body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
हॅलो, सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा! मी विकी, व्हिक्टोरिया मट्यास! आमच्या हंगेरियन मध्ये "उटिजैम अ विलागबान" “Útjaim a világban” म्हणजे my journeys in the world ! माझा जगप्रवास!! माझ्या ह्या जगप्रवासातले अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी मूळची हंगेरीची पण आता कामानिमित्त गेली अनेक वर्षे फ्रांकफुर्ट मध्ये राहते. असं म्हटलं खरं की मी फ्रांकफुर्ट मध्ये राहते पण माझं वास्तव्य खरं तर सूटकेस मध्येच असतं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कामानिमित्त मला अनेक ठिकाणी, देशोदेशी अगदी वेगवेगळ्या खंडात फिरावे लागते.. आणि खरं सांगू का? मला ते आवडतं सुध्दा.. तशी मी 'भटक्या' स्वभावाचीच आहे. I am a traveller by nature and not a tourist! म्हणजे देशोदेशी भटकून तिथली लोकं, त्यांचं रहेनसहेन, त्यांचं फूडकल्चर, त्यांची संस्कृती पहायला, अनुभवायला नुसतं टूरिस्ट स्पॉट बघण्यापेक्षा मला जास्त भावतं. अगदी लहानपणापासूनच मला फिरायला, वेगवेगळी ठिकाणं पहायला आवडतं. प्रवासाचा मला कंटाळा कधीच येत नाही; उलट एक वेगळीच उर्जा मिळते! अमेरिका, अफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप तर आहेच.. अशा पाचही खंडात मी वेगवेगळ्या कारणांसाठी फिरले आहे.
मी जेव्हा युनिवर्सिटी मध्ये शिकत होते ना, तेव्हा स्टुडंट एक्चेंज प्रोग्राम मध्ये मी कॅनडाला गेले. अगदी १६,१७ वर्षांची असेन, कोवळं वय, इंग्लिश येतं होतं पण बोलायची सवय नव्हती. हंगेरीत त्यावेळी आमची हंगेरियन भाषा आणि स्लोवाक नाहीतर जर्मन चालायची. इंग्लिश फार कमी! त्यातून मी जरा बुजरीच होते. ग्रामर चुकेल, वर्गातले बाकीचे हसतील ह्या भीतीमुळे बोलायची सवय नव्हती पण इथे आता पाण्यात पडले होतेच, लागले हात पाय मारायला! ग्रामर वगैरेचा विचार न करता बोलायला लागले आणि मग हळूहळू भीड चेपत गेली. जरी स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम मध्ये येथे आले असले तरी ३.५ महिने रहायचे होते आणि मी स्टुडंट वर्क परमिट वर आले होते. मी जिथे राहत होते ती एक पर्यटकांची पर्वणी असलेली जागा होती. खूप टूरिस्ट तिथे सतत येतजात असत. अशा ठिकाणी मी एक स्टुडंट म्हणून एका इटालियन रेस्तराँ मध्ये काम केले. हंगेरी सारख्या आधी कम्युनिस्ट आणि मग सोशालिस्ट असलेल्या देशातून आलेल्या माझ्यासारख्या १६ वर्षाच्या मुलीसाठी कॅनडातले हे मुक्त वातावरण फारच वेगळे होते. इथे सगळे लोकं फ्री होते, ओपन होते, हसून खेळून बोलत वागत होते. extremely approachable होते.
