"माझ्या एका मित्राच्या गावी; शिरकोलीला यात्रेचे आमंत्रण आले आहे. शनिवारी निघून रविवारी परत..!!"
असा संदेश किरणने ग्रूपवर टाकला आणि पटापट "हो येणार", "चुकवणार नाही", "फायनल रे" असे रिप्लाय आले.
यात्रा, बगाड, गांवरान चिकन-मटण आणि कँपिंग वगैरे गोष्टी असल्याने या राईडचे फारसे प्लॅनींग झालेच नाही. सगळे जण लगेचच तयार झाले.
माझ्यासह कांही मित्रांची सायकल अनेक दिवसांपासून (की महिन्यांपासून) घरातच विसावली असल्याने सायकल राईडचे निमीत्त हवेच होते. त्यामुळे गाडीने जायचे की सायकलने हा मुद्दाही लगेचच निकाली निघाला.
शिरकोली - पानशेत धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेले एकदम छोटे व टुमदार गांव. किरण यापूर्वी यात्रेलाच येवून गेला होता आणि पानशेत परिक्रमेच्या वेळी केदार व अमित याच गांवावरून पुढे गेले होते त्यामुळे रस्ता त्यांना व्यवस्थीत माहिती होता. त्यामुळे ते सांगतील तेथे सायकल हाणायची इतकेच माझे कांम होते.
शिरकोलीचा रस्ता सोपा आहे.
पानशेतजवळ कादवे फाटा लागतो तेथून डावीकडे वळायचे नंतर एका ठिकाणी कादवे रस्ता सोडून उजवीकडे वळायचे आणि कादवे खिंडीला समांतर रस्त्याने थोडे अंतर व पानशेतच्या बॅकवॉटरजवळून २० किमी घाटरस्ता पार केल्यानंतर शिरकोली गांव आहे.
शनिवारचे सर्वांचे एकंदर प्लॅनिंग बघता ११ वाजता निघायचे आणि ४ किंवा ५ वाजेपर्यंत शिरकोलीला पोहोचायचे असे ठरले. दिवसा उजेडी पोहोचून टेंट लावणे वगैरे गोष्टींना व्यवस्थीत वेळ मिळणे हे ही एक कारण होतेच.
"एकदम भिक्कार रस्ता आहे..!!" असे किरणने सांगीतले होतेच मात्र या राईडचे आणखी एक आव्हान होते टळटळीत उन्हात सायकल चालवणे.
सकाळपासून सर्वांचे मेसेज ट्रॅक करत करत मी ११:४० ला घरातून निघालो. किरण, केदार खडकवासला ला भेटणार होते. "तुम्ही पुढे व्हा, मी कामात अडकलो आहे, ते आवरून तुम्हाला दीड एक तासात गाठतो" असा अमितचा मेसेज होता.
मी घरातून बाहेर निघालो व अगदी थोडे अंतर कापले तर सोसायटीतले एक काका त्यांची हवा गेलेली सायकल ढकलत ढकलत चालले होते. मी आज्ञाधारक मुलासारखा थांबलो व काय झाले असे विचारले, "एका चाकातली हवा गेली आहे आणि एका चाकात पंक्चर आहे" असे काकांनी सांगीतले. मी विचारले "माझ्याकडे पंप आहे, हवा भरून देवू का?" काका हो म्हणाले, मी सायकल सावलीत लावून त्यांच्या सायकलच्या दोन्ही चाकात हवा भरून दिली. अगदी शेवटचे कांही पंप मारता मारता काकांना म्हणालो.. "कोपर्यावर पंक्चरवाला आहे, आता चालवत गेलात तरी हवा टिकेल"
"मी सायकल चालवतच नाही, माझा मध्ये एकदा सायकलवरच अॅक्सीडेंट झाला म्हणून मी सायकल चालवणे बंद केले आहे, हवा भरली की सायकल ढकलणे थोडे सोपे जाईल हो.."
