या सिझनला लाल माठ, मुळा, नवलकोल अशा पालेभाज्या कोकणात मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. आमच्याही बागेत सासर्यांनी मुळाभाजी पेरलीय छान कोवळी भाजी आता तयार होऊ लागलीय.
मुळ्याची पचडी
साहित्यः मुळ्याच्या जुड्या दोन, अर्धे लिंबू, दोन्/तीन ओल्या मिरच्यांचे तुकडे, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट पाव वाटी, फोडणीचे साहित्य.
कृती: मुळ्याचा कोवळा पाला स्वच्छ धूऊन घ्यावा. यासाठी मुळ्याचा कंद अजिबात नसलेला किंवा अगदी बारीक कंद असलेला पाला वापरावा. हा मुळ्याचा पाला बारीक चिरून घ्यावा. चिरलेल्या पाल्यात चिमुटभर मीठ घालून हाताने चांगला कुस्करून घ्यावा. दोन चमचे तेल तापत ठेवावे. मोहरी घालावी. मोहरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे घालावे. मिरच्या थोड्या तळल्या की गॅस बंद करून हिंग, हळद घालावी. ही फोडणी, दाण्याचे कूट, चवीनुसार चमचाभर साखर पाल्यात मिसळावी. अर्धे लिंबू पिळावे. पचडी नीट एकत्र करून चवीनुसार थोडे मीठ घालावे, आपण आधी पाल्यात मीठ घातले आहे. चवीनुसार लिंबू, साखरेचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. एकदम चविष्ट लागते ही पचडी! याच प्रकारे पालकचीही पचडी होते.
मुळ्याची भाजी
साहित्यः तीन जुड्या मुळा, तेल अर्धी वाटी, लाल तिखट, मीठ, साखर, वड्याची/कडबोळ्याची भाजणी एक वाटी, फोडणीचे साहित्य, दोन कांदे, सात/आठ लसूण पाकळ्या. सुक्या मिरच्या चार/पाच
कृती: मुळ्याचा पाला स्वच्छ धुऊन, बारीक चिरून घ्यावा, कांदे आपल्या आवडीप्रमाणे चिरून घ्यावेत, सात/ आठ लसूण पाकळ्या सोलून घ्याव्या. या भाजीला मेथीच्या भाजीसारखेच तेल सढळ हाताने लागते. बेसनापेक्षा भाजणीने खमंगपणा येतो, भाजणी नसल्यास बेसन वापरण्यास हरकत नाही.
कढईत तेल तापत ठेवावे. मोहरी घालावी. मोहरी तडतडली की चिरलेला कांदा, लसूण घालावे. थोडे परतल्यावर लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. हळद, लाल तिखट घालून परतून घ्यावे. मुळ्याचा चिरलेला पाला फोडणीत घालावा. चांगला परतून झाकण ठेवावे. गॅस मंद ठेवून भाजीला वाफ काढून घ्यावी. दहा मिनिटांनी भाजीला वाफ आली ही चवीनुसार मीठ, साखर घालावी. या भाजीत पाणी अजिबात घालायचे नाही. मीठ, साखर नीट मिसळून घेतल्यावर भाजणी पेरावी. छान परतून झाकण ठेवावे, परत पाच मिनिटे वाफ काढावी. या भाजीला तेल व्यवस्थीत लागते. वाफ आल्यावर भाजी कोरडी वाट्ल्यास वाढण्यापूर्वी वरून फोडणी द्यावी.
याशिवाय नेहमीच्या आमटीलाही मुळ्याच्या पाल्याने मस्त स्वाद येतो.
मुळ्याच्या पाल्याचे मेथीसारखे पराठेही होतात. त्याचा फोटो नाहीय.
प्रतिक्रिया
9 Jan 2016 - 5:21 pm | विवेकपटाईत
मस्त पाककृती माझी आवडती, तोंडाला पाणी सुटले. हिवाळ्यात सौ. सुद्धा कित्येकदा पचडी करते. इथे मुळा आणि त्याचा पाला दोन्ही थोडे गोड असतात. कधी कधी मुळ्याच्या पल्याजागी कोवळी मेथी (दाण्याचा कूट, टमाटर इत्यादी टाकून वरील प्रमाणे करते), मुळा आणि पाल्याची सुकी भाजी हि मस्त लागते. आज गल्लीच्या बाहेर शनी बाजार लागणार आहे. आज संध्याकाळीच पचडी करायला सांगतो. ...
एक शंका तुम्ही विदर्भातल्या आहात का??
9 Jan 2016 - 6:00 pm | अनन्न्या
मी कोकणातली.. रत्नागिरीकर!
9 Jan 2016 - 5:28 pm | अजया
कच्चा मुळा खाता येत नाही पण पाला चालत असावा.पचडी करुन बघते रात्री.सध्या आमच्या इथल्या कातकरणी मुळ्याचे ढिग घेऊन बसतात बाजारात. ताजा बघून घ्यावासा वाटतो.मग हायपोथायराॅइड स्टेटस आठवुन ठेवला जातो!
