पुस्तक दिनाचा विषय निघाला आणि मला एक पुस्तक परिचय तरी लिहावासा वाटू लागला. कोणत्या पुस्तकावर लिहावं असा विचार करताना सतत एकच पुस्तक समोर दिसू लागलं, ते म्हणजे मारा अँड डॅन.
आता यात गोम अशी होती की मी हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेलं असल्याने तपशील काहीच आठवत नव्हते. पण अगदी मनापासून तर त्यावरच लिहावंसं वाटत होतं. मग पुस्तकशोध सुरू झाला. ‘शोधात असलेलं पुस्तक न सापडणं’ हा एक प्रकार घडल्याशिवाय पुस्तकांची जिज्ञासा कायम नाही राहणार असं काहीसं माझ्या दैवाला वाटतं. असो. तात्पर्य, पुस्तक मिळालं नाही, तपशील आठवत नाहीत, आणि लिहायचं त्याबद्दलच आहे. एकदा त्याचा विचार आल्यावर दुसरं काहीच खरंच लिहावंसं वाटत नव्हतं, सुचत नव्हतं. पण मग इतक्या वर्षांनीही हेच पुस्तक मनात पिंगा का घालत होतं? बस, या किड्यानेच माझी पेचातून सुटका केली.
पुस्तकं असतातच का? कागदावरून उतरून मनाच्या कोपऱ्यात दडी मारून अशी कधीतरी, कुठेतरी उगवण्यासाठीच ना? निर्जीव वाटणाऱ्या पुस्तकांना आपण खरंच निर्जीव मानू शकतो का? वाटेवाटेवर भेटणारी पुस्तकं कुठच्या रस्त्यावर कधी हात दाखवतील, कुठच्या वडावर कधी पाय सोडून बसलेली दिसतील आणि कधी कुठच्या विहिरीतून आवाज देतील, याचा काही नेम नसतोच. पुस्तकांना आत्मा असतो, आणि तो झपाटतो तो आयुष्यभरासाठी.
आता हेच पुस्तक बघा, तसं तर फिक्शन आहे. ३००० वर्षानंतर अजून एका आईस एजने आपली आजची संस्कृती नष्ट केली आहे. ‘इफ्रिक’ मधे पाण्याच्या वाढत जाणाऱ्या दुर्भीक्ष्यातून आणि राजकीय यादवीतून एका टोळीची ७ वर्षांची राजकन्या, आणि ५ वर्षांचा राजपुत्र यांना वाचवलं जातं. त्यांची खरी नावे त्यांना संकटात ढकलतील म्हणून त्यांना नावे विसरायला लावली जातात. आणि अशा पद्धतीने मारा आणि डॅनचा ‘अप नॉर्थ’ प्रवास सुरू होतो. का, त्यांनाही माहीत नाही. पण ‘गेलं पाहिजे’ या एकाच ध्यासाने ते पुढे जातात. ‘व्हॉट डिड यू सी टुडे’ हा पारंपारिक खेळ खेळत.
मला एक आठवतं, की हे पुस्तक वाचताना मला फार तहान लागायची. मोकळा वाहणारा नळ पाहून कसंतरी व्हायचं. माराचे पाण्याच्या थेंबासाठीचे हाल, जीव वाचवण्याचे प्रयत्न माझ्यासोबत फिरायचे. पण, तेव्हाच नाही, हल्लीच होळीचे रंग टाकीमधे टाकून खोडसाळ पोरांनी पाणी वाया घालवलं, तेव्हाही मला अस्थिपंजर मारा त्या पाण्यात परत दिसली. तसाच डॅन. धाडसी, पण आधी कृती व मग विचार करणारा, बहिणीला टाकून पुढे जाऊन परत तिच्यासाठी म्हणून येणारा, तिला सर्वस्व मानूनही तिला जुगारात पणाला लावणारा डॅन अनेक ठिकाणी दिसतच राहिला. पण हे दोघं दिसले, पण भेटले कुठेच नाहीत. डोरिस लेसिंगचं हे लिखाण असं वाचकाला दूर दूर ठेवणारं आहे. त्यात प्रवाहीपण नाही, बरंच अडखळायला होतं. त्यातली ही दोन पात्रे वैचारिकरित्या गुंतवतात, भावनिकरित्या नाही. त्यांना ‘आवडती’ म्हणावंसं वाटत नाही.
मग असं काय आहे जें इतक्या वर्षानंतर मनाला खेचतं? काहीसं दुर्बोध, गूढ, चेहरा नसलेलं बनून हे पुस्तक टोचत का राहतं?
मारा आणि डॅन यांचं ‘माणूस’ असणं हेच कदाचित.. हे दोघं पुस्तकातही आणि खऱ्या जगातही तुकड्या-तुकड्यांनी सापडत राहतात. एक स्त्री आणि एक पुरुष म्हणून. पुस्तकाचं मुखपृष्ठ असंच काहीसं. दुष्काळी भेगाळलेल्या जमिनीवर एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या पळणाऱ्या सावल्या. अगदी लहान वयापासून आपली सगळी ओळख पुसून टाकून हे दोघं धडपडतात, निरनिराळ्या अनुभवांमध्ये फेकले जातात, केवळ २ माणसं म्हणून जगात आपला मार्ग शोधतात. एक आदिम काहीतरी या दोघांमध्ये जाणवत राहतं. पण त्याचसोबत पुढे पुढे जात राहण्याची, काहीतरी ध्येय घेऊन झपाटून घेण्याची आधुनिक वृत्तीही त्यांच्यात दिसते. ज्ञानतृष्णा आणि खरी तहान आणि त्यासोबत जगण्याचा संघर्ष, अशी काहीशी गुंफण या पुस्तकात आढळते. अतिशय विस्कळितपणे या पात्रांचं बाईपण, पुरुषपण आणि माणूसपण दिसत राहतं. आणि म्हणूनच ते पाठलाग करणं सोडत नाही.
