|| श्री गुरवे नम: ||
चिखलपायटे (Waders)
समुद्रकिनारा.. जिथे सागरा धरणी मिळते, तिथे ‘त्याची / तिची’ वाट पाहण्याची जागा. आम्ही मुंबईकर तसे भाग्यवानच - आम्हाला असा लांबलचक किनारा लाभला आहे. समुद्रामुळेच परमेश्वराचा प्रथमावतार आमच्यावर प्रसन्न आहे. मुंबईच्या पश्चिम बाजूला गिरगाव, वरळी, दादर, जुहू, वर्सोवा वगैरे सगळ्या प्रसिद्ध चौपाट्या आहेत. पूर्व किनार्यावर मात्र वाळूच्या चौपाट्या नाहीत, तर सगळा खाडीपरिसर आहे. समुद्र आणि समुद्रकिनारा फक्त या प्रथमावतारासाठीच नव्हे, तर इतरही जीवांसाठी एक आश्रयस्थान असतं. समुद्रकिनार्यावरचा खाडीपरिसर म्हणजे जीवविविधतेने संपन्न असा परिसर. इथे इतकी जीवविविधता असते की कितीही वेळा जा, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आश्चर्य तुमची वाट पाहत असतंच. मुंबईचा हा बराचसा पूर्व किनारा ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या मालकीचा आहे. इथे जहाजांच्या गोद्या, प्रवासी वाहतुकीचे धक्के आणि माझगाव-शिवडी-वडाळा-माहुल (चेंबूर) या पट्ट्यात रिफायनरी, पेट्रोलियम कंपन्यांची गोदामं यासारखी अतिमहत्त्वाची ठिकाण असल्यामुळे हा सर्व परिसर संरक्षित आहे. इथे कोणत्याच बांधकामाला परवानगी नाही; इतकंच काय, अगदी आताआतापर्यंत इथल्या काही रस्त्यांवरून वाहतूकही प्रतिबंधित होती. तसंच, घाटकोपर ते मुलुंड मिठागर हा पट्टा गोदरेज ट्रस्टच्या खाजगी मालकीचा आहे. माणसाचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे साहजिकच माझगाव ते मुलुंड मिठागर हा सर्व खाडीपरिसर जीवविविधतेसाठी वरदानच ठरला आहे.
खाडीपरिसरातल्या जीवविविधतेचं मुख्य कारण म्हणजे इथे (आणि फक्त इथेच) आढळणारा अद्वितीय, वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतिवर्ग – खारफुटी / तिवर (Mangroves). खारफुटी म्हणजे वनस्पतीच्या उत्क्रांतीमधलं अनन्यसाधारण नवल आहे. उत्क्रांतीच्या ओघात ज्या काही वनस्पती अत्यंत जोमाने वाढत होत्या, त्यांनी तुलनेने कमकुवत वनस्पतींना समुद्राच्या दिशेने ढकलायला सुरुवात केली. कालांतराने या विस्थापित वनस्पतींना टिकून राहण्यासाठी, जगण्यासाठी एकच मार्ग उरला, तो म्हणजे समुद्राच्या, खाडीच्या खार्या पाण्याशी जुळवून घेणं. खार्या पाण्यात तगून राहण्यासाठी क्षारयुक्त पाणी शोषून घेऊन, विशिष्ट यंत्रणेद्वारे त्यातले क्षार वेगळे करून ते पानावाटे उत्सर्जित करण्याची एक अद्भुत अद्वितीय क्षमता त्यांच्या शरीरात हळूहळू विकसित झाली. म्हणूनच खारफुटीच्या पानांवर क्षाराचे (मिठाचे) स्फटिक चमकताना दिसतात, चाटून पाहिलं तर खारट चव लागते. या क्षमतेमुळेच, अत्यंत प्रतिकूल अशा खार्या पाण्यातही खारफुटीची जंगलं फोफावली आणि विविध जीवांना आश्रयस्थान मिळालं. दिवाळीनंतर थंडीच्या दिवसात तर अनेक जातींचे स्थलांतरित पक्षीही अक्षरशः हजारोंच्या संख्येने इथे येतात आणि चार-पाच महिने मुक्काम ठोकतात. अन्नाची विपुल उपलब्धता, आणि माणसाचा हस्तक्षेप नसलेला अनाघ्रात विशाल परिसर यामुळे लहान-मोठ्या असंख्य जीवांना आणि पक्ष्यांना इथे उत्तम अधिवास मिळाला आहे.
