आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही.
अशाच एका पुतळ्याविषयी एक व्यथित करणारी बातमी पाहिली. महाराष्ट्रात नाशिकच्या पुढे सटाणा येथे एक 'मांगी-तुंगी' नावाची जागा आहे. हा एक सुमारे ४४०० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर जायला ४५०० हून अधिक पाय-यांचा मार्ग आहे. इथे वर गुहा आहेत ज्यांमधे जैनपंथीयांच्या आकृती कोरलेल्या असून हे जैन सिद्धक्षेत्र म्हणून मानलं जातं. या ठिकाणाला अद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे. चारही दिशांना पसरलेली सह्याद्रीची शिखरं आहेत. त्यामुळे जैनपंथीयांबरोबरच इतर अनेक पर्यटक, ट्रेकरही इथे येत असतात. या ठिकाणाबद्दल वाचलेली बातमी अशी की या पर्वताचा एक भाग पोखरून तिथे रिशभदेव या जैन देवाचा १०८ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. याविषयीच्या एका कार्यक्रमात तेथील विश्वस्त व्यक्ती सांगत होती की, "ये स्टॅच्यू ऑफ अहिंसा" है. यहां आनेवाले सभी जैन भाविक इसके दर्शन का लाभ पा सकते है. ये अपने आप में एक अनुभूती है" इत्यादी.
एक व्यक्ती म्हणून, एक ट्रेकर म्हणून, मला त्या निसर्गाच्या वैभवाच्या या लचका तोडलेल्या, पोखरलेल्या रूपाने विषण्ण केलं. अनेक प्रश्न पडले. या पुतळ्याच्या उभारणीला मान्यता देणारे स्वतः माननीय मुख्यमंत्री आहेत. त्यांना यात होणारं निसर्गाचं विदृपीकरण दिसलं नाही का? पुढे या पुतळ्याच्या निमित्ताने तिथे उत्सव भरवला जाणार आहे. त्यासाठी रस्त्यांचं रूंदीकरण केलं जाणार आहे, पाण्याची सोय, भक्तांसाठी रहाण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी मंजूर झालेला खर्च ७० कोटी रुपये, टाईम्स ऑफ इंडियात बातमी आहे. रस्ते, पाणी यांची कामं होण्यासाठी या पुतळ्याचं निमित्तच हवं होतं का? ती कामं अशीही व्हायलाच हवी होती; इथेच नाही सगळीकडे.
या पुतळा उभारणीतून नेमकं काय सिद्ध करायचं आहे हाही एक वादाचा मुद्द होऊ शकतो. मांगी तुंगी हे जैन तीर्थ होतं आणि ते कुणीही नाकारलं नव्हतं. मग हा जैन देवतेचा पुतळा बांधण्याचं प्रयोजन काय? त्यासाठी डोंगर पोखरलेला कसा चालला? हे एका प्रकारचं शक्तिप्रदर्शन आहे असं का वाटू नये? आणखी एक गोष्ट अशी की काहीही सोयी सुविधा नसताना ज्या लोकांनी अशा खडतर जागी कोरीवकामं केली, गुहा बांधल्या, त्यांच्यापुढे आज सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जर तुम्ही एखादा पुतळा बांधलात तर त्यात तुमचा मोठेपणा काहीच नाही. पैसे असले की आज हे असं काही करणं सहज शक्य आहे. त्यामुळे यात भक्तीचा भाग कमी आणि इतर सूप्त हेतूचा भाग जास्त आहे, हे जाणवतं.
मुळात, भौतिकाचं कौतुक जास्त असल्याने हे प्रत्येक बाबतीत होत आलंय. मग शिवाजी महाराजांचं स्मारक काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक काय, सरदार पटेलांचा पुतळा काय किंवा आणि कुणाचं स्मारक काय. या गोष्टीतून काय साध्य होतं हे अनाकलनीय आहे. शिवाजी महाराजांचे विचार घ्यावे, बाबासाहेबांची बुद्धिमत्ता घ्यावी, साधूसंतांची शांतता, संयम व इतर गुणवैशिष्ट्य घ्यावीत; परंतु ते होत नाही. ते फक्त नावापुरतं असतं.
