गजाल खरी काय?'
कोकणी माणसाचा आवडता स्वभाव म्हणजे गप्पा छाटत बसणे. त्यात कोणी पळून वैगरे गेलं असेल तर मग काय सांगता! अशाच पळून गेलेल्या गुरवाच्या मुलीबद्दल गावातल्या घरात जी काही चर्चा रंगते त्याची थोडीशी झलक. चर्चा इतकी रंगते की मूळ कथानक अजूनही सुरु व्हायचंच आहे.
बरेच दिवस, खरंतर बरीच वर्ष ही भाषा कानावर न पडल्याने लिखाणात लहेजा तितकासा नीट उचलता आलेला नाहीये.
=======
''रं म्हाद्या… "
"ऊंssssssss"
"हाईस कुटं? कालपासना कुटं पायरव नाय तां?"
"कुटं मंजे? आमान्ला कामा हायत, तुमच्यासारं गावभर छकन्या मारीत फिराय येल नाय.. "
"तं !! आला मोटा कामा करनारा…. ता जाव दे, बातमी समाजली काय?"
"कंची ?"
"कंची? आरं गावातच -हाताईव ना? हिकडं सगला गाव ताच बोलतोय नि तुमान्ला म्हायत नाय ?"
"आता नाय म्हायत…. सांगताय्स? का जाव ?"
"ताच ता, ती गुरवाची पोर? ती पलून गेली !!"
"अरे कर्मा !!"
"तं… !! सांगताय काय मी !! "
"तरीच सकाल-सकाल गुरवाच्या घरातना कंदाल आयकू येयीत व्हती. मना वाटला ह्यांची रोजचीच नाटका आसतील. गुरवाची बायको, मेली, वस्साडी तशीव सासवंला डोल्याफ़ुडं धरीत नाय. मना वाटला दोगींचा रोजचाच काय चालला आसंल."
"रोजचा त्यांचा नाय, गुरवीनीच्या प्वोरीचा चालल्याला. काय म्येली फ़्याशनी करं !! म्हयन्या दीड म्हयन्यापासना रोज फ़ाटं फ़ाटं देवलाफ़ुडल्या बावीवं पानी आनाय जायाची. गो बाय जाव नुको, पानी व्हंड हाय म्हनंस्तवर बाय हांडं कलश्या घेऊन पसार…. ! कार्टी येयाची ती दीड दोन तासान. आयशीला काय, तेवडाच बरा… येक काम कमी व्हयीत व्हता. . सासवंन येक-दोन येलं गुरवीनीला सांगून बगतलान.. पर गुरवीन कशी ती म्हायत हाय ना? सासवंन सांगतल्याला आईकलान तं कान झडतील नाय तिजं? नि आयता मिलताय तं सोडील कशाला? येकदम कंडम बाई !! उंद्या न्हव-याला न्हेयाला यम आला तं जल्ली यमासंगाती कवड्या खेलीत बसंल. आशी आईस म्हनल्याव काय पोरीला रानंच मोकला मिल्ला. तं झाला काय !! गुरवीनीच्या भयनीच्या पोरीचा हाय फुडल्या म्हयन्यात लगीन!!"
"काय सांगतास? आमच्या पोरांसंगाती खेलाय येयाची, ही अशी नकावडी पोर…लगीन पन ठरला!!"
"ता -हाव दे, काय सांगताय ता आईक. तं ही गुरवीन म्हनली वायच काय बाय करु. कंदी नाय ती सासवंला हाताशी घ्येतलान, सासू सुना लाडू बांदीत बसलंल्या. रव्याचं लाडू काय जमताईत काय! उब्या जिंदगीत गुरवीनीन असला काय केलंला नाय. सासवंला आयता कारन मिल्ला सुनंला अद्दल घडवाय. सासू जरा लकाटतो सांगून ग्येली ती झोपली…. मंग हिनं ल्येकीला सांगतलान…बाय जरा सामनी जा नि कदमीनीला आवाज देस… "
"मंग ? म्होरं काय झाला? तिकडच्या तिकडं पलाली का काय?"
"च्च, मांगारी आली, आयशीला म्हनं, काकूस जेवाय बसली. ज्येवान झाला का मंग येयील. गुरवीन वाट बगत बसली ती तितच वायच लकाटली, तं तिचा लागला डोला!! मेली निजते पन अशी कुंभकरनासारी का ढोल वाजावलं तरी उटायची नाय. तं ही अशी आत लकाटल्याली. तेवड्यात झाला काय, दावनीला बांदल्याला रेडकू सुटला नि आला माजघरात. त्या लाडवाच्या टोपात घातलान तोंड!! सगला टोप खाली केलान तरी बायला सूद नाय"
"गुरवीनीच्या पोरीचा काय झाला?"
"ताच सांगताय… आईक !… "
-------
मूळ कथानक अजूनही सुरु व्हायचंच आहे!!