9 Jan 2016 - 8:39 pm | पैसा
मुळे आमटीत टाकून आवडतात. पाल्याची आमटी विशेष कधी खाल्ली नाही. मुळ्याच्या शेंगा (डिंगर्या) हा एक लै भारी प्रकार.
9 Jan 2016 - 9:41 pm | रेवती
डिंगर्यांची आठवण काढू नकोस गं! इथे मिळत नाहीत.
कोवळ्या डिंगर्या बारीक चिरून त्यात कच्चे तेल, दाण्याचे कूट, मीठ, साखर, मसाला, लिंबू. अश्या पचडीची आठवण येते.
10 Jan 2016 - 3:28 pm | अनन्न्या
मुळ्याच्या शेंगा पण आवडतात.
9 Jan 2016 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पचडीचा अर्थ सांगाल कोणी प्लीज ?
-दिलीप बिरुटे
9 Jan 2016 - 9:36 pm | रेवती
कच्च्या भाजीचे तोंडिलावणे, कोशिंबीर याअर्थी.
9 Jan 2016 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थ्यांक्स...
-दिलीप बिरुटे
9 Jan 2016 - 9:38 pm | रेवती
अनन्या, अत्यंत आवडते पदार्थ सांगितल्याबद्दल आभार. फोटू व कृती अगदीच मस्त. तू अशा पारंपारिक, परसदारी उगवणार्या भाज्यांच्या पाकृ दिल्यास की लगेच करून पाहण्याचा मोह होतो.
10 Jan 2016 - 3:05 am | स्रुजा
+ १
मला मोह झाला पण मुळा नव्हता , पाला फार लांबची गोष्ट. पण मेथी होती, मी याच रेसिपीने मेथीची पचडी केली. पण मेथी किती आळते !! एक अख्खी जुडी आम्हाला दोघांना लागली. मी पहिल्यांदा अर्ध्यापेक्षा कमी घेतली , ती दोन चमचे झाली, मग अजुन तेवढीच घेतली तरी काही फरक फारसा नाहीच . शेवटी अख्खी जुडी सत्कारणी लावली. मजा आली आज जेवणात पचडीने.
9 Jan 2016 - 10:29 pm | पद्मावति
खूप मस्तं पाककृती आणि फोटो.
10 Jan 2016 - 6:09 am | कंजूस
चारही प्रकार करतो.या असल्या भाज्या हॅाटेलात मिळत नाहीत म्हणून विशेष कौतुक.पालेभाजीचे निरनिराळे प्रकार,मिसळ,शेवभाजी यांचे फ्युजन करतो.
#हायपोथायरॅाइड स्टेटस आठवुन ठेवला जातो!"?
हायपोथायरॅाइड काय भानगड आहे मुळ्याविषयी?
10 Jan 2016 - 6:44 am | स्रुजा
ह्म्म. मी पण आत्ता वाचला अजया ताईचा प्रतिसाद. आंजावर उचकपाचक केल्यावर हे सापडलं. मुळ्याने हाय्पोथायरॉईड वाढु शकतो.
10 Jan 2016 - 10:51 am | अजया
:(
10 Jan 2016 - 2:14 pm | दिपक.कुवेत
त्यातल्या त्यात पचडी जास्त. आम्ही त्यात बारीक चीरलेला कांदा घालतो. फोटो बघून भुक चाळवली आहे.
10 Jan 2016 - 2:22 pm | पियुशा
मस्त !
10 Jan 2016 - 2:57 pm | कुसुमिता१
आजच करुन बघीतली मुळ्याची पचडी ..एक्दम मस्त लागते!
10 Jan 2016 - 3:26 pm | अनन्न्या
मला हायपोथायरॉईडबद्दल माहित नव्हते.
10 Jan 2016 - 8:25 pm | हेमंत लाटकर
मला मुळ्याच्या शेंगाची भाजी फार आवडते. आई करते. बायकोला आवडत नाही. आई आध्रांतील असल्यामुळे सांबारमध्ये मुळा, दुधी यांच्या फोडी टाकते.
11 Jan 2016 - 4:05 pm | पूर्वाविवेक
वा मस्त ! सगले प्रकार नविन आहेत मला. करुन पहावेच लागतिल. :)
11 Jan 2016 - 4:10 pm | पिलीयन रायडर
मुळा फारसा आवडत नाही म्हणुन आणलाही जात नाही. पण आता सगळे एवढी तारीफ करत आहेत तर करुन पहायला हवा.
फारशा माहिती नसलेल्या पाकृ आवडल्या!
11 Jan 2016 - 4:42 pm | नूतन सावंत
अनऩउप,झकास पाककृती.मुळा आणि पाला यांची एकत्र कोशिंबीरही सही लागते.ओली मिरची,खोबरे.कांदा घालून.
11 Jan 2016 - 4:44 pm | नूतन सावंत
अनन्या असे वाच.