लहान मुलांचा मित्र "बबल्स" (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

मालविका's picture
मालविका in लेखमाला
18 Apr 2016 - 11:18 pm

Header

लहान मुलांचा मित्र "बबल्स "(वय वर्षे २ते ५ )

माझा मुलगा दोन वर्षाचा झाला तेव्हा आमची भारत वारी झाली . माझ्या तिथल्या एका स्थानिक मैत्रिणीने तिच्याकडील २ पुस्तके मला दिली होती. त्याचे पूर्ण १२ भाग आहेत असे सांगितले होते. तिच्याकडे २ च होते. भारतात मिळतील असेही सांगितले. तेव्हा मी राहत असलेल्या देशात इंग्रजी पुस्तके तुलनेने खूप म्हणजे खूपच कमी मिळत. दुसऱ्याने वापरलेली पुढे पास होत असत. म्हणून मग भारतातून पुस्तके आणायची ठरलेलेच होते. त्या यादीत या पुस्तकांची भर पडली.

अगदी लहान मुलांना वाचून दाखवता येतील अशी हि पुस्तकांची मालिका! नाव आहे "बबल्स ". माझ्या २ वर्षाच्या मुलाला मी हि वाचून दाखवत असे. पुस्तक इंग्रजीतून आहे. पण आम्ही घरात मराठी बोलत असल्याने २ वर्षे वयाला मुलाला इंग्रजी कळत नसे. पण मी ते मुलाला वाचून दाखवत असे नि मग मराठीत सांगत असे. गोष्टीनुरूप हावभाव दाखवल्याने हळूहळू समजायला लागल्या. पुस्तकं खूपच छान आहेत. प्रत्येक पानावर एक वाक्य. वाक्याला साजेस चित्र. अशी १२/१५ वाक्यांची गोष्ट. छोटीशी पण अर्थपूर्ण गोष्ट.

बऱ्याच वेळा मी मुलाला जेवण भरवताना हि पुस्तकं वाचयला घ्यायचे. वाचताना नि गोष्ट ऐकताना त्याचं जेवण केव्हाच संपून जाई. माझा यात दुहेरी फायदा होता. एक तर मुलगा एका जागी बसून जेवे आणि दुसरं म्हणजे हळूहळू का होईना मी त्याला पुस्तकांची गोडी लावू शकेन .

तर पुस्तकं थोडक्यात कशी आहेत? खाली फोटो दिला आहेच. छोटीशी रंगबेरंगी पुस्तके आहेत. बबल्स एक कार्टून. १ ते १२ असे भाग आहेत. प्रत्येक भागात एक सूचनावजा गोष्ट किंवा मुलांनी काय गोष्टी कराव्यात किंवा करू नयेत असे आपल्याला वाटते, साधारण त्याच गोष्टी. जसे कि सुपर मार्केट मध्ये फिरताना मुलांनी आपला हात सोडून इकडे तिकडे जाऊ नये अशी अपेक्षा असते. तेच गोष्टीरुप आपल्या समोर बबल्सच्या माध्यमातून येते. "Bubbles is Lost " या पुस्तक बबल्स हरवतो नि मग आईला सापडतो अशी गोष्ट आहे. "bubbles is careless " या गोष्टीतून बबल्स ने खेळणी न आवरल्याने काय होतं ते सांगितलय. "Bubbles owns up " यातून बबल्स आपल्या चुकीची माफी कशी मागतो ते सांगितलय. "Bubbles is greedy " मधून हावरटपणाने काय होते ते दाखवलय . "Bubbles goes to school " मध्ये शाळेचा परिचय करून दिलाय. "Bubbles has a toothache " मधून चॉकलेट खाल्ल्याने काय होतं ते सांगितलय. "babbles the artist " मध्ये बबल्स भिंती रंगवतो ती गोष्ट आलेय. अशा छोट्या छोट्या पण मस्त गोष्टी यात आहेत. २ ते 5 वयोगटाला साजेशा अशा या गोष्टी आहेत. कुठेही भडकपणा नाही. साधी सरळ भाषा जी मुलांना समजेल. मला तरी या गोष्टी खूप आवडल्या. माझा मुलगा खूपच एकरूप झाला बबल्सशी. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही गोष्टी त्याला ओरडून समजवायला लागल्या नाहीत. "बबल्स असे करतो का ?" किंवा " बबल्स ने असं केल्यावर काय झाल?"असे विचारल्यावर तो आपणहून उत्तर देत असे आणि मग पुढे काही सांगायची गरज राहत नसे. परदेशात भाड्याच्या घराच्या भिंती रंगवण आम्हाला परवडणारं नक्की नव्हत अशा वेळी या बबल्सने माझं काम खूप सोप्प केलं. मी घरी एक फळा आणून ठेवला. मुलगा अगदी आठवणीने त्या फळ्यावर काय ती कलाकुसर करायचा. बबल्स ची आई देखील वेळप्रसंगी ओरडताना किंवा निट समजावताना दाखवलेय. आधी इंग्रजी वाचन आणि मग मराठीतून परत समजावून सांगणे यामुळे त्याला गोष्ट जशी समजली तसेच इंग्रजीचे शब्द देखील समजायला लागले .

