body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
"व्हेन यू आर टायर्ड ऑफ लंडन, यू आर टायर्ड ऑफ लाइफ..." असे कोणीतरी म्हणून ठेवलंय...
माझ्या मते हे शहर एका मस्त, मोठ्या बुफे टेबल सारखं आहे. इथे प्रत्येकाच्या आवडीचं, रुचीचं काही ना काहीतरी आहेच. इतिहास प्रेमींसाठी टॉवर ऑफ लंडन, चर्चिल वॉर रूम्स आहे. कला, संगीत, स्थापत्यकलेमधे रुची असणार्या लोकांना सेंट पॉल्स कॅथेड्रल आहे. इथली असंख्य संग्रहालये, आर्ट गॅलरीज आहेत, थियेटर्स आहेत. लहान मुलांसाठी लंडन झू, हॅरी पॉटर वर्ल्ड आहे. राणीचा राजवाडा आहे, लंडन आय, फेरफटका मारायला थेम्सचा किनारा, रीटेल थेरेपी साठी अख्खा ऑक्स्फर्ड स्ट्रीट आहे आणि खेळ वेड्यांसाठी ... अर्थातच लॉर्ड्स आणि विम्बल्डन आहे.
जगभरातल्या टेनिस आणि क्रिकेट शौकिनांसाठी विम्बल्डन आणि लॉर्ड्स वर जाऊन प्रत्यक्ष मॅच बघण्यासारखी सुखाची गोष्ट नाही. पण लंडन मधे जर तुम्हाला कमी वेळ असेल तर दुसरा बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे या दोन्ही ठिकाणी गाइडेड टूर्स घेणे. मॅच न बघता सुद्धा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड आणि विम्बल्डन स्टेडियम प्रत्यक्ष बघण्याचा उत्तम पर्याय आहे हा! जेव्हा मॅच बघणं जमेल तेव्हा जमेल पण तोपर्यंत या तीर्थक्षेत्रांचे निदान दर्शन तर घेऊ असा विचार करून आम्हीही हा पर्याय घ्यायचे ठरविले. आधी बुक केली लॉर्ड्स ची टूर. सकाळी अकराची वेळ मिळाली होती. आठवड्याचा अधला-मधला दिवस असल्यामुळे गर्दी काहीच नव्हती.
वेलकम टू लॉर्ड्स, होम ऑफ क्रिकेट
ही टूर सुरू झाली लॉर्ड्स म्युझीयम पासून..
१८८२ च्या ऑगस्ट मधे ओवल वर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. दुसर्या दिवशीच्या लंडनच्या स्पोर्टिन्ग टाइम्स मधे 'ब्रिटीश क्रिकेट' च्या निधनाची दुख:द वार्ता जाहीर करण्यात आली. थोडक्यात मजकूर असा होता.... " काल ओवल वर ब्रिटीश क्रिकेटचे निधन झाले. क्रियकर्म पार पडले असून त्याची राख रांगोळी म्हणजे 'अॅशस' आता लवकरच ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येतील ".. अगदी टिपिकल ब्रिटीश सेन्स ऑफ ह्यूमर!
त्यानंतर काही आठवड्यातच ईंग्लिश संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेला. ब्रिटीश संघाचा कर्णधार, आयवो ब्लिघ ने प्रतिज्ञा केली की यावेळेस ऑस्ट्रेलियाला जिंकून आपली गेलेली अब्रू परत आणायची...' अॅशेस' परत आणायचेच. या दौर्यावर एका फ्रेण्डली मॅच नंतर फ्लोरेन्स मॉर्फी या ऑस्ट्रेलियन मुलीने गंमत म्हणून मॅच मधे वापरल्या गेलेल्या बेल्स जाळल्या आणि त्याची राख स्वत:च्या अत्तराच्या रिकाम्या बाटलीत भरली. मग तो 'अॅशस अर्न' मोठ्या थाटामाटात आयवो ब्लिघला अॅशस चे रूपक म्हणून सादर केला गेला. ब्लिघने सुद्धा हा जरासा खोडसाळपणा अतिशय खिलाडू वृत्तीने स्वीकारला आणि तो अॅशस अर्न आपल्याबरोबर इंग्लंडला परत घेऊन आला. आता मजा अशी की, हीच फ्लोरेन्स मॉर्फी पुढे बरोबर एक वर्षानी सौ.आयव्हो ब्लिघ झाली.
