body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
शुभास्ते पंथानः संतु!
बरोब्बर एक वर्षापूर्वी याच दिवशी, म्हणजे ८ मार्चला अनाहिताचा पहिला विशेषांक प्रकाशित झाला. देशोदेशीच्या अनाहिता कधी अंक दिसतोय याची वाट बघत होत्या. प्रत्येकीलाच उत्सुकता होती की गेले ३-४ महिने ज्या अंकाबद्दल चर्चा होत आहेत तो अंक प्रत्यक्षात कसा असेल? कुणी काय लिहिलं असेल? वाचकांना आवडेल का? असे अनेक प्रश्न. अखेर मुखपृष्ठ दिसू लागले, एकेक लेख दिसू लागले आणि मूर्त स्वरुपात पहिला अंक प्रकाशित झाला. विविध विषयांवर लेख, कविता यातून वाचक म्हणून अनेकांना आनंद मिळालाच, पण या सगळ्यासोबत त्यापेक्षाही महत्वाचा होता तो या अंकाने दिलेला आत्मविश्वास! सर्वजणी आयुष्यभर जतन करतील असा तो अनमोल क्षण होता. या अंकानंतर आता पुढचा अंकही इतकाच प्रभावी व्हायला हवा यातून पुन्हा काही महिन्यातच चर्चा सुरू झाल्या. विशिष्ट विषय घेऊन काहीतरी करायला हवे यातून रुची अंकाची निर्मिती झाली आणि पुन्हा एक वैविध्यपूर्ण अंक 'जागतिक अन्न दिवसा'च्या निमित्ताने प्रकाशित झाला. केवळ मिसळपावच नाही, तर इतरत्रही या अंकाचे कौतुक झाले आणि मग तेवढ्याच उत्साहाने अनाहिता सज्ज झाल्या वाचकांना 'अनाहिता' च्या पुढच्या विशेषांकाची सहल घडवायला! यावर्षीच्या जागतिक महिला दिनी तुमच्यासमोर अत्यंत आनंदाने सादर करत आहोत हा 'भटकंती विशेषांक'!
अगदी सुरूवातीच्या काळात जागोजागी भटकणारा मनुष्य पुढे स्थिरावला खरा, पण अनेक कारणांसाठी भटकंती हा प्रत्येकाच्या जीवनात आजही तेवढाच अविभाज्य घटक आहे, किंबहुना अनेक कारणांनी त्यात भर पडली आहे. हे सहलीचे अनुभव इतरांसोबत शेअर करणे हाही त्यातलाच एक भाग! पुलंपासून ते मीना प्रभुंपर्यंत दिग्गज लेखक-लेखिकांनी वाचकांना त्यांच्या प्रवासवर्णनातून सातासमुद्रापार फिरवून आणले. गेल्या काही वर्षात आंतरजालामुळे विविध ब्लॉग्स, लेख यामार्फत आपल्याला बसल्या जागेवर अनेकविध स्थळांचे दर्शन घडले. नवीन ठिकाणी जाताना माहिती शोधणे सोपे झाले. यातूनच विचारमंथन घडू लागले भटकंती विशेषांकाचे! कोण काय लिहिणार, काय असायला हवे यावर गप्पा रंगू लागल्या,चर्चा होऊ लागल्या. 'प्रवासवर्णन' हेच फक्त भटकंतीचे एकमेव स्वरुप नाही, हे लक्षात घेऊन भटकंती या विषयाशी निगडीत विविध पैलुंवर विचार केला गेला.
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकेन मनुजा चातुर्य येतसे फार॥
अशा मनुजा फार चातुर्य येणार्या देशाटनात येणारे वेगवेगळे अनुभव, प्रवासासाठी करावी लागणारी तयारी, प्रवासात घ्यावी लागणारी काळजी, औषधे, साहसी सफरी अशा अनेक विषयांना स्पर्श करणारा हा अंक असावा या दृष्टीने अनाहितांनी आवडीप्रमाणे, त्यांच्या अनुभवांवर लिहायला सुरूवात केली. घर, मूल, करीअर या सर्वात गुरफटलेल्या असताना, अनेक जबबदार्या खांद्यावर झेलत असलेल्या या सगळ्या जणी अंकासाठी म्हणून विशेष वेळ काढून लिहित्या झाल्या आणि हेच विविध अनुभव एकत्रितपणे गुंफणारा हा अनाहिता भटकंती विशेषांक आज प्रत्यक्षात तुमच्यासमोर आहे.
