उन्हाळा आणि भटकंती...

sagarshinde's picture
sagarshinde in भटकंती
11 Feb 2016 - 3:07 pm

उन्हाळा आणि भटकंती... हे समीकरण अनेकांना ऑड वाटते, पण मित्रांनो उन्हाळ्यातही तुम्ही अगदी मनसोक्त भटकंती करू शकता उन्हाळा हा भटकंतीसाठी तसा खडतरच ऋतू म्हणायला हरकत नाही. पण हाडाच्या ट्रेकर्सना दुर्गभ्रमंती करण्यासाठी खरं तर कुठलीही वेळ आणि ऋतू आडवा येत नसतो.पाठीवर सॅक अडकवून द-या-खो-यांत, डोंगर शिखरावर, गड-किल्ल्यांवर, रानावनात, अभयारण्ये-जंगलात आपला आनंद शोधत फिरत असतात. यासाठी या भटक्यांना कोणतीही काळवेळ आडवी येत नाही. अमावस्येची काळी गडद छाया पांघरलेली रात्र असो वा पौर्णिमेचं पिठुर चांदणं अस पण डोक्यावर रखरखतं ऊन, अंगाची होणारी लाही-लाही, गडकिल्ल्यांवर असणारं पाण्याचं दुर्भिक्ष यामुळे बरेच भटके या ऋतूत गडकिल्ल्यांपासून काहीसे दूरच राहतात पण माझ्यासारखे काही जण चांदण्या रात्रीतले छोटे-छोटे ट्रेक आखून या दिवसातही ट्रेकिंग चा आनंद लुटत असतात. तसा या उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास टाळण्यासाठी मस्त "मूनलाइट ट्रेक' करता येतो, रात्रीच्या या ट्रेक्सचीही एक वेगळीच मजा आहे. फक्त यावेळी निशाचरांपासून सांभाळून राहावं लागतं. गडकिल्ल्यांच्या प्रेमात पडलेल्या कोणत्याही भटक्याची भटकंतीची इच्छा ती कुठल्याही ऋतूतली, अपुरी राहणारच नाही असा हा सारा सह्याद्रीचा आसमंत आहे. म्हणूनच सह्याद्रीच्या अरण्यात लपलेले काही वनदुर्ग आपल्याला ऐन उन्हाळी वातावरणातदेखील वेगळाच थरारक अनुभव देऊन जातात.
नाइट ट्रेकची मजा म्हणजे जणू मूनलाइट सफरच. शांत-निवांत वेळ, गूढरम्य वातावरण, दोस्त मंडळींची सोबत अन्‌ आपले आवडते ठिकाण, यापेक्षा बेस्ट आणखी काय असू शकते? खगोलशास्त्राचा अभ्यास करणारा दोस्त सोबत असेल तर रात्रीच्या आकाश आणि ताऱ्यांच्या स्थितीची माहितीही तुम्हाला मिळून जाते. इतिहासातला एकच विषय घेऊन रंगणाऱ्या गप्पांमध्ये केव्हा पहाटेचा गारवा जाणवू लागतो, ते लक्षातच येत नाही. पहाटेचा सूर्योदय त्या ठिकाणाहून पाहण्याचा आनंदही आगळाच. या गप्पांतूनच तुम्हाला खूप काही नवी माहिती मिळते अन्‌ तुमच्या जाणिवा प्रगल्भ होत जातात. मित्रांनो, निसर्ग नेहमीच तुम्हाला शिकवत असतो. प्रत्येक पानाफुलातून, कीटकांच्या हालचालींतून, दिवस-रात्रीच्या चक्रातून अन्‌ अशा अनेक प्रकारांतून तो आपल्याशी बोलत असतो. तेव्हा त्याच्याशी संवादाची संधी दवडू नका.मग चला अशाच आपणही निरार्गाशी संवाद सादुयात "लेटस चॅट विथ हिम''.

प्रतिक्रिया

शान्तिप्रिय's picture

11 Feb 2016 - 3:37 pm | शान्तिप्रिय

व्वा व्वा!
मस्त उन्हाळ्यात रात्रीचा ट्रेक करण्यात खुप मजा येते.
आम्ही एकदा एप्रिल महिन्यात नेरळ ते माथेरान ९ किमि नेहमिच्या रस्त्यावरुन रात्रभर चालुन गेलो होतो.
ते सुध्धा पोर्णिमेच्या चांदण्यात!

sagarshinde's picture

11 Feb 2016 - 3:41 pm | sagarshinde

रात्रीच्या ट्रेक ची मजाच काही वेगळी आहे मी हि याच आठवड्यात "मूनलाईट ट्रेक" च आयोजन केला आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Feb 2016 - 3:57 pm | स्वच्छंदी_मनोज

रात्रीच्या ट्रेक ची मजाच काही वेगळी आहे मी हि याच आठवड्यात "मूनलाईट ट्रेक" च आयोजन केला आहे. >> ह्या ट्रेकचा लेख येऊद्या लगेचच ...

sagarshinde's picture

11 Feb 2016 - 4:10 pm | sagarshinde

नक्की

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Feb 2016 - 4:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

कुठला नाईट ट्रेक करताय आत्ता?
मागे के २ एस केलावता चांदण्या रात्री..त्याची आठवण झाली!!

