आपण त्यांना कुठे ना कुठे भेटलेलो असतो तरी आपण त्यांना नीटसे ओळखत नाहीच सहसा. अतिशय बुद्धिमान दिसायला वेगळे असे हे प्राणी म्हणजे ऊंट!.
सरफ़रोश ह्या आमीरच्या सिनेमा मधले नुसते सामान पाठीवर बांधले की नीट बॉर्डर क्रॉस करुन येणारे तस्करांचे ऊंटही आपण पाहिलेले असतात किंवा पाठीवरचा जवान जख्मी झालेला कळला की त्याला बिना लगाम बिना आज्ञा बेसला परत आणणारे, 26 जानेवारीच्या परेड मधे 73 दागिन्यांनी मढवलेले कॅमल कंटिंजेंट ऑफ़ बीएसएफ सुद्धा आपण पाहतो, फार काय पुण्यात किंवा इतर मोठ्या गावात चोखीढाणी असली तर तिथे कॅमल राइडच्या वेळी ऊंट पाहिलाच जातो, बीच वर सुद्धा दिसतात ऊंट.तरीही, ऊंट ह्या प्राण्याबद्दल शास्त्रोक्त अशी माहीती जवळपास आपल्या सगळ्यांनाच कमी असते, दिसायला थोड़ा बेंगरुळ तरीही विलक्षण बुद्धिमान अश्या ह्या प्राण्याबद्दल मला नवीन माहीती मिळवता आली तीच तुमच्यापुढे मांडायचा प्रयत्न म्हणजे हा लेख.
(बीएसएफ ऊंट दस्ता,चित्र जालावरून साभार)
तर, हल्लीच काही वैयक्तिक कामानिमित्त राजस्थामधे बीकानेरला जाणे झाले असता, एकेदिवशी करायला काही नाही म्हणून भटकंती करायला ठिकाणे शोधता शोधता एक नवे ठिकाण सापडले, ते म्हणजे "राष्ट्रिय उष्ट्र संशोधन केंद्र" उर्फ़ "National Research Center on Camels".बीकानेर शहरा पासुन जवळपास 7 किमी अंतरावर जोधपुर बायपास लगत जोरबीर (उच्चारी जोड़बीड)मधे हे संशोधन केंद्र, जवळपास 700 हेक्टेयर जमीनीवर वसलेले आहे. 1984 मधे स्थापित ह्या संस्थेची ख्याती म्हणजे,1984 मधे हे केंद्र "Project Directorate on Camel" म्हणून अस्तित्वात आले अन पुढे 1995 साली एक पूर्णवेळ रिसर्च सेंटर म्हणून ह्या केंद्राला मान्यता मिळून आज हे केंद्र आशिया खंडातले सगळ्यात मोठे उष्ट्र संशोधन केंद्र अन फार्म म्हणून नावाजले. हे संशोधन केंद्र भारतीय कृषि अनुसंधान परिषद उर्फ़ Indian Council For Agricultural Research
च्या अखत्यारीत काम करते.
(NRCC logo, चित्र जालावरून साभार)
राष्ट्रिय ऊंट संशोधन केंद्र (ह्यापुढे उल्लेख केंद्र असा करतो) हे एक महत्वाचे पर्यटक आकर्षण म्हणून नावारुपाला न आल्यास नवल वाटेल इतके सुंदर ह्याचे कैंपस मेंटेन केले गेले आहे, रोज सकाळी इथे असलेले 350 ऊंट चरायला म्हणून केंद्राच्याच मागे असलेल्या 650 हेक्टेयर रानात सोडले जातात अन ते स्वयंप्रेरणेने दुपारी ठरल्यावेळी परत येतात. ह्यामुळेच इथे पर्यटकांसाठी वेळ दुपारी अडीच ते सायंकाळी साडे सहा ठेवली जाते व सहा वाजता तिकीट विक्री बंद होते. नाममात्र 30 की 50 रूपये माणशी तिकीट असते प्रवेशाकरीता. इथे एक आवर्जून सांगावे वाटते की केंद्राला भेट देतेवेळी गाइड नक्की घ्यावा नाहीतर कश्याचीकश्याशी टोटल न लागता नुसता ऊँटाचा कळप पाहून परत फिरायची वेळ येऊ शकते. गाइडचे शुल्क अवाजवी नसुन फ़क्त 150 रुपये प्रति टूर इतके आहे. गाइड्स सौजन्यपूर्ण अन माहितगार आहेत केंद्राचे. खालील माहीती गाइड ने दिलेली असुन ती त्रोटक स्वरुपात मांडतो आहे ती फ़क्त आपल्याला गाइड का करावा ह्याची नीट कल्पना यावी म्हणूनच.
मुळात ऊंट वाळवंटाचे गलबत वगैरे प्रार्थमिक माहीती आपल्याला असते पण गाइडने दिली ती माहीती प्रचंड सुरस होती (माझ्यासाठी तरी). भारतात मूलतः चार प्रकारचे ऊंट बहुतकरून सापड़तात अन ह्याच चार प्रजातींवर केंद्रात मुख्य संशोधन चालते.
1 बीकानेरी
2 जैसलमेरी
3 मेवाड़ी
4 कच्छी
एक एक प्रजातीची माहीती मिळाली ती खालील प्रमाणे
1 बीकानेरी ऊंट
बीकानेरी ऊंट हे उंटातले जर्सी ब्रीड समजले तरी हरकत नसावी. मजबूत बांधा बऱ्यापैकी ऊंची ही ह्या जातीची स्पेशलिटी म्हणवली जाते. ह्यांची ओळख म्हणजे घुमट किंवा डोम शेप्ड डोके. ह्यांच्या पापण्यांवर बऱ्यापैकी केस असतात जे त्यांना वाळुच्या वादळांत संवेदनशील डोळ्यांची काळजी घ्यायला मदतगार असतात. रंग कथ्या खाकी ते काळ्याच्या मधे असतो. प्रसंगी एखाद लालसर झाक असलेला ऊंट ही बीकानेरी जातीत सापडतो. ही जात अतिशय एक्टिव असुन हिचा उपयोग भारवाहन ते दुग्धउत्पादन दोन्हीमधे होतो. डोके संपून नाक अन जबड़ा (muzzle) सुरु होतो तिथे एक खळगा ही अजुन एक ओळख ह्या प्रजातीची.