तर काय काय आहे या अंकात? या सहलीत जंगलसफारी आहे आणि आनंदाने नाचणारा मनमोरही आहे. सरप्राइज सहलीची वेगळीच कल्पना, प्रवासात येणारे बरेवाईट अनुभव आहेत आणि अगदी ज्याला मनमुराद भटकंती म्हणता येईल असे ट्रेक्स, पायवाटा धुंडाळत जाणारे ट्रेल्स, ऐतिहासिक ठिकाणांची वर्णने, खेळवेड्यांसाठीची एक वेगळीच भटकंती आहे. आपल्या मातीतली रॉयल राजस्थानची सफर आणि अनवट अशा खेड्याची ओळख आहे. ग्रीसमधील शांत समुद्रातली सफर आहे, ग्वाटेमाला, ग्रोसग्लोकनर हाय अल्पाइनरोड सारख्या अनवट ठिकाणांची ओळख आहे आणि परदेशातल्या घरांमधलं आनंददायी वास्तव्यही आहे. प्रवासाला निघताना काय काळजी घ्याल? कोणती औषधे बरोबर ठेवाल ह्याचबरोबर अनेक ट्रॅव्हल टिप्सही आहेत. प्रवासात कंटाळा आला किंवा जरा विसावू या वळणावर..असे वाटले तर चित्रकोडे आहे आणि रंगवायला मंडलाचित्रंही आहेत. सातही खंडात पर्यटन केलेली आसावरी आणि पाच खंड कामा निमित्त फिरलेली विकी अशा काही मिसळपाव बाहेरच्या मैत्रिणीही आपल्याला गप्पांमधून भेटणार आहेत. प्रवासात भेटणारी माणसं कधी कधी जीवाचे मैत्रं कसे होतात हे सुध्दा खेड्यामधल्या कौलारु घरात उलगडले आहे आणि शेवटी परत जाताना आठवणींच्या खजिन्याबरोबरच स्मरणवस्तूंचा खजिनाही आहे. भटकंती म्हणजे छायाचित्रे हवीच, आणि प्रत्येक लेख अशा उत्तमोत्तम छायाचित्रांनी नटलेला आहे. शिवाय या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल असा अजून एक मुद्दा असा की, फक्त विविध प्रकारचे लेख हा एकमेव केंद्रबिंदू न ठेवता त्यासोबतीने चित्र, ओरिगामी, क्रोशा अशा विविध कलांचे भटकंतीशी निगडीत स्वरुप देखील या संपूर्ण अंकात बघायला मिळेल आणि हे सगळं आहे 'मेड बाय अनाहिता'!! थोडक्यात एकाच ठिकाणी बसून या अंकाच्या निमित्ताने आपण आसेतुहिमाचल आणि विदेशातही शब्दरुपी, चित्ररुपी सफर करणार आहोत. अगदी सगळ्या खंडातून जगभर मनमुराद भटकंती करणार आहोत.
