श्री मोदक दादा व मार्गी साहेब व अन्य मिपाकर सायकल प्रभृतींना वंदन करून "सायकल कशी निवडावी?" हा विषय हाती घेत आहे. चू.भू.दे.घे.
सायकल नियमितपणे चालवून बरेच दिवस झाले होते. ज्यू. कॉलेज संपल्यावर माझी सायकल कनिष्ठ बंधूंच्या हाती सोपवून रेल्वे/बस ने प्रवास सुरु झाला. नंतर मोटर सायकल आली. सायकल ने 'गरज' म्हणून प्रवास थांबलाच. विकांताला मनोरंजन / भटकंती म्हणून ट्रेकिंग सुरु होतेच. अशात ओळखीतल्या २-३ लोकांनी भारीतल्या सायकली घेऊन भटकंती सुरु केली. आणि सायकल बद्दल परत आकर्षण निर्माण झाले.
मोदक दादांशी ट्रेकिंग च्या माध्यमातून ओळख होतीच. एक दिवशी त्यांचा मेसेज आला - "अरे, सायकल वरून कोकण दौरा करूया का?"
मी म्हणले - "बाबो! कोकण! नाही जमणार बाबा. एकतर सायकल नाही, सराव नाही. त्यात कोकण म्हणजे मोठाले घाट आणि खराब रस्ते!"
पण मनाशी ठरवले - सराव करून सायकलिंग सुरु करायचे.
लहानपणापासून साधी सायकल चालवायचा सराव होता, पण सायकल चे गिअर कशाशी खातात हे पण माहित नाही. म्हणून ठरवले गिअर च्या महागड्या सायकल घेण्यापेक्षा सायकल भाड्याने घेऊन सराव करावा. गिअर कसे वापरावे ते शिकावं. मग मागील गेल्या वर्षभरात पिरंगुट, लवासा, हिंजेवाडी, ई. नजीकच्या ठिकाणी सायकल चालवून आणली. सुदैवाने कंपनीचे सायकलिंग क्लब असल्याने त्यांच्याबरोबर काही ठिकाणे फिरून झाली. पण नियमित सायकलिंग अजूनही नव्हते. ५०-६० कि.मी. नंतर हवा खतम होत होती.
अखेर (बजेट तयार झाल्यावर) ठरवले कि, हे असे जमणार नाही. स्वतःची सायकल हवी. मग ओळखीच्या सायकल प्रेमींकडून माहिती घेऊन होमवर्क सुरु केले. माझ्यासारख्याच अन्य इच्छुकांना मदत व्हावी म्हणून त्याचाच सारांश खाली मांडत आहे.
१. साईझ
सायकल ची (म्हणजेच फ्रेमची) साईझ हा कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सायकल ची साईझ व आकार समजा तुमच्या शरीराला पूरक नसेल तर भयंकर त्रास होतो. पहिल्याच वेळी सायकल चालवली तेव्हा हे चांगलंच लक्षात आलं. मी घेतलेली सायकल फारच लहान होती. दुकानदार म्हणाला - काही प्रोब्लेम नाही, सीट वरती करून देतो कि झालं. सुरुवातीला काही त्रास झाला नाही पण २०-३० कि मी नंतर गुढघे, हात आणि पाठ हळू हळू दुखायला लागले. सीट वर केली असली तरी हॅंडल ची उंची, सीट आणि हॅंडल मधील अंतर हे शरीराशी अनुकूल नसल्याने सायकल वर बसण्याची आदर्श स्थिती बनत नाही आणि त्रास होतो.
गुगल महाराजांच्या कृपेने या बाबत भरपूर माहिती मिळाली ("cycle frame size" म्हणून सर्च करा). विविध संस्थळावरून हि माहिती मिळते. त्यात अर्थात थोडाफार फरक असतो, पण साधारणपणे काय साईझ साठी चौकशी करावी हे लक्षात येतं. याही पुढे, जर सायकल ची कंपनी व प्रकार (३) नक्की असेल तर त्या कंपनीच्या साईट वर असणाऱ्या मदत पानावरून साईझ नक्की करावी.
