सकाळचं आट वाजलं तसं कौशीनं च्याचं आदान ग्यासवर चढीवलं . मारत्या रातपाळी करून याची वेळ झाल्याली. आदनात च्या-साकर घालताना, मारत्या आल्यावर मनातला ब्येत तेच्या डोस्कीत कसा उतरवायचा हेचा ती इचार कराय लागली. आंगुळीचं पानी न्हाणीत ठेवायला ती आत गेली तवर मारत्या कवा डूटीवरनं यून हातरुनात गडप झाला त्ये तिला समजलंच न्हाई. सज नजर भिताडाकडं ग्येली तर मोळ्याला प्यांट आडिकल्याली. बघतीया तर मारत्या खालवर कांबळं घ्यून घोराय लागलाता.
मौ कवळा आवाज काडून कौशीनं हाळी दिली,
'आवं..'
'घुर्रर्र..!'
'आईकतासा न्हवं... '
'घुर्रर्र..ठिस्स !'
'आत्ता ! माज्या जीवाला हितं घोर लागलाय आन तुमी घोरायलायसा ? उटा उटा !' कौशी चं डोस्कं फिरलं.
'खुर्र फटाक ..!' मारत्या निस्ता ह्या अंगावरचा त्या अंगावर.
'आरं मुडद्या. आता उटतोस का घालू साळुता डोस्क्यात ?'
हे आईकल्यावर मातर मारत्याची झोप, पाठीत साळुता बसलेल्या चिचुंद्रीगत पळाली. डोळे चोळत आन जांभया देत त्यो उठून बसला.
'आयला, काय बायकू हैस का भिताड ? मायला आत्ता रातपाळी करून आलोय न्हवं ? जरा लवंडलो तवर काय तुझं तिरकाट ?'
'झोप दोडा तू रातदिस ! आन नशीबबी झोपू दे माजं !'कौशी खरंच कावलीया हे मारत्याच्या धेनात आलं.
'आता काय झालं तुज्या नशिबाला ? घटकाभर थंड बसायला काय हुतंय तेला, म्हनतो मी ?'
'आवं, त्या गोंद्यानं निस्तं दिसभर काम करून ग्याल्याक्षी घेतला नवीन ! आन तुमी बसलाय मोकळंच, रातपाळी करून !'
'आगं, तेची कमळीबी जाती न्हवं कामाला बेकरीत ! डब्बल इंजिन हाय तेचं !'
'आन मग तुमचं काय हाप इंजिन हाय व्हय ? मीबी जाते कि कामाला कुटंतरी !' आता कौशीला प्वाइंट बरोब्बर सापडला !
'कुटं ? त्या बाबूरावाच्या बेकरीत ? नको बा ! त्ये बाब्या सुक्काळीचं लई भिकारचोट अवलादीचं हाय ! तरण्या तरण्या बायका बघून भट्टीफुडं पाव भाजायला रातपाळीला बलीवतोय. तू अजाबात जायचं न्हाईस तितं, सांगून ठेवतो.'
'आवं, बेकरीत न्हाई, पन पलीकडच्या गल्लीत शिदनाळ्याच्या खानावळीत कामाला येक बाई पायजे आसं रावजी शिदनाळ्या सांगत हुता काल...'
'ये कौशे, तू हाटेलात वाढप्याच्या कामाला गेलीस तर तंगडं तोडून गळ्यात बांधीन तुज्या, धेनात ठेव ! तेज्यायला सगळी पिंडकीच आसत्यात रातच्याला खानावळीत जेवायला. मागनं कायतर लडतर नको !' मारत्या तरबत्तर झाला.
'आवं, वाढप्याचं न्हवं, म्याणेजरचं काम हाय !'
'म्याणेजरचं ? म्हंजे ?'
'निस्तं आरडर घ्याची आन भटारखान्यात सांगायची आनि गिराईकाचा हिशेब करून बिलं वाढप्या पोराच्या हातात दयाची, येवडंच काम ! रोज चं चार तास काम आन आटवड्याला चारशे रुपय पगार ! म्हंजे म्हैना सोळाशे श्यालरी !'
कौशी पाचवी शिकल्याली आसल्यामुळं तिला आदनं मदनं इंग्लीस बोलायची हौस यायची.