मुळात एकसंध नसलेल्या या कथेला आठवणींच्या तुकड्यांमधून शोधणं माझ्यासाठी कठीण आहे. पण एक मात्र आहे, या पुस्तकाने जुन्यात नवीन भर घातली नसेल कदाचित, पण नव्यात सतत जुनी भर ते अजूनही घालत आहे.
प्रतिक्रिया
25 Apr 2016 - 9:03 am | पैसा
सुरेख ओळख. हे पुस्तक कुठे मिळालं तर नक्की वाचणार.
25 Apr 2016 - 9:24 am | सानिकास्वप्निल
छान ओळख पिशी, लेख आवडला.
पुस्तक शोधतेच आता.
25 Apr 2016 - 9:30 am | प्रीत-मोहर
सुरेख ओळख!!!! नक्की शोधेन हे पुस्तक
25 Apr 2016 - 9:55 am | कवितानागेश
सुन्दर लिहिलंयस . पुस्तक नक्की शोधून वाचणार.
25 Apr 2016 - 10:07 am | पिलीयन रायडर
आवडलं.. नक्कीच वाचेन..!
25 Apr 2016 - 10:21 am | क्रेझी
तुझ्या मनावर असलेला ह्या पुस्तकाचा जबरदस्त पगडा लेखामधून स्पष्टपणे कळून येतो, लेख आवडला.
25 Apr 2016 - 11:51 am | सस्नेह
परीक्षण आवडले ! नेमक्या शब्दात मांडले आहे.
25 Apr 2016 - 11:56 am | एस
अप्रतिम लिहिलेय!
25 Apr 2016 - 2:29 pm | मधुरा देशपांडे
सुंदर लिहिलं आहेस पिशे.
25 Apr 2016 - 4:32 pm | मितान
मारा आणि डान पहिल्यांदा बेल्जियम मध्ये हातात पडलं. भारले गेले होते. तू म्हणतेस तसं खरोखर उघडा नळ पाहून आजही कसेतरी होते. खुप काहीतरी हलवून गेलेलं पुस्तक आहे हे !
तु अजून लिहू शकली असतीस पण थांबलीस कशासाठी ?
25 Apr 2016 - 4:34 pm | मितान
पाठलाग करणारी पुस्तके अशी लेखमालाच व्हायला हवी खरंतर. गॉन विथ द विंड, रिबेका.... कितीतरी ! अजून पाठलाग सोडत नाहीत !
25 Apr 2016 - 4:41 pm | सविता००१
मस्त परिचय
25 Apr 2016 - 4:55 pm | नूतन सावंत
पिशे,हे पुस्तक वाचलेय.आता परत वाचायचं पिसं लावलंस बघ.छान लिहिलंयस.
26 Apr 2016 - 1:55 am | nishapari
मारा अँड डॅन हे पुस्तक माझ्याकडे इबुक ( पीडीएफ ) स्वरुपात उपलब्ध आहे . आपल्याला हवे असल्यास सांगा , इमेल वर पाठवेन .
26 Apr 2016 - 2:38 pm | चिन्मयी भान्गे
मला मारा अँड डॅन पीडीएफ हवी आहे!
26 Apr 2016 - 9:48 pm | nishapari
कृपया आपला इमेल अॅड्रेस द्या .
26 Apr 2016 - 9:03 am | इडली डोसा
तु ज्या पद्धतीने पुस्ताकाची ओळख करुन दिली आहेस तीच इतकी अस्वस्थ करुन जाते कि प्रत्यक्ष पुस्तक कसं असेल याची कल्पना करवत नाही. भरपुर निवांत वेळ हातात असताना सवडीने वाचेन कधीतरी हे पुस्तक.
तुझी लिखाणाची शैली खूप आवडली... थोडक्यात पण अगदी टोकदार लिहिलं आहेस.
26 Apr 2016 - 2:27 pm | चिन्मयी भान्गे
http://www.amazon.in/Mara-Dann-Adventure-Doris-Lessing/dp/006093056X
26 Apr 2016 - 4:58 pm | Mrunalini
खुप छान लिहला आहेस पुस्तक परिचय.. कुठे सापडले तर नक्की वाचुन काढेल. :)
26 Apr 2016 - 5:27 pm | कविता१९७८
मस्त पुस्तक परीचय
26 Apr 2016 - 6:10 pm | निशांत_खाडे
सहमत. काही पुस्तके ही माझ्यासाठी चश्म्यासारखी आहेत, राहतील.
26 Apr 2016 - 6:21 pm | स्रुजा
सुरेख लिहिलयेस. हे पुस्तक मिळवुन वाचेन. माणुसपणाचे इतके खरे चित्रण कधी कधी माझ्या अंगावर येते पण तुझ्या लेखाने अस्वस्थतेचा पण एक वेगळा पैलु दिसला. वाचण्याचं धाडस नक्की करेन :)
26 Apr 2016 - 10:51 pm | Maharani
छानच ग पुस्तक परिक्षण.मिळाल तर नक्की वाचेन.
5 May 2016 - 9:39 pm | जुइ
पुस्तकाचा परीचय आवडला पिशी.
6 May 2016 - 2:20 am | यशोधरा
सुरेख लिहितेस नेहमीच.
6 May 2016 - 3:07 am | वैभव जाधव
सुंदर टोकदार लिखाणाचा नमुना. नेमकं आणि नेटकं.
हॅट्स ऑफ!
8 May 2016 - 11:13 am | पिशी अबोली
मन:पूर्वक धन्यवाद!
9 May 2016 - 9:54 pm | पद्मावति
छान परिचय.