उदा. मेरीडा चा फ्रेम साईझ कॅलक्युलेटर
माझी उंची जास्त असल्याने मला किमान २२इंच / ५५ सेमी साईझ ची सायकल लागणार होती. आणि आपल्याकडे साधारणतः २१ इंचाहून अधिक साईझ च्या सायकल मिळत नाहीत. फायरफाॅक्स, माँट्रा ई. देशी सायकल कंपन्या तर १९.५ हून मोठ्या फ्रेम मध्ये सायकल शक्यतो काढत नाहीत. अशा प्रकारे देशी-विदेशी सायकल मध्ये मला अगदी निवडक पर्यायच राहिले.
सायकल साईझ निवडण्याचा देशी उपाय (मोजमापाच्या भानगडीत पडायला नको) - सायकलवर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे उभे राहा
आणि सायकलची वरची दांडी आणि तुमचे सेंटर यामध्ये १ ते २ इंच इतकेच अंतर आहे हे तपासून पहा.
२. बजेट
हा अर्थात दुसरा महत्त्वाचा मुद्दा :) बजेट नक्की करताना सायकलिंगची (अपेक्षित) नियमितता, पायांना कष्ट देण्याची सवय देखील लक्षात घ्यावी. एकदा बजेट नक्की केले कि त्या बजेट च्या साधारण +-१०% किमतीच्या सायकल शोधायला सुरुवात करावी.
३. प्रकार
सर्वसाधारणपणे सायकल चे ४ प्रकार येतात -
रोड (रेस साठी, वापर फक्त चागल्या रस्त्यांवर),
MTB (कुठेही न्या, अगदी पायवाटातूनही पण मजबुतीसाठी अधिक जड, टायर जाड असल्याने कष्ट अधिक),
हायब्रीड (रोड आणि MTB चा संकरीत प्रकार, नेहमीच्या वापरासाठी) आणि
BMX (कसरती करण्यासाठी).
सायकल च्या अपेक्षित वापरानुसार यातील प्रकार निवडावा
४. हब
सायकलच्या चाकाच्या रिम आणि एक्सल मध्ये वंगण आणि बॉल बेअरिंग असते. हा चाकाच्या मध्यभागी जो दंडगोल असतो त्याला हब म्हणतात. याची क़्वालिटी जितकी अधिक तितकी सायकल ची एफिशन्सी जास्त (एक पेडल मारल्यावर अधिक वेळ चाक फिरत राहते). हि क्वालिटी ओळखण्याचा एकमेव उपाय म्हणजे सायकल चालवून बघणे.
५. गिअर
हा आपला आकर्षणाचा मुद्दा. आपल्या इथे मिळणाऱ्या बहुतकरून सगळ्या सायकलींमध्ये शिमनो या कंपनीचे गिअर सेट येतात. सेट म्हणण्याचे कारण कि हा मागील गिअर, पुढील गिअर, त्यांचे डीरेलर्स (निवडलेल्या गिअर वर चेन नेण्याचे काम करतात) आणि शिफ्टर्स (हातात असलेले गिअर बदलण्याचे उपकरण) यांचा संच असतो.
डीरेलर्स मध्ये शक्यतो टर्नी(स्वस्त) -> अल्तस -> अॅसेरा -> अॅलीवियो -> ड्योरे (महाग) हे प्रकार येतात. अर्थात किमती बरोबर त्याची गुणवत्ता सुधारत जाते.
लक्षात ठेवा कि सायकल मध्ये २ डीरेलर्स असतात - पुढचा आणि मागचा.
शिफ्टर्स हे रोटेटिंग टाइप चे शक्यतो घेऊ नयेत (कष्ट अधिक).
६. स्प्रिंग / सस्पेन्शन
सस्पेन्शन हे अर्थात सायकलस्वाराला तसेच फ्रेम आणि रिमना रस्त्यातील खड्ड्यांमुळे कमीत कमी धक्के बसावेत यासाठी असते. सस्पेन्शन मुळे सायकलिंग ची एफिशन्सी कमी होते. यामुळेच रेसिंग ला वापरल्या जाणाऱ्या रोड सायकल मध्ये कोणतेही सस्पेन्शन नसते.
सायकल मध्ये २ ठिकाणी सस्पेन्शन असू शकतात - एक म्हणजे फ्रेम खाली स्प्रिंग आणि दुसरा म्हणजे पुढील चाकाच्या बेचाक्याला सस्पेन्शन.