यावर मारत्या आणि कौशीचं जरा चंगूमंगू होऊन अखेरीस न्हेमीपरमाणे कौशीची सरशी झाली आन शिदनाळ्याच्या खानावळीतली तिची म्याणेजरकी फायनल झाली.
दुसऱ्या दिवसापास्नं कौशी शिदनाळ्याच्या खानावळीतल्या म्याणेजरच्या खुर्चीत बसून आपल्या, होम थेटरसारक्या खणखणीत आवाजात 'आरडरी' घ्यू आन द्यू लागली.
'सात नंबरला तीन मटनताटं...'
'चार नंबरला दोन पिलेट खिमा-पाव'
'बारा नंबर, चार कडक भाकरी '
आरडरी आन बिलाची झकाझकी मिटली म्हनून रावजी शिदनाळ्या निवांत गल्ल्यावर बसून डुलू लागला.
ताटात भाजीबरुबर रोजचं खानावळीतलं येखादं अंडं नायतर मुंडी रस्सा , कधी माशाचा तुकडा आसं कायबाय पडू लागलं आनी मारत्या गडी खुशालला. पन पंधरा दिवस गेल्यावर राती झोपेतबी कौशी 'पाच नंबर, दोन अंडा मसाला' आसं जाबडायला लागली तसा त्यो लई कावला.
'आयला, ताटात वाढती मटणाची नळी खरं, झोप माजी हराम झाली ! xxxx ये कौशे, बास झालं, दुसरीकडं डूटी बघू म्हनं !'
पन कौशीची गाडी जोरात सुटल्याली. ती काय ऐकती व्हय ?
चार पैसे हातात पडाय लागल्यावर तिचं इंग्लीसबी उड्या माराय लागलं. एक दिवशी खानावळीत सफारीवालं व्हीआयपी गिराईक आलं. त्यास्नी मटन-भाकरी खायाची लै हौस. कौशी सायबापशी येऊन आरडर घ्याय लागली.
'येक मटन ताट, मुंडी रस्सा, पांढरा रस्सा , आनी भाकरी'
'भाकरी मौ का कडक, सायेब ?'
'मिडीयम कडक.' सफारीवाला डुलत बोलला.
कौशी म्याणेजरच्या खुर्चीत येऊन बसली आन भटारखान्याकडं तोंड करून खच्चून वरडली,
'दोन नंबरला सायबास्नी मटन मुंडी रस्सा पांडरा रस्सा आन येक म्याडम कडक !'
'म्याडम कडक ' आयकून सायबाची निम्मी उतरली आनी शिदनाळ्याला फेफरं आलं !
सायेब जेवून गेल्यावर रावज्यानं कौशीचा धुरळा काढला , तसं कौशीचं डोस्कं फिरलं. तिनं खानावळीला रामराम ठोकला. मारत्या जरा खुल्लाट झाला.
पन कौशीची ग्याल्याक्षीची हौस अजून भागली न्हवती.
चार दिवस मोकळं गेल्यावर तिला नायकुड्याच्या हास्पिटलात शिस्टरची नोकरी लागली. हास्पिटलात जाऊन जाऊन कौशीचं इंग्लीसबी टाॅनीक पिल्यागत बाळसं धराय लागलं . आटच दिवसांत मारत्याला येता जाता 'ओपीडी', 'आडमिट', 'येनिमा' आनी 'आयव्ही'ची इंजेक्शनं फुकटात मिळाय लागली.
एक दिवशी नायकुडीणबाई कौशीला म्हणल्या,
'कौशी, डॉक्टरसायबांना म्हणावं, सात नंबरच्या सुभानरावांचं अर्जंट ग्यांग्रीनचं ऑपरेशन करायचंय, ताबडतोब ऑपरेशन रूममध्ये या म्हणून सांग.'
'जी म्याडम'
अर्जंट ऑपरेशन म्हटल्यावर कौशी पळतच वॉर्डात गेली. नायकुडे डॉक्टरसाहेब पेशंट तपासत हुते.
'डॉक्टरसायेब, म्याडमनी आरजंट बलीवलंय...'
'काय झालं ?'
'सात नंबरच्या सुभानरावाचं आरजंट सिझरीन करायचं हाय !'
