body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
मी शाळेत असताना रविवारी 'रंगोली' कार्यक्रमात 'मेरा जूता है जापानी' हे गाणं बरेचदा लागायचं आणि खूप आवडायचंही. भविष्यात कधीतरी या देशात जाण्याची आपल्याला संधी मिळेल असा विचार करण्याचंही ते वय नव्हतं. पुढे नोकरीत जपानी लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या वर्कोहोलिक पणाचा पुरेपुर अनुभव घेतल्याने जपानला जाण्याचे योग कधी म्हणजे कधीच येऊ नयेत असं वाटू लागलं. पण जेवढा तुम्ही एखाद्या गोष्टीला विरोध करता, त्याच्या दुपटीने ती गोष्ट तुमची वाट बघत असते असे काहीसे होत अखेर पहिले परदेशगमन जपानला होणार यावर (काहीशा नाईलाजाने) शिक्कामोर्तब झालं. आता जायचंच आहे तर 'बी पॉजिटिव्ह' असं म्हणत जोरदार खरेदीला सुरूवात झाली. पासपोर्ट वर पहिला वहिला व्हिसाचा शिक्का बसला, विमानाच्या खिडकीतून हात बाहेर काढू नकोस अशा हजारो सूचना चालू झाल्या, "पहिल्यांदाच जाते आहेस त्यामुळे आम्ही विमानतळावर सोडायला येणारच" असं म्हणत जमेल तेवढी जनता तिथे पाठवणी करायला लोटली आणि थोडंसं बिचकत, घाबरत, थोडंसं कुतूहल, औत्सुक्य अशा संमिश्र भावनांतच विमान आकाशात झेपावलं.
जपानच्या 'ओकायामा' शहरात विमान उतरले तेव्हा रात्र झाली होती. दिवे झगमगत होते पण तरीही अंधारच सगळीकडे, जपान किंवा कुठलाही परदेश नेमका असतो कसा याची उत्सुकता शमवण्यासाठी फारसा काही चान्स नव्हता. सोबतच्या कलीगने टॅक्सीवाल्याला जपानीतून 'कुराशिकी स्टेशन' एवढे सांगितले. कुराशिकी हे या ओकायामा शहरापासून अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरचे खेडेगाव. सिग्नल लाल झाला की गर्दी नसतानाही गाडी थांबते, पायी चालणार्यांना अत्यंत चांगली वागणूक दिली जाते, या व्यतिरीक्त त्या अर्ध्या तासाच्या प्रवासात फारसे काही कळत नव्हते. मी सुखरूप पोहोचले हे घरी कसे कळवता येईल याचे विचार डोक्यात होते, त्यात डोळ्यात झोप होती आणि टॅक्सी हॉटेलपाशी थांबली. एका अत्यंत लहानशा खोलीत फ्रीजपासून सर्वच कसे बसवले जाते याबद्दल बरंच काही ऐकलं होतं तरीही ते प्रत्यक्षात बघून प्रचंड कौतुक वाटत होतं. एक रात्र फक्त इथे राहून दुसर्या दिवशी सकाळी यापुढचे २ महिने जिथे राहायचे होते तिथे नेण्यासाठी बॉस येणार होता. सकाळी उठून ठरल्याप्रमाणे जपानी बॉस हजर झाला, जपानी पद्धतीने वाकून नमस्कार झाले आणि यावर नेमकं कसं रिअॅक्ट व्हावं हे न कळल्याने मी गोंधळून फक्तच हस्तांदोलन केले. :) सामान घेऊन आम्ही त्याच्यासोबत निघालो. सोबतचा कलीग पूर्वीही इथे येऊन गेला होता, त्यामुळे त्याच्या दृष्टीने आता मिळणार्या अपार्टमेंट्स या बर्याच चांगल्या होत्या. आता सकाळच्या वेळी जपानी लोकांची लगबग चालू होती, गाड्या धावत होत्या, लहान मुलांना शाळेत सोडायला निघालेल्या आया दिसत होत्या, मधूनच रेल्वेचा आवाज येत होता. एवढी स्वच्छता पहिल्यांदाच बघून मी अवाक झाले होते आणि आम्ही त्या घरापाशी पोहोचलो. हे साधारण १.