मांगी-तुंगी बद्दलच्या त्या कार्यक्रमात त्या विश्वस्तांनी सांगितलं की आणखी एका डोंगरावर ते अशा प्रकारचा पुतळा बांधणार आहेत. आनंद आहे. यालाही शासन मंजूरी देईलच. सर्वांना खूश ठेवायचं म्हटल्यावर सर्वांना हवे तसे हवे तिथे पुतळे बांधायला द्यायला हवेतच. विकास यालाच तर म्हणतात! पण एक ट्रेकर म्हणून, एक सह्याद्रीत रमणारा म्हणून मला तरी आता त्या ठिकाणी जावंसं वाटणार नाही. कदाचित तो पुतळा बांधणा-यांचा हेतू काही अंशी यातून साध्य होईल.
मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
मी इथे जाऊन आलेलो आहे. परंतु खालील छायाचित्रे जालावरून साभार घेतलेली आहेत.
प्रतिक्रिया
27 Jan 2016 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला ते पूतळे प्रकरण इतकं डोक्यात जातं की विचारू नका. आपण सहन करण्यापलिकडे काही करू शकत नाही.
-दिलीप बिरुटे
27 Jan 2016 - 5:38 pm | तर्राट जोकर
पुतळे
बांधले तरी प्रोब्लेम, तोडले तरी प्रोब्लेम.
27 Jan 2016 - 5:42 pm | उगा काहितरीच
तुका म्हणे उभे रहावे(पुतळ्यासारखे)|
ज्या ज्या (सोयी) होतील त्या त्या पहाव्या ||
27 Jan 2016 - 5:52 pm | चैतन्य ईन्या
शासकीय अल्पसंख्य आहेत ते आता. जास्त बोलू नका. शिवाय तसेही आपल्याला निसर्ग वगैरे ह्याच्याशी काहीही घेणे देणे नाहीये. आपण बुवा स्वर्गात पोहोचाल्याशी कारण बाकी काय का होऊ देत हो
27 Jan 2016 - 6:18 pm | एस
अगदी सहमत. :-(
27 Jan 2016 - 6:38 pm | सायकलस्वार
ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या मध्यभागी बांधलेलं देऊळसुद्धा हिडीस आहे. त्याने तळ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचं विद्रुपीकरण करण्यापलिकडे काहीही साध्य झालेलं नाही. पण सांगता कोणाला?...
27 Jan 2016 - 9:04 pm | वेल्लाभट
Absolutely! There is no need to place statues anywhere and everywhere
28 Jan 2016 - 12:07 pm | प्राची अश्विनी
अगदी खरे!
27 Jan 2016 - 6:44 pm | कंजूस
हं.
27 Jan 2016 - 7:21 pm | नगरीनिरंजन
धार्मिकतेत एकप्रकारची दांभिकता असतेच. त्यात "भाविक" लोक पैसेवाले असले तर मग काय विचारता!
27 Jan 2016 - 9:06 pm | सामान्यनागरिक
आपल्या देशात धर्म म्हंटलं म्हणजे काही बोलता येत नाही. या धाग्यावर जास्त चर्चा केली तरी चर्चा करणाऱ्या लोकांच्या घरावर येण्याची शक्यता आहे.
अनेक हिंदू देवळांना सुद्धा अत्यंत हिडीस पद्धतीने रंग देऊन विद्रुप केलेलं आहे. त्यांचं मूळ दगडातील सौंदर्य हरवून गेलेलं आहे.
28 Jan 2016 - 12:47 am | अन्नू
रोचक आणि तितकाच वादग्रस्त विषय.
याच्याशी १०० नव्हे.. १००००००००००+++++++ सहमत.
