खुणावणारं खुलं वाचनालय (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

शिल्पा गडमडे's picture
शिल्पा गडमडे in लेखमाला
18 Apr 2016 - 10:19 pm

Header

काही दिवसांपूर्वी ऑनलाइन काहीतरी वाचत असताना मला अचानक ‘बालभारतीचे’ पुस्तक गवसले. ते पुस्तक चाळताना मन थेट जाऊन पोहचलं ते शाळेत. बालभारतीचे धडे वाचताना अनेक लेखकांची ओळख झाली, अधिकाधिक वाचायची गोडी निर्माण झाली. या आवडीतून माझी ओळख झाली लायब्ररी म्हणजेच वाचनालयाशी. कितीतरी विषयांवरची हजारो, लाखो पुस्तकं
वाचनालयात आपली वाट बघत सज्ज असतात. वाचनालय म्हटलं कि डोळ्यासमोर येते कमी उजेडाची खोली आणि त्या खोलीत दाटीवाटीने कपाटात असलेली पुस्तकं. त्या पुस्तकांचा वास, स्पर्श सगळे तुम्हाला वेगळ्याच अनुभवविश्वात घेऊन जातात. मी कॉलेजमध्ये असताना विद्यापीठाचे अतिशय समृद्ध वाचनालय होते. कॉलेज संपलं कि माझी गाडी थेट वाचनालयाच्या दिशेने
वळत असे. तिथल्या अनेक पुस्तकांना स्पर्श करताना मनात कितीतरी विचार असत. प्रत्येक पुस्तकावर ते कधी घरी वाचण्यासाठी दिले होते त्याची तारीख लिहलेली असे. कितीतरी पुस्तकं कित्तेक दिवस, कित्तेक वर्ष त्या वाचनालयातून बाहेरच पडलेली नसत. त्या पुस्तकांना काय वाटत असेल? त्या पुस्तकाचा श्वास गुदमरत असेल का एकाच खोलीत, एकाच जागी थांबून?
ही पुस्तकं बाहेरून येणाऱ्या पुस्तकाला प्रश्न विचारून भंडावून सोडत असतील का? असे अनेक प्रश्न मला पडत. सजीव-निर्जीव गोष्टींच्या यादीत पुस्तकं निर्जीव यादीत येत असली तरी इतके भरभरून सांगू पाहणारी पुस्तकं निर्जीव असतात हा विचार मला करता यायचा नाही. पुस्तकं घरी नेतांना मला फार आनंद व्हायचा. कितीतरी चांगल्या पुस्तकांची ओळख करून देणारे हे
वाचनालय मोकळ्या हवेत असतं तर असा विचार सतत मनात येई.

जर्मनीत येतांना सामानाच्या वजन मर्यादेमुळे अगदीच एखादं दुसरं पुस्तक घेऊन येता आलं होतं. हातात निवांत वेळ असताना नदीकाठाला अथवा एखाद्या बागेत जाऊन मोकळ्या हवेत पुस्तक वाचत बसायची अनावर उर्मी त्या वेळी दाटून यायची. बाहेर जायचा अगदीच कंटाळा आला किंवा थंडी झोंबायला लागली तर घरात निवांत बसून, अधेमधे कॉफीचा घोट घेत पुस्तक वाचत
बसावे असे मनोराज्य मी करत असे. पण हे करायला पुस्तकं नको का? मग पुस्तकांचा शोध घेतांना माझी ओळख झाली जर्मनीतील ‘ओफने बुशरश्रांक’ (Offene Bücherschränke) अर्थात खुल्या पुस्तकांच्या कपाटांशी..म्हणजेच मिनी वाचनालयाशी.. वाचनालयातील बंदिस्त पुस्तकांना बाहेरचे जग पाहता आले तर किती छान, हा कॉलेजला असताना मनात
येणारा विचार इथे जर्मनीतील या ‘खुल्या वाचनालयांनी‘ प्रत्यक्षात आणला होता.