५ किमी अंतर उद्यापासून रोज पायी यायचं आहे आणि तेही बाहेरचं तापमान ०-५ डिग्री असताना याचं टेन्शन आलं होतं. एक बोळ आणि एका बाजूला ५ खोल्या म्हणजे ५ घरं! किल्ल्या घेतल्या आणि दार उघडून मी सामान आत ठेवू लागले तसा 'स्तॉप, स्तॉप' म्हणत बॉस आला. "यु तेक शुज हिअर, यु कान्त गो विथ्थ शुज". मी गुन्हा केलाय असा काहीसा चेहर्यावरचा आविर्भाव पण तरीही सांगताना स्वर मात्र कोमल. मग तिथल्या खास बुट-चपलांसाठी आरक्षित जागेत बुट काढून ठेवले. घराच्या आत बुट घालायचे नाहीत हा जपानी संस्कृतीचा पहिला धडा मी गिरवला होता. लाकडी बेस असलेल्या त्या घरात पायांना मस्त गारवा जाणवला आणि सामान आत नेले. "चला मी येतो" असं म्हणून बॉस निघून गेला. आत हे घर माझी वाट बघत होतं. घर म्हणजे खरं तर स्टुडिओ अपार्ट्मेंटच, पण त्याचे मिनी-मायक्रो स्वरुप! आणि हे म्हणे इतरांपेक्षा मोठे होते. घरात प्रवेश करतानाची पहिली जागा बुटांची, मग लगेच वॉशिंग मशिन, मग पुढे स्वयंपाकघर - आता स्वयंपाकघर म्हणायचं फक्त, कारण त्याची व्याप्ती म्हणजे फक्त २ हॉट प्लेट्स, सिंक आणि वर एक इल्लुसं कपाट. खालच्या जागेत ४ भांडी. ईथे मी कसं मॅनेज करणार असं म्हणतच पुढे गेले. टॉयलेट बाथरुमचा दरवाजा, मग फ्रीज, त्यावर मायक्रोवेव्ह आणि इथे एक भिंत आणि दार. दोन खोल्या वेगळ्या आहेत असं समजायचं फक्त म्हणून हे दार. आणि मग एक माझ्या उंचीपेक्षाही जास्त असा पलंग, त्यावर चढायला लाकडी पायर्या हे दिसले. नाही, लहान मुलांचे असतात तसा नाही, एक मोठं लाकडी कपाट, ज्याच्या आत पण झोपता येईल इतकी त्यात जागा, आणि त्याच्यावरची जागा म्हणजे झोपायची जागा. बरं त्यावर गादी पण नाही, त्यामुळे मला कळेना की झोपायचं कुठे? पण त्या कपाटाच्या आत गादी दिसली, ती मग वर टाकली आणि एक प्रश्न सुटला. पुढे एक डब्बा जुना टीव्ही, एक कपाट, एक टेबल आणि २ खुर्च्या. मला एकटीला तशी ही जागा पुरेशी होती, पण तरीही हे सगळं फार वेगळं वाटत होतं आणि बाकीच्यांची घरं यापेक्षाही लहान आहेत हे ऐकल्यामुळे तर जे आहे ते चांगलं आहे अशीच भावना होती. २ महिने काय असे उडून जातील, पण या २ महिन्यात ६० गुणिले २ वेळचे जेवण या मायक्रो किचन मध्ये करणे हे मात्र काही केल्या पचनी पडत नव्हते. त्यात पोळ्या कुठे कराव्या हा मोठ्ठा प्रश्न होता, मग वॉशिंग मशिन वर पोळ्या लाटायच्या आणि नंतर भाजायच्या की कसं करता येईल अशा विचारातच सामान काढलं.