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Feb 2016 - 4:26 pm | स्वच्छंदी_मनोज

प्रबळगड व कलावंतिणी मुनलाईट ट्रेक >>> सागर साहेब, छान आहे प्लॅन पण जरा जपून कारण प्रबळ त्याच्या वन्य श्वापदांसाठी आणी सापांसाठी प्रसिद्ध आहे (आम्ही ह्याच्या काळ्या बुरुजावर टेंट मधे राहीलो होतो तेव्हा हा अनुभव घेतला आहे). हा आपला माझा एक प्रेमाचा सल्ला :) :)

बाकी ट्रेक केल्यानंतर एक झकास लेख लिहाच..

जिन्क्स's picture

11 Feb 2016 - 4:45 pm | जिन्क्स

काय अनुभव आला ते पण सांगा...

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Feb 2016 - 5:13 pm | स्वच्छंदी_मनोज

जिन्क्स भाऊ.. आम्ही टेंट मधे रात्री गावातल्या एका बरोबर झोपलो होतो (टोटल ६ मेन टेंट) आणी रात्री साधारण २-३ च्या सुमारास आमच्या बरोबर आलेली २ कुत्री एका विशीष्ठ आवाजात ओरडायला लागली आणी टेंटजवळ येवून अंग घासायला लागली आम्हाला संशय आला म्हणून आम्ही टेंटमधील लँटर्न लावला आणी अंदाज घेत बसलो होतो. आमच्या बरोबर असलेल्या गाववाल्याने बिबट्याची शंका व्यक्त केली.

सकाळी बघतो तर खरच टेंटपासून थोड्याच अंतरावर बिबट्याचे ठसे होते. आमची काय हालत झाली असेल त्याचा तुम्ही अंदाज बांधू शकता :):)

प्रबळवर फिरताना तर अनेक सापांच्या कात दिसल्या आणी तसेही किल्ल्यावर घनदाट आणी अनएक्स्प्लोअर्ड जंगल आहे त्यामुळे साप आणी बिबट्या वगळता दुसरेही वन्य श्वापदे असण्याची खुप शक्यता आहेच. मुख्यत्वे रानडुक्कर (लय बेक्कार जात.. सुळेवाल्या रानडुकराने एकाची शिकार केलेल्यानंतरचा फोटो बघीतला आहे. लिहू नये पण कापडाच्या चिंध्या कराव्या तसा त्याला फाडला होता.)

असो.. लिहीण्याचा विषय हा नव्हे.. जर काळजी घेवून ट्रेक केला तर मुनलाईट ट्रेक अतिशय आनंददायीच..

हो नक्की रानडुक्करा पासून मी सावधच राहील, सापांबद्दल सांगायचं झाल तर साप मला खूप आवडतात त्यामुळे ऐन उन्हाळ्यात त्याचा दर्शन झालं तर मला बराच वाटेल.

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2016 - 5:51 pm | टवाळ कार्टा

यालासुध्धा काळजी न घेणे कॅटेगरीमधे टाकावे का? का फक्त जंगली प्राण्यांचा हल्ला होउन कोणी गेले की मगच तसे करता येते??

जिन्क्स's picture

11 Feb 2016 - 6:26 pm | जिन्क्स

मस्त अनुभव. अशाच थरारक अनुभवांचा एक वेगळा धागा काढा.

sagarshinde's picture

11 Feb 2016 - 5:26 pm | sagarshinde

नक्की

sagarshinde's picture

11 Feb 2016 - 5:17 pm | sagarshinde

प्रबळ त्याच्या वन्य श्वापदांसाठी आणी सापांसाठी प्रसिद्ध आहे

बरोबर आहे तुमच प्रबळगडावर वन्य श्वापदाचे वास्तव्य आहे अस एकले आहे आणि सापांसाठीही हा प्रसिद्ध आहे पण मी गेले ४ वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करतो आहे त्यामुळे सापांबद्दल थोडीअधिक माहिती आहे त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त भीती नाहीये पण वन्य श्वापदाचे थोडे भय आहेच.