नाही. या सामाजिक सुधारणा वगैरेंसाठी कुठलाही पुतळा किंवा स्मारक उभारले जात नाही. यामागे श्रद्धेचे कारण असते- थोडक्यात- पुतळा उभारण्यासाठी श्रद्धेचे निमित्त असते.
इट्स वोर्स्ट, बट डॅम ट्रूथ!!
आता पुतळा का आणि कशासाठी उभारायचा? आणि त्याचे फायदे काय? तर-
जसे मी वर सांगितले, पुतळा सामाजिक सेवेसाठी नाही तर त्यातून मिळणार्या फायद्यासाठी उभारला जातो.
त्यातून होणारे फायदे म्हणजे- रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्ती, वीज- वाहतुक- पाण्याच्या सोयी, जागेचे सुशोभिकरण आणि नैसर्गिक देखावे, भक्त, अनुयायी आणि इतर पर्यटकांसाठी जागेच्या आणि इतर सोयी. म्हणजेच, रेंटवर रहाण्याची सोयी करणारे गेस्टहाऊस- वस्तीगृहे- हॉटेल्स, खाण्यापिण्याच्या सोयी वगैरे-वगैरे! आणि इतर बरेच काही.
अर्थात हे याचे खरे फायदे नाहीत, फक्त लोकांना दाखवण्याचे फायदे आहेत. मग याचे खरे फायदे आहेत तरी काय? आणि ते कोणाचे आहेत?
हाच सर्वात मोठा आणि मुख्य प्रश्न आहे.
तर याचे फायदे जे कधीच दाखवले जात नाहीत ते म्हणजे, त्या संबंधीत असणार्या अधिकारी उद्योगपती आणि संस्थानिकांचे!
बघा म्हणजे आता- भक्तांच्या(?) मागणीनुसार पुतळा तयार करणे निश्चित झाले तर तो कोण उभारणार? मग एक नेता (पैशाच्या कारभाराची) सगळी जबाबदारी आपल्यावर घेतो आणि होणार्या खर्चाच्या दुप्पट-तिप्पट खर्च दाखवून तो अमाप पैसे आणि नंतर पुतळा बनवल्याचे श्रेयही घेतो! झाला फायदा त्याचा?
नंतर नंबर उद्योगतीचा! (जो अगोदरपासूनच लायनीत उभा असतो!!)
आता पुतळा उभारणार म्हणजे त्याचे काम एखाद्या उद्योगपतीच करणार. मग इथे एक उद्योगपतीवर ते काम सोपविले जाते. यात त्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो. कारण कित्येक वर्ष आपले 'पैसे कव्हर झाले नाहीत' च्या नावावर तो तेथे वेगवेगळ्या युक्त्यांनी मिळकत करतच राहतो.
याशिवाय तेथील अधिकारी, संस्थानिक त्यांचे फायदे असतात ते वेगळेच!
28 Jan 2016 - 5:02 am | आदूबाळ
अवघड आहे...
28 Jan 2016 - 12:05 pm | वाह्यात कार्ट
नक्की कोणत्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेय यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, कारण मी ४ वर्षापूर्वी मांगी- तुंगी ट्रेक केला होता तेव्हा सुद्धा मूर्तीसाठी डोंगर कापण्याचं काम चालूच होतं. पर्यावरणाचा ऱ्हास पाहून मन विषण्ण झालं. आणि आता एकदा ही प्रथा पडली कि सर्व धर्मीय आता आपापल्या हिश्श्यात्ला सह्याद्री तोडायला सरसावणार.
28 Jan 2016 - 12:56 pm | वेल्लाभट
माफ करा माझं वाक्य पुरेसं स्पष्ट झालं नाही.
पुतळ्याला मान्यता अर्थातच तत्कालीन सरकारने दिली असावी. पण सद्य सरकारही अप्रत्यक्षपणे त्यास पाठिंबाच देत आहे.