डावीकडे अॅशस अर्न आणि उजवीकडे अॅशस ट्रॉफी
ही अॅशसची गोष्ट टूर गाइड सांगत होता पण माझं पूर्ण लक्ष होतं अर्थात प्रुडेन्शियल वर्ल्ड कप १९८३ कडे..
१९७५ मधे सुरू झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप चे पहिले तीन सामने इंग्लंड मधेच पार पडले. या तिन्ही कप्सचे प्रयोजक होती प्रुडेन्शियल पी एल सी कंपनी.
या संग्रहलयात अजूनही बर्याच गोष्टी आहेत. खेळाडूंचे पोर्टेट्स, डॉन ब्रॅडमन सारख्या दिग्गजांनी वापरलेल्या क्रिकेट किट्स, जुने बॉल्स, बॅट्स, कागदपत्रे आणि पत्रव्यवहार इत्यादी.
म्युझीयम नंतर आता आम्ही लॉर्ड्स पॅविलियन कडे वळलो.
आधी इंग्लिश संघाच्या ड्रेसिंग रूम कडे. ही रूम अतिशय साधी आहे. खोलीच्या मधोमध एक काउंटर टेबल आणि सर्व भिंतींना लागून असलेले काळ्या लेदरचे सोफे/ खुर्च्या. आमचा गाइड सांगत होता की हे खेळाडू इतके अंधश्रद्धाळू असतात की प्रत्येक खेळाडूची या ड्रेसिंग रूममधे बसण्याची जागा ठरलेली असते. ही जागा हातची जायला नको म्हणून हे लोक आपापला नंबर लावायला उतावीळ असतात नाहीतर त्यादिवशी आपला खेळ बिघडण्याची त्यांना धास्ती असते.
या खोलीच्या बाहेर आलं की त्याच लाईनीत पुढे जाऊन पाहुण्या संघाची ड्रेसिंग रूम आहे. रचना तशीच. तसेच सोफे. दोन्हीही ड्रेसिंग रूम्स मधे ऑनर्स बोर्ड्स आहेत. एका इनिंग मधे शंभर रन्स किंवा पाच विकेट्स घेणर्या खेळाडूचे नाव या बोर्डावर लागतं. इथे आपले नाव लागणे हे कुठल्याही क्रिकेट खेळाडू साठी मोठ्या अभिमानाची बाब असते. या बोर्डवर सचिन तेंडुलकरचं मात्र नाव नाही.
ड्रेसिंग रूम्सला लागून आहेत लॉर्डसची सुप्रसिद्ध गॅलरी! याच गॅलरीतून खेळाडू ग्राउंडवर चाललेली मॅच बघतात आणि आपापल्या संघाला चियर करतात. इथेच सौरभ गांगुलीने सीरीज जिंकल्यानंतर बेभान होऊन आपल्या अंगातला शर्ट काढून हवेत फिरवला होता. त्याच्या अशा वागण्याने लॉर्ड्सच्या प्रतिष्ठेला कसा धक्का बसला होता, लॉर्ड्सच्या परंपरेचा केव्हडा तो अपमान , सगळे MCC सभासद कसे भयंकर डिस्गसटेड झाले होते असे आमचा टूर गाइड मोठ्या कळकळीने सांगत होता... फक्त मग त्याला अँड्र्यू फ्लींटॉफच्या वानखेडे स्टेडियमवरच्या शर्ट स्ट्रिपिंग बदद्ल छेडल्यावर मात्र त्यावर त्याने पाठांतर केलेलं, अपेक्षित असलेलं अगदी टिपिकल गुळमुळीत उत्तर दिलं. थोडक्यात " आपला तो बाब्या, दुसर्याचे ते...." असला प्रकार होता.
