body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
फतेहपूर सीकरी
मुलं लहान असताना त्यांना घेऊन जमेल तसे फिरत होतो. २००५ मधे दिवाळीच्या आधी सुटी घेऊन दिल्ली वारी करू म्हटले. दिल्लीला जायचे म्हटल्यावर ८० वर्षांचे सासरे बरोबर येतो म्हणाले. त्यांची दोघांचीही तिकिटे काढली. हॉटेल्स दिल्लीत जाऊन बघू म्हटले. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असल्याने फार काही बघून होणार नाही हे माहीत होतेच. त्याप्रमाणे दिल्ली, आग्रा, मथुरा, फतेहपूर सीकरी एवढाच प्लॅन ५ दिवसांसाठी ठरवला.
जुनी दिल्ली, लाल किल्ला, म्युझियम वगैरे पाहिले. मथुरा वृंदावन, आग्रा किल्ला, ताजमहाल हे बघून झाले. हॉटेलवाल्याने गाडी ठरवून दिली होती तो ड्रायव्हर मुस्लिम होता. अतिशय अदबशीर ऊर्दू-हिंदी बोलणारा आणि व्यवस्थित माणूस. पान सिगारेट काही व्यसन दिसले नाही. ग्रँड ट्रंक रोडवर दरोडे वगैरे घातले जातात असे काहीबाही सांगत होता. फतेहपूर सीकरीला जाताना किल्ल्याजवळ पोचताच ५/६ टपोरी पोरांनी गाडीच्या मागून पुढून धावत गाडीला अक्षरशः घेरले. दोघेजण गाडीच्या बॉनेटवर चढले. शेवट ड्रायव्हरने गाडी थांबवली. पोरे एकूण 'अवतार' दिसत होती. ऊर्मट भाषेत आम्ही गाईड आहोत, किल्ला दाखवू म्हणाले. ड्रायव्हर काही बोलेना. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असताना विरोध तरी कसा करणार?
नशिबावर भार टाकून त्यांच्याबरोबर गेलो. त्यानी सलिम चिश्तीच्या दर्ग्यात नेले. तिथे चादर चढवा म्हणून त्या चादर विकणार्याला दीडशे रुपये देणगी झाली, फुले सब्जा वगैरे झाले. आणि मग त्या पोरांना खंडणी दीडशे रुपये दिल्यावर परत त्यांनी गाडीकडे आणून सोडले. गाडी सुरू झाल्यावर ड्रायव्हर म्हणाला "साब, असली किला आगे दूसरे दरवाजे से जाकर मिलेगा" पुन्हा आता असलाच प्रकार आहे का म्हणून जीव मुठीत धरून बसलो. पण नाही. तिकडे गेल्यावर खरा किल्ला, जोधाबाई महाल, दरबार वगैरे बघायला मिळाला. पण साक्षात दिल्लीच्या जवळ गाईडच्या नावाखाली अशी लुटालूट कशी काय चालू देतात हा प्रश्न पडला. ड्रायव्हरही त्या प्रकारात सामील असावा का शंका आलीच, पण हा प्रकार होऊन गेल्यावर आता काय उपयोग होणार होता? तीनशे रुपये अक्कलखाती खर्च समजून गप्प बसलो. मात्र इतर ट्रिप छान झाली त्यामुळे एक गालबोट एवढेच म्हणून दुसर्या दिवशी शॉपिंगला आणि चांदनी चौकात जायचे ठरवले.
-------------------
दिल्ली
चांदनी चौकात एक दहा मिनिटे भयानक टेन्शनची गेली. झालं काय की तिथल्या प्रसिद्ध गुरुद्वारासमोर आम्ही जरा रेंगाळलो तेवढ्यात सासरे आणि सासूबाई गायब!! जिवाचे पाणी झाले. त्याना हिंदी काही समजत नाही. सगळ्या बाजूंना माणसांचा अफाट सागर. धनत्रयोदशीचा दिवस, संध्याकाळ. सगळी दिल्ली शॉपिंगसाठी बाहेर पडलेली. शोधायचे तरी कुठे? मुलाचे प्रसंगावधान तेवढ्यात कामाला आले. तो म्हणाला आजोबा आपल्या पुढे या फूटपाथवर चालत पुढे होते. त्यांच्यासोबत आजी पण होती. नवरा अक्षरशः धावत त्या दिशेने गेला. एका सिग्नलसमोर फूटपाथच्या टोकाला दोघेही उभे सापडले! (माझ्या सासर्यांना असे कोणी सोबत आहे का नाही न बघता चालत सुटायची सवय आहे) तिथल्या ट्रॅफिकमधे रस्ता क्रॉस करायची हिंमत त्यांना झाली नाही हे नशीब.