(बीकानेरी ऊंट, चित्र जालावरून साभार)
2. जैसलमेरी ऊंट
ही जात मध्यम आकारचे ऊंट म्हणून ओळखली जाते, हिचा रंग फिकट कथ्था असतो बहुतकरुन . ह्यांचे पाय काटकुळे असतात अन जबड़ा छोटा असतो, वाळवंटी ऊंट असल्यामुळे ह्यांच्या पापणीवर सुद्धा बरेच केस असतात, ह्यांचे शरीरावर असलेले केस तुलनेने थोड़े कमी लांबीचे अन रखरखित असतात. दुग्धोत्पादन सुद्धा थोड़े कमीच असते , एकंदरित हा ऊंट शोपीस म्हणून जास्त प्रसिद्ध आहे.
(जैसलमेरी ऊंट, चित्र जालावरून साभार)
3.मेवाड़ी ऊंट
मेवाड़ी ऊंट ह्यांची पैदास बहुतेक उदयपुर जिल्ह्याकड़े होते, बीकानेरी पेक्षा थोड़ी बुटकी तरी मजबूत अशी ही जात वाढीव दुग्धोत्पादनासाठी (प्रत्येक वेतात रोजचे 5-8 लीटर) प्रसिद्ध आहे तसेच डोंगराळ भागात बोजड़ वजन वाहण्या करीता प्रसिद्ध आहे, ह्यांचा रंग फिक्कट ते गडद कथ्था असतो अन क्वचितप्रसंगी पांढरेशुभ्र पिलु सुद्धा होते ह्यांच्यात.
(मेवाड़ी ऊंट, चित्र जालावरून साभार)
.
(मेवाड़ी ऊंट पांढरे पिलु, चित्र जालावरून साभार)
4. कच्छी ऊंट
कच्छी ऊंट सुद्धा मध्यम बांधणीचे ऊंट असतात, ह्यांची विशेषता म्हणली तर हे ऊंट रंगाने फिक्कट असतात फिक्कट कथ्था ते भुरकट असतात रंगाने हे ऊंट, जबड़ा मध्यम लांबीचा असतो अन पापण्यावर केस नसतात ह्या ऊँटाची खासियत म्हणजे विलक्षण दमट अश्या कच्छी वातावरणात सुद्धा तगण्यालायक हे ऊंट असतात, थोडेसे मंद हालचाली असणारे हे ऊंट असतात. ह्यांच्यात बरेच वेळा खालचा ओठ लटकलेला असतो ज्यामुळे त्यांचे दात दिसतात .
(कच्छी ऊंट , चित्र जाला वरुन साभार)
ऊंट हे मुळातच अतिशय हुशार प्राणी असतात, दिशा निर्देशक अश्या काहीही खाणाखुणा नसलेले वाळवंट हे जन्मस्थान असल्यामुळे ऊँटाची स्मरणशक्ती प्रचंड शार्प असते, आमचे गाइड श्री रामजी ह्यांनी सांगितल्या प्रमाणे तर ऊंट जर एखाद्या रस्त्यावर सतत ने आण केला तर त्याला तो रस्ता तोंडपाठ होतो,बरेचवेळी तर ऊंटगाड़ीला ऊंट जोडून नेहमीच्या रस्त्यावर आणला की त्याचा सारवान (ऊंट/ऊंटगाड़ीचालक) चक्क लगाम मोकळी सोडुन गाड़ीत झोपुन जातो अन तरीही हे तेज जनावर इच्छित स्थळी अगदी बरोबर पोचते. ह्याच स्मरणशक्ती मुळे बरेचवेळी ऊंट धोकादायक सुद्धा होतात म्हणजे लहानपणी किंवा आधी कधीतरी जर एखाद्या मनुष्याने त्यांना मारहाण केली असल्यास ती लक्षात ठेऊन ऊंट नंतर त्या व्यक्तिवर हल्ला सुद्धा करू शकतात,पण एकंदरित असे किस्से खुप कमी असतात.
ह्या प्राण्याच्या ह्या बुद्धिमत्तेमुळेच केंद्रात ह्यांची विशेष निगा रखावी लागते. प्रणायोत्सुक नर अतिशय जास्त एग्रेसिव असतात व ते सतत लाथा मारत वा चावत असतात म्हणून त्यांना ठेवायला वेगळी जागा आहे.
(स्टड कोरल्स चित्र जालावरून साभार)
काही काही नाठाळ जनावरे ही प्रणयऋतू असो वा नाही कायम मारामारी मोड़ मधे असतात त्यांना ठेवायला वेगळा कोंडवाङा आहे
मॅटरनीटी वॉर्ड वेगळा इथे गाभण किंवा डिलीवरी जवळ आलेल्या अन ओल्या बाळंतिणी सांडण्या ठेवल्या जातात इथे त्यांच्या पिलांसोबत ती पिले घन आहार घेणे सुरु करेपर्यंत राहतात.
.
(मॅटरनीटी वॉर्ड)
ह्याच्या पलिकडेच मिल्क पार्लिंग एरिया आहे , इथे सांडणीची धार काढली जाते, कुठलेही यंत्र न वापरता माणसे इथे धार काढ़तात, धार काढ़ताना पर्यटक तिकडे फिरकले तर जनावरे बिचकु शकतात म्हणून तिथले फोटो नाही काढता आले (जालावर एक मिळाला तो इकडे देतो आहे)
(धार काढणे फ़ोटो जालावरून साभार)
उंटाचे बछड़े थोड़े मोठे झाले की त्यांच्यात सुद्धा टीनएजर प्रॉब्लम सारखे प्रॉब्लम असतात म्हणून त्यांना (वय वर्षे 3-5) ठेवायला वेगळे कोरल्स असतात ,
(टीनएजर कोरल्स)
उंटाच्या आहारात मुख्य समावेश असतो तो वाळवंटी खुरट्या वनस्पतींचा ह्यात बाभुळ, शमी, कडुनींब वगैरे झाडांचा समावेश असतो, लिंबोळ्या ह्या उंटाला विशेष प्रिय असतात. ह्या शिवाय केंद्रावर त्याना चराई सोडुन रोज त्यांच्या वय अन गरजेनुसार 3- 15 किलो मिश्र चारा ज्याच्यात हिरवे अल्फ़ाअल्फ़ा गवत भुईमुगाचे कुट्टी कुटार इत्यादी पौष्टिक जिन्नस दिले जातात , आठवड्यातुन एकदा 100 ग्रॅम खड़े मीठ पावशेर गुळ वगैरे पोषण सुद्धा त्यांना विशेषतः बाळांतीण असलेल्या सांडणीला दिले जाते , काही ऊंट संशोधन करायला म्हणून वेगळे बांधलेले असतात एकटे एकटे त्यांचा डाइट खुप कड़क कंट्रोल करुन ते कुठला चारा किती खातात शेण किती तयार होते त्याच्यात नत्र किती उष्मांक किती वगैरे संशोधन सतत सुरु असते.
