आजच्या उन्हाच्या काहिलीने अस्वस्थ होत असतानाच मागच्या वर्षी केलेल्या एका अशाच अचानक केलेल्या भ्रमंतीची आठवण आली, आंदर मावळच्या फिरस्तीची.
मागच्या पावसात तसा दोनच ठिकाणी गेलो. एक माझ्या आवडत्या नाणेघाटात. जूनमध्ये जो पाऊस तुफ्फान बरसला नेमका त्याच वेळी मी नाणेघाटात होतो. त्यानंतर जो पाऊस गेला तो गेलाच. त्यानंतर मग ऑगस्ट मध्येच बाहेर पडलो ते मावळात जाण्यासाठी.
आंदर मावळ म्हणजे मावळातल्या आंद्रा नदीच्या खोर्याचा भाग. हा भाग वेढलेला आहे तो आंद्रा, शिरोटे, वडिवळे आणि ठोकळवाडी अशा धरणांनी आणि उंच उंच डोंगररांगांनी. ४/५ महिने सोडले तर हा भाग तसा रुक्ष, दुर्गम, राकट असा. पण पावसकाळात मात्र हा हिरवा शालू नेसून नव्या नवरीसारखा सजून जातो. मागच्या वर्षीच्या दुष्काळाचा फटका ह्या भागाला देखील बसला, पाऊस इथेही असा झालाच नाही तरीही एखादी का होईना चुकार सर इथे कोसळून जायचीच. अशा एका ऐन पावसाळ्यातल्या एका पेटत्या दुपारीच आम्ही चिंचवडाहून येथे यायला निघालो. वडगावच्या पुढेच टाकवे बुद्रुकला जायचा फाटा आहे त्या रस्त्याने निघायचं. येथंवर येईतो आभाळात मळभ दाटलं होतं. उन्ह सावलीचा खेळ चालूच होता.
टाकवेच्या पुढेच एका धबधब्याचं दर्शन झालो. लहानसाच तरीही वेगवान प्रवाह होता. मनसोक्त भिजलो.
दिसायला जरी लहान असला हा तरी हा एका उंच डोंगरावरुन तीन पायर्यांत खाली उतरतो
भाताची रोपं तरारुन अधिक पावसाची वाट पाहात होती.
मधूनच डोंगरात एखादं कातळकोरीव बौद्धकालीन लेणं दिसत होतं. हे जे लेणं आहे ते टाकवे बुद्रुकच्या थोडं पुढं एका डोंगरात. बहुधा डॉक्युमेन्टेड नसावं.
रदोन्ही बाजूला मस्त हिरवाई आणि मधूनच जाणारा रस्ता
नंतर येतं ते कांब्रे गाव. इथले धबधबा खरोखरचं ग्रॅण्ड म्हणावे असे . इतक्या कमी पावसातही ते प्रचंड उंचीवरुन तुफ्फान कोसळत होते . ह्यांच्याखाली उभं राहणं सर्वथा अशक्य.
ह्याच कांब्र्याच्या डोंगरात लेणी आहेत. कातळपटीच्या इथे जी भलीमोठी आडवी भेग दिसतेय तीच ही लेणी. जाणं अत्यंत कठीण.
आपल्याच साईप्रकाश बेलसरेनं मावळातली बरीचशी अनवट आणि दुर्गम लेणी सर केलीत त्यात हीसुद्धा एक
अवश्य वाचाच साईची ही भटकंती
कांब्र्याच्या पुढे धुव्वाधार पाऊस सुरु झाला. चिंब चिंब झालो. ठोकळवाडीच्या काठावर उतरलो
निर्झर खळाळत होते
मधूनच एकूटवाणं राऊळ दिसत होतं.
ठोकळवाडीला वळसा मारला की खांडी येतं. ह्याच्या पुढे सह्याद्रीची रांग आणि टाटाच्या भिवपुरी प्रकल्पाला जाणारा रस्ता. हा भागही खूप सुंदर आणि हिरवा. हे ठिकाण अगदी घाटमाथ्यावर असलं तरिही येथे प्रचंड खोल असे तुटलेले, भिववणारे कडे नाहीत. सौम्य असाच उतार आहे.
भिवपुरीचा घाट निम्मा उतरुन परत फिरलो. पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरु झाला.
मन झिम्माड झिम्माड होऊन गेलं.