फोटोत उजवीकडे गॅलरीचा भाग दिसत आहे..
लॉर्ड्स गॅलरी-- डावीकडची इंग्लिश आणि उजवीकडे जी दिसते ती पाहुण्या संघाची..
दोन गॅलरिजच्या मधे खालचा मजल्यावर दिसतेय ती जगप्रसिद्ध लॉंग रूम. इथे फोटो मात्र काढू देत नाहीत. प्रत्येक खेळाडू हा ड्रेसिंग रूम मधून तयार होऊन खाली येतो मग लॉंगरूम मधून चालत, सगळ्या MCC सभासदांचे अभिवादन स्वीकारत इथल्याच दारातून खाली ग्राउंडवर उतरतो. मॅचच्या वेळेस प्रेक्षकांच्या प्रचंड आवाजाने, गदरोळाने इथे टांगलेली झुंबरे कधी कधी थरथरतात.
लॉर्ड्स ग्राउंड हे MCC ( Marylebone Cricket Club ) या क्रिकेट क्लबच्या अखत्यारीत येतं.
१९९९ पर्यंत इथे स्त्रियांना मेंबरशिप मिळत नसे . MCC च्या या भेदभावामुळे एक ईंग्लंडची राणी सोडली तर सामन्यादरम्यान कुठल्याही स्त्रीचा प्रवेश या pavilian मधे निषिद्ध असे. प्रत्यक्ष लॉर्ड्सच्या क्रिकेट ग्राउंड बदद्ल मी काय बोलणार? बस, नाम ही काफ़ी है....
जे.पी. मॉर्गन मीडीया सेंटर मधून दिसणारा नजारा.. समोर लॉर्ड्स pavilion. या ग्राउंड ला एका बाजूने जवळजवळ अडीच मीटर्सचा उतार आहे त्यामुळे पावसात इथे पाणी साचण्याचा खूप मोठा प्रश्न असतो.
जे.पी. मॉर्गन मीडीया सेंटर
९ जून १८७७ या दिवशी लंडनच्या ' द फील्ड' या मासिकात एक छोटीशी जाहिरात आली होती, ती साधारण अशी होती..." द ऑल इंग्लंड क्रुके अँड लॉन टेनिस क्लब ने एक लॉन टेनिस स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा ९ जुलै पासून सुरू होईल."
ही जाहिरात होती सगळ्यात पहिल्या वहिल्या विंबल्डन चॅम्पियनशिप्सची!!! ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोके क्लब अर्थात विम्बल्डन! हा जवळपास पाचशे सभासदांचा प्रायवेट मेम्बर्स क्लब आहे. या संपूर्ण अतीप्रचंड आवारात ग्रास, क्ले, इनडोर तसेच सरावाचे कोर्टस असे सर्व मिळून पन्नासएक कोर्टस आहेत.
या आमच्या टूरची सुरूवात झाली ती विम्बल्डन म्युझीयम पासून. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे वर्षानुवर्षं टीवीवर पाहिलेल्या विम्बल्डन पुरूष आणि स्त्रियांच्या एकेरी विजेत्यांच्या हातातल्या या ट्रॉफीज...
या ट्रॉफीज विजेत्यांच्या समारंभपूर्वक हातात देतात खरे पण समारंभानंतर त्या इथेच या संग्रहालयात ठेवल्या जातात. विजेते घरी घेऊन जातात ती याची प्रतिकृती! पुरूष एकेरीचा कप जिंकण्याचं भाग्य ब्रिटीश खेळाडूंना फार कमी मिळालं. फ्रेड पेरी च्या १९३६ मधे झालेल्या विजयानंतर हा कप जिंकणारा ब्रिटीश खेळाडू ठरला अँडी मरे...... पण त्यासाठी ब्रिटीशांना सत्त्याहत्तर वर्षे वाट पाहावी लागली.