हे होतं घर -
खरेदीला म्हणून जवळच्या सुपरमार्केट मध्ये गेलो. मीठ आणि साखर यातला फरक कसा ओळखायचा? साखर आपली भारतातलीच डोक्यात होती, पण इथे तीही अगदी मीठासारखीच बारीक. मग चित्रावरून काय म्हणजे काय हे ओळखण्याचे काही जुजबी ज्ञान मित्राकडून समजून घेत दूध, साखर, मीठ, तेल, काही भाज्या अशी खरेदी झाली आणि स्वयंपाकाचे प्रयोग सुरू झाले. प्रयोगच कारण तेव्हा मोजक्या भाज्या, आमट्या एवढीच मजल होती. पोळ्या काय, पुण्यात विकत मिळायच्या. इथे मात्र सगळं करावं लागणार होतं. कपडे धुवायला वॉशिंग मशिन बघितलं तर त्यावर सगळं जपानीत. एसी कम हीटर च्या रिमोट वरही तेच. इंटरनेट होतं पण त्याच्या सेटींग आधी कराव्या लागतात म्हणे जपानीतून. संध्याकाळी जपानी भाषा येणारा एक कलीग आला, त्याने सगळं समजावून सांगितलं. इंटरनेट मिळालं, वॉशिंग मशिनवरच्या २५ सेटिंगशी मला काही देणं घेणं नव्हतं. मुख्य काम होण्यापुरती दोन बटनं लक्षात ठेवली. आणि मग खर्या अर्थाने आता इथे राहता येईल इतपत ते सुसह्य वाटले. त्यात इंटरनेटचा स्पीड बघून सुखद धक्का बसला, घरी बोलता आलं आणि सोबत आणलेलं खाऊन गाढ झोपही लागली.
आता ऑफिसला जायचं होतं. सकाळी उठून डबा घेऊन. आमचं ऑफिस हे या कुराशिकीपासून पुन्हा ३ गावं पलीकडे एका दुर्गम जागेत आणि लहान होतं. मोजून ३०-३२ लोक, त्यातलेही आम्ही भारतीयच अर्धे. कॅन्टीन वगैरे काही नाहीच, असतं तरीही जपानी जेवण भारतीय जीभेला मानवलं नसतंच. त्या मायक्रो किचन मध्ये स्वयंपाक आवरून घरापासून १५ मिनिटांचा प्रवास करून आलो कुराशिकी स्टेशन वर. नशीब इथे इंग्रजीत पाटी होती. शिवाय एकंदरीत एखाद्या रेल्वे स्थानकाचे हे रुप बघून मी थोडीफार तरी जपानच्या प्रेमात पडले होते.
तिथे पहिलं काम होतं महिन्याचा पास काढायचा हे. भाषा हा सगळ्यात मोठा प्रश्न. अनेक हातवारे करून, कागदपत्र दाखवून ते दिव्य पार पडलं, त्यात तारीख वगळता काहीही कळत नव्हतं. थोड्याच वेळात २ डब्यांची ही ट्रेन आली. इतक्या कमी गर्दीची ट्रेन पहिल्यांदाच बघितली. आणि मग पांढरे हातमोजे आणि इस्त्रीचे कपडे, टोपी घातलेला चालक आणि त्याचे हातवारे हा एक विशेष अंक सुरू झाला. तो त्यांच्या नोकरीचा एक भाग असला तरीही हे बघून हसू आवरत नव्हते. प्रत्येक स्थानकाहून निघण्यापूर्वी डावीकडे बघा, उजवीकडे बघा, आरशात बघा, वेळ बघा अशा टाईपचे ते चेकिंग असावे पण ते सगळे तो चालक हातवारे करून कन्फर्म करून मग गाडी निघायची. प्रत्येक स्थानक येण्यापूर्वी रेकॉर्डेड टेप मधून जपानीत एक काकू बोलत होत्या आणि त्यासोबत चालकाच्या खाणाखुणाही असायच्या. हसू येत असलं तरीही त्यांच्या कुशलतेचं कौतुक वाटलं, जपानी चालकांना वेळा पाळल्या नाहीत तर नियम कडक आहेत हे ऐकलं होतं, तेही प्रत्यक्षात पाहिलं. आमचे स्थानक आले, उतरताना तिकिटं तपासली गेली आणि आमचे मंडळ ऑफिसात पोहोचले.
"मधुरा सान, वेलकम इन जापान" म्हणून स्वागत झाले आणि दहाव्या मिनिटाला सगळे संगणक आणि त्यावरील भाषा, कळफलक (कीबोर्ड्स) जपानीत बघून मी उडाले. दर काही वेळाने नवीन धक्का बसत होता. मग त्यालाही हळूहळू सरावले. वरून तिसरा ऑप्शन म्हणजे हे, राईट क्लिक करून सगळ्यात खालचा ऑप्शन म्हणजे ते, असे लक्षात येऊ लागले आणि कामंही सुरू झाली.