खाडीपरिसरातल्या सर्व जीवाचं दैनंदिन जीवन अवलंबून असतं दिवसाकाठी दोनदा येणार्या भरती-ओहोटीवर. गोगली मृदुकाय प्राणी (Molluscs), नेरिससारखे प्राणी, खेकडावर्गीय (Crustacians) कवचवाले प्राणी, कृमी-जंत वगैरे अनेक लहान-मोठे प्राणी चिखलात राहतात. भरतीबरोबर किनार्यावर येणारे सूक्ष्म अन्नकण, वाहवटी खाण्यासाठी हे प्राणी खोल चिखलातून पृष्ठभागावर येतात आणि या प्राण्यांना खाण्यासाठी पक्षी चिखलात फिरत असतात. चिखलात अन्न शोधतात, म्हणून या पक्ष्यांना ‘चिखलपायटे’ (Waders) असं म्हणतात. शिवडीच्या खाडीपरिसरात थंडीच्या दिवसात आढळणार्या चिखलपायट्यांची आणि इतर काही जीवांची ही चलतचित्रओळख.
निवटी (Mudskippers) – खाडीपरिसरात नेहमी आढळणारी माशांची एक आदिम (Primitive) प्रजाती. दोन्ही बाजूना दोन छोटे पाय असतात, त्यांच्या साहाय्याने चिखलात ‘चालू’ शकतात. पाठीवर एक पंखा असतो. तो फुलवून बहुधा प्रणयाराधन प्रदर्शन (courtship display) चाललंय.
सारंगी खेकडा (Fiddler crab). याच्या नराची एक नांगी खूप मोठी असते. ती हवेत फिरवताना सारंगी वाजवल्यासारखं दिसतं, म्हणून याला सारंगी खेकडा म्हणतात. नांगी हलवून नर प्रियतमेला आवतन देतात आणि इतर नरांना आपल्या मालकीच्या जागेबद्दल इशारा देतात.
हिरवा बगळा Little Green Heron Butorides striatus इथला स्थानिक पण जरा दुर्मीळ पक्षी. अतिशय बुजरा. आतापर्यंत मला चार-पाच वेळाच दिसला आहे.
काळा बगळा Western Reef Egret Egretta gularis हा इथला स्थानिक पक्षी. याची दोन रूपं (phases) असतात – काळा आणि पांढरा. चिखलात तुरुतुरु चालत एकटा चरतो आणि अन्न मिळवतो.
शराटी / कुदळ / अवाक Oriental White Ibis Threskiornis melanocephalus इथला स्थानिक पक्षी. पांढराशुभ्र, काळी मान-डोकं आणि लांब बाकदार चोच चिखलात खोलवर खुपसून अन्न शोधतात. चार-पाच पक्षी एकत्र चरताना दिसतात.
ग्रीनशँक Common Greenshank Tringa nebularia पाय हिरव्या रंगाचे. चोच लांब, चोचीचं टोक वरच्या बाजूला किंचित वळलेलं. चिखलात एकेकटे चरतात.
केंटिश चिलखा Kentish Plover Charadrius alexandrinus अतिशय चंचल पक्षी. काहीशी आखूड चोच. चिखलात एकेकटे चरतात.
देशी तुतारी Common Sandpiper Actitis hypoleucos छोटुकला पक्षी. अतिशय चंचल. छोटीशी चोच. चिखलात तुरुतुरु धावत अन्न शोधते.
रोहित / अग्निपंख Flamingo Phoenicopterus spp. यांच्या दोन जाती इथे येतात – थोरला Greater Flamingo Phoenicopterus roseus आणि धाकला Lesser Flamingo Phoenicopterus minor. हल्ली धाकले रोहितच खूप जास्त दिसतात. इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा अन्न शोधण्याची यांची तर्हाच वेगळी.
रोहित पक्ष्यांविषयी ‘पाहुणे येती मुंबईला’ हा लेख जरूर वाचा.
या वर्षी शिवडीला आश्चर्याचा एक धक्का बसला – शिवडीच्या किल्ल्यावरून विहंगम दृश्य (Bird’s Eye view) बघताना, इथे प्रथमच चित्रबलाक Painted Storks Mycteria leucocephala दिसले. यापूर्वी इथे कधीच दिसले नव्हते. एक राखी बगळाही Grey Heron Ardea cineria दिसतोय.
तर अशी ही चिखलयात्रा. प्रत्येक वेळी नव काहीतरी देणारी. इथलं निसर्गनवल पाहण्याची अनुभवण्याची एक सुवर्णसंधी आली आहे.