शॉपिंग वगैरे विचार कॅन्सल करून आम्ही परत पहाडगंज एरियातल्या हॉटेलवर आलो. हॉटेलच्या बाहेर वातावरण जरा विचित्र वाटले. लोक काळजीत दिसत होते आणि घाईघाईत इकडून तिकडे जात होते. बहुतेक हॉटेल्स आणि दुकाने बंद होती. जरा टेकतोय तेवढ्यात भावाचा फोन आला, "तुम्ही कुठे आहात? सगळे सुरक्षित आहात ना?" काय झालं म्हणून विचारले तर टीव्ही लाव म्हणाला. पहाडगंज भागात बॉम्बस्फोट झालाय. अजून कुठे कुठे बाँबस्फोट झालेत आणि चांदनी चौक भागात एक बॉम्ब पकडला गेलाय. अरे देवा!
आम्ही राहिलो होतो तिथून २ रस्ते ओलांडून पलिकडच्या गल्लीत बाँबस्फोट झालेला. चांदनी चौक मधून आम्ही निघालो त्यानंतर अर्ध्या तासात तिथेही एक बाँब डिफ्युज केला होता! सासरे दुसर्या खोलीत विश्रांती घेत होते. त्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आणि अनोळखी गावात उगीच टेन्शन नको म्हणून काही सांगितलेच नाही. रात्री हॉटेलचे रेस्टॉरंट बंद होते. बरेचसे चालून एक बंगाली खानावळ उघडी सापडली. तिथे पटापट मिळाले ते जेवून परत येऊन झोप काढली. सासरे जरा त्या जेवणाबद्दल कुरकूर करत होते, पण ते फक्त ऐकून घेतले. दुसर्या दिवशी ऑगस्ट क्रांतीने परत यायची तिकिटे काढली होती.
संध्याकाळपर्यंतचा वेळ कसातरी काढला. बाहेर कुठे जाणे शक्य नव्हतेच. गाडीत पेपर बघताना सासर्यांना समजले की दिल्लीत बाँबस्फोट झाले. मुंबईला नणदेच्या घरी पोचल्यावर ते गप्पा सांगत होते, दिल्लीत असे बाँबस्फोट झाले तसे झाले, तेव्हा मुलगा म्हणाला, "काय आजोबा, दिल्लीत असताना तुम्हाला स्फोट झाले हे कुठे माहीत होते?" :D हा आमचा बॉम्बस्फोटांचा सर्वात जवळून घेतलेला अनुभव. प्रत्यक्षात ज्यांना असे कुठे दुर्दैवाने स्फोटाच्या किंवा दहशतवादाच्या तडाख्यात सापडून त्रास होत असेल त्याची किंचित का होईना कल्पना मात्र तेव्हा आली.
--------------------
बंगलोर - म्हैसूर
२००६ साली म्हैसूर, बंगलोर ऊटीला जायचे ठरले. बंगलोर पर्यंत रेल्वेची तिकिटे आयआरसीटीसीवरून विनासायास काढली. मात्र हॉटेल आणि तिथल्या लोकल साईट सीइंगची व्यवस्था तिथे गेल्यावर करू म्हणून निवांत राहिलो. गेल्यावर बंगलोरमधे हॉटेल चांगले मिळाले. म्हैसूर बघायचे आहे केटीडीसी च्या बसची तिकिटे कुठे मिळतील म्हणून हॉटेलवाल्याला विचारले. तर इथेच शेजारी ऑफिस आहे म्हणाला म्हणून आम्ही बुकिंग केले. ऑफिस लहानसे होते. आणि प्रवासाची तिकिटे हातात पडली त्यावर दादा ट्रॅव्हेल्स असे नाव! बाहेर येऊन पाहिले तर केटीडीसीचा बोर्ड!! हा काय प्रकार म्हणून विचारले तर "इदर ऐसाच रहता" हे उत्तर तिथल्या माणसाने दिले.