काकांनी एकदम बाँब टाकला. आता काय बोलणार.. मी मुकाट पंप बॅगेत भरला आणि काकांना टाटा करून निघालो..
मी खडकवासलाला पोहोचलो, किरण येवून पोहोचला होताच. उसाचा रस प्यायला, थोड्या वेळात केदारही आला. मग केदारची बॅग आणि टेंट सायकलवर नीट बसवण्यात थोडा वेळ गेला व नंतर आम्ही तिघांनीच डोणज्याकडे कूच केले. येथे माझी बॅग त्या उसाच्या रसाच्या ठिकाणी विसरली, मात्र पुढच्या अर्धा-एक किलोमीटरमध्ये हे लक्षात आल्याने मी गडबडीने परत येवून बॅग घेतली व केदार किरणला गाठले.
डोणज्याला पोहोचतो न पोहोचतो तोच केदारच्या पॅडलच्या शाफ्टचा नट निखळून पडण्याच्या बेतात आला होता. आणखी त्रासदायक गोष्ट ही होती की तो नट वारंवार ढिला होतो म्हणून केदारने ते संपूर्ण युनीट बदलले होते, तरीही ते प्रकरण दुरूस्त झाले नव्हतेच. केदारचा आणि ते दुरूस्त करून देणार्याचा फोनवर सुखसंवाद सुरू असताना मी माझी सायकल त्याच्याकडे सोपवली व त्याची सायकल घेवून हार्डवेअरचे दुकान शोधायला सुरूवात केली. आम्हाला तो नट आवळण्यासाठी बॉक्स पानाच लागणार होता. शेवटी एका गॅरेजवाल्याकडे तो पाना मिळाला व केदारची सायकल ठीकठाक झाली.
पानशेतच्या रस्त्याला लागल्यानंतर आमच्या सायकलींनी थोडी लय पकडली. पानशेतचा रस्ता वळणावळणाचा व चढउतारांचा असला तरीही सलग चढ नसल्याने आंम्ही आरामात चाललो होतो. वाटेतली छोटीमोठी गांवे पार पडत होती. ठरावीक अंतराने पाण्याचे ब्रेक घेत घेत प्रचंड उन्हात सायकल प्रवास सुरू होता.
शेवटी एकदाचा पानशेतजवळचा कादवे फाटा आला. आम्ही तिथल्याच एका महादेव मंदिराच्या अंगणात झाडाखाली टेकलो. अमित थोड्याच वेळात पोहोचणार होता. शेवटी एकदा ३ वाजता अमित उगवला. अजून २० किमी खराब अवस्थेतल्या घाटाच्या रस्त्यावरून प्रवास करायचा होता.
कादवे रस्त्यावरून उजवीकडे वळण घेतले, कादवेचा पहिलाच चढ पार केला, शिरकोली फाटा आला आणि पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची झलक मिळाली.
रस्ता ख रा ब होता. या रस्त्यावरून सायकल पंक्चर न होता चालवणे आवश्यक होते. अन्यथा पंक्चर काढण्यात बराच वेळ गेला असता.
होय.. हा रस्ता आहे. (आणि खडतर रस्त्यावरून आम्ही सर्वजण नाजुक चाकांच्या हायब्रीड सायकली घेवून चाललो होतो)
यानंतर फारसे काही लिहिण्यासारखे नाहीये. अत्यंत खराब रस्ता, मध्येच शिल्लक राहिलेले डांबरी रस्त्यांचे लहान मोठे तुकडे, सतत बाजुने दिसणारे पानशेतचे बॅकवॉटर, आणि या सर्वांसोबत अखंड सुरू असलेली सुर्यनारायणाची कृपा. उन्हामुळे अंग अक्षरश: भाजून निघत होते. त्यात भर पडली होती वणव्यांची. उन्हामुळे सगळीकडेच किरकोळ वणवे लागले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे गवत व छोटी झुडुपे जळत असताना त्याजवळून सायकल चालवण्याची कसरतही करावी लागली.