गजबजलेल्या रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यात वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं भरलेलं कपाट.. हे कपाट कुलुपबंद नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटले तर त्यांनी थांबावे, पुस्तकं चाळून हवे ते आणि हवी तेवढी पुस्तकं वाचायला घेऊन जावी. पुस्तकं घेऊन जाताना कायम रागावलेल्या ग्रंथपालाशी तुमचा काही संबंध येत नाही किंवा कुठल्याही कागदावर सही करावी लागत नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अगदी कुठल्याही ऋतूत हे वाचनालय सुरूच असते. अगदी बारा महिने, चोवीस तास.. इथे एकच नियम असतो कि पुस्तकं वाचून झाली कि परत आणून ठेवा किंवा तुमच्याकडचे वाचनीय पुस्तक तिथे ठेवून जा. कधीही पुस्तकाचे कपाट रिकामं असू नये त्यासाठी ही तरतूद.

या खुल्या वाचनालयाची कल्पना ९० च्या दशकात जर्मनीमधे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या संस्थाच्या उपक्रमामुळे आकाराला आली. पण मुखत्वे या खुल्या वाचनालायाचे श्रेय जाते ते ‘क्लेग आणि गुटमान’ (Clegg and Guttmann) या कलाकारांच्या जोडीने राबविलेल्या प्रकल्पाला. शहरातील विविध ठिकाणी कुठल्याही देखरेखीशिवाय अथवा ग्रंथपालाशिवाय खुले
वाचनालयय उभे करून त्याद्व्यारे लोकांच्या ‘वाचनसवयी, वैचारिक आवड आणि समाजाचा एकत्रितपणे होणारा वावर’ समजून घेणे हा त्यांच्या प्रकल्पाचा उद्देश होता. या प्रकल्पातून निर्माण होणारी ‘समाजाचे पोर्ट्रेट’ जाणून घेण्याचा या दोन कलाकारांचा मानस होता. त्या अंतर्गत १९९१ साली ग्राझ या शहरात खुल्या वाचनालयाचा सगळ्यात पहिला प्रयोग करण्यात आला. त्यानंतर १९९३ साली हाम्बुर्ग येथे विद्युत विभागात वापरण्यात आलेली जुनी कपाटं या खुल्या वाचनालयासाठी वापरण्यात आली. शहरातील तीन भागात राबवलेल्या या योजनेत एक ठिकाण सपशेल नापास झाले तर बाकी २ ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. १९९४ साली माईन्झ येथे या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.

हळूहळू जर्मनीमधे अनेक ठिकाणी अशा खुल्या वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला काही ठिकाणी हे वाचनालय यशस्वी झाले नाही तरी नंतर ही संकल्पना रुजू लागली. नागरिक जबाबदारीने ही सोय वापरताना दिसू लागले. कालांतराने सगळीकडे ही कल्पना पोहचली, रुजली. आज जर्मनीभर निरनिराळ्या शहरात ५०० हून अधिक पुस्तकांची कपाटं आहेत. या
कपाटांना वेगवेगळे आकार, रंग आहेत. कमीतकमी २००-२५० पुस्तकं असणारं हे पुस्तकाचं कपाट उभारताना प्रत्येक शहरातील कार्यालय आर्थिक भार उचलत असतं. या कपाटांची निगराणी करण्याचे काम स्वयंसेवक करतात. नागरिकदेखील जबाबदारीने वागून सहकार्य करतात. एखादी दुसरी घटना वगळली तर ही योजना अतिशय उत्तम सुरु आहे. संगीतविषयक पुस्तकं, कादंबऱ्या, कविता, लहान मुलांची पुस्तकं अशा अनेक विषयांवरची पुस्तकं इथे भेटतात. अधिकतर पुस्तकं जर्मन भाषेत असली तरी वेगवेगळ्या भाषेवरची पुस्तकंदेखील सहज सापडतात. इंग्रजी भाषेसाठी पुस्तकांचे स्वतंत्र कपाट फ्रंकफुर्ट शहरात आहे. डार्मस्टाट शहरात तर बागेतच असे मिनी वाचनालय आहे. झाडाखाली बसून निवांतपणे पुस्तकं वाचत बसायची सोय..

अनेक लोकं त्यांच्याकडच्या उत्तम पुस्तकांची भर या वाचनालयात घालत असतात. आजवर कधीही कुठलंही पुस्तकाचं कपाट मला रिकामं दिसलं नाही. नागरिकांच्या सहकार्यातून किती छान गोष्टी आकाराला येऊ शकतात याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वीच मी माझ्याकडची काही मराठी पुस्तकं या कपाटात नेऊन ठेवली. न जाणो शहरात नव्यानेच आलेलं
कोणी मराठी पुस्तकांच्या शोधात असेल आणि माझ्याकडची पुस्तकं त्या मोकळ्या हवेत बाहेर पडायची वाट बघत असतील..