हे सगळे काही बरोबर वाटेना. संध्याकाळी पुन्हा तिकिटे कॅन्सल करावी म्हणून गेलो तर तिथे दुसराच कोणीतरी गुंडासारखा दिसणारा माणूस बसलेला. त्याची हिंदी अजून दिव्य. पण अर्थ समजला. तिकिटे कॅन्सल होणार नाहीत. तुम्हाला नको तर येऊ नका. पैसे परत मिळणार नाहीत हे समजले. आता असो. काय फसवणूक करतील? एखादे दुसरे ठिकाण दाखवणार नाहीत. असे ना का! जाऊ म्हणून दुसर्या दिवशी सकाळी सांगितल्या ठिकाणी भरभर आटपून हजर राहिलो. आठाचे नऊ झाले, नऊचे दहा झाले तरी बसचा पत्ता नाही! शेवट साडेदहाला एकदाचा एक बसनामक प्रचंड आवाज करणारा खटारा आला. इतका उशीर म्हटल्यावर माझे डोके आधीच गरम झाले होते.
बस अजून उशीर उशीर करत काही ठिकाणे दाखवून चालत होती. त्या बसवाल्यांची जेवणाची ठिकाणे ठरलेली असतात. तिथे पोचायला दुपारच्या दीडऐवजी पावणेचार झाले. प्रवासात असल्याने काही च्याव म्याव बरोबर होतं. पण माझ्या मुलाला पहिल्यापासून वेळेवर व्यवस्थित जेवायची सवय. त्याला खूप भूक लागलेली. त्याचे कळवळणे बघून मला रडू फुटले. आधीच केटीडीसीच्या नावाचा वापर करून फसवणूक झाली म्हणून डोक्यात संताप खदखदत होता. त्यात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मुलाचा त्या दिवशी वाढदिवस म्हणून आम्ही ती ट्रिप आखली होती!
माझा सगळा संताप टूर गाईडवर निघाला. त्याला म्हटले, वेळेवर गाडी जेवायला का थांबवली नाही? तो म्हणे की आमची ठरलेली हॉटेले असतात. त्या दिवशी मी त्यालाच नव्हे, त्याच्या मुलांना शाप दिला. म्हटले, तुला मुले आहेत? माझ्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी तुझ्यामुळे उपाशी रहावे लागले, तुझी मुले पण उपाशी राहतील. त्याच्या चेहर्यावर एकच अर्धा क्षण चलबिचल दिसली. पुन्हा काहीच झाले नाही असा तो निगरगट्टपणे पुढे चालता झाला.
संध्याकाळी परत यायला उशीर झाला. सगळ्या दिवसाची वाट लागली होती. भुकेमुळे कोणाला काय पाहिले त्यातही इंटरेस्ट राहिला नव्हता. फसवणुकीमुळे अपमान, निराशा आणि असल्या सगळ्या निराश भावना घेऊन ती म्हैसूर ट्रिप पार पडली. दुसर्या दिवशी ऊटीला जायचे होते. सुदैवाने दादा ट्रॅव्हेल्सकडे बुकिंग केले नव्हते. आम्हीच दुसर्या एका बसने गेलो आणि कोणत्याही अपघाताशिवाय बंगलोरला परत आलो. मैसूरच्या दादा ट्रॅव्हेल्सच्या अनुभवावर जरा उतारा मिळाला. चांगली गोष्ट म्हणजे ऊटीहून परत येताना बसमधे मुंगारु मळे चित्रपटाची अतिशय गोड गाणी पहिल्यांदाच ऐकायला मिळाली!
नंतर इकडे तिकडे बोलताना कळले की बंगलोरमधे कसल्याही चिंधी ट्रॅव्हेल्सनी केटीडीसीचे बोर्ड लावून लुटालूट चालवली आहे. आणि केटीडीसीही त्याच्याकडे काणाडोळा करते. आता या गोष्टीला १० वर्षे झाली. आताची परिस्थिती काय माहीत नाही.
