शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार.
कोकणपट्ट्यातल्या बायका सुगरणी खऱ्याच.एकाच भाजीचे वेगवेगळे प्रकार करून संसार चालवणे यांना उपजतच जमते. प्रत्येक दारात शेवग्याचे झाड असतेच. आणि नसलेच तरी एका घरी शेंगा काढल्या की त्याचा वानवळा वाडीवरच्या बाकीच्या घरातून चार चार शेंगा दिल्याशिवाय झाडाच्या मालकिणीलाही काही त्या घशाखाली उतरायच्या नाहीत.
शेवग्याची शेंग कशातही रमते बटाट्यासारखीच,पण बटाटा कसा?आपली चव बदलून ज्यासोबत आहे त्याची चव घेणारा.”जिसमे मिला दो लागे उस जैसा”आणि शेवग्याची शेंग मात्र कोणतीही भाजी असो,कोलंबी,तिसऱ्या सारखे मासे असोत,त्यांना 'मी प' म्हणत स्वत:ची चव देणार.ज्यांना या शेंगा नुसत्या चोखून न खाता चावून खायला आवडतात,त्यांना ही भजी फारच आवडतात.
ही भजी माझ्या एका मावसासासूबाईंनी शिकवली होती.जेव्हा पाहिल्यांदा खाल्ली तेव्हाच मला ती आवडली होती.पण त्यासाठी लागतात त्या जून,जाड शेंगा आणि त्या मिळण्यासाठी ज्यांच्याकडे झाड आहे अशी व्यक्ती तुमच्या ओळखीत असायला हवी.त्यामुळे बऱ्याच वर्षांनी एका सुहृदाच्या घरी गेले असताना हव्या तशा शेंगा मिळाल्या आणि ही भजी केली.त्याची पाककृती मिपाकरांसाठी.
साहित्य:-
१. दोन/तीन शेवग्याच्या शेंगा.
२. एक वाटी डाळीचे पीठ.
३. एक चहाचा चमचा मिरचीपूड.
४. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.
५. अर्धा चमचा चमचा हिंगपूड.
६. अर्धा चमचा चहाचा साखर.
७. चवीनुसार मीठ.
८. तळण्यासाठी तेल.
कृती:-
१. शेंगा तासून त्यांचे नेहमीप्रमाणे तुकडे करावेत.
२. पाण्यात थोडेसे मीठ घालून हे तुकडे उकडावे.
३. पाणी वेळून तुकडे थंड झाल्यावर मधल्या बिया काढून त्या एका तुकड्याचे तीन तुकडे करावे.
४. अनुक्रमांक दोन ते सात एकत्र करून त्यात पाणी घालून भज्यांचे सरसरीत पीठ तयार करावे.
५. तेल गरम करून त्यात हे तुकडे पिठात बुडवून मंद आचेवर तळावेत.
६. ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत वाढावेत.
दुसरा प्रकार:-
हा मात्र माझा शोध आहे. असे जाहीर करून मीच मला सुगरण म्हणवून घेतेय.असो.
वरच्या कृतीतील एक ते तीन पर्यंतच्या कृतीनंतर मिरचीपूड,हळदपूड,हिंगपूड,मीठ सरळ तुकड्यांना चोळून घ्यावे,आणि मंद आचेवर शॅलो फ्राय करावेत.मस्त कुरकुरीत होतात.हवे हसेल तर बेसनात किंवा तांदुळाच्या पिठात घोळवून तळल्यासही छान लागतात. मला नुसतेच आवडतात.पसंद अपनी अपनी,खयाल अपना अपना.चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सुरेख लागतात.
प्रतिक्रिया
30 Mar 2016 - 7:06 pm | सूड
भारी!
बाकी ते पाणी वेळून बर्याच दिवसांनी पुन्हा ऐकलं.
30 Mar 2016 - 7:36 pm | उगा काहितरीच
घशात अडकत नाही का ? च्युयी होत असतील ना ? बाकी दिसायला भारी दिसत आहेत भजी.
30 Mar 2016 - 8:55 pm | आनंदी गोपाळ
माशांचे काटे दोन प्रकारे सहन करतात.
एकतर चावून खाऊन टाकणे, नाहीतर (तोंडातून) काळजीपूर्वक काढून टाकणे.
आता हा उद्योग कोकण्यांना पक्का जमतो. तर शेवग्याच्या शेंगा किस झाड की पत्ती हय?
31 Mar 2016 - 1:07 am | उगा काहितरीच
तेच तर नाही ना जमत मला :-( . मासे एक-दोनदा खाऊन बघितले होते. जाम टेस्टी होते. पण ते काटे प्रकार काही झेपला नाही बुवा! कुणी शिकवेल का ? ;-)
31 Mar 2016 - 10:30 am | वेल्लाभट
बोणलेस खा मग! रावस, सुरमई, पापलेट, जिताडा हे मासे चंगले त्यासाठी. कमी काटे असतात.