सर्पमित्र असाल तरी उगाच दिसला साप, बघायला गेलो, पकडून सोडण्यासाठी धरणे असे काही करु नका ही कळकळीची विनंती. मी प्रबळगडाजवळच्या एका गावात राहते.जवळच असलेल्या हाॅस्पिटलला बरीच वर्ष कार्यरत होते. कांडराने आणि फुरशाने दंश केलेल्या सर्पमित्राला आणण्याची घटना दोन वेळा स्वतः पाहिली आहे.प्रबळवरुन नजिकच्या हाॅस्पिटलला कांडरदंश झालेला आणताना मित्रांची काय वाट लागते तेही पाहिलंय.धाय मोकलून रडणारे आईबाप पण.
घाबरट लोक परवडतात पण आगाऊ सर्पमित्र साप दिसला आणि सोबत मुली असतील ट्रेकला तर, इम्प्रेस करायला उगाच साप हातात पकडायला जातात जे महागात पडते.
तुम्ही असे असाल असे नाही पण दोनदा हे बघितले असल्याने हे कळकळीने सांगते आहे असे समजा.

सहमत. हे साप हातात घ्यायच फॅड डिस्कवरी, NGC वरुन आलं आहे. "देखो कितना खुबसुरत साप हॅ" असं म्हणत ही लोकं मांबा पासुन टायपॅन पर्यंत सगळे साप आरामत हातात उचलतात. प्रेक्षकांना यातुन काय संदेश जाइल याची पर्वा हे लोक नाही करत.ऑस्टीन स्टिवन सारख्या सर्पतज्ञाला तर चित्रिकरणावेळी इजिप्शियन कोब्राचा दंश झाला होता तरी हा गड्या काय सुधरत नाही.

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 6:46 pm | उगा काहितरीच

त्यांना त्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात . पण आपले महाभाग नडतात बिंदास !! सर्पमित्राचे ट्रेनिंग वगैरे असेल ना ? स्वयंघोषीत सर्पमित्र नकोत. याबाद्दल "जेडी" नावाच्या एका मिपाकराची चांगली मालिका होती.

sagarshinde's picture

11 Feb 2016 - 7:03 pm | sagarshinde

सहमत,
पण मी पहिल्या पासून विषारी सापांपासून लांबच राहिलो आहे आणि तशी काळजी हि घेत आलो आहे, विषारी सापाला पकडण्यासाठी नेहमी स्टिक चा उपयोग करतो अन ब्यागिंग पण हात न लावताच करतो.

sagarshinde's picture

11 Feb 2016 - 7:06 pm | sagarshinde

अगदी बरोबर आहे तुमच
मला पहिल्या पासूनच सापांचे स्टंट करायला आवडत नाहीत.

स्वाती दिनेश's picture

11 Feb 2016 - 7:26 pm | स्वाती दिनेश

मूनलाइट ट्रेकच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत,
स्वाती

प्रचेतस's picture

11 Feb 2016 - 9:13 pm | प्रचेतस

मूनलाईट ट्रेक म्हणजे राजमाचीशिवाय पर्याय नाही.
पिंपरीहून रात्री नवाच्या लोकलने निघायचं. सव्वादहापर्यंत लोणावळा. जुन्या हायवेवरच्या पंपाला वळसा मारून एक्सप्रेस वे वरच्या पुलाखालून तुंगार्ली गाव. तिथून एक तीव्र चढ चढून धरणावर ज़रा वारा खायचा मग पांगळोलीतल्या कुत्र्यांची धास्ती घेतघेतच घळीतून तीव्र उतार उतरून ऐन सह्यधारेवर यायचं. आता ती घळ म्हणजे घळीतली वाट वापरात नाही. त्याऐवजी त्याच्या शेजारून कच्चाच पण बैलगाड़ी जाईल इतका रुंद रस्ता काढलाय. तर इथून पुढे नुसतं चालत राहायचं. उजवीकडे उंच कड्याची रांग तर डावीकडे खोल दरी. मधूनच पलीकडच्या डोंगरातून चाललेल्या रेल्वेचे दिवे बोगद्यांमुळे उघडमिट्ट होताना दिसतात. इंजिनाचा धुडुक धुडुक आवाज येतो. हे बघेस्तोवर आपण फ़णसराईपर्यंत आलेलो असतो. त्यापुढे सरळ रस्ता ढाकला व् डावीकडचा उढेवाडी. आपण डावीकडे वळतो. इतका वेळ अंधारातच समोर दिसत असलेल्या श्रीवर्धन मनरंजनाची आकृती आता डावीकडे आणि पाठीमागे जाताना दिसते. इथून सुरु होतं ते किर्र रान आणि काळामिट्ट अंधार. चांदण्या रात्रीही विजेऱ्यांची गरज लागते ती फ़क्त इथेच. मधूनच तितरांचा आवाज येतो, भेकरं झाडीतनं पळत जातात. ओढा पार करून एक कंटाळवाणा चढ. तो संपल्यावर श्रीवर्धन थेट उजव्या हाताला. डावीकडे दरीत मधूनच दिवे लुकलुकतात. पांगळोलीतल्या बंगल्यांचे लाइट्स दिसतात. हे बघत बघतच राजमाचीची वेस येते. वेशीवरच एका झाडाखाली उघड्यावरच मारुतीची मूर्ती आणि वीरगळ. आता तिथे एक लहानसं राऊळ बांधलंय. इथनं दहा पंधरा मिनिटांवर वाडी. इथवर येईस्तोवर पहाटेचे साडेतीन चार वाजत आलेले असतात. सवंगड्यांबरोबर मनसोक्त गप्पा झालेल्या असतात. माचीच्या अगदी सुरुवातीला एक खोपट आहे. तिथेच आम्ही तास दोन तास ताणून देतो. काही वेळात झुंजूमूंजू होतं. रात्रीच्या अविस्मरणीय वाटचालीची सांगता होते.

