मी अनुभवलेले एव्हरेस्ट ...

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in भटकंती
20 May 2016 - 11:54 am

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिमेला असलेले महत्वाचे राज्य आहे.महाराष्ट्र आणि कोकण यांच्या मध्ये संपूर्ण सह्याद्रीची रांग पसरलेली आहे.महाराष्ट्रात कळसुबाई हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ५४०० फुट इतकी आहे.महाराष्ट्राला ७०० कि.मी चा समुद्र किनारा लाभला आहे.

पांडकर ...धडा वाचणे चालू असताना आपले लक्ष कुठे आहे...न वाचता सांग बरं... कळसुबाई शिखराची उंची किती आहे ते ?...
परवाच्या रविवारी हाच २० वर्षापूर्वीचा भूगोलाचा तास डोळ्यासमोरून तरळून गेला...मात्र त्या प्रसंग नंतर मी कळसुबाई ची उंची कधीच विसरलो नव्हतो.कारण त्या उंचीचे एक अप्रूप वाटायचे.

प्रसंग सांगण्याच्या मागे पर्वाचा रविवारच कारणीभूत आहे.काही प्रसंग किव्वा व्यक्ती अश्या प्रकारे समोर येतात कि त्या क्षणापासून ती व्यक्ती किव्वा तो प्रसंग विसरणे हे केवळ अशक्य होऊन जाते.त्या दिवसाची पण हीच गत.साधारण सकाळी ११ च्या सुमारास मी आणि माझा मित्र आमच्या एका मित्रकडे गेलो होतो.रविवारची सकाळ होती.आमचा मित्र घरीच होता.आणि त्याच्याकडे त्याचा एक मित्र आधीपासून येऊन बसलेला होता.त्यानी आमची एकमेकांना ओळख करून दिली.आम्ही गप्पा मारत बसलो.
खरे तर गप्पा मारत बसलो हे म्हणणे चुकीचे आहे कारण जे संभाषण चालू होते ते एक मार्गी होते.इथे फक्त तो बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो.या मुलाचा थोडक्यात तुम्हाला परिचय देतो.हा मुलगा मागच्या महिन्यात एव्हरेस्ट शिखर सर करून आला होता.आणि बोलता बोलता त्याने त्याचे अनुभव कथन करणे सुरु केले होते.
मी सहज त्याला म्हणालो कि " अरे असे मधूनच एखादा अनुभव सांगण्यापेक्षा पहिल्या पासून सगळा सांग ना...म्हणजे सगळे संदर्भ व्यवस्थित लागतील.अर्थात तुला तेवढा वेळ असेल तर.." माझा परीक्षेत पहिला नंबर आला" हे आपल्या आई बाबांना सांगताना जेवढा आनंद आणि उत्सुकता लहान मुलाच्या चेहेर्यावर असते तेवढीच उत्सुकता त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती..त्याने हसूनच संमती दिली..आणि त्याने आमचा ताबा घेतला....
मोहिमेच्या पैशाची तजवीज,त्यासाठी केलेली धावपळ,लोकांनी केलेली मदत,घरच्यांच्या भावना,शारीरिक आणि मानसिक तयारी या गोष्टी ऐकताना एक वेगळेच कुतूहल निर्माण झाले होते.मी मन लाऊन ऐकत होतो.हे सगळे सांगत असताना एक विचार मनात डोकावून गेला कि यांनी एवढे पैसे उभे केले आणि शिवाय जीवावर उदार होऊन मोहीम आखली ते फक्त एव्हरेस्ट सर करण्यासाठी ? इतके काय असू शकते त्या शिखरात ? पण तूर्तास हा प्रश्न बाजूला ठेऊन मी ऐकत होतो.
मोहिमेला सुरुवात झाली तीच मुळात पुणे स्टेशन वरून.या वेळी त्यांच्यापेक्षाही त्यांच्या पालकांची मित्रांची आणि नातेवाईकांची मनस्थिती काय असू शकेल याचा अंदाज लावणे मला त्या वेळी कठीण जात होते.कदाचित तुम्हाला पण अंदाज लावणे अशक्यच आहे.या नंतर त्याने पुढे सांगायला सुरुवात केली आणि तो थेट दिल्लीला येऊन पोहोचला.आणि जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज मिळतो जो आपल्याला शिखरावर नेण्यासाठी दिलेला असतो आणि हाच राष्ट्रध्वज शिखरावर फडकतो हे त्याने सांगितले तेव्हा अंगावरच्या शहर्याला जाग आली.आपल्या देशाचा झेंडा जगाच्या सर्वोच शिखरावर घेऊन जाणे आणि फडकावणे या सारखा मोठा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येणे शक्य नसते.
आता खर्या अर्थाने एव्हरेस्ट कडे निघायची वेळ आली होती.दिल्ली वरून काठमांडू आणि काठमांडू वरून 'लुक्ला' असा विमान प्रवास पार करून एव्हरेस्ट च्या कुशीत पोहोचलो.असे तो म्हणाला पण खरे तर आम्ही देखील तेथे पोहोचलो होतो.या नंतर चालत एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत जावे लागते.
हे ऐकायच्या आधी एव्हरेस्ट बेस कॅम्प म्हणजे माझा असा समज होता कि मस्त छोटेसे वसलेले गाव असेल.छोट्या छोट्या बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत ते गाव असेल.कश्मीरी तरुण्या दिसू शकतील.आणि मान वर करून पहिले कि एव्हरेस्ट दिसत असेल.हो असेच काहीसे चित्र एव्हरेस्ट बेस कॅम्प बद्दल चे माझ्या डोळ्यापुढे होते.मात्र प्रत्यक्षात यातील एकही गोष्ट इथे नव्हती.म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प हा संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे.आणि त्यातल्या त्यात सपाट जागेवर आपला तंबू लावणे आणि आपला कॅम्प उभा करणे हीच मुळात बेस कॅम्प ची कल्पना आहे.आता हे ऐकल्यावर माझ्या मित्रांनी त्याला विचारले कि "जागा शोधणे म्हणजे काय..तिथे जागा नसते का ?"..या वर तो म्हणाला कि जागा असते पण जो बर्फ जमा झालेला असतो ती आधी एक नदी असते आणि ती नदी गोठून जो पृष्ठभाग तयार होतो त्यावर आपला कॅम्प लावायचा असतो.मात्र कदाचित काही वेळेस तो पृष्ठभाग इतका बारीक असतो कि त्यावर पाय दिला तर संपूर्ण बर्फ खाली जाण्याची शक्यता असते.तंबू लावणे तर दूरच...." यावर आम्ही फक्त एक उसासा टाकला आणि पुढे ऐकू लागलो.

EBC

त्यानंतर अगदी खर्या चढाईच्या आधी मोहिमेतील सर्वांनी मिळून तिथे शिवरायांच्या पुतळा उभा केला आणि मग चढाईला सुरुवात केली.किती अभिमानाचा क्षण असू शकतो.म्हणजे सुमारे १७६०० फुटांवर शिवरायांचा पुतळा उभा करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन सर्वोच्च माथ्याकडे प्रस्थान करणे.या गोष्टी ऐकतानाच खूप रोमांचकारी वाटत होत्या.म्हणजे मी इथे बसून फक्त त्या वातावरणाचा अंदाज लावत होतो.शिवरायांचा ४ फुटी पुतळा, पाठीमागे दिसणारा अभेद्य सागरमाथा,ताज्या बर्फावर परावर्तीत झालेल्या सूर्यकिरणांनी न्हाऊन निघालेला संपूर्ण बेस कॅम्पचा प्रदेश आणि महाराजांच्या घोषणेने आलेला अभिमानाचा शहरा...मी फक्त २ घोट पाणी प्यायले आणि पुन्हा त्याच्याकडे पाहू लागलो.

