नोकरीच्या निमित्ताने सध्या आम्ही अमेरिकेतील युटा राज्यात राहत आहोत. निसर्गसौंदर्य म्हणजे घनदाट झाडी, डोंगर-दऱ्या आणि हिरवा रंग हा माझा आपला उगाचच (गैर)समज होता. युटा हे खरेतर वाळवंट, त्यामुळे मला इथे आल्यानंतर फार काही निसर्गसौंदर्य वैगेरे पहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती.
पण इथे आल्यानंतर ग्रैंड कॅनियनबद्दल ऐकले. ऐकून फार काही नवल असेल असं वाटलं नाही. कॅनियन म्हणजे मोठ्या डोंगरांच्या मधील खोल दरी. बऱ्याच कॅनियनमधून नदी किंवा पाण्याचा प्रवाह वाहताना आढळतो. ग्रैंड कॅनियन या अमेरिकेतील युटा, अरिझोना आणि नेवाडा या ३ राज्यांमध्ये पसरल्या आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गनिर्मित भूभाग बघायला मिळतात. ग्रैंड कॅनियनला ४ दिशांनी जाता येते. पूर्व भागामध्ये आर्चेस, कॅनियन लैंड, अन्टोलोप कॅनियन, होर्शू बेंड, ब्राईस कॅनियन इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात.
मित्रांकडून आणि ऑफिसमधील काही स्थानिक लोकांच्या सल्ल्यानंतर आम्ही शेवटी युटा आणि अरिझोना राज्यांमध्ये असणाऱ्या इस्ट रिमला जाण्याचे ठरवले. दगड माती मध्ये फारसा रस नसल्याने मी या सहलीकडून फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण या सहलीने वाळवंट आणि कोरडे प्रदेशसुद्धा फारच सुंदर असू शकतात याची जाणीव मला करून दिली.
सर्वात आधी काहींना युटा आणि अरिझोना अमेरिकेत नक्की कुठे आहेत असा प्रश्न पडू शकतो (इथे येण्याआधी तो मलासुद्धा पडला होता). त्यामुळे माहितीसाठी लेखामध्ये हा नकाशा लावत आहे.
लेखातील सर्व फोटो आम्ही आमच्या फोनमधुनच काढले आहेत.
आर्चेस, कॅनियनलैंड्स आणि ब्राइस कॅनियन राष्ट्रीय उद्याने, युटा
युटा आणि त्याच्या दक्षिणेकडील भाग वाळवंट असल्याने या भागातील डोंगर व खडक मुख्यत्वे वाळूपासून बनलेल्या (Sand Stone) प्रकारात मोडतात. त्यामुळे ते निसर्गतःच पिवळे, केशरी, गुलाबी आणि लाल रंगाचे असतात. याशिवाय ते फार घन किंवा टणक नसतात. लाखो वर्षे बर्फ, पाऊस, ऊन आणि वारा याचा परिणाम होऊन या डोंगरांमध्ये खिडक्या तयार होतात यालाच इंग्लिशमध्ये आर्चेस असे म्हणतात. आर्चेस राष्ट्रीय उद्यानामध्ये अशा खडकांमधल्या असंख्य खिडक्या तयार झाल्या आहेत. याशिवाय मोठ्या खडकांची झीज होऊन निरनिराळ्या प्रकारचे आकार निर्माण झाले आहेत.
आर्चेस राष्ट्रीय उद्यानाच्या सुरुवातीलाच दगडांची ही सुंदर कलाकृती पाहायला मिळते.
संतुलित खडक (बैलन्स्ड रॉक)
मोठ्या खडकाखालील भागाची झीज होऊन हा खडक जणू हवेत तरंगतच आहे.
इतर काही खिडक्या (आर्चेस)
डेलिकेट आर्च
युटा राज्याचे मानचिन्ह असणारी डेलिकेट आर्च पाहण्यासाठी जवळ जवळ दोन-अडीच मैल (सुमारे ४ किलोमीटर) डोंगर चढून जावे लागते. पायवाट बरी असली तरी चढ आणि अंतर बऱ्यापैकी मोठे आहे. डेलिकेट आर्च बघायला जात असताना कमीतकमी दहा वेळा मला वाटले असेल की एवढे कष्ट करून असा काय चमत्कार बघायला मिळणार आहे कोणास ठाऊक. पण जेव्हा आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा निसर्गाची अद्भुत कलाकृती पाहायला मिळाली. सुमारे ६० फूट उंच खडकामध्ये ४८ फूट उंच खिडकी (आर्च) तयार झाली आहे.
सूर्यास्ताच्या वेळी या लालसर गुलाबी रंगाच्या आर्चवर केशरी सोनेरी ऊन पडल्यावर ती विलक्षण सुंदर दिसते. डेलिकेट आर्चचा सुर्यास्ताचा क्षण हा नक्कीच आयुष्यातल्या मोजक्या स्वर्गीय क्षणांपैकी एक होता यात मला अजिबात शंका नाही.