प्रतिक्रिया
14 May 2016 - 3:40 pm | किसन शिंदे
ती दोन्ही झाडे अगदी जुळी असल्यागत दिसताहेत. फोटो अर्थातच आवडले. आता लवकरच पाऊस पडावा अशी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना. बाकी कुठेही जा, ती लेणी किंवा एखादा वीरगळ तू शोधून काढणारच.
14 May 2016 - 6:07 pm | कानडाऊ योगेशु
प्रतिसाद वाचुन पुन्हा फोटो पाहीले.अगदी तंतोतंत एकसारखी दिसताहेत ती झाडे. मान गये किसनराव आपकी नजर को!
14 May 2016 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झांडं म्हणजे, त्यात एक बाबा, एक आई, आणि बाबाचं बोट धरुन चाललेलं पिलु हे दिसलं का तुम्हाला. :)
दिलीप बिरुटे
14 May 2016 - 6:47 pm | सतिश गावडे
तुम्ही या गावविश्वाची "त्या" भावविश्वासी गल्लत करत आहात.
14 May 2016 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चुकलं. :)
वल्लीचा धागा आहे म्हणुन अवांतर प्रतिसाद लिहून प्रतिसाद संख्या वाढवायची नै हे आपलं ठरलंय ना ?
लेखन करणारा लेखक किती नवे प्रतिसाद बघायला येतो, आणि अवांतर गप्पा पाहुन नाराज होतो.
-दिलीप बिरुटे
14 May 2016 - 6:55 pm | किसन शिंदे
खिक्क!! सरांची आयड्या आवल्डी.
16 May 2016 - 9:34 am | नाखु
असल्या अनवट आय्डीयांचे (आयडीचे नाही) जनक आहेत याबाबत फक्त वहीम होता आता खात्री झाली.
मूळ अवांतर .वल्लींची भटकंती गड-लेण्याशिवायही असते (आणि तीही हिरवीगार) हे पाहून मस्त वाटले. भावी वल्लीणबैंना कुठं फिरायला जायच असा प्रश्न कधीच पडणार नाही याची तजवीज करणार्या वल्लींना हिर्व्याकंच धाग्याबद्दल दोनशे मार्क.
वरती आलेला भावविश्वचा उल्लेख पाहून त्याचे वाचाक सुदूर पोहोचलेले आहेत यामुळे त्यांनी अता (अस्सल) भाव विष्व लिहिण्यास घ्यावे ही मिपा वाचक चळवळ संघाकडून मागणी.
14 May 2016 - 3:41 pm | यशोधरा
मस्त फोटो. डोळे निवले आणि भषाही काव्यात्मक वापरलीये अगदी!
क्या बात हय प्रचेतस सर?
14 May 2016 - 3:45 pm | किसन शिंदे
बहुतेकदा प्रेमात पडणारी/ पडलेली व्यक्ती काव्यात्मक पद्धतीने जास्त विचार करते/ लिहीते/ बोलते.
तसंच काहीसं असणार बहुदा.
14 May 2016 - 4:00 pm | यशोधरा
अरे वा! अभिनंदन!
14 May 2016 - 4:59 pm | प्रचेतस
सह्याद्री आहेच तसा प्रेमात पडण्याइतका. :)
14 May 2016 - 5:01 pm | किसन शिंदे
सह्याद्री का? बरं बरं..मी तर दुसर्याच कुणाचे तरी नाव ऎकले होते. :)
14 May 2016 - 5:04 pm | प्रचेतस
=))
18 May 2016 - 3:39 pm | राजेंद्र मेहेंदळे
मोनालिसाचे हास्य :) त्यात अनेक गुढ अर्थ आहेत म्हणे.
14 May 2016 - 5:01 pm | यशोधरा
हे एकदम भारी!
14 May 2016 - 3:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाषाही काव्यात्मक वापरलीये.
सहमत. लेख आवडला वल्लीसेठ. फोटोही छान. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
14 May 2016 - 3:45 pm | उल्का
फोटो खूप छान!
14 May 2016 - 3:46 pm | तुषार काळभोर
भव्य हिमालय तुमचा आमचा..केवळ माझा सह्य कडा
याची आठवण करून देणारे फोटो. सह्याद्री एकाच वेळी अफाट, बेफाट, बेलाग असतो, आणि त्याचवेळी तो निरागस, सुंदर, अवखळही असतो!!
14 May 2016 - 3:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
हिरवागार वृतांत आवडला,
लवकरच पाउस सुरु होइल अशी अपेक्षा आहे.
पैजारबुवा,
14 May 2016 - 4:03 pm | एस
सर्व फोटो दिसल्यामुळे अत्यानंद झालेला आहे!