हा अंक तयार होऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात लागले आहेत. आसावरी, मुग्धा आणि विकी ह्या तिघींनी अनाहिता नसूनही, या अंकाबद्दल समजल्यावर त्यांचे अनुभव इथे मांडायला तयारी दाखवली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद! नीलकांत आणि प्रशांतने बंदिस्त दालन वेळेत खुले करून दिल्यामुळे तेथे काम करणे सुकर झाले. किलमाऊस्कीने सुरेख मुखपृष्ठ तर तयार केलेच, शिवाय वेगवेगळ्या कल्पनाही वेळोवेळी सांगितल्या. अंकाचे टीझरही तिनेच तयार केले आणि मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत अंकाची सजावटही केली. तिचे आभार मानून तिला परकं करत नाही पण कौतुक नक्कीच करतो. आवर्जून लेख देणार्या अनाहिता आणि पडद्यामागे राहून मदत करणार्या, प्रोत्साहन देणार्या सर्वच अनाहिता, या सगळ्या जणी अंकाच्या खर्या शिलेदार कारण त्यांच्याशिवाय हा अंक पूर्ण झाला नसता. त्यामुळे ह्या अंकाच्या निर्मितीसाठी ज्यांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
चला तर मग, भटकंती अंकात फेरफटका मारून या. मुखपृष्ठावरचा इमिग्रेशन स्टॅम्प तुम्ही पाहिला असेलच, ही या सहलीची सुरूवात, त्यापुढील प्रत्येक स्थळवर्णन, अनुभव तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. आम्ही तुमच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत आहोत. हा अंक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य सांगा, ह्यात अजून काय आवडले असते यासाठी तुमच्या सुचवण्याही सांगा. अनाहिताच्या प्रत्येक नवीन अंकाच्या निमित्ताने नवीन अनाहिता लिहित्या होतील आणि हे अंक प्रत्येक वेळी नवीन विषय घेऊन वाचकांना आनंद देतील याची आम्हाला खात्री आहे.
तेव्हा निघूयात 'अनाहिता ट्रॅव्हल कंपनी' तर्फे आयोजित या महिला दिन विशेष सहलीला...
आपला प्रवास सुखाचा होवो!! हॅप्पी जर्नी! बॉन व्हॉयेज!!
- स्वाती दिनेश, मधुरा देशपांडे
"मिसळपावच्या बाहेर असणार्या तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे फेसबुक पेज-अनाहिता भटकंती विशेषांक
चित्र : किलमाऊस्की
© या अंकातील लेखांचे सर्व हक्क संबंधित लेखिकेच्या स्वाधीन. या अंकातील कुठलाही भाग/चित्रे, कुठल्याही स्वरुपात पूर्वपरवानगीशिवाय वापरता येणार नाही.
प्रतिक्रिया
7 Mar 2016 - 10:55 pm | अनन्न्या
खरच खूप उत्सुकतेने वाट पहात होते अंकाची!
7 Mar 2016 - 11:01 pm | पिलीयन रायडर
अंक फार सुंदर झाला आहे! तुमची मेहनत दिसत आहे.
मी अंक वाचुन इथे परत प्रतिसाद देणार आहे... थांबा!
7 Mar 2016 - 11:35 pm | भिंगरी
वाचता वाचता प्रतिसाद दिल्याशिवाय रहावेना.
खूप मस्त झालाय अंक.
8 Mar 2016 - 12:22 am | इडली डोसा
उत्तम सादरीकरणामुळे अंकाला चार चांद लागले आहेत.
8 Mar 2016 - 12:49 am | नूतन सावंत
संपादिकांनो,खूपच मेहनत घेतलीय हां तुम्ही.अगदी सुरेख झालाय अंक.
8 Mar 2016 - 1:07 am | जुइ
अंकासाठी कष्ट घेणार्या सर्वांचे आभार. निवांत सगळा अंक वाचते
8 Mar 2016 - 2:03 am | श्रीरंग_जोशी
मनमोकळं व अकृत्रिम संपादकीय भावलं.
सादरीकरण तर एकदम खास वाटत आहे. मिपावर प्रथमच बॅकग्राउंड वापरले गेले असावे.
आता निवांतपणे अंकातल्या लेखांचा आस्वाद घेईन.
या उपक्रमासाठी राबणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. मिपाच्या वैभवात अशीच भर पडत राहो.
8 Mar 2016 - 3:11 am | रेवती
संपादकीय आवडले. आम्ही सफरीला तयार आहोत. चला तर, निघुयात!
8 Mar 2016 - 6:01 am | अस्मी
मनापासून लिहीलेलं संपादकीय आवडले... अंक एकदम देखणा दिसतोय!! सजावट खूपच सुंदर झाली आहे...
स्वातीताई आणि मधुराचे अभिनंदन..!!
हेमांगी आणि अंकाला हातभार लावणार्या सर्व अनाहितांचे अभिनंदन!!!