- शिल्पा गडमडे

फ्रांकफुर्ट, जर्मनी

Footer

प्रतिक्रिया

अजया's picture

24 Apr 2016 - 8:42 am | अजया

चक्क हेवा वाटला असे वाचनालय गावात असल्याचा!

सस्नेह's picture

25 Apr 2016 - 11:58 am | सस्नेह

कधीतरी अशा एखाद्या गावात मुक्काम ठोकायचा आहे !

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:33 pm | शिल्पा गडमडे

स्नेहांकिता- फ्रांकफुर्टला आलीस तर मी सगळ्या खुल्या वाचनालयात घेऊन जाईन..कधी येतेस ते ठरव?

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:33 pm | शिल्पा गडमडे

स्नेहांकिता- फ्रांकफुर्टला आलीस तर मी सगळ्या खुल्या वाचनालयात घेऊन जाईन..कधी येतेस ते ठरव?

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:32 pm | शिल्पा गडमडे

नागरिकांचा प्रतिसाद कसा असेल याविषयी दोन्ही बाजूने विचार करून राबविलेला उपक्रम आहे..तो उत्तम चालतोय यासाठी त्यांचे कौतुक आहे..

पिशी अबोली's picture

12 May 2016 - 4:55 pm | पिशी अबोली

जळून खाक!

लेख छान!

कविता१९७८'s picture

24 Apr 2016 - 10:43 am | कविता१९७८

वाह वाचनालय मस्तच

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:38 pm | शिल्पा गडमडे

धन्यवाद!

सानिकास्वप्निल's picture

24 Apr 2016 - 1:18 pm | सानिकास्वप्निल

युरोपात अशा वाचनालयाबद्दल ऎकून माहिती होतेच, तुमचा लेख वाचून बरीच माहिती मिळाली. असे वाचनालय लंडनमध्ये ही आहेत.

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:40 pm | शिल्पा गडमडे

लंडनमध्ये इंग्रजी भाषेत पुस्तकं मिळायला सोप्पं जात असेल..इथे जर्मन पुस्तकातून इंग्रजी पुस्तकांना शोधून काढावे लागते..

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2016 - 1:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती !

रसिक व जबाबदार नागरिक आणि सहृदय व सजग प्रशासान यांचा असा संगम विरळ !

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:41 pm | शिल्पा गडमडे

धन्यवाद!

नूतन सावंत's picture

24 Apr 2016 - 2:18 pm | नूतन सावंत

आहा! काय मजा येत असेल ना वाचायला.लेख आवडला हेवेसांलान

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:43 pm | शिल्पा गडमडे

खरंच..असे वाचनालय दिसले कि पावले तिकडे वळतातच..आपल्याकडे आधीच ढीगभर पुस्तकं आहेत आणि नवीन पुस्तक वाचायला लगेच वेळ नाही हे माहित असूनही...

हेमंत लाटकर's picture

24 Apr 2016 - 4:10 pm | हेमंत लाटकर

छान माहिती. खुले वाचनालय भारतात चालले तर तो चमत्कार असेल?

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:44 pm | शिल्पा गडमडे

असा प्रयोग करून बघायला हरकत नाही भारतात..काही ठिकाणी तरी नक्कीच यशस्वी होईल असे वाटते..

उल्का's picture

24 Apr 2016 - 9:44 pm | उल्का

मी लगेच गूगल करुन फोटो पाहिला. काय मस्त आहे.
ह्यापुढे फक्त एकच शब्द मनात येतो. काश!

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:45 pm | शिल्पा गडमडे

समजू शकते..धन्यवाद!

पैसा's picture

24 Apr 2016 - 10:18 pm | पैसा

किती सुंदर कल्पना! आपल्याकडे हे शक्यच नाही. वाचणार्‍यांपेक्षा रद्दीवाले अशी पुस्तके घेऊन जातील!

उल्का's picture

24 Apr 2016 - 10:51 pm | उल्का

अगदी माझ्याही मनात असाच विचार आला होता. म्हणजे चोर चोरून रद्दीवाल्याना विकतील असा. :)

प्रीत-मोहर's picture

25 Apr 2016 - 10:27 am | प्रीत-मोहर

अगदी अगदी!!!