गिर्यारोहकांनी बेस कॅम्प सोडल्यानंतर बेस कॅम्प ला कदाचित नासा चे स्वरूप येत असावे कारण,वायरलेस फोनचा सतत होणारा आवाज,विविध देशांच्या हवामानशाळेचे अंदाज वर्तवणारे फोन,गिर्यारोहकांच्या नातेवाईकांचे फोन,देशभरातील मिडियाचे बातम्या मिळवण्यासाठीचे फोन , एक वेगळाच माहोल तिथे बनत असावा असे त्याच्या बोलण्यावरून सतत जाणवत होते.
तो म्हणाला आता आमच्या दृष्टीने खरी चढाई सुरु झाली होती.आणि हे सांगताना तो देखील थोडा सावरून बसला.तो म्हणाला एव्हरेस्ट च्या मार्गावरील 'one of the toughest part ' म्हणजे 'खुंबू आईस फॉल' .त्यानंतर सुमारे अर्धातास आम्ही खुंबू मध्ये होतो.ऐकताना जाणवणारी भीषणता प्रत्यक्षात कुठल्या थराची असेल याची कल्पना न करणे यावर मी ठाम झालो.तो सांगत होता... 'खुंबू आईस फॉल' हा असा प्रदेश आहे कि नद्या गोठून एक बर्फाचा थर जमा होतो.आणि त्या थराच्या जाडीचा अंदाज आपल्याला पाय ठेवताना लावणे शक्य नसते त्यामुळे कदाचित पुढे टाकलेले पाऊल भसकन बर्फात जाऊन तो संपूर्ण बर्फाचा थर च्या थर काही हजार फुटांपर्यंत खाली कोसळू शकतो.किव्वा आपण चालत असताना वर असलेले बर्फाचे अर्धवट उरलेले मोठे थर कोसळण्याची सदैव असलेली भीती सोबतीला असते.मी मुद्दाम टांगती तलवार म्हणत नाहीये...याने कदाचित त्या बर्फाच्या थराला तलवार म्हणून कमी लेखण्यासारखे वाटले.

Khumbu Icefall

म्हणजे बर्फातून चालताना जिथे श्वास घेण्याइतपत ऑक्सिजन देखील नसतो अश्या ठिकाणी या भीतीची सोबत किती भयंकर असू शकेल.मी फक्त मागे ठेवलेली उशी पुढे घेतली...आणि 'खुंबू आईस फॉल' मध्ये परतलो. 'खुंबू आईस फॉल' हा एव्हरेस्ट च्या वाटेवरील 'Death Zone ' म्हणून ओळखला जातो..हे तो शेवटी म्हणाला...
दुभंगलेल्या बर्फामधून चालत असताना बर्फाची भेग पार करून जाण्यासाठी शिडी चा वापर करावा लागतो.दोन बर्फाच्या पृष्ठ्भागामध्ये तयार झालेली भेग काही हजार फुट खोल असू शकते.अश्या वेळी ती शिडी आडवी टाकून त्यावरून तो टप्पा पार करणे प्रचंड अवघड आणि एकाग्रतेचे काम असते.कदाचित यामुळेच डेथ झोन हे नाव खुंबू आईस हे नाव अतिशय सार्थ आणि समर्पक आहे...
अर्थात पाठीमागे दिसणारे शिखर या भीतीवर पांघरून घालत असावे.

Death Zone

एव्हरेस्ट चढणे म्हणजे एकदा सुरु केले कि एक मार्गी शिखरापर्यंत जाणे इतके सोपे नसते.कारण तुम्हाला प्रत्येक कॅम्प वरून पुन्हा बेस कॅम्प ला यायचे असते आणि मग पुढच्या कॅम्प वर जायचे असते.हे ऐकल्यावर मी माझा अतिशय बाळबोध प्रश्न केला..."अरे याची काय गरज आहे ?...ज्या कॅम्प वर पोहोचतो तिथे रहायला काय हरकत आहे ? यावर तो म्हणाला कि कॅम्प-२ च्या पुढे कोणत्याही कॅम्प वर राहायला परवानगी नाहीये .किव्वा रहाताच येत नाही.प्रत्येक पाउलागणिक वाढणारी अनिश्चितता आणि दडपण अनुभवाने हा थरारक अनुभव होता. हे त्याला आत्ता सांगायला काय जात होते म्हणा...
हे सगळे चालू असताना माझ्या मित्राने त्याला विचारले कि " हे सगळे चालू असते तेव्हा तुम्हाला रस्ता कसा सापडतो ?" यावर तो हसून म्हणाला कि आम्हाला रस्ता शोधायची गरज नसते कारण प्रत्येकाबरोबर एक शेरपा असतो.त्यामुळे रस्ता शोधणे वगरे प्रकार नसतो.कारण आधीपासूनच चढाईचा मार्ग ठरलेला आहे.कारण तो एकच मार्ग आहे.या वर आम्ही एकदा एकमेकांकडे पहिले पुढे ऐकायला सुरुवात केली.

khumbu

तो सांगत होता कि जेव्हा आम्ही चढत असतो तेव्हा एक 'common rope ' असते जिची दोन्ही टोकं फिक्स केलेली असतात.आणि त्या rope ला आपापले anchor लाऊन चालायचे असते.यावर माझा मित्र पुन्हा म्हणाला कि "अरे मग हे तसे सोपे आहे.म्हणजे त्या मुख्य rope ला आपले लूप लावायचे आणि त्या rope प्रमाणे चालायचे."यावर पुन्हा तो हसला आणि म्हणाला कि “हो ते ऐकायला मलाही सोपे वाटले असते.पण मजा अशी असते कि चालत असताना वेगाने वाहणाऱ्या वार्याच्या झोताबरोबर आपल्यासाहित आपल्या rope ला असलले ६/८ जितके लोक आहेत ते सगळे जण १५-२० फुटांवर उडून पडतात.म्हणजे वारा येतो.. rope वर असलेल्या सर्वांना उचलून २० फुटांवर फेकून देतो.मग आम्ही परत तिथून उठायचे,आपल्या मूळ मार्गावर येऊन पोहोचायचे आणि पुढे चालायला सुरुवात करायची.थोबाडीत मारल्यासारखे तोंड करून आम्ही पुढचे ऐकायला लागलो...तर असे पुढे टाकलेले पाऊल बर्फावर टिकेल कि नाही याची शाश्वती नसताना आणि वरून काही निसटून पडणार नाही याची स्वतःलाच खात्री पटवून देताना पुढे जाणारा तो आणि पर्यायाने आम्ही, कॅम्प एक वर येऊन पोहोचलो होतो....

Enroute Camp 1

कॅम्प १ ला पोहोचल्यावर पुन्हा बेस कॅम्प ला यावे लागते.वातावरणात वेगाने होणारा बदल हे याला प्रमुख कारण आहे असे समजले.पुन्हा बेस कॅम्प ला यायचे म्हणजे पुन्हा 'खुंबू आईस फॉल' पार करायचा आलाच.पण त्याला पर्याय नसतो.हे सांगत असताना मी पुन्हा एक प्रश्न विचारला कि "एवढी थंडी,कमी ऑक्सिजन, आणि एकाकीपण या गोष्टींवर मात करण्यासाठी तुम्ही काय करायचात" यावर तो शांतपणे म्हणाला कि मी शक्यतो वाचन करायचो किव्वा गाणी ऐकायचो.कारण मनात कायम चढाईचा विचार केला तर मानसिक दबाव वाढण्याची भीती असते.तेव्हा मला जाणीव झाली होती केवळ शारीरिक बळावर तुम्ही शिखर सर करू शकत नाही.. तर किंबहुना शारीरिक तयारी पेक्षा मानसिक तयारी जास्त महत्वाची आहे.अर्थात शारीरिक तयारी पण तितकीच महत्वाची असते हे मला नंतर समजले.काही किलोचा तो ड्रेस,ऑक्सिजन सिलिंडर,सामान भरलेली मोठी 'haver sack' असे सुमारे १५/२० किलोचे सामान वाहून न्यायची वेळ येते तेव्हा खरा शारीरिक कस लागतो.ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे शावासोछ्वासाला त्रास होतो.आणि त्यामुळे शरीरातील उर्जा झपाट्याने कमी होत असते.अश्या परिस्थितीत दर ३ पाऊलानंतर १५ सेकंद विश्रांती हे समीकरण ऐकून मी एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा ऐकू लागलो.एव्हाना आम्ही पुन्हा बेस कॅम्प ला येऊन पोहोचलो होतो....
कॅम्पवर पोहोचल्यावर त्याची विश्रांती जरी वेगळ्या पद्धतीची होती तरी मी मात्र प्रत्येक कॅम्प वर २ घोट पाणी पीत होतो..जेणेकरून अचंब्याने गोठलेला घसा आपल्या पुण्याच्या पाण्याने उबदार व्हावा ...

