body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
दुसर्या दिवशी सक्काळी शिस्तीत उठलो. आदल्या रात्री नीट काही न खाल्ल्याने कडकडून भूक लागली होती. कॉम्प्लिमेंटरी नाश्ता खुणावत होता. मी नाचत बागडत कॅफेटेरियात गेले. आता एवढ्या सकाळी थंड वातावरणात नाश्ता म्हणजे कसं गरम वाफाळतं सांबार आणि त्यात डुंबणार्या इडल्या, किंवा उडीद वडे!! अहाहाहा.... विचारानेच अजून भूक खवळली. उड्या मारत जाऊन पाहिलं तर काय, थंडगार डोनट्स, ब्रेड आणि आंबट ज्युस. हुडुत....!
हा काय नाश्ता असतो का राव?? आपली तर भूकच मेली. एका कोपर्यात टोस्टर दिसला. त्यात ब्रेड गरम करुन घेतले आणि लोणी लावून खाल्ले. अमेरिकन प्रथे प्रमाणे हे गिळायला दोन घोट ज्यूस प्यायला आणि डोकंच दुखायला लागलं. वैतागून मी बस मध्ये जाऊन बसले. अशी पोटात भूक घेऊन मी जन्मात आनंदी राहु शकत नाही. बॅगेत चिवडा वगैरे काही तरी होतं. भल्या सकाळी चिवडा शेव तोंडात टाकलं तेव्हा माझा भारतीय मेंदू चालू झाला. बसही चालू झाली. तसं सुकीचं तळ्यात मळ्यातही सुरु झालं. तिने केलेल्या अथांग बडबडीचा सारांश असा होता की आता आम्ही "ऑज्बल / ऑस्बल चाझम" कडे निघालो होतो. तिथे जंगल ट्रेल करुन मग आम्ही रिव्हर राफ्टिंग करणार होतो. रिव्हर राफ्टींगसाठी वजनाची अट असल्याने अबीर येउ शकेल की नाही हे ठाऊक नव्हतं. मग तिथे जाऊन आमच्यापैकी नक्की कोण कोण हे राफ्टींग करु शकेल ते बघायचं होतं.
नितांत सुंदर रस्त्यांवरुन गाडी धावत होती. मला आपण युरोपमध्ये आहोत का असं वाटायला लागलं होतं. "मी कधी युरोपला गेले?" असला कुजकट प्रश्न विचारु नका. पिक्चरें नही देखते क्या? आजवर सिनेमातून, फोटोंमधून जे काही युरोपचे चित्र डोळ्यासमोर होते, तेच सत्य बनून समोर आले की काय? भव्य कॅनव्हासवर चितारलेले मनोहर दृश्य! हिरवेगार डोंगर, निळेशार आकाश, हिरवळीतून डोकावणारी टुमदार घरं. काही म्हणा, ह्या लोकांची सौंदर्यदॄष्टी मानली पाहिजे. लहानसेच घर बांधतील, पण काय बांधतील! फिकटसे रंग, समोर छोटीशी बाग, जे असेल ते टापटीप, जागच्या जागी. जागेची इथे काही कमतरताच नसल्याने दोन घरांमध्ये भरपूर जागा. शिवाय कुंपण वगैरे भानगड इथे दिसलीच नाही. त्यामुळे डोळ्यांना कुठलीच सीमारेषा नाही. आपण लहानपणी चित्र काढतो ना, दोन डोंगर, मधून उगवणारा सूर्य, डोंगरातून येणारी नदी, एका कोपर्यात एक उतरत्या छपराचे घर, मागे झाड...अगदी तसेच.
गाडी इतक्या जोरात पळत होती की मला फार फोटो काढणे जमले नाही. पण हा एकच कसाबसा जमवला. पण खरं सांगायचं तर ह्या फोटोत १०% सुद्धा मजा नाही.