पुढचे २ महिने बहुतेक वेळा शनि रवि धरून सुद्धा फक्त आणि फक्त काम होतं. आणि रोज १०-१२ तास थांबूनही आमचं काम जपानी लोकांच्या मानाने बरंच कमी होतं. रोज डबा नेणे याला पर्याय नसल्याने रोजचं ऑफिसचं आणि घरचं काम, तेही त्या मायक्रो किचन मध्ये. तेल गरम होऊन मोहरी टाकून बाकीचं सगळं दुसर्या कपाटातून आणायचं असं करताना अनेकदा फोडण्या जळायच्या. एक बरं होतं की पोळ्या जमल्या नाहीत तर "नाचता येईना अंगण वाकडे" या उक्तीने तिथल्या स्वयंपाकघराला दोष देता येत होता. खाणारीही मीच होते म्हणा, त्यामुळे प्रश्न नव्ह्ता. कडाक्याच्या थंडीत रोजचं जाणं येणं वेळखाऊ आणि बराचसा पायी प्रवास यामुळे वैताग येऊ लागला. तसं ते गृहित धरलेलं होतं, पण तरीही रोजचे दिवस मोजणं चालू झालं. नशीबाने त्या कुराशिकीत एक इंडियन रेस्टॉरंट होतं, नेपाळी माणसाचं आणि एक इटालियन, या दोन्हीनी आधार दिला. संध्याकाळी ऑफिससमोरच्या एका दुकानात कॉर्न आणि चीज घालून मिळणारा ब्रेड आणि बटाटा चिप्स हे दोन पर्याय आलटून पालटून खायला होते. "अरिगातो" असे म्हणत तिथल्या बाईने कितीही प्रेमाने स्वागत केले, तरी आम्हाला खायला काही पर्याय नसल्याने त्यातला गोडवा जाणवायचा नाही. मॅकडोनल्ड्स मध्येही शाकाहारी म्हणजे उकडलेले कॉर्न किंवा फ्रेंच फ्राईज. व्हेज बर्गर नाहीच. त्यात नेमकं अशाच वेळी भारतातलीही चुकीची लोक भेटतात आणि कामाचा वैताग अजून वाढतो असं काहीसं झालं. पण जपानी लोकांच्या या अति काम करण्याच्या सवयीने हे दिवस नकोसे झाले होते हे खरं! आणि जास्तीचं काम करण्याच अडचण नव्हती, महिनोनमहिने तेच तेच काम आणि ते सुध्दा एकही ब्रेक न घेता हे मानवणारे नव्हते. त्यापैकी आम्ही काही नवीन होतो नोकरीत, बाकीचे बरेच जण इतर दहा देशातले अनुभव घेतलेले होते आणि त्यांनाही आजवरच्या अनुभवात जपान सगळ्यात जास्त त्रासदायक वाटत होता. रात्रभर ऑफिसच्या खुर्चीत झोपून पुन्हा सकाळी तिथेच काम करताना जपानी माणसांना प्रत्यक्षात पाहिलं. ज्या देशाने पहिली बुलेट ट्रेन अस्तित्वात आणली, त्या देशात ३ तासांवरच्या बायकोला भेटायला जायला लोकांना ६-६ महिने वेळ नाही हे ऐकून तर फार वाईट वाटायचे. एकूणच सेलिब्रेशन हा प्रकार तिथे कमी दिसला. ३१ डिसेंबरच्या रात्री सुद्धा सगळीकडे शुकशुकाट होता आणि रात्री उशीरापर्यंत अनेक लोक काम करत होते.