-------
उत्तर असो की दक्षिण आपण भारतीय प्रवाशांची फसवणूक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या जवळ गुंडगिरी यात सगळीकडे सारखेच आहोत! आता हॉटेल बुकिंग आणि लोकल साईट सीइंग सगळे ऑनलाईन आणि सोपे झाल्यामुळे एवढी फसवणूक होत नसेल. पण जे असे ऑनलाईन बुकिंग करू शकत नाहीत, त्यांची परिस्थिती मात्र कठीण वाटते. प्रवासात अनेक चांगले अनुभवही आले. मुलगा अगदी लहान असताना भाषा सुद्धा न कळणार्या केरळी हॉटेलवाल्यांकडून वेळोवेळी गरम पाणी, दूध, दूधभाताची व्यवस्था होणे असो की कोणी आजारी पडल्यावर अनोळखी गावात जुन्या डॉक्टरने नीट समजून उपचार करणे असो. आंबटगोड अनुभव सगळीकडे येणारच. मात्र हे फसवणुकीचे दोन अनुभव सांगावेत असे वाटले, कारण एरवी आपण खाजगी कंपन्यांचे काम सरकारी कंपन्यांपेक्षा चांगले असे समजतो, पण प्रवासाच्या क्षेत्रात मात्र सरकारी कंपन्याच उत्तम. कारण गाड्या वेळेत सुटतात, वेळेत पोचतात. आपल्याला किती पैशात काय मिळणार आहे याची सुरुवातीलाच कल्पना असते. व्यवहारात पारदर्शकता महत्त्वाची. इथे गोव्यात येणार्यांना मी नेहमी सरकारी गोवा टुरीझमच्या हॉटेल्सची शिफारस करते ती याचसाठी. तिसरा अनुभव म्हणजे दहशतवादाशी लांबून ओळख झाली ती एवढी घाबरवणारी होती, की ज्यांना सहन करावे लागत असेल त्यांच्या हालांची पुसट तरी कल्पना आपल्याला असावी.
(चित्र- किलमाऊस्की)
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 12:31 am | नूतन सावंत
किती भयंकर ग पैताई.सोबतची माणसे हरवणे काय आणि बॉम्बस्फोटच्या ठिकाणांजवळ आपण असणे काय?दोन्ही अनुभव नकोसे.
सहमत.
8 Mar 2016 - 7:18 am | प्रीत-मोहर
असे अनुभव बंङळुरकर मित्र-मैत्रिणींकडुन ऐकलेत. त्यामुळे कुणावरही विश्वास न ठेवणे आणि सावधगिरी हाच उपाय आहे.
8 Mar 2016 - 7:25 am | यशोधरा
नशीबाने आजवर असे अनुभव कधी आले नाहीत.
8 Mar 2016 - 4:07 pm | वेल्लाभट
असे दोन तीन अनुभव आम्हालाही आलेत सांगण्यासारखे. सवडीने टंकेन.
8 Mar 2016 - 7:14 pm | कंजूस
हे खरं आहे.अजूनही असंच करतात.पाच ते पंचाहत्तर असा वयोगट असला की जमेल तेवढं पाहू असाच दृष्टीकोन ठेवावा लागतो.
8 Mar 2016 - 10:01 pm | Mrunalini
बापरे.. किती भयंकर अनुभव... खरच प्रवासात कधी काय होईल काहि सांगता येत नाही.
8 Mar 2016 - 10:04 pm | सस्नेह
पण असेही असते प्रवास म्हणजे. सगळं काही गोगोड नसतं नेहमी.
8 Mar 2016 - 10:12 pm | पद्मावति
बरोबर वेगवेगळ्या वयोगटातले, विशेष करून ज्येष्ठ लोकं असल्यावर व्यवस्था, नियोजन आधीच कठीण असतं त्यात असे अनुभव म्हणजे भयंकरच आहे.
8 Mar 2016 - 10:56 pm | चेक आणि मेट
>>आणि मग त्या पोरांना खंडणी दीडशे रुपये दिल्यावर परत त्यांनी गाडीकडे आणून सोडले.<<
भारीच अनुभव
10 Mar 2016 - 6:01 pm | अनन्न्या
काटा आला अंगावर, अजूनतरी असे अनुभव नाहीत. बंगलोरचा फसवाफसवीचा अनुभव मात्र घेतलाय. ठरलेल्या ठिकाणीच गाडी थांबवणे, सगळ्यांचे जेवण पूर्ण व्हायच्या आधीच निघायला लावणे, खरेदीसाठी हेच दुकान क्से योग्य आहे हे पटवणे असे बरेच आहेत.