ऑस्बल चाझम
आधीच सांगते की हा शब्द फ्रेंच आहे. त्यामुळे स्पेलिंग आणि उच्चार ह्यांचा मेळ मला तरी जमेल असं वाटत नाही. म्हणून मी त्याला ऑस्बल चाझम (Ausable Chasm) 'च' म्ह्णणार. उच्चार काही का असेना. तर काय आहे हे प्रकरण? ऑस्बल चाझमला "Grand Canyon of East" देखील म्हणतात. आपल्या निघोजला नाही का, नदीच्या प्रवाहामुळे रांजणखळगे तयार झालेत. किंवा मध्यप्रदेशमध्ये, जबलपूरजवळ नर्मदा नदीवर "मार्बल रॉक्स" आहेत ना, तसंच. इथेही पाण्याने खडकात कपारी तयार झालेल्या आहेत. फरक इतकाच की ग्रॅण्ड कॅनियनला आपण वरुन खाली बघतो. तर ऑस्बल चाझमला (किंवा मार्बल रॉक्सलाही) आपण खालून वर. ह्या नदीत रिव्हर राफ्टींग करता येते. मी केवळ गुगलवर याचे फोटो पाहून ही अख्खी टुर निवडली होती. त्यात तिथे पोहोचण्याचा रस्ता असला जीवघेणा. त्या स्वर्गामधून वळणं घेत घेत गाडी पोहोचली.
एका छोट्याशा हॉटेल मध्येच खाणेपिणे, खरेदी, तिकीटं, सगळंच होतं. इथे आमच्या हाताला तिकीट देऊन बॅण्ड्स बांधायला दिले. अबीरलाही चक्क छटाकभर वजन जास्तच भरल्याने राफ्टींगमध्ये घेतले. इथून पुढे जायचा मार्ग हा असा होता.
चार प्रकारचे ट्रेल होते. काही सोप्पे होते, काही कठिण. आमचा अधला मधलाच होता. अर्धा तास चालायचं होतं. पायर्या, चढ उतार करायचे होते. मग एका ठिकाणी खाली उतरुन रिव्हर राफ्टींग करत पुढे जायचे होते. तिथून परत मागे मूळ ठिकाणी गाडी नेऊन सोडणार होती. आमचा जथ्था घेऊन सुकी बाय निघाल्या. भराभर चालत रिव्हर राफ्टींगच्या ठिकाणी पटकन पोहोचावे असे बाईंचे म्हणणे. तर आम्ही इथे मजा करायला आलोय, आम्ही मजा करतच निवांत पोहोचणार असे इतरांचे (म्हणजे ८०% चायनीज प्रवासी असणार्या ग्रुपचे) म्हणणे. तू बाई शंभरवेळा आली असशील, आम्ही तर जन्मात पहिल्यांदाच आलोय ना! मग आजुबाजूला बघत, फोटो काढत यायला वेळ तर लागणारच. लोक निवांत होते तशा सुकी बाय लय लय चिडल्या. गुरं हाकल्या सारखी लोकं हाकत पुढे नेऊ लागल्या. आम्ही आधीच बरेच पुढे असल्याने सुकीबाईंचा रोष पत्करण्याची वेळ काही आली नाही.
लोकांचं काही चूक नव्हतं हो. आजूबाजूला असा परिसर असेल तर कुणाचा पाय निघेल?
छोट्याशा पायवाटेने आम्ही जंगलात घुसलो. नदीच्या कडेकडेने चालत निघालो. पायवाट संपली आणि आता खडकाळ रस्ता सुरु झाला. तर एकंदरीत प्रकरण हे असं होतं
ह्या कपारीला लागून चालण्यासाठी कठडे टाकून नीट रस्ता बनवला होता. पायर्या होत्या. पुष्कळ चढ उतार होता. बाजूने ही नदी वाहात होती. मी आजतागायत असं काही कधी पाहिलेलं नसल्याने फारच भारावून वगैरे गेले होते. एकंदरीत सुहाना सफर झालेला. मौसम हसीन होताच...दिल तर जवान आहेच माझं..आणि सनम साथ होता..!
ही खळाळत चाललेली नदी..