पण तरीही ऑफिसपलीकडचा जपान आणि तिथले लोक यांच्याशी जेवढा संबंध आला, त्यात बरेच अनुभव मिळाले. कुराशिकी गावात वेळ मिळेल तेव्हा फेरफटका मारणे हा शनि रवि काम संपल्यावरचा एकमेव उद्योग होता. इथला एकमेव मॉल बघून झाला. जपान मध्ये जागेची अडचण असल्याने घरं लहान आहेत हे जाणवायचं. त्यात भूकंपासारख्या आपत्तीशी कधीही सामना करावा लागेल हेही त्यांना माहित आहे. गावातून कुठही जाताना बहुतेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग लागायचीच कारण पुन्हा तेच, जागेची अडचण. ट्रेनने जातानाही रुळांच्या अगदी शेजारी वसलेली अनेक घरं दिसायची. या लोकांना मोबाईल किंवा एकूणच गॅजेट्सचं प्रचंड आकर्षण आहे हेही जाणवायचं. तसंच गाडी हा सुद्धा या लोकांचा जिव्हाळ्याचा भाग.
इथेच बिकान म्हणून एक भाग होता. तिथे कितीही वेळा गेलो तरी छान वाटायचं. शिवाय इथे भरपूर दुकानं होती, विंडो शॉपिंग करत तिथे फिरायचं हा मोठा विरंगुळा होता.
जवळच एक तलाव होता तिथे गेल्यावर बाकी कामं, वैताग याचा विसर पडायचा.
एकच शनि-रवि आम्हाला मोकळा वेळ होता. मग ठरवून कुठेतरी जाऊयात म्हणून क्योतो या शहरात जायचे ठरले. बुलेट ट्रेन शिन्कान्सेनचा प्रवास. जपानी भाषा येणारे भारतीय लोकही सोबत होते, पण तरीही काही ठिकाणी अडलेच. तेव्हा जपानी लोकांच्या मदत करण्याचा स्वभाव जवळून पाहिला. जमेल तसे जपानी-इंग्रजी मिश्रित बोलून त्याने आम्हाला सगळी नीट माहिती दिलीच आणि उतरायच्या आधी परत एकदा सांगायला आला. क्योतो मध्ये ट्राम दिसली, मोठमोठ्या इमारती होत्या. कुराशिकीच्या मानाने इथे बरीच गर्दी होती. जपानी ललना किमोनो घालून, मेकअप करून अजूनच सुरेख दिसत होत्या. क्योतोत आम्ही बरंच फिरलो, पण आता सविस्तर काही आठवत नाही. क्योतो टॉवर, सुवर्णमंदिर आणि तिथला परिसर, आणि अजून काही मंदिरं हे एका दिवसात बघितलं.
इथे लक्षात आलं की जपानी लोकांमध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात आहेत. म्हणजे ठिकठिकाणी "लकी पर्स", लकी लॉकेट अशा नानाविध लकी वस्तुंची मांदियाळी होती. आणि तेवढ्याच प्रमाणात खरेदी करणारेही होते. पण मंदिरात शांतता होती, कुठेही आरडाओरड, धक्काबुक्की नव्हती. कुराशिकीबाहेर झालेली ही एकमेव सहल पण कायमस्वरुपी लक्षात राहील अशी.
जपानी लोकांचे कलाकुसरीचे प्रेम माहित होते, त्याची प्रचिती अनेक वेळा आली. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स यात वस्तूंची सुबक मांडणी लक्ष वेधून घ्यायची. प्रत्येक वस्तू अधिकाधिक आकर्षक कशी दिसेल, त्यातही अत्यंत नाजुक कलाकुसर, मनमोहक रंगसंगती यासाठी जपानी लोक, विशेषतः जपानी बायकांना मानायला हवं. अगदी कमी जागेत देखील ज्या पद्धतीने सगळं ठेवलेलं असायचं, ते अचंबित करणारं होतं. लहान मुलांचे कपडे, त्या बायकांच्या छत्र्या, त्यांचे कपडे हे सगळंच फार सुरेख. काय काय घेऊ आणि काय नको असं व्हायचं अगदी. एकदा असंच फिरताना जपानी जुत्याच्या प्रेमात राजकपूर का पडला याचा उलगडा झाला. आता त्या वस्तूंचे फोटो नाहीत, पण तेवढ्या सुंदर चपला आणि बुट मला कधीही कुठेही मिळणार नाहीत हे नक्की. मी चप्पल घेत होते तिथल्या मुलीने तोडक्या मोडक्या इंग्रजीतून संभाषण साधून "प्रेझेंत, प्रेझेंत, तेक फॉर फ्रेंड, यु इंडिया, नमास्ते" म्हणत खरेदीचा भरपूर आग्रहही केला. बांबु वापरून केलेले नळ आणि दगडी हौद आणि ते पाणी घ्यायला वाडग्यासम प्रकार, हा एक प्रकारही इथे पाहिला जो अनेक मंदिरांमध्ये दिसायचा.