यानंतर आम्हाला नेण्यात आले कोर्ट क्रमांक १. सेंटर कोर्ट नंतर हे कोर्ट सगळ्यात महत्वाचं. ही दोन कोर्टस अत्यंत कमी अपवाद सोडले तर वर्षातून फक्त एकदा चॅंपियन-शीप साठीच उपयोगात आणली जातात. बाकी सर्व कोर्टस मात्र सभासदांसाठी खेळायला उपलब्ध असतात.
दरवर्षी विम्बल्डन सामने सुरू होण्याआधी कोर्टस वर नवीन गवत उगवले जाते. सामने खेळतांना गवताची लांबी अचूक आठ मिलिमीटर्स असणे जरूरी असते. गवताच्या वाढीसाठी कृत्रिम सूर्यप्रकाशासाठी दिव्यांची व्यवस्था आहे. इंग्लंडमध्ये एकूणच कोल्हे आणि कबुतरे भरपुर प्रमाणात आहेत. हे कोल्हे या गवतावर वर येऊ नयेत म्हणून कोर्टवर विजेच्या तारांची कुंपणं घातलेली दिसतात. तसेच सामन्यांच्या वेळेस कबुतरं आणि पक्ष्यांना पळवून लावायला विम्बल्डन चा खास प्रशिक्षण दिलेला ससाणा (Hawk) ' रूफस' रोज सकाळी एक तास कोर्टसवर घिरट्या मारतो.
या कोर्टाच्या बाहेर पडलं की बाहेर मोकळ्या जागेत सामन्यांच्या वेळी प्रचंड मोठे टीवी स्क्रीन्स लावलेले असतात. ज्या लोकांना तिकिटे मिळाली नाहीत अशांसाठी या स्क्रीन्सवर सामना बघायला समोर एका छोट्याशा टेकडावर मोकळी जागा राखून ठेवली असते. या जागेला ' Aorangi Terrace' म्हणतात. मित्रमंडळी, कुटुंबियांबरोबर इथल्या हिरवळीवर सतरंजी पसरून ऐसपैस बसून ,आरामात खात पीत आपल्या आवडत्या खेळाडूला चियर करत सामना पाहण्याचा हा अनुभव केवळ आणि केवळ अविस्मरणीय! विम्बल्डन सामन्यांच्या वेळेस स्ट्रॉबेरी आणि क्रिमला आणि 'पिम्म' या ड्रिंकला प्रचंड मागणी असते. स्ट्रॉबेरी अँड क्रीम तसेच पिम्म या गोष्टी म्हणजे विम्बल्डनची जणू परंपराच आहे.
आता कोर्ट नंबर १८. टेनिसच्या इतिहासातली सर्वात जास्तं वेळ चाललेला सामना २०१० मधे इथे खेळला गेला. जॉन इस्नेर आणि निकोलस माहूत मधे खेळलेला हा सामना १८३ गेम्स, अकरा तास आणि एकूण तीन दिवस चालला. या कोर्टला लागूनच ज्या काळ्या काच लावलेल्या खिडक्या आहेत ती ब्रॉड्काॅट सेंटरची इमारत.
ही खेळाडूंची इंटरव्यू रूम. मॅच संपल्यानंतर प्रत्येक खेळाडू इथे मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देतो. सगळ्यात छान म्हणजे या टूर मधे आपल्याला पण या इंटरव्यू टेबलसमोर, खुर्चिवर बसून फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेता येते.
" If you can meet with triumph & disaster, & treat those imposters just the same...."
विम्बल्डन चं हृदय ज्याला म्हणता येईल ते सेंटर कोर्ट. ज्यावर खेळणे हे जगातल्या प्रत्येक टेनिस खेळाडूचं स्वप्न ते सेंटर कोर्ट. या कोर्ट वर येण्यासाठी स्पर्धकांसाठी जे प्रवेशद्वार आहे त्यावरती या वरील ओळी कोरल्या आहेत.
