला. सायकल दमाटत राहा, जमतंय आपल्याला. अजून १-१:३० तास जास्तीत जास्त, मग झोप :D
देहूरोडला बायपासला वळून रावेत पुलावरून आता पुणे. रावेत पुलावर एक छोटा ब्रेक घेतला (८:००). पाणी संपलं. आता तशी फार तहान पण लागत नव्हती. बहुतेक मध्ये थांबावं नाही लागणार. जमतील तितके फ्लायओवर टाळत काळेवाडी फाटा-जगताप-औंध अशी वाटचाल सुरु होती.
ब्रेमेन चौकात एकदा रुट गाईड चेक केलं. सिम्बोय्सीस कडून BMCC रस्त्याने रुपाली असा शेवटचा भाग बाकी आहे. म्हणजे अजून एक चढ. थोडं टेन्शन आलं. ० गिअर - सायकल हातात घेऊन जावं लागतंय कि काय?
पण नाही १x२ मध्ये चढ चढला. आणि उताराच्या मिळालेल्या वेगाने रुपालीला पोहोचलो.
"यायायायायायाहू!! BRM खतम! जिंकलो!"
तिथे थांबलेल्या स्वयंसेवकांनी अभिनंदन केले. त्यांच्याकडे ब्रेवे कार्ड जमा केलं. ९:१५. तासाभरापेक्षा जास्त वेळ राखून पहिलीच BRM संपवली.
झोप-गुडघा यांनी एवढा वैतागलो होतो कि फोटो-सेल्फी काढावेत अशी इच्छा राहिली नव्हती. तिथे हे पण लक्षात आलं कि गुडघा एवढा दुखतोय कि चालण्यापेक्षा सायकल चालवणे सोपे. मग परत सायकल घेऊन शेवटची अग्निपरीक्षा दिली. शेवटचे ९-१० किमी संपवून घरी पोचलो. थोडाफार नाश्ता केला, अंघोळ आवरली आणि कुंभकर्णा सारखा संध्याकाळ पर्यंत मस्त झोपलो.
एका दिवसात २२५ किमी सायकलिंग, अपुरी झोप झाली असली तरी BRM पूर्ण केल्याच समाधान औरच.
प्रतिक्रिया
21 May 2016 - 10:23 pm | मार्गी
वा वा!!! अतिशय जोरदार!!!!! त्रि वा र अ भि नं द न!!!!! दंडवत स्वीकारा!!!!!!!!
22 May 2016 - 6:26 pm | sagarpdy
__/\__
21 May 2016 - 10:36 pm | कविता१९७८
मस्त
21 May 2016 - 11:26 pm | राघवेंद्र
अरे वा मस्त एकदम. अभिनंदन!!!
21 May 2016 - 11:28 pm | मुक्त विहारि
२०० तर झाले आता....३००, ४०० आणि ६०० हे पण नक्कीच पुर्ण कराल...
22 May 2016 - 6:24 pm | sagarpdy
बच्चे की जान लोगे क्या?:D
23 May 2016 - 12:20 pm | मुक्त विहारि
उलट तुम्ही ह्या गोष्टी पण नक्कीच करू शकाल.
इंन्सान अगर चाहे, तो कूछ भी कर सकता है.
22 May 2016 - 12:28 am | आदूबाळ
जबरदस्त! लय भारी! अभिनंदन आणि शुभेच्छा.
22 May 2016 - 12:57 am | एस
एकच नंबर. कीप इट अप!
22 May 2016 - 7:01 am | भुमी
छानच, अभिनंदन...
22 May 2016 - 7:06 am | नाईकांचा बहिर्जी
तुफान आवडले हे लेखन अन साहस! पुढील रपेटीला शुभेच्छा
22 May 2016 - 8:44 am | इशा१२३
तुमच्या जिद्दीला सलाम!
22 May 2016 - 10:37 am | यशोधरा
मस्त! अभिनंदन!