(भुईमुग कुटाराचा ढिग)
ह्या सगळ्याशिवाय ऊंट हा वाळवंटाची कामधेनु आहेच. स्थानिक संस्कृती मधे त्याचे महत्व अपरंपार आहे, शुभकार्याला सोवळ्याचे जेवण उंटाच्या वाळल्या शेणाच्या आगीवर शिजवले जाते कारण ते शुद्ध समजले जाते, एक ऊंट (बीकानेरी जैसलमेरी) सरासरी वर्षाला 400-700 ग्रॅम केस देतो, हे केस पिंजून ते इतर धाग्यात मिसळून उबदार अन गर्मी च्या मोसमात चक्क गार राहणारी कापडं वीणली जातात, उंटाच्या कातड़ीची जॅकेट किंवा इतर उपयोगी वस्तु बनवल्या जातात. मालवाहतुक ते दूध सगळे काही करायला ऊंट उपयोगी असतो.
उंटाच्या दुधाचे वेगवेगळे खाद्य अन पेय प्रकार चाखायचे असल्यास केंद्रातच एक "कॅमल मिल्क पारलर" आहे तिथे उंटाच्या दुधाचे चहा कॉफ़ी, फ्लेवर्ड मिल्क, कुल्फी, वगैरे प्रकार विक्रीला ठेवलेले असतात. उंटाचे दूध किंचित खाराट अन मधुर असे असते, सवय नसता हे दुग्धपदार्थ ट्राय न करणेच उचीत , पचायला ते दूध कसे हे माहीती नसल्यामुळे मी तरी नाही केले ट्राय कारण आम्हाला अजुन प्रवास करायचा होता, तसे पाहता प्रोसेस केलेला पदार्थ म्हणजे फ्लेवर्ड मिल्क किंवा कुल्फी ट्राय करवायास हरकत नाही, केंद्राच्या मुख्य गेट वर हे मिल्क पार्लर आहे.
(कैमल मिल्क पारलर चित्र जालावरून साभार)
उंटाला माणसांचे निर्देश शिकवायला एक खास भाषा आहे त्या भाषेचे ज्ञान अन त्याचे उंटाला ट्रेनिंग द्यायला राजस्थान मधे एक खास जातीचे लोक बोलवले जातात त्यांना राजस्थानात राईका किंवा गुजरात मधे रेवाड़ी असे म्हणले जाते.
असे हे केंद्र तुम्हाला 2 तासात सहज पाहून होईल, आम्ही तिथे गेलो असता निघायची घाई असल्यामुळे आम्ही म्यूजियम नाही पाहिले तिथले ! पण एकंदरित स्वच्छता टापटीप माहीती अन अनुभव म्हणून खुप मजा आली
काही आमची वैयक्तिक स्मरणचित्रे (श्रेय आमचे मेव्हणे श्री. किरण)
सौ.बापुसाहेब एका ऊंट बाळाचे लाड करताना
.
बालऊंट नर्सरी
.
चराई कर्म करुन परत येणारा कळप
.
मॅटरनीटी वॉर्ड मधील निवांत मम्मी ऊंट
प्रतिक्रिया
16 Apr 2016 - 5:54 pm | मोदक
झकास धागा. क्रमश: आहे का?
बाकी तुमने नांव वाचून NMCC सारखे काहीतरी असेल असे वाटले ;)
16 Apr 2016 - 5:56 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाय ओ मोदक भाऊ ! संपला धागा! छोटेसे सेंटर आहे किती लिहिणार :)
16 Apr 2016 - 6:11 pm | एस
वा! छान माहिती. उंटावरील माहिती उपयुक्त. वाखुसाआ! ह्या केंद्राला भेट देण्याची उत्सुकता लागली आहे.
16 Apr 2016 - 7:00 pm | बोका-ए-आझम
लेख पण छान. Highway on my plate च्या एका भागात या केंद्राविषयी माहिती पाहिली होती. जैसलमेरच्या वाळवंटात उंटाच्या पाठीवरून फिरण्याचा अनुभव आहे. त्यांचा चेहरा असा असण्याचं कारण ते श्वासोच्छ्वास एकदम मंद गतीने करतात. त्यामुळे त्यांच्या अन्नपचनाचा वेगही एकदम संथ असतो, जो वाळवंटात, जिथे अन्न दिवसेंदिवस न मिळण्याची शक्यता असते, त्यांच्या कामाला येतो. ही खरी निसर्गाची किमया आहे!
16 Apr 2016 - 7:40 pm | कैलासवासी सोन्याबापु
आभार!
होय, ही माहीती लिहायची राहिली खरी!
ऊंट उन्हाळ्यात ७ दिवस अन हिवाळ्यात पंधरा दिवस पर्यंत विना चारापाणी राहु शकतात असे गाइड बोलला होता शिवाय जेव्हा ते परत rehydrate होतात तेव्हा मिनिटाला वीस लीटर वगैरे पाणी पिऊ शकतात.उपाशी असताना त्यांच्या मदारीत (कुबडात) साठवलेली चरबी जाळुन ते स्वतःसाठी पाणी अन ऊर्जा तयार करतात.त्यामुळे जेव्हा ते उपाशी असतात तेव्हा ते कूबड़ सपाट होत जाते !
16 Apr 2016 - 7:21 pm | मार्मिक गोडसे
खरंच नवीन माहीती मिळाली.
माझ्या मते शरीराचा एकही अवयव आकर्षक नसणारा हा एकमेव प्राणी असावा. अवयवच काय, त्याची चाल व आवाजही आकर्षक नाही आणि जीवनही रखरखीत वाळवंटात..
16 Apr 2016 - 9:34 pm | विजय पुरोहित
सहमत मा.गो. साहेब.
म्हणून तर संस्कृत कथा एक निर्माण झालीः अहो रूपम् अहो ध्वनिम्...
16 Apr 2016 - 7:41 pm | कैलासवासी सोन्याबापु
आभार गोडसे साहेब
16 Apr 2016 - 9:29 pm | टवाळ कार्टा
मस्तयं
16 Apr 2016 - 9:32 pm | विजय पुरोहित
बाप्पू हो! छानच माहिती दिलेली आहे. फोटो पण झकास!!!
16 Apr 2016 - 9:54 pm | अजया
सोन्याबापू लिहिते झाले मिपावर याचा आनंद झाला लेख बघून.