14 May 2016 - 4:16 pm | चौकटराजा
आम्ही मावळा . आंदर मावळातलाच पण १९६९ नंतर तिकडे वळलोच नाही. आता घर कसं असेल की ढिगारा काय पत्ता नाही. आता एकदा चक्कर मारली पाहिजे. असं हा फोटो प्रपंच पाहून वाटायला लागलेय ! मस्त हिरवाई !
14 May 2016 - 4:18 pm | स्रुजा
वाह ! डोळे निवले. वर्णनही सुरेख.
14 May 2016 - 5:10 pm | टवाळ कार्टा
+११११११११
14 May 2016 - 4:32 pm | अभ्या..
वा वा वा.
वल्ली हुशार आणि होतकरु आहे.
14 May 2016 - 4:49 pm | चांदणे संदीप
सह्याद्री.... बास!
Sandy
14 May 2016 - 5:38 pm | अजया
उकाड्याच्या दिवसात हिरवागार धागा! क्या बात है!
14 May 2016 - 6:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अहाहा... क्या बात... जियो...
14 May 2016 - 6:12 pm | कानडाऊ योगेशु
फोटो पाहुनच पावसात भिजल्याचा फिल आहे.सुरेख वर्णन.
दिल बाग बाग हो गया!
14 May 2016 - 6:50 pm | सतिश गावडे
छान चित्रे.
अशा छोट्या ओढ्यांना दगडांचा बांध घालून अडवणे हा माझा गुरांकडचा आवडता उद्योग असायचा. :)
14 May 2016 - 7:00 pm | चौकटराजा
अता बांध फोडायचे दिवस आहेत तुमचे सर !
14 May 2016 - 7:09 pm | किसन शिंदे
चौकार हाणलात चौराकाका
15 May 2016 - 8:32 am | प्रचेतस
=))
16 May 2016 - 9:36 am | नाखु
ते बांधे(सुद) बंदीस्तीत व्यग्र आहेत.
जल्युक्त शिवार नाखु
15 May 2016 - 11:40 am | चतुरंग
चौराकाकांनी एकदम स्टेडियमबाहेर भिरकावून दिलाय चेंडू! :)
-रंगबंध
15 May 2016 - 11:53 am | सतिश गावडे
=))
15 May 2016 - 7:11 am | कंजूस
भारी.बाकी ते विहार नेहमी भिक्कूलोक पावसाळ्यात वस्तीसाठी वापरत आणि सहज जाता येईल अशा ठिकाणी असतात मग कांब्रेचे एवढ्या अवघड जागी का?
नवनाथपंथीय गुहा वगैरेत राहात असलेतरी स्वत: गुहा खोदत नसावेत.
15 May 2016 - 8:31 am | प्रचेतस
हे विहार म्हणजे अर्धवट सोडून दिलेली लेणी आहेत. बहुधा खड़क योग्य नसावा किंवा निधी संपला असावा. पूर्वीची वाटही दरड कोसळल्याने बंद झाली असावी.
अगदी अजिंठ्यातही २६ क्रमांकाच्या लेणीच्या वर अवघड जागी अर्धवट बांधून सोडून दिलेली चैत्यगृहाची कमान दिसते.
नाथपंथीयांनी गुहा खोदल्या नाहित हे खरंच. बौद्ध धर्म मृतप्राय झाल्यावर काही बेवसाऊ लेण्यात नाथपंथीय गेले. पाटेश्वर येथील गुहा मात्र नाथपंथीयांनी खोदल्या असाव्यात असा माझा तर्क आहे.
15 May 2016 - 10:44 am | जव्हेरगंज
डोळे निवले
15 May 2016 - 11:05 am | विवेकपटाईत
लेख आणि फोटो दोन्ही सुंदर. बाहेर जबरदस्त ऊन आहे, त्यात हे फोटो. मनाला शांती देणारी.
15 May 2016 - 11:42 am | चतुरंग
आज इथे दिवसभर पाऊस आहे आणि त्याला साजेशी चित्रे बघून हर्ष झाला.
-रंगारवा
15 May 2016 - 11:45 am | आतिवास
प्रकाशचित्रं आणि वर्णन दोन्ही आवडलं.
15 May 2016 - 11:58 am | बॅटमॅन
अप्रतिम लेखन बे. फोटो तर अतिशय जबराट, शिवाय भाषा थेट गोनीदांची आठवण करून देणारी. "एकुटवाणे राऊळ" वगैरे एकदम सहीसही तिथलेच. अशा गोष्टींचे वर्णन करताना सर्वांत चपखल तीच भाषा वाटते यात काही सौंशयच नाही.