मी जिथे राहत होते, ते अगदी लहानसे गाव! त्या गावातल्याच एका व्हिलामध्ये मी पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. आमच्या घराच्या मागेच घनदाट जंगल होते आणि तेथले अनेक प्राणी आमच्या इथे अनेकदा दिसत. पेक्स सारख्या शहरात वाढलेल्या मला त्याची फार गंमत वाटत असे. आमच्या मालकिणबाईंच्या अंगणातल्या चेरीच्या, हेझलनटच्या झाडावर खूप पक्षीही यायचे. त्यांचा किलबिलाट ऐकत एकदा अशीच रविवारच्या सकाळच्या उबदार उन्हात अंगणात खुर्ची टाकून कॉफी पित बसले होते, तर तेथे अस्वलाचे लहानसे पिल्लू जंगलातून रस्ता चुकून आले. ते भेदरलेले होते आणि त्याला बघून मी अगदी एक्साइट झाले. लगेचच माझ्या लँडलेडीला बोलावून घेतले मी अंगणात. आम्ही मग त्याला दूध पाजले. मी त्याच्याशी खेळत होते पण त्याची आई आता त्याला शोधत इथे येईल. त्याच्या जास्त जवळ जाऊ नकोस असं बजावून मालकीणबाई आत गेल्या आणि पाचच मिनिटात त्यांनी मलाही आत बोलावले. मग आमची चाहूल लागू न देता खिडकीतून आम्ही दोघी ते पिल्लू काय करतं हे पाहू लागलो. आधीचं भेदरलेलं ते पिल्लू आम्ही दूध पाजल्याने आणि थोडा वेळ त्याच्याबरोबर घालवल्यामुळे थोडं आश्वस्त झालं होतं. पण आता आम्ही दोघी दिसेनाशा झाल्यामुळे ते टेडी, ते पिल्लू परत कावरेबावरे झाले होते. मला अंगणात त्याच्याजवळ जावेसे वाटत होते. पण माझ्या मालकीणबाईंनी माझा एक हात घट्ट धरला होता आणि दुसर्या हाताचे बोट तोंडावर ठेवून ती मला न बोलण्याचा इशारा करत होती. आम्ही खिडकीला चिकटूनच होतो. दहा एक मिनिटातच आई अस्वल आली आणि पिल्लाला घेऊन मागच्या झाडीत दिसेनाशी झाली. "आता समजलं, मी बाहेर का थांबायचं नाही म्हटलं ते?" मालकीणबाई मला मग त्यांचे असे अनेक अनुभव सांगू लागल्या. कॉफी पित मग आमच्या जंगलगप्पा रंगू लागल्या.
तेथे असतानाच एकदा एक रम्य संध्याकाळी आम्ही अंगणात बार्बेक्यु लावायचे ठरवले. अंगणातून घरात अशी आमची बार्बेक्यूची तयारीची ने आण चालू होती. ट्वायलाइटचे संध्यारंग पसरले होते. घरट्याकडे परतणार्या पक्षांच्या किलबिलाटाचं संगीत होतं. अंगणातच बसून रहावंस वाटणारं असं सुंदर वातावरण होतं आणि 'तो' आला. सोनेरी बुट्ट्यांचा, डौलदार शिंगांचा, उमदा, देखणा काळवीट! तो कळप चुकून आलेला वाटला नाही तर बाकीचे खूप मागे राहिले असावेत आणि बहुदा हा कळपाचा म्होरक्या खूप पुढे आला असावा आपल्याच नादात, आपल्याच मस्तीत.. समोर एकदम रस्ता दिसल्यावर बावरला. आणि मग त्याच डौलात चपळतेने उड्या मारत पुन्हा शेजारच्या जंगलात दिसेनासा झाला. तो काळवीट, त्याची ऐट कॅमेरात बंद करायला कॅमेरा आणायला आत जाण्याइतका वेळ नव्हताच. मी अगदी चुकचुकले कॅमेरा हातात नाही म्हणून पण मग बार्बेक्यू कारायचं म्हणून आत जाऊन कॅमेरा आणला आणि , आणि मग एक मोठ्या नाकाचा 'मूस' आला. त्याला मात्र मी लगेच कॅमेर्यात बंदिस्त केलंच पण ते दृश्य माझ्या मनात अगदी कोरलं गेलं आहे. आमच्या मालकीणबाईंना किवा तिथे राहणार्या बाकीच्या लोकांना हे असे प्राणी दिसणे नेहमीचेच होते पण माझ्यासारख्या शहरी वातावरणातल्या मुलीला असे अनुभव फार रोमहर्षक आणि तितकेच आनंददायी होते.
एम बी ए ची डिग्री घेतल्यानंतर मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला लागले आणि कामाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी भटकंती सुरू झाली. परत कॅनडा, अमेरिकेला जाणे झाले. पण माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे ते कॅनडा मधलं हे पहिलं वास्तव्य!