लेख नेहमीप्रमाणे मस्तंच!
16 Apr 2016 - 10:09 pm | अद्द्या
बापूंचा लेख म्हणजे गडबडीने उघडून बहितला ,
मस्तच ,
अजुनी किस्से येउद्यात बापू
16 Apr 2016 - 10:23 pm | लालगरूड
नमस्कार
16 Apr 2016 - 10:35 pm | कपिलमुनी
लेख आवडला !
दोन कुबडांचा (काय म्हणतात त्याला ?) उंट होता का ?
16 Apr 2016 - 10:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
कमु
प्रथम आपले आभार,
दोन कुबडे असलेल्या उंटाला बॅक्ट्रियन ऊंट म्हणतात हा ऊंट मुख्यत्वे थंड प्रदेश किंवा ज्याला कोल्ड डेजर्ट म्हणतात अश्या ठिकाणी जास्त सापडतो, तो लद्दाख मधे सापड़तो आपल्याकडे, ते ऊंट वाळवंटी वातावरणात टिकु शकत नाहीत त्यामुळे बीकानेर केंद्रात त्यांचेवर शोध सुद्धा होत नाही किंवा ते बाळगलेसुद्धा जाऊ शकत नाहीत तिथे
कश्मीर लद्दाख वगैरे भागात त्यांचे अनुसंधान केंद्र असल्यास कल्पना नाही!!.
17 Apr 2016 - 7:08 am | बोका-ए-आझम
का हे दोन वेगळे प्राणी आहेत?
17 Apr 2016 - 7:36 am | कैलासवासी सोन्याबापु
नाही नाही दोन मदारीचा ऊंट अन साधा ऊंट एक जीनस होते अन न्यू वर्ल्ड कैमेलिड्स म्हणजे लामा वगैरे वेगळे जीनस होते एकच प्रजातीचे
हे विकिपीडिया वर सापडले
16 Apr 2016 - 10:40 pm | कैलासवासी सोन्याबापु
टका
मांत्रिक जी
अजया तै
अद्द्या भाऊ
आपला आभारी आहे
लालगरुड़ ___/\___ नमस्कार
16 Apr 2016 - 10:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहितीपूर्ण लेख. चित्रांनी अजूनच मजा आणली.
16 Apr 2016 - 11:57 pm | अभ्या..
अरे वा बापूसाब. मस्तच माहीती की.
बसलेल्या उंटाचे फोटो पाहून जुनी आठवण आली. एका अॅनिमेशनच्या इंटर्व्ह्युला बसलेला उंट मेमरीने ड्रॉ करायला सांगितलेला. जवळपास कुणालाही त्याचे मुडपलेले पाय प्रॉपरली दाखवता आले नाही.
मला अशाच आर्मीच्या उंट प्रशिक्षण केंद्राचे वर्णन एका साप्ताहिकात वाचल्याचे स्मरते. त्यातल्या जवानांचे म्हणने की ओरल कमांड कळतात उंटाला पण त्यात त्याची मेमरी फार वीक असते. रेग्युलर सराव असेल तरच त्या पाळल्या जातात. खरे आहे काय हे?
17 Apr 2016 - 6:43 am | कैलासवासी सोन्याबापु
अभ्या भाऊ,
मला उलटे वाटते, मेमोरी वीक असती तर त्यांची अशी एक भाषा विकसीत झाली नसती, किंवा ऊंटाने लक्षात ठेऊन खुन्नसवर हल्लेही केले नसते, त्यांची मेमोरी स्ट्रॉन्ग असतेच (गाइड उवाच) फ़क्त ती त्यांना इतर प्राणी उदा हत्ती मानव डॉलफिन कुत्रा ह्यांच्यासारखी मुक्त वापरण्यावर बंधने असावी
17 Apr 2016 - 12:06 am | उगा काहितरीच
वा अगदीच वेगळ्या विषयावर छान लेख ...आवडला. उंट थुंकतो, उंटाने चाटले तर डोक्यावर केस उगवतात वगैरे रोचक (खखोदेजा) गोष्टींमागे कितपत सत्यता आहे ? कुणी सांगू शकेल काय ?
17 Apr 2016 - 6:48 am | कैलासवासी सोन्याबापु
उंटाने चाटल्यास केस उगवतात का? हे तर माहीती नाही पण थुंकण्याबद्दल एक निरिक्षण आहे अन गाइड ने सुद्धा सांगितले होते
प्रणयोत्सुक नर आपल्या गळ्यामधील एक ग्रंथी बाहेर काढतो आपल्या दोन्ही गालातून अन आपली इच्छा फुर्र फुर्र फुर्र करत जाहिर करतो त्यावेळी त्याच्या तोंडाला प्रचंड फेस येतो आता ह्यालाच जर "थुंकणे" म्हणले जात असेल तर माहीती नाही :D
17 Apr 2016 - 1:59 am | आदूबाळ
एक नंबर लेख! बहुत धन्यवाद!
17 Apr 2016 - 6:48 am | कैलासवासी सोन्याबापु
थैंक्स ईए काका अन आदूबाळ साहेब! :)
17 Apr 2016 - 9:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं धागा. ते पांढर्या मेवाडी उंंटाचं पिल्लु कसलं गोंडस आहे. लष्करवाले परत लिहिते झालेले पाहुन बहुत संतोष झाला हे.वे.सां.न.ल. :)!!!!
17 Apr 2016 - 10:12 am | कैलासवासी सोन्याबापु
___/\___
17 Apr 2016 - 9:58 am | इडली डोसा
ऊंटबद्दलची रोचक माहिती आवडली.
लष्कराला पण इथुनच उंट पुरवले जातात का? कि त्यांचे स्वतःचे उंट संगोपन/ प्रशिक्षण केंद्र आहे? तिथेही अश्याच प्रकारे उंटांची वर्गवारी आणि निगा ठेवली जाते का?
17 Apr 2016 - 10:11 am | कैलासवासी सोन्याबापु
लष्कर उर्फ़ रेगुलर आर्मी मधे ऊंट दस्ता असल्याचे माझ्या तरी माहीतीत नाहीत, असले तरी ते RVC उर्फ़ रिमाउंट एंड वेटर्नरी कोर अंतर्गत पैदास संगोपन अन पुरवठा केले जात असावेत, आर्मी फार्मच्या साहीवाल गाई प्रेसिडेंटस बॉडीगार्ड्सचे घोड़े वगैरेची काळजी हीच कोर घेत असे.