हा आम्ही अजिबात न ओलांडलेला पूल
पुढे जाऊन थोडी शांत झालेली नदी
असं जात जात शेवटी आम्ही रिव्हर राफ्टींगच्या ठिकाणी आलो. इथे ह्या ज्या बोट्स दिसत आहेत, त्यातून ५-६ च्या एका ग्रुपला घेऊन गाईड राफ्टींग करत जात असे. मग पुढे त्यांना सोडल्यावर ह्या बोटी वर चढवून मग गाडीने परत मागे आणल्या जात आणि परत एकदा राफ्टींगसाठी वरुन खाली सोडल्या जात.
गाईडला येण्याजाण्यासाठी पायर्या
आम्ही एका टुरचा भाग असल्याने की काय, रांग मोठी असूनही लवकरच आमचा नंबर लागला. रांगेत सर्वात शेवटी उभे राहून अचानक आपले नाव पुकारले की सगळ्यांना टुक टुक करुन बोटीत जाऊन बसण्याची मजा औरच!!
जॉन नावाचा आमचा हसरा गाईड आम्हाला ह्या राफ्टींगला घेऊन गेला. इतका वेळ वरुन बघितलेली नदी आता खालून वर बघताना वेगळीच भासत होती.
जॉन आम्हाला ह्या परिसराची माहिती सांगत शांतपणे नेत होता. इथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे म्हणे. एकात तर एका घोड्याने वरच्या कड्यावरुन पाण्यात उडी मारली होती. घोडा पोहत निघून गेला, घोडेस्वार तंगडे गळ्यात घेऊन परत आला म्हणतात. इथून म्हणे तो स्टंट झाला
हे काय होतं ते मला अजिबात आठवत नाहीये.
कारण माझं लक्ष इकडे होतं.
इथून पुढे मात्र आम्ही फोन वगैरे सगळं पॅक करुन ठेवलं आणि मस्तपैकी प्रवाहात बोट घातली. अजिब्बात भीती वाटली नाही. मुळात पाणी फार शांत होते आणि राफ्टींगचा वेळ अगदीच ४-५ मिनिटं.. एका ठिकाणी फक्त छोटासा भोवरा होता. तिथे हलकीशी डुचमळली आमची बोट. पण तेवढंच...अबीरलासुद्धा करता येईल असे रिव्हर राफ्टींग. काय ते समजून घ्या!!
राफ्टिंग संपवून आम्ही वर चढून गेलो. दर १० मिनिटानी तिथे एक बस येते. तिने आम्हाला परत मूळ ठिकाणी आणून सोडले. आम्ही जिथून आत प्रवेश केला होता, त्याच्या मागे ही गंमत लपली होतं हे ठाऊकच नव्हतं..
मला तर किती फोटो काढू न किती नको असं झालं होतं. पण मोबाईल मध्ये येऊन येऊन काय फोटो येणार..
तिथल्या कॅफेमध्ये एका छोट्याशा खोलीत ह्या जागेची माहिती देणारे फलकही लावले होते. पण मी शैक्षणिक सहलीला आले नसल्याने मी ते अजिबात वाचले नाहीत.
ह्या कॅफेत पोटोबा शांत करुन (म्हणजे परत एकदा पिझ्झा आणि सॅण्डविच गिळून) आम्ही पुढच्या सफरीला निघालो. व्हाईटफेस माऊंटनकडे!!
व्हाईटफेस माऊंटन
इथे काय नवीन? तर इथे म्हणे स्किईंगचे ऑलिम्पिक होते. आपण अगदी वर पर्यंत रोपवेने जाऊ शकतो. तिथून "लेक प्लासिड" बघता येतो. तसं इथे फार काही करण्यासारखं नव्हतं. म्हणून वेळही अगदी जेमतेम अर्धाच तास होता.
रोपवेने वर जाताना जवळपास १०-१५ मिनिटं आजूबाजूचा निसर्ग पहाता येतो. रोपवे मधून दिसणारे हे दृश्य.
ही सुकी बाई तर आम्हाला एकाचढ एक जागी घेऊन जात होती!! वर पोहोचल्यावर आजूबाजूचा परिसर आणि लेक प्लासिड पहायला दुर्बिणी होत्या. वर जाउन आजुबाजूला पाहून थक्क होणे ह्या व्यतिरिक्त काही दुसरे काम नव्हतेच!
हाच तो लेक प्लासिड.
