अलीकडेच राजहंस प्रकाशनातर्फे आयोजित एका कार्यक्रमात डॉ. उदय निरगुडकर यांचे 'पत्रकारिता आणि व्यावसायिकता' या विषयावर भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी 'मन की बात' सांगणार आहे, हे स्पष्ट केलं. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, म्हणून ते इथे देतेय.
१. वृत्तपत्रातल्या जाहिराती, पहिल्या पानावरच्या जाहिराती यावर आपण वाचक टीका करतो. डॉ. निरगुडकरांनी त्यामागची आर्थिक अडचण उलगडून सांगितली. अंक तयार करण्यासाठीचा खर्च आणि त्याची किंमत यातला फरक भरून काढण्यासाठी जाहिराती देणं भाग होतं. रुपयाची किंमत कमी झाली की आयात कराव्या लागणाऱ्या मालाचा खर्च वाढतो. जाहिराती पुन्हा मिळवणं, हेही एक आव्हान असतं. वृत्तपत्राचा वाचकवर्ग कोण आहे, हे लक्षात घेऊन जाहिराती मिळतात. (महागड्या गाड्यांच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांमध्ये दिसत नाहीत.)
असंच वृत्तवाहिन्यांच्या बाबत होतं. एखादी भूकंप, विमान अपघात यासारखी महत्वाची बातमी आली की दिवसभर तिच बातमी दाखवावी लागते. तिच्यात खंड पडला की प्रेक्षक दुसऱ्या वाहिनीकडे वळतात. त्यामुळे जाहिरातींवर गदा येते आणि त्या दिवसाचं उत्पन्न बुडतं
२. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न - लोक वृत्तपत्र वाचतात, पण त्यातल्या विचारांशी सहमत होतात का ? पुढचा प्रश्न येतो - वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्या नसल्या तर काही फरक पडेल का ? अलीकडे बातम्या नेटीझन्स देऊ लागले आहेत, त्यामुळे पुढे वृत्तपत्रांची गरज उरेल का ? करमणुकीच्या वाहिन्यांच्या तुलनेत वृत्तवाहिन्यांना कितपत महत्व असतं ?
३. वेगळा वाचक वर्ग निर्माण होतोय का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आजचा वाचक म्हणतो, कुठे, काय, कधी घडलं तेवढं फक्त सांगा. माहितीचे विश्लेषण आम्ही करतो. त्यामुळे वाचकांमधल्या बदललेल्या सवयींचा मागोवा घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
४. अजून एका आव्हानावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. एकीकडे या क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत, तर दुसरीकडे चांगली लोकं मिळवणं कठीण झाले आहे. सर्व उमेदवारांचे अर्ज सारखेच दिसतात. भडक बातम्या देऊन पुढे कसं जाता येईल, याचा विचार चाललेला असतो. अशा परिस्थितीत वेगळं काहीतरी करणाऱ्यांची दखलही घेतली जात नाही. नाविन्यपूर्ण उपक्रम काही दिवसातच बंद पडतात.
५. या आव्हानांना तोंड देण्यासाठी काय उपाय करावे लागतील, यावर ते शेवटी बोलले. माहितीचे स्त्रोत अखंड टिकवून ठेवावे लागतील, बातम्यांमधली सत्यता टिकवून ठेवावी लागेल. एकच बातमी वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, ट्वीटर इत्यादिंवर कशी जाईल, याचं भान असेल तोच टिकेल.
या व्यवसायापुढे आव्हानं मोठी आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग धूसर आहे. या क्षेत्राला अस्तित्वाचा प्रश्न सतावतोय, हे त्यांच्या भाषणातून जाणवलं. आर्थिक आघाडीवर तोंड देणं, स्पर्धेत टिकून राहणं, मोबाईल पत्रकारितेला तोंड देणं, पत्रकारितेतली मूल्य टिकवणं, दमनशाहीचा सामना करणं असे अनेक प्रश्न आहेत. पण त्यावर या क्षेत्राकडे ठोस उपाय नाहीत, हेदेखील त्यांनी सुचवलेल्या उपयांवरून वाटलं .
प्रतिक्रिया
25 May 2015 - 7:55 am | चुकलामाकला
तटस्थ आणि सत्य बातम्या देणार्या वृत्तपत्रांची कायम गरज राहील असे मला वाटते.