बी.एन.एच.एस.तर्फे फ्लेमिंगो महोत्सव
शनिवार, दि. ५ मार्च २०१६, दुपारी १ ते संध्या. ६पर्यंत.
http://bnhs.org/bnhs/
बी.एन.एच.एस. ही संस्था दर वर्षी मुंबईकरांसाठी फ्लेमिंगो महोत्सव आयोजित करते. शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूपासून जेटीपर्यंत जायला-यायला विनामूल्य बस असते. पायी किंवा स्वत:च्या वाहनानेही जाता येईल. जेटीवर प्रवेश नि:शुल्क असतो. तिथे संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला माहिती देतात. दुर्बिणी, स्पॉटिंग स्कोप वगैरे लावलेले असतात. संस्थेची विविध उत्पादनही विकत घेता येतात, संस्थेचे सभासदही होता येतं.
सर्वांनी सहकुटुंब, मित्रमंडळींसह जरूर या. पिण्याचं पाणी आणि दुर्बीण, कॅमेरा घेऊन या. मीही तिथे असेनच, तुम्ही येणार असाल तर शनिवारी दुपारी १२पूर्वी मला व्यनि करा किंवा ९८६९४२८५०३वर संपर्क साधा, म्हणजे आपली भेट होईल.
प्रतिक्रिया
4 Mar 2016 - 1:36 pm | प्रचेतस
प्रचंड सुंदर.
चलतचित्रणाचा हा प्रयोग खूपच भावला. सारंगी खेकड्यांचे नांगीवादन आवडले. ग्रीनशँकला पायाने डोके खाजवताना बघून मौज वाटली.
खरंच अद्भूत जीवन आहे हे.
4 Mar 2016 - 2:42 pm | सस्नेह
अतिशय रोचक आणि रंजक चित्रण / चित्रे !
5 Mar 2016 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
मिपावरील निसर्गवर्णनांत नूलकर साहेबांचा हात कोणीच धरू शकत नाही. या धाग्यात तर चित्रफितींनी बहारच आणली आहे !
4 Mar 2016 - 1:36 pm | जगप्रवासी
शिवडीला राहत असूनसुद्धा एकदाही फ्लेमिंगो बघायला जायला जमल नाही. यावेळेला नक्की.लेख छान आहे
4 Mar 2016 - 1:42 pm | कंजूस
म्हणजे उद्याच.
4 Mar 2016 - 1:48 pm | स्पा
एकदम फस क्लास लेख काका
4 Mar 2016 - 1:54 pm | राही
माहीम निसर्गउद्यानातून खाडीकिनार्यावर बागडणार्या बगळ्यांच्या काही प्रजाती पाहिल्या आहेत. इथे सपाट चिखलकिनारा -मड फ्लॅट्स पक्ष्यांच्या थव्यांनी भरलेला असतो. नवीमुंबईतल्या एका तळ्याकाठीसुद्धा अनेक पक्षी दिसतात. मुंबईकरांना निसर्गाने थोडेसे तरी देणे दिलेच आहे, अगदीच वंचित ठेवलेले नाहीय!
लेख फार छान आहे. मुंबईतल्या आणि (मिपावरसुद्धा)वेगळ्या वातावरणात जाता आले.
4 Mar 2016 - 1:56 pm | पद्मावति
फारच मस्तं लेख.
4 Mar 2016 - 2:19 pm | नाखु
आणी चित्रफीतीच्या आयडीयाच्या कल्पनेला मनापासून दाद.
पक्षी सतत कार्यमग्न असल्याने ते सुटत(पुन्हा पक्षीच जाड होत) नाहीत काय ? ही एक शंका निरसन व्हावे.
4 Mar 2016 - 2:36 pm | कविता१९७८
निवटी सारखा चविष्ट मासा नाही खाण्यासाठी, वाह, मस्त आठबण करुन दिलीत. साधा भात , वरण आणि तळलेल्या निवट्या आणखी काय हवंय पोटाला?? मी ही समुद्र किंनार्याजवळच्या भागात राहत असल्याने निवटी , बोंबिल, खेकडे आणि समुद्री मासे यांची अगदी चाहती आहे. बाकी पक्षांकडे इतकं लक्ष दिलं जात नाही पण हा डोंगराळ भाग असल्याने पक्षीप्रेमी साठी इथे बरेच फोटो मिळु शकतात.
4 Mar 2016 - 2:51 pm | वेल्लाभट
कडक
पण कामात व्यग्र असल्याने यायला जमणार नाही उद्या. शिवडी, भिगवण हुलकावणीच देतं नेहमी. असो.
बघूयात. लेख येईलच तुमचा... फोटो व्हिडिओ सकट.. जरूर लिहा बरं का.