आता वेळ होती दुसर्या कॅम्पवर जाण्याची..हे सांगायच्या आधीच त्याने जाहीर केले कि हेलीकॉप्टर पोहोचू शकेल असा हा शेवटचा टप्पा आहे.इथून पुढे हेलीकॉप्टर जात नाही.आणि कॅम्प २ च्या वर समजा मृत्य झाला तर मृतदेह मिळण्याची शक्यता नगण्य असते...म्हणजे नसतेच..हा कॅम्प २ चा ट्रेलर ऐकून आम्ही बरे आणि आमचे पुणे त्याहून बरे. असा एक संकुचित विचार मनाला चाटून गेला.२१३०० फुटांवर कॅम्प २ आहे.अर्थात कॅम्प आहे म्हणजे तिथे जाऊन आपापले तंबू ठोकावे लागतात हा भाग वेगळा.पण ती एक सर्वसाधारणपणे ठरविली गेलेली जागा आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत असाल तर बघा...भुसभुशीत आणि कठीण बर्फ ओळखून त्यावर योग्यरीत्या आपले तंबू ठोकणे आणि त्यात राहणे...
त्यापेक्षा मी प्रभात रस्त्यावर २ 'Duplex Flats ' घेऊन राहीन ना.अर्थात त्या प्रभात रस्त्यावरून त्याने वर्णन केलेली सकाळ मला दिसली नसती हा मुद्दा वेगळा.कारण सकाळी ९ वाजता लक्ख सूर्यप्रकाशाने चकाकणारा प्रदेश डोळे वर करायची संधी देत नव्हता.पांढराशुभ्र ताजा बर्फ आणि त्यावर परावर्तीत होणारा लक्ख सूर्यप्रकाश हे दृश्य ऐकायला जरी प्रचंड विलोभनीय वाटत असले तरीही परावर्तीत होणारे किरण हे धोकादायक असतात.UV किरणांचा सर्वात जास्त त्रास होण्याचा धोका या वेळी सर्वात जास्त असतो.आणि या वेळी असणारी तापमानाची पातळी कमाल ४५C इतकी असते.( म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे तर मे महिन्यामधील जळगावातील दुपार ). या वरून तुम्ही साधारण अंदाज लाऊ शकता कि बर्फातील उकाडा काय लेव्हलचा असू शकतो.मात्र खरी गम्मत तर या पुढे होती कारण ९ वाजता असणारे ४५C तापमान ११.३० वाजेपर्यंत -४५C ला जाऊन पोहोचते.४५C te -४५C हा प्रवास सुमारे २.३० तासात पार पडतो.म्हणजे तो इतके देखील म्हणाला कि सकाळचे २ तास कपडे काढून बसण्याइतपत उकाडा असह्य होतो आणि एखादा ढग जरी सूर्यासमोर आला तरी तापमानात प्रकर्षाने घट होऊन थंडी वाजण्याइतपत तापमान घसरते.आपल्याला इथे बसून याचा अंदाज येणे शक्य नाहीये मात्र AC रूम मधून बाहेर उन्हात आल्यावर किव्वा उन्हातून लगेच AC खोलीत गेल्यावर आपल्याला जसे वाटते त्याच्या कित्येक पट जास्त विरोधाभास इथे घडत असावा.

Camp 2

एवढा सगळ्या दिव्यातून गेल्यावर पुन्हा बेस कॅम्प ला येणे हे आव्हान कायम होतेच.म्हणजे पुन्हा कॅम्प १, खुंबू आईस फॉल आणि मग बेस कॅम्प.आणि हे अडथळे पार करून आम्ही बेस कॅम्प ला उतरलो.
हे झाल्यावर मी त्याला सहज खाण्यापिण्याचे विचारले.कारण परदेशातल्या लोकांपैकी कोणाचा फोन आला तर माझी आई सर्वप्रथम "तिथे आत्ता किती वाजले आहेत हे विचारते", त्याप्रमाणे मी पण अतिशय सर्वसामान्य प्रश्न विचारून चर्चेला थोडा विसावा दिला.अर्थात त्याने दिलेल्या उत्तरावरून लक्षात आले कि त्या वातावरणातील 'जेवण' हा काही 'खाण्याचा' विषय नव्हता.कारण अतिप्रचंड कमी तापमानामुळे भूक अजिबात लागत नाही. त्यामुळे ज्यूस किव्वा energy drink या पेक्षा जास्त खाणे शक्य होत नाही.पण शरीराची प्रतिकार क्षमता आणि ताकद कायम ठेवण्यासाठी किमान नाश्ता करणे अत्यावश्यक असते.आणि भूक नसताना पोटात अन्न ढकलणे हा मोठा अडथळा होता.कारण त्याने हे सांगितले कि 'उद्या सकाळी नाश्ता पोटात ढकलणे आणि मग चालायला सुरुवात करणे यातील 'नाश्ता पोटात ढकलणे' याचे टेन्शन त्यांना जास्त होते.ऐकायलाच विचित्र वाटत होते.प्रत्यक्षतेची तर कल्पनाच नको.
आता पुन्हा नव्या तयारीने आम्ही तिसर्या कॅम्प च्या ओढीने सावरून बसलो.तो तर काय सांगू आणि काय नको या उत्साहात सांगत होता.चढाईचा उत्तरार्ध इथे खर्या अर्थाने सुरु होतो असे म्हणायला हरकत नाही.कॅम्प ३ वर बर्फ म्हणल्यावर डोळ्यासमोर जे येते त्यासारखा बर्फ इथे नसतो.म्हणजे खूप काळ साठलेला आणि प्रचंड कठीण झालेला निळसर रंगाचा बर्फ इथे असतो.ज्यावर चालणे अवघड असते.अर्थात पायात जरी खिळ्यांचे बूट असतील तरीही कठीण असते.शिवाय चढताना हातातील 'Ice Axe 'बर्फात घुसवून त्या आधाराने पुढे सरकणे भयंकर कष्टप्रद असावे.कारण बर्फाचा थर प्रचंड कठीण झालेला असतो.
आधी सांगितल्याप्रमाणे कॅम्प २ च्या पुढे हेलिकॉप्टर येऊ शकत नाही त्यामुळे वार्याचा वेग आणि हवामानाची क्रूर खेळी याचा किमान भौगोलिक अंदाज तुम्ही लाऊ शकता.तो सांगत होता, ताशी काही मैलाच्या वेगाने वाहणारे वारे चालताना इतके आव्हान निर्माण करतात कि वार्याच्या वेगापुढे पाऊल टाकणे देखील अशक्य आस्ते.यावर त्याने एक अनुभव सांगितला.तो आणि त्याचे दोन साथीदार आणि त्यांच्याबरोबर असलेला एक एक शेरपा असे सहाजण एका रेषेत चालत होते.आणि अशक्य वेगाने एक वार्याचा झोत आला तेव्हा आणि क्षणार्धात आम्ही सहाजण त्या दोरी सहित किमान १५ फुट लांब उडून पडलो...आणि मग वारा थांबल्यावर आम्ही पुन्हा उठून आमच्या मूळ मार्गावर आलो आणि पुन्हा चढाई सुरु केली.वार्याच्या झोताबरोबर १५ फुट उडणे हि क्रिया पचनी पडायलाच मला काहीसा वेळ गेला.म्हणजे एक तर चालताना लागणारा दम वेगळाच.त्यात १५ फुट फेकून दिल्यासारखे दूर कुठेतरी जाऊन पडायचे.परत तिथून उठून योग्य वाटेवर येऊन चढायला नव्यानी सुरुवात करायची.आणि त्यात समजा तुम्ही कुठल्या कड्यावरून चालत असाल तर काय ??...मरायचे ??...मी फार काही विचारायच्या फंदात न पडता ऐकणे चालू ठेवले..

Storm

तिसर्या कॅम्पची उंची २४,००० फुट इतकी आहे म्हणजे सुमारे २७०० फूट चढून तुम्हाला कॅम्प ३ वर यावे लागते.ऑक्सिजन चे कमी होणारे प्रमाण,सतत बदलणारे तापमान आणि बर्फाचे कडे कोसळण्याची वाढलेली शक्यता या गोष्टीना समर्थपणे तोंड देऊन चढायचे...हे वाचताना देखील कदाचित दमायला होऊ शकेल.मला ऐकताना झाले म्हणून सांगतोय.
तिसरा कॅम्प हेच मुळात एक आश्चर्य आहे, कारण हा ७५ अंशाचा चढ आहे आणि संपूर्ण बर्फ पसरलेला आहे.आणि या ठिकाणी मध्यभागी उतारावर तंबू ठोकावे लागतात.आता हा जो उतारावर असलेला बर्फ असतो तो खाच मारून अक्षरश: कापला जातो आणि त्या खाचेत तंबू ठोकावा लागतो. म्हणजे जी रात्र तेथे घालवावी लागते ती त्या उतारावर तयार केलेल्या खाचेत काढावी लागते.आता या कल्पनेनेच झोप येणे हि दूरची गोष्ट आहे.यानंतर तो म्हणाला कि मी जेव्हा सकाळी माझ्या तंबूतून बाहेर डोकावले तेव्हा उजव्या हाताला थेट अडीच हजार फुट खाली लावलेला दुसरा कॅम्प दिसत होता.आता हे दृश्य किती विलोभनीय असू शकेल.म्हणजे आपण स्वतः २४००० फुटांवर बसलेले आहोत.चहुबाजूला बर्फ पसरलेला आहे.समोर एव्हरेस्ट आणि मागे खोल दिसत असलेला कॅम्प २....