मी एका प्रोजेक्ट साठी ऑस्ट्रेलियात चांगले ८-९ महिने गेले होते. त्यामुळे तेथले लोकं, त्यांची जीवन पध्दती, त्यांची कामाबद्दलची अॅटिट्युड ह्याची चांगलीच ओळख झाली. त्यांचा वेगळेपणाही जाणवला. युरोप मध्ये विशेषतः जर्मनीमध्ये काम करताना एखाद्या मुद्द्यावर जर दुमत असेल तर चर्चा, आर्ग्युमेंटस होतात. एका बाजूने दोन पायर्या खाली उतरल्या जातात, तर दुसर्या बाजूने दोन पायर्या वर चढल्या जातात आणि एका कॉमन ग्राउंड वर दोन्ही बाजू येऊन विचार करतात ह्या गोष्टीची मला सवय! पण ऑस्ट्रेलियात एकदमच एखादा इश्यु रेझ केला जायचा. हे मला खूपच नवीन होते. सुरूवातीला मी बावरून गेले. जेव्हा 'एस्क्लेशनची त्यांची व्याख्याच वेगळी आहे' असं लक्षात घेतल्यानंतर मग त्या पध्दतीशी जुळवून घेत स्वतःला थोडे रुळवून घेतले. तेथला प्रोजेक्ट संपत आल्यावर मी चक्क महिनाभ्राची सुटी घेतली आणि ऑस्ट्रेलियातली बाकीची ठिकाणे आणि न्यूझीलंड फिरून आले. नाहीतर २४ तासांचा विमान प्रवास करून युरोपातून ऑस्ट्रेलिया बघायला जाण्याइतका सलग वेळ काढणं कठिणच होतं. तेथेच असताना कामाकरता सिंगापूर, मलेशिया, जपान येथेही जावे लागत असे. मग साधारण गुरुवार, शुक्रवारी काम संपेल असे पाहत असे मी, मग त्याला जोडूनचा विकेंड तिथल्या गोष्टी, ते गाव पाहण्यात घालवता येत असे. एरवीही ऑस्ट्रेलियातले विकांत मी आजूबाजूचा परिसर पाहण्यात रमत असे.
जपानमधली सांगण्यासारखी वेगळी गोष्ट म्हणजे ऑफिसची वेळ संपली तरी जपान्यांच्या कामाच्या वेळा संपतच नसत. काही काम नसले तरी बॉस ऑफिसातून बाहेर निघत नाही म्हणून मग बाकीचेही बसून राहत, काही तरी कामं काढून काढून कर बसत. पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफ यात कायम बॅलन्स राखायची सवय असलेल्या कामाच्या संस्कृतीतून आलेल्या मला हा बसलेला धक्काच होता. पण जपानी लोकं मात्र फार मृदु, अगत्यशील आणि मदत करायला तत्पर असणारे आहेत. श्रीलंकेतला कामाच्या बाबतीतला अनुभव मात्र जपानपेक्षा अगदी वेगळा आणि मला फार आश्चर्यचकित करणारा होता. तेथले लोकं पाश्चिमात्य कामाच्या पध्दतींना फार चांगल्या प्रकारे सामोरे गेले. मदतीचा हात तर पुढे होताच पण वेस्टर्न वर्क कल्चर बरोबर हातात हात घालून चालण्याची त्यांची मनोभावना दिसली. अर्थात मी फार काळासाठी तेथे गेले नसल्यामुळे सरसकटीकरण करू शकणार नाही.