यातील फ्रेम मधील सस्पेन्शन टाळावे, कारण याच्यामुळे सायकलचे वजन वाढते आणि बहुतकरून २-३ वर्षात खराब होते.
काही सायकल मध्ये पुढील चाकाचे सस्पेन्शन हे सुरु-बंद करण्यासाठी कळ असते. हि असल्यास उत्तम - कारण रस्ता माहित असेल तर सस्पेन्शन बंद करून एफिशन्सी वाढवता येते.
७. ब्रेक
V ब्रेक अथवा डिस्क ब्रेक असे दोन पर्याय असतात. पाणी / चिखल यामुळे V ब्रेक चे घर्षण कमी होते, अशा वेळी डिस्क ब्रेक असतील तर नक्कीच फायदा होऊ शकतो. पावसा-चिखलात सायकलिंग करायचे असेल तर डिस्क ब्रेक असलेली सायकल निवडावी.
८. उपकरणे
मुख्य सायकल सोडून पूरक उपकरणे उदा. हेल्मेट, दिवे, हवेचा पंप, मडगार्ड, सायकलिंग चा ड्रेस, कुलूप ई. याचे एकूण बजेट ३००० पर्यंत जातेच. खिशाला झेपेल त्याप्रमाणे हि उपकरणे नंतरही घेता येऊ शकतात.
हे मुद्दे लक्षात घेऊन, ८-१० दुकाने फिरून अखेर गेल्या महिन्यात आमची नवी सायकल आली - ऑथर क्लासिक
खडकवासला
हायब्रीड सायकल, २२ इंच फ्रेम, २४ गिअर्स (शिमानो अॅसेरा), लॉकेबल फ्रंट सस्पेन्शन.
सायकल आल्यावर सुरुवातीला आठवड्यातून १-२ दिवस आणि आता आठवड्यातून ४ दिवस ऑफिस चा प्रवास सायकल ने चालू आहे. शिवाय विकांताला "कोकणच्या" लक्ष्यासाठी सराव म्हणून भटकंती आहेच.
थेऊर भटकंती ला गेलेलो मी, केदार आणि किरण
प्रतिक्रिया
12 Jan 2016 - 7:42 pm | आदूबाळ
सायकल निवडताना सायकलचं वजन हा एक घटक असतो का? हलकी तितकी उत्तम असा काही थंबरूल आहे का?
12 Jan 2016 - 7:49 pm | sagarpdy
अर्थात. कितीही झालं तरी सायकलचं इंजिन आपण स्वतः असतो. सायकल चालवताना स्वतःच्या वजनाबरोबर बरोबर सायकलच वजनही हकावं लागतं. त्यामुळे जितकी वजनाने हलकी तितकी उत्तम.
12 Jan 2016 - 7:46 pm | मोदक
मोदक दादा??
भेट रे एकदा.. बघतो तुझ्याकडे.
12 Jan 2016 - 7:50 pm | sagarpdy
ट्रीप ठरवा, भेटतो :P
12 Jan 2016 - 7:59 pm | मोदक
सांगतो.
बाकी सायकलचे व्यसन वाढते आहे हे वाचून भारी वाटले आहे.
अभिनंदन..!!!!!
12 Jan 2016 - 8:09 pm | एस
उत्तम माहिती!
12 Jan 2016 - 8:25 pm | कंजूस
असा एखादा लेख मराठीत असण्याची भारी गरज होती..धन्यवाद.
तुमच्या सायकलला २४ गिअर्स आहेत.आता हे मोजून सांगा-
सायकलचे पेडल पुर्ण एकदा फिरवल्यावर चाक रस्त्यार किती फुट-इंच पुढे जाते? १/८/१६ आणि २४.
12 Jan 2016 - 8:26 pm | कंजूस
१/८/१६ आणि २४ वा गिअर वापरून?
13 Jan 2016 - 9:37 am | sagarpdy
२१/२४/२७ गिअर हि फक्त बोलण्याची गोष्ट आहे (हवा करण्यासाठी).
२४ = ३ (पुढचे) x ८(मागचे)
पुढील व मागील गिअर ची एकूण २४ कॉम्बिनेशन शक्य आहेत एवढेच. प्रत्यक्षात यातील प्रत्येक कॉम्बिनेशन वापरता येत नाही (वापरू नये). गिअर वापरणे हा तर वेगळ्या लेखासाठी विषय होऊ शकतो.