माझ्या माहीतीनुसार कॅमल कंटिंजेंट असलेली एकमात्र फ़ोर्स म्हणजे बॉर्डर सिक्यूरिटी फ़ोर्स उर्फ़ सीमा सुरक्षा बल ही पैरामिलिटरी संघटना आहे. त्यांचे प्रोक्योरमेंट अन ब्रीडिंग ते स्वतः करतात त्यांचा एनआरसीसी सोबत संबंध नाही
17 Apr 2016 - 10:22 am | इडली डोसा
प्रथमतर लष्कर आणि लष्करेतर ज्या काही संघटनांचा सर्सकट लष्कर अस उल्लेख केल्यबद्दल क्षमस्व!
लष्कर (आर्मी), बॉर्डर सिक्यूरिटी फ़ोर्स (सीमा सुरक्षा बल) आणि अश्याच अजुन ज्या संघटना आहेत ज्याचा माझ्यासारखी इग्नोरंट लोकं सरसकट लष्कर म्हणुन उल्लेख करतात त्यांचा एक परिचय देणारा लेख लिहावा हि विनंती. म्हणजे इथुन पुढे अशी चुक होणार नाही.
( खरतरं अजुन अश्या ज्या शासकीय संघटना आहेत त्यांचा उल्लेख करण्यापुरत्याही त्या माहित नाहित याची खरतरं लाज वाटतिये )
17 Apr 2016 - 10:28 am | कैलासवासी सोन्याबापु
अहो क्षमा वगैरे नको हो! प्लीज लोक जेन्युइन कंफ्यूज होतात त्याला कारण म्हणजे यूनिफार्म (कॉम्बैट ड्रेस) हा बराचसा सारखा असतो (कैमोफ्लाज ड्रेस) पण मुळात मिलिट्री अन पैरामिलिट्री चे रोल्स खुप वेगळे असतात , त्यावर पुन्हा कधीतरी!
बाकी कुठल्या संघटनेबद्दल बोलत होतात आपण ? मला काही माहीती असली तर मी निश्चित देईल आपल्याला आनंदाने
17 Apr 2016 - 10:33 am | इडली डोसा
बिएसएफ मध्ये या उंटांना काही विषेश प्रशिक्षण वगैरे दिले जाते का? किंवा त्यांच्या कारवायांमधे या ऊंटाची काय आणि कश्याप्रकारे विशेष मदत होते या बद्दल जाणुन घ्यायला आवडेल.
17 Apr 2016 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार
एका वेगळ्याच विषयावरची चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, उंटाच्या जाती आणि प्रत्येक जातींची वैशिष्ठ्ये माहित नव्हती.
उंटांचे पाय वैशिष्ठ्यपूर्ण असतात. अत्यंत तापलेल्या वाळुवरुन ते सहज चालु शकतात. हा प्राणी अन्नपाण्याविना कित्येक दिवस राहू शकतो.
उंटाचे दुध हे औषधी आहे असे ऐकले होते. डायबिटिस वरचे ते एका प्रभावी औषध आहे असे कुठेतरी वाचण्यात आले होते.
पैजारबुवा
17 Apr 2016 - 10:24 am | पैसा
मस्त लेख! उंटांची पिले सगळीच खूप छान दिसत आहेत. सांडणीचे दूध शेळीच्या दुधासारखे असते का?
17 Apr 2016 - 10:33 am | कैलासवासी सोन्याबापु
पै तै,
नाही ग, सांडणीचे दूध वेगळे असते फार ! पचायला विलक्षण जड़ असते कच्चे दूध अन जाणवण्या इतके खाराट असते चवीला.
पैजार बुआ
होय बहुतेक सांडणीच्या दुधात नैसर्गिकरीत्या इन्सुलिन आढळून येते अश्याच प्रकारचा रिसर्च सद्धया केंद्रात सुरु होता म्हणे.
17 Apr 2016 - 10:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
रच्याकने कुठेतरी बर्याचं वर्षांपुर्वी असं वाचलेलं की व्यापारी उंटांच्या ताफ्यावर हल्ला करणार्या दरोडेखोरांना उंटांनी तुडवुन मारलेलं. दोन उंट गोळीबारामधे जायबंदी झालेले.
17 Apr 2016 - 10:41 am | जव्हेरगंज
रोचक धागा!
आवडला !!
17 Apr 2016 - 11:09 am | राही
एका अनवट विषयावरचा नावीन्यपूर्ण माहितीने भरलेला लेख आवडला. आपला लेख तसाही उघडून पाहिला असताच. फोटो छान आहेत. एरवी उटांना गोंडस म्हणायला मन धजावले नसते. पण इथली पिल्ले खरोखर गोंडस दिसताहेत.
अवांतर (१) : उंट (आणि गाढवेसुद्धा) खाताना जबडा डावीकदून उजवीकडे आनि पुन्हा उजवीकडून डावीकडे असा हलवतात. त्यामुळे प्राचीन काळातल्या एका भारतीय लिपीला खरोष्ट्री हे नाव पडले कारण ह्या लिपीत एक ओळ डावीकडून उजवीकडे व खालची ओळ उजवीकडून डावीकडे अशा लेखनाची पद्धत होती. (खर=गाढव, उष्ट्र=उंट)
अवांतर (२) : कान्हेरीच्या एका शिल्पपट्टिकेमध्ये दोन वशिंडे असलेले बॅक्ट्रियन उंट दिसतात. (अन्य काही तुरळक ठिकाणीही आहेत.) यावरून असा निष्कर्ष काढता आला की-१) कारागिरांना हे उंट परिचयाचे असावेत, बॅक्ट्रियन प्रदेशाशी त्या काळी घनिष्ठ संबंध असावेत. २) या शिल्पांसाठीच्या देणगीदारांमध्ये बॅक्ट्रियनांचा समावेश असावा, त्यांचे येथे म्हणजे या बौद्धमठात येणेजाणे असावे. म्हणजे बॅक्ट्रियातल्या बौद्धमठांचा कान्हेरीशी संपर्क असावा.
17 Apr 2016 - 11:14 am | कैलासवासी सोन्याबापु
जबरदस्त प्रतिसाद राही जी ___/\___
खरोष्टी बद्दल माहीती होते थोड़ेबहुत पण कान्हेरी मधे बॅक्ट्रियन ऊंट असल्याचे अजिबात आईडिया नव्हती!! आभारी आहे आपला
17 Apr 2016 - 11:22 am | अभ्या..
खरोष्ट्री आणि कान्हेरीतल्या बॅक्ट्रीयन उंटाबद्दल धन्यवाद राहीताई.