22 May 2016 - 10:46 am | प्रशांत
अभिनंदन आणि शुभेच्छा.
22 May 2016 - 11:07 am | बोका-ए-आझम
जबरदस्त!
22 May 2016 - 12:42 pm | उगा काहितरीच
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .लेख चांगला लिहीलात हेवेसांनलगे .
22 May 2016 - 5:16 pm | मित्रहो
जबरदस्त
22 May 2016 - 6:21 pm | sagarpdy
सर्वांना धन्यवाद.
22 May 2016 - 6:50 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मी एक सल्ला देतो,असल्या हेवी सायकलींग ने गुढघ्याचे कार्टीलेज झिजते किंवा फाटते,या कार्टीलेजला कोणताचे रक्तपुरवठा होत नसतो त्यामुळे रिपेरींगचे चान्सेस शुन्य असतात.
तरुणपणात घेतलेली अशी रिस्क उतारवयात त्रासदायक होऊ शकते,
बाकी प्रयत्न छान होता.व यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन.
22 May 2016 - 9:34 pm | टवाळ कार्टा
तुम्च्यामुळे इकडच्या एका प्रसिध्ध आयडीची आठवण आली :)
23 May 2016 - 9:48 am | आनन्दा
डुआयडी कळला ही सांगण्याची पद्धत आवडली.
23 May 2016 - 11:26 am | पक्षी
काही नाही होत. बिनधास्त रिस्क घ्या, होऊ दे खर्च.
22 May 2016 - 8:16 pm | सविता००१
मस्तच
22 May 2016 - 8:18 pm | सिरुसेरि
जबरदस्त प्रवास . अभिनंदन .
22 May 2016 - 9:27 pm | पिंगू
लय भारी रे सागर.. अभिनंदन...
23 May 2016 - 12:00 am | बाबा योगिराज
सागर भौ,
अभिनंदन. 300 चा पल्ला गाठण्यासाठी शुभेच्छा.
23 May 2016 - 2:43 am | केदार
गुडघा दुखन्याचे कारण म्हणजे सायकलच्या सीटची उंची योग्य नाही.
वर कोणीतरी म्हणाले आहे की, सायकलिंग मुळे उतारवयात गुडघेदुखी होते. ते तेव्हढे खरे नाही. जर योग्य मेजरमेंट घेऊन सीटची उंची ठेवली तर गुडघे व इतर अवयव दुखायचे काहीही कारण नाही.
इथे जाऊन ते जी मापं विचारत आहेत ती सर्व टाकल्यावर किती उंची ठेवायचे ते मिळेल. त्याप्रमाने सीट अॅडजस्ट करावी लागेल.
पुढच्या ब्रेव्हेसाठी शुभेच्छा. आणि सायकलिंग डिस्टन्स सोबतच कोअर फिटनेस वाढवण्याकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणजे इतर दुखने उदा खूप सायकल चालविल्यामुळे येणारी पाठदुखी वगैरे दुर होतील.
23 May 2016 - 6:59 am | sagarpdy
हो कल्पना आहे. बाईक फिट चेक करायच आहे.
24 May 2016 - 10:42 am | अप्पा जोगळेकर
सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सायकलच्या सीटवर बसावे आणि एक हात भिंतीला टेकवून सायकल भिंतीला समांतर व जमिनीला पर्पेन्डिक्युलर ठेवावी.
टाच पायडलच्या मागच्या कडेला चिकटून यावी आणि गुडघा ताठ असावा. गुडघा वाकत असेल तर सीट वर करा. पाय पोचत नसेल तर सीट खाली करा. हे सर्व अनवाणी करावे.
प्रत्यक्ष सायकल चालवताना पायात बूट असतात आणि टाच पायडलच्या थोडीशी मागे येते.
बाकी, सागर पाध्ये यांचे खूप अभिनंदन.
24 May 2016 - 10:52 am | अप्पा जोगळेकर
जे पायडल खाली आहे तो गुडघा ताठ असावा व पायडल क्रँक जमिनीला समांतर असावा. तो पायडलचा असा बिंदू असावा ज्याच्या खाली पायडल जाऊ शकत नाही.