अश्या वाचनालयांची कल्पना मात्र अगदी आवडली

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:55 pm | शिल्पा गडमडे

इकडे रद्दीवाला नसतो म्हणून वाचली पुस्तकं..लगेच डोळ्यासमोर चित्र आलं रद्दीवाला पुस्तकं चोरून नेताना..

एस's picture

24 Apr 2016 - 10:59 pm | एस

वा!

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:56 pm | शिल्पा गडमडे

धन्यवाद!

मितान's picture

25 Apr 2016 - 5:59 am | मितान

असे वाचनालय पाहिले आहे. भारतात हे होऊ शकत नाही याबद्दल हळहळ वाटली.
तुमचा लेख आवडला.

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:56 pm | शिल्पा गडमडे

धन्यवाद!

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2016 - 10:12 am | पिलीयन रायडर

कितीही प्रकारे विचार करुन बघितला पण भारतात हे शक्य नाही हेच जाणवले. कमालीचं वाईट वाटलं.

एखादं पुस्तक नेऊन ते परत आणुन देणे ह्या प्रकाराबद्दल मला विलक्षण आदर आहे. कुणाच्याही पोलीसगिरी शिवाय लोक पुस्तक नेऊन आणुन देतात ही गोष्ट केवळ कल्पनेपेक्षा जास्त म हा न आहे. काय त्या देशातल्या लोकांच्या डिएनए मध्ये असेल? असा कसा हा देश इतका भाग्यवान?

तुमचा लेख वाचुन खुप आनंदही झाला आणि खुप विषादही दाटुन आला...

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 4:59 pm | शिल्पा गडमडे

एखादं पुस्तक न परत करण्याचा मोह झाला तर त्याबदल्यात दुसरं पुस्तक ठेवायचं असा नियम आहे..तो देखील लोकं पाळत असावीत कारण पुस्तकांची कपाटं कधीच रिकामी नसतात..

जागेचा प्रश्न सुटतो आणि पुस्तक कोणी चोरण्याचा प्रश्नच नाही.

मस्त लेख आणि असं वाचनालय असणं म्हणजे तर सुखच :)

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 5:00 pm | शिल्पा गडमडे

धन्यवाद!

सविता००१'s picture

25 Apr 2016 - 10:42 am | सविता००१

मस्तच लेख आणि माहिती. असं वाचनालंय म्हणजे स्वर्गीय सुखच

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 5:01 pm | शिल्पा गडमडे

धन्यवाद!

मधुरा देशपांडे's picture

25 Apr 2016 - 2:31 pm | मधुरा देशपांडे

तुझ्या त्या मराठी पुस्तकांच्या शोधात फ्रांकफुर्ट मध्ये भटकायला हवं. :) लेख आवडलाच.

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 5:03 pm | शिल्पा गडमडे

धन्यवाद! म्हणत असशील तर तू दिलेलं पुस्तक पण ठेवून येते तिकडे..गमतीचा भाग वगळता..मागच्या महिन्यात एक हिंदी पुस्तक देखील दिसलं..भारतीय स्त्रियांवर जर्मन भाषेत लिहलेलं पुस्तक देखील दिसलं..आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टीकोन कळू शकेल अशी पुस्तकं वाचून..

मस्तच.. इथे पण आहेत असे खुले वाचनालय. पण सगळी पुस्तके स्लोवाक भाषेत असल्यामुळे काहि उपयोग होत नाही. :(

शिल्पा गडमडे's picture

27 Apr 2016 - 5:04 pm | शिल्पा गडमडे

फ्रांकफुर्ट मोठे शहर असल्यामुळे इंग्रजी पुस्तकं पण मिळतात बघायला..

शान्तिप्रिय's picture

27 Apr 2016 - 7:44 pm | शान्तिप्रिय

सुंदर माहिती!

Maharani's picture

28 Apr 2016 - 8:55 pm | Maharani

Khupach mast kalpana....

पद्मावति's picture

12 May 2016 - 9:24 pm | पद्मावति

वाह, मस्तं वाचनालय़. लेख आवडला.

जुइ's picture

14 May 2016 - 12:09 am | जुइ

लेख आवडला.