कामानिमित्त जर ४-६ दिवस एखाद्या नव्या ठिकाणी जायचे असेल तर जोडूनचा विकांत तेथे घालवायचा, तेथला परिसर, ते गाव, शहर पहायचे अशी मला सवयच लागून गेली. एक तर कामाचा ताण कमी होऊन एकदम रिफ्रेश, ताजंतवानं व्हायला होतं. मन फ्रेश झालं ना की मग प्रवासाची दगदग, कामाचा ताण ह्याचं काही वाटत नाही. एक तर कंपनी तर्फे कुठे जायचं असेल तर सगळी व्यवस्था केली जातेच, चांगल्या वस्तीत, चांगल्या हॉटेलात सोय असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेथले लोकल कलिग्ज असतात त्यांना बरीचशी माहिती विचारता येते. त्यांच्याकडून जवळपासचा एखादा ऑफबिट पॉईंट समजतो आणि अगदी नुसता टूरिस्टी हेतूही नसतो. असं फिरणं मला जास्त आवडतं. अर्थात माझ्या कामाच्या स्वरुपामुळे मला अशी संधी बरेचदा मिळत असते. :) आणि हो, आपण जेव्हा टूरिस्ट म्हणून एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा तिथला मौसम, तिथलं हवामान ह्याचा विचार करतोच. मुद्दाम खराब हवेत काही आपण आल्प्समध्ये किवा किवा कडाक्याच्या उन्हाळ्यात इटालीला जाणार नाही. अर्थात कामाकरता जाताना इटालीत ३५ अंशाच्या वर तपमान आहे तर मिटिंग पुढे ढकला..किवा अति हिमवृष्टीमुळे स्वीसचा वर्कशॉप आत्ता न घेता समरमध्ये घेऊ या.. असं तर सांगता येत नाही ना! पण मग अशा वेळीच तिथले नकोसे ऋतुही पाहता, अनुभवता येतात हा मोठाच फायदा! पण तोटा असा की कामासंबधी जेव्हा फिरणे होते तेव्हा ते बहुतांश मोठ्या शहरातून होते आणि एका पॉईंटनंतर सगळ्या मेट्रो सिटीज मध्ये फार फरक जाणवत नाही. एक 'मेट्रो कल्चर' अशा शहरातून दिसतं. त्या देशाची, तिथल्या माणसांची, मातीची अशी खरी ओळख होत नाही. पण थोडीफर कल्पना मात्र येते. कामानिमित्त देशोदेशी फिरताना प्रवासात आणि कामाच्या ठिकाणीही एक बाई म्हणून मला तरी कोणताही वाईट अनुभव आला नाही किवा बाई म्हणून फार काही मोठी व्हिआयपी, रेड कार्पेट ट्रिटमेंटही कोणी दिली नाही. सगळीकडे 'एक माणूस' म्हणून अगदी सर्वसाधारणपणे कोणाशी वागतात तसेच वागवले गेले. ह्याचा मला अर्थात आनंदच आहे.
साऊथ अफ्रिकेतला अनुभव मात्र थोडा वेगळा आहे. तेथे अगदी विमानतळापासून तेथला कोणीतरी लोकल सहकारी तुमच्या सोबत सतत असतो. अगदी विकांताला सुध्दा.. माझ्या दिमतीलाही तिथली सहकारी, कॅथरिन दिली होती. आम्हाला असं कायम कोणी एस्कॉर्ट असण्याची सवयच नाही. माझ्या हॉटेल रुम वर मला सोडून मग ती घरी जात असे. साऊथ अफ्रिका, नेल्सन मंडेलांची जन्मभूमी! इथे येऊन नेल्सन मंडेलांच्या जन्मगावात जायचं नाही? ते शक्यच नव्हतं. अगदी साधे कपडे घाल, जास्त पैसे बरोबर घेऊ नको. कॅथरिनच्या मला एक ना दोन शंभर सूचना! शेवटी एकदाचे तिथे जायला निघालो. कॅथी मला घ्यायला हॉटेलवर आली होती. अग, इतकी चांगली पर्स नको घेऊ आणि घड्याळ पण काढून ठेव तुझं, महागातलं दिसतय. तिने बरोबर एक झोळी आणली होती. ती मला दिली. आम्ही बसकडे निघालो. जाताना ती मला म्हणाली, अग, माझ्या गावाच्या अगदी जवळच आहे हे ठिकाण तरीही मी एकटीने जायची हिंमत करत नाही. इथे खूप अनसेफ आहे ना, म्हणून तर बाहेरचा कोणी आला की ती व्यकी हरवू नये आणि लुटली जाऊ नये म्हणून आमच्या पैकी कोणी तरी सावलीसारखा त्यांच्या बरोबर थांबतो. हे ऐकून अगदी काटाच आला अंगावर. माबसे नदीच्या काठावर वसलेलं मवेत्सो, अगदी लहानसं ८००-८५० वस्तीचं लहानसं सर्वसाधारणसं खेडं! नेल्सन मंडेलांचं जन्मगाव, यामुळे त्याला वलय प्राप्त झालं आहे. तिथे पोहोचल्यावर ती जे म्हणत होती त्यातली सत्यता दिसली. मला तिथे एक विचित्र तणाव जाणवला. युरोपातल्या खुल्या, मुक्त वातावरणात वावरलेल्या मला हा एक नक्कीच साहसी आणि थोडा भीतीदायक अनुभव होता.