8 Mar 2016 - 6:25 am | मितान
मनमोकळं संपादकीय आवडलं :)
8 Mar 2016 - 8:11 am | सविता००१
आता सफरीला सुरुवात करून मग लिहितेच इथे.
स्वातीताई आणि मधुरा,
शिवाय अंकासाठी काम करणार्या सगळ्याजणींचे हार्दिक अभिनंदन
8 Mar 2016 - 8:28 am | प्रीत-मोहर
मधुरा ,स्वातीतै आणि किलमाउस्की मस्तच झालाय अंक. इतका सुंदर अंक मिपावर या आधी पाहिला नव्हता. :)
8 Mar 2016 - 8:38 am | अजया
आजवरचा अनाहिताचा सर्वोत्कृष्ट अंक देणार्या हेमांगी मधुरा स्वातीताईचे हार्दिक अभिनंदन.
अभिमानाने ऊर भरुन आलाय अंक बघून!
8 Mar 2016 - 9:44 am | स्नेहल महेश
खूप मस्त झालाय अंक.
8 Mar 2016 - 9:49 am | पिलीयन रायडर
संकल्पना - लेखन - संपादन - सजावट - तांत्रिक इ इ सर्वच आघाड्या केवळ महिलांनी सांभाळलेला हा आंतरजालावरचा पहिलाच अंक असावा! महिला दिनाला ह्याहुन बेश्ट गिफ्ट काय असु शकतं!
अंक केवळ तीन जणींनी मिळुन बनवला आहे.. इतके लेख प्रुफ रीड करणे, संपुर्ण अंकाला एकाच थीम मध्ये आणणे, मुखपॄष्ठ ते मलपृष्ठ, सुची सर्व काही फक्त तिघींनी सांभाळले आहे. ते ही आपापली व्यवधाने सांभाळुन. कमाल आहे!
अंकाच्या देखण्या रुपासाठी (टिजर पासुन ते मुखपॄष्ठ, बॅकग्राऊंड, स्टॅम्प, प्रत्येक लेखाला इंट्रनॅशनल पत्राची किनार, गिफ्ट शॉप...इ इ सर्वकाही) साठी हेमांगीचे प्रचंड कौतुक!
अनाहिताचा लोगो सुद्धा तिनेच बनवलेला आहे. ही मुलगी अनाहिताची शान आहे!!
वे टू गो गर्ल्स!!!
सखी शक्ति जयती!
8 Mar 2016 - 10:35 am | जेपी
चांगलय..
8 Mar 2016 - 10:45 am | नीलमोहर
आजवर अनाहिता म्हणजे काय, महिलांचा वेगळा विभाग कशासाठी, अनाहितांचं काय एवढं कौतुक असं वाटायचं. अर्थातच तेव्हा अनाहितांच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती, आता मात्र १००% पटतंय अनाहितांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अनाहिता- यु गो गर्ल्स :)
भटकंती विशेषांक अत्यंत कल्पक, नावीन्यपूर्ण, प्रेक्षणीय आणि वाचनीय झाला आहे, त्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व अनाहितांचे मन:पूर्वक आभार आणि विशेष कौतुक.
हे असं अचाट काम करणं अजिबात सोपं नाही, त्यासाठी प्रचंड मेहनत, वेळ, एनर्जी द्यावी लागली असणार आहे आणि ते दिसून येत आहे, आपली इतर कामे, व्यवधानं, घर-संसार इ. अनेक जवाबदार्या सांभाळून एवढं अफाट काम करणं म्हणजे - धन्य आहात तुम्ही सगळ्याच !!
8 Mar 2016 - 11:42 am | गिरकी
झकास !! आता वाचायला सुरवात करते :)
8 Mar 2016 - 11:59 am | जेनी...
मस्त ....
कुछ दिल कि बातोंको चाहिये जुबां का सहारा |
पर कलम ने शायद उन्हे कागज पे उतारा ||
ऑल द बेस्ट ऑल अनाहिताझ्झ
8 Mar 2016 - 1:23 pm | माहितगार
अंकलेख मजकुर सवडीने वाचेन, अंकाची सजावट छान दिसते आहे.