कधी हे जपानमधले वास्तव्य नकोसं होत तर कधी क्वचित तिथल्या चांगल्या बाबींचं कौतुक वाटायचं. २ महिने झाले आणि मी अत्यंत आनंदाने 'सायोनारा' म्हणून परतले. त्यावेळच्या अनेक कारणांनी "जपानमध्ये मी कधी ट्रांन्झिटही घेणार नाही" असं मी रागाने म्हणायचे. पण आता इतक्या वर्षांनंतर मत बदललं आहे. म्हणजे त्यांचे वर्कोहोलिक नेचर, कोरडेपणा हे अजूनही आवडत नाहीच, पुन्हा तिथे जाऊन काम करणे काही रुचणार नाही, पण त्या दिवसांनी अनेक अनमोल आठवणी मला दिल्या. जेव्हा कधीकधी निवांत आयुष्याचा सुद्धा कंटाळा येतो, तोचतोच पणा वाटू लागतो, तेव्हा ही अशी आव्हानं असावीत असं वाटतं. या जपानच्या वास्तव्याने कोषाबाहेर पड्ण्याची मला संधी दिली. त्यांच्या या कामसू वृत्तीनेच दुसर्या महायुद्धानंतर बेचिराख झालेला हा देश आज परत घडला आहे हेही आहेच. तिथले भूकंप, त्सुनामी यामुळे अनेक अडचणी येऊनही जपानी लोक किती शांततेनी राहतात, लहान मुलांपासून सगळेच कसे शिस्तीत राहतात अशा पोस्ट ज्या फेसबुक किंवा इतरत्र वाचायला मिळतात, त्या खर्या असतील याची खात्री वाटते. बराच काळ जावा लागला या देशावरचा राग जायला, यात त्यांचा दोष नव्हता, परिस्थिती आणि माझे अनुभव असे जुळून आले की 'आल इज वेल' म्हणूनही बरं काही वाटेना. पण आता मात्र हे सगळं विसरून त्या अनुभवांनी मला किती समृद्ध केलं, किती कणखर बनवलं हे उमगतंय. आणि म्हणूनच आता मी अभिमानाने गुणगुणते, मेरा जूता है जापानी...फिर भी दिल है हिंदुस्थानी!!
(चित्र- किलमाऊस्की)
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 12:17 pm | मृत्युन्जय
इथेच बिकान म्हणून एक भाग होता. तिथे कितीही वेळा गेलो तरी छान वाटायचं. शिवाय इथे भरपूर दुकानं होती,
मराठीतले आपण "दुकान - बिकान" म्हणतो तो शब्द या बिकानवरुनच आलाय काय :) ;)
लेख मस्त जमलाय. माझ्या माहितीतल्या अजुन एका कंपनीत सुद्धा लोक जपानला जायचे म्हटले की धाय मोकलुन रडतात. एरवी ऑनसाइट हवे असते पण जपान नको रे बाबा असे म्हणतात ते लोक. त्याचीच प्रचिती आली तुमच्या लेखात :)
8 Mar 2016 - 12:30 pm | मितान
मस्त जमून आलेला लेख !
मला हे सगळं असलं तरी जायचंय जपानला ;)
8 Mar 2016 - 12:30 pm | मितान
मस्त जमून आलेला लेख !
मला हे सगळं असलं तरी जायचंय जपानला ;)
8 Mar 2016 - 2:05 pm | पद्मावति
लेख मस्तं जमलाय. खूप आवडला.
8 Mar 2016 - 2:33 pm | सुबक ठेंगणी
Home is where you make it :)
8 Mar 2016 - 4:46 pm | नीलमोहर
जपानविषयी अशा प्रकारची तपशीलवार माहिती पहिल्यांदाच वाचायला मिळाली.
8 Mar 2016 - 6:03 pm | प्राची अश्विनी
लेख आवडला.