मस्त!
4 Mar 2016 - 4:50 pm | शान्तिप्रिय
नूलकर सर . मस्त सफर घडवलीत.
अवांतरः
मी गेल्या रविवारी कन्जुस मामांना भेटलो.
मस्त भेट झाली.
पुढच्या एक दोन महिन्यात पुणे कट्टा घेइन
मी लीड करेन.
माझी खुप इच्छा आहे.
पाहुया कसे जमते ते.
त्यानंतर नवि मुंबई कट्टा सुध्धा घ्यायचा आहे.
मला वाटते इच्छाशक्ती च्या जोरावर या गोष्टी शक्य होतील .
4 Mar 2016 - 7:05 pm | सूड
कट्टा घेईन? ती काय शिकवणी आहे का? =))
4 Mar 2016 - 7:13 pm | अभ्या..
ओढ भावड्या.
आम्ही हाव................................बघाया ;)
4 Mar 2016 - 7:17 pm | प्रचेतस
मी तुम्ही लीड केलेल्या कट्ट्यास येण्यास तयार आहे. ( पुणे फ़क्त)
बाकी आमचा आगामी कट्टा लवकरच अंबरनाथच्या शिवमंदिरात होण्याची शक्यता आहे.
5 Mar 2016 - 10:52 am | जगप्रवासी
कधी आहे अंबरनाथ चा कट्टा, मला तुमच्यासोबत यायला खूप आवडेल.
5 Mar 2016 - 11:01 am | अभ्या..
आम्ही पण आधी असेच म्हणायचो.
आजकाल वेळ नसतो हो आम्हाला. :(
5 Mar 2016 - 11:07 am | प्रचेतस
तारीख अजून नक्की नाही. पण ठरल्यावर जाहिर धागा काढेन.
8 Mar 2016 - 7:20 pm | यशोधरा
लीड कोण करणारे अंबरनाथवाला कट्टा?
8 Mar 2016 - 8:44 pm | प्रचेतस
बहुधा किसनदेव किंवा गावडे सर करतील.
मला बापड्याला काय कळतं त्यातलं?
9 Mar 2016 - 7:19 am | यशोधरा
मोठे मोठे लीडर आहेत तर! :D
4 Mar 2016 - 4:55 pm | पियुशा
सहि !!!
4 Mar 2016 - 5:12 pm | एस
वाखुसाआ.
4 Mar 2016 - 5:14 pm | बोका-ए-आझम
_/\_
4 Mar 2016 - 6:47 pm | अभ्या..
ते सारंगी खेकडा एका उजव्या नांगीने कसले हादडायलाय. बकाण्यामागून बकाणे. हान तिज्यायला.
मस्तच ट्रीप सुधांशूदादा.
4 Mar 2016 - 6:50 pm | अभ्या..
उत्क्रांतीच्या वेळेला ह्या खेकड्यानी एकच हात वर केलेला काय? ;)
बहुतांशी प्राण्यात असलेली सिमेट्री ह्या खेकड्यात अशी कशी गंडली?
4 Mar 2016 - 7:18 pm | प्रचेतस
उलट मादीला आत्कृष्ट करण्यासाठी उत्क्रांत झाली.
4 Mar 2016 - 7:30 pm | अभ्या..
मिती मिती आगोबा. सममिती. सममिती गंडलीय. दोन्ही नांग्या मोठ्या असत्या तर काय माद्या आकृष्ट (प्लीज चेक स्पेल हं प्रचेतस) झाल्या नसत्या काय?
एकाच हाताचा वेगळा काय उपेग असला तर मला म्हैत नाही.
4 Mar 2016 - 7:40 pm | प्रचेतस
उम्म्म.
असे का झाले असावे हे नूलकरकाका किंवा घासुगुर्जी सांगू शकतील पण मितीचंच उदाहरण घे.
समभंग मूर्ती आकर्षक दिसते का त्रिभंग?
(चुकीच्या आकृष्टयाबद्दल माफ़ी हं)
4 Mar 2016 - 7:45 pm | अभ्या..
स्त्री मूर्ती त्रिभंग आणि पुरुष मूर्ती समभंग आकर्षक दिसते. त्रिभंग पुरुषमूर्ती खूप कमी आहेत.
इथे नराची मिती गंडलीय. ;)
4 Mar 2016 - 7:49 pm | प्रचेतस
त्रिभंग पूरुषमूर्तीही पुष्कळ आहेत मात्र स्त्रीयांपेक्षा कमी हे खरेच.