राहिला प्रश्न गणिताचा - केलेले नाही, एवढ्यात करणारही नाही. कारण त्याचा प्रत्यक्ष वापर फार नाही (रेस मध्ये जात नाही तोवर).
13 Jan 2016 - 11:06 am | मोदक
प्रत्यक्षात यातील प्रत्येक कॉम्बिनेशन वापरता येत नाही (वापरू नये)
चूक.
प्रत्येक कॉम्बीनेशन वापरता येते आणि जरूर वापरावे. चढ, उतार आणि सपाट रस्त्याला पूरक असेल तो गिअर वापरावा.
गिअरबद्दल एक लेख लिहायचा विचार आहे. सवड झाली की नक्की लिहितो.
13 Jan 2016 - 11:34 am | तुषार काळभोर
हे जाणून घ्यायची लई दिसांची विच्छा आहे..
13 Jan 2016 - 11:57 am | sagarpdy
वापरू नये उदा. समोरील सर्वात मोठा आणि मागील सर्वात लहान तसेच समोरील सर्वात लहान व मागील सर्वात लहान. कारण या केसेस मध्ये चेन अतिशय तिरकी होते, आणि तिचे, डिरेलर्स चे आयुष्य कमी होते (संदर्भ : सायकल चे युजर गाईड).
अर्थात इथे अवांतर नको, गिअर चा वेगळा लेख नक्कीच बरा पडेल.
13 Jan 2016 - 12:05 pm | sagarpdy
मागील सर्वात मोठा
13 Jan 2016 - 2:05 pm | मोदक
ओके. या पद्धतीने बरोबर आहे. मात्र गिअर्स वापरता येतच नाही असे नाही.
..तसेही सवय झाल्यानंतर आपण एका ठरावीक गिअरसेटच्या कॉम्बिनेशनमध्ये सेट होत जातो. त्यामुळे २४ च्या २४ गिअर्स एकाच राईडमध्ये वापरले जातीलच याची शक्यता कमी होत जाते.
13 Jan 2016 - 2:07 pm | शैलेन्द्र
Correct,
One shd not use all combinations,
Thumb rule is
In MTB/Hybrids
Front 1 rear 1-2-3
Front 2 rear 3-4-5
Front 3 rear 5-6-7
In roadbikes
Front 1 rear 1 to 5/6
Front 2 rear 4 to 9/10
15 Jan 2016 - 11:50 pm | एस
गिअर कशा पद्धतीने बदलत जावेत (क्रमाने) तेही कृपया लिहा.
19 Jan 2016 - 11:13 am | शैलेन्द्र
Sorry for typing in english again,
Generally start with F 2 R 4 on MTB or Hybrid bike, get your legs rolling for 3-4 minute, then shift to F 2 R 5 if road is flat and you are in city. If you are outside city,on open road, go to F 3 R 5.
There is no fix rule as which gear to be used when, It depends on strength of your legs and cadence. Idea is you should never change your cadence, and adjust gears accordingly. like when you are on slop, due to ease in rolling, your cadence will go up, then you should drive at higher gear to gain maximum benefit and speed, whereas on climb, if you ride at normal gear, your cadence will be low due to resistance, so you should come down to lower gear which will ease pressure on your knees and keep your cadence constant.
hope this will help. Thanks
19 Jan 2016 - 11:59 am | sagarpdy
एकदम सही. आं जा वर हीच माहिती मिळाली. मिनिटाला ८० ते ९० पेडल्स मारता येतील असा गिअर असावा. (मिनिटाला पेडल मारण्याच्या दरालाच केडन्स म्हणतात). यामुळे गुडघ्यावर कमीत कमी ताण येतो.
19 Jan 2016 - 12:00 pm | एस
धन्यवाद!
19 Jan 2016 - 2:57 pm | मोदक
+११११
धन्यवाद.
19 Jan 2016 - 1:37 pm | तुषार काळभोर
एकदम व्यावहारिक माहिती!
19 Jan 2016 - 5:35 pm | शैलेन्द्र
अजून एक महत्वाची गोष्ट, जिचा संबंध योग्य गिअरशी आहे ती म्हणजे गिअर रेशिओ..
