माझा एक चतूरपणाचा (?) अनुभव..
अभियांत्रिकी पदवी घेतल्यावर मद्रास येथे नोकरी निमित्त रुजू झालो. घरापासून दुर आणि त्यात खिश्यात पैसा खुळखूळत असल्याने थोडाफार माज आला होता. वाट्टेल तसे पैसे उधळायचो. अर्थात दारू, सिगारेटवगैरे व्यसनापासून दुर होतो. मुख्यतः कपडेलत्ते, हॉटेल ,चित्रपट पहाणे, हिंडणे आणि छानछोकीत राहणे..यातच बराच पैसा खर्च होत होता.
अशा माझ्या राहणीमानामुळे बर्याच लोकांनी मला हेरले असावे. मुद्दाम माझ्याशी मैत्री कर, मला खर्च करायला लाव असे काहीजण करायचे. पण थोड्याफार अनुभवांनंतर मी अश्या लोकांना दूर ठेवू लागलो. पण काही हेकेखोर पाठच सोडायची नाहीत. त्यातल्यात्यात पैसे मागायला येणारेच जास्त. तसा मी कोणाकडून फसलो गेलो नाही. पण परत पैसे मागण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे रक्त आटायचे. त्यावेळचाच एक अनुभव.
त्या काळात (१९९५ साली) तसे मद्रासला हिंदी बोलणारे कमी भेटायचे. त्यामुळे मोजकेच मित्र होते. बाकी दक्षिण भारतीय मित्र पण होते पण ते हिंदी नाही बोलायचे त्यामुळे त्यांच्याशी एवढी जवळिक नाही झाली. एक कैलाश नावाचा मारवाडी होता. थोडाफार मराठी बोलायचा. त्यामुळे सुरुवातीला फारच जवळचा वाटला. हळूहळू त्याची जीवनपद्धती समजल्यावर तसा मनातून उतरलाच. त्याला सगळी व्यसने होती. शराब आणि शबाब सुद्धा. बोलण्यात मात्र कोणालाच हार नाही जाणार. मित्र्यांच्यात चांगलीच माझी खेचायचा.
एकदा त्याने माझ्याकडे रु. ३००० मागितले. ते पण सर्वांसमोर. पहिल्यांदा मी नाही म्हणालो . पण त्याने मला सोडले नाही. सर्वांसमोर माझ्यावर टोमणे. वर अडीअडचणीत असलेल्यांना मदत करावी असा उपदेश. मला पण खुन्नस चढली ( खरे म्हणजे अवदसा आठवली असे म्हणणे योग्य ठरेल). मी त्याला सर्वांसमोरच रु. ३००० कसले मागतोस. मी तुला रु.५००० देतो असे म्हणालो. आणि सावकाश दे असे वर म्हणालो. त्याकाळी ATM नव्हते. त्यामुळे दुसरे दिवशी बँकेतून पैसे पण काढून दिले. दिलेला शब्द पाळायची हौस ..दुसरे काय ?
तसे माझ्या हितचिंतकांनी मला सावधही केले होते. पण मी ईरेलाच पेटलो होतो. मला खात्री होती की मी माझा पैसा वसूल करेनच.
पण या शहाण्याने मला रडकुंडीलाच आणले. त्याकाळी रु.५००० म्हणजे खुपच वाटायचे. (आजही खुपच वाटतात) . जवळजवळ ३-४ महिने त्याने मला तंगवले. मला टाळायचा काय..काहीतरी कारणे देयचा. तसे मी त्याला उधळपट्टी करताना बघायचो. तो पण माझी गंमत बघायचा. मुद्दाम असूनसुद्धा त्याने एक रुपया ही परत नाही केला. वर एक दोन वेळा माझ्याकडेच येवून आणखी पैसे मागितले. मी तर सगळ्यांच्या चेष्टेचा विषय झालो होतो. मी नंतर नंतर पैसे परत मिळण्याची आशाच सोडली होती.
