रतनगड कातळभिंत चढाई - २०१५
कात्राबाई, कळसुबाई, घनचक्कर वगैरे डोंगररांगांनी आपल्या कुशीत सांभाळलेलं अपत्य म्हणजे दुर्गरत्न 'रतनगड'. एका टोकावरून 'आजा' ही त्याजवर आपली कृपादृष्टी ठेऊन उभा आहे. रतनगड ते हरिश्चंद्रगड जाणाऱ्या यात्रेकरुंमुळे अधिकचे वलय या गडाला लाभले आहे. अशा या वलयांकीत गडाला सध्या मानवी अवकृपेने ग्रासले आहे. राबता वाढल्याने गडावर जागोजागी मलविसर्जन केले जाते, अगदी कालपरवापर्यंत आम्हीही त्यातलेच होतो. लोकांनी पाण्याचे टाके सुद्धा सोडलेले नाही. मुंबई-पुण्याची काही जाणती मंडळी सोडल्यास ट्रेकर्सनी गावातली हागणदारी गडावर आणली आहे. तेंव्हा सर्व ट्रेकर्सना एक विनंती आहे कि त्यांनी मलमुत्राची विल्हेवाट लावण्याचीही जबाबदारी घ्यावी. आपल्यासोबत एखादी अणुकूचीदार वस्तू ठेवावी, जेणेकरून खड्डा करून त्यात आपल पुण्यसंचित डाऊनलोड करता येईल आणि त्यावर परत माती ढकलून आम्ही त्या गावचेच नाही असा पवित्राही घेता येईल :-). असो आता पुढे….
कित्येक वर्ष रतनगडावर जाण्याचा कार्यक्रम रखडतच होता. ट्रेकर्स मित्रांबरोबर भटकताना 'तुम्ही रतनगडाच्या कातळभिंतीवर आरोहण कधी करणार' अशी विचारणाही होत होती. फेब्रुवारीमध्ये एके दिवशी अचानक किरणकाकांनी रतनगडावर स्वारी करण्याचा मानस बोलून दाखवला. आम्ही तर टुणकन उडीच मारली. लगोलग मार्चमध्ये रतनगडाच्या कातळभिंतीची रेखी (अभ्यास) करण्यासाठी किरणकाका, वासुदेव, मनीष आणि मी असे चौघेजण आजोबाच्या पायथ्याशी वसलेल्या डेहणे गावात दाखल झालो. दूरवर रतनगड आणि त्याच्या विरुद्ध दिशेस असणारी कात्राबाई यांच्या पायथ्याशी दरीच्या अगदी टोकाला जायचे होते.
ग्रीष्माचा रुक्ष उन्हाळा असल्यामुळे सर्व डोंगररांगांनी आपले हिरवे कपडे फेकून दिले होते. त्या निष्पर्ण झाडांकडे पाहताना ब्राझीलच्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावरील ललना तर इथे पहुडलेल्या नाहीत ना असा विचार क्षणभर मनात चमकून गेला. मी तो विचार सोबतच्या मंडळीबरोबर बोलून दाखवला तर ते माझ्याकडे, ‘मी डोक्यावर पडलेलो तर नाही ना’ अशा अविर्भावात पाहायला लागले आणि सल्लाही दिला कि टीवी-सिनेमे पाहणे कमी कर नाहीतर उद्या लिरिल गर्ल कात्राबाईच्या खाली धबधब्यात आंघोळ करताना दिसतेय म्हणून आ वासून पाहत राहशील आणि दोर सोडून खाली दरीत उडी मारायचास. असो!
कदाचित एक रात्र दरीतच काढावी लागणार असल्यामुळे गावात पाण्याची चौकशी केली. साधारण डिसेंबर-जानेवारी पर्यंत डोंगरांमध्ये पाणी सापडते पण त्यानंतर उन्हाळ्याची झळ वाढत जाऊन पाण्याची मारामार होऊन जाते. संपूर्ण वाट काळू नदीच्या पात्रातूनच असल्याने पाणी मिळण्याची शक्यता होती. पण गावकऱ्यांनी अर्ध्या वाटेपर्यंत पाणी असल्याचे सांगितले. आम्हीही पाण्यासाठी तयारी करूनच आलो होतो. जवळपास चाळीस लिटर पाणी डेहणेच्या पुढे असलेल्या चिंचपाडा गावातच भरून घेतले आणि सूर्याला शिव्यांचे अर्ध्यदान करून वाटेला लागलो. कात्राबाईची एक धार खालच्या दिशेने उतरते जिला स्थानिक गावकरी चिंधीची धार म्हणतात, बारा वाजेपर्यंत तेथपर्यंत पोहोचलो. इथपर्यंत वाट नदीपात्राच्या कडेकडेने जाते, पुढे नदिपात्रातल्या मोठमोठ्या दगडधोंड्यांवरून मर्कटलीला करीत वाटचाल करावी लागणार होती.
या धारेखाली पाणी होते. स्थानिक गावकरी त्याला उंबराचे पाणी म्हणतात. हेच शेवटचे पाणी, इथून पुढे पाणी सापडले तर नशीब समजायचे अस गावकरी म्हणाले. आम्ही पाठीवर चाळीस लिटर वाहून आणलेच होते, त्यामुळे चिंता नव्हती. अद्यापही आम्ही अर्ध्या वाटेवरच होतो. येथपर्यंत आमच्याबरोबर १५-२० गावकरी सोबत होते. त्यांची आणि आमची वाट आता वाकडी होणार होती कारण आज त्यांना रानडुकरांची पारध करायची होती. गावकरी आपल्या वाटेने निघून गेले आणि आम्ही नदीपात्रातून चालू लागलो. सुरुवातीला कडेकडेने चालताना सावली होती पण आता नदीपात्रातून चालताना घामाच्या धारा वाहायला सुरुवात झाली होती. त्यातल्यात्यात मोहाच्या फुलांचा दरवळ सगळीकडे पसरलेला असल्याने वातावरणात मस्त धुंदी होती. काही फुल तोंडात टाकली, मस्त गोड स्वाद होता. सगळेच ती फुल खाण्यात मग्न झाले, एव्हढ्यात 'पावट्यानो, आता चखना पण काढून देऊ का?' असा प्रश्न कानावर येऊन आदळला. सहज तोंडातून शब्द बाहेर पडले, "हो, द्या आणि सोबत बिल पण द्या, आम्हाला लवकर निघायचं आहे!" :-) किरणकाकांकडून परत दोन-चार ओव्या ऐकून वाटेला लागलो.
