नमस्कार खवय्यांनो,
तुमच्यासाठी पालक कॉर्न पुलावाची कृती देत आहे, कशी वाटली ते जरूर कळवा.
पालक कॉर्न पुलाव
साहित्य:-
१ वाटी बासमती तांदुळ
अर्धी जुडी पालकाची पाने
अर्धी वाटी मक्याचे दाणे
अर्धी वाटी गाजराचे उभे पातळ चिरलेले काप
अर्धी वाटी कोथिंबीर
१०-१२ पुदीन्याची पाने
१ इंच आलं
७-८ लसूण पाकळ्या
५-६ हिरव्या मिरच्या
३ टे.स्पून तेल
चवीप्रमाणे मीठ
पूर्वतयारी :-
एका मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदीना, कोथिंबीर याची पेस्ट करून घेणे.
पालकाची पाने स्वच्छ धुवून त्याची पेस्ट करून घेणे.
मक्याचे दाणे आणि गाजराचे काप वाफवून घेणे.
बासमती तांदुळाचा फडफडीत भात शिजवून तो एका परातीत मोकळा करून घ्यावा.
कृती :-
एका नॉन स्टिक पॅन मध्ये तेल गरम करून घेणे. तेल चांगले गरम झाले की त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदीना, कोथिंबीर याची केलेली पेस्ट घालणे. चांगले परतून घेणे.
यात वाफवून घेतलेले मक्याचे दाणे आणि गाजराचे काप घालणे. १ मिनिटभर परतणे. त्यानंतर यात तयार केलेली पालकाची पेस्ट घालणे. परतून घेणे आणि दोन वाफा आणणे.
चवीनुसार मीठ घालणे. आता या मिश्रणात शिजवलेला भात घालून एकजीव करणे. भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घेणे.
गॅस बंद करून आता या पुलावात लिंबाचा रस घालून परत एकदा अलगद ढवळणे.
एका डीश मध्ये काढून, त्यावर कोथिंबीर भुरभुरवून सजवणे आणि गरमागरम पुलावाचा आस्वाद घेणे. :)
गाजर, पालक आणि कॉर्न यांच्या रंगामुळे हा पुलाव एकदम रंगीबेरंगी दिसतो.
टीप:-
पालक मूळचा थोडा खारट असल्याने मीठ घालताना काळजी घ्यावी.
--शाल्मली.
प्रतिक्रिया
8 Jan 2009 - 8:09 pm | प्राजु
आजचा मेनू ठरलाच!
सगळंच सामान आहे घरी..
मस्त फोटो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Jan 2009 - 8:14 pm | सुनील
छान. यात वाटाणे, बेबी कॉर्न किंवा मश्रूम घालून अधिक विविधता आणता येईल.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
9 Jan 2009 - 3:35 pm | शाल्मली
प्रतिसादाबद्दल आभार!
हो.. बरोबर. बेबी कॉर्न घालूनही छान दिसेल आणि चवही छानच असेल..
तसेच याच पुलावात कॉर्न आणि गाजर वगळून जर सगळे होरवे पदार्थ घातले- मटार, फरसबी- पालक, पुदीना, कोथिंबीर आहेच.. की झाला ग्रीन पुलाव!
तोही छान लागतो. :)
--शाल्मली.
8 Jan 2009 - 8:55 pm | किट्टु
शाल्मली,
खुप छान रेसिपी दिल्या बद्द्ल धन्यवाद!! :)
माझा पण आजचा मेनू ठरला!
--
किट्टु
8 Jan 2009 - 9:33 pm | रेवती
मीही करून पाहीन व कळवीन.
फोटूमुळे मजा आली.
माझ्याकडेही सगळं साहित्य आहे घरात.
आज संध्याकाळी जमेल करायला.
रेवती
9 Jan 2009 - 4:59 am | रेवती
केलाय. मस्त झालाय. रंगही अस्साच आलाय.
हिरवा पालक, कोथिंबीर, पुदीना, केशरी गाजर, पिवळा मका.
रंगीबेरंगी पुलाव छान दिसतोय.
धन्यवाद!
रेवती
9 Jan 2009 - 9:12 pm | शाल्मली
अरे वा! लगेच करूनही बघितलास?
छान.. :) उत्साही आहेस एकदम!
--शाल्मली.
9 Jan 2009 - 7:28 am | रेणुका
वा मस्त दिसतोय. माझी आई करते त्याची आठवण आली. आता लवकरच केला पाहिजे.
रेणुका
9 Jan 2009 - 6:11 pm | वाहीदा
एक प्रश्न आहे .
तुम्ही पालकाची पेस्ट मध्ये शिजवलेला भात घातलात, जर पालकाची पेस्ट आणी भात एकत्र शिजवला तर ?? म्हणजे पटकन होईल ना ग ??
असो बाकी फोटो बघुन खुप भुक लागली सपाटुन!
धन्यवाद!
~ वाहीदा
10 Jan 2009 - 8:19 pm | शाल्मली
वाहीदा,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
जर पालकाची पेस्ट आणी भात एकत्र शिजवला तर ?? म्हणजे पटकन होईल ना ग ??
हो.. चांगली कल्पना आहे. मी तसं कधी करून पाहिले नाही. पण आता पुढच्या वेळेस करुन पहायला पाहिजे.
--शाल्मली
9 Jan 2009 - 7:42 pm | वल्लरी
आजचा मेनु ठरला गं शाल्मली .... :)
---वल्लरी
10 Jan 2009 - 8:20 pm | शाल्मली
सर्व खवय्यांना मनापासून धन्यवाद!
:)
--शाल्मली.
10 Jan 2009 - 8:33 pm | शितल
शाल्मली,
पुलाव सह्ही दिसत आहे, आणि रेसेपी ही छान आहे.
कालच पटेलची वारी केली आहे त्यामुळे सर्व सामान घरी आहेच आजचा आज नाही तर उद्या नक्की करेन. :)
13 Jan 2009 - 10:28 am | समिधा
छानच , मी मक्या एवजी पनिर घालुन करत होते असाही छान लागतो
मी पालकाची पेस्ट आणी भात एकत्रच शिजवते
23 Jan 2009 - 5:21 am | गरम मसाला
पुदिना टाकणे आवश्यकच आहे का? मला माहिति नाहि माझ्याईकडे मिळु शकेल...त्याएवजी काही...??
5 Feb 2009 - 12:37 am | रामची आई
मी आजच करुन पाहिला...मस्त :) मी फक्त एक बदल केला, तो म्हणजे तांदुळ पालक प्युरीत शिजवुन घेतला. छान रेसिपीबद्दल धन्यवाद!!
5 Feb 2009 - 1:40 am | शाल्मली
ह्म्म.. हा बदल छान वाटतो आहे.
आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
--शाल्मली.