17 Apr 2016 - 12:05 pm | राही
या लिपीला खरोष्ठी असेही म्हणतात, किंबहुना हेच नाव जास्त प्रचलित आहे आणि त्याची फोड खर+ओष्ठ अशी केली जाते. (खरे तर याचा संधि खरौष्ठ आणि त्यावरून खरौष्ठी असा व्हायला हवा, पण कालौघात थोडा बदल होतो शब्दात.) म्हणजे गाढवाच्या जबड्या प्रमाणे मागेपुढी डावी-उजवी हलणारी. खरौष्ट्री या शब्दामध्येसुद्धा खरौष्टी-खरोष्टी असा बदल झालेला आहेच.
17 Apr 2016 - 1:02 pm | चांदणे संदीप
तुमच्या लेखातून उंटाचे आताचे वास्तव प्रामुख्याने दिसते आणि जरा सुखावणारेही आहे. पण थोड्याच वर्षापाठीमागे अशी परिस्थिती नव्हती. अगदी हे राष्ट्रीय उष्ट्र संशोधन केंद्र १९९५ मध्ये सुरू झाले असले तरीही!
"मौज" च्या गेल्या (२०१५) दिवाळीतल्या अंकात लेखिका विनया जंगले यांचा उंटावरचा रोचक आणि माहितीपूर्ण लेख वाचनात आलेला.
त्यात त्यांनी उंट आणि उंटावर संशोधन करणाऱ्या जर्मन स्त्री - पशुवैद्य इल्से कोहलर रोफेलसन यांच्याबद्दल थक्क करून सोडणारी माहिती लिहिली आहे. ह्यांचे कार्य प्रामुख्याने रायका समाजातल्या लोकांबरोबर राहून, त्यांच्यात मिळून-मिसळून, राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यातील "कॅमल कंझरवेशन सेंटर" इथे चालते.
इथे बऱ्याच जणांना कदाचित माहीती नसेल असे समजून थोडक्यात लिहितो.
१) इल्से यांच्या अविरत प्रयत्नांमुळे उंटामध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या गर्भपाताच्या समस्येला वाचा फुटून त्यावर प्रतिबंधक लस वगैरे संशोधनाचे काम सुरू झाले आहे.
२) इल्से यांना २०१४ चा राजस्थान मधला मानाचा "मारवाड रत्न" हा पुरस्कार मिळाला आहे व त्यांच्याच कष्टांना फळ येऊन राजस्थान सरकारला अतिउशिराका होईना बुद्धी प्राप्त होऊन, २०१४ मध्येच उंटाला "राज्यप्राणी" घोषित केले आहे.
३) उंटाच्या दुधात विशीष्ट प्रकारची प्रकारची प्रोटीन्स असतात, ती प्रतिजैविकांप्रमाणे काम करतात. उंटाच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा दहापट 'क' जीवनसत्व असते.
४) उंटाच्या दुधात इन्सुलिन असते व मधुमेहाच्या सुरूवातीच्या स्थितीत जर सलग दहा दिवस उंटाचं दूध घेतल, तर मधुमेह पूर्ण बरा होतो!
५) उंटामध्ये खरूज मोठ्या प्रमाणावर होतो.
जर्मनीतील एक स्त्री अमेरिकेतील सुखवस्तू जीवन त्यागून, परिवारापासून दूर राहून, भारतात खेडोपाडी काम करते ही कल्पनाच भारावून सोडते आपल्याला!
आवर्जून वाचावा असा हा लेख आहे. असो. बापूसाहेबही मिपावर एक मोठा पॉज घेऊन लिहिते झाले याबद्दल खूप आनंद आहे..
बापूसाहेब पॉज जरा छोटे घ्यावेत एवढीच नम्र विनंती! ___/\___
जयहिंद!
Sandy
17 Apr 2016 - 3:53 pm | शलभ
हा लेख वाचलेला मी. तुम्ही चांगला गोषवारा दिलात.
बापूसाहेब.. तुमची माहिती खूप मस्त. नक्कीच भेट देण्यात येईल. परत लिहीते झालात त्याचा आनंद आहे.
18 Apr 2016 - 5:25 pm | विजय पुरोहित
@ संदीप चांदणे
अतिशय उत्तम गोषवारा दिलात त्याबद्दल धन्यवाद! मूळ लेख मी वाचला नव्हता. पण आपण अतिशय छान माहिती थोडक्यात दिलेली आहे.
18 Apr 2016 - 8:29 pm | कैलासवासी सोन्याबापु
चांदणे साहेब अप्रतिम माहीती! आता हा लेख मिळवून वाचणे आले! जबरदस्त प्रतिक्रिया बद्दल आभार
19 Apr 2016 - 1:52 pm | गुलाम
तो लेख मस्तच होता. त्यातली मला रोचक वाटलेली आणखी एक माहिती मादी उंटाबद्द्ल होती. उंट खूप इमोशनल प्राणी आहे. विशेषतः मादी उंटाचे आपल्या नरावर खूप प्रेम असते. एका कळपामध्ये एकच नर आणि बाकी सगळ्या माद्या असतात आणि त्या आपल्या नराशी एकनिष्ठ असतात. जर दुसरा एखादा नर जबरदस्तीने कळपात घुसायचा प्रयत्न करत असेल तर सगळ्या माद्या मिळून त्याला हुसकाउन लावतात. इतकेच नाही, जर कळपातला नर काही कारणाने मेला किंवा मालकाने त्याला विकले तर कळपातल्या सगळ्या गर्भार माद्यांचा गर्भपात होतो. मला हे फारच विलक्षण वाटले.
बाकी, या निमित्ताने बापू लिहिते झाले हे फक्कड झाले.
17 Apr 2016 - 1:32 pm | मधुरा देशपांडे
छान लेख आणि माहिती.
17 Apr 2016 - 4:19 pm | आतिवास
वेगळ्या विषयावरचा उत्तम लेख.
18 Apr 2016 - 5:18 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेख आवडला. एक वेगळाच प्राणी वाटतो उंट.
18 Apr 2016 - 5:27 pm | सस्नेह
आणि फोटो. उंट या प्राण्याबद्दल इकडे पश्चिमेत फारच अज्ञान आहे. वरची माहिती वाचून थोडा प्रकाश पडला.
18 Apr 2016 - 5:42 pm | अप्पा जोगळेकर
सुंदर माहितीपूर्ण लेख आहे. फोटोतले उंट छान आहेत.
फक्त सगळ्यांना एकदा आंघोळ घालावी असे वाटते.