डॉक्टरसाहेब टाणकन उडाले आनी आजूबाजूचे पेशंटबी इवळायचं इसरून खो खो हसाय लागले , तरी कौशीला इंग्लीसची मिष्टेक काय कळंना !
'सिझरीन' झाल्याला सुभानराव डिस्चार्ज घ्यून घरला गेल्यावर सुन्द्रा शिस्टरनं कौशीला येका बाजूला घेतलं आनी म्हनली, 'शानी का खुळी तू, आगं, , सिझरीन फक्त बायकांचंच हुतं !'
'आत्ता ! आन मग म्याडम मला आसं का म्हनल्या ?'
म्हैनाभर हास्पिटलात पेशंटांची उसाभर करून झाल्यावर आनी इंग्लीसचा बुकना पाडून झाल्यावर कौशीच्या कमरंचा काटा ढिल्ला झाला.
आशात येक दिवस आपिंडिसचा पेशंट म्हनून नारबातात्या आडमिट झाला. आता नारबातात्या म्हंजे कौशीच्या चुलत्याच्या सुनंच्या मावळनीचा इवाई म्हंजे आगदी जवळचाच सोयरा की !
तर नारबातात्या कौशीला म्हणला,
'आगं ये कौशे, हितं दवाखान्यात काय म्हनून डबरं पाडत बसलीयास ? उगं आपलं आंग खरवडून बुक्का किती पाडायचा म्हनतो मी !'
'मग काय करू, तात्या ? तेवडाच आपला परपंचाला हातभार, रे.'
'आन मग आमच्या लांडे-पाटलाच्या कॉलिजात का येत न्हाईस, शिपाई म्हनून ?'
'कालिजात ?'
'हां. माप चार जागा हाईत मोकळ्या. निस्तं धा ते चार काम आनी शनवार आईतवार सुट्टी !'
'आनी पगार रे किती ?'
'पगार चार हजार म्हैना !'
'आरं, चल की मग ! येवडी शिप्ट सपली की येतो बग तुज्याकड, जाऊ आपुन '
आनी हास्पिटलाला फाट्याव मारून कौशी लांडे पाटलाच्या कॉलिजात शिपाई म्हनून हजर झाली.
कॉलिजात जाऊन कौशीच्या इंग्लीसला आनीच जरा धार चढली. मारत्याला सांज-सकाळ फुकट इंग्लीसचा रतीब सुरु झाला. लेकचर काय, रजिष्टर काय, ल्याबररी काय आनी मष्टर काय, काय इचारू नका.
आसं म्हैनाभर बरं चाललं . आन मग येका सोमवारी कौशीच्या इंग्लीसचा बार उडाला !
झालं काय, की येचोडी हळदीकर म्याडम कौशीला म्हणाल्या,
'कौशे, आगलावे सरांकडं जा, आणि त्यांच्या क्लासची एटीकेटीची लिस्ट घेऊन ये.'
कौशी लगालगा स्टाफरुमात गेली. आगलावे सर पेपर तपासत बसले हुते.
'सर, सर हळदीकर म्याडमनी तुमची लिष्ट मागितलीया.'
'कसली लिस्ट, कौसाबाई ?'
'आवो सर , तुमच्या पेटीकोटची लिष्ट !'
आगलावे सरांनी दचकून आजूबाजूला बगितलं. नशिबानं सगळे सर आनी म्याडम तासावर गेले हुते.
'कौशे, काय गांजा बिन्जा वडतीस का काय ? '
'मी ? आन गांजा ? कोण फुकनीचा म्हनीतो मी गांजा वडते म्हनून ?'
आसा दोगांचा झिम्मा सुरु झाला तवर पलीकडल्या ल्याबररीतनं नारबा तात्या तिथं आला आनी सगळं आईकल्यावर त्यो म्हनाला,
'आवं सर, तुमी म्याडमास्नीच इचारा की कसली लिष्ट पायजे ते !'
मग आगलावे सरांनी इंटरकॉम उचलून हळदीकर म्याडमकडून खुलासा करून घेतल्यावर सगळ्यांची डोस्की जाग्यावर आली !