तासाभराच्या वाटचालीनंतर सूर्यदेव अचानक कुठेतरी दडी मारून बसले आणि वर आकाशात काळे ढग गोळा व्हायला सुरुवात झाली, “च्यायला मार्चमध्ये हे काय नवीन!” दरीच्या शेवटी पोहोचेपर्यंत धडामधूमचा जयघोष सुरु झाला. त्यात आम्ही दरीच्या आत असल्याने तिन्ही बाजूंच्या उंच डोंगरावर उमटणारा प्रतिध्वनी कितीतरी वेळ घुमत राहायचा आणि आमची घाबरगुंडी उडून जायची. कुठेतरी दरडी कोसळल्याचाही आवाज येत होता. एव्हढा वेळ त्या उंच डोंगररांगेच्या भव्यतेची प्रशंसा करीत होतो आणि आता त्याचीच भीती वाटायला लागली. एक तंबू आणला होता पण तो लावण्यासाठी सपाट जागाच नव्हती.
अद्याप पाऊस सुरु झाला नव्हता. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ज्या कातळभिंतीचा अभ्यास करण्यासाठी आलो होतो तेथपर्यंत पोहोचलो होतो. घाईघाईत रतनगडाच्या भिंतीचा अभ्यास केला, पण आम्ही अगदीच पायथ्याला असल्याने संपूर्ण अंदाज येत नव्हता. अभ्यास अर्धवट टाकून रात्रीच्या निवाऱ्याची सोय करण्याकरीता जागेची शोधाशोध सुरु झाली, त्यात पावसाने थेब-थेंब शिडकावा करून आम्हाला घाबरवून टाकले होते. नदी पात्रातच एके ठिकाणी उंचवट्यावर तंबू जेमतेम राहील एव्हढा सपाट दगड दिसला, त्यावरच तंबू उघडून लावला. रात्रीच्या जेवणाकरिता पिशव्या उघडल्यावर तांदूळ आणलेच नसल्याचे लक्षात आले. ठीक आहे, बटाटे तर होते. बटाट्याचीच भाजी खाऊन मनाने तृप्तीची ढेकर दिली.
अभ्यासदौरा तर अर्धवट झाला होता, त्यामुळे पुन्हा मे मध्ये, खाली दरीमध्ये न येता थेट रतनवाडी वरून रतनगड गाठला. रतनगड आणि कात्राबाई यांच्या खिंडीत एकमेव मोकळी जागा दिसली, बेसकॅम्पसाठी अगदी योग्यच आणि मुख्य म्हणजे ज्या कातळभिंतीवर चढाई करणार होतो ती अगदीच मागे २०-२५ मिनिटांवर होती. इथे बेसकॅम्प टाकणे खूपच सोयीचे होते, एकतर आम्ही या कातळभिंतीच्या बरोबर मध्यावर होतो. म्हणजे या भिंतीवर चढाईसाठी दोन टिम तयार करू शकत होतो. एक टिम दरीमध्ये उतरून पायथ्याकडून वर-वर येईल आणि दुसरी टिम मध्यातून सुरुवात करून माथ्यापर्यंत जाईल. योजना तर कागदावर मस्त उतरली होती.
१४ नोव्हेंबर २०१५ ला भाऊबिजेचे औक्षण स्विकारून मध्यरात्री २ वाजता डोंबिवलीहून रतनवाडीकडे प्रयाण केले. एकूण चौदाजण असलो तरी पाठपिशव्या मात्र २० होत्या. सकाळी आठ वाजता रतनवाडीत उतरल्यावर थोडी घासाघीस केल्यावर पाच गावकरी अतिरिक्त सामान वाहून नेण्यास तयार झाले. याचवर्षी रतनवाडी मध्ये रस्त्याला लागुनच एक नवीन बंधारा आणि त्यापुढे एक छोटे धरण बांधण्यात आले असल्याने गावातून गडाकडे जाणारी वाट पाण्याखाली आली आहे. नवीन वाट डाव्या बाजूने बंधाऱ्याच्या कडेकडेने जाते. पुढे बंधारा ओलांडून धरणाच्या उजव्या बाजूने पाण्याच्या कडेकडेने जाऊन जिथे चढ सुरु होतो तिथे मूळ वाटेला परत भेटते. अंगावर भार नसल्यास रतनवाडीतून गडावर जाण्यासाठी २ तास पुरेसे आहेत, आमच्याकडे वजनी सामान खूप असल्याने जवळपास दुपारी बारा वाजता रतनगडवरून हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या वाटेवर येऊन पोहोचलो. येथून समोरचा उभा चढ रतनगडावर जातो (गणेश दरवाजा). पण आम्हाला गडावर जायचे नसल्याने हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या वाटेला लागलो. पंधरा मिनिटातच आमच्या नियोजित म्हणजेच कात्राबाई आणि रतनगड यामधील खिंडीत पोहोचलो.
बेसकॅम्पसाठी हि एकमेव मोकळी जागा होती, पाणीही अगदी हाकेच्या अंतरावरच पण मुबलक सापडले. पहिला दिवस बेसकॅम्पसाठी जागा तयार करण्यातच गेला. सामान लावताना लक्षात आले कि टूलकीट घरीच राहिले आहे. बोल्टमध्ये टाकण्यासाठी लागणारी पाचर बनविण्यासाठी टूलकीट जरुरीचे होते. बरीच फोनाफोनी केल्यावर दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने किशोर ती टूलकीट घेऊन रतनवाडीत येण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवशी आलेल्या १४ जणांपैकी ८ जण परत आपल्या घरट्यात निघून गेले, उरलो फक्त ६ जण. सगळ्यांनाच एकत्र सुट्टी मिळणे दुरापस्तच, त्यात ऑफिसमधून सुट्टी मिळाली तरी घरून सुट्टी मिळेलच याची शाश्वती नाही. सन्नीला ऑफिसमधून तर सुट्टी मिळाली पण घरातून नकार देण्यात आला. बिच्चारा!