संपादकाच्या विचराप्रमाणे व्रुत्तपत्राची विचारधारा असते (उदा.गिरिश कुबेर मोदीविरोधी) त्यामुळे "कुठे, काय, कधी घडलं तेवढं फक्त सांगा. माहितीचे विश्लेषण आम्ही करतो. " असे वाटते.
12 Dec 2015 - 1:51 pm | सामान्यनागरिक
तटस्थ आणि सत्य बातमीसाठी किती लोक योग्य ते पैसे वर्तमापत्राला द्यायला तयार आहेत? पाच रुपायाच्यावर किंमत कोण मोजायला तयार आहे वर्तमानपत्रासाठी?
25 May 2015 - 9:21 am | पिंपातला उंदीर
मस्त . वर्तमानपत्रांनी आपली विश्वासाहर्ता वाहिन्यांच्या तुलेनेत अजुनही टिकवून ठेवली आहे असे वाटते . वाहिन्यांच्या तुलनेत बातम्यांचे आणि घटनेचे विश्लेषण वर्तमानपत्रात अजुनही चांगले होते असे वाटते . अर्थातच काही रवीश कुमार सारखे सन्माननीय अपवाद आहेत . वर्तमानपत्र संपणार अशी ओरड खुप वर्षांपासून चालु आहे पण अजूनही वर्तमानपत्र सुशेगात चालू आहेत . बाकी ओसामा बिन लादेन ला मारण्यासाठी जे ऑपरेशन अमेरिकेने केले होते त्याचा पहिला सुगावा जगाला कुठल्याही वर्तमान पत्र किंवा वाहिनीकडून लागला नव्हता तर अबोटाबाद इथेच राहणाऱ्या आणि लांबून हे ऑपरेशन पाहणाऱ्या एका स्थानिक तरुणाच्या tweets मुळे लागला होता . यावरून पुढचा ट्रेंड कसा असेल हे कळायला हरकत नाही .
25 May 2015 - 8:38 pm | कविता१९७८
छान लेख, काहीतरी वेगळ दाखवण्याच्या नादात व्रुत्त वाहीन्यांचा दर्जा घसरला आहे त्यासाठी एखाद्या बातमीची चिरफाड केली जाते त्यामानाने व्रुत्तपञे चांगली आहेत त्यात सतत एकाच बातमीला प्राधान्य दिले जात नाहीं
25 May 2015 - 9:37 pm | एस
वर्तमानपत्र वाचणं हा इतर कशाहीपेक्षा सवयीचा भाग जास्त असतो हे मी या क्षेत्रातील अत्यल्प ज्ञानावरून निश्चित सांगू शकतो. त्यामुळे एखादी बातमी ही वृत्तवाहिन्या, आंतरजाल, फेसबुक, ट्विटर वगैरेंवर कितीही चघळून झाली असली तरी दुसर्या दिवशीच्या सकाळी आपण आपल्या आवडीच्या वृत्तपत्रात ती बातमी आवर्जून वाचतोच. वृत्तपत्र हे रोज जे वाचतो तेच हवं असतं. एखाद्याला रोज 'दै. सकाळ' वाचायची सवय असेल तर तो 'दै. लोकसत्ता' काही केलं तरी वाचणार नाही, आणि वाचलं तरी पुन्हा 'दै. सकाळ' वाचायला मिळेपर्यंत त्याला वृत्तपत्र वाचल्यासारखे वाटणार नाही.
त्यामुळे वृत्तपत्र माध्यमाची स्पर्धा ही इतर माध्यमांशी नसून इतर वृत्तपत्रांशी आहे.
आणि एकूण सर्वच प्रसारमाध्यमांमधील सध्याचा कल पाहिल्यास त्यात 'यूजर कंटेंट' ला हल्ली महत्त्व आले आहे. त्यात फारफारतर मूल्यात्मक बदल मला अपेक्षित आहेत. परंतु संख्यात्मक वाढ काही होणार नाही.
12 Dec 2015 - 3:45 pm | बोका-ए-आझम
झी तर शक्यच नाही. कुठलंही वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिनी ही एकाच वेळी इतर वर्तमानपत्रे आणि वाहिन्या, इंटरनेट आणि इतर अनेक मनोरंजन वाहिन्यांशी स्पर्धा करत असते. तटस्थ बातम्या दिल्या तर स्पर्धेत टिकणंच शक्य नाही. आपल्या देशातच हा प्रश्न आहे असं अजिबात नाही. जगभर वर्तमानपत्रांना आणि वाहिन्यांना नव्या नव्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय. नफा मिळवणं आणि तोटा कमीतकमी होईल ते पाहाणं हाच एक व्यवसाय म्हणून त्यांच्यासमोरचा पर्याय आहे.