दिसभर कॉलिजात काम करून घरात आल्यावर जेवान करायचं, पानी भरायचं, गावाच्या चवकशा करायच्या आनी गल्लीतल्या साळकाया माळकाया गोळा करून कॉलिजातल्या मज्जा सांगायच्या, ह्या कौशीच्या उद्येगात मारत्याच्या पोटात येळेला च्या-पानी जेवन पडंना झालं, आनी एक दिवस त्येच्या चक्कीत लैच जाळ झाला.
'ये कौशे, ह्यो तुज्या कॉलिजचा गुळमाट च्या झेपत नाय मला ! सोड बगू ती शिपाईगिरी. उगं आपलं कोंबडं म्हनून कुत्र्याची पिसं उपडायची म्हंजी काय ? सगळ्या परपंचाचा इस्कुट बाजार निस्ता ! गपगुमान बाराच्या टायमाला घरात ऱ्हाउन मला जेवाय वाडाय याला पायजे, असली नोकरी बग म्हनं !'
'आरं वाद्या, तुज्या जेवनापायी माजा ग्याल्याक्षी सोडू व्हय ?'
'आगं ग्याल्याक्षी सोड कुटं म्हन्तोय मी ? हाय ही नोकरी सोड आनी दुसरी हुडीक !'
'आता ती काय उंडारल्याली कोंबडी हाय व्हय, हुडकायला ? '
तवर कबाड्याचं किशा मारत्याला आढळायला आलं. दोगांचा दंगा आयकून त्यो म्हणला,
'ये मारत्या, आसाच ऊट आन आन्ना कित्तुऱ्याकडं जा !'
'ते कशाला ?'
'आरं, त्यो नगर्शेवक हाय न्हवं ? मुन्शीपाल्टीच्या सफाई खात्यात मुकादम भरती चाललीया. आन्नाच्या वशिल्यानं चाटदिशी मुन्शीपाल्टीत चिकटंल कौसावैनी ! काय न्हाय, निस्तं सकाळी सातला जायाचं आन धाला परत. पुन्ना सांजच्याला चारला हाजरी द्याची आन याचं . खल्लास !'
'आनी पगार रे ?'
'आरे साव्वा वेतन आयोग हाय मुन्शीपाल्टीत, हैस कुटं ?'
'म्हंजे ?'
'पगार म्हैन्याला धा हजार !'
कौशी आनी मारत्याचं डोळंच फिरलं !
'आयला खरं सांगतुईस का आंबं पाडतुईस ?'
'तुज्या गळयाशप्पत ! '
'लेका, आदीच बोल्ला आसतास तर इदुळनं कौशीच्या हातात ग्याल्याक्षी खेळला असता की !'
झालं ! कौशीनं कॉलिजाचापन काडीमोड घेतला आनी आन्नाच्या किरपेनं ती मुन्शीपाल्टीत चिकटली. मुकादमगिरी तिला चांगलीच मानवली. झाडूवाल्या माम्या आनी मावश्या तिचं इंग्लीस-विंगलीस सांज-सकाळ कवतिकानं आयकू लागल्या. मारत्याच्या ताटात येळेला भाकरी भाजी पडाय लागली आनी चार म्हैन्यात कौशीच्या कमरंला शामसंग ग्याल्याक्षी लटकाय लागला.
सा म्हैनं झालं आनी कित्तुरे आन्नाच्या मर्जीनं कौशी पर्मनंटबी झाली.
मग येक दिवशी किशा येरवाळीच आला आन मारत्याला म्हणला,
'काय कळळं न्हाय बा !'
'कशाचं काय कळळं न्हाय ?' मारत्याला काय कळंना.
'म्हंजे वैनी परमणण्ट झाल्या म्हनं, खरं आमाला काय कळळं न्हाय !'
'नीट बोलतोस का द्यू झटका, भाड्या ?'
'आरं, वैनी मुन्शीपाल्टीत परमणण्ट झाल्या , कुणाच्या किरपेनं ?'
'कुणाच्या म्हंजे ? आन्नासायबाच्या !'
'आन मग पार्टी कोण द्याची त्यास्नी ?'
'आस्स म्हन्तोस व्हय ?' आत्ता मारत्याची टूबलाईट पेटली.
'आरं द्यू की, हाय काय आन नाय काय ? येत्या शुक्क्कीरवारी जंगी पारटी करू.'