रतनगड कातळभिंत- हि भिंत म्हणजे रतनगडावरील गणेश दरवाजाचा जो बुरुज आहे त्याची दरीकडील बाजू. हि बाजू कात्राबाईच्या अगदी समोरच आहे. यातील सर्वात वरील अवघड टप्पा जवळपास ६५० फुट एकसंध आहे, ज्यात एक दगडी छत सुद्धा आहे. आम्ही याच टप्प्याखाली बेसकॅम्प स्थापित केला होता. बेसकॅम्पपासून या टप्प्याच्या पायथ्याला जाण्यासाठी एक तिरकस लेज आहे. या मुख्य लेजखाली जवळपास १००० -१२०० फुट खाली पायथा आहे. संपूर्ण लेजवर वरून पडझड होऊन खाली पडलेले ताशीव दगड पडलेले आहेत. त्यामुळे जपूनच वाटचाल करावी लागते.
या लेजखालील टप्पा जवळपास ३५०-४०० फुटांचा असून खूपच पडझड झालेला आहे, जिथे हात घालू तो दगड सरळ हातातच येतो. त्यामुळे त्यावरून आरोहण करण्याचा नाद सोडून दिला आणि वळसा घालून त्याखालील १५० फुटी टप्प्याची निवड केली. या १५० फुटांच्या टप्प्यानंतर जवळपास हजारफुट खाली घळीमध्ये सरळ चालत जाता येते. या संपूर्ण भिंतीची उंची साधारण २००० फुट उंची आहे पण मुख्य चढाई १००० फुटच भरते.
हा फोटो साभार: जिग्नेश लाखानी
From Ratangad Wall- Nov-15
दुसऱ्या दिवशी टूलकीटच नसल्याने चढाईला सुरुवात करावी कि नाही याबाबत साशंकता निर्माण झाली. कारण चढाई सुरु केल्यावर एखादे वेळेस वाटेत भक्कम Anchor न मिळाल्यास बोल्ट ठोकावा लागतो व त्या बोल्टच्या साहाय्याने परत खाली येण्यास मदत होते. म्हणून मग चढाईमार्ग ते बेसकॅम्प यातील झाडीझुडपे वाटेतून बाजूला करून मार्ग सुरक्षित करण्यात आला. दरम्यान सेकंड-इन-कमांड प्रदीपला सुरुवातीचा टप्पा आश्वासक वाटल्याने त्याने तुषारला चढाईची सूत्रे सोपवली.
प्रदीपला वर कड्यातून बाहेर आलेले एक उंबराचे झाड दिसत होते. जर त्या झाडापर्यंत चढाई करता आली तर बोल्ट नसतानाही त्या झाडालाच दोर बांधून परत खाली उतरता येईल अशी अपेक्षा होती. तुषारनेही जीवनात पहिल्यांदाच मिळालेल्या संधीचे सोने करून धाडसी मुक्त चढाई करून दीड तासातच जवळपास ९० फुटांची उंची गाठली. या संपूर्ण ९० फुटांच्या चढाई दरम्यान त्याला हाच एकमेव भक्कम आधार सापडला होता. हे खरोखरच एक जबरदस्त धाडस होते कारण वर पकडण्यासाठी काही असेल याची शाश्वती नसताना त्याने हि चढाई पूर्ण केली होती. सलाम त्याच्या या धाडसाला!
त्याच्या या धाडसाला उडत्या कॅमेऱ्यात कैद केले ते स्वप्नील पवार ने. त्याने आपल्यासोबत Gopro कॅमेरा आणि Camcopter हि आणले होते. दरवेळेस शूटिंग करताना आम्ही चुकत होतो, म्हणून यावेळेस सोनारालाच सोबत आणले होते. आमचाच सदस्य असलेला राधेश आणि स्वप्नील ठाण्याच्या 'रानवाटा' संस्थेचा संस्थापक सदस्य आणि उत्कृष्ट छायाचित्रकार. त्याच्याकडून मौलिक सल्ला आणि सूचना मिळाल्या ज्या आम्ही संपूर्ण मोहिमेदरम्यान पाळल्या.
स्वप्नील पवार - दिग्दर्शकाच्या भूमिकेतून फिल्म बनविण्यासाठी काय कराव याच मार्गदर्शन करताना.
From Ratangad Wall- Nov-15
आम्ही ज्या ज्या वेळेस फिल्म बनवायचो तो एक सोहळाच असायचा. गेल्यावर्षीचाच किस्सा…।
आम्ही असेच फिल्म बनवायला बसलेलो तर दर्शनने एका दृश्यावर थांबायला सांगितले आणि निट पाहून झाल्यावर म्हणाला, "हा डुकराचा शॉट मस्त आलाय, हा ठेवाच!" बाजूला बसलेला वासुदेव म्हणाला, "अरे, तो सतीश आहे, चिखलात पडलाय!".
तेव्हढ्यात शेजारी बसलेला मनीष म्हणाला, "मी, त्या सापाला पकडलेला तो पण शॉट ठेवा!".
तिकडे निकिता जागी झाली, तिने एक सूचना केली, "दादा आफ्रिकन सफारीची फिल्म बनवताय का, मग आमच्या मिंटीची सुद्धा एक फ्रेम ठेवा! :-)
त्यात प्रदीप सारखी काही संत मंडळी, ज्यांना फिल्म वगैरेशी काहीच देणघेण नाही. त्याला विचारलं, 'अरे प्रदीप तुझी हि मूव्ह मस्त आली आहे, हि ठेवू का?' तर आधी दुर्लक्षच केलं. परत विचारलं तर त्रासिक चेहरा करून उपदेश दिला. 'कोंबडीने अंड दिला ना, मग बास्स झालं, आता तिच्याकडून दुधाची पण अपेक्षा करणार का?' :-)
दुसऱ्या दिवशी अनपेक्षितपणे किरणकाकांनी मला लिड करायला सांगितले. माझ्याबरोबर सेकंडमॅन म्हणून अनुभवी मनीषला पाठवले. काल तुषारने जिथे चढाई थांबवली होती, तिथपर्यंत जुमारिंग करीत पोहोचलो. आजच लक्ष होत, मुख्य लेजवरून जवळपास २००-२२५ फुट उंचावर दिसत असलेली एक लेज. आज पहिल्यांदाच GoPro कॅमेराचा उपयोग होणार होता. कॅमेरा हेल्मेटवर बांधलेला असल्याने, दगडावर डोकं आपटणार नाही ना याची काळजी करावी लागणार होती. सवय तर नव्हती, कसे जमणार होते काहीच कल्पना नव्हती.