10 Mar 2016 - 6:07 pm | गिरकी
अय्यो पाSSSप ….
बाकी उत्तरेकडे मलापण नेहेमी असेच इन-सिक्युअर वाटत आलेले आहे. नम्मा बेंगळूरू बद्दल आम्ही काही बोलणार नाही. :)
10 Mar 2016 - 6:17 pm | होबासराव
इथे गोव्यात येणार्यांना मी नेहमी सरकारी गोवा टुरीझमच्या हॉटेल्सची शिफारस करते
हजार वेळा सहमत, तिन्हि वेळेस चा अनुभव एकदम छान होता जिटिडिसि चा.आणखि एक गोष्ट गोव्यात मला तरि प्रवाशां सोबत फसवा फसवि चे प्रकार कुठे आढळले नाहि. मि रोज एक नविन बाईक तिथे दिवसभरासाठि रेंट वर घ्यायचो. मनसोक्त फिरलोय, मनसोक्त हॉटेलिंग केलिय ति गोव्यातच.
11 Mar 2016 - 9:51 am | पूर्वाविवेक
थरारक! पण असेच अनुभव माणसाला शहाणे करतात. तुमच्या या अनुभवांचा निश्चितच वाचकांना फायदा होईल.
11 Mar 2016 - 10:33 am | जेपी
थरारक अनुभव..
11 Mar 2016 - 3:20 pm | इशा१२३
फतेहपुर सिक्रीचा असा अनुभव मीहि घेतलाय.आम्ही खाजगी गाडी ठरवुन गेलो होतो.गाडीतुन्न उतरताच हि गाईड पोर मागे लागली.शेवटी एकाच मुलाला बरोबर घेउ आणि ठराविक रक्कम देउ अस ठणकावुन सांगितल्यावर ती मुल गप्प बसली.तेवढाच त्या मुलाला रोजगार असा नवर्याचा उदात्त हेतु.नकार दिला असता तर त्या मुलांनी पिच्छा सोडला नसताच.त्या मुलाला माहिती अगदिच सुमार होती.दर्गाच्या इथे जायला मी आधीच नकार दिल्याने तो प्रश्ण मिटला.
हा गाईडचा त्रास अनेक ठिकाणी अनुभवास येतोच.विशेषकरून स्थळ नीट दाखवण्यापेक्षा त्यांच्या ठरलेल्या दुकानात खरेदिला न्यायची घाई फार असते.
खुप वर्षापुर्वी केलेल्या बेंगलोर म्हैसुर उटी ट्रिप आम्हालाहि असाच अनुभव आलाय.केटिडीसीचे ओफिस रेल्वे स्टेशनच्या बाजुला असलेले दाखवले गेले.त्यांच्या बस यथातथाच होत्या.ठिकाण सगळि दाखवली.पण जेवणासाठि अगदिच सुमार होटेलात नेले.खरेदिलाहि त्यांच्या ठराविक दुकानातच नेले.वैताग.
लेखात लिहिलेले अनुभव वाचुन हे आठवले.प्रवासात सावधगिरी बाळगणे हेच उत्तम.असे अनुभव शिकवुन जातात.
11 Mar 2016 - 4:23 pm | मधुरा देशपांडे
सगळेच अनुभव भयंकर पण तो बॉम्बस्फोटाचा वाचूनच शहारे आले.
11 Mar 2016 - 4:45 pm | प्रमोद देर्देकर
पैतै मी आता ऑक्टोबर-२०१५ मध्ये आई ,बाबा, मावशी आणि साबा याच्या सोबत आम्ही तिघे असा ७ जणांनी दिल्ली, फत्तेपुर सिक्री , वृंदावन, अक्षरधाम असाच दौरा केला त्यावेळी मलाही सिक्रीला असाच अनुभव आला. मी त्या पोरांना शेवटपर्यंत दाद दिली नाही. शेवटी बुलंद दरवाजा पर्यंत पायर्या चढुन गेल्यावर त्या किल्ल्यात शिरल्यावर ते मागे फिरले. आणि तुझा बँगलोरचा अनुभव नाहीये पण त्याचा पुढे उपयोग होईल. पण मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी असा अनुभव आल्याने कसतरीच / वाईट वाटलं.