ह्या जागेवरुन कुणाला उठावे वाटेल?!
जाता जाता एक महत्वाची गोष्ट वाचली.
इथून आता आम्ही निघालो आमच्या शेवटच्या टप्प्याकडे - हाय फॉल्स गॉर्ज!
हाय फॉल्स गॉर्ज!
आता मला हे लोक नदी, डोंगर, पाणी ह्या शिवाय अजून काय दाखवणारेत असं झालं होतं. पण सुकीच्या आग्रहास्तव आम्ही ह्या ही जंगल ट्रेलवर गेलो. इथेही मघाच्याच नदीच्या बाजूने जंगलातून चालत जायचे होते. पण इथे नदी धबधबा म्हणून कोसळते ते पहायला हा सगळा अट्टाहास! गेल्या गेल्या शांत पसरलेल्या नदीने आमचे स्वागत केले.
आता ही नदी खाली उतरू लागली
आणि बदाबदा कोसळू लागली..
जागोजागी अशा काचा होत्या, ज्यावर उभे राहून तुम्ही खालचा प्रवाह पाहू शकता.
अचानक क्षणभरासाठी दिसलेले इंद्रधनुष्य!
हाच तो हाय फॉल्स गॉर्ज. पण दूधसागरचे फोटो बघितलेल्यांना फार काही विशेष वाटायचं कारण नाही!
आता मात्र सगळेच दमले होते. तृप्त मनाने आम्ही निघालो. ८-९ तास सरळ फक्त प्रवास करायचा होता आणि घरी परतायचे होते.
ही ट्रिप माझी सगळ्यात आवडती ट्रिप आहे. मी, नवरा आणि अबीर, अशी तिघांचीच ही पहिलीच भटकंती. ती सुद्धा अमेरिकेत. खरं तर अमेरिका हा काही पृथ्वीच्या बाहेरचा देश नाही. डोंगर-दर्या, नद्या - तलाव ह्या व्यतिरिक्त असं वेगळं काय असणार? ते तर आपल्या भारतातही आहेच. ह्या डोंगररांगा अगदी सह्याद्रीची आठवण करुन देतात. ऑस्बल चाझम सारखे मार्बल रॉक्स तर आपल्या जबलपूरलाही आहेत. आणि धुंवाधार किंवा दूधसागर समोर हाय फॉल्स गॉर्ज किस झाड की पत्ती! पण तरीही अमेरिकेत फिरताना हे सगळं जास्त सुंदर, जास्त मनोहारी वाटत होतं. ह्याच एकमेव कारण म्हणजे स्वच्छता!
स्वच्छता कोणत्याही गोष्टीला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. ह्या दोन दिवसात आमची कुठेही गैरसोय झाली नाही. जागोजागी स्वच्छतागृह होते. व्हाईटफेस माऊंटनचे स्वच्छतागॄह तर स्वतःच एक पर्यटन स्थळ म्हणून भारतीयांनी पहावे इतके स्वच्छ! कुठेही दुकानांच्या रांगा नाहीत की बेशिस्त कारभार नाही. सर्वत्र एकच दुकान, जिथे तुम्हाला सगळंच मिळेल. अगदी बाथरुम पासून ते स्मरणवस्तूंपर्यंत. खायला मोजकेच चार पर्याय असतील पण कळकटपणा अजिबात नाही. थेट नळाचे पाणी पितानाही काही वाटत नाही.
आपला देश मात्र एवढा सुंदर असून स्वच्छतेत मार खातो. टपर्या असायला माझी ना नाही. पण किमान पर्यटकांच्या सोयीचा तर विचार करा. महिलांना तर स्वच्छतागृहापायी किती त्रास होतो हे भारतीय स्त्री असल्याशिवाय नाही कळणार. आपला देश सोडून अमेरिकेत जायला धडपडणार्या लोकांची मानसिकता अशी का बनत असेल हे मला हळूहळू कळायला लागलं होतं. हे सगळं सुंदर असलं तरी आपलं नाही ह्या विचित्र विचाराने उगाच खिन्न वाटायला लागलं. खरं सांगायचं तर आठवण यायला लागली घराची.. खूप आनंदी झाल्यावर अचानक उगाच उदास वाटायला लागणे तर माझ्या स्वभावाची खासियत आहे..