पेडलच्या आतून चेन ज्या गोल चकतीवरून फिरते त्याला क्रँक म्हणतात आणि मागच्या चाकाला चेन ज्या फ्री व्हील वर फिरवते त्याला कॅसेट म्हणतात. हे वेगवेगळ्या दात्यांचे (ज्यात चेन अडकते) असतात, अन त्यानुसार त्यांचे प्रकार ठरतात. क्रँकमध्ये दाते जितके जास्त तितका वेग जास्त आणि श्रमही जास्त. कॅसेटमध्ये अगदी उलट, जितके दाते जास्त तितके श्रम कमी आणि वेगही कमी,
साधारण क्रँकचे प्रकार(दात्यांच्या संख्येनुसार)
MTB
42-32-24
हायब्रीड-रोड
24-34-50 किंवा 34-50
कॅसेट
MTB हायब्रीड
गियर संख्येनुसार
11-28 ते 11-34
रोड
11-25 किंवा 12-26
13 Jan 2016 - 11:32 am | अप्पा जोगळेकर
२१/२४/२७ गिअर हि फक्त बोलण्याची गोष्ट आहे
शिफ़्टर, रिअर डीरेलर, फ़्रंट डीरेलर या संज्ञा आणि त्यांचे कार्य नीट समजावून घ्यावे. हवेचा अवरोध, केडन्स इत्यादि गोष्टी माहित करून घ्याव्यात. थोडक्यात 'अभ्यासोनि प्रकटावे' असे नम्रपणे सांगू इच्छितो.
बाकी मोदक दादांच्या गिअर विषयक लेखाची वाट पाहतो आहे.
मराठीत सायकलविषयी असे तांत्रिक लिखाण जवळपास शून्य आहे.
फक्त मायबोलीवर आशुचांप नावाच्या सदस्याने असे लिखाण केले आहे. तेदेखील अगदी प्राथमिक.
त्यामुळे मोदक दादांनी लेख लिहावाच अशी आग्रहाची विनंती.
12 Jan 2016 - 9:02 pm | पिंगू
भारी. क्लबात स्वागत..
12 Jan 2016 - 9:22 pm | अरिंजय
सागर, सही. धन्यवाद.
12 Jan 2016 - 9:59 pm | चतुरंग
नवीन सायकलसाठी अभिनंदन आणि पुढील अनेक मोहिमांसाठी शुभेच्छा! :)
मी देखील नवीन सायकल घेणार आहे परंतु येत्या उन्हाळ्यात.
(किंचित अवांतर - सध्या उणे तपमानाने सायकलिंग बंद झाले आहे. माझा म्यानीजर उणे -५ अंश सेल्सिअसमध्ये अजूनही सायकलवर येतो. हॅट्स ऑफ बाबा त्याच्या डेडीकेशनला! कमी तपमानातले सायक्लिंग हा एक मोठा विषय आहे...)
12 Jan 2016 - 10:06 pm | मित्रहो
मराठित ही माहिती हवी होतीच छान लेख
13 Jan 2016 - 10:35 am | बाबा योगिराज
सायकल साठी अभिनंदन. अजून ही माहिती पूर्ण लेख येऊ द्या.
एक प्रश्न:- जर ६ फुट उंच व्यक्ति असेल तर फ्रेम साईझ काय असावी? (चाके मझ्या मते २९ इंची असावी, बरोबर आहे काय?)
13 Jan 2016 - 11:16 am | sagarpdy
फ्रेम ची साईझ सायकल च्या प्रकाराप्रमाणे पण बदलते. लेखात दिलेला उंची आणि फ्रेम साईझ चा तक्ता पहिला तर लक्षात येईल कि समान उंचीसाठी रोड सायकल आणि MTB यांच्या फ्रेम साईज मध्ये फरक आहे. ६ फुट उंच व्यक्तीसाठी रोड बाईक ५७-५८ सेमी (~२३ इंच) तर MTB २० ते २१ इंच योग्य आहे. हायब्रीड ची साईझ या दोघांच्या शक्यतो मध्ये निघत असल्याचे दिसते (माझी उंची ६'२" आणि सायकल फ्रेम २२ इंच आहे).