कॅनियनलैंड्स राष्ट्रीय उद्यान
कॅनियनलैंड्स राष्ट्रीय उद्यान हे आर्चेसच्या साधारण समोरच आहे. दोन्हीमधील अंतर फार फार तर २५-३० मैल असेल. आर्चेसच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आम्ही दुसऱ्यादिवशी कॅनियनलैंड्सला जायचा बेत आखला. पण आर्चेसशी तुलना करता कॅनियनलैंड्स फार काही विशेष पाहायला न मिळाल्याने थोडा हिरमोड झाला आणि दिवसही वाया गेल्यासारखे वाटले. संध्याकाळी हॉटेलवर आल्यावर ऑफिसमधल्या अमेरिकन मित्राचा फोन आला. त्याने मी अजून कॅनियनलैंड्सच्या जवळच असल्याची खात्री करून मला कॅनियनलैंड्समधली मेसा आर्च सुर्योदयाच्यावेळी पाहण्याचा सल्ला दिला. बायकोशी चर्चा करून, हो-नाही करून आम्ही सूर्योदयापूर्वी मेसा आर्च गाठली.
सूर्योदय हा बरोब्बर मेसा आर्चच्या मागे होतो हे कळल्यावर आणि सकाळी ५.३० वाजता तिथे असलेली गर्दी पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत पाहायला मिळणार याची मला खात्री झाली. आमच्या सुदैवाने आकाशही अगदी मोकळे होते.
जशी जशी सूर्योदयाची वेळ होऊ लागली तशी तशी मेसा आर्च पिवळी आणि मग हळूहळू केशरी सोनेरी होऊ लागली.
सूर्योदयापुर्वीची मेसा आर्च
मेसा आर्चचा सूर्योदय
मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने मी अनुभवले. मला एखाद्या वेगळ्याच विश्वात असल्यासारखे वाटले आणि याच अवस्थेत आम्ही ब्राइस कॅनियन राष्ट्रीय उद्यानाला जाण्याचा प्रवास सुरु केला.
------------------------------------------------------------क्रमशः---------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
12 Mar 2016 - 8:23 am | इडली डोसा
मेसा आर्चचा फोटो खरंच मंत्रमुग्ध करणारा आहे.
युटा मधल्या तुमच्या वास्तव्याचा पुरेपूर आनंद घेत आहात हे दिसून येतंय, पुभाप्र
12 Mar 2016 - 8:34 am | अन्नू
वाळवंटातही सौदर्य असू शकतं कि. खुप मस्त फोटो आणि तितकाच माहितीपुर्ण लेख. :)
ते शेवटचे आर्चेस तर एकदम पिवळ्याधमक सोन्यासारखे वाटले.
12 Mar 2016 - 8:51 am | पैसा
सुंदर वर्णन आणि फोटो!
12 Mar 2016 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाह् ! अमेरिकेच्या वाळवंटी पार्क्सची सफर म्हणजे डोळ्यांना मेजवानी !! फोटो टाकताना हात आखडता घेऊ नका :)
12 Mar 2016 - 1:23 pm | एस
नेत्रसुखद!
12 Mar 2016 - 2:11 pm | अजया
मेसा आर्चचे फोटो अतिशय सुंदर.अद्भूत नजारा आहे.
12 Mar 2016 - 3:17 pm | पद्मावति
सुंदर!
मेसा आर्च चे फोटो तर अफलातून आहेत.
12 Mar 2016 - 11:37 pm | आनंदयात्री
लेख छान झालाय आणि छायाचित्रे तर अप्रतिम! या निमित्ताने इथे केलेल्या भटकंतीला उजाळा देता आला.
अवांतर:
अमेरिकन साउथवेस्टातला युटा, अरिझोना, कोलोराडो आणि न्यू मेक्सिको या चार राज्यांचा भाग हा नेटिव्ह प्युब्लो किंवा अनासाझी लोकांचा भाग. साउथवेस्टात अनासाझी लोकांच्या पाच मोठ्या रिजन मानल्या जातात, त्यापैकी सगळ्यात मोठी 'मेसा वर्दे रिजन'. या लेखातले आर्चेस आणि कॅनियनलैंड्स पार्क याच मेसा वर्दे रिजन मधलेच. या अनासाझी लोकांचा इतिहासही मोठा रंजक आहे. कोलोराडोतल्या मेसा वर्दे नेशनल पार्कात तर त्यांच्या जुन्या खेड्यांसह जवळपास ५००० पुरातन घरांना संरक्षित करण्यात आलेय. इ.स. ६०० पासून इ.स. १३०० पर्यंत या भागात नांदणारी ही लोकं तेराव्या शतकाच्या अखेरीस अचानक इथून नाहीशी झाली. काही ठिकाणी घर दारं जशीच्या तशी सोडून तर काही ठिकाणी सगळं जाळून! हे मायग्रेशन होते का अजून काही? मायग्रेशन असेल ते फ़ोर्सड होते, अत्याचारी नवीन जमातीला कंटाळुन केलेले (exodus) होते का अजून काही विशिष्ठ परिस्थिती मुळे उद्भवले होते? हे आजही न उकलेले कोडे आहे. त्याबद्दल अनेक थेअरीज आहेत पण नक्क्की कारण माहित नाही. या संदर्भात ही हिस्टरीची डोक्युमेंट्री फिल्म अजून माहिती देऊ शकेल.