खालील दुवे बघा अशी विनंती करतो.
http://www.dnaindia.com/mumbai/report-rs185-crore-state-nod-for-infra-wo...
http://timesofindia.indiatimes.com/city/nashik/70-crore-plan-for-idol-in...
28 Jan 2016 - 12:57 pm | वेल्लाभट
मीही तीन एक वर्षापूर्वीच गेलो होतो.
28 Jan 2016 - 1:04 pm | यशोधरा
ह्म्म..
28 Jan 2016 - 3:45 pm | नाखु
आता उरलो पुतळ्यापुरता !!!
घरीच बसलेला (टा़ळ न कुटणारा) वारकरी
1 Feb 2016 - 4:52 pm | शरद
हे परमकृपालु दयाघना, या पर्यावरण संरक्षकांना सहाव्या शतकात जन्माला न घातल्याबद्दल तुझे किती आभार मानू ?
नाही तर मला वेरूळचे कैलास लेणे पहावयास तरी मिळाले असते कां ?
शरद
1 Feb 2016 - 5:42 pm | वेल्लाभट
खरंय
1 Feb 2016 - 5:47 pm | संदीप डांगे
दाण्ण! जबरी मुद्दा! __/\__
1 Feb 2016 - 6:59 pm | प्रचेतस
:)
1 Feb 2016 - 5:51 pm | पैसा
अवघड आहे
20 Jan 2021 - 5:46 pm | अमरेंद्र बाहुबली
मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगरे ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो. मध्येच कुठली ही सूचना न देता येणाऱ्या स्पीड ब्रेकर मुळे दोन वेळा गाडी ला दणके बसले, रफड्रायव्हिंग करतो म्हनुन वडील ओरडायला लागले आणि भावाने मला स्टेरिंग वरून उतरवून स्वत गाडीचा ताबा घेतला. गाडीची वेगवान 80 ते 100 च्या स्पीड वाली घोडदौड थांबली आणी 40 ते 70 च्या मध्ये गाडी चालू लागली. पिंपळनेर सटाणा रस्त्याचे ही काम चालू असल्याने हळुहळु साडे 9 च्या आसपास उजव्या बाजूला turn घेऊन मांगीतुंगी पोहोचलो. इतक्या लवकर कुठल्याही हॉटेलात काहीच नाश्त्यासाठी तयार झालेले नसल्यामुळें parle g चा पुडा पाण्यात बुडवून खाऊन मांगी तुंगी च्या पायथ्याशी पोहोचलो.
मांगीतुंगी हे दिंगंबर जैन तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी वर डोंगरावर बऱ्याच जुन्या जैन लेण्या कोरल्या आहेत, जगातील सर्वात उंच 108 फुटी ऋषभदेव ह्यांचा पुतळा मांगी तुंगी वर बऱ्याच वर डोंगर फोडून( की बाहेरून दगड आणून?) बनवलाय. खाली भक्तांची रहाण्याची सोय देखील आहे. अनेक जैन धर्मिय दुरवरून ईथे भेट देण्यासाठी येतात. पायथ्याला भिलवाडी म्हणून गाव आहे. सर्व सुचना फलक हिंदीत होते. (मराठी ईथेही डावललेली होती) 2016 पासून थेट पुतळ्या पर्यंत 100 रूपये तिकिटात गाडी सोडते. ( हे आधी माहीत नव्हतं 2018 ला खालून पायी चढत गेलो होतो) बोलता बोलता ड्रायवर कडून कळले की गाडी 4 व्हील ड्राइव्ह आहे. प्रायव्हेट गाडी इतका तीव्र चढ चढेल ह्याची शक्यता कमी आहे. खाली अल्टो पार्क करून 100 रुपये प्रत्येकी तिकीट घेऊन (ज्यात वर लिफ्ट लावलीय पुतळ्याजवळ त्याचेही तिकीट असते) गाडीत जाऊन बसलो. एक आठ लोकांच जैन कुटुंब विजापूर (कर्नाटक) वरून आलं होतं. ते आणि आम्ही निघालो 20 मिनिटांत गाडी वर पोहोचली. लिफ्ट चालू करायला वेळ लागत होता म्हणून आम्ही जिन्याने चढू लागलो तर माकडांनी प्रचंड त्रास देणं सुरू केलं. ते माकड माणसांची सवय झाल्याने आजिबात घाबरत नव्हते. माझ्या बॅग मधून एकाने बिसलेरी ओढली पण वजन न पेलल्याने सोडून दिली. मग बॉटल आत बॅग मध्ये घातल्या. तरी बॅगची ओढाताण चालूच होती. शेवटी एक पार्ले जी दूर फेकला सगळे तिकडे पळाले आणी आम्ही मोकळे झालो.