12 Dec 2015 - 7:50 pm | मदनबाण
याच विषयावर एक सुंदर चर्चा RT च्या न्यूज चॅनलवर पाहिली आहे. RT ला १० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्त्याने या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अर्णब गोस्वामीची या कार्यक्रमात उपस्थिती होती आणि त्यांचे भाष्य अर्थातच मला आवडले. :) त्या कार्यक्रमाचा व्हिडीयो इथे शेअर करत आहेत. { ही चर्चा प्रिंट मिडीयावर नसुन एकंदर इंटरनॅशनल मिडीया संदर्भात आहे.} ही चर्चा नक्कीच ऐकण्या सारखी आहे. RT एडिटर इन चिफ Margarita Simonyan यांचे विचार देखील महत्वपूर्ण आणि ऐकण्या सारखे आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हमरी अटरिया पे आजा रे सांवरिया देखा देखी तनिक हुई जाए... :- Dedh Ishqiya
12 Dec 2015 - 8:16 pm | पैसा
दिवसेंदिवस वृत्तपत्र चालवणेइश्वास ठ खूप कठीण होत जाणार असे वाटतेय. त्याचवेळी वृत्तपत्रेच नव्हे तर इतर माध्यमांवर किती विश्वास ठेवावा हेही कळत नाही.
12 Dec 2015 - 8:48 pm | चलत मुसाफिर
भारतीय माध्यमे आणि पत्रकार यांनी कितीही आव आणला तरी ते सत्ता आणि पैसा या दोहोंना टरकून असतात. राहुल गांधी त्यांना दोन महिने सापडले नाही. दाऊद इब्राहिमचा साधा फोटो त्यांना मिळवता येत नाही. जातीय भेदभाव, शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा त्यांना दिसत नाहीत. टी आर पी आणि खप यापलिकडे विचार करायची त्यांची कुवत नाही. शीना बोरा किंवा सलमान खानच्या घराबाहेर तळ ठोकून बसलो की आपण फार मोठी देशसेवा केली असा बहुतेकजणांचा समज असतो. मोठी राष्ट्रीय वृत्तपत्रे असोत की साप्ताहिक भेंडवणेवाडी समाचार, प्रत्येक जागी कोणत्या ना कोणत्या पातळीवर तोडपाणी होतच असते.
12 Dec 2015 - 9:04 pm | कंजूस
विश्वास ठेवावाच लागेल असं माझं मत बनत चाललं आहे.कितीही ओरड केली तरी मतपेटीतून खटलेवालाच बाहेर येतो ना.कित्येक पक्ष पेपरवाले/मिडिया आमच्याविरूद्ध छापतात म्हणतात पण थोड्या वर्षांनी त्याचं स्वत:च एनरॅान करतात.बुडवतात वर काढतात.प्रवासात मात्र पेपरच कामाला येतो बौद्धिक,शिरीरिक गरजा भागवतो.
14 Dec 2015 - 2:03 pm | नितीनचंद्र
आजकाल पॅकेजचे पेव फुटल्यामुळे पत्रकारिता हा लोकशाहीचा स्तंभ वगैरे राहिला नसुन हा नुसता दंभ झाला आहे. लवासामध्ये १६७ परवानग्या ह्या संबंधीत अधिकार्यांनी त्यांच्या कडे असलेल्या डिस्क्रिएटीव्ह पॉवरचा वापर करुन दिल्या ही बातमी कुठल्याच वर्तमान पत्रात नव्हती. या उलट काही व्यक्तींनी याचा पाठपुरावा करुन मायबोली सारख्या सदरातुन ती उघड केली.
कालच्या रविवारच्या सकाळची पुरवणी पहा. सोनीया आणि राहुल दोषी अथवा दोषी नाही याबाबतचे ठाम मत देण्याऐवजी बाष्कळ चर्चेत पुरवणी वाया घालवली आहे.
14 Dec 2015 - 4:13 pm | राही
आता लवासासारखी आणखी एकदोन हिल स्टेशन्स मुळशीच्या आसपास अधिकृतपणे उभी राहात आहेत.
कदाचित सगळ्या परवानग्या अधिकृतपणे घेऊन.