दोन दिवस दंगा करुन आता शांत बसून होते. दूरवर न्यूयॉर्कची स्कायलाईन दिसायला लागली. अगदी विंचवाचे बिर्हाड का असेना, पण न्यूयॉर्क आलं की घरी आल्यासारखं वाटायला लागलं...!
(चित्र- किलमाऊस्की)
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 12:12 am | राघवेंद्र
Take Tours जिंदाबाद. मस्त झाली ट्रिप !!!
8 Mar 2016 - 12:19 am | नूतन सावंत
सुरेख हां पिरा .मस्तच झालीय टूर.
हे मात्र भावलं.
8 Mar 2016 - 7:20 am | प्रीत-मोहर
छानच झाली की टुर. स्वच्छतेच्या बाबतीत +११११
8 Mar 2016 - 1:28 pm | गिरकी
ती हामेरिका छान असेल नसेल पण लेख मात्र जबरा … तुझी लेखन शैली हमेरीकेला चार चांद लावतीये हे नक्की :)
8 Mar 2016 - 2:52 pm | वेल्लाभट
क्लास! अमेरिका भारीच आहे या बाबतीत
वर्णन एक नंबर झालंय मात्र ! सुपर्ब.
हा अंकच भारी झालाय एकंदर
8 Mar 2016 - 2:56 pm | स्नेहल महेश
त्या मुळे वाचायला मज्या येते
8 Mar 2016 - 4:31 pm | हाहा
वेगळ्या लेखनशैली मुळे जास्त आवडला.
8 Mar 2016 - 4:57 pm | रायनची आई
मस्त लिहिलय पिरा..अजून पुढचे भाग येऊ दे ना पटापट..मला मधले मधले फोटो दिसत का नाहीयेत काही?
8 Mar 2016 - 5:00 pm | प्रचेतस
जबराटच आहे हे सर्व.
8 Mar 2016 - 6:29 pm | स्मिता श्रीपाद
मस्त लिहिलय्स पिरा....
खुप आवडलं...मला काही काही फोटो दिसत नाहियेत...का बरं ?
8 Mar 2016 - 6:31 pm | मधुरा देशपांडे
कुठले फोटो दिसत नाहीयेत? म्हणजे वाक्य सांगू शकशील का काही की कशानंतरचे? सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतोय का? सेटिंग सेम आहे सगळ्यांचं.
9 Mar 2016 - 11:52 am | स्मिता श्रीपाद
अत्ता या क्षणी मला कोणतेच फोटो दिसत नाहियेत ग....बहुतेक ऑफिस च्या ब्राउजर चा प्रॉब्लेम असेल..
काल १-२ दिसत होते....
बाकी सगळ्याना दिसतायत का...? कोणी फोटोबद्दल काही लिहिलं नाही म्हणजे दिसत असावेत
पण आत्ताच मी स्वातीताईचा लेख पाहिला...त्यातले फोटो दिसले सगळे..
म्हणजे माझ्या ब्राउझर चा प्रॉब्लेम नाही....
9 Mar 2016 - 2:03 am | टुंड्रा
खुप भारी!!!!!!!
9 Mar 2016 - 7:21 am | मितान
भन्नाट लिहिलं आहे पिरा !
तुझ्याकडून अजून ऐकायच आहे !! :)
9 Mar 2016 - 10:53 am | सविता००१
खूप छान लिहिलं आहेस. आणि फोटो जबराट
9 Mar 2016 - 11:33 am | सस्नेह
मस्त वर्णन आणि फोटो.
9 Mar 2016 - 12:01 pm | प्रमोद देर्देकर
खुप सुंदर सफर पण काही बहुतेक ५०% फोटो दिसत नाहियेत.
खालील टॅग असलेले फोटो...
map, ac3, bridge on river, fafting 2, dhabadhabaa, hotel, bench, infor room , whiteface, ropeway 1,2,3, how big, lake प्लासिड एवढे फोटो दिसत नाहियेत आणि त्याऐवजी तिथे चौकोनात हे Hotel, Bench असे लिहलेले दिसत आहे.