View From Camp 3

एव्हाना माझी अशी कल्पना झाली होती कि त्या ठिकाणी या ६/८ लोकांखेरीज कोणी नसेल.आणि मी विचारले कि "रात्रीचा अंधार आणि एकांत याची तुम्हाला भीती वाटली नाही का ?" या वर तो थोडेसे हसून म्हणाला कि, "शरीराची शक्ती टिकवणे,शिखराची असलेली ओढ आणि विचार करण्याची मेलेली इच्छा या गोष्टींपुढे भीती आणि एकाकीपणा फार दुय्यम ठरतात" आणि तो म्हणाला कि इथे एकच ग्रुप आहे असे कधीच होत नाही, कारण कॅम्प ३ वरून कॅम्प ४ ला जाण्याच्या वाटेत असलेली लोकांची गर्दी हि गणपती मिरवणुकीत असलेल्या लक्ष्मी रोड ची गर्दी झक मारेल अशी असते.यावर अचंबित होणे या पलीकडे कुठलेही expression माझ्याकडे उरलेले नव्हते.कारण अश्या आडवळणी वाटेवर पण इतकी गर्दी असू शकते हे मला पहिल्यांदाच समजले होते.

आता आम्ही एव्हाना तिसरा कॅम्प सोडला होता.कॅम्प ३ ते कॅम्प ४ या टप्प्यात सुमारे २००० फूट एवढी उंची सर करावी लागते.चढत असताना समोरच्या व्यक्तीला 'overtake 'करणे हि अतिशय अवघड आणि जीवघेणी गोष्ट आहे.म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या पुढे जायचे असेल तर सर्वप्रथम स्वत:चा हूक दोरीतून काढायचा,समोरच्याच्या पुढे चालत जायचे आणि मग तो पुन्हा दोरीत अडकवायचा.या मधल्या काळात वार्याचा झोत जरी आला किव्वा काहीही झाले तरी जीवनाची दोर तुटायची.अश्या वेळी समोरचा समजा दम लागून थांबला असेल तर आपल्यालाही थांबावे लागते.आणि हे सर्वात कष्टप्रद काम असते.कारण थांबल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्याची शक्यता असते आणि चालण्याची लय जाते हा वेगळाच भाग असतो.
मी एक सहज विचार केला कि या स्थितीला त्यांची मानसिकता काय असू शकेल.कारण एवढ्या अवघड परिस्थितीत मानसिक आणि शारीरिक संतुलन ढळू न देता स्वतःला सावरायचं.भूक लागण्याचा तर संबंधाच नसतो.आणि अतीव थकवा असून देखील तापमानामुळे निद्रानाश झालेला असतो त्यामुळे झोपेचा तर आनंदच असतो.आणि पुरेशी झोप न मिळूनही दुसर्या दिवशी आपले मार्गक्रमण चालू ठेवणे अपरिहार्य असते.मात्र एव्हरेस्ट सर करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती हि एकचं जमेची बाजू बाकीच्या अडचणींवर सहज मात करीत असावी.

समुद्रसपाटीपासून २६००० फुट उंचीवर असलेला हा चौथा कॅम्प.ऑक्सिजन मास्क खेरीज वावरणे केवळ अशक्य.हवेचा अतिशय कमी दाब.त्यामुळे २/३ पाऊले टाकल्यावर छातीचा भाता होतो.वातावरणामुळे होणारी शरीराची प्रचंड झीज .भूक अजिबात लागत नसल्यामुळे उर्जा मिळण्याची शक्यता कमीच.अर्थात हाच निसर्गाचा नियम आहे.नियम पळून खेळलात तरच खेळण्यात अर्थ आहे.नाहीतर त्याला फाउल असे म्हणाले जाते.दुसर्या खेळातील फाउल मध्ये point जातो...इथे जीव...

Enroute Camp 4

कॅम्प ४ सर केल्यावर वेध लागतात ते 'सागरमाथ्याचे'.इथून पुढे त्याने सांगण्यास सुरुवात केली आणि आमची उत्सुकता देखील उत्तरार्धाकडे सरकली.

कॅम्प ४ सोडला तो मध्यरात्री.कारण शक्यतो शेवटची चढाई मध्यरात्रीत केली जाते.कारण दुपारी १२ नंतर हवामान झपाट्याने बदलते आणि बर्फाचे वादळ किव्वा avalaunch या सारख्या गोष्टी किव्वा बर्फाचे कडे कोसळून रस्ते block होणे या सारख्या गोष्टी घडतात.या गोष्टी टाळण्यासाठी पुढचा प्रवास हा मध्यरात्री पासून सुरु केला जातो.अर्थात हा अनुभवातून आलेला अंदाज आहे.पण अंदाज आणि खात्री यातील फरक निसर्ग आपापल्या परीने स्पष्ट करत असतोच.पण मुद्दामून आगीत उडी मारण्यात काय अर्थ आहे.

त्याने चौथा कॅम्प सोडला, आणि तो 'south col' पर्यंत पोहोचला.अर्थात तो जेव्हा सर्वप्रथम 'south col' असे म्हणाला तेव्हा मला 'south col' म्हणजे काय हे माहित असायचे कारणाच नव्हते.तेव्हा त्याने त्याचे स्पष्टीकरण दिले कि..'south col' हि अशी जागा आहे कि एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखर यांच्या दरम्यान असलेल्या रांगेचा सर्वात कमी उंचीचा बिंदू.म्हणजे दोन शिखरांचा मध्ये जो 'V' आकार तयार होतो तर त्या 'V' चा सर्वात खालचा भाग म्हणजेच 'South col'...शंका निरसन झाल्याने मी समाधानाचा आणि चहाचा घोट घेतला आणि 'south col' वरून चालायला सुरुवात केली.

South Cole

'South Col' सोडल्यानंतर साधारण ९००/१००० फुटांवर 'एव्हरेस्ट बाल्कनी' नावाची एक जागा आहे.अर्थात आपल्या डोक्यात बाल्कनी ची कल्पना आहे .तशीच काहीसे इथे पण आहे.म्हणजे गिर्यारोहकांना विश्रांती घेण्यासाठी असलेली हि जागा.म्हणजे छोटेसे पठार आहे.जेथे उभे राहून तुम्हाला संपूर्ण भोवतालचा परिसर पाहता येतो.अर्थात हि बांधलेली जागा नसून हि निर्माण झालेली जागा आहे.बाल्कनी मधून दिसणाऱ्या तिबेट चे वर्णन ऐकताना क्षणभर पायाखाली बर्फ लागतोय कि काय असा भास होऊन मी बावळटासारखे पायाकडे पहिले.या बाल्कनी पासून शिखर १२०० फुटावर आहे.बाल्कनी मध्ये सर्वप्रथम ऑक्सिजन सिलिंडर बदलला जातो.

View of Tibet From Everest Balcony

'एव्हरेस्ट बाल्कनी' मध्ये काहीसा विसावा घेऊन आम्ही आमचे ऐकणे पुढे चालू ठेवले.भले तिकडे बर्फ पडत असेल पण आम्ही बसलेल्या खोलीत येणारा उन्हाचा कवडसा थंडगार एव्हरेस्ट सफरीवर उबदार पांघरून घालत होता.आम्ही बाल्कनी मधून चालायला सुरुवात केली.