15 May 2016 - 12:39 pm | मनीषा
निव्वळ अप्रतिम छायाचित्रे.
15 May 2016 - 1:08 pm | पैसा
सुंदर!
15 May 2016 - 1:20 pm | चौथा कोनाडा
धाग्याच्या मथळ्यापासुन ते शेवटच्या वाक्यापर्यंत काव्यमय हिरवा कंच धागा !
प्रचि अप्रतिम !
आत्तापर्यंत दोन वेळा पावसाळ्याच्या आसपास या ठिकाणची सफर केलीय त्याची उजळणी झाली.
पावसाळी धुडगुस पर्यटकांचे इकडे लक्ष गेले नसल्याने हे ठिकाण अजुन तरी व्हर्जिन आहे.
सलाम प्रचेतसच्या शब्दांना अन कॅमेरानेत्राला !
16 May 2016 - 12:45 pm | कपिलमुनी
धुडगूसन चालू झालाय ! परांजपे स्कीमने प्लॉटींग करून विकायला काढलय !
वडेश्वर ला रीसॉर्ट सुरू झाले आहेत. अजुन २-३ वर्षेच फक्त !
15 May 2016 - 1:23 pm | नंदन
फोटो आणि लेख - दोन्ही सुरेख, डोळे निववणारे!
15 May 2016 - 2:09 pm | सुधांशुनूलकर
तापलेल्या धरित्रीवर पावसाची पहिली सर पडल्यावर धरणीमातेला कसं वाटत असेल, तसा मनावर थंडगार शिडकावा झाल्यासारखं वाटलं. मनात मृद्गंध दरवळायला लागला. मन झिम्माड झालं.
जियो, वल्ली, फोटो आणि वर्णन अतिशय सुंदर.
सर्वांचे प्रतिसादही आवडले.
चौराकाकांच्या चौकाराला उभं राहून, दोन्ही हात वर करून टाळ्यांचा कडकडाट.
अवांतर - बहुतेकदा प्रेमात पडणारी/ पडलेली व्यक्ती काव्यात्मक पद्धतीने जास्त विचार करते/ लिहीते/ बोलते. तसंच काहीसं असणार बहुदा... किसनद्येवांना काहीतरी शिकरेट...?
15 May 2016 - 5:45 pm | स्पा
ज ह ब री
15 May 2016 - 6:07 pm | घाटी फ्लेमिंगो
सहन होईना आता हे फोटो बघून... कधी एकदा येतोय परत असं झालंय...!! :(
15 May 2016 - 6:23 pm | नीलमोहर
मन झिम्माड झालं....
........हिरव्या बहरात..
15 May 2016 - 9:56 pm | रातराणी
अप्रतिम!!
16 May 2016 - 4:33 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो, अप्रतिम लेखन !
वल्ली नजर असली की कडेकपारीत लपलेली लेणी आणि वीरगळ स्वतःहून समोर येऊन उभे राहत असणार ! ;)
16 May 2016 - 6:56 am | एक एकटा एकटाच
आवडलं
16 May 2016 - 7:06 am | माहितगार
गार गार :)
16 May 2016 - 12:26 pm | स्वच्छंदी_मनोज
वल्लीसेट.. लय भारी.. मस्तच..
(पण मनातल्या मनात: अत्यंत जळजळ झालीय. ह्या मरण उकाड्यात असे हिरवे सह्याद्रीचे फोटो टाकून... जाऊदे.. कुफेहेपा :) :) )
रच्याकने... हा आंदर मावळचा भाग सगळाच भटकंतीचा राहीलाय. कधी होणार देव जाणे.
16 May 2016 - 3:08 pm | मोदक
हा आंदर मावळचा भाग सगळाच भटकंतीचा राहीलाय.
नोंद घेतली आहे.
झक्कास फोटो.. नेहमीप्रमाणेच.
16 May 2016 - 1:52 pm | पद्मावति
मस्तं!
16 May 2016 - 2:22 pm | सूड
झिम्माड वैगरे शब्द आणि वल्लीचा धागा, वाचण्यात काही गल्लत तर झाली नाही ना म्हणून दोनदोनदा वाचलं.
छान आहे धागा, फोटो बघून गारगार वाटलं.
16 May 2016 - 2:52 pm | पिशी अबोली
सुंदर!
ते एकुटवाणं राऊळ नितांत आवडलंय.