जाऊ दे इथे अवांतर होतेय. हा प्रश्न आपण नूलकरकाकांवरच सोडूया. मात्र तो खेकडा आहे मात्र भन्नाट.
6 Mar 2016 - 2:44 pm | राजेश घासकडवी
प्रचेतस म्हणतात त्याप्रमाणे उत्क्रांतीमुळेच ही सिमेट्री मोडलेली आहे. मी जे काही अल्प वाचन केलं त्यानुसार हे खेकडे त्यांचा मोठा 'हात' माद्यांना डिस्प्ले म्हणून दाखवतात. तो जितका मोठा तितका त्या माद्यांना आकर्षक वाटतो. (कोण म्हणतं साइझ डझंट मॅटर? आणि माद्यांना नक्की काय आकर्षक वाटेल हे कोणी सांगावं, हेही दुसरं गूढ. पण ते एक असो.) थोडक्यात मोराचा पिसारा उत्क्रांतीच्या दृष्टीने मारक असला तरीही माद्यांना आकर्षक वाटतो या एका कारणापोटी तो प्रचंड मोठा होऊ शकतो. या खेकड्याच्या बाबतीत हेही वाचलं की त्यांचं बीळ खणताना हा मोठा हात वापरतात. त्यामुळे मोठा हात म्हणजे मोठं बीळ म्हणजे चांगलं बीळ, म्हणूनही हा हात उत्क्रांतीने मोठा मोठा होत गेला असू शकेल.
राहाता राहिली गोष्ट 'सिमेट्री का भंग व्हावी?' तर कदाचित बीळ खणण्यासाठी आलटून पालटून दोन हात वापरण्याऐवजी एका हाताचा आधार घेऊन दुसऱ्या हाताने खणत राहाणं कदाचित जास्त एफिशियंट असेल. ही आपली एक शक्यता आहे - मला नक्की खरं काय ते माहीत नाही. पण जेव्हा असा प्रकार असतो तेव्हा सिमेट्री भंग होताना इतर प्राण्यांतही दिसते. काही समुद्राच्या तळाला चिकटून दबा धरून बसणारे आणि भक्ष्यावर झडप घालणारे मासे असतात. त्यांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे मासा वरून चपटा करून डोळे वरच्या बाजूला आलेले, दुसरे म्हणजे माशाचा चपटेपणा तसाच राहून एक डोळा सरकून दोन्ही डोळे एकाच बाजूला आलेले. पहिल्यात सिमेट्री राहिलेली असते, दुसऱ्यात ती गेलेली असते.
हे डोळे फिरलेल्या माशाचं उदाहरण.
6 Mar 2016 - 4:44 pm | प्रचेतस
सुरेख प्रतिसाद.
ती माशांची चित्रं जाम भारी आहेत.
6 Mar 2016 - 5:40 pm | आनन्दा
अवो नांगी नाय ती.. जेशीबीचा खोरा हाय त्यो.
5 Mar 2016 - 12:18 am | शलभ
नूलकरकाका खूप मस्त लेख. खूप आवडला.
5 Mar 2016 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार
नुलकर काका लेख अतिशय आवडला आणि चित्रफिती दाखवण्याची आयडियाची कल्पना तर लैच भारी.
बघताना फारच मजा आली.
पैजारबुवा,
6 Mar 2016 - 9:04 am | सुधांशुनूलकर
चलतचित्र टाकण्याची कल्पना सर्वांना आवडली आहे असं दिसतंय. मला स्वतःला चलतचित्रीकरण जास्त आवडतं, कारण त्यात 'हालचाल' आणि आवाज असं दोन्ही दाखवता-ऐकवता येतं. म्हणूनच, अगुंबे भ्रमंती वृत्तान्तातही बरीच चलतचित्र टाकली होती.
@ नाखुकाका : पक्षी सतत कार्यमग्न असल्याने ते सुटत(पुन्हा पक्षीच जाड होत) नाहीत काय? हे अक्षरशः खरं आहे. त्यांच्या चयापचयाचा वेग आपल्यापेक्षा खूपच जास्त असतो. चरबी जास्त असली तर उडायला जास्त शक्ती लागेल, म्हणून चरबी कमी असते. (म्हणून आपण मटणापेक्षा चिकन आणि मासे जास्त खावं. मटण हल्ली फार महाग झालंय म्हणे, ती गोष्ट निराळी.)
@ शान्तिप्रिय : नवी मुंबई कट्टा ठरला तर यायचा प्रयत्न करीन.