सेकंडमॅन खाली जवळपास १०० फुटखाली लेजवर होता. माझ्यासमोरील रॉक ठिसूळ असल्याने त्याला जवळ घेणेही सुरक्षित नव्हते. सेकंडमॅन जवळ असेल तर फ्रीमूव्ह करताना मानसिक आधार मिळतो. सुरुवातीची मूव्ह उंबराच्या झाडावर उभ राहून करायची होती. डोक्यावरील रॉक कड्यातून बाहेर आल्याने त्या झाडावर चढायचा प्रयत्न करताना हेल्मेट रॉकवर आपटायचे आणि तोल दरीच्या दिशेने जायचा. त्यात कॅमेरा असल्याने नसती झंझट वाटायला लागली. बरीच झटापट केल्यानंतर एकदाचा त्या झाडाच्या बाहेर आलेल्या फांदीवर उभा राहिलो. इथून परत वरचा रॉक ओव्हरहेंग असल्याने मूव्ह करताना पाय उचललाच जात नव्हता. ओव्हरहेंग असल्यावर बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते. पाचेक मिनिटे अशीच गेली. शेवटी मनाला बजावले 'अभी नाही तो कभी नाही', गेल्या तीन महिन्यात मोहिमेच्या तयारीसाठी जो घाम गाळलाय त्याची अंतिम परीक्षा हीच होती.
मनाचा हिय्या करून एक पाय उजव्या बाजूच्या भिंतीवर दाबला आणि डावा हात प्रेसहोल्ड करून छातीवरच्या रॉकवर दाबून उभा राहिलो आणि हळूहळू डावा पाय झाडावरून उचलून डाव्या हाताच्या बाजूला ठेवला आणि सरळ उभा राहिलो. हुश्श! जमलं-जमलं! मनोमन खुश झालो आणि त्याच मस्तीत जवळपास ४० फुटांची फ्रि-मूव्ह केली. Anchor पासून ४० फुट वर जाणे माझ्यासाठी मोठीच उपलब्धी होती. मी आता एका चिमनीमध्ये पोहोचलो होतो. चिमनीचा सुरुवातीचा भाग जास्तच रुंद होता. लेजवरून इथपर्यंत जवळपास १३० फुटांमध्ये झाडाच्या रुपात एकच भक्कम Anchor होता, त्यामुळे इथे एक बोल्ट ठोकून मार्ग सुरक्षित केला आणि सेकंडमॅन मनीषला वर घेतले. मनीष वर आल्यावर परत दहा फुटांची मूव्ह करून वर गेलो. पुढे थोडी अवघड वाटचाल होती त्यामुळे संभाव्य Fall Arrest करण्यासाठी एक बोल्ट ठोकणे जरुरी होते. पण हा बोल्टसुद्धा उंचीवर मारणे गरजेच होत म्हणून दोन्ही पाय फाकवून समोरासमोरील भिंतीवर दाबून उभा राहिलो. आता याच स्थितीत १५-२० मिनिटे उभे राहून बोल्ट टाकावा लागणार होता. पाचेक मिनिटातच पायामध्ये क्राम्प यायला लागले. पुढची चढाई मनिषकडे सुपूर्द केली. मनीषने आपला अनुभव पणाला लाऊन उर्वरित ५० फुट चढाई करून नियोजित वरच्या लेजवर पोहोचला आणि संध्याकाळ झाल्याने दोघेही परत बेसकॅम्पवर पोहोचलो
तिसऱ्या दिवशी प्रदीप आणि वासुदेव गेले. प्रदीपने सुरुवातीचा अवघड टप्पा स्वतः सर करून पुढील चढाई वासुदेवकडे सोपवली. दरम्यान प्रदीप परत लेजवर आला आणि अचानक त्याची नजर एके ठिकाणी खिळली. चक्क एक साप त्या लेजवर वळवळत होता. प्रदीपला तो ओळखता येईना, म्हणून त्याने त्याचा फोटो काढून घेतला आणि लगेच तो whatsapp च्या माध्यमातून बेसकॅम्पवर पाठवला. बेसकॅम्पवर उपस्थित असलेल्या अमोलने त्याची ओळख पटवली. तो बिनविषारी चित्रांगण (Günther's Racer) जातीचा साप होता, हा साप खास सह्याद्रीचा वहिवाटदार आहे. याच लेजवर दुसऱ्या दिवशीही एक बिनविषारी Bronzeback जातीचा साप दिसला. एव्हढ्या अवघड ठिकाणी सापांना वावरताना पाहून आम्हीही अचंबित झालो. तेंव्हा आम्ही या लेजचे नामकरण 'सापांची लेज' असं करून टाकलं.
प्रदीप चढाई करताना. वासुदेव आणि हितेश सापांच्या लेजवर:
From Ratangad Wall- Nov-15
Gunther's Racer
From Ratangad Wall- Nov-15
चवथ्या दिवशी मी आणि मनीष गेलो. गेल्या तीन दिवसांमध्ये मुख्य लेजवरून फ़्रि मूव्ह करीत जवळपास २५० फुटांची उंची गाठली होती. आता मात्र मुक्त चढाईसाठी वावच नव्हता, कातळभिंत अगदीच सपाट होती त्यामुळे कृत्रिम चढाई करावी लागणार होती. सुरुवात मी केली आणि लागोपाठ ६ बोल्ट ठोकल्यानंतर पायात क्राम्प यायला लागले म्हणून नाईलाज झाल्याने परत सापांच्या लेजवर खाली उतरलो. पुढची चढाई मनीषने सांभाळली. दरम्यान सकाळी रेडीओवर आंध्र/तामिळनाडू मध्ये जोराचा पाऊस झाल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. त्यातच आज सकाळी योगेश आला होता. त्याने मोबाईलमध्ये Wheather Forecast पडताळून पाहिले आणि आम्ही हसायला लागलो. भारतीय हवामान खात्यानुसार महाराष्ट्रातही २ दिवसांनी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.:-), हवामान खात्याचे अंदाज कायम चुकतात, त्यामुळे दुर्लक्ष केले.