चाकांच्या मापाचा तसा उंचीशी थेट संबंध नाही. पण उंची जास्त -> फ्रेम मोठी आणि फ्रेम मोठी तर चाके मोठी असा संबंध लागतो.
13 Jan 2016 - 11:27 am | बाबा योगिराज
माहिती बद्दल धन्यवाद.
13 Jan 2016 - 10:42 am | लॉरी टांगटूंगकर
एक्क नंबर. कोंकण भटकंतीच्या लेखाच्या प्रतीक्षेत .....
13 Jan 2016 - 11:28 am | बाबा योगिराज
मन्द्या भौ ला अनुमोदन.
13 Jan 2016 - 11:19 am | अप्पा जोगळेकर
सायकलींग हा मोदक (दादा ?) चा धागा वाचल्यापासून अनेकांचे सायकलचे व्यसन वाढले आहे.
सायकल प्रेमींसाठी हे
"http://212.50.14.233/Knowledge/Sport,%20Food%20%26%20Drink/Bicycle%20Rep..." बाईक रिपेअर मेन्युअल फारच उपयोगी आहे.
असे एखादे मेन्युअल मराठीत बनवण्याची इच्छा आहे.
पण सध्यातरी सायकल चालवणे आणि मेंटेननस शिकणे यातच वेळ जातो आहे.
13 Jan 2016 - 1:42 pm | sagarpdy
धन्स!
13 Jan 2016 - 2:02 pm | मोदक
सध्यातरी सायकल चालवणे आणि मेंटेननस शिकणे यातच वेळ जातो आहे.
झक्कास. हात काळे करायला काहीही कमीपणा वाटून घेवू नका.
मी सायकल राईडला गेल्यावर, एखादा हौशी सायकलवाला रस्त्याकडेला थांबून सायकल सोबत काही खुडबूड करताना दिसला तरी बिन्धास्त "मदत हवी आहे का..?" असे विचारतो.
शिकत रहा..!!
13 Jan 2016 - 11:41 am | पिलीयन रायडर
मी "मोदक दादा"लाच हसत बसलेय.. संपलं की येते...!!
गंमत राहु दे.. खरंच छान लेख आहे. गिअर्स बदल पण येऊ द्यात..
मोदक दादा आहेच मदतीला!!!
13 Jan 2016 - 1:46 pm | मोदक
ओ काकू... आता काय बाजार उठवता काय आमचा?
13 Jan 2016 - 3:16 pm | sagarpdy
तरी ऐतिहासिक "मादक" च्या जवळपास देखील नाही हे ! :P
13 Jan 2016 - 11:53 am | कंजूस
सायकल न चालवणारा परंतू गणित ( आणि विज्ञान ) येत असेल तर ते गिअर प्रकरण सहज समजावता येते.अशा उदाहरणांत उत्तर माहिती असते फक्त ते कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे काढता येते ते दाखवायचे असते.थोड्या वेळाने लिहितो.
13 Jan 2016 - 1:27 pm | राजेंद्र मेहेंदळे
<<<सीट वर केली असली तरी हॅंडल ची उंची, सीट आणि हॅंडल मधील अंतर हे शरीराशी अनुकूल नसल्याने सायकल वर बसण्याची आदर्श स्थिती बनत नाही आणि त्रास होतो.>>>
हे पटले मला.मी २ महिन्यापुर्वी ही सायकल घेतली आहे.
http://www.suncrossbikes.com/bike_detail.php?bikeId=212&BikeCatId=2&Bran...
माझी उन्ची ५-८" आहे. पण कधी कधी वर म्हटल्याप्रमाणे त्रास जाणवतो. काय करता येइल? मी हँडलची उंची वाढवायचा विचार करतोय.
13 Jan 2016 - 2:50 pm | sagarpdy
नक्की सांगता येणार नाही. तितका अभ्यास नाही. पण जायंट कंपनीच्या शोरूम ला गेलो होतो त्यावेळी याबाबत थोडी माहिती मिळाली, जाणकारांनी दुरुस्त करावी.
जायंट च्या शोरूम मध्ये माझ्या उंचीची सायकल स्टोक मध्ये नव्हती. आणि नवीन स्टोक यायला २-३ महिने जाणार होते. उपलब्ध सायकल माझ्या गरजेपेक्षा १ साईझ ने कमी होती. २१ इंच. तर तेथील एका सेल्समन ने पुढील उपाय सुचवले.