राजमाची कित्येकवेळा गेलोय पण तो रात्रीच. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा सर्व ऋतूंत, चांदण्या रात्री, ढगाळ रात्री, अगदी अमावास्येच्या रात्री देखील, पण रात्रीच. ह्या वाटेने राजमाचीला दिवसा यायचं भाग्य मला कधीच लाभलं नाही. अर्थात परतीच्या प्रवासात मात्र ही वाट दुपारी, संध्याकाळी अशीच, पण येताना मात्र रात्रीच.

यशोधरा's picture

12 Feb 2016 - 4:22 am | यशोधरा

क्या बात!

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Feb 2016 - 2:02 pm | स्वच्छंदी_मनोज

व्वाह क्या बात..जियो वल्ली साहेब. अगदी प्रत्ययकारी आणी तंतोतंत वर्णन. राजमाची मुनलाईट ट्रेकला प्रत्येकाला अगदी असाच अनुभव येतो.

(स्वगतः असे कातील लिहीणारा वल्ली कुठे हरवलाय कोण जाणे. कधी तो असे लेख लिहीणार ते त्या दर्पण सुंदरीलाच ठावूक :) :) )

पण मुनलाईट ट्रेक म्हणजे फक्त राजमाचीच नव्हे.. एकदा पौर्णीमेच्या रात्री नाणेघाट, रायगड, सुधागड आणी अनेक असे किल्ले चढून बघ भन्नाट अनुभवाची गॅरंटी.

तश्या घाटवाटा मुनलाईट मध्ये चढू-उतरू नयेत पण शांत आणी किर्र जंगलातून, चंद्र सावल्यांचा आणी सुखद गार वार्‍याचा अनुभव घेत सर्पाकार वळणे चढत एखादी घाटवाट पण स्वर्गिय आनंद देते. वाट चढून घाटमाथ्यावर आल्यावर खाली दूर दिसणारी आणी मिणमिणत्या दिव्यातली घरे आणी वरती कधी झुळूक तर कधी सोसाट्याच्या वार्‍यात आपण समोरील दरीतील झोपलेले सभोवताल पहात कधी तंद्री लागून निसर्गाशी एकरूप होतो आपल्यालाही कळत नाही.

एकदा रायरेश्वर ते पाठशीला हे अंतर पौर्णीमेच्या रात्री चालायचे आहे. दिवसा चाललो आहे पण रात्रीचा अनुभव खासच असेल..बघू कधी जमते ते.

प्रचेतस's picture

12 Feb 2016 - 6:15 pm | प्रचेतस

नाणेघाट, सुधागड आणि रायगड मुक्कामी केलेत पण रात्री सर केले नाहीत. घाटघर आणि धोंडश्याला मुक्काम. रायगड मुक्काम मात्र थेट गडावर. रायगडावर रात्री टकमकावर जाऊन काहीही न बोलता फ़क्त उभं राहावं. स्वर्गीय अगदी.

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Feb 2016 - 6:54 pm | स्वच्छंदी_मनोज

रायगडावर रात्री टकमकावर जाऊन काहीही न बोलता फ़क्त उभं राहावं >>> येस अगदी..

नुसत टकमक नाही तर समाधी आणी बाजारपेठेत, नगारखाना टॉपला किंवा होळीच्या माळावर जाऊन शांत तार्‍याची परीक्रमा पहात रहावे.. आहा..मस्तच..