रिकामीपणाचे उद्योग: प्रवीणने आम्हाला बासरी शिकवायचे खूप प्रयत्न केले पण आम्ही फक्त एकच सूर शिकलो, 'फुंकणीचा'
From Ratangad Wall- Nov-15
पाचव्या दिवशी अमोल, प्रदीप आणि तुषार गेले. अमोलने सुरुवातीला पहिल्याच प्रयत्नात एक १५ फुटांची फ्री मूव्ह केली आणि त्यानंतर सलग ३ बोल्ट टाकून परत २०-२५ फुटांची एक सुंदर आणि थरारक फ़्रि मूव्ह केली आणि एका छोट्याश्या बसता येईल अशा गुहेत पोहोचला. ससाणा, गरुड यांच्यानंतर अमोलच पहिला मानव जो त्या गुहेत बसला होता. पायथ्यापासून १५०० फुट वर फ़्रि मूव्ह करणे हे एक दिव्यच आहे.
सहाव्या दिवशी हितेश, मनीष आणि राधेश गेले. हितेशने दिवसभरात १० बोल्ट टाकून चढाई थांबवली. आज फ़्रि मुव्हसाठी वावच नव्हता म्हणून संपूर्ण दिवस कृत्रिम चढाईच करावी लागली.
सातव्या दिवशी वासुदेव आणि तुषार गेले. तुषारने पहिल्याच दिवशी फ़्रि मूव्ह करून सगळ्यांची वाहवा मिळवली होती. पण आज त्याला पहिल्यांदाच कृत्रिम चढाईसाठी पाठवले गेले. आजच्या दिवसात दगडी छताच्या खाली पोहोचण्याचा मानस होता. सुरुवात तुषारने केली आणि नंतर वासुदेवने फ़्रि मुव्ह करीत त्या दगडी छताला स्पर्श केलाच. चढाई थांबवण्यास उशीर झाल्यामुळे संपूर्ण काळोखातच खाली उतरलो.
रात्री अंधारात एकटाच बसलो होतो, तेंव्हा मागून प्रदीपने खांद्यावर हात ठेवून विचारलं, ' काय रे काय झालं, एकटाच का बसला आहेस?'
मी: 'काही नाही रे, घरची आठवण यायला लागली आहे?'
प्रदीप: 'हो यार, आताच बायकोबरोबर बोलण झालं! ती सांगत होती छोट्याने आजचं पहिला शब्द उच्च्रारला, पप्पा! शिट, I missed it?'
मी: ‘तीन महिने झाले आहेत’, आणि मी बायकोबरोबर राहायचं सोडून पंधरा दिवसांसाठी इकडे आलोय, सासऱ्याना उत्तर देता-देता तिच्या नाकीनाऊ येत आहे'.
प्रदीप: हो यार, आपण उनाडक्या करायला बाहेर पडल्यावर या कशा दिवस काढत असतील. घरी परत येईपर्यंत त्यांच्या जीवाला घोर! उनाडक्याबरोबर संसार थाटलाय त्याची शिक्षा भोगतायत!'
मी: चल चारच दिवस राहिले आहेत, एकदा घरी गेल कि परत दोन महिने बाहेर पडायचं नाही. तुम्ही पण दोन महिने तोंड दाखवू नका आणि फोनही करू नका!' :-)
आठव्या दिवशी किरणकाका, प्रदीप गेले. दगडी छताचे आव्हान असल्याने अनुभवी प्रदीपने सुरुवात केली. अपेक्षेपेक्षा लवकरच त्याने दगडी छत सर करून आणखी वर पोहोचला. अडीज वाजले होते. अचानक कात्राबाईच्या डोंगरावरून काळे ढग जमा व्हायला लागले. च्यायला, हवामान खात्याने दगा दिला.
दरम्यान आम्हीही होत नव्हत तेव्हढे सगळ प्लास्टिक तंबू वर अंथरलं आणि पावसाची वाट पाहू लागलो. प्लास्टिकहि पुरेसं नव्हतच. वेळातवेळ काढून रात्रीच जेवण बनवायचं संपताच पावसाने फेर धरला. तंबूच्या आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आमची धावपळ सुरु झाली. सगळ सामान तंबूच्या मध्यभागी गोळा केलं आणि त्या सामानाभोवती आम्ही सगळे पावसाचा आवाज ऐकत पाय दुमडून बसलो. किरणकाकांनी स्वतः शिवलेला हा तंबू कापडाचा असूनही एक थेंब पाणीही आतमध्ये गळत नव्हत. त्याच्या उतरत्या रचनेमुळे पाणी खाली वाहत जाऊन तंबूच्या शेवटी जमिनीवर पडायचं त्यामुळे तंबूच्या मधली जागा काहीशी सुकी राहिली होती. पाऊस थांबण्याची वाट पाहण्याशिवाय काहीच काम नसल्यामुळे गाण्याच्या भेंड्या सुरु केल्या. त्याचाही कंटाळा आल्यावर उर्वरित रात्र अशीच बसून काढली. सकाळी कधीतरी पाऊस थांबल्यावर ओली झालेली लाकड बऱ्याच प्रयत्नानंतर पेटविण्यात यश मिळालं. सगळ सामान भिजल्यामुळे चढाईसाठी सुट्टी घेऊन सामान सुकविण्याच कामं केलं. आमचं हे रडगाणं आदल्या रात्री डोंबिवलीला कळवल्यानंतर दिवाकर आणि आशिष मोठ प्लास्टिक घेऊन सकाळीच बेसकॅम्पवर दाखल झाले. संध्याकाळी परत पाऊस जो सुरु झाला तो थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच थांबला. पण निदान आज प्लास्टिक जवळ असल्यामुळे तंबू भिजण्यापासून वाचला होता.
दहाव्या दिवशी अस ठरविण्यात आल कि चढाईचे नियमन थेट रतनगडाच्या माथ्यावरूनच करायचं. मुख्य लेजवरून साधारण ४५० फुट चढाई झाली असल्यामुळे दररोज एव्हढ्या उंचीवरच झुमारींग करून वेळ आणि उर्जा खर्ची करण्यापेक्षा माथ्यावरून रॅपलिंग करून प्रस्तरारोहकाला चढाईमार्गात उतरवायचे अस ठरलं. योगेश, वासुदेव आणि आशिष तिघांनी आपला गाशा गुंडाळून रतनगडाची गणेश दरवाजाजवळील गुहा गाठली. संपूर्ण कातळ तुळतुळीत असल्याने आणि चढाईला सुरुवात करण्यास १२.३० वाजल्याने वासुदेवने आशिषच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात कृत्रिम चढाई करून जवळपास ३५-४० फुटांची उंची गाठली होती. चढाईपटुचा मुक्काम गुहेतच असल्याने रात्री चपाती-भाजीचा नैवेद्य घेऊन अमोलने रतनगडाची गुहा गाठली.