8 Mar 2016 - 1:30 pm | पैसा
खास शाबासकी स्वाती आणि मधुरा, किलमाऊस्की यांना! अप्रतिम देखणा अंक झालाय! यात विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त विशेष अंक असला तरी त्यात टिपिकल गर्लिश काही नाही. आम्ही हे करू शकतो आणि करतो. सगळं नॉर्मलच आहे. यात कोणता अभिनिवेश नाही. की महिला सबलीकरण वगैरे नेहमीचे वापरायचे शब्द नाहीत. ते आहेच!
परवा एअर इंडियाची दिल्ली सान फ्रान्सिस्को १७ १८ तासांची फ्लाईट संपूर्णपणे महिलां क्रू नी नेली, तसंच काहीसं या अनाहिता विशेष अंकाबद्दल वाटतंय.
अंकाची सजावट इतकी देखणी झालीय यासाठी किलमाऊस्कीने बरेच उंदीर मारलेत! =)) =)) अगदी सोबर आणि अभिनव अशी सजावट तिने एकटीने केली. जबरदस्त!
काही जणांनी मागच्या अंकाच्या वेळी म्हटले होते की मिपावरचा अंक म्हणून सर्व मिपाकरांना सहभागी करून घ्यावे. याचा विचार केला होता. पण यावेळचा अंक महिला दिनाचा विशेष म्हणून अनाहितांतर्फे संपूर्णपणे तयार केला. पुढच्या वेळी सर्व मिपाकरांना सहभागी करू घेऊन असाच देखणा अंक सगळ्यांनी मिळून काढू!
8 Mar 2016 - 3:55 pm | सस्नेह
सर्व मानकर्यांचे कौतुक आणि अभिनंदन.
प्रचंड अनुमोदन !!
8 Mar 2016 - 1:39 pm | पुष्करिणी
अंक सुरेख झाला आहे, संपादकीय आवड्ले. उपक्रमात सामिल झालेल्या सर्व अनाहितांचे अभिनंदन आणि कौतुक.
सगळे लेख वाचत वाचत प्रतिसाद देइनच
8 Mar 2016 - 3:41 pm | Mrunalini
अंक अगदी सुंदर झालाय. संपादकीयही आवडले. आता १-१ लेख वाचायला घेते.
8 Mar 2016 - 3:51 pm | मोदक
संपादकीय आवडले!! :)
अभिनंदन!
8 Mar 2016 - 4:13 pm | प्रश्नलंका
अंक सुरेख झाला आहे. संपादकीय खुप आवड्ले. उपक्रमात सामिल झालेल्या सर्व अनाहितांचे अभिनंदन!!
सर्व लेखही मस्तं आहेत.
8 Mar 2016 - 6:47 pm | मीता
अंक सुरेख झाला आहे.
8 Mar 2016 - 7:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अंक वरुन वरुन चाळलाय अत्ता. उत्तम झालयं काम. सजावट आवडली. स्वाती दिनेश, मधुरा देशपांडे आणि इतर सगळे ज्यांचा अंकनिर्मितीमधे हातभार लागलाय त्यांचं मनापासुन कौतुक.
9 Mar 2016 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार
अंक दृष्टलागण्याएवढा सुरेख झाला आहे. प्रत्येक लेख वाचनीय आणि संग्रहणिय आहे. अंक चांगला व्हावा यासाठी घेतलेली मेहेनत पदोपदी जाणवते आहे. या अंकासाठी ज्यांनी आपला अमुल्य वेळ, अनुभव आणि बँडविड्थ् खर्ची घातली त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन,
पैजारबुवा,
9 Mar 2016 - 9:37 am | पूर्वाविवेक
सुंदर! मस्त! झकास! अप्रतिम! भन्नाट!
मार्गसुची आणि मांडणी उत्तम. कॅलेंडर आवडलं. खजिनाच आहे. पण लेख निवांत वाचून प्रतिसाद देइन. अंकासाठी कष्ट घेणार्या सर्व अनाहितांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. आणि अशा अंकाचा मी एक छोटासा भाग असण हि माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
9 Mar 2016 - 10:14 am | जिन्गल बेल
संपादकीय पण मस्त....सर्वांची मेहेनत दिसून येत आहे....hatts off galz !!!!