8 Mar 2016 - 6:35 pm | प्रीत-मोहर
आवडेश. मला तरीही जायचय जपानात. विषेशतः साकुरा ब्लॉसमस च्या वेळेस
9 Mar 2016 - 2:22 pm | बरखा
"इथे लक्षात आलं की जपानी लोकांमध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात आहेत. म्हणजे ठिकठिकाणी "लकी पर्स", लकी लॉकेट अशा नानाविध लकी वस्तुंची मांदियाळी होती. आणि तेवढ्याच प्रमाणात खरेदी करणारेही होते. पण मंदिरात शांतता होती, कुठेही आरडाओरड, धक्काबुक्की नव्हती."
आपल्या देशात असे चित्र कधी बघायल मिळ्णार कोण जाणे. मंदिरातील शांतता बघायला मिळाली आणि सगळे धक्कबुक्की न करता रांगेतुन गेले तर फार सुरेख वाटेल......
बाकी लेख वाचायला आवडले.
10 Mar 2016 - 12:35 pm | स्नेहल महेश
सुंदर फोटो
तरी पण मला जपानला जायचं ब्लॉसम साठी
10 Mar 2016 - 1:51 pm | पियुशा
किती कष्टाळु जनता आहे जापानची ;) लेख आवडला.
10 Mar 2016 - 4:24 pm | वैदेहिश्री
लेख आवडला. खूप छान लिहील आहे.
11 Mar 2016 - 7:16 am | अर्धवटराव
नवखा बॅट्समन एकदम वासीम अक्रमच्या तोफखान्यापुढे उभा झाला म्हणायचा.. पण विकेट पडली नाहि, पीचवर टिकुन राहिला हे महत्वाचं :)
अवांतरः
जपानी म्हणजे अत्यंत वर्कोहोलीक, तणावात जगणारे पण सहृदयी लोक असच ऐकलय. कोरीयाबद्द्लपण असच ऐकुन आहे... फक्त तिथे मॅनेजर लोक्स फार कडक शब्द वापरतात म्हणे.
11 Mar 2016 - 7:58 am | किलमाऊस्की
अंकातला "वन ऑफ द बेस्ट हायलाईट" लेख आहे हा. छान जमलाय लेख. जपानी जनतेच्या वर्कोहोलिक स्वभावाबद्दल गोष्टी ऐकल्या होत्या. फोटोही सुंदर. जापनीज गार्डन्स, जपानी कलाकुसर फारच आवडतं.
अवांतर - युट्युबवर 'izumislife' हा व्हिलॉग मी फॉलो करते. इझुमी नावाची जपानमधे जन्मलेली कोरीयन मुलगी हा व्हिलॉग चालवते. तुझ्या टीनी टायनी अपार्टमेंटचे फोटो पाहून तिच्या व्हिलॉग मधला हा एपिसोड आठवला.
11 Mar 2016 - 8:12 am | रेवती
बापरे! किती ते सारखं काम करत रहायचं! मलाही अशा देशात रहायला आवडणार नाही असं लेखावरून दिसतय. फोटू आवडले व लहान जागा म्हणजे नक्की किती लहान ते समजलं. सगळं डोळ्यासमोर आलं. छान लिहिलयस.
11 Mar 2016 - 8:22 am | सविता००१
आणि फोटोही अप्रतिम. त्या दुकानांच्या बिकान मध्ये जावस वाटतंय
11 Mar 2016 - 9:08 am | स्पा
वाह, मस्तच लिहिलय, प्रांजळ वर्णन आवडलं
11 Mar 2016 - 2:55 pm | इशा१२३
मस्त!जपानी सफर आवडली.त्या छोट्याशा घरात रहाण किती अवघड.ही छोटि घर एका माणसासाठी असतात कि कुटुंबहि अशाच छोट्या घरात राहतात?
12 Mar 2016 - 12:41 am | डॉ सुहास म्हात्रे
जपानची फर्स्ट हँड ओळख खूप आवडली ! हा लेख वाचून एक नक्की, अजिबात आवडणार नाही तेथे काम करायला. पण फिरायला नक्की जाणार... एक अनामिक आकर्षण वाटायला लावणारा देश आहे तो !