असेच मला एकदा समजले की तो महिना-दोन महिने कामानिमित्त बाहेरगावी जाणार आहे. म्हणून त्याला भेटायला संध्याकाळी त्याच्या घरी गेलो तर तो त्याच्या टोळभैरवांबरोबर दारू पित होता. मला बघितल्या बघितल्या माझ्यावर उसळून म्हणाला " मी आज उद्या सकाळी बाहेरगावी चाललो आहे. मी तुला आत्ता पैसे अजिबात देवू शकणार नाही." अश्या काहीतरी उत्तराची अपेक्षा असल्याने मी शांतपणे त्याला सांगितले " बाबारे.. मला पण कळतयं तू चाललास ते.. मी तुला भेटायला आणि तुमच्या पार्टीत भाग घेण्यासाठी आलो आहे." असे म्हणून मी त्यांच्या पार्टीत सहभागी झालो. थोडाफार कोक, चकणा आणि मस्त जेवण पदरात पाडून घेतले.
मी जात असताना त्याला काय वाटले कोणास ठावूक. त्याने सरळ रु. ५००० चा माझ्यानावाने चेक फाडला. वर सेंटी होवून मला म्हणाला," जाऊ दे रे सर्व काही..हे घे तुझे पैसे "
पण चप्पल घालत असताना त्याचे मित्रांशी बोललेले वाक्य माझ्या कानावर पडले आणि मला कळले की त्याच्या बॅक खात्यात तेवढी रक्कमच नाही आहे. म्हणजे काय चेक असून नसल्यासारखाच होता.
त्यावेळी आम्हाला पगार चेकनेच मिळायचा आणि मग तो आम्ही आमच्या खात्यात भरायचो. त्यामुळे मला हा परत गावाला जाऊन येई पर्यंत वाट बघावी लागणार होती. तरी मी बॅकेत जाऊन हा चेक वटतोय का असे विचारले. अर्थात "चेक वटणार नाही कारण तेवढे पैसे खात्यात नाहीत" हेच उत्तर मिळाले. माझेही खाते त्याच बॅकेत असल्याने कारकुन मला थोडापार ओळखत होता. त्याने मला सहज सांगितले की फक्त रु२०० कमी पडत आहेत. चेक वटला नाही गेला तर कायदेशिर कारवाई करता येते हे मला त्यावेळी माहीत नव्हते. बँकेतून परत जात असताना एकदम एक कल्पना डोक्यात आली. दुसर्या दिवशी बॅकेत जाऊन याच्या खात्यात रु. २०० टाकले. आणि सरळ माझा चेक वटवला.
कैलाश गावाहून परत आल्यावर त्याला पहिल्यांदा कळलेच नाही की घरमालकाने त्याला पैशासाठी शिव्या का दिल्या. त्याने घरमालकाला दिलेले दोन महिन्याचे घरभाड्याचे चेक वटले नव्हते. तसेच वीज कंपनीने चेक वटला नाही म्हणून त्याची वीज तोडली होती. या शहाण्याने वीज कंपनीला आणि टेलीफोन कंपनीला एक -एक आणि घरमालकाला दोन असे चेक दिले होते. बँकेत पगाराची रक्कम टाकायला गेला असता त्याला सगळा प्रकार लक्षात आला. त्याने त्या कारकूनाला धारेवर धरले की तुम्ही कोणालाही माझ्या खात्यात पैसे का भरायला देता. बँक मॅनेजर आणि कारकूनाने मला बोलावले आणि सगळा प्रकार माझ्याकडून समजून घेतला. त्या दोघांनी नंतर कैलाशलाच चांगलेच झाडले आणि त्याचे खाते बंद करायची धमकी दिली. शिवाय ४ चेक परत आल्याचा आणि दोन महिने खात्यावर काहीच रक्कम न ठेवल्याचा दंड ही वसूल केला. (तरी बरे की त्याकाळी बॅका आजच्या इतका दंड वसूल करत नव्हत्या). शिवाय वीज कंपनी आणि टेलीफोन कंपनी यांनी त्याच्याकडून वेगळा दंड वसूल केला.