14 Mar 2016 - 5:18 am | चौकटराजा
पेक व शेरीफ यांची मॅकेन्नाज गोल्ड मधली मारामारी अशाच एका जागेच्या पार्शवभूमीवर चित्रित झाली आहे.
13 Mar 2016 - 12:44 pm | बाबा योगिराज
काय मस्त फोटू आहेत. भरपूर फोटो टाका.
पुलेशु. पुभाप्र.
13 Mar 2016 - 7:27 pm | प्रचेतस
एकापेक्ष एक सरस.
ह्यापूर्वी म्याकेन्नाज गोल्ड, इंडियाना जोन्स एण्ड द लास्ट क्रूसेड आदी कित्येक चित्रपटातून पाहिलेले युटाचे अद्भूत निसर्गनवल तुमच्या नजरेतून पाहायलाही तितकंच भारी वाटतंय.
14 Mar 2016 - 5:16 am | चौकटराजा
लुकास- स्पीलबर्ग च्या लास्ट क्रुसेडचे शुटींंग युटात झाले नाही. ते स्पेनच्या वाळवंटात झाले. शेवटचा क्लायमॅक्स चा भाग
जॉर्डन पेट्रा येथे झाला. आपले मिपाकर युवान च्वांग डॉ म्हात्रे यानी हे पेट्रा हे ठिकाण पाहिले आहे.
14 Mar 2016 - 6:44 am | प्रचेतस
अगदी सुरुवातीचा 'टायटल' वाला भाग तिथे चित्रित झालाय. लास्ट क्रूसेड नसेल तर बहुधा मग तो किंग्डम ऑफ़ क्रिस्टल स्कल असेल.
14 Mar 2016 - 3:13 am | जुइ
सर्वच फोटो खूपच आवडले! पुढिल भाग लवकर टाका.
14 Mar 2016 - 5:06 am | चौकटराजा
अमेरिकेचाच नव्हे तर या प्लॅनेटचाच मुकुट म्हणजे ही अजब गजब जागा आहे. आपले फोटो अप्रतिम आहेत.पण डॉ म्हात्रे यानी सुचविल्या प्रमाणे अजून फोटो टाका. मॅकेन्नाज गोल्ड मधला स्पायडर रॉक पाहिला का ? अनेक लोक त्याच्या पायथ्याशी टेंट टाकून रात्री झोपण्याचा आनंद घेतात म्हणे ! अशा जागांवरून रात्रीचे आकाश पहाणे हा काय अनुभव असेल बरे ?
14 Mar 2016 - 7:32 am | स्पा
कसले अदभुत फोटो आलेत , खल्लास
14 Mar 2016 - 9:09 am | बोका-ए-आझम
कुठल्यातरी दुस-या ग्रहावरचे वाटतात. असा नजारा आपल्या देशात कधीच बघायला मिळत नाही.
14 Mar 2016 - 8:02 pm | चौकटराजा
आपल्या नद्यानी केलेली अशी रचना जुनेपणामुळे बुजून गेली असणार. कोलोराडोचे खोरे वयाने लहान असल्याने आपली स्थिती यायला अनेक वर्षे जावी लागतील. या भागाचे अनेक अप्रतिम व्हिडीओ यु ट्युबवर पहा ! आपल्याकडे असे थोडे काही अवशिष्ट भाग आहेत उदा हाजिमलंग, वणी ई.
14 Mar 2016 - 9:54 am | विद्यार्थी
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. यावेळी फोटो प्रथमच टाकल्यामुळे किती टाकावे आणि कसे टाकावे याबद्दल फारशी माहिती नव्हती. पण आता लेखावर मिळालेल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचा पुढील भाग टाकताना नक्कीच उपयोग होईल.
14 Mar 2016 - 7:23 pm | भाऊंचे भाऊ
एकदम एमाई 2, 72 तास अन अनेक काउब्वायपटांची आठवण झाली...
15 Mar 2016 - 4:09 pm | पियुशा
१ च नम्बर !!!
15 Mar 2016 - 5:38 pm | सुमीत भातखंडे
थक्क करणारे फोटो.
15 Mar 2016 - 5:43 pm | नीलमोहर
तो शेवटचा फोटो अवर्णनीय आलाय.