पाणी संपले की एखाद्या ठिकाणी भरून घ्यायचे व पुन्हा मार्गक्रमणा सुरू असा प्रवास सुरू होता.
एक गोष्ट मात्र चांगली होती. इतक्या उन्हाळ्यात व एकंदर दुष्काळी वातावरण असूनही त्या भागामध्ये बॅकवॉटरमुळे थोडीफर तरी हिरवळ होती. टळटळीत ऊन सुखावह करण्यात झाडांच्या सावलीची मोठी मदत होत होती.
मी - एका चढावर सायकल ढकलत नेताना
अमितची सायकल - टेंट सह.
शिरकोलीला त्या दिवशी यात्रा असल्याने जाताना बर्यापैकी गाड्या दिसत होत्या आणि त्यातले लोक प्रोत्साहन देत, कधीकधी चेष्टा करतही जात होते. एका हिरोने पुढे गेलेल्या किरणला "मागे तुमच्यातला एक मेंबर सायकलवरून पडला आहे" असेही सांगून टेन्शनमध्ये आणले.
यथावकाश आंम्ही शिरकोली ला पोहोचलो. किरणच्या मित्राचे घर लगेचच सापडले. तेथे सायकली लावल्या व टेंट साठी योग्य जागा शोधायला बाहेर पडलो.
किरण आणि अमित टेंट लावताना.
टेंट सेट झाला..
नंतर पुन्हा घरी येवून जेवण आवरले. ( चिकन व मटणाचे फोटो देत नाहीये - धन्यवाद दिल्याबद्दल आभारी आहे. ;) )
रात्री तेथल्या एका वापरात नसलेल्या गोबर गॅस टाकीच्या डोमवर बसून तारे बघत बघत गप्पा मारल्या...
बर्याच दिवसांनी घाटरस्त्याचा (व एकंदर सायकलचाच..!!) प्रवास झाला होता. :)
*************************
दुसर्या दिवशी सकाळी ४ वाजल्यापासून एका कोंबड्याने बांग देवून देवून आंम्हाला लवकरच झोपेतून उठवले. केदारच्या सायकलच्या टायरमधली हवा कमी झाली होती, आदल्या रात्री भरपूर हवा भरूनही सकाळी हवा कमी झाल्याने पटकन त्याने ट्युब बदलली. चहा घेतला व घरातील सर्व मंडळींना टाटा करून आंम्ही निघालो.
सकाळी निघायला फार उशीर झाला नव्हता तसेच आजचा रस्ता बहुतांश उताराचा असल्याने आजचा प्रवास तुलनेने निवांत होता. त्यामुळे भरपूर ब्रेक घेत आणि क्लिकक्लिकाट करत सर्वजण निघालो.
एक चढ चढताना.. किरण, त्याच्या मागे केदार आणि सर्वात मागे मी..
हा संपूर्ण रस्ता बॅकवॉटर शेजारून जात असल्याने पाण्याचा सतत शेजार होताच.
खराब रस्त्याचे अनेक प्रकार होते.
अशाच एका खडबडीत रस्त्यावर..
येथे एका ठिकाणी केदारच्या सायकलचा नट पुन्हा ढिला झाला. त्याला आवळण्यासाठी पाना लागणार होता. आंम्ही आता सरळ येणार्या-जाणार्या चारचाकी थांबवायला सुरूवात केली. पण कोणाकडे पाना नव्हता तर एका सुमोवाल्याकडे १९ नंबरचा पाना होता. आंम्हाला १४ नंबरचा पाना हवा होता. थोडा वेळ सायकल चालवणे, नंतर थांबून नट हातानेच आवळणे पुन्हा सायकल चालवणे असे प्रकार करत केदार हळूहळू सायकल चालवत येत होता.
या दरम्यान एका कारवाल्याला आंम्ही थांबवले, त्याला जाण्याची गडबड होती पण "मेजर काहीतरी असेल तर सांगा" असे त्याने सांगितले. त्याला गडबड असल्याने शेवटी आंम्हीच त्या बाबाला "तुम्ही निघा आम्ही करतो काहीतरी असे पुरेपूर पटवून सांगितले मगच तो पुढे निघाला.