अगदी युरोपातच फिरायचं म्हटलं ना तरी इथल्याही देशादेशातल्या कामाच्या पध्दतीत थोडा थोडा फरक आहेच. उदाहरणच द्यायचं झालं तर जर्मन अर्ली बर्डस आहेत. कामाच्या बाबतीत रोखठोक आणि वेळेच्या बाबतीत अगदी दक्ष! अगदी कितीही महत्त्वाची मिटिंग असो.. पाचसाडेपाचच्या सुमाराला त्यांची चुळबुळ चालू होणारच पण मिटिंगमध्ये व्यत्यय नसतो. चार नंतर मिटिंग असेल तर ही मंडळी आपलं सँडविच नाहीतर सॉसेज असं काहीतरी बरोबर घेऊनच मिटिंग हॉल मध्ये येतात आणि चक्क सँडविच खात खात ते मिटिंग चालू ठेवतात. इटालियन, स्पॅनिश उशीरा दिवस चालू करतात आणि ग्रीक मंडळींचे कॉफी ब्रेक्स मोठाले असतात आणि त्या कॉफीब्रेक्सचं रुपांतर मग मिटिंग मध्ये होतं. फ्रेंच मंडळींना सगळं डेलिकेट, अप टू डेट लागतं पण घोळ घालत बसतात. अशा अनेक गमतीजमती सांगता येतील.
एकाच ठिकाणी, वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी, त्याचत्याच लोकांबरोबर काम करणं मला कंटाळवाणं, स्वत:ला मिटून घेतल्यागत झालं असतं. पण असं अनेक ठिकाणी फिरल्यामुळे वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आले, त्यांच्याकडून काय करावं आणि काय करू नये असं दोन्ही शिकता आलं. स्वतःला उलगडताना माझी मीच स्वतःला समजत गेले. माझ्या स्ट्रेन्ग्थ, माझे विकनेसेस मला उमजत गेले. यातून मी समृध्द होत गेले. हा माझ्या कामानिमित्त फिरण्यातून मिळालेला मोठा ठेवा!
असं देशोदेशी कामानिमित्त खूप फिरल्यामुळे अनेक देशातले मित्र झाले आहेत. काहींशी चांगले बंध जुळले तर काहींशी अगदी औपचारिक संवाद झाला. पेरु, स्कॉटलंड आणि नॉर्वेचा मध्यरात्रीचा सूर्य ह्यांना भेटायला जायचं आहे. तसंच भारतातही जायच्या संधीची मी वाट पाहते आहे. पण भारतासारख्या खंड:प्राय देशात जायचं तर हाताशी भरपूर मोकळा वेळ निदान महिनाभर तरी हवाच. जसा मी ऑस्ट्रेलियात महिनाभर वेळ घेऊन फिरले तसंच काहीसं करायचं माझ्या मनात आहे. नुसतंच ताजमहाल, सुवर्णमंदिर, राजस्थान असं न करता एखाद्या खेड्यात जायचं आहे. येथे माझ्या अनेक भारतीय सहकार्यांकडून मी इतकं काही ऐकलं आहे की एवढे देश फिरूनही अजून भारतात जायचा योग का नाही आला? असं मला अनेकदा वाटतं आणि लवकरच ती संधी यावी अशी आशा करते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विकी, व्हिक्टोरिया मट्यास ही आमची मैत्रिण, कामानिमित्त पाचही खंड पालथे घालून आली आहे हे एकदा असंच गप्पा मारताना समजलं होतं आणि तिचा प्रचंड हेवा वाटला होता. अनाहिताचा भटकंती अंक काढायचा ठरल्यावर विकीच डोळ्यासमोर आली. तिची मुलाखत घ्यायचे ठरवलेच अगदी मनाशी पण तिच्या ह्या नेहमी चालू असलेल्या जगभ्रमंतीतून तिला वेळ सापडतो की नाही? ह्याची शंका होती. एकदाचा वेळ मिळाला आणि मग ती सापडली. खूप भरभरून बोलली. तिच्याकडचा हा प्रवासी अनुभवांचा खजिनाच तिने माझ्यासमोर उघडला. हा खजिना फक्त मराठीत शब्दांकित करण्याचे भारवाही हमालाचे काम मी केले आहे. विकीने उत्साहाने तिला जगभरात आलेल्या अनुभवांची पोतडी आपल्यासमोर उघडून आपल्याला त्यात सामील करून घेतल्याबद्दल तिला आपल्याकडून मनःपूर्वक धन्यवाद आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
(चित्र- किलमाऊस्की)
प्रतिक्रिया
9 Mar 2016 - 4:43 pm | पिलीयन रायडर
अशीच आमची नोकरी असती तर...!