9 Mar 2016 - 12:50 pm | पिलीयन रायडर
ओके! सगळे फोटो एकाच सेटिंग मध्ये आहेत. चेक करतो.
9 Mar 2016 - 12:48 pm | स्मिता.
छानच झालीये टूर. मनातले विचार प्रांजळपणे लिहिलेले जास्त आवडले.
9 Mar 2016 - 1:42 pm | पियुशा
मस्त मस्त मस्त !
9 Mar 2016 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं झाली सफर !
स्वच्छतेबद्दल डबल बाडिस :(
9 Mar 2016 - 2:19 pm | पूर्वाविवेक
तू भन्नाट लिहील आहेस, तुझी शैली इतकी खुमासदार आहे की तुला धारावीतल्या झोपडपट्टीत फिरायला नेल तरी तू त्यावर पण असच भन्नाट लिहिशील.
मी खूप प्रवास वर्णन वाचते. मीना प्रभूंची सगळी पुस्तक वाचून काढलीत. पण भावतात ते फक्त पुलच ग. पिराबाई, तुम्ही पण तसच खुमासदार लिहिताय हो.
पण आम्हांला स्वर्गासारखी भासणारी हि अमेरिका प्रत्यक्षात इतकी पण छान नाही असे वाटले.
मला फक्त ac आणि ac2 हे फोटो दिसत नाहीयेत.
9 Mar 2016 - 8:10 pm | भाग्यश्री कुलकर्णी
पिरा कय लिवलय कय लिवलय. लै भारी. आपन अशेपन फ्यानच हौत तुमचे.
9 Mar 2016 - 9:18 pm | अभिजीत अवलिया
एकदम मस्त...
9 Mar 2016 - 10:05 pm | पद्मावति
सुंदर वर्णन आणि फोटो. मुख्य म्हणजे तुझी भन्नाट लेखनशैली त्यामुळे लेख जास्त आवडला.
10 Mar 2016 - 1:58 pm | पैसा
खूप सुरेख लिहिलं आहेस. जियो!
10 Mar 2016 - 2:22 pm | मधुरा देशपांडे
झक्कास. तू लिहितेस छानच, अगदी तुझ्यासोबत गप्पा मारतेय असं वाटतं. दोन्ही भाग आवडले. आता लेखमालेच्या प्रतीक्षेत.
10 Mar 2016 - 4:58 pm | अजया
मस्त मस्त वर्णन!
खाण्याचे हाल वाचून माझी ट्रिप परत आठवली!
11 Mar 2016 - 3:45 pm | समीरसूर
ऑसमच फक्त! काय सुरेख लिहिलंय...मजा आ गया. लिहिण्यातला सहजपणा भावला.
आणि मनमोहक फोटो...
17 Mar 2016 - 3:08 am | किलमाऊस्की
काही पंचेस तर एक्दम भारी! विशेषत:
हे असले फलक मी नेहमी अथ पासून इतिपर्यंत वाचते. :-)
17 Mar 2016 - 10:08 am | स्पा
दोन्ही भाग भारीच
25 Mar 2016 - 7:21 am | Maharani
मस्तच गं..हा भागही मस्त.
25 Mar 2016 - 11:32 am | बदामची राणी
फारच सुन्दर लिहिलय. अगदी खुदूखुदू हसवलस. शेवटही सही!
25 Mar 2016 - 1:33 pm | स्वाती दिनेश
पिरा, तू लेख पाठवले होतेस तेव्हापासून किती वेळा वाचले असतील दोन्ही भाग. फार मस्त, खुसखुशीत लिहिले आहेस.
स्वाती
25 Mar 2016 - 2:17 pm | palambar
सुरेख वर्णन , स्वच्छते साठी तरी भारत सोडावा असे वाटते
26 Mar 2016 - 6:38 pm | इशा१२३
फोटो ,वर्णन सगळच भारी.
मजा आली वाचताना .
26 Mar 2016 - 6:55 pm | बहुगुणी
उशीराच वाचतोय, पण दोन्ही भाग आवडले.