23 May 2016 - 6:10 am | रेवती
बापरे!
हे सोपं नाही.
तरी तुम्ही स्पर्धा पूर्ण केलीत ते बरं झालं.
23 May 2016 - 6:53 am | संजय पाटिल
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
23 May 2016 - 8:34 am | नाखु
आणि शुभेच्छा !
मोदक एक दादा(सायकलींग्मध्येही) माणूस आहे हे पुन्हा सिद्द झाले.
23 May 2016 - 9:48 am | आनन्दा
अभिनंदन. हॅट्स ऑफ.
23 May 2016 - 9:54 am | चतुरंग
मनापासून अभिनंदन!
23 May 2016 - 10:26 am | श्रीरंगपंत
सागर भाऊ हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या उपक्रमास शुभेच्छा!
23 May 2016 - 10:44 am | केडी
पुढच्या BRM साठी शुभेच्छा!
23 May 2016 - 10:50 am | अन्या दातार
शाब्बास रे गड्या.
23 May 2016 - 12:04 pm | असंका
जबरदस्त!!
अभिनंदन!!
लेखही अगदी सुंदर झालेला आहे!
त्याबद्दल धन्यवाद!
23 May 2016 - 12:24 pm | ब़जरबट्टू
मस्त रे.. शाब्बास..
23 May 2016 - 12:27 pm | मोदक
झक्कास रे..!!!
BRM पूर्ण करशील ते माहिती होतेच. म्हणून किती वाजता संपवलीस असे विचारले होते. :)
पुढच्या आव्हानांना शुभेच्छा..!!!
23 May 2016 - 12:56 pm | sagarpdy
:)
23 May 2016 - 12:42 pm | हृषिकेश पांडकर
मस्तच ...अभिनंदन :)
23 May 2016 - 1:16 pm | नाईकांचा बहिर्जी
एक शंका,
ह्या असल्या भारी सायकलिंग करीता आपल्या एतद्देशीय सायकली कुचकामी असतात काय? म्हणजे वजन आराम राइड क्वालिटी साठी एवन हर्क्यूलिस हीरो ऍटलस ची मॉडेल ननाहीत का वैल्यू फॉर मनी! भारी सायकली मधे फायरफॉक्स हे नाव सुद्धा ऐकले होते
ह्या बद्दल तज्ञ मंडळी काही सांगू शकल्यास सरस ठरेल.
23 May 2016 - 2:59 pm | sagarpdy
नाव माहित नाही, पण या BRM मध्येच एक महाशय विदाउट गिअर सायकल घेऊन आले होते. बुंगाट निघून गेले पुढे. पूर्ण नक्कीच केली असेल.
मध्यंतरी ३०० किमी पण विदाउट गिअर सायकने पूर्ण केलेली ऐकली आहे.
अर्थात फार चांगला फिटनेस पाहिजे गिअरशिवाय घाट चढवायला.
23 May 2016 - 1:21 pm | अभ्या..
भारीच रे सागर. शुभेच्छा.
स्टामिना आणि फिटनेसवाल्या गोष्टी करणार्या मानसाबद्दल आपल्या मनात लै आदर है.
23 May 2016 - 2:16 pm | स्पा
बाबोव २०० किमी
अरे काय खाऊ आहे काय
__/\__
23 May 2016 - 5:21 pm | पिशी अबोली
मस्त!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
24 May 2016 - 8:51 am | limbutimbu
छान लिहिले आहे. :) बीआरएम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन व शाबासकी...
>>>>> इतक्यात एका स्वयंसेवकाने हाक मारून, उजेड दाखवून कंट्रोल तिथे असल्याचे सांगितले. कंट्रोल सापडला. <<<
या कंट्रोलला मी देखिल होतो स्वयंसेवक म्हणून.
24 May 2016 - 9:35 am | sagarpdy
धन्स!