18 Apr 2016 - 5:52 pm | मदनबाण
मस्त माहिती आणि फोटू.
उंटावर बसणे, उंटाचे बसुन उठणे आणि उभा उंट बसणे हा अनुभव फारच मजेशिर असतो... जिथे शक्य असेल तिथे या वाळवंटाच्या जाहाजावरुन मला सफर करणे आवडते.
असा एक अनुभव मी गुहागरला सुद्धा घेतला होता :- चित्रमय कोकण दर्शन (भाग ४) गुहागर समुद्र दर्शन.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डि... ;) :- Genius
18 Apr 2016 - 5:53 pm | चिनार
वा बापूसाहेब !! एक नम्बर माहिती !!
अहो बापू.... या केंद्राचे प्रमुख श्री नितीन पाटील माझे नातेवाईक आहेत...आपल्या अकोल्याचेच आहेत ते...
18 Apr 2016 - 8:26 pm | कैलासवासी सोन्याबापु
ओये तेरी! अकोल्याचे लेकरं लैच टॅलेंटेड (जीभ चावणारी स्माइली) पैले माहीती असते चिनार भाऊ तर आवर्जून भेट घेतली असती त्यांची! आता परत कधी जाणे झाले तर पाहु!
18 Apr 2016 - 6:07 pm | सूड
नाव बघून लेख उघडला. नेहमीप्रमाणेच छान!!
18 Apr 2016 - 8:34 pm | कैलासवासी सोन्याबापु
मधुरा ताई, अतिवास ताई, मेहेंदळे साहेब, स्नेहांकिता ताई, आप्पा साहेब, बाण भाऊ, सूड राव
आपले अनेक आभार _/\_
18 Apr 2016 - 9:13 pm | विवेकपटाईत
छान माहिती. या आधी उंटाना २६ जानेवारीच्या आधी विजय चौक वर बघायचो. आज माहिती वाचायला मिळाली.
19 Apr 2016 - 12:06 pm | नाखु
खणखणीत आगमन तेही उंटावरूनच नाही तर उंटासोबत...
ता.क. येताना एखादा उंट आणला की नाही. मिपावर बरेच शहाणे वाट पहातायत त्याची...
उटपटांग नाखु
19 Apr 2016 - 6:51 pm | मी-सौरभ
अपेक्शेप्रमाने ऊतम लेख..
पु ले ल टा
19 Apr 2016 - 8:49 pm | सुबोध खरे
बापूसाहेब
आपल्या ताज महालाला वीट लावतो आहे. (आपली क्षमा मागून)
उंटाची स्मरणशक्ती अतिशय उत्तम असते. नौदलात ओखा(१९८९) येथे असताना तेथून कच्छच्या रणात जखाऊ, मांडवी ई ठिकाणी जाण्याचे प्रसंग आले. त्या वेळेस तेथील कस्टम अधिकाऱ्यांशी संबंध आले तेंव्हाची हि कहाणी. अफघाणीस्थानातील अफू हि पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने पाकिस्तानात येते. तेथून ती सिंध मध्ये येत असे. कच्छ आणी राजस्थानच्या सीमेवरील गावात हि अफू येत असे. दिपलो, बदीन अशी काही पाकिस्तानातील गावे आज आठवत आहेत. तेथे हि पुडकी उंटांच्या पोटाला बांधून त्यांना सांडणी स्वाराशिवाय भारतात सोडत असत. तेंव्हा आपली सीमा फारच सच्छिद्र होती. हे उंट रात्रीचे सीमा पार करीत आणी आपल्याकडे येत. उंटावरील सीमा सुरक्षा बलाचे गस्त घालणारे जवान दिसले कि हे उंट खाली बसत. आता असे अनेक रानटी ऊंट तेथे बसलेल असत. प्रत्येक उंटाला उठवून पोट तपासणे शक्य नसे. हे उंट आपल्या भारतातील ठिकाणी पोहोचले कि त्यांना खाणे पाणी अशी उत्तम त्यांची बडदास्त ठेवली जात असे आणी दुसर्या दिवशी हे परत उलट्या प्रवासाला निघत आणी तुम्ही पकडले तरी त्या उंटाला उठवणे हे महाकर्म कठीण काम त्यातून त्याचे पोट तपासून तेथील अफू घेऊन त्या उंटाला अटक करून (पुरावा म्हणून) लाखपतच्या किंवा खावडाच्या पोलीस ठाण्यावर आणायचे हे त्यातून अजून कठीण काम होते. उंट फारच अडेल तट्टू ( कि अडेल उंट) असतात आणी दुसर्याच माणसाबरोबर तिसर्या ठिकाणी जाता जात नाहीत. ( "बैठे उंट को उठाना आणी आडियल जाट को समझाना नामुमकीन है" अशी उत्तर राजस्थानात म्हणच आहे)
कच्छ मध्ये आजही अनेक मुसलमान असे आहेत कि त्यांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत. आणी या लोकांनी या तस्करीतून अमाप पैसा मिळवला आणी इथे इस्टेटी केल्या याचा कच्छ मधील लोकांना अजूनही राग आहे. कारण एक किलो अफू ची तेंव्हा पाकिस्तानात किंमत १ लाख रुपये होती आणी भारतात १० लाख रुपये. जेंव्हा हि अफू भारतातून अमेरिकेच्या किनार्यावर उतरत असे तेंव्हा तिची किंमत १ लाख डॉलर्स होत असे. इतका प्रचंड नफा या व्यवसायात असे. यातील काही लोक शस्त्रास्त्रांच्या तस्करीतही गुंतलेले आहेत.
असो.
19 Apr 2016 - 9:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
"बैठे उंट को उठाना आणी आडियल जाट को समझाना नामुमकीन है" अशी उत्तर राजस्थानात म्हणच आहे
ही म्हण साक्षात् धाकट्या मेव्हण्याच्या जाट मित्रानेच हसत हसत सांगितली होती :D
बाकी क्षमा वगैरे नको प्लीज! तुमचे अनुभव एनरीचिंग असतात खुप जास्त ! अतिशय हैंडी अन उपयोगी सुद्धा. कच्छची बॉर्डर आता खुपच जास्त टाइट केली गेली आहे, आमच्या काही बीएसएफ मधील मित्रांनुसार आता सर क्रीक उर्फ़ हरामी नाला सुद्धा सील केलाय आजकाल , शिवाय तिकडे बीएसएफ चं प्रसिद्ध अन खास असे क्रीक क्रोकोडाइल कमांडोज़ दल तैनात असते, असं ती बीएसएफची माणसे सांगत होती.