अकराव्या दिवशी वासुदेवनेच परत चढाईची सूत्रे आपल्या हाती घेऊन सकाळी ८.३० लाच चढाई सुरु केली. आज माथा सर करण्याचा अंदाज होता. वासुदेवने दिवसभरात कृत्रिम चढाई आणि जवळपास ६० फुट फ़्रि मूव्ह करून दुपारी ३.३० वाजता रतनगडाचा माथा गाठला.
पुढील दोन दिवसात मुख्य लेजखालील उर्वरित भागाची चढाई पूर्ण करून गिरीविराज च्या १५९ व्या मोहिमेची सांगता झाली.
काही ठळक वैशिष्ट्ये:
वासुदेव दळवी: शरीरसौष्ठव स्पर्धेत पदक जिंकूनही प्रस्तरारोहणाचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. त्यासाठी स्वतःचे वजनही कमी केले. फेसबुकच्या माध्यमातून गिरीविराजशी संपर्क करून संस्थेत सामील झाला आणि संस्थेचा पुढील पिढीचा आघाडीचा प्रस्तरारोहक म्हणून पुढे आला आहे.
तुषार परब: हा पण एक हरहुन्नरी मुलगा. पक्षी निरीक्षण करताकरता मुंब्रा येथे अचानक गिरीविराजशी संपर्क झाला आणि कधी कुटुंबामध्ये मिसळून गेला कळलच नाही. पक्षांच्या दुनियेत पिएचडी करण्याचा मानस.
वासुदेव - तुषार
From Ratangad Wall- Nov-15
अमोल पाटील: उत्कृष्ट छायाचित्रकार. अध्यात्माचा किडा चावल्यामुळे Thyssenkrupp मधील नोकरी सोडून दिवाकर भाटवडेकर सोबत ७१ दिवसांमध्ये पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतर हिमालयही फिरला आणि सोबत प्रस्तरारोहणही करतो. हितेश साठवणे ने हि डोंबिवली-नागपूर-जबलपूर-सुरत-वसई-डोंबिवली अशी आगळीवेगळी ३००० किलोमीटरची नर्मदा परिक्रमा २१ दिवसांमध्ये सायकलवरून पूर्ण केली आहे.
त्यात ५६ वर्षीय गुरुजी किरण अडफडकर हे स्वतःच एव्हढी धडपड करतात कि तरुणाला सुद्धा लाजवतील. ऐनवेळेस धाऊन आलेले योगेश, दिवाकर आणि आशिष यांच्यामुळे खूप मोलाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
अशी हि आगळीवेगळी मंडळी सोबत असल्याने कितीही शारीरिक कष्ट पडले तरी दुसऱ्या दिवशीच्या परिश्रमासाठी मानसिक उर्जा आपोआपच मिळायची.
किरण अडफडकर यांचे मार्गदर्शन आणि प्रदीप म्हात्रे यांच्या नेतृत्वखाली हि मोहीम राबविण्यात आली होती.
मोहिमेचे सदस्य - वासूदेव दळवी, सतीश कुडतरकर, अमोल पाटील, राधेश तोरणेकर, दर्शना तोरणेकर, तुषार परब, हृषीकेश साखरे, प्रवीण घुडे, दिवाकर भाटवडेकर, आशिष पालांडे, योगेश सदरे, हितेश साठवणे, मनीष पिंपळे, दर्शन ऐडेकर, रणछोडदास, मंगेश सदरे, निकिता अडफडकर, संजय गवळी, राहुल शिंदे, उमेश विरकर .
Photography point:
From Ratangad Wall- Nov-15
From December 10, 2015
काही दुर्गकंटकानी गडावरून खाली फेकून दिलेले रेलिंगचे २ लोखंडी भाग लेजवर पडून होते . गडावर नेऊन ठेवले तर परत ते खाली ढकलले जाणार याची १००% टक्के खात्री असल्याने ते उचलून बेसकॅम्पच्या जागेत आणून ठेवले आहेत. पाहू पुढे त्याचं काय करायचं ते.
प्रतिक्रिया
19 Dec 2015 - 11:36 am | एक एकटा एकटाच
जबरदस्त सतीश दा
फ़ोटो आणी निवेदन अप्रतिम
19 Dec 2015 - 11:58 am | एस
रतनगडाची शेवटची वारी करून झाल्याला आता एक तप उलटून गेलेय ह्याची जाणीव झाली. तेव्हा रतनगडावर क्वचितच लोक जात. स्वच्छ होता किल्ला. आताची अवस्था वाचून वाईट वाटले.
तुमची चढाई नेहमीप्रमाणेच थरारक. महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांना खरोखरच आर्थिक पाठबळ शासनाकडून आणि समाजाकडूनही मिळणे आवश्यक आहे याची निकड परत जाणवली.
पुढील मोहिमेच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत!
19 Dec 2015 - 12:36 pm | आरोह
छान वर्णन आणि आम्हा पामरांना थरारक अनुभव करून दिल्याबद्दल आभार !
19 Dec 2015 - 12:38 pm | वेल्लाभट
कडक !
अशक्य !
नेहमीप्रमाणेच...
हॅट्स ऑफ
19 Dec 2015 - 12:50 pm | यशोधरा
हॅट्स ऑफ!! कसलं भारी आहे हे सगळं!
19 Dec 2015 - 1:30 pm | नि३सोलपुरकर
अशक्य !अशक्य ! आहे हे सर्व .
हॅट्स ऑफ .
19 Dec 2015 - 2:23 pm | बिपिन कार्यकर्ते
आ ई श प्प थ ! !! !!!
19 Dec 2015 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त !
19 Dec 2015 - 2:51 pm | प्रचेतस
जबरदस्त.
मला नेहमीच ह्या परिसरातले कातळकडे तुलनेने अजस्त्र उंचीचे वाटतात. कात्राबाईचा कडा तर हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यापेक्षाही अधिक खोलवर तुटलेला आणि जास्त भेदक वाटतो. रतनगड तर सर्वाधिक आवडता किल्ला. शिड्यांची वाट, त्र्यंबक दरवाजाच्या तुफ्फान पायर्या, बुजलेला कोकणदरवाजा, नेढं, राणीचा हुडा, चिकटलेले बाण आणि खुट्टा, सगळंच अतिशय वेधक.