..विश्रांती..
सायकलींची पण विश्रांती..
वाटेत एका ठिकाणी सावलीत थांबलो असताना अचानक १०-१२ चिल्लीपिल्ली मुले एका पातेल्यात भरपूर कैर्या घेवून हजर झाली. आंम्हाला वाटले त्यांना कैर्या विकायच्या असतील.. तर त्यांनी आंम्हाला खाण्यासाठी कैर्या आणल्या होत्या. आंम्ही ४ / ५ कैर्या खाल्या तोच जवळच्या त्यांच्या घरातून "पैशे घेवून नका रे" असा त्यांच्या आयांचा आदेश आला.
तितक्यात तेथे एक आईसक्रीम वाला अवतरला. आंम्ही त्याला थांबवून तेथे असलेल्या सगळ्या मुलांना व त्यांच्या आयांना आईसक्रीम दिले.
शेवटी एकदाचा खराब रस्ता संपला व आंम्ही शिरकोली फाट्यावर पोहोचलो.
आता कादवेचा उतार उतरायचा होता व पुण्यापर्यंतचे अंतर पार करायचे होते. केदारने पानशेतला एका सायकलच्या दुकानात नट आवळून घेतला.
हा प्रवासही भर उन्हात सुरू होता. त्यामुळे वेळोवेळी सावलीत थांबून किंवा मिळाले तर पाणी / उसाचा रस घेत घेत आरामात चाललो होतो.
किरण - एका सावलीत.
सरतेशेवटी २ वाजता घरी पोहोचलो. एक झकास राईड संपली होती.
या राईडचा मॅपवरील रस्ता एकदम भारी जमला होता.
पानशेत ते शिरकोली
भेटू पुन्हा.. अशाच एका सायकल राईडनंतर..
(समाप्त)
( यांतले कांही फोटो अमितने काढलेले आहेत - जे खूपच चांगले आहेत ते अमितचे फोटो समजायला हरकत नाही. ;) )
प्रतिक्रिया
29 Apr 2016 - 1:58 pm | वेल्लाभट
सहीच्च जमलंय हे.
फोटो भारी, वृत्तांत भारी, सगळंच मस्त.
क्लास.
29 Apr 2016 - 2:10 pm | sagarpdy
पहाटे निघायचं कि लोकहो ! का उनातून प्रवास करताय ?
29 Apr 2016 - 2:35 pm | केडी
बाबा, संसार सांभाळून करावा लागतं सगळं. मग ह्यात पोराटोरांचे ररिझल्ट शाळेतून आणणे, अशी बरीच कामे करावी लागतात बाबा. :-) त्यामुळे दुपारी निघालो. बऱ्याच दिवसांनी मस्त राईड झाली पण.
29 Apr 2016 - 2:44 pm | गणामास्तर
मस्त भटकंती. नेमकं काय खाल्लं की इतकी उर्जा मिळते ही जाणून घेण्यास उत्सुक आहे.
च्यायला इथे मागच्या आठवड्यात दोन दिवस लातूर दौरा केला तर उष्णतेनी हालत खराब झाली आमची.
बाकी फोटोच्या बाबतीत आमचा गणेशा झालाय.
29 Apr 2016 - 8:48 pm | मोदक
असे काही नाही हो. आवड आहे सायकलींगची बस्स्स. मग असे वेगवेगळे प्रकार खुणावतात.
अनिश्चिततेतही एक मजा असते. मागच्या वेळी डांबरी रस्त्यावर दोन किमीमध्ये पंक्चर झालेली सायकल यावेळी असल्या धबडग्यात टिकून राहिली.