पुतळा पाहिला. तिथल्या एका कर्मचाऱ्याने आत (तिथल्या शेड च्या ऑफिस मध्ये ) मुर्त्या आहेत त्यांचं दर्शन घ्या म्हणून सांगितले. पण आत कुठुन आलात वगैरे कोणता समाज, काय करतात वगैरे चौकश्या सुरू झाल्या त्या देणगी देणार की नाही देतील तर कीती निघेल ह्या साठी होत्या हे लक्षात आल्याने आत गेलो नाही. मंग मांगी आणि तुंगी ह्या सुळक्याकडे जायचे ठरले. भाऊ आणि वडील पायर्या असूनही ती उभी चढ पाहून येण्यास नकार देऊ लागले. मग व एकटा निघालो. वर एक माकड पिच्छा करू लागल. मग बरोबर आणलेल्या छत्रीची ढाल करून त्याच्या पासून सुटका करून मांगी ह्या सुळक्यावर पोहोचलो. तिथे एक परभणी आणी एक नाशिक हुन आलेला ग्रुप होता दोन्ही ग्रुप माकडांच्या भीतीने बरोबर फिरत होते. मग मीही त्यांना जॉईन होऊन निघालो. पायथ्याहून एका कुत्र्याने त्यांची सोबत केली होती. त्याला घाबरून माकडे येत नव्हती. पाठीवर माकडानी केलेल्या असंख्य जखमा घेऊन ते कुत्र वावरत होतं.
मांगी आणी तुंगी दोन्ही सुळक्यांवर लेण्या कोरलेल्या आहेत. मांगी च्या बाजूलाच एक किल्ला आहे. वर चढलेल्या मधील कुणीतरी त्याला मुल्हेर घोषीत केले आणी इतरांनी ही त्यात होकार भरला. पण आपल्या समूहातील जिरगे सरानी सांगितल्यावर तो न्हाविगड उर्फ तांबोळ्या आहे हे कळाले. तिथून मग तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा घालून खाली उतरलो. गाडीने खाली ड्रॉप केले. तो पर्यन्त दुपारचा एक वाजला होता. वर लिंबू सरबत विकनारे स्थानीक बसलेले होते. २० रूपयात ग्लास. फिरताना वेळ लक्षात आला नाही. मग तिथून निघालो रस्त्यात खालप गाव लागतं तिथे आपला समुह सदस्य शशीराज राहतो. त्याला फोन केला. पण त्या बहीर्याला माझा आवाज आला नाही. त्या दिवशी ग्रामपंचायत ईलेक्शन चा रिजल्ट असल्याने रस्त्यात भेटनारी गावेच्या
गावे गुलालाने ओसंडून वाहत होती. मग मांगीतुंगी~ सटाणा~देवळा~ चांदवड~लासलगाव~विंचूर~येवला~कोपरंगाव~नगर करत पुण्यात रात्री दहा ला पोहोचलो.
21 Jan 2021 - 5:32 pm | चौथा कोनाडा
अतिशय सुंदर वृतांत ! +१
👌