आणि त्या किल्ल्यावरची तुमची चढाई तर निव्वळ वेडं साहस.
19 Dec 2015 - 4:11 pm | सतीश कुडतरकर
प्रचेतस
खरतरं या भागात जाण्याची हि माझी फक्त दुसरीच वेळ. संपूर्ण परिसर पाहताना तोंड आपोआपच उघडले जाते. गेल्या काही वर्षात रतनगडाच्या या भिंतीबद्दल ऐकून होतो. पण प्रत्यक्षात जेंव्हा तिथे जाऊन ती पाहिली तेंव्हा भ्रमनिरास झाला. या भिंतीच्या अर्धाअधिक भागात पडझड होऊन दगड भुसभुशीत झालेला आहे त्यामुळे त्याच्यावर आरोहण करणे टाळले.
पण समोरील कात्राबाईचे कडे मात्र फक्त पाहतच राहावेत असेच आहेत. थेट माथ्यापासून खाली दरीत सरळसोट उडी मारतात. रतनगडावरून पाहताना कात्राबाईचे कडे एव्हढे सपाट आणि तुळतुळीत दिसतात कि त्यावर आरोहण करण्यास अशक्यच वाटतात. प्रत्यक्षात भिड्ल्यावरच खरी परिस्थिती कळेल.
19 Dec 2015 - 4:43 pm | प्रचेतस
अगदी.
कात्राबाई अनुल्लंघनीय वाटतो. इतका सरळसोट कडा सह्याद्रित इतर कुठे मी तरी पाहिलेला नाही.
23 Dec 2015 - 5:29 pm | अप्पा जोगळेकर
चढाई आणि वृत्तांत अप्रतिम.
हे खरोखरच एक जबरदस्त धाडस होते कारण वर पकडण्यासाठी काही असेल याची शाश्वती नसताना त्याने हि चढाई पूर्ण केली होती.
_/\_. बोल्टिंग टूलकिट नसतानाची चढाई. निव्वळ वेडं साहस. पण पटले नाही.
माझ्या माहितीनुसार आरोहक (आनंद पाळंदे) ने कात्राबाई सर केला आहे. चूकभूल देणेघेणे.
24 Dec 2015 - 9:00 am | प्रचेतस
कात्राबाई सर केला असेल तर खरोखरच अचाट काम आहे.
24 Dec 2015 - 11:57 am | सतीश कुडतरकर
आप्पा
हो, खुप वर्षांपूर्वी पुण्याच्या संस्थेने कात्राबाई सर केला आहे. पण पहिलीच एक उतरती धार दिसते त्या मार्गाने. आम्ही मार्चमध्ये अभ्यासदौऱ्यासाठी जेंव्हा पायथ्याच्या घळीत गेलो होतो त्यावेळेस रतनगडच्या भिंतीचा अंदाज येत नव्हता. म्हणून वासुदेव दळवी आणि किरणकाकांनी कात्राबाईच्या त्या धारेवर चढण्याचा निर्णय घेतला. अभ्यासदौरा असल्याने चढाईचे सामान सोबत नव्हते. जवळपास ३०० फुट चढाई त्यांनी दोराशिवायच केली. पाळंदेनी जो मार्ग निवडला त्यातील फक्त शेवटचा टप्पा बहुतेक ३०० फुट आव्हानात्मक आहे. ती धार चढून गेल्यावर पुढे त्यांनी कोणता मार्ग निवडला याचा अंदाज नाही.
प्रचेतस आणि मी, कात्राबाईची सरळसोट भिंतीविषयी बोलत आहोत. या भिंतीला हात घालण्याआधी खूप अभ्यासाची आणि चांगल्या टीमची गरज आहे.
anchor ची शाश्वती नसताना चढाई करणे धोकादायक आहेच पण हा खेळच धाडसाचा आहे.
19 Dec 2015 - 3:17 pm | सस्नेह
जीवघेणे फोटो आहेत ! हॅट्स ऑफ !
19 Dec 2015 - 4:05 pm | चांदणे संदीप
प्रतिसाद लिहितानाच हात थरथरत आहेत! चढाईची कल्पनाच नाही करवत!
तुमच्या सर्व टीमला नमस्कार सांगा आणि किरणकाकांना दंडवत! ___/\___
लेखन पण उत्तम, वाचनीय! फ़ोटो तर एकापेक्षा एक!
लेखाच्या सुरुवातीलाच इतर गिरी-दुर्गप्रेमी, पर्यटक यांना केलेले आवाहन पाहून तुमची तक्रार लक्षात आली. माझ्याकडून शक्य होईल तेवढा मी हा निरोप माझ्या परिचित/मित्र यांच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करेन! काही दिवसांनीच कायप्पावर तो विनंतीचा संदेश तुमच्यापर्यंतही नक्कीच येईल!
धन्यवाद!
Sandy
19 Dec 2015 - 4:11 pm | सतीश कुडतरकर
धन्यवाद sandip
19 Dec 2015 - 4:31 pm | नाव आडनाव
क्या बात!
नुसते फोटो बघूनंच माझे डोळे फिरलेत.(इथे योग्य त्या शब्दांचा अंदाज आलाच असेल :))
माझ्या दोन पर्या बाजूला बसल्या होत्या - त्यांनी विचारलंय "काकांचे पाय नाही दुखले का एव्हढ्या वर गेल्यानंतर" :)
आणि दोघिंना शेवटचा चांदणीमामीचा फोटो आवडला :)
19 Dec 2015 - 4:48 pm | बोका-ए-आझम
वर्णन त्याहून अप्रतिम!
20 Dec 2015 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार
वेडी आहेत ही सगळी माणस ठार वेडी आहेत.
फोटो आणि वर्णन दोन्ही अप्रतिम. मोहिमेत सहभागी झालेल्यांचे कौतुक कारायला माझ्याकडे शब्दच नाहीत. त्या सर्व वीरांना माझा साष्टांग दंडवत.
लेखाच्या सुरुवातीला लिहिलेले निवेदन खरोखर विचार करायला लावणारे आहे. ते जास्ती जास्त जणांपर्यंत पोचवायचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. (बाकी काही नाही तरी एवढे तरी मी करू शकतोच)
पैजारबुवा,
23 Dec 2015 - 12:35 pm | सतीश कुडतरकर
लेखाच्या सुरुवातीला लिहिलेले निवेदन खरोखर विचार करायला लावणारे आहे. ते जास्ती जास्त जणांपर्यंत पोचवायचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. (बाकी काही नाही तरी एवढे तरी मी करू शकतोच)>>>>>
निवेदन टाकण्याचा हाच हेतू होता, धन्यवाद!