या प्रवेशद्वाराच्या थेट वरती दिसतोय तो रॉयल बॉक्स. फक्त ब्रिटीश राजघराण्यातले लोक आणि खास आमंत्रित केलेले विशेष पाहूणेच फक्त इथे बसू शकतात. स्वत: राणी आतापर्यंत फक्त चार सामन्यांच्या वेळेस उपस्थीत होती, बाकी तिला टेनिस फारसे आवडत नसावे. या रॉयल बॉक्स च्या शेजारी खाली कॉमिंट्रेटार बॉक्स आणि त्यावरती स्पर्धकांच्या नातेवाईकांसाठी असलेला प्लेयर्स बॉक्स. ८७ मधे पॅट कॅश ने इवान लेंडलला मात दिल्यानंतर एक अतिशय आगळी-वेगळी गोष्ट केली. ती म्हणजे जिंकल्यानंतर आनंदाच्या भरात हा माणूस स्टँड्स कडे धावत सुटला. कॉमिंट्रेटार बॉक्स च्या वरती चढून प्लेयर्स बॉक्स मधे पोहोचला आणि तिथे जाऊन आपल्या कोचला, वडिलांना भेटला. विम्बल्डन च्या इतिहासात हे असे कोणीही केले नव्हते. त्यानंतर मात्र असे करणे आता अगदी नेहमीचेच झाले आहे. आता तर त्या खेळाडूंना चढून जावं लागू नये म्हणून एक लहानसे गेटच बनवले आहे.
या कोर्टवर काही वर्षांपूर्वी सरकणारं छत बांधल्या गेलं. तीन हजार टन वजनाचे हे प्रचंड धुड पूर्णपणे सेंटर कोर्ट ला अच्छादायला दहा मिनिटे लागतात. आता या रूफ मुळे मात्र पावसातही सामने निर्धोक पणे चालू राहतात.
शेवटी विम्बल्डन काय आणि लॉर्ड्स काय इथे प्रत्यक्ष मॅच बघण्याचा योग येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत लंडन गेलात तर ही दोन ठिकाणे तुमच्या मस्ट विझिट यादीत जरूर असू द्या...
(चित्र- किलमाऊस्की)
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 7:53 am | प्रीत-मोहर
नक्कीच बघणारे ही स्थळॅ. नवर्याची तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे या टुर्स कधीतरी त्याला गिफ्ट करायचा मानस आहे.
8 Mar 2016 - 9:17 am | आदूबाळ
झकास!
वेम्बली स्टेडियम आणि केनिंगटन ओव्हलचा उल्लेखही हवा होता.
8 Mar 2016 - 12:32 pm | वेल्लाभट
जबर सफर !
आहा. विंबल्डन ला मॅच बघायचीच आहे एकदा.
बाकी ओल्ड ट्रॅफर्ड न दिसल्याने मात्र जरासा अपेक्षाभंग झाला.
- मॅन्चेस्टर युनायटेडचा पंखा
8 Mar 2016 - 4:24 pm | प्रचेतस
मस्तच.
नेहमीच्या लंडनपेक्षा वेगळं लंडन खूप आवडलं.
8 Mar 2016 - 4:39 pm | मोदक
झक्कास..!!!!
8 Mar 2016 - 4:53 pm | सविता००१
अफाट
8 Mar 2016 - 7:20 pm | Mrunalini
मस्त झालीये टुर. कधी आलोच लंडनला तर इकडे जायचेच आहे.
8 Mar 2016 - 9:49 pm | नूतन सावंत
लंडन वर्ल्ड कप बघायची इच्छा अजून तीव्र झाली.लेख आवडला हेवेसांलान.
9 Mar 2016 - 4:27 pm | मोहनराव
हि दोन्ही ठिकाणे २००७ मध्ये मित्रांबरोबर पाहण्याचा योग आला होता. तुमच्या लेखामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
9 Mar 2016 - 5:12 pm | अनुप ढेरे
आवडली ओळख!
9 Mar 2016 - 5:34 pm | पैसा
अफाट!