मी फक्त माझे पैसे वसूल व्हावेत म्हणून केलेल्या उपायामुळे त्याला चांगलाच दणका बसला. माझ्या सुदैवाने मला फक्त रु २०० च त्याच्या खात्यात भरावे लागले. जर ही रक्कम जास्त असती तर मी हा प्रकार केलाच नसता. मला अजिबात कल्पना नव्हती की याने आणखी काही चेक देवून ठेवले आहेत. अर्थात या प्रकारात मला रु.२०० चे जरी नुकसान झाले असले तरी नंतर कैलाशला झालेला मन:स्ताप आणि त्याचे वीज मंडळातले खेटे बघून आणि काही दिवस त्याने वीजेशिवाय काढलेले बघून मला ते पैसे वसूल झाले. त्याच्या सुदैवाने टेलीफोन कट झाला नव्हता. शिवाय नंतर बरेच दिवस माझे कौतूक आणि त्याची चेष्टा ह्यामुळे रु.५००० वर व्याजही मिळाल्यासारखे वाटले.
( ही सत्यकथा असून कथेतील फक्त मित्राचे नाव बदलले आहे.)
प्रतिक्रिया
19 Dec 2008 - 3:26 am | प्राजु
खरंच पैसे चुकवणार्यांना एखादा सव्वाशेर भेटावा लागतोच... त्याशिवाय अक्कल येत नाही त्याना..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Dec 2008 - 3:37 am | शितल
अनुभव छान लिहिला आहे.
:)
19 Dec 2008 - 4:34 am | पक्या
मस्त अनुभव कथन.
19 Dec 2008 - 4:58 am | मदनबाण
मस्त अद्दल घडवलीस...
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
19 Dec 2008 - 7:53 am | एकलव्य
- अंगठाबहाद्दर
19 Dec 2008 - 7:55 am | आजानुकर्ण
कसे काय?
एकलव्याचा अंगठा तर कापून घेतला होता ना
आपला
(द्रोणाचार्य) आजानुकर्ण
प्रतिसाद अवांतर वाटला तरी उडवू नये!
19 Dec 2008 - 7:57 am | मदनबाण
=)) एकदम झकासमाडी प्रतिसाद...
प्रतिसाद अवांतर वाटला तर जरुर उडवावा.. <:P
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
19 Dec 2008 - 8:58 am | एकलव्य
कसे काय? एकलव्याचा अंगठा तर कापून घेतला होता ना... आपला, (द्रोणाचार्य) आजानुकर्ण
गुरुदेव - अहो म्हणूनच तर आम्ही ...अंगठाबहाद्दर
19 Dec 2008 - 8:12 am | अनिल हटेला
ह्याला म्हणतात शेरास सव्वाशेर ....
(वसूलीभाई)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Dec 2008 - 9:10 am | दवबिन्दु
जो मानूस प्रामानिकपने पैशे परत करतो तो गाधव असे झालं आहे. लोकांना पैशे बुडवन्यात मजा वाटुन राह्यली आहे.
19 Dec 2008 - 9:35 am | वृंदा
मस्त शक्कल लढवलीस!
19 Dec 2008 - 10:55 am | मैत्र
असेच म्हणतो!
19 Dec 2008 - 10:58 am | सखाराम_गटणे™
मस्तच,
अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात.
फुले शु
----
सखाराम गटणे
19 Dec 2008 - 10:00 am | झकासराव
आयला, पण दोनशे अक्कलखाती जमा झालेच की. असो.
बाकीचे पैसे मिळाले हे महत्वाचे.
चेक बाउन्सचा नियम (फौजदारी खटला) हल्लीच आला असेल अस वाटत.
एका मित्राने माझ्या रुमपार्टनरचे ५००० नेले होते आणि तो जे गायब झाला तो झालाच.
परत अजुन भेटला नाहिये. माझ्या रू पा ने त्याच्या रूम वर जावुन त्याची एक बॅग आणली, त्यात त्याचे दहावी आणि डिप्लोमाचे सर्टिफिकेट होते.
मग काय तीन महिन्यानंतर त्याच्या घरचे काका वै आले आम्हाला भेटायला.