विकीचा फारच हेवा वाटला! ही मुलाखत इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
9 Mar 2016 - 5:00 pm | वेल्लाभट
आय वुड लव्ह टू बी इन सच अ जॉब
शब्दांकन मस्त!
विकीचा प्रवास त्याहून.
9 Mar 2016 - 7:15 pm | अजया
+१००००
मस्तच लेख ताई.
10 Mar 2016 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
विकीने उत्साहाने तिला जगभरात आलेल्या अनुभवांची पोतडी आपल्यासमोर उघडून आपल्याला त्यात सामील करून घेतल्याबद्दल तिला आपल्याकडून मनःपूर्वक धन्यवाद आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
+१०००
अशी नोकरी मिळाली तर आज बॅग घेऊन म्हणतील त्या काँट्रॅक्टवर सही करायला तयार आहे !
10 Mar 2016 - 3:45 pm | स्नेहल महेश
खरज अशी नोकरी मिळाली तर ........................
10 Mar 2016 - 3:56 pm | भुमी
छान लेख.
10 Mar 2016 - 4:07 pm | सविता००१
सुरेख लेख
10 Mar 2016 - 4:38 pm | क्रेझी
शब्दांकन खुप सुंदर केलं आहे अगदी व्हिक्टोरिया आमच्याशी मराठीतून गप्पा मारत आहे असं वाटलं :)
14 Mar 2016 - 8:50 pm | प्रीत-मोहर
अगदी!!!
12 Mar 2016 - 7:45 pm | पैसा
विकीला आमच्यातर्फे धन्यवाद सांग भरपूरसे!
12 Mar 2016 - 8:11 pm | यशोधरा
भारीच आहे ही नोकरी!! मस्त मुलाखत!
14 Mar 2016 - 2:32 pm | पद्मावति
वाह, मस्तं वाटलं वाचून.
14 Mar 2016 - 2:40 pm | मालोजीराव
एकदम झकास
14 Mar 2016 - 5:56 pm | मधुरा देशपांडे
सुरेख शब्दांकन!!
14 Mar 2016 - 8:57 pm | मितान
फार हेवा वाटला या तुझ्या मैत्रिणीचा !!!
मस्त ताजंतवानं करणारी मुलाखत :)
16 Mar 2016 - 3:34 pm | Mrunalini
मस्तच लेख ताई.. छान लिहले आहेस.
22 Mar 2016 - 6:41 pm | इशा१२३
सुरेख लेख!!अशी नोकरी सुरेख बाई...
अनुभव वाचाताना मजा वाटली.
6 Apr 2016 - 5:21 am | जुइ
असे कामानिमित्य जग भ्रमंती करायला मिळाली तर किती छान होईल!
6 Apr 2016 - 5:53 am | रेवती
लेखन आवडले. फिरस्तीची आवड असलेल्यांना बरय असं! फोटू आवडले.
अस्वलाच्या पिल्लाचा जास्त आवडला.