या पुस्तक वाचनात मला दुहेरी फायदा होता. एक तर एका जागी बसून कार्टून वगैरे न लावता तो जेवत होता शिवाय हळूहळू त्याला पुस्तक वाचायची आवड देखील निर्माण झाली. आता २ वर्ष वयात कसली आवड असे तुम्ही म्हणाल? पण सलग १ महिना मी हा प्रयोग करून बघितला आणि खरच नंतर तो जेवायला बसताना आपणहून पुस्तक घेवून बसायला लागला. मी त्याच्यासमोर सगळे पुस्तकाचे भाग मांडून ठेवायचे मग आज कोणता वाचायचा हे तो ठरवायचा. शिवाय त्यावर १ ते १२ असे अंक असल्याने आम्ही अंकांचा खेळ पण खेळायचो. आज या नंबरचे पुस्तक वाचायचे किंवा या नंबरच्या पुस्तकाचे नाव काय? वगैरे. शिवाय एका पानावर एक चित्र असल्याने चित्रात काय आहे? खडू, फळा, बरणी, चोकलेट, खेळणी ओळखणे असे आमचे खेळ चालत.

मला हा सगळा १२ पुस्तकांचा सेट पुण्यात तुळशीबागेच्या समोरच्या (बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर ) दुकानात मिळाला होता. एका पुस्तकची किंमत ४० रुपये होती. बबल्स फर्स्ट स्टोरी बुक नावाने पुस्तके आहेत. पुस्तकाची पेपर क्वालिटी चांगली आहे.
रोजच्या नित्याच्या गोष्टी समजावून सांगायला माझ्यासाठी तरी हि पुस्तके खूपच फायदेशीर ठरली .

.

.

Footer

प्रतिक्रिया

अजया's picture

23 Apr 2016 - 6:39 am | अजया

लेख आवडला!

सानिकास्वप्निल's picture

23 Apr 2016 - 8:46 am | सानिकास्वप्निल

लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगण्यास उपयुक्त अशी ही पुस्तके.
छान लिहिले आहे, लेख आवडला.

एस's picture

23 Apr 2016 - 9:07 am | एस

मस्त लिहिलेय!

जेपी's picture

23 Apr 2016 - 1:27 pm | जेपी

लेख आवडला..
आता बबल्स ला शोधने आले!.

वैदेहिश्री's picture

23 Apr 2016 - 2:36 pm | वैदेहिश्री

छान लिहील आहे.माझा मुलाला देखील मी झोपताना गोष्टी वाचून दाखवते. त्याला पण वाचनाची आवड लागली आहे. आता तर तो बिछाना घातला का पुस्तक घेऊन येतो.

कविता१९७८'s picture

23 Apr 2016 - 2:43 pm | कविता१९७८

मस्त लेखन

पैसा's picture

23 Apr 2016 - 3:07 pm | पैसा

लेख आवडला. मुलांना अशीच वाचायची गोडी लागते.

सविता००१'s picture

23 Apr 2016 - 4:02 pm | सविता००१

मस्त दिसतोय हा बबल्स.
सुरेख लेखन

स्रुजा's picture

23 Apr 2016 - 7:04 pm | स्रुजा

छान ! लेख आवडला.