12 Mar 2016 - 6:59 am | अन्नू
कधी चुक्कून फिरायला गेलो तर जाईन. तेही कोणी नेलं तर ;) बाकी काम करायला आमालाबी आज्जिब्बात जमणार न्हाय! (असं पण देतंयच कोण म्हणा आमच्यासारख्या, "आय माय स्वारी" म्हणणार्याला काम तिथं!) ;)
28 Mar 2016 - 6:30 pm | अजया
:) अगदी हेच!
12 Mar 2016 - 2:15 pm | स्वाती दिनेश
छान लेख,
माझ्या जपानच्या आठवणी ताज्या झाल्या ह्या लेखामुळे,
स्वाती
13 Mar 2016 - 6:13 pm | पैसा
खूप सुरेख लिहिलंयस!
14 Mar 2016 - 4:41 pm | पिलीयन रायडर
वर्णन वाचुन मी तर धसका घेतला बुवा जपान्यांचा!! जन्मात काम करायला जाणार नाही.. पण फिरायला मात्र नक्की जाईन.
जपान्यांचे यश त्यांच्या ह्या अतिकामात आणि शिस्तीतच आहे. पण आपल्याला झेपण्यासारखे नाही हे ही खरे. फोटो खुप छान आहेत. वर्णनही आवडले. :)
15 Mar 2016 - 2:30 pm | मधुरा देशपांडे
सर्वांना धन्यवाद.
@ईशाताई, बरीच कुटुंबदेखील अशा लहानशा घरात राहतात, जागेची कमतरता आहेच आणि महागाई. त्यामुळे अगदी १-२ बेडरुमची घरं असली तरीही तुलनेने लहान खोल्या असतात.
17 Mar 2016 - 1:12 pm | इशा१२३
बापरे!अवघडच मग.
16 Mar 2016 - 3:56 pm | Mrunalini
मधुरा भारी आहे लेख.. जपान बद्दल उत्सुकता आहेच पण त्यांच्या workoholic असण्याबद्दल खुप ऐकले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या ८ तासाच्या वर १ मिनिटसुद्धा जास्त काम न करणारीला इथे काम करणे अशक्य. ;)
16 Mar 2016 - 10:56 pm | रुपी
छान लिहिलंय! स्वातीताईंची मालिका आधी वाचली आहेच. पण प्रामाणिकपणे मांडलेली ही दुसरी बाजूसुद्धा आवडली.
16 Mar 2016 - 11:23 pm | मित्रहो
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
मी टोकीयोमधे होतो त्यामुळे जिकडे तिकडे उंच उंच इमारती आणि माणसेच दिसायची. ट्रेनला प्रचंड गर्दी होती. विशेषतः जेआर यामानोते लाइनला. शिस्त होती मात्र. जपानमधे कधी भिती वाटली नाही. रात्री अपरात्री घरी परतलो तरी भिती वाटत नव्हती. काम भरपूर करतात हे खरे. नवीन पिढी तशी नाही हे ऐकून आहे.फोनवर बोलतानाचा हाइ आणि हेहेहे हे शब्द विशिष्ट लयीत उच्चारले जातात. ते संभाषण काही न कळता ऐकने गंमतच असते.
17 Mar 2016 - 2:39 pm | वेल्लाभट
खलास!!!!!!
25 Mar 2016 - 11:31 am | पूर्वाविवेक
लेख अतिशात छान लिहिला आहे. भाषा ओघवती आहे. जपान आणि तिथल्या लोकांबद्दल मनात एक सुप्त कुतूहल आहे, वाचून मजा आली त्यामुळे. ते इटुकल-पिटुकल घर खुप आवडलं.
28 Mar 2016 - 3:14 pm | सानिकास्वप्निल
लेख मस्तं लिहिला आहेस. तोत्तोचान, मुराकामी, Yasunari Kawabataमुळे जपानबद्दल फार कुतुहल वाटत असे. तुझा लेख वाचून जपान बघायची / फिरण्याची इच्छा झाली आहे ;)
5 Apr 2016 - 6:49 am | Maharani
Mast anubhav....
7 Apr 2016 - 3:46 am | जुइ
जापानी लोक अती कामसू असल्याबद्द्ल नेहमी ऐकायला येते. बाकी छान अनुभव!