16 May 2016 - 4:40 pm | वपाडाव
अप्रतिम...१
16 May 2016 - 3:18 pm | अद्द्या
फोटो बघूनच थंड थंड वाटतंय :)
जबरा
16 May 2016 - 4:57 pm | जगप्रवासी
खूप छान लेख आणि फोटो सुद्धा. तो ब्लॉग देखील खूप मस्त आहे.
16 May 2016 - 6:30 pm | शान्तिप्रिय
मस्त फोटो आणि वर्णन
हे फोटो पाहून खालील वेगवेगळ्या जॉनरची मराठी आणि हिंदी गाणी ओठावर येतात.
१. घन घन माला नभि दाटल्या कोसळती धारा
२.ओ सजना बरखा बहार आयी रस की फुहार लायी अखियों मे प्यार लायी ओ सजना
18 May 2016 - 1:02 pm | प्रशांत
फोटो आणि लेख मस्तच
18 May 2016 - 1:16 pm | रमेश भिडे
हा छान आहे धागा...
इतक्या अभ्यासू माणसाची कसं लोक टिंगल करतात कोण जाणे
18 May 2016 - 1:25 pm | चांदणे संदीप
ते म्हणजे अगदी असं चाल्लय!
;)
Sandy
18 May 2016 - 1:33 pm | प्रचेतस
=))
18 May 2016 - 1:29 pm | मृत्युन्जय
सुरेख लेख. ललित लिहिता येत नाहिस म्हणुन उगाच रडतोस तु, इतके सुंदर तर लिहितोस.
18 May 2016 - 1:50 pm | चौकटराजा
हे असलं लालित्य पूर्ण वगैरे अलीकडेच ...... काहीतर गरबड आहे म्रुत्य्न्ज दया !
18 May 2016 - 2:28 pm | यशोधरा
वल्ली बदललाय बरे मृत्यंजय! तूस नाही ठावा? =))
18 May 2016 - 2:28 pm | यशोधरा
वल्ली बदललाय बरे मृत्यंजय! तूस नाही ठावा? =))
18 May 2016 - 2:05 pm | सस्नेह
हिरवाईने डोळे निवले !
आता लौकरच अशी हिरवाई सगळीकडे दिसूदे. जीव कावला बॉ उन्हानं !
18 May 2016 - 2:17 pm | नाखु
हिरवळ दाटे चोहिकडे,
नितवाचक नाखु
18 May 2016 - 2:20 pm | सस्नेह
तुमच्याकडे पौस सुरु झाला वाट्टं ?
18 May 2016 - 2:08 pm | पियुशा
मस्त गार गार रिफ्रेशिंग वाटल
18 May 2016 - 3:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
आणि वर्णन पण साजेसे!! ऐन उन्हाच्या काहीलीत गारेगार वाटायला लागले.
हे आंदर मावळ म्हणजे हिंजेवाडी फेज-३ कडुन पुढे गेल्यावर लागते तेच का? म्हणजे डावीकडे गेल्यास चांदे/ नांदे वगैरे लागते आणि उजवीकडे वर गेल्यास हे लागेल का?
18 May 2016 - 4:12 pm | प्रचेतस
नाही.
हे पुण्यावरुन मुंबईच्या वडगाव मावळच्या पुढे उजवीकडच्या फाट्याने वळून टाकवे बुद्रुकच्या पुढे. ट्रेकर्सच्या भाषेत ढाक बहिरीचा मागचा भाग.
18 May 2016 - 6:53 pm | राजेंद्र मेहेंदळे
अच्छा!! आता समजले
18 May 2016 - 4:17 pm | सतिश गावडे
>> हिंजेवाडी फेज-३ कडुन पुढे गेल्यावर लागते तेच का? म्हणजे डावीकडे गेल्यास चांदे/ नांदे वगैरे लागते आणि उजवीकडे वर गेल्यास हे लागेल का?
उजवीकडे जाता येते?
18 May 2016 - 6:54 pm | राजेंद्र मेहेंदळे
सह्याद्री टेक पार्क तुमच्या उजव्या हाताला असेल अशी कल्पना करा.उजवीकडे वर एक रस्ता जातो ना?
18 May 2016 - 6:00 pm | मुक्त विहारि
आणि तसाच अप्रतिम लेख...
18 May 2016 - 6:55 pm | मोहनराव
छान फोटो व लेख...
19 May 2016 - 2:33 am | जुइ
सुरेख वर्णन आणि सुंदर फोटो!