माज्या दोन्हिही लेकिंना बबल्स पुस्तके खुप आवडतात. बबल्स सारखी पेपर डॉग,निन्नी शीप ही पण पुस्तके प्रिय.

mugdhagode's picture

24 Apr 2016 - 1:03 am | mugdhagode

छान

धन्यवाद! शोधतोच आता बबल्सला.

mugdhagode's picture

24 Apr 2016 - 9:10 am | mugdhagode

http://www.jainbookagency.com/booksearch.aspx?title=Bubbles

ऑर्डर दिली. व्ही पी ने कॅश ऑन डिलिवरी सोय आहे.

एकुण किती भाग आहेत ? इथे ८ आहेत

नूतन सावंत's picture

24 Apr 2016 - 2:59 pm | नूतन सावंत

छान लेख.

मला माझ्या मुलांचे बालपण आठवले. माझ्याकडे विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांच्या बालगीतांचा संग्रह होता. मुलानाच का आम्हाला पण खूप आवडायच्या त्या बालकविता.
'राणीची बाग' ही अत्यंत आवडीची कविता.
ह्या लेखामुळे आठवणींना उजाळा मिळाला.
तुमचा लेख मस्तच.

मितान's picture

25 Apr 2016 - 5:48 am | मितान

मस्त लेख मालविका !
आमच्या घरातही हा आवडता हीरो :)

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2016 - 10:27 am | पिलीयन रायडर

अरे मला माहितीच नव्हता हा बबल्स!! माझा मुलगा चार वर्षाचा आहे. तू वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींसाठी मला एखादा हिरो हवाच होता. मी लगेच आणणार ही पुस्तकं. एका संशयित आयडीचा प्रतिसाद उपयोगी पडला असं पहिल्यांदाच झालंय. मुग्धा गोडे ताई/ दादांना लिंक साठी धन्यवाद!!

क्रेझी's picture

25 Apr 2016 - 10:36 am | क्रेझी

लेख आवडला :) खुप गोड आहे हा बबल्स :)
ह्याप्रमाणेच ज्योत्स्ना प्रकाशनाची माधवी पुरंदरे यांची लालू बोक्या, राधाचं घर आणि अशीच सगळी पुस्तकं फार सुंदर आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमधे उपलब्ध आहेत आणि ऑनलाईन पण मागवू शकता.

ज्योत्स्ना प्रकाशन +१
मस्त पुस्तके आहेत. मी बरीच घेतलीत. घरी आणि भेट द्यायला.

प्रीत-मोहर's picture

25 Apr 2016 - 10:59 am | प्रीत-मोहर

वाव आवडला हा बबल्स . आमच्या घरातल्या लहानग्यांसाठी मी पण मागवला

पुंबा's picture

25 Apr 2016 - 11:20 am | पुंबा

खुप आवड्ला पुस्तक परिचय. माझ्या भाचीला घेउन देतो लवकरच... धन्स

सस्नेह's picture

25 Apr 2016 - 11:54 am | सस्नेह

मुलगा लहान असताना याविषयी समजायला हवं होतं....

इशा१२३'s picture

25 Apr 2016 - 12:42 pm | इशा१२३

मस्त परिचय!
हिंदीपण दिसताहेत पुस्तक .लेकिसाठी हिंदी मागवते .

मधुरा देशपांडे's picture

25 Apr 2016 - 2:23 pm | मधुरा देशपांडे

बबल्सची ओळख आवडली.

ज्यांना बबल्स विकत घ्यायची आहे त्यांनी एकदम सगळे भाग मागवू नयेत असे सुचवतो.
अगदीच सामाय नवनीतछाप मालिका आहे असे माझे मत इथे औचित्यपूर्ण ठरणार नाही कदाचित पण अनेक जण अख्खी सिरीज मागावताहेत हे बघुन देणे गरजेचे आहे असे वाटले

--

लेखन आवडले!

Mrunalini's picture

26 Apr 2016 - 6:20 pm | Mrunalini

छान लेख. बबल्स आवडला.

स्मिता श्रीपाद's picture

27 Apr 2016 - 3:30 pm | स्मिता श्रीपाद

काय योगायोग आहे...परवाच या बबल्स च एक पुस्तक मुलीसाठी आणलय...रीडींग प्रॅक्टीस साठी
तिला आवडलं तर उरलेली पण आणेन हळुहळु

जुइ's picture

8 May 2016 - 4:21 am | जुइ

बबल्स बद्द्ल प्रथमच ऐकले.

पद्मावति's picture

9 May 2016 - 9:42 pm | पद्मावति

मस्तं लेख.