प्रतिक्रिया
24 Feb 2016 - 11:13 pm | सूड
थोडं स्पष्टीकरण, फक्त कुळवाडीच नाही....महाड ते राजापूर भागात जवळपास सग़ळ्यांच घरात बोलली जाते. खाली सरकता सरकता थोडी मालवणीची छटा वाढत जाते.
कदाचित प्रमाण मराठी बोलीभाषा आपली केल्यावर बाकी बोलीभाषांचं झालं तेच हीचंही झालं असावं आणि अमक्याच लोकांची म्हणून राह्यली असावी.
पुढचा भाग शक्य तितक्या लवकर टाकतो, प्रतिसांदांबद्दल प्रचंड आभारी आहे.
शक्य असल्यास धनाजीराव उर्फ सतिश गावडे यांनी हिची रायगडातली छटा दाखवणारा एक लिहावाच अशी आग्रहवजा विनंती.
24 Feb 2016 - 11:19 pm | पैसा
रत्नागिरीत आणि जवळपास तर जातीबरोबर बोली बदलते. कोकणस्थ, भंडारी, खारवी, दाल्दी, कित्ती प्रकार ऐकलेत. त्यांना वेगळाली अशी नावं मात्र नाहीत. तू लिहिलं आहेस हे खास कुळवाडी लोकांकडून ऐकलंय. पुलंच्या म्हैसमधे आहे सही न सही!
24 Feb 2016 - 11:51 pm | सूड
जातीबरोबरच सांगायचं तर हीच भाषा मी आजपर्यंत कुळवाडी, मराठे, न्हावी, गवळी घरातनं ऐकली आहे. कदाचित थोडा फार फरक असेल, मला वेगळा करता नसेल आला.
24 Feb 2016 - 11:54 pm | सतिश गावडे
आमच्या जातीचा उल्लेख न केल्यामुळे तुमचा तीव्र निषेध. उद्याच तुमच्या घरावर मोर्चा घेऊन येतो. तेव्हढं चहा आणि बिस्कीटांचं बघा.
25 Feb 2016 - 12:11 am | सूड
हा हा!! बघू की.
आमच्या पण घरात गावात सोनारांचं एकच घर असल्यामुळे की काय बर्यापैकी प्रभाव होता दोन पिढ्या आधी. आजोळी काही शब्दप्रयोग जसेच्या तसे सापडायचे, उदा. 'बयो, ह्याला जरा खायला देस', 'साधं पाणी विचारलान नाय'.
25 Feb 2016 - 8:56 am | पैसा
गावात एखादे दुसरे घर असेल तर त्यांच्या भाषेवर इतरांचा परिणाम होतो. मी राहत होते तिथे गवळी वगैरे अजिबात नव्हते. सोनार, मराठे सगळे शिकलेले त्यामुळे घरात शुद्ध मराठी बोलत. कोकणस्थ लोकांकडे देस गो, केलंन नाय असे ऐकू येई. फरक म्हणजे ळ आणि ण चा उच्चार. भंडारी खारवी दालदी (मुसलमान) वेगवेगळ्या नमुन्यांचे बोलत. दालद्यांची मराठी म्हणजे "होरीत मानसां वारली" असली!
25 Feb 2016 - 8:58 am | प्रीत-मोहर
देस गो, केलंन नाय हे तर इथे आमच्याकडे पण आहे चित्पावनीत. " तेला भाकरी देस गो ती" किंवा "में सांगलां सलां त्याला सारय म्हणी, केलान नाय नी? हा गो!!!" अस काहीतरी
25 Feb 2016 - 2:20 pm | सूड
अगदी!!
4 Mar 2016 - 10:28 pm | खटपट्या
महाड, चिपलून या भागात ल चा उच्चार जास्त. जसे जसे दक्षिणेकडे जाउ तसा ल चा उच्चार कमी होत जातो.
जातीचे म्हणाल तर सर्वजण सर्व बोली भाषा बोलतात. अगदी ब्राह्मणसुध्दा या भाषेत बोलताना पाहीले आहेत चारचौघात. बाकी त्यांच्या घरात थोडी वेगळी असते. "मज काय सांगतस?" वगैरे...
25 Feb 2016 - 12:04 am | सही रे सई
गजाली म्हणजे नेमक काय या बद्दल सविस्तर कोणी सांगेल काय?
25 Feb 2016 - 12:12 am | सूड
गजाल: बातमी/गोष्ट, गजाली: गप्पागोष्टी.
25 Feb 2016 - 12:13 am | सही रे सई
अछ्छा बर..
25 Feb 2016 - 12:37 am | अभ्या..
मस्त रे सूडूक्स
आवडली भाषा.
हे असले पंच गावाकडंच ऐकावेत. जबरदस्त.
25 Feb 2016 - 10:00 am | मितान
सूडा मी वंदिले :))
25 Feb 2016 - 10:00 am | मितान
सूडा मी वंदिले :))
4 Mar 2016 - 10:07 pm | पद्मावति
:) मस्तं! अजुन येऊ द्या.
4 Mar 2016 - 10:44 pm | विशाखा राऊत
खी खी खी... भारीच