12 Mar 2016 - 11:06 am | रवीराज
पण हे आवडले नाही.मोठ्यांची शिक्षा मुलांना का? तुम्हाला त्रास झाला मान्य, त्याचा जाळ गाईडवरच काढायचा.
तरी पण अनुभव कथनाबद्दल धन्यवाद,इतर लोक तरी अशा जाळ्यात अडकणार नाही.
14 Mar 2016 - 8:32 pm | अभिजित - १
मला पटले विचार .. तुम्ही आदर्श वादी दिसता ..
असो तुमचे आदर्श तुमच्या कडे ठेवा आणि त्यांची जोपासना करण्याची संधी तुम्हाला भरपूर मिळो हि प्रार्थना .. बघू किती वेळ टिकतात तुमचे आदर्श ..
15 Mar 2016 - 12:40 am | रवीराज
ईश्वर तुमचे भले करो .
16 Mar 2016 - 7:43 pm | अभिजित - १
दोषींच्या कायदेशीर वारसांनाही दंड सक्तीचा
न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसदारांनी दंडाची रक्कम भरायला हवी,
मुंबई : | March 15, 2016 5:12 AM
12 Mar 2016 - 8:37 pm | सत्याचे प्रयोग
फतेहपूर शिक्रीला जाताना असाच अनुभव आला. आणि एकूण वातावरणातही गूढ भिती वाटली
2 Apr 2016 - 9:04 am | अत्रन्गि पाउस
तिथल्या दर्ग्यात असाच ५०० रुपयांना फसवले गेल्याची भावना आली होती...
पण त्या शिवाय काहीतरी अघोरी वातावरण वाटते तिथे ....
14 Mar 2016 - 6:16 pm | पिलीयन रायडर
मला वाटतं ह्या धाग्यात अशा अनुभवांचे संकलन होऊ शकेल. मलाही म्हैसुरला फार वाईट अनुभव आला होता.
एका टॅक्सीवाल्याने बंगलोरला सोडतो म्हणुन सांगितले आणि ऐनवेळेस आलाच नाही. शेवटच्या क्षणी गाडी मिळवुन अत्यंत वेगाने चालवुन बेंगलोर गाठावे लागले. थोडक्यात ट्रेन पकडली. सोबत सासु सासरे आणि बाळ होते. तेव्हा थोडे पैसे जास्त गेले तरी हॉटेलातुन विश्वासु माणसाकडेच गाडी बुक करावी.
14 Mar 2016 - 8:04 pm | palambar
आत्ता केरळ ला गेलो होतो तिथे हि थोडा खरेदि बाबत असाच अनुभव आला. प्रवासि कंपनि सुध्हा आंतरजाला वरुन काहि माहित्ति काढ्तात. उदा national park फेब्रुवरिमार्च मधे बंद असते हे त्यांना माहिति नव्हते , त्यामुळे मुन्नार चे पार्क
बघ्ता आले नाहि.
14 Mar 2016 - 8:12 pm | पैसा
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद! असे अनुभव सहसा कोणी उघड सांगत नाहीत. पण निदान कोणीतरी सावध होऊन बचावले तर तेवढेच पुण्यकर्म! म्हणून लिहिले.
14 Mar 2016 - 8:20 pm | गवि
बापरे. थरारक आणि काही ठिकाणी भयंकर पीडादायक अनुभव आलेले दिसताहेत. मांडलेतही चांगल्या प्रकारे.
भारतात आणि काही ठिकाणी परदेशातही पर्यटनस्थळांवर मुख्य प्रॉब्लेम बुजबुजलेल्या गाईड्स, एजंट आणि गुंडसदृश फसव्या लोकांपासून होतोय. अगदी फसवणारेच असतील असं नाही पण चहा, भजी, कणीस इ.इ. वाले झुंडीने अंगावर येतात. पाय पालटू देत नाहीत मोकळेपणी.
14 Mar 2016 - 8:32 pm | जव्हेरगंज
मी एकदा ट्रेनमध्ये परत येत असताना
15 Mar 2016 - 2:15 pm | वैदेहिश्री
भयंकर अनुभव.
15 Mar 2016 - 5:33 pm | स्वाती दिनेश
भयंकर अनुभव ग.. वाचताना काटा आला .