Leaving Everest Balcony

'एव्हरेस्ट बाल्कनी' सोडल्यानंतर सर्वप्रथम जी चढाई असते त्याला 'साउथ समिट' असे म्हटले जाते.शेवटच्या चढाईचा मध्य असावा कदाचित.ज्याच्या नावातच 'समिट' हा शब्द आहे तिथून खरे समिट लांब नसेल असा निरागस आणि मोघम अंदाज लावून मी 'साउथ समिट' ऐकत होतो.या भागातून चालताना दगडाचा भाग जास्त असतो.म्हणजे समजा वार्याच्या अतिवेगामुळे ताजा आणि भुसभुशीत बर्फ उडून गेला असेल तर.या 'साउथ समिट' वरून चालत असताना उजव्या हाताला सुमारे ५००० फुटाची दरी आहे जी थेट तिबेट मध्ये उतरते आणि डाव्या बाजूला उंच कडा आहे.आणि या दोघांमधून ३० अंशाच्या कोनात चढाई करणे क्रमप्राप्त असते.हे सांगत असताना मी ३० अंश, ५००० फुट याचा गणिती हिशोब लावून आश्चर्य व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत होतो.

आणि हे चालू असताना माझा मित्र आश्चर्याने म्हणाला कि 'अरे हे कसे शक्य आहे ?...काही काय '..यावर तो त्याला म्हणाला कि 'अरे हो..वाटल्यास एकदा जावून पाहून ये'....या वाक्यानंतर मात्र माझी एकाग्रता आणि आमची शांतता भंग पावली...'एकदा जावून पाहून ये '...या म्हणण्यावर आम्ही काय बोलणार होतो.हे म्हणजे ४ फुटी स्विमिंग पूल मध्ये टायर लावून पोहत असलेल्या एखाद्या मुलाला अरे 'इंग्लिश खाडी एकदा पोहून बघ...किती छान वाटते ते' असे म्हणण्यासारखे होते.अर्थात यावर त्यालाही हसू आले...या वेळात उरलेला चहा आणि ताटली मधील २ उरलेली बिस्कीट संपवून हात झटकून आम्ही पुन्हा 'साउथ समिट' वर येऊन पोहोचलो.

South Summit

'साउथ समिट' हा टप्पा पार केल्यानंतर पुढची चढाई असते ती 'हिलरी स्टेप' कडे जाण्याची. या मधल्या वाटेचे वर्णन करीत असताना त्या वाटेचा अवघडपणा त्याच्या प्रत्येक शब्दातून बाहेर पडत होता.अतिशय निमुळती वाट म्हणजे बरोब्बर एका माणसाचे एक पाऊल फक्त कसेबसे बसू शकेल इतका निमुळता हा रस्ता ज्याच्या दोन्ही बाजूंना खोल दरी आहे.दरी मंजे एक बाजू सुमारे १०००० फुट खाली नेपाल मध्ये उतरते आणि दुसरू बाजू ८००० फुट खाली तिबेट मध्ये उतरते.अश्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे किती भयावह असू शकेल याचा अंदाज न लावणे इष्ट.म्हणजे समोर दिसत असलेली 'हिलरी स्टेप' जितकी प्रसिद्ध आहे तितकाच हा 'साउथ समिट' ते 'हिलरी स्टेप' हा प्रवास कुप्रसिद्ध असू शकेल असे म्हणायला हरकत नाही.

Hillary Step

'हिलरी स्टेप' म्हणजे एव्हरेस्ट या विषयाबद्दल मला माहित असलेला दुसरा शब्द.कारण एव्हरेस्ट सर्वप्रथम कोणी सर केले ? '' या प्रश्नांचे इयत्ता ३री मध्ये असताना वाचलेले म्हणजे 'एडमंड हिलरी आणि 'तेनसिंग नोर्गे'.तर त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली हि हिलरी स्टेप.याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी त्याला या स्टेप बद्दल विचारले असता त्याने सांगायला सुरुवात केली.हिलरी स्टेप हि खरच एक पायरी आहे.मात्र त्याची उंची साधारण ४० फूट इतकी असून संपूर्ण कातळ खडक आहे .साधारण 'साउथ समिट' आणि एव्हरेस्ट माथा यांच्या मध्ये हि हिलरी स्टेप आहे.
हि स्टेप चढताना आलेला अनुभव सांगताना तो म्हणाला कि, हिलरी स्टेप चढताना ३ टप्प्यात चढायची असते म्हणजे सर्वप्रथम डावा पाय रोवायचा त्यावर भार देऊन उजवा पाय वर ठेवायचा आणि मग लगेच उजव्या यावर भार देऊन डावा पाय थेट वर ठेवायचा.एवढ्या तीन छोट्या टप्प्यात हिअरी स्टेप चढली जाते.आता इतकी छोटी आणि सोपी गोष्ट असूनही हि हिलरी स्टेप इतकी प्रसिद्ध कशी ? या माझ्या प्रश्नावर त्याने दिलेले उत्तर प्रचंड आश्चर्यकारक होते.

Hillary Step 2

तो म्हणाला कि...हिलरी स्टेप समुद्रसपाटीपासून सुमारे २८८४० फुट उंचीवर आहे,त्यामुळे ऑक्सिजन चे प्रमाण अतिशय नगण्य असते.गिर्यारोहकाच्या शरीराची त्यावेळेची परिस्थिती इतकी बिकट असते कि थोडासाही जोर देऊन पुढे जाणे हे केवळ अशक्य असते.आणि या करणा मुळेच हिलरी स्टेप चढत असताना १/२ प्रयत्नांत तुम्हाला ती पार करता आली नाही तर तुमच्यात इतकी ताकदच शिल्लक रहात नाही कि तुम्ही ती चढून पुढे जाऊ शकाल.काही गिर्यारोहक तिथूनच परत आले आहेत.हे ऐकून परत आलेल्या लोकांच्या दुखाची पातळी काय असू शकेल याचा अंदाज लावत मी हिलरी स्टेप पार केली.

Completing Hillary Step

हिलरी स्टेप हा एव्हरेस्ट च्या मार्गातील शेवटचा अडथला मानला जातो.आणि आता चढाई असते ती माथ्याची.....
आता फक्त ३०० फुटांवर शिखर आलेले असते, अतिशय सावध गतीने पुढची चढाई करावी लागते, शरीर प्रचंड थकलेले असते, झोपेच्या अभावामुळे शरीरातील त्राण नाहीसे झालेले असतात.मात्र काही फुटांवर आलेले स्वप्न पूर्ण होणार असते.तो देखील आता सागरमाथ्याच्या समीप येऊन पोहोचला होता.आणि आमची उत्सुकता अजिबात ताणून न धरता त्याने एव्हरेस्ट सर केले....
अक्षरशः अंगावर काटे उभे राहिले.आणि त्या क्षणी नकळत पुढचा प्रश्न माझ्या तोंडी होता कि 'तुझी पहिली भावना काय होती ?'
त्याला हा प्रश्न अनेकांनी विचारला असेल, पण एवढं सगळं सांगून झाल्यावर ह्या प्रश्नाचं उत्तर देतानाचा त्याचा उत्साह कमालीचा वेगळा होता.त्याने सांगायला सुरुवात केली.तो म्हणाला "मी साधारण सकाळी ९.३० - १० च्या सुमारास शिखर सर केले,आनंद तर साहजिकच होता,पण व्यक्त करायची अजिबात ताकद नव्हती.शिखराला नमस्कार केला...तिरंग्या समवेत एक फोटो काढला आणि केवळ १५ मिनिटे थांबून परतीचा आरंभ केला"...एका श्वासात २ वर्षाचा प्रवास त्याने संपवला होता...

एव्हरेस्ट माथ्यावरून काय दिसत असेल आणि कसे...या वर त्याने घेतलेला क्षणभर वेळ माझ्या प्रश्नाचे निम्मे उत्तर देऊन गेला होता.५ मजली इमारतीच्या गच्ची मध्ये उभे राहून खालचे बघणारे आम्ही किव्वा १०० मजली 'Eiffel Tower ' वरून खालचे paris बघणारे लोक या सर्वांच्या कित्त्येक पट पुढे गेलेला तो म्हणाला कि सुर्यकीरणांनी हिर्यासारखा चकाकणारा संपूर्ण बर्फाळ प्रदेश.नजरेच्या खालच्या बाजूस उतरलेले ढग.बोट दाखवून अंदाज व्यक्त करता येईल असे नेपाळ आणि तिबेट.... आणि पृथ्वीचा आकार गोल आहे..ह्या भौगोलिक वाक्याचे याची देही याची डोळा असे घडलेले दर्शन.कारण शिखरावरून क्षितिजा कडे बघितले असता पृथ्वी गोल आहे याची खात्री पटते.