@ प्रचेतस, अभ्या.. : सारंगी खेकड्यात 'मिती' गंडली आहे, हे खरंय. त्याचं कारण मात्र मला माहीत नाही. असं वाटतं की दोन्ही नांग्या मोठ्या झाल्या, तर त्याला अन्न मिळवायला कठीण जाईल. चलतचित्रामध्ये स्पष्ट दिसतंय की डावी नांगी इतकी मोठी आहे की तिच्यात पकडलेलं अन्न तोंडात घालणं कठीण जाईल.
@ कविता१९७८ : निवटी अजून खाल्ली नाहीये. आता बोईसर कट्ट्याची वाट पाहणं आलं.
@ वेल्लाभट : तुम्हाला माझी खुली ऑफर आहे - तुम्ही मुंबईत असाल, तर कोणत्याही शनिवार-रविवारी तुम्हाला वेळ असेल तर मला फोन करा. मी भरती-ओहोटीच्या वेळा पाहून तुम्हाला योग्य वेळ सांगेन आणि शिवडीला तुमच्याबरोबर येईन.
ता.क. आज बोका-ए-आझम आणि जगप्रवासी येत आहेत. शिवडीला भेट होईल.
5 Mar 2016 - 6:48 pm | अजया
भेट द्यायला नक्की आवडेल.रविवार जमवायला हवाच एखादा.
6 Mar 2016 - 8:20 am | बोका-ए-आझम
मला दीडच्या सुमारास नूलकरकाकांचा फोन आला की ते कुर्ल्याहून निघताहेत. (ते कुर्ल्याला राहात असल्यामुळे त्यांना खेकडे आवडतात यात काही नवल नाही.) आणि कंजूसकाका तिथे १२ वाजल्यापासून येऊन बसले आहेत.
मग मी शिवडीला जायला निघालो. तिथे दोन रेल्वे क्राॅसिंग्ज आहेत. मी आणि नूलकरकाका वेगळ्या क्राॅसिंगपाशी उभे होतो. पण मोबाईल झिंदाबाद त्यामुळे भेटलो आणि बससाठी न थांबता
समुद्रकिना-यापर्यंत चालत गेलो. वाटेत नूलकरकाका वेगवेगळी माहिती देत होतेच. बोलता बोलता ते जे म्हणाले ते खूप आवडलं - जंगल पाहायचं तर पायी फिरलं पाहिजे. ताडोबा किंवा काॅर्बेटसारखी अभयारण्यं जीपमधून पाहणं म्हणजे जंगल पाहणं नव्हे.
आम्ही किनाऱ्यावर पोचलो. तिकडे जत्रा भरली होती. शाळांमधली मुलंसुद्धा आली होती. BNHS चे तंबू होतेच. मग पुढचे दोन तास नूलकरकाकांच्या live commentary मध्ये कसे गेले ते काही कळलं नाही. आम्ही पोचलो तेव्हा कंजूसकाका आणि नूलकरकाका या दोघाही जाणकारांनी सांगितलं की आता पक्षी बरेच दूर दिसताहेत पण जसजशी भरतीची वेळ जवळ येईल तसतसे ते जेट्टीच्या जवळ यायला लागतील. आणि तसंच झालं. गेलो तेव्हा दूर कुठेतरी गुलाबी ठिपके दिसत होते, आणि जसजसा वेळ पुढे सरकू लागला तसतसे ते ठिपके जवळ यायला लागले. मोठे आणि छोटे फ्लेमिंगोज. ते बघणं हा एक अनुभव आहे. मध्येच ते चार-पाचच्या संख्येने उडत होते आणि अक्षरशः गुलाबी रंगाचा मोठा रुमाल इथून तिथे गेल्यासारखा वाटत होता.
त्यांच्याबरोबर टर्न, गल, काळे आणि पांढरे इग्रेट्स, लाल नांगीवाला सारंगी खेकडा वगैरे पाहायला मिळाले. नूलकर काकांना हे कोण, कुठले, कसे उडतात, काय खातात याची इत्यंभूत माहिती असल्यामुळे मजा आली.
५ वाजता जगप्रवासी सहकुटुंब आले. ओळख झाली. मला काम असल्यामुळे अनिच्छेने निघावं लागलं. पण त्यांना फ्लेमिंगोज अजून छान दिसले असतील कारण तेव्हा ते खूपच जवळ आले होते.
6 Mar 2016 - 9:11 am | सुधांशुनूलकर
बी.एन.एच.एस.तर्फे १० एप्रिल २०१६ला रविवारी पुढचा महोत्सव होणार आहे, असं कळलं. अजून जाहीर झालेलं नाही.