५००० प्लस त्याच्या घरच्याना करावे लागलेले फोनचे बिल (त्यावेळी एसटीडी चार्ज होता महाराष्ट्रात) सगळ वसुन केल.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
19 Dec 2008 - 10:57 am | सखाराम_गटणे™
----
सखाराम गटणे
19 Dec 2008 - 10:36 am | विसोबा खेचर
मस्त अनुभवकथन..!
19 Dec 2008 - 10:49 am | सखाराम_गटणे™
मस्तच,
अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात.
फुले शु
----
सखाराम गटणे
19 Dec 2008 - 10:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त कथन आणि शक्कलही! झरा, तुमच्या रुपाची कल्पनापण भारीच!
19 Dec 2008 - 11:03 am | भास्कर केन्डे
वा भाऊसाहेब, मस्तच वसुली केलीत!
एखाद्या मरतुकड्या मुलाचा एखादा बलदंड मित्र असावा. त्या बलदंडाने एखाद्या माजोरड्याचा माज उतरवावा. मरतुकड्याला त्या बलदंडाचा अभिमान वाटावा.... अगदी तस्साच अभिमान आम्हाला तुमच्याबद्दल वाटतो आहे.
दुर्दैवाने मला बर्याच जनांनी केविलवान्या चेहर्याने विनंत्या करुन गंडवलेले आहे. वसुलीचं कंत्राट तुम्हाला द्यावं म्हणतो: ५०-५०. काय म्हणता? ;)
आपला,
(आपल्यांनीच बुडवलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
19 Dec 2008 - 11:23 am | धमाल मुलगा
खादाडभौ,
करणार का मदत? तुमची आयडीया लै भारी आहे की :)
भास्करराव, एकदम सहमत हो तुमच्याशी!!
मलाही दोन-चार जणांनी असाच गंडा घातलाय! साले कुणि चेकही देत नाहीत, आणि त्यांच्या बॅगा कुठे असतात तेही माहिती नाही, काय करावं बरं? :?
-(आतबट्याच्या व्यवहारात निपुण) ध मा ल.
19 Dec 2008 - 11:30 am | योगी९००
सर्व प्रतिसादांबाबत धन्यवाद..
खरं सांगायचं झालं तर मी हे सर्व माझे पैसे परत मिळावे म्हणून केले होते. त्यामुळे त्याला इतका दणका बसेल याची कल्पना नव्ह्ती. चोराच्या हातची लंगोटी तर लंगोटी..म्हणून मी रु.२०० वर पाणी सोडायला तयार झालो.
अर्थात एक गोष्ट इथे नमूद केली पाहिजे. बॅकेत आणखी पैसे भरून आपला चेक वटवणे ही मुळ कल्पना अगदी लहानपणी माझ्या आजोबानी दिलेल्या एका पुस्तकामुळे मला सुचली. त्या पुस्तकात अशाच छोट्या छोट्या गोष्टी होत्या. मला त्या पुस्तकाला आणि आजोबांना श्रेय दिलेच पाहिजे. फक्त एकच श्रेय मला की योग्य वेळी मी जे वाचले त्याचा उपयोग करून घेतला.
या वरून मी एकच धडा शिकलो. की तुम्ही कोणाला रु १०० दिले तर तुम्ही त्याला आपल्या नियंत्रणात ठेवू शकता. पण हेच जर रु. १०००० असतील, तर तोच तुमच्यावर नियंत्रण ठेवेल.
खादाडमाऊ
19 Dec 2008 - 12:02 pm | एकलव्य
या वरून मी एकच धडा शिकलो. की तुम्ही कोणाला रु १०० दिले तर तुम्ही त्याला आपल्या नियंत्रणात ठेवू शकता. पण हेच जर रु. १०००० असतील, तर तोच तुमच्यावर नियंत्रण ठेवेल.
आणि जर १०००,०००,०००,००० दिलेत तर अमेरिकन गव्हर्नमेन्ट बेल-आऊट करेल.