20 Dec 2015 - 1:26 pm | बाबा योगिराज
काय हाय वो ह्ये?
लै म्हणजे लैच जबरदस्त. फ़ोटू पण एक से एक.
बाप्पा फ़ूड कै सूचना.
अचंबित बाबा.
20 Dec 2015 - 1:42 pm | स्पा
भयंकर __/\__
21 Dec 2015 - 1:08 am | प्रसाद गोडबोले
निव्वळ अप्रतिम !
मला तुमच्या चाहत्यांमध्ये स्थाण द्या ना गडे !
21 Dec 2015 - 1:09 pm | पिलीयन रायडर
दं ड व त हो!!!
__/\__
22 Dec 2015 - 10:45 am | राजेश घासकडवी
जबरदस्त.
22 Dec 2015 - 11:54 am | केतकी
खतरनाक!
22 Dec 2015 - 1:34 pm | शरभ
तुम्हाला माहीत आहे ना, की तुम्ही काहीतरी वेगळं करताय इतरांपे़क्षा. आणि तुम्हाला त्याचं आत्यंतिक समाधान आहे.
Hats off to whole team. परमेश्वराची क्रुपा अशीच सतत तुम्हा सगळ्यांवर राहू देत.
- शरभ
22 Dec 2015 - 1:49 pm | अनुप ढेरे
अप्रतीम!
22 Dec 2015 - 3:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
एकच नंबर...सतीश कुडतरकर ह्या ब्रँडला जागणारे वर्णन आणि जबरदस्त फोटो. _/\_
तो ओव्हरहँग (३५/३६/३७ नंबर) बघुनच पोटात गोळा आला. चिमणीचे फोटो (२०) झकासच.
गिरिविराजच्या १६० व्या मोहिमे साठी शुभेच्छा (आत्ताच हरीश्चंद्रला तुमचे एक सदस्य भेटले होते.. नाव विसरलो बघा. ५-६ मुले आणि २-३ मुली होत्या)
23 Dec 2015 - 12:32 pm | सतीश कुडतरकर
रणछोड असेल, नवीन पाखरू आहे ते!
आपण एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होता होता राहिलात. आताच आठवड्याभरापूर्वी गणेश गिध आणि रोहित वर्तक या दोघांनी Alpine पध्दतीने कोकणकडा सर करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी, आम्ही २००६ साली चढाई केलेल्या मार्गाची निवड केली होती. सह्याद्रीमध्ये या दोघांनी प्रथमच हि पध्दत वापरली आहे. या पध्दतीत संपूर्ण चढाई फक्त दोघांनीच करायची असते आणि ती सुद्धा बेसकॅम्पवर न येता. रात्रीचा मुक्काम तिथेच सापडेल त्या लेजवर करायचा. त्यांची सुरुवात तर चांगली झाली होती पण कोकणकड्याच्या त्या प्रसिध्द ओव्हरहेंग ला हात घालणार तोच मधमाशांचा त्रास सुरु झाला. मधमाशांनी आपल बस्तानच बसवलंय, त्यामुळे त्या दोघांना माघार घ्यावी लागली.
22 Dec 2015 - 5:14 pm | सुमीत भातखंडे
जबरी.
22 Dec 2015 - 5:23 pm | पद्मावति
केवळ अचाट!
अप्रतिम लेख.
22 Dec 2015 - 5:48 pm | टुकुल
नतमस्तक !!!
22 Dec 2015 - 5:48 pm | नीलमोहर
आधीच्या लेखांप्रमाणेच थरारक.
असं काही करण्यासाठी ते वेडच अंगी असलं पाहिजे,
अंगावर काटा आणणारे फोटो आणि वर्णन..
धन्य !!
22 Dec 2015 - 6:58 pm | मित्रहो
केवळ फोटो बघूनच पोटात गोळा येतो तुम्ही चढून गेलात. मस्त अनुभव कथन.
23 Dec 2015 - 12:33 pm | सतीश कुडतरकर
सर्व वाचक आणि प्रतिसाददात्यांचे धन्यवाद!
23 Dec 2015 - 3:59 pm | अत्रुप्त आत्मा
__/\__
24 Dec 2015 - 6:44 pm | मी-सौरभ
आम्हि फक्त तारीफ करु शकतो.
हा खेळ करण्याचे स्वप्न सुद्धा आम्हाला पडत नाही आन तुम्ही हे जगता..._/\_
24 Dec 2015 - 8:56 pm | सुहास झेले
निशब्द !!!
25 Dec 2015 - 12:22 pm | बिपिन कार्यकर्ते
हे असलं काही वाचताना माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो.... 'का?' .... पण त्याचं उत्तर जॉर्ज मॅलरीने आधीच देऊन ठेवलंय... "Because it's there!"
तरी येतंच मनात प्रत्येक वेळेस.... 'का?'
25 Dec 2015 - 12:47 pm | बाजीगर
जाॅंबाझ / जवाॅंमर्द/ शूरवीर मावळ्यांनो तुमचे अभिनंदन,कौतूक करावं तितकं थोडंच.
फोटो पाहूनच काळीज थरारतं,त्या विशाल कातळावर माणूस यत्कींचित दिसतो.सुंदर जिंदादिल वर्णनशैली. छा गये.तुमच्या टीम ला प्रणाम.
25 Dec 2015 - 4:29 pm | शलभ
थरारक..
26 Feb 2018 - 2:11 pm | vikrantkorde
जबरदस्त !!!
26 Feb 2018 - 3:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
२-३ वर्षांनी हाच लेख पुन्हा वाचुन पुन्हा नव्याने पोटात गोळा आला. अशा सह्याद्रीच्या कुशीत आपण जन्माला आलो हे आपले भाग्यच , आणि तुमच्यासारखे वेडेपीर त्या आव्हानाला पुरुन उरताहेत हा आण्खी एक चमत्कार.
अशाच अनेकानेक मोहिमांसाठी गिरिविराजला शुभेच्छा
27 Feb 2018 - 2:44 pm | चाणक्य
धागा वर काढल्याबद्दल आभार. बेक्कार फाटली फटु बघूनच.