:)
30 Apr 2016 - 8:40 am | चौकटराजा
शनिवारच्या संध्याकाळी नवनव्या ठिकाणी भरपूर हादडायचं मग वजन वाढलं की सायकलीच्या ट्रीपा मारायचा ! ( ह घ्या)
@ मोदक, हा धागा मिपावर टाक असे सुचविणार होतो. तोच तो आला देखील. यातून मिपाकराना मनोरंजन. सायकलीच्या ट्रीप्साठी प्रोत्साहन, हाटेल वाल्याना उत्पन्न, व पंकचर वाल्याना रोजगार ई मिळेल. मेक एन इन्डिया ! तो पाणी पिण्याचा फटू मस्तच आलाय !
29 Apr 2016 - 2:47 pm | एस
भन्नाट!
29 Apr 2016 - 3:49 pm | अप्पा जोगळेकर
मस्त. पण सगळे फोटो दिसत नाहीत.
29 Apr 2016 - 3:52 pm | जगप्रवासी
"मी सायकल चालवतच नाही, माझा मध्ये एकदा सायकलवरच अॅक्सीडेंट झाला म्हणून मी सायकल चालवणे बंद केले आहे, हवा भरली की सायकल ढकलणे थोडे सोपे जाईल हो..">>>> बेक्कार हसतोय या काकांच्या वाक्यावर
30 Apr 2016 - 1:32 am | अनुप कोहळे
+१
29 Apr 2016 - 4:19 pm | मार्गी
जोरदार!!! :)
29 Apr 2016 - 4:38 pm | प्रचेतस
क्या बात है...
भारीच हिंडलास.
29 Apr 2016 - 5:28 pm | शलभ
Camping मस्तच झालय.
रस्ते खूपच खतरनाक आहेत. अशा रस्त्यातून भर उन्हात सायकल चालवायची म्हणजे _/\_
30 Apr 2016 - 7:29 am | सतिश गावडे
वाह.. भारीच..
30 Apr 2016 - 2:04 pm | सविता००१
छान चांदण्यात काढलेल्या सफरीचा वृत्तांत आवडला.
भारी
थोडा आधी गेला असतास तर रस्ता या विषयावरच्या फोटोंमध्ये डेंजर रस्ते म्हणून देता आले असते की ;) (कृ.ह..घे.)
खरच बेक्कार आहेत रस्ते.
30 Apr 2016 - 2:29 pm | नीलमोहर
'आम्ही त्याला थांबवून तेथे असलेल्या सगळ्या मुलांना व त्यांच्या आयांना आईसक्रीम दिले.'
- हे भारी काम केले :)
30 Apr 2016 - 4:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरे उन कसलं आहे बाहेर, कशाला असला अघोरी पणा करता?
पैजारबुवा,
30 Apr 2016 - 10:02 pm | खटपट्या
मस्त फोटो आणि वर्णन. मी असतो तर बॅकवॉटरमधे डूबकी मारुन आलो असतो. पण कपडे न्यायला हवे होते. तेवढाच उन्हाच्या काह्य्लीवर उपाय...
1 May 2016 - 8:44 pm | पैसा
मस्त!
2 May 2016 - 1:12 am | बोका-ए-आझम
आणि मस्त फोटो. तो टेंटचा फोटो ल इ च भारी!
2 May 2016 - 11:00 am | मित्रहो
येवढ्या उन्हाच सायकलींग करण्याचा विचार करणे म्हणजेच महान आहे. तुम्ही सायकलींग केली, तेही घाटातल्या अशा खराब रस्त्यावरुन केलीत. मानल बॉ.
2 May 2016 - 12:03 pm | सुबोध खरे
हे बरोबर आहे.
आम्ही तर मोटारसायकलवर पण ऊन लागते म्हणणारे साजूक लोक आहोत. आम्हाला असे कष्ट झेपत नाहीत. उगाच वजन कमी बिमी झाले तर काय घ्या?
2 May 2016 - 1:17 pm | आदूबाळ
एक नंबर.
वळणावळणाचा रस्ता आणि त्यावर आडव्या अर्धवट सावल्या हा मोदकरावांचा सिग्नेचर फोटो आहे. लेखावर नाव नसतं तरी चाललं असतं ;)
2 May 2016 - 1:24 pm | अभ्या..
भारीच की.