First View from Everest

एव्हरेस्ट सर करायचे स्वप्न पूर्ण झाले होते.मोहिमेसाठी केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी फळास आली होती.गिर्यारोहणाचा परमोच्च बिंदू असलेले एव्हरेस्ट शिखर सर झाले होते.आणि जगातील सर्वात उंच ठिकाणी पोहोचल्याचा आनंद होताच."शिखरावर पहिले पाऊल टाकले तेव्हाचा अनुभव कसा होता ?"..या प्रश्नावर त्याने उत्तर दिले कि "एव्हरेस्ट शिखरावर पाय ठेवण्याची परवानगी नाहीये,एव्हरेस्ट माथ्याला देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्यामुळे पाय ठेवण्याचा प्रश्नच येत नाही,आपण फक्त फुलं वाहायची आणि बुद्ध लोकांच्या प्रार्थनीय असलेल्या पताका वाहायच्या आणि वंदन करून नतमस्तक व्हायचे "...

The Summit

" येथे कर माझे जुळती " अशी काहीशी मनस्थिती माझी झाली होती.खरच निसर्गासमोर नतमस्तक होणे या खेरीज पर्याय नसतो हेच खरे.
इथे काहीशी शांतता पसरली होती,आपल्यासाठी एव्हरेस्ट वर पोहोचलो आणि मोहीम फत्ते झाली अशी ती भावना होती,मात्र त्याच्या म्हणण्यानुसार जो पर्यंत बेस कॅम्प ला सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत मोहिमेची यशस्वी सांगता झालेली नसते.आणि एव्हरेस्ट मोहिमेत जे मृत्यू होतात यातील ९०% मृत्यू हे उतरताना होतात.त्यामुळे चढण्याचा आनंद फार क्षणभंगुर ठरतो.कारण आता आव्हान असते उतरणीचे.

उतरताना महत्वाचा भाग असा असतो कि चढताना इतका वेळ असलेली शिखर सर करण्याची इच्छाशक्ती आणि स्फूर्ती आपल्याला शिखरावर पोहोचवते.पण एकदा ते शिखर सर झाले कि इतका वेळ तग धरलेले आपले शरीर जणू गलितगात्र झाल्याचे संकेत देऊ लागतात.इतका वेळ चढताना आपल्या मनात आणि शरीरात 'मला शिखर सर करायचे आहे' या खेरीज कुठलाच विचार येत नाही.पण एकदा ते काम पूर्णत्वाला मिळाले कि इतका वेळ मिळत असलेले हे 'Motivation' क्षणार्धात कोसळून पडते आणि खाली उतरण्याची जबाबदारी थेट शरीराच्या जोरावर येऊन पडते.आणि 'जा ..आता अंगात खरच दम असेल तर खाली उतर' अशा अविर्भावात एव्हरेस्ट आपल्याला खुणावत असते.मात्र इतक्या कमी दाबातून पुन्हा उतरत खाली यायचे हे आव्हान पेलणे देखील प्रचंड अवघड काम असते.हे त्याच्या प्रत्येक वर्णानातून जाणवत होते.त्याचा हा उतरायला निघाण्यापुर्वीचा अनुभव ऐकून 'अरे असा देखील होऊ शकते' असा विचार देखील मनात आला नाही.पण इतर लोक जेव्हा त्याला शिखर प्राप्तीच्या आनंदाविषयी विचारतात तेव्हा "खूप छान वाटले ,डोळ्यात पाणी आले,भारावून गेलो" या भावना येण्या आधी 'आता उतरायचे आहे' याची जाणीव नक्की होत असेल यात शंका नाही..

शिखरावर फार काळ थांबता येत नाही कारण हवामान बदलण्याची शक्यता असते.त्यामुळे उतरणीचा प्रवास लगेच सुरु होतो.पुन्हा 'हिलरी स्टेप,पुन्हा 'साउथ समिट',पुन्हा 'south col',पुन्हा बाल्कनी,पुन्हा कॅम्प ४ ,३ ,२ ,१ ,पुन्हा 'खुंबू आईस फॉल'. ज्या सावधतेने चढाई केलेली असते तेवढीच किव्वा त्यापेक्षा जास्त सावधता उतरताना बाळगावी लागते.

Toughest Journey - Stepping Down

आता आम्ही बेस कॅम्पवर आलो होतो.मोहीम यशस्वी झाली होती.दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम फत्ते झाली होती होती.बेस कॅम्प वरील आनंदाला तर सीमाच उरली नसेल.इतका वेळ फक्त वायरलेस फोन वरून संपर्क साधणारे गिर्यारोहक सहीसलामत बेस वर येऊन पोहोचले होते.पुन्हा बेस कॅम्प ला आल्यावर तोच शिवरायांचा पुतळा पाहून कुठल्या लेव्हल चा अभिमान वाटला असेल हे लिखाणातून व्यक्त करणे अवघड आहे.इतके दिवस जीव मुठीत धरून बसलेले आई वडील,नातेवाईक आणि मित्र मंडळींची परिस्थिती वर्णन करणे देखील अशक्यच.
खरंच... निसर्गाच्या लहरीपणासमोर आपण अतिशय हतबल असतो.एव्हरेस्ट पादाक्रांत करणे हे विधान कदाचित उद्धट असू शकेल.कारण निसर्गावर विजय मिळवायचा नसतोच.त्याचा फक्त आनंद घ्यायचा असतो.
त्याची एव्हरेस्ट मोहीम यशस्वी झालीच...आणि माझे कान तृप्त झाले...
आता निघायची वेळ आली होती...मी त्याला सर्वप्रथम अभिनंदन केले...या गोष्टी सगळ्यांनाच जमत नाहीत..आणि ज्यांना जमतात ती लोकं खरच अभिनंदनीयच असतात...आणि नशीबवान देखील ..
इतके काय असू शकते त्या शिखरात ?...या सुरुवातीच्या प्रश्नाला मला आता व्यवस्थित उत्तर मिळाले होते...एव्हरेस्टची उंची कायमचीच स्मरणात कोरली गेली होती...

Oxygen Mask ...Jacket..आणि goggle उतरवून मी मित्राच्या घराबाहेर पडलो...

_/\_

समाप्त ...

विशेष आभार : चेतन केतकर ( Everest Summit ‘12 )

- हृषिकेश पांडकर

प्रतिक्रिया

रातराणी's picture

20 May 2016 - 12:13 pm | रातराणी

कहर! हॅट्स ऑफ! अतिशय आवडला लेख!

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:04 am | हृषिकेश पांडकर

धन्यवाद :)

बेकार तरुण's picture

20 May 2016 - 12:18 pm | बेकार तरुण

कमाल !!!
आवडलेला आहे लेख !
चेतन केतकर आणी टीमचे मनापासुन अभिनंदन आणि तुमचे अनेक आभार.

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:04 am | हृषिकेश पांडकर

धन्यवाद :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2016 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवळ अद्भुत सफर. मजा आली. छान वर्णन. सुंदर छायाचित्र.
आजच आमच्या औरंगाबादच्या पोलीस असलेल्या रफीक शेख याने दोन वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे त्याची मोहीम अर्धवट राहिली होती. काल अखेर त्याने तिस-या प्रयत्नात एव्हरेष्ट सर केले. त्याचं अभिनंदन आणि आपल्या मित्राचंही अभिनंदन.

-दिलीप बिरुटे

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:05 am | हृषिकेश पांडकर

धन्यवाद :) आणि रफिक शेख यांचे मनापासून अभिनंदन..

तुषार काळभोर's picture

20 May 2016 - 12:25 pm | तुषार काळभोर

आईशप्पथ सांगतो, अंगावर काटा आलाय...थंडीने!

चेतनरावांनि प्रत्यक्ष तुम्हाला सांगताना तुमची कशी अवस्था झाली असेल, त्याची मला कल्पनाही करायची नाही.

-(पर्वती चढताना २ वेळा ब्रेक पैलवान) पैलवान

सह्यमित्र's picture

20 May 2016 - 12:35 pm | सह्यमित्र

सुंदर वर्णन! आपण स्वतः तिथे गेला नसतानाही तो अनुभव जिवंत केला आहे.

बाकी चेतन केतकर हे गिरीप्रेमी ह्या पुण्यातील संस्थे सदस्य आहेत. २०१२ Everest (पहिली नागरी मोहीम ) , २०१३ Everest आणि Lohtse , २०१४ Makalu अशा ८००० मीटर्स उंची वरच्या मोहिमा ह्या संस्थेने यशस्वी केल्या आहेत. पुण्यात गिर्यारोहणाचे धडे देण्यासाठी Guardian बरोबर Collaboration करून Guardian Giripremi Institute of Mountaineering हि संस्था देखील सुरु केली आहे . एकूणच गिरीप्रेमी चे गिर्यारोहण क्षेत्रातील योगदान मोठे आहे. अनेक जेष्ठ आणि तज्ञ गिर्यारोहकांचा ह्यात मोलाचा वाटा आहे.