अश्याच एका पौर्णीमेला आम्ही ६ जण भवानी टोकावर जाऊन बसलो होतो. समोरच्या वाघोलीच्या दरीत चांदणे सांडले होते. समोर पाने, दापोली, वारंगीचे लाईट्स चमकत होते. (रायगडच काय पण कुठल्याची किल्ल्यावरून खालच्या गावातील दिवे न्हाहाळणे हा माझा एक आवडीतीचा उद्योग आहे :) :) ). खालच्या दरीतली निरव शांतता, अगदी पानांचीही सळसळ नाही आणी नि:शब्द असे आम्ही ६ जण निसर्गाचा हा अदभुत खेळ पहात होतो. डिवाईन ह्या शब्दाचा अनुभव आम्ही त्यादिवशी तिथे घेतला.

ह्याच भवानी टोकावर अगदी एकांतात बसले की काय वाटते ते शब्दातीत आहे. एकदा अनुभवण्याजोगा असा हा प्रकार आणी एकदा अनुभवण्याजोगी ही जागा.

अगदी अगदी. कधीमधी गावात सप्ता चाललेला असतो. भजनीमंडळाचे रात्रभर गायन वादन चाललेले असते. त्याचा गडावर हलकेच तरंगत येणारा आवाज एक वेगळाच नाद निर्माण करतो.

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Feb 2016 - 12:31 pm | स्वच्छंदी_मनोज

वेल्लाभट साहेब हे मिसलं होतं.. फार छान लिहीले आहे. असेच अनुभव गाठीशी जोडण्यासाठी तर ट्रेक करायचे असतात :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Feb 2016 - 2:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

चला!! कधी ठरवताय मग?

प्रचेतस's picture

12 Feb 2016 - 6:16 pm | प्रचेतस

राजमाची बहुधा लवकरच.

नाखु's picture

16 Feb 2016 - 3:31 pm | नाखु

या लवकरच ची तीव्र प्रतीक्षा आहे.

सरधोपट ट्रेकपुरताच (उरलेला) नाखु

वेल्लाभट's picture

12 Feb 2016 - 3:09 pm | वेल्लाभट

मीही केलाय हा. आम्ही चौघे होतो. काजवे बघायचे होते. जबरा अनुभव. ६:३० ला वगैरे चालू केली चाल. ११:३० पर्यंत पोचलो. सरपंचांकडे झोपा-जेवायची सोय केली.

खलास मजा.

हा धागा.

चांदणे संदीप's picture

12 Feb 2016 - 6:32 pm | चांदणे संदीप

म्या केलाय राजमाची मुन्लाईट!! \o/ \o/ \o/ \o/

सा जण व्हतो....एक फक्कड काविताबी लीव्हली तिकून आल्यावं! पायजेल तर फ़ोटो आण कविता टाकतो!

Sandy

कपिलमुनी's picture

12 Feb 2016 - 7:37 pm | कपिलमुनी

अरेरे ! बरेच दिवसात कोणी गेलेले दिसत नाही!
दुसरा भुशी डॅम झालाय.
टाळावा असा ट्रेक. गप्पगुमान ढाक करावा. अगदी पायथ्याशी जाउन आलात तरी चांगला

एस's picture

13 Feb 2016 - 12:16 am | एस

लोणावळा - राजमाची - ढाकचा बहिरी - कोंडेश्वर - जांभिवली - कामशेत असा ट्रेक बर्‍याच वर्षांपूर्वी केला होता. त्यातला पहिला टप्पा ऐन पावसाळ्या रात्री. तो ओढा जवळजवळ छातीइतक्या पाण्यातून पार केला. सकाळी समजले ते काय होते ते! नंतरही ढाक करून आल्यावर कोंडेश्वराचे ओढे फणाणून वाहत होते. तसेच ओलेचिंब कामशेतपर्यंत चालतच यावे लागले होते. हा एक मूनलाईट नाही पण रेनीनाईट ट्रेक छान झाला होता.

धो-धो पावसात वेल्हा ते पाने व्हाया बोराट्याची नाळ व लिंगाणा हाही ट्रेक खूप वर्षांपूर्वी केला होता. तोही रात्रीच झाला होता. लिंगणमाची गावात उतरल्यावर उजाडलं.

अजून बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. हल्ली फिरणं फारसं होत नाही.

पैसा's picture

16 Feb 2016 - 5:23 pm | पैसा

लेख आणि इतर बरेच प्रतिसाद आवडले. ट्रेक झाला की त्याबद्दल जरूर लिहा.