पण माझ्या मते, महोत्सवाला खूपच गर्दी - जत्राच - असल्यामुळे नीट बघता येत नाही. म्हणूनच, मिपाकरांना जायचं असेल तर इतर कोणत्यातरी रविवारी जावं. दिवस ठरवला की त्या दिवशीच्या भरती-ओहोटीच्या वेळेनुसार तिथे जायची योग्य वेळ मी सांगू शकेन.
ठरवा तर मग.
6 Mar 2016 - 9:27 am | प्रचेतस
मस्त वृत्तांत.
नूलकरकाकांसोबत निसर्ग पाहात हिंडणं मस्त. प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष, वनस्पती ह्यांची अगदी इत्यंभूत माहिती त्यांच्यासोबत फिरताना सतत मिळत राहते.
6 Mar 2016 - 10:31 am | बोका-ए-आझम
नूलकर काकांनी भारताचे Butterfly Man आयझॅक किहीमकर यांच्याशी करुन दिलेली भेट. फार छान वाटलं त्यांना भेटून. एक महिनाभर ते सुंदरबनमध्ये होते आणि शुक्रवारी मुंबईत येऊन शनिवारच्या फ्लेमिंगो महोत्सवाला हजर होते.
6 Mar 2016 - 12:32 pm | अभ्या..
बटरफ्लाय म्यान आयझॅक किहीमकर. वॉव.
किहिमकर शनवार तेली. कोकणातले मराठी ज्यू. हो ना? अजुन कुणा मराठी ज्यू लेखिकेचा बोकेशानी रेफरन्स दिला होता बरे?
7 Mar 2016 - 2:15 pm | बोका-ए-आझम
कवयित्री. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी हे गीत त्यांनी लिहिलेलं आहे. (आत्ता हेच आठवतंय.)
7 Mar 2016 - 3:14 pm | जगप्रवासी
अर्धा दिवस हापिसात भरल्यावर तिथून निघून डायरेक्ट शिवडीला जायचा प्लान होता पण आमच्या सौ नी देखील यायची तयारी दाखवल्यावर मग त्यांना घेऊन तिथे जाई पर्यंत ५ वाजले. तिथे गेल्या गेल्या एखादी जत्रा भरल्याचा भास होत होता. नूलकर काका आणि बोका-ए-आझम यांच्याशी तिथे ओळख झाली. मी येणार म्हणून बोका-ए-आझम थांबले होते. थोडा वेळ बातचीत करून ते निघून गेले. मग सुरु झाला सुंदर प्रवास.
सुरुवात झाली सारंगी खेकडे आणि निवटीच्या ओळखीने. नूलकर काका इतक्या आवडीने सर्व पक्षांची ओळख करून देत होते एकदम आवडून गेल. नूलकर काकांनी त्यांची दुर्बीण माझ्या गळ्यात घातली आणि म्हणाले आता बघा काय काय दिसतंय. लहान मुलाच्या हातात खाऊ दिल्यावर त्याची अवस्था कशी होईल तशीच थोड्या फार फरकाने माझे झाली. थोरले आणि धाकले फ्लेमिंगो, पेंटेड स्टोर्क, कृष्ण शराटी असे वेगवेगळ्या पक्षांची तोंड ओळख नूलकर काकांनी करून दिली. सचिन तेंडूलकर ची फलंदाजी चालू असताना रवी शास्त्री किंवा हर्षा भोगले ची कॉमेंट्री ऐकायला जितकी मजा येते तोच अनुभव हे पक्षी बघताना होत होती. दुर्बिणीच्या डोळ्याने पक्षी बघतोय आणि त्याच वर्णन काकांना सांगतोय, तर लगेच काका पुस्तकातून त्या पक्षाचा फोटो, त्याच इंग्रजी तसेच मराठी नाव सांगत होते. त्यासोबतच त्या पक्षाचं वैशिष्ट्य रंगवून सांगत होते. भरतीला सुरुवात झाल्यामुळे फ्लेमिंगो इतक्या जवळून बघता आले. तिथे हवशे गवशे स्वतःचेच सेल्फी काढण्यात मग्न होते आणि आम्ही नूलकर काकांमुळे पक्षांच्या जगात वावरत होतो. इतक्या जवळ राहत असून सुद्धा इथे न आल्याबद्दल स्वतःला शिव्या घालत होतो. नूलकर काकांना देखील जायचं असल्यामुळे आणि भरतीची वेळ असल्यामुळे मग निघालो. नूलकर काकांचे खूप धन्यवाद जे मी येणार म्हणून थांबून होते आणि इतक्या वेगळ्या जगाची ओळख करून दिली म्हणून.