बाकी त्या चवीपुढे ते मधले काटे फार टोचत नाहीतच कधी.
31 Mar 2016 - 8:34 am | नूतन सावंत
अगदी बरोबर,आनंदी गोपाळ.
30 Mar 2016 - 10:05 pm | पद्मावति
मस्तं आहे. वेगळीच पाककृती.
30 Mar 2016 - 10:17 pm | अजया
+१
वेगळीच पाकृ.छान आहे.
30 Mar 2016 - 10:18 pm | मुक्त विहारि
एक अनवट पा.कृ. दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद....
30 Mar 2016 - 10:38 pm | स्रुजा
अरे वा ! पाकृ तर छान च पण तुझी वर्णन शैली म्ह्णजे.. अगदी छान सारवलेल्या अंगणात झाडाखाली बसुन भजी समोर आल्याचा फील आला..
31 Mar 2016 - 8:33 am | नूतन सावंत
सृजा, मी पहिल्यांदा खाल्ली तेव्हा सफाळ्याला,असंच सारवलेल्या अंगणात शेंगानी बहरलेल्या झाडाखाली बसून ,लहानपणच्या (म्हणजे इतरांना न देता,स्वत: न खाणाऱ्या झाड मालकिणीच्या म्हणजे आईच्या) आठवणीत रमून,खाल्ली आहेत.
1 Apr 2016 - 1:36 am | स्रुजा
क्या बात !
31 Mar 2016 - 12:00 am | foto freak
सॉस सोबत छान लागतील..
31 Mar 2016 - 6:50 am | lgodbole
छान
31 Mar 2016 - 6:56 am | यशोधरा
मस्त गं सुरंगीतै. प्रकार १ करतो बर्याच्दा. आता प्र २ करुन पाहू.
31 Mar 2016 - 10:28 am | वेल्लाभट
क्या बात है !
खमंग वाटतात. एक बाळबोध प्रश्न - खायची शेंगेसारखीच ना दातात धरून? की चावून मग शेंगेचं साल काढून टाकायचं?
31 Mar 2016 - 11:57 am | अत्रन्गि पाउस
सोच रहेलाय ...
31 Mar 2016 - 2:41 pm | नाखु
उत्तर का मिळेना
शेवगा शेंगा प्रेमी (आणि शेवग्याच्या शेंगेसारखे होण्याची स्वप्ने पाहणारा) नाखु पालक
31 Mar 2016 - 3:02 pm | नूतन सावंत
उगा काहीतरीच,वेल्लाभट,अत्रंगी पाऊस, आणि नाखुजी,
यासाठी वापरण्याच्या शेंगा जून असल्यामुळे नेहमीपेक्षा थोड्या जास्त तासून घ्यायच्या आणि मंद आचेवर तळायचे.मस्त कुरकुरीत होतात.सहसा चावून खाता येतात.अगदीच एखादी हटवादी असली तर तिचा नाद सोडून दुसरी फोड अथवा भजी तोंडात टाकायची.हाकानाका.
1 Apr 2016 - 1:33 am | उगा काहितरीच
ओक्के ! धन्यवाद ...
31 Mar 2016 - 11:16 am | सस्नेह
सुरेख सादरीकरण !
शेवग्याच्या शेंगा चोखूनच खायला आवडतात. त्यामुळे क्र. २ करण्यात येईल.
31 Mar 2016 - 12:32 pm | स्वाती दिनेश
पाकृ आणि आठवणी आवडल्या. माहेरी व सासरी दोन्हीकडे शेवग्याचे झाड आहे. शेवग्याच्या शेंगाची आमटी, सांबारात शेंगा, पिठले असे अनेक प्रकार केले जातात पण ही शेवग्याची भजी माहित नव्हती. आता भारतवारीत ही भजी नक्की.
स्वाती
31 Mar 2016 - 12:55 pm | सविता००१
भारी प्रकार दिसतोय. मी ऐक्ल पण नाहीये कधी. आता नक्की करून पाहीन गं सुरंगीताई
31 Mar 2016 - 1:25 pm | अमृता_जोशी
झक्कास.. असं काहीतरी खायला मिळायला हवं.. आयतं.
1 Apr 2016 - 1:23 am | जुइ
शेवग्याच्या शेंगांची भजी प्रथमच पाहिली. इथे चांगल्या शेंगा मिळाल्यातर नक्की करुन बघेन.
1 Apr 2016 - 1:49 pm | विशाखा राऊत
अरे वाह डाब्यांची भजी. एकदा करुन बघायला हवी