9 Mar 2016 - 8:27 pm | मधुरा देशपांडे
काही नावं बघूनच लेखांचा अंदाज येतो, ते अगदी सार्थ करणारा लेख. खूप आवडलं. धन्यवाद पद्मावती अंकासाठी आवर्जून लिहिल्याबद्दल.
9 Mar 2016 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
खेळनगरी लंडनची आगळीवेगळी सहल आवडली !
9 Mar 2016 - 10:16 pm | Sanjay Uwach
क्रिडा विषयी सुंदर लेख
9 Mar 2016 - 10:40 pm | बोका-ए-आझम
लाॅर्ड्स ईडन गार्डन किंवा एमसीजीएवढं भव्य नाहीये पण त्याचा इतिहास जबरदस्त आहे. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या कोणाचंही मन भरून येईल इतकं देखणं तर ते नक्कीच आहे. विंबल्डन फक्त बाहेरुन पाहिलंय. पण त्याचाही इतिहास तितकाच दैदीप्यमान आहे. खरोखर इतिहास जपणं हे ब्रिटिशच करु जाणे!
11 Mar 2016 - 2:17 pm | गिरकी
वेगळ्याच प्रकारची भटकंती आवडली :)
11 Mar 2016 - 2:57 pm | रंगासेठ
सही एकदम, खरय तुमचं. कोणत्याही क्रिकेटवेड्या/टेनीसवेड्यासाठी ही तीर्थक्षेत्रच आहेत. :-)
माझ्या यादीत "वेंबली आणि मँचेस्टर युनायटेडचे ग्राउंड, ओल्ड ट्रॅफर्ड" पण आहे.
11 Mar 2016 - 3:03 pm | वैदेहिश्री
लेख आवडला.
11 Mar 2016 - 4:02 pm | इशा१२३
फोटो,स्थळ,माहिती सगळेच आवडले.
11 Mar 2016 - 4:06 pm | अजया
लेख तुझं नाव वाचून उघडला आणि तू नेहमीप्रमाणेच निराश केलं नाहीस! मस्त जमलाय लेख.लवकरच यायला लावणार तू राणीच्या देशात!
14 Mar 2016 - 6:27 am | जुइ
लंडन भेटीत या २ गोष्टी बघणारच!
15 Mar 2016 - 6:00 pm | स्वाती दिनेश
खेळवेड्यांसाठीची ही सफर फारच आवडली,
स्वाती
15 Mar 2016 - 6:26 pm | पिलीयन रायडर
सुरेखच!!! डोळ्याचे पारणे फिटले बाई फोटो पाहुन!
लंडनला जायचे आहेच!
15 Mar 2016 - 7:34 pm | अस्वस्थामा
अरे वा छान वर्णन केलंय. त्याचबरोबर प्रिमिअर लीग टीम्सची मैदाने, सिल्वरस्टोन (एफ-१) अशी इतर पण ठिकाणे किमान उल्लेखली असती तर खेळवेड्यांसाठी उत्तम माहिती झाली असती.
16 Mar 2016 - 9:54 am | पूर्वाविवेक
खूप छान वर्णन आणि फोटो. क्रिकेटवेड्या माझ्या नवरोबाला इथे नक्कीच आवडेल.
20 Mar 2016 - 1:00 pm | सानिकास्वप्निल
लाॅर्ड्सवर पाय ठेवला ते माझ्या क्रिकेटवेड्या बाबांसोबत. लाॅर्ड्स बघायचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आजही ते अगदी भरभरून व्यक्त करतात. तुझ्या या लेखामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या :)
विंबल्डनला लंडन आॅलिंपिक्सच्या वेळी गेलो होतो टेनिस मॅच बघायला, कोर्ट १ ला अँडी मरे आणि लाॅरा राॅब्सनची मॅच व सेंटर कोर्टला व्हिलियम बहिणींची मॅच बघितली होती.
पद्मावती सुरेख लेख लिहिला आहेस, नेहमी लिहित जा.
24 Mar 2016 - 3:34 pm | Maharani
Mast lekh....