१. उंचीला अधीक पूरक स्टेम (हँडल) लावायचे
२. सीट वर-खाली करण्यासोबत मागे-पुढे करण्यासाठी देखील सेटिंग येते. ती एकदम मागे करावी. सोबत सीटचा कोन देखील बदलता येऊ शकतो.
३. सायकल वापरायची पद्धत (posture ) बदलावी.
अधिक माहिती : http://www.bicycling.com/maintenance/bike-fit/fine-tune-your-bike-fit
(बाईक फिटिंग हा गिअर प्रमाणेच लेखाचा स्वतंत्र विषय होऊ शकेल)
13 Jan 2016 - 3:48 pm | शैलेन्द्र
नक्की काय त्रास जाणवतोय
13 Jan 2016 - 6:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
जास्त अंतर चालवताना सीट उंच असेल आणि हॅन्डल खाली असेल तर समोरचे बघायला मान वर करावी लागते आणि दुखु लागते. नंतर कंबरही दुखु लागते, मग हात सोडुन सायकल चालवतो :)
13 Jan 2016 - 2:11 pm | शैलेन्द्र
"V ब्रेक अथवा डिस्क ब्रेक असे दोन पर्याय असतात. पाणी / चिखल यामुळे V ब्रेक चे घर्षण कमी होते, अशा वेळी डिस्क ब्रेक असतील तर नक्कीच फायदा होऊ शकतो. पावसा-चिखलात सायकलिंग करायचे असेल तर डिस्क ब्रेक असलेली सायकल निवडावी."
Another benefit of Disk brake is if ur rim is slightly out, V brake can be a headache, as it touches rim every time. If u loosen it, it will not be effective. But then Disc brakes make cycle heavy and costly.
The best are the kind of brakes available on road bike, very effective and light, easy to maintain.
13 Jan 2016 - 2:58 pm | कपिलमुनी
वापरत असलेल्या सायकलींच वजन किती आहे ?
येथे कोणी कार्बन फ्रेमच्या सायकल्स वापरतात का ?
13 Jan 2016 - 2:59 pm | कपिलमुनी
कार्बन फायबर असे वाचावे
13 Jan 2016 - 3:36 pm | शैलेन्द्र
।माझ्याकडे या सेगमेंटमधल्या 3 सायकल आहेत
Scott aspect 60 वजन 14-15 किलो
GT converted Hybrid वजन 11-12 किलो
Scott 30 roadbike वजन 9 10 किलो
शिवाय एक चायनीज कार्बन फ्रेम आहे, जी अजून बांधायचीय.
पण खरं सांगायचं तर कमी वजन म्हणजे फार फरक पडतो असं नाही. तुमची ताकद,अँगल, तंत्र, हवेचा अवरोध, टायरचा प्रकार हे जास्त महत्वाचे
13 Jan 2016 - 3:38 pm | कपिलमुनी
भारीये !
13 Jan 2016 - 3:45 pm | मोदक
सायकलच्या वजनावर आधारित एक झकास व्यंगचित्र बघितले होते. नेमके आत्ता सापडत नाहीये.
13 Jan 2016 - 3:37 pm | किरण कुमार
आपली थेऊर राईडपण मस्त झाली आता हळूहळू जास्त अंतराच्या आणि घाटाघाटाच्या राईड्सपण करु.
13 Jan 2016 - 4:16 pm | sagarpdy
येस्स, नक्कीच !
13 Jan 2016 - 10:08 pm | प्रशांत
अतिशय उपोयागी माहिती.
५० किमि पेक्षा जास्त सायकल चालवायची असल्यास काय करावे?
अवांतारः मी सायकल घेतली तेव्हा साक्षात मोदकदादा लाच घेवुन गेलो होतो म्हणुन जास्त गुगलले नव्हते.
14 Jan 2016 - 9:45 am | sagarpdy
नियमित सराव.
14 Jan 2016 - 10:04 pm | चतुरंग
नसेल तर १० किमि चे राउंड्स घेत जाणे म्हणजे समजा चार राउंडनंतर फारच थकल्यासारखे झाले तरी घरापासून फार लांब नसतो.