हळू हळू वाचते आहे..एका एका अंकाची मज्जा घेत घेत....निव्वळ अप्रतीम!!!
सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा !! आणि अंकाला मूर्त रूप देणाऱ्या सगळ्याजणींना खूप खूप धन्यवाद !!!!
10 Mar 2016 - 11:56 pm | किसन शिंदे
पर्फेक्ट संपादकीय!
11 Mar 2016 - 4:54 pm | बरखा
"परवा एअर इंडियाची दिल्ली सान फ्रान्सिस्को १७ १८ तासांची फ्लाईट संपूर्णपणे महिलां क्रू नी नेली, तसंच काहीसं या अनाहिता विशेष अंकाबद्दल वाटतंय."
हे वाक्य अगदी फिट बसतय अनाहिताच्या अंकाला......
12 Mar 2016 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संपादकीय आवडल. स्वाती दिनेश आणि मधुरा देशपांडे आपलं मनःपूर्वक अभिनंदन. मिपावरील एक उपक्रम आपण यशस्वी केला आहे. अंकासाठी खुप मरमर करावी लागते हे मला माहिती आहे. आपले दिनक्रम सांभाळुन हा नस्ता उद्योग लावून घेणे हा मनस्ताप आणि सक्सेस झालं की त्याचाही खुप मोठा आनंद असतो. आपल्या मेहनतीची कल्पना आहेच. म्हणुन या मनकी बाते. लेख वाचतोच आहे. बाकी, लेखातील चित्र, बाजुच्या या बॉर्डर्स, हे सर्वच आवडलं. सर्वच कलाकारांचं कौतुक आहे. मिपावरील कोणताही उपक्रम यशस्वी झाला की आनंद वाटतो, तसा आनंद आताही झाला आहे.
थोडीशी उगाच खुसपट : संपादकीय मधे विशेष अंकाच्या सदस्यांच्या मिपाच्या भावनिक अटेचमेंटविषयी अजून भर घालायची संधी होती, असे उगाच वाटले. पण एवढं तेवढं चालायचंच. :)
हं ! आता पुरुषी अहंकारामुळे आणि आपल्या सवत्या सुभा धोरणामुळे अंकातील लेख आवडले तरी सर्वच लेखांना मी दाद देईनच याची काही ग्यारंटी नाही, हेही नम्रपणे नमुद करतो. बरेचशे लेख वाचुन संपवले आहेत. सर्वच लेख छान आहेत. ;)
-दिलीप बिरुटे
(मिपा प्रवासी)
14 Mar 2016 - 2:42 pm | पद्मावति
स्वाती, मधुरा अप्रतिम झाला आहे अंक. तुम्ही दोघी, किलमाऊस्की आणि हातभार लावणार्या सर्वांचेच मनापासून कौतुक आणि अभीनन्दन. संपादकीय आवडलं.
14 Mar 2016 - 3:11 pm | सस्नेह
उत्कृष्ट सादरीकरणामुळे अंक देखणा झाला आहे आणि भन्नाट प्रवासवर्णनांमुळे रोचक !
सर्व श्रेयकांना सलाम !
15 Mar 2016 - 10:31 pm | यशोधरा
भटकंती विशेषांक अतिशय सुरेख झाला आहे. सजावट, लेख, फोटो, लिखाण सर्वच उत्तम. अंकासाठी घेतलेली मेहनत दिसून येते आहे ह्यासाठी सर्वप्रथम अंकासाठी काम करणाऱ्या प्रत्येकीचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन!
मात्र ह्या अंकावर कुठेही मिपाचा लोगो का नाही हा प्रश्न मला पडला आहे. अनाहिता हा मिपाचाच भाग आहे आणि त्यानुसार ह्या अंकावर मिपाच्या लोगोला स्थान मिळायला हवे होते, असे वाटते.
पुढील अनाहिता अंकामध्ये ही एकमेव त्रुटी भरून निघेल, अशी आशा करते. पुन्हा एकदा देखण्या अंकाबद्दल अभिनंदन!