टीप: ह्या वर्षी गिरीप्रेमी च्या २ teams धवलगिरी आणि चोयोयू ह्या अजून २, ८००० मीटर्स वरच्या शिखरांच्या चढाई ला गेल्या आहे. लवकरच हि दोन्ही शिखरे हि सर झाल्याचे आपल्याला कळेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2016 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन! आपण स्वतः तिथे गेला नसतानाही तो अनुभव जिवंत केला आहे.

+१

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:06 am | हृषिकेश पांडकर

धन्यवाद :)

अफाट धाडस आहे हे.काय सुरेख लिहिलंय.
हिलरी स्टेप बघून पण अंगावर काटा आला.माझ्या नवर्याला मी कधी जाऊ देणार नाही अशा ठिकाणी! या धाडसी लोकांच्या घरच्यांना पण सलाम.

रंगासेठ's picture

20 May 2016 - 12:40 pm | रंगासेठ

'एवरेस्ट' या विषयावरचे चित्रपट पाहताना / पुस्तक, लेख वाचताना प्रत्येकवेळी अद्भुत अनुभव येतो.
तुमचा हा लेख पण असाच थरारक अद्भुत अनुभव देणारा.

कालच आपल्या महारष्ट्र पोलीसांच्या एका चमूने एवरेस्ट सर केले, त्यांचे पण अभिनंदन.

मेघना मन्दार's picture

20 May 2016 - 12:46 pm | मेघना मन्दार

वाह !! खूपच सुंदर लिहिलंय !! पुण्यातून गिरीप्रेमी या गिर्यारोहण संस्थेतून २०१२ ला जी मोहीम गेली होती तीच आहे का ही? की तुमचे मित्र स्वतंत्र गेले होते? माझा एक मित्र या मोहिमेचा भाग होता म्हणून विचारले.

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:07 am | हृषिकेश पांडकर

धन्यवाद :)
हो,पुण्यातून गिरीप्रेमी या गिर्यारोहण संस्थेतून २०१२ ला जी मोहीम गेली होती तीच आहे.तुमचा मित्र कोण होता ?
त्याचेही अभिनंदन.

नाईकांचा बहिर्जी's picture

20 May 2016 - 12:48 pm | नाईकांचा बहिर्जी

वाचताना आम्ही तुमच्या मित्रांच्या कोंडाळ्यात बसलोय असा फील यावा इतके चित्रमय वर्णन केले आहेत पांडकर साहेब तुम्ही वाचुन अंगावर सरसरून काटा आला!

पुढील लेखनास शुभेच्छा

संजय पाटिल's picture

20 May 2016 - 12:54 pm | संजय पाटिल

जबर्दस्त अनुभव!!
आणि फोटो पण सुपर्ब..

विटेकर's picture

20 May 2016 - 12:55 pm | विटेकर

.

अप्रतिम फोटो आणि सांगण्याची/लिहिण्याची पद्धतही आवडली.

कानडाऊ योगेशु's picture

20 May 2016 - 1:07 pm | कानडाऊ योगेशु

केवळ थरारक!

साधारण सकाळी ११ च्या सुमारास मी आणि माझा मित्र आमच्या एका मित्रकडे गेलो होतो.रविवारची सकाळ होती.आमचा मित्र घरीच होता.आणि त्याच्याकडे त्याचा एक मित्र आधीपासून येऊन बसलेला होता.

त्यातल्या कुणाचे नाव मित्रगोत्री तर नव्हते ना? :D

टवाळ कार्टा's picture

20 May 2016 - 1:08 pm | टवाळ कार्टा

अफ्फाट्ट

चौकटराजा's picture

20 May 2016 - 1:26 pm | चौकटराजा

सलाम लिहिणार्याला, टीमला ,छायाचित्रकाराला, या सर्वाना मदत करणार्याना, हवामानाला , बर्फाला ......विमान संचालन असो वा गिर्यारोहण चढ उतरणे हे अधिक कौशल्याचे , धोक्याचे काम सबब त्या उतरणीला ही सलाम !

चांदणे संदीप's picture

20 May 2016 - 1:46 pm | चांदणे संदीप

साष्टांग दंडवत! फ़ोटो पाहूनच काय समजायचे ते समजलो..... वाचायला घेतलं नाहीच अजून...काही फ़ोटो तर पाहूही शकलो नाही!

फक्त अफ़ाट, प्रचंड, महान, अप्रतिम वगैरे शब्दच डोक्यात फिरत आहेत सध्या!

___/\___

Sandy

मधुरा देशपांडे's picture

20 May 2016 - 1:47 pm | मधुरा देशपांडे

__/\__
जेवढी साहसी मोहीम, तेवढेच सुरेख अनुभवकथन. सलाम.

पैसा's picture

20 May 2016 - 1:58 pm | पैसा

अचाट आणि अफाट!

लिखाण आणि फोटो मस्त! रफीक शेख ह्यांनी शिखर सर केल्याची बातमीही वर्तमानपत्रात वाचली, त्यांचेही मनापासून अभिनंदन!

स्वराजित's picture

20 May 2016 - 2:56 pm | स्वराजित

जबरदस्त

रमेश भिडे's picture

20 May 2016 - 3:07 pm | रमेश भिडे

___/\___

एवढंच.

पद्मावति's picture

20 May 2016 - 3:08 pm | पद्मावति

अफाट आणि अद्भूत!! शब्दच संपले...__/\__

सिरुसेरि's picture

20 May 2016 - 3:15 pm | सिरुसेरि

रोमांचकारी वर्णन .. +१००

पिलीयन रायडर's picture

20 May 2016 - 3:34 pm | पिलीयन रायडर

मी हिमालयाचे इतके सुंदर फोटो आणि इतकं थरारक वर्णन कधीही वाचलं नव्हतं... अप्रतिम!

बसं इतकंच सुचतंय आत्ता मला...

-(निशब्द) पिरा

अतिशय थरारक वर्णन. लेखनशैली सुंदर.

प्रत्येक कॅम्पनंतर परत उतरुन खालच्या बेस कॅम्पवर परत यायचं तर मुळात ते चढण्यात नेट "गेन" काय राहिला आणि प्रोग्रेस कशी होते हा प्रश्न मात्र अजून शिल्लक आहे.

त्याचप्रमाणे यातल्या प्रत्येक टप्प्याला लागलेला नेमका वेळ (विशेषतः उतरण्यासाठी लागलेला) हा नीट कळला नाही.

तुम्ही जश्या शब्दांत वर्णन केलंय ते खुद्द गिर्यारोहकही करु शकणार नाहीत कदाचित. अभिनंदन आणि लिहीत राहा.

खेडूत's picture

20 May 2016 - 6:54 pm | खेडूत

+१
जिद्दीला सलाम.
जाण्यायेण्याचा मार्ग, मुक्काम, वेळ ठरलेली असेल तर साधारण किती दिवसांची मोहीम असते?

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:14 am | हृषिकेश पांडकर

प्रत्येक कॅम्प वरून बेस कॅम्पला यावे लागते हे फक्त पहिल्या दोन कॅम्पला केले जाते.हवामानाचा अंदाज घेण्यासाठी असे करतात.मात्र तिसर्या वेळी थेट तिसर्या कॅम्प वर जायचे असते.अर्थात हा नियम नाही पण सर्वसाधारण रीत समजली जाते.
उतरण्यासाठी लागलेला मी देखील विचाराचे राहून गेले त्याबद्दल क्षमस्व.पण हा वेळ हवामानावरच अवलंबून असतो.'weather window ' हि एक संकल्पना असते यावरून हवामानाचा अंदाज लावून शक्यता उतरण अथवा चढाई ठरवली जाते.

धन्यवाद :)

नागेश कुलकर्णी's picture

26 May 2016 - 1:26 pm | नागेश कुलकर्णी

+1
गवि, प्रत्येक कॅम्पनंतर परत उतरुन खालच्या बेस कॅम्पवर परत यायचं कारण बहुतेक शरीराला हळूहळू कमी हवेची सवय व्हावी म्हणून असेल. (acclimatization )

पाटीलभाऊ's picture

20 May 2016 - 4:51 pm | पाटीलभाऊ

शिरसाष्टांग नमस्कार त्या अवलियाला...!
रोमांचकारी लिखाण.

चाणक्य's picture

20 May 2016 - 5:16 pm | चाणक्य

छान सफर घडवलीत आमची पण.