आन्ना कित्तुऱ्या , किशा आनी मुन्शीपाल्टीतली तेंची बगलबच्ची सगळ्यांना शुक्कीरवारी रातच्या जेवनाचं आवतन गेलं. पालव्याचं सुक्कं , खेकड्याचा रस्सा, आनी अंड्याचा गब्रा झालं तर कोंबडीची बीरयानी असा खत्रा बेत केला कौशीनं . सायेब मंडळी रंगा खुश झाली, आगदी सगळं जेवान सुपडा साफ !
जेवान आवरलं, पान-बिन खाऊन मंडळी निवांत भायेर पडाय लागली. जाता जाता येका बगलबच्च्यानं कौशीला गमतीत इचारलं,
'येवडी जंक्शान पारटी कशापाई वो केलासा कौसाबाय ?'
'कशापाई म्हंजे ? तुमच्या आन्ना मालकांनी मला प्रेगनंट केलं न्हवं का, मुन्शीपाल्टीत ?'
'काय म्हनताय काय ?' त्याचं डोळं पांढरं झालं !
आनी दुसरे दिवशी कित्तुरणीला कौशीचं इंग्लीस विंगलीस समजून देता देता कबाड्याच्या किशाची केसं पांढरी झाली !!
प्रतिक्रिया
26 Feb 2016 - 7:39 am | अजया
दे धमाल कथा!
जगात भारी कोल्लापुरी!!
26 Feb 2016 - 7:46 am | पैसा
सकाळी सकाळी बेक्कार हसतेय!!
26 Feb 2016 - 7:54 am | एस
हेहेहे!
26 Feb 2016 - 7:55 am | विजुभाऊ
लय भारी.
म्होरल्या डांबावर आक्षी मोट्ट्या बोरडावर रंगीत आक्षरात ल्ह्यावी अशीच फर्मास कथ्था हाय बगा.
26 Feb 2016 - 8:06 am | पॉइंट ब्लँक
जिकलासा एकदम. नाद खुळा गोष्ट लिवलिया!
26 Feb 2016 - 8:45 am | नाखु
मज्जा आली...
आमचा मुद्द्याचा पॉइंट ध्यानात ठिवा बरं !!!
26 Feb 2016 - 11:24 am | पॉइंट ब्लँक
ठेवणार दादा :)
26 Feb 2016 - 8:14 am | यशोधरा
आक्शी जंक्शान! (बरोबरे का?)
26 Feb 2016 - 8:19 am | प्रदीप साळुंखे
अगागा झण्णाटच.
खटक्याव बोट जाग्याला पलटी
26 Feb 2016 - 8:59 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी खटक्यावं ब्वॉट आनं जाग्यावर पल्टी
26 Feb 2016 - 9:02 am | विटेकर
आवडली कथा !
26 Feb 2016 - 9:20 am | प्रचेतस
तुफ्फान.
26 Feb 2016 - 9:37 am | सतिश गावडे
मस्त आहे गोष्ट. साळुता म्हणजे काय?
26 Feb 2016 - 9:45 am | खेडूत
साळुता मजी झाडू.
गोष्ट येक लंबर. शून्य मिनटांत वाचून टाकली.
26 Feb 2016 - 10:05 am | राजेश घासकडवी
मस्त.
26 Feb 2016 - 10:06 am | पिलीयन रायडर
धमाल!!! मस्तच लिहीलय!!
मावळीन म्हणजे कोण? माहरेवाशीण का? आणि इवाई म्हणजे जावाई का?
26 Feb 2016 - 10:16 am | चेक आणि मेट
इवाई म्हंजी लेकीचा/लेकाचा सासरा.
मावळीन म्हंजी आत्या.
26 Feb 2016 - 10:23 am | सस्नेह
इवाई हा 'व्याही' चा गावरान अवतार.
26 Feb 2016 - 10:46 am | पिलीयन रायडर
हो का?!! एकवेळ इवाई = व्याही समजलं असतं.. पण मावळीन = आत्या हे मला ह्या जन्मात उलगडलं नसतं!
26 Feb 2016 - 12:11 pm | भुमी
म्हंतात नव्हं मावळीन?
26 Feb 2016 - 12:13 pm | भुमी
मामीला....असे वाचावे.
26 Feb 2016 - 12:26 pm | चेक आणि मेट
व्हय..