एकदा तो कॉन्फिडन्स आला की मग जवळपासचे पल्ले गाठावेत. सोबत पिण्याचे भरपूर पाणी हवेच, डीहायड्रेशन झाले की थकवा झपाट्याने शक्ती कमी करतो आणि मसल क्रँप्स तुम्हाला जखडून टाकतात.
14 Jan 2016 - 6:03 pm | मार्गी
अरे वा! उत्तम लेख!! तुमच्या सायकलिंगला शुभेच्छा! सर्वांना हॅपी सायकलिंग! माझ्या उल्लेखाबद्दल धन्यवाद! :)
15 Jan 2016 - 11:47 am | ससन्दीप
नववर्षाच्या मुहुर्तावर मी श्नेल कूप ४ ही एमटीबी प्रकारातील बाइक घेतली.
सायकलच्या जागी १६ हजारात एखादा चांगला मोबाइल येऊ शकला असता असे प्रबोधन बिल्डींगमधल्या माझ्या गुजराती-मारवाडी मित्रांनी केले.
15 Jan 2016 - 11:58 am | sagarpdy
अभिनंदन आणि प्रबोधनासाठी लोल.
15 Jan 2016 - 4:10 pm | शैलेन्द्र
सायकल चालवून आणि फिट राहून त्यांचे प्रबोधन करा.
शुभेच्छा
15 Jan 2016 - 5:57 pm | मोदक
+११११
15 Jan 2016 - 7:34 pm | चतुरंग
सायकलमुळे अख्खे तुम्हीच 'मोबाईल' झालेला आहात त्यामुळे पुढील वाट(चाक)चालीला शुभेच्छा! :)
15 Jan 2016 - 11:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
६ फुट उंच आणि बर्याचं वजनदार व्यक्तीसाठी सायकल कशी निवडावी? फ्रेम साईझ आणि वजन जास्ती असल्याने फ्रेम रिजीडीटी.
16 Jan 2016 - 12:42 am | कपिलमुनी
एॅटलासचा घोडा बरा
16 Jan 2016 - 7:14 am | मोदक
Calling मापं, त्यांच्या सायकलचे टायर पाहून मोटार सायकल पण मान खाली घालते ;)
On a serious note, MTB घे. तुला नक्की आवडेल
19 Jan 2016 - 9:39 am | kulpras
I searched on net for same but didn't find anything on price
19 Jan 2016 - 10:02 am | sagarpdy
मित्रहो यांना कदाचित माहित असावे.
19 Jan 2016 - 10:15 am | मित्रहो
Bike Affairs Kondapur, jubilee hills(above Star buck) : Author, Merida, Bergamont, Fuji, Trek किंमत 25000+
Peddles point Kondapur, Gachibowli: Fantom, Firefox, Giant, Trek किंमत ७००० ते ५००००
Track and Trails Madhapur (pride honda showroom) : Montra, Schwinn, Cannondale, Bianchi
Yellow Jersey Madhapur (YSR Statue): Scott, Firefox, Trek
Decathlon : Btwin
सगळ्यांच्या वेबसाइट आहेत.
19 Jan 2016 - 11:39 am | kulpras
थन्क्स
19 Jan 2016 - 4:13 pm | मोहनराव
उत्तम माहीती दिलीत. मी साधारणपणे आठवड्यातुन २-३ वेळा सायकलनेच ऑफिसला जातो. मस्त वाटते.
सायकल दुरुस्ती काही मोठे प्रकरण नाही. बेसीक रिपेरिंग किट असले की झाले. स्वत: दुरुस्ती करण्यात एक मजाही असते व अडचणीच्या काळी हे कसब छान उपयोगी पडते. आता अनेक लोकांचे अनुभव येउद्यात. मिपा सायकल क्लब काढु ;)
19 Jan 2016 - 7:18 pm | प्रशांत
सायकल चालवण्याच्या आधी आणि नंतर व्यायाम करायला हवा या वद्द्ल आणखी माहिती मिळल्यास उत्तम.
काहि दुवे..
http://home.trainingpeaks.com/blog/article/the-best-strength-exercises-for-cyclists
https://www.britishcycling.org.uk/knowledge/training/off-the-bike/article/izn20130617-Busting-The-Core-Myth-0
http://www.bikeradar.com/commuting/gear/article/core-training-for-cyclists-41207/