डावीकडून बोका-ए-आझम, नूलकर काका आणि अस्मादिक.
7 Mar 2016 - 3:21 pm | अभ्या..
मस्त वृत्तांत. जगप्रवासी यू आर लक्की.
सुधांशू दादांचा टिशर्ट डिझाईन जबरा, चक्क कॅलिग्राफी खोपा. मस्त मस्त.
7 Mar 2016 - 4:42 pm | बोका-ए-आझम
म्हणजे शेवटच्या अर्ध्या-एक तासातही तुम्हाला भरपूर बघायला मिळालं. नूलकरकाका की जय हो!
7 Mar 2016 - 3:33 pm | जगप्रवासी
"सुगरणीचा खोपा" ही कविता प्रिंट केलेली आहे. म्हणजे माणसाच व्यक्तिमत्व कपड्यांमधून दिसत म्हणतात ते असं.
8 Mar 2016 - 11:37 am | सुधांशुनूलकर
कंजूस, बोका आणि जगप्रवासी (श्री व सौ) यांची भेट झाली. जगप्रवासींची वाट बघता बघता बोकाशी मस्त गप्पा झाल्या. बोकाने लिहिलेल्या 'द स्केअरक्रो' आणि माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर आता चालू असलेली 'मोसाद' या लेखमाला वाचल्या होत्याच. 'मोसाद'वर विशेष चर्चा झाली. एखाद्या विषयावर लेखमाला लिहायची तर त्याविषयी प्रचंड प्रेम आणि किती गाढ व्यासंग लागतो, याची जाणीव झाली.
बोका गेल्यानंतर श्री व सौ जगप्रवासी अत्यंत लक्षपूर्वक माझं बोलणं ऐकत होते. एव्हाना ५ वाजले होते, भरतीला सुरुवात झाली होती. त्यामुळे खूप जीव दिसले. तेवढ्यात जगप्रवासींनी दूरवरच्या एका एकलकोंड्या पक्ष्याकडे माझं लक्ष वेधलं. त्या दिवसाच्या श्रमांचं सार्थक झालं. तो खूप लांब होता, तरी ३५x झूम वापरून त्याचं चलतचित्रीकरण केलं. ते खाली देत आहे -
हा 'कर्ल्यू' Eurasian Curlew Numenius arquata याची चोच लांबलचक आणि तलवारीसारखी बाकदार असते. त्यामुळे खोलवर दडलेले जीव त्याला टिपता येतात. इतक्या लांबून चित्रीकरण केलं असलं, तरी त्याच्या चोचीचा बाक स्पष्ट दिसतो आहे.
https://youtu.be/JiDu5i8VHkw
आयझॅक किहीमकर - माझ्यावर यांचा अत्यंत लोभ. त्या दिवशी त्यांना इतके लोक भेटत होते, तरी त्यांनी माझ्याशी फुरसतीत गप्पा मारल्या, माझ्या नव्या उपक्रमांविषयी चौकशी केली.. अत्यंत निगर्वी व्यक्ती. काही महिन्यांपूर्वी एका जीवघेण्या अपघातातून ते थोडक्यात बचावले. त्यानंतर काठी घेऊन फिरत असत. आता काठीशिवाय फिरतात. तेव्हा भेट झाली, त्या वेळी त्यांना 'ओरिगामी स्वॅलोटेल फूलपाखरू' (मागच्या बाजूला लोहचुंबक लावलेलं) भेट दिलं. 'Butterfly Man of India'ला 'Origami Butterfly' भेट.. माझ्यासाठी गौरवाचा एक क्षण.
माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी फार पैसा कमावला नाही; पण आयझॅकसरांसारख्या काही व्यक्तींचा स्नेह ही मात्र माझी मोठीच कमाई आहे, त्या दृष्टीने मी नक्कीच श्रीमंत आहे.
जाता जाता - नूलकरकाका की जय हो! नाही, निसर्गदेवता की जय हो!!! असं म्हणू या.
8 Mar 2016 - 8:46 pm | प्रचेतस
ही चित्रफीत पण अतिशय सुंदर आहे.
8 Mar 2016 - 12:01 pm | पैसा
अप्रतिम माहितीपूर्ण धागा!
8 Mar 2016 - 7:14 pm | सुमीत भातखंडे
तो सारंगी खेकडा एकदम भारीये!
9 Mar 2016 - 7:23 am | यशोधरा
सुरेख धागा, वा खु साठवली आहे!
28 Mar 2016 - 2:40 pm | उल्का
अप्रतिम चित्रफिती व महिती सुद्धा!