सायकलीला टुबलेस टायर नसतेत काय? पंक्चर प्रकरणात जरा तरी रिलीफ.
2 May 2016 - 2:47 pm | मोदक
धन्यवाद.
ट्युबलेस रोड बाईक आणि MTB ला असतात. तसाही सर्वसाधारणपणे "पंक्चर रेझीस्टंट टायर" हा एक प्रकार असतो पण लै महाग असतो. पंक्चर टाळण्यासाठी २५०० / ३५०० चे एक टायर विकत घेण्यापेक्षा २०० रूपयांची एक एक्ट्रा ट्युब जवळ बाळगायची. पंक्चर झाले तर ट्युब बदलून प्रवास सुरू ठेवायचा आणि मुक्कामाच्या ठिकाणी निवांत पंक्चर काढायचे. असे आंम्ही करतो त्यामुळे फारसा वेळ जात नाही.
2 May 2016 - 2:51 pm | मोदक
सर्व प्रतिसादकांचे आभार्स.. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
खटपट्या शेठ - कितीही ऊन असले तरी अनोळखी ठिकाणी / त्यातल्या त्यात बॅकवॉटरमध्ये पोहोणे टाळावेच्च.. आपल्याला माहितीही नसणारे बरेच प्राणी पाण्यात असू शकतात.
पैजारबुवा - झकास मजा आली राईडला. सगळ्या गोष्टींची काळजी घेवून गेलो होतो. पाणी, इलेक्ट्रॉल, खाण्याचे पदार्थ, औषधे/गोळ्या वगैरे वगैरे सगळे त्यामुळे ऊन असले तरी फार त्रास झाला नाही. :)
5 May 2016 - 4:45 pm | पिलीयन रायडर
डेस्कपासुन ३० पावलांवर असलेल्या कॅण्टिनमध्ये मी दुपारी १२.४५ ला असल्या उन्हात चालत जाते ह्याबद्दल माझं मलाच कौतुक आहे.. लोक असल्या उन्हात मुळात सायकलींवर जाण्याचा विचार मनातही कसा आणतात देवच जाणे.. शिवाय जाऊन जिंवत परतही येतात.. चमत्कारच बाबा!!
पण हळुहळु मला तुझे आश्चर्य वाटेनासे झाले आहे. लवकरच तू सायकल घेऊन अमेरिकेला चक्कर मारुन आलो म्हणलास तरी मी ओक्केच म्हणेन.. काय नेहमी नेहमी थक्क होऊन कौतुक करायचं.. =))
असो.. बड्डे बॉयला शुभेच्छा!! ;) असेच नवनवे उपक्रम करत रहा..!
5 May 2016 - 4:49 pm | सविता००१
असंच म्हणते.
मोदक, प्रकट दिनाच्या शुभेच्छा!
आणि नवनवीन उपक्रमांसाठीही भरपूर शुभेच्छा!
5 May 2016 - 6:36 pm | चांदणे संदीप
मोदक्राव मिपाश्टैल शुभेच्छा! \o/ \o/ \o/
मस्त कसला खतरा लेख आणि कहर फोटू!
वरून चौथा फोटू ज ब र द स्त आलेला आहे! इतरही सर्व छानच आहेत.
तुमच्या भविष्यातील अनेकोनेक सायकलसफरींना मनापासून शुभेच्छा!
एक सहज मनात आले...सिंदबाद सारख्या सात सुरस व चमत्कारिक सफरी तुमच्याही घडोत व त्या आम्हाला (वाचूनच) अनुभवायला मिळोत!
Sandy
5 May 2016 - 7:13 pm | मोदक
धन्यवाद..!!! :)
5 May 2016 - 7:14 pm | मोदक
फास्टर फेणे.. :)) :))
6 May 2016 - 1:48 pm | चौकटराजा
बन्यासारखे सडपातळ ही व्हाल ! आत पुणे ते ग्वालेर ओर्छा सायकलने करा म्हणजे व्हाल !