स्वाती
15 Mar 2016 - 6:31 pm | नाखु
अगदी दोन वर्षापुर्वी पर्यंत हीच बोंब आहे आणि के टी डी सी अप्रोवड असे काहीसे लिहिलेले असते. तेही समजेल न सम्जेल असे. सुट्ट्या जाहीर न करणे ही सार्या सरकारी पर्यटन खात्यांची मिरास्दारी आहे. एम टी डी सी ने कोयनानगर जागेवर आरक्षण पेक्षा (पुण्यात्च) करा असा दांडगा अनुभव १९९९ ला घेतला) आणि रिसॉर्त अक्षरशः ओसाड होते सहा ट्वीन बंगल्यातल्या एकात आम्ही (दांपत्य) दोघेच भुतासारखे.
ही चाल्वातातच मुळी अश्या पद्धतीने की खाजगीचा धंदा जोरदार व्हावा.
15 Mar 2016 - 7:26 pm | हाडक्या
भलतेच अनुभव आहेत हो. यामुळेच "अतिथी देवो भव" सारख्या जाहिराती चालवाव्या लागतात.
तसेही सगळीकडे पब्लिक आपल्या गल्लीत शेर असतंय. मग टुरिस्ट ठिकाणी लुट हा जणु त्यांचा अधिकारच (गोवा पण अपवाद नाही हां). ;)
अलाहाबादला जाताना ट्रेनमध्ये स्लीपर कोचमध्ये सीट होती. सगळ्या प्रवासभर लोकल प्रवासी एक दोन स्टेशनसाठी आत घुसायचे आणि ज्यांची सीट त्यांनाच कोपर्यात सरकवायचे. हे महाराष्ट्रापासून युपीपर्यंत मात्र सेम होतं. :)
15 Mar 2016 - 7:41 pm | पैसा
गोव्यातही टॅक्सी ड्रायव्हर्स, रिक्षावाले अव्वाच्या सव्वा पैसे काढतात आणि पोलिस मामांचे इतर राज्यांच्या नंबर प्लेट्स वाल्या गाड्यांवर बारीक लक्ष असते.
रिझर्व्हेशनच्या डब्यात घुसून रिझर्व्हेशन केलेल्या लोकांना कोपर्यात बसवणे हे तर सगळीकडेच असते. वरचे बर्थ असतील तर नशीब. पण खालचे बर्थ असतील तर बघायला नको!
2 Apr 2016 - 5:37 am | जुइ
४ वर्षापूर्वी आमच्या काश्मीर सहली दरम्यान असेच काही वेगळे अनुभव आले होते.
2 Apr 2016 - 7:36 am | रेवती
बापरे! बॉम्बस्फोट काय आणि वयस्क लोकांचे हरवणे काय, सगळेच अंगावर शहारे आणणारे आहे. आपल्याकडे हे असेच असते. येथील आमचे एक मित्रकुटुंब भारतवारीला गेल्यावर मुंबैपासूनच अपघाताचे इतके अनुभव आले की ते त्यानंतर भारतात गेलेच नाहीत. त्यांनी हौसेने सर्व नातेवाईकांची मिळून ट्रीप आठेक दिवसांची काढली होती पण त्यांच्या गाडीवर चोरांचा हल्ला, त्यात ड्रायव्हर जखमी होणे, हॉस्पिटलवार्या असं झाल्याने त्यांनी कानाला खडा लावलाय.
आधीच मला प्रवास करणे आवडत नाही त्यापुढे जाऊन हे सगळे झेपणारे नाही. पुण्याच्या एका टोकापासून दुसर्या टोकाला जाऊन नातेवाईकांना भेटून आलं की प्रवासाची हौस संपते. आजकाल जर कोणी घरी जेवायला बोलावले तर मी त्यांना सांगते की मी दिवसा येऊ शकते पण परत घरी सोडायला रात्रीचे तुम्ही तुमची गाडी घेऊन या. तसे असेल तर जमेल नाहीतर नस्ते व्याप नकोत. अगदी भेटायचेच असेल तर माझ्या घरी येऊन भेटा. त्यांना मग तसेच जमते. हापिसातून जाता येता ते भेटतात. लक्षुमी रस्त्याला खरेदी नको होते तर दिल्लीच्या गर्दीत काय होत असेल ही कल्पनाही नको वाटते.
8 Apr 2016 - 3:21 pm | Maharani
Baapre....pravasat ase anubhav ale ki pravasachi majach jate sagale