कंजूस's picture

20 May 2016 - 6:29 pm | कंजूस

रोमांचकारी वर्णन .. +१००

एकटे जाणारे ( राइनोल्ड मेस्नर ) कसे जात असतील?!!

स्पार्टाकस's picture

20 May 2016 - 7:36 pm | स्पार्टाकस

मेस्नर पहिल्यांना ऑक्सीजनविना गेला तो पीटर हेबलरच्या जोडीने १९७८ मध्ये. बाकी गिर्यारोहक सोडाच पण खुद्दं शेर्पांचाही मेस्नर-हेबलर ऑक्सीजनविना एव्हरेस्टवर पोहोचले यावर विश्वास बसला नाही. तेनसिंगच्या नेतृत्वाखाली शेर्पांनी मेस्नर-हेबलरची चौकशी करण्याची मागणी केली. दोघांनी लपवून ऑक्सीजन सिलेंडर्स नेले होते असा त्यांचा दावा होता! याला उत्तर म्हणून मेस्नरने १९८० मध्ये एकट्याने ऑक्सीजनविना एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करुन सर्वांचा आवाज बंद केला! जगातील ८००० मीटर्सवरील सर्व चौदा शिखरांवर चढाई करणारा तो पहिला गिर्यारोहक!

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:16 am | हृषिकेश पांडकर

मेस्नर खरच धन्य आहे _/\_

स्पार्टाकस's picture

20 May 2016 - 7:26 pm | स्पार्टाकस

अप्रतिम वर्णन आणि फोटो!

एव्हरेस्ट बेस कँपच्या ट्रेकला गेलेलो असताना खुंबू आईसफॉल याची देही याची डोळा पाहिला आहे. तो पार करुन जाण्याच्या कल्पनेनेच सॉलीड टरकली होती. अर्थात फक्तं बेस कँपच्या ट्रेकला जाणार्‍याला क्लाईंबिंग परमीट नसल्याने त्यात पाय टाकता येत नाही त्यामुळे तो प्रश्नच उद्भवला नाही हा भाग वेगळा, परंतु नेपाळमधून एव्हरेस्टच्या शिखरावर जाणार्‍यांना तो पार करावाच लागतो आणि हिलरी स्टेपही (जशी चीनामधून जाणार्‍यांना मॅलरी-आयर्विनची सुप्रसिद्ध दुसरी स्टेप!)

प्रीत-मोहर's picture

20 May 2016 - 8:03 pm | प्रीत-मोहर

सागरमाथ्यापुढे नतमस्तक.__/\__

अफाट फोटोज आणि वर्णन.
त्या शेवटचा लखलखणार्‍या फोटोने डोळ्यांचे पारणे फेडले !!!

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:18 am | हृषिकेश पांडकर

धन्यवाद :)

शेवटचा फोटो हा बेस कॅम्प वरून काढलेला आहे.पूर्ण चंद्र आणि निरभ्र आकाश जेव्हा असेल तेव्हा मिळू शकेल.

विवेकपटाईत's picture

20 May 2016 - 8:26 pm | विवेकपटाईत

अद्भुत वर्णन, वाचताना काटा उभा राहिला. फोटो हि सुंदर आणि सुरेख आहे.

अनामिक२४१०'s picture

20 May 2016 - 9:02 pm | अनामिक२४१०

जबरदस्त वर्णन आणि फोटोस अतिशय रोमांचक …

खरंच... निसर्गाच्या लहरीपणासमोर आपण अतिशय हतबल असतो.एव्हरेस्ट पादाक्रांत करणे हे विधान कदाचित उद्धट असू शकेल.कारण निसर्गावर विजय मिळवायचा नसतोच.त्याचा फक्त आनंद घ्यायचा असतो.

+१ प्रचंड सहमत
..
अवलियाचे अभिनंदन आणि लेखकाचे आभार

स्वाती दिनेश's picture

20 May 2016 - 9:13 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला,
स्वाती

कपिलमुनी's picture

21 May 2016 - 1:36 am | कपिलमुनी

लेख खूप आवडला

कपिलमुनी's picture

21 May 2016 - 1:36 am | कपिलमुनी

लेख खूप आवडला

उगा काहितरीच's picture

21 May 2016 - 7:40 am | उगा काहितरीच

एवरेस्ट चित्रपट पाहत असल्यासारखं वाटलं.

चतुरंग's picture

21 May 2016 - 11:25 am | चतुरंग

केवळ आणि केवळ नतमस्तक!
एवरेस्टचे वर्णन आणि चित्रे प्रत्यक्ष एका एवरेस्टविजेत्या गिर्यारोहकाच्या तोंडून ऐकणे हे थरारकच आहे..
तो थरार आमच्यापर्यंत अतिशय परिणामकारकरीत्या पोचवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
चेतन केतकर यांना तुमच्या मित्रामार्फत मिपाकरांकडून अभिनंदन कळवा.
(तुमची कथा सांगण्याची हातोटी मोठी विलक्षण आहे.)

(थक्क्)रंगा

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:18 am | हृषिकेश पांडकर

नक्कीच :)
धन्यवाद !

स्वीट टॉकर's picture

21 May 2016 - 12:51 pm | स्वीट टॉकर

प्रत्यक्ष एव्हरेस्टवीराकडून सविस्तर ऐकायला मिळायला तुम्ही भाग्यवान आहात. आणि तुमच्या लेखनकौशल्यामुळेच आम्हालाही त्याचा आनंद मिळाला. धन्यवाद!

नि३सोलपुरकर's picture

21 May 2016 - 1:32 pm | नि३सोलपुरकर

__/\__.

धनंजय माने's picture

21 May 2016 - 1:35 pm | धनंजय माने

आमाला फोटो दिसत नाहियेत. (हा तुम्च्या हलकटपणाचा परिणाम आहे माने असं कोण म्हणतंय रे)

लिखाण खुप छान आहे. निव्वळ थरार. आम्हि बेसकॅम्पलाच बेस बसवू बहुधा.

नीलमोहर's picture

21 May 2016 - 1:55 pm | नीलमोहर

अफाट !!

प्रचेतस's picture

21 May 2016 - 2:38 pm | प्रचेतस

लेख आवडला.
वर्णन अगदी जीवंत आहे. नेमक्या छायाचित्रांमुळे काठिण्यतेची पातळीचीही जाणीव होते आहे.

सविता००१'s picture

21 May 2016 - 2:43 pm | सविता००१

कसलं अफाट लेखन आहे हे....
अतिशय सुंदर फोटो.
त्या गोतावळ्यात बसून प्रत्यक्ष गोष्ट ऐकतोय असा भास झाला.

सुबोध खरे's picture

1 Jun 2016 - 11:43 am | सुबोध खरे

+१००

अभ्या..'s picture

21 May 2016 - 5:43 pm | अभ्या..

जब्बरदस्त

हृषिकेश पांडकर's picture

23 May 2016 - 11:20 am | हृषिकेश पांडकर

सर्व वाचकांचे आणि प्रतिक्रिया नोंदविणार्यांचे मनापासून धन्यवाद... वाचते रहो :)

गेल्या दोन दिवसांतच दोन दुर्दैवी मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत.
दोन्ही बाबतीत शिखर सर करुन नंतर खाली उतरताना अतिथकव्याने मृत्यू झालेत. लेखात लिहीलेल्या "उतरणं जास्त धोकादायक" या मताप्रमाणेच.

वेल्लाभट's picture

24 May 2016 - 6:20 pm | वेल्लाभट

चित्रच बघून येडा झालोय. लेख वाचलाच नाही अजून.

अफाट लेख. नुसता वाचतानासुद्धा पाय गारठले......
अशा वीरांसमोर नतमस्तक.....

तिमा's picture

25 May 2016 - 10:15 am | तिमा

लेखनशैली उत्तम, प्रसंग प्रत्यक्षांत घडलेले, म्हणून रोमांचक!
एव्हरेस्टच काय, त्याच्या बेस कँपला जाण्याचा विचार पण सोडून देण्यांत आला आहे.

शित्रेउमेश's picture

26 May 2016 - 11:40 am | शित्रेउमेश

__/\__

__/\__

__/\__

त्रिवार वंदन....

नागेश कुलकर्णी's picture

26 May 2016 - 1:28 pm | नागेश कुलकर्णी

थरारक वर्णन... तुमच्या मित्राचे अभिनंदन......

अभिजीत अवलिया's picture

1 Jun 2016 - 6:31 am | अभिजीत अवलिया

फार सुंदर लिहिलेय.