मामा = मावळा
मामी = मावळीन
पण मावळीन जास्तकरून आत्यालाच म्हणत्यात.
26 Feb 2016 - 10:17 am | प्रीत-मोहर
लोल =))
26 Feb 2016 - 10:36 am | रातराणी
लय भारी!
26 Feb 2016 - 10:43 am | पियुशा
काय लिवताय काय लिवताय वाचु वाचु न हसु हसु ठ स का लागलाय कि वो पार ;)
26 Feb 2016 - 11:03 am | मितान
अगागागागा =))
26 Feb 2016 - 11:28 am | राजाभाउ
एक नंबर
26 Feb 2016 - 11:37 am | नूतन सावंत
Purepur kolhapur
26 Feb 2016 - 11:41 am | प्राची अश्विनी
लय भारी!
26 Feb 2016 - 11:47 am | प्रमोद देर्देकर
ए टंगा पल्टी , घोडं फरार ! जर का मराठी भाषा लेखासाठी बक्षीस लावले असते तर तुम्हालाच पहिलं मिळाले असते ताई.
दादु इंदुरीकरांसारखा याचा एकपात्री प्रयोग होईल मस्त पैकी , तुमची हरकत नसेल तर (आधी घरी) करुन बघु का?
26 Feb 2016 - 2:15 pm | सस्नेह
आणि इकडं ऑडिओपण पेस्टव.
26 Feb 2016 - 9:03 pm | नूतन सावंत
व्हिडोपन चालंल बर्का.
26 Feb 2016 - 11:47 am | एकनाथ जाधव
कोल्हापुरी
26 Feb 2016 - 11:48 am | नीलमोहर
म्याडम कडक :)
26 Feb 2016 - 11:48 am | कविता१९७८
वाह नेहमीप्रमाणेच दमदार
26 Feb 2016 - 11:59 am | नगरीनिरंजन
=)) लै भारी!
26 Feb 2016 - 12:11 pm | बाबा योगिराज
लै ब्येस लिवलंय.
26 Feb 2016 - 12:12 pm | भुमी
लय भारी कोल्लापुरी झटका:)
26 Feb 2016 - 12:30 pm | मित्रहो
लय भारी
बेक्कार हसतोय
26 Feb 2016 - 1:03 pm | बोका-ए-आझम
कबूल करून घेवा म्हणून रायलो हो ताई!_/\_
26 Feb 2016 - 1:07 pm | बॅटमॅन
शून्य मिण्टात वाचलोय तेच्यायला, हपिसात लोकं बघत्याल म्हूनशान हासू आवराय लागायलंय, अग्गा बाब्बौ =)) =)) =)) =)) _/\_
26 Feb 2016 - 1:14 pm | चिगो
लै भारी.. तुफ्फान जमलीय..
26 Feb 2016 - 1:18 pm | यमगर्निकर
लै दिस ग्वाड ग्वाड खाल्यावर आज अचानक झनझणीत कोल्लापुरि जेवल्याच फिलिंग आल.. एक नंबर....
ताई तुम्हि आजुन ग्रामिण साहित्य लिवाच
26 Feb 2016 - 1:26 pm | अभ्या..
कबाड्याच्या किश्याच्या कौशीचा कोरा करकरीत कोल्लापुरी किस्सा.....
मस्त
26 Feb 2016 - 1:38 pm | सस्नेह
कौशी किशाची न्हवं, मारत्याची रे !
तेनं आइकलं तर बुकना पाडंल की तुजा !
26 Feb 2016 - 2:10 pm | सस्नेह
प्रकाटा
26 Feb 2016 - 2:02 pm | अभ्या..
आसली तर आसली. आपण लिहायला घाबरत नाही ब्वा. किश्या आन मारत्या बगून घेतीला.
26 Feb 2016 - 2:24 pm | नाव आडनाव
मस्त :)
26 Feb 2016 - 2:25 pm | सूड
आक्षी झ्याक लिवलंसा!!
26 Feb 2016 - 3:15 pm | सतिश पाटील
का हसतोय म्हणून यच आर बाय म्हाग हुबारावून बगून गेल्या, म्हनली मिसळपावाची रेशिपी बघतोयस हापिसात बसून? आन त्यात एवढह दात काढाया काय झालं?
अडाणी कुठल्ची...