19 Apr 2016 - 10:34 pm | श्रीरंग_जोशी
उंटाबाबत प्रथमच एवढे तपशीलवार वाचण्यास मिळाले. मनःपूर्वक धन्यवाद सोन्याबापू. तुमची लेखनशैली एकदम सहज पण खिळवून ठेवणारी आहे.
राही, संदीप चांदणे व डॉ. खरे यांचे प्रतिसादही आवडले.
एक प्रश्न - सांडणीस्वार हा शब्द का वापरला जात असावा? नर उंटांपेक्षा मादी उंटाचा उपयोग वाहतुकीसाठी अधिक होतो असे काही कारण आहे का?
20 Apr 2016 - 2:28 pm | उल्का
तुम्ही ह्या स्थळाला भेट दिलीत आणि आम्हालाही घडवुन आणलित तीही अतिशय सविस्तरपणे ह्याबद्दल धन्यवाद.
राही, सन्दीप चान्दणे आणि सुबोध खरे ह्यान्चे प्रतिसादही माहितीपूर्ण आहेत.
लेख आणि हे प्रतिसाद दोन्ही आवडले. :)
20 Apr 2016 - 2:47 pm | पिलीयन रायडर
लेख आवडला. उंटाबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती. आज लेख आणि प्रतिसादातुन बरंच काही कळालं.
बापु परत लिहीते झाले ह्याचाही आनंद आहेच!
23 Apr 2016 - 12:44 pm | कैलासवासी सोन्याबापु
आभार पंत उल्काजी अन पिरा तै.
पंत सांडणीस्वार का म्हणतात ते माहीती नाही पण ऊंट स्वारांना सारवान सुद्धा म्हणतात असे ऐकल्याचे स्मरते.
फोटो तासात आणल्याबद्दल सासं मंडळीचे मनःपूर्वक आभार
30 Apr 2016 - 9:18 am | अभिजीत अवलिया
वा. एका तितक्याश्या सुंदर नसणाऱ्या प्राण्याची ओळख आवडली. संदीप चांदणे ह्यांनी देखील चांगली माहिती दिलेली आहे.
कॅप्टन जॅक स्पॅरो ह्यांच्याशी सहमत. ते मेवाड़ी ऊंट पांढरे पिलु खरच खूपच देखणे आहे.
30 Apr 2016 - 9:38 am | प्रचेतस
अरेच्चा, हा धागा वाचलाच नव्हता.
जबरीच माहिती.
30 Apr 2016 - 12:13 pm | स्वामी संकेतानंद
जबरदस्त कमब्याक हो बापूसाहेब!
7 Mar 2019 - 3:11 pm | गोरगावलेकर
उंट आणि उंदीर एकाच दिवशी पहिले.
मी २०१६ ला येथे जाऊन आले आहे तरीही इतकी सविस्तर माहिती मिळाली नव्हती. आधीच हा लेख वाचनात आला असता तर सहलीची मजा अजून वाढली असती.
येथून जवळच म्हणजे साधारण २५ किमीवर असलेल्या देशनोक येथील करणी देवी मंदिरालाही भेट दिली. मंदिरात प्रवेश केल्यापासून संपूर्ण परिसरात हजारो उंदीरच उंदीर नजरेस पडतात. यांना काबा असे म्हणतात व देवीचे पुत्र आहेत असा समज आहे. पायाखाली उंदीर येऊ नये म्हणूनच आपल्याला जमिनीवर पाय घासतच चालावे लागते. उंदरांचा उष्टा प्रसाद आधी देवीला दाखवून मगच भक्तांना वाटला जातो. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार कोणालाच उंदरांपासून आजार वा इतर काहीच त्रास होत नाही.
परिसरातच म्युझिअम आहे तेथे करणी देवीचे आयुष्य व आयुष्यातील घटना
चित्रांमधून दाखविल्या आहेत.
11 Mar 2019 - 11:01 am | खंडेराव
आणि प्रतिक्रिया सुद्धा.. राजस्थान दौऱ्यात नक्की बघतो हे सेंटर.
संदीप चांदणे यांनी उल्लेख केलेल्या isle kohler बाईंचे Camel Karma: Twenty Years Among India's Camel Nomads हे पुस्तक कालच वाचून संपवले आणि आज हा लेख पहिला. isle बाईंच्या कष्टाला सलाम. तुम्हाला जर उंट आणि एकूणच उंटाभोवतालच्या वातावरणाविषयी इंटरेस्ट असेल, तर हे पुस्तक जरून वाचावे. आपण एकूणच आपल्या वारश्याविषयी किती निष्काळजी आहोत हे कळते.
11 Mar 2019 - 3:58 pm | गोरगावलेकर
माझ्या बिकानेर सहलीत मी एक रात्र राजस्थान पर्यटन मंडळाच्या हॉटेल "ढोला मारु" मध्ये राहिले. सेवा-सुविधा ठीकठाक, अतिशय अस्वच्छ. नाही आवडले.
एक रात्र बिकानेर स्टेशनजवळील "हॉटेल जसवंत भवन" मध्ये राहिले. (जुने नाव दाऊदसार हाऊस ) इ.स. १९२६ मध्ये रावबहादूर जसवंत सिंग (तेव्हाचे बिकानेर संस्थानचे शेवटचे पंतप्रधान यांनी बांधलेले हे भवन पारंपरिक वास्तू स्थापत्यानुसार म्हणजे झरोके, जाळ्या, चौक युक्त अशी एकमजली सुंदर इमारत आहे.
सध्या इमारतीच्या तळमजल्यावर काही भागात स्वतः मालक राहतात व इतर जागेत व पहिल्या मजल्यावरील खोल्या हॉटेलमध्ये येणाऱयांसाठी भाड्याने दिल्या जातात.
रूम अतिशय स्वछ न नीटनेटक्या आहेत. रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असूनसुद्धा शांत वातावरण आहे. आधी सांगितले तर नाश्ता, जेवण बनवून मिळते. जेवण खरोखर खूप रुचकर असते.
आमच्या ग्रुपला घेण्यासाठी यजमान स्वत: रेल्वे स्टेशनवर हजर होते. त्यांच्या पत्नीही हॉटेलच्या देखभालीचा भार उचलतात व जेवण स्वतः तयार करतात. (त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे असे सांगितल्याचे स्मरते)
तेव्हा बिकानेर भेटीत हॉटेल निवडताना हा पर्याय निश्चित लक्षात ठेवावा.
तिसऱ्या फोटोत मालकीण बाईंसोबत (साडीतील) आमच्या गृपमधील महिला सदस्य