जय सिटी - एकलव्य
19 Dec 2008 - 4:27 pm | लिखाळ
मस्त अनुभवकथन !
आवडले.
छान.
वाचाल तर वाचाल याचा साक्षात प्रत्यय :)
-- लिखाळ.
12 May 2010 - 11:05 pm | शिल्पा ब
मलाही एकदा असा अनुभव आलं...कॉलेजात असताना काहीतरी काम करायचे म्हणून हॉटेलातल्या पार्टीला होस्टेस म्हणून २-४ वेळा गेले...एक कंत्राटदार होतं...त्याने माझे २००/- थकवले...त्याला फोन केलं तर राँग नंबर लागायचा...मग एकदा त्याचाच फोन आलं ... मग मी तेव्ह्द्यासाठी गेले आणि १००/- वसूल केले ...त्याला वाटले उरलेल्या १००/- साठी परत येईन...काही दिवसांनी परत फोन केलं...मग मी त्याला बराच ऐकवलं...वर आणि मला म्हणतोय काय १००/- साठी अडलंय...म्हंटला तू तरी का अडलाय बाबा..मी तर काम केलाय...
...म्हंटल १००/- गेले तर जाऊदे.......आणि शिवाय आयत्यावेळी न जाऊन त्याची फजिती केली ती वेगळीच...काय एकेक लोक असतात...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 11:12 pm | शुचि
मित्र पैसे मागतो तेव्हा निर्णय तुम्हाला करायचा असतो - मित्र महत्वाचा की पैसे?
मित्र महत्वाचा असेल तर पैसे उधार द्या पण मग पैसे विसरा.
पैसे महत्वाचे असतील तर सरळ नकार द्या पण मग मित्र विसरा.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
12 May 2010 - 11:28 pm | पांथस्थ
खादाडमाउ एकदम झकास!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
13 May 2010 - 9:22 am | चिर्कुट
>>मित्र महत्वाचा असेल तर पैसे उधार द्या पण मग पैसे विसरा.
पैसे महत्वाचे असतील तर सरळ नकार द्या पण मग मित्र विसरा.
हे कळतय पण वळत नाही हो.. :(
आम्हाला पण लई वसुली करायची बाकी आहे. पण मित्रांना दुखवायचं धाडस होत नाही. स्वतःचाच पैसा परत मागायची चक्क लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण करून ठेवतात लोक..
(उदारपणा दाखवून गंडलेला) चिर्कुट X(
18 Jan 2016 - 3:02 pm | मन१
वरती केन्डे आणि धमालशेठ प्रमाणेच मीही बर्रेच आतबट्ट्याचे व्यवहार करुन पस्तावलेला प्राणी आहे.
18 Jan 2016 - 3:21 pm | सस्नेह
उधारीचे पैसे इतक्या सुखासुखी परत मिळाले म्हणजे तुम्ही खरंच लकी आहात.
19 Jan 2016 - 5:57 pm | मराठी कथालेखक
माझा अनुभव खूप चांगला आहे ...माझ्या अगदी जिवलग मित्राला प्लॅट बुक करताना मोठ्या रकमेची गरज होती. त्याने विचारणा केली मी लगेच हो म्हटले पण तोच म्हणाला "आधी घरी (आई-वडिलांना) विचार .." मग विचारले. आमच्या घरी माझ्यापेक्षा या मित्राचेच जास्त कौतूक असल्याने आई-बाबांनी अजिबात आक्षेप घेतला नाही.
मित्राचा प्लॅट घेवून झाला. यथावकाश पैसेही परत मिळाले. त्याने देवू केलेले व्याज मी मात्र मी नाकराले..
मैत्री आणि पैसा यातील कशाचेही नुकसान नाही झाले.
19 Jan 2016 - 6:16 pm | रेवती
छान आयडियाची कल्पना!
पैसे देऊन पुन्हा न मिळाल्याचे सांगणारे अनेक प्रतिसाद येथे आहेत. कोणी पैसे उचलून न परत केलेले आहेत का? ते असे समोर येऊन कबूल करतील का? ;)