मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...
आधुनिक वैद्यकातली नीतीमत्ता आणि कट प्रॅक्टिस उर्फ़ रेफ़रल फ़ी
आधुनिक वैद्यकातली प्रगती म्हणजे नेमके काय ? असा हल्ली प्रश्न पडत राहतो..
हा विचार मनात येण्यास खालील कारण घडले...
प्रसंग १.
आमच्या भागात नुकत्याच सुरू झालेल्या एका मोठ्या उद्योगपतीच्या नावाने निघालेल्या हॊस्पिटलच्या उद्घाटनाची बातमी वाचून माझे एक नातेवाईक आनंदाने म्हणाले," वा...या हॊस्पिटलात गरीब रुग्णसेवा होणार बरंका.. १५ ते २० % खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव असणार आहेत इथे असं लिहिलंय "... त्यांच्या उत्साहाला आणि सकारात्मक विचारसरणीला खोडून काढणं मला बरं वाटेना. इतकंच म्हणालो, " खरंच असं झालं तर आनंदाचीच गोष्ट आहे "
प्रसंग २.
शाळेत शेजारच्या तुकडीत शिकणारा एक मित्र पंधरा वर्षांनी भेटला. आता डॉक्टर झालाय. म्हणाला, मस्त प्रॅक्टिस चालू आहे. मला आनंद वाटला.
म्हणाला, " ... आपण पेशंटला नुसतं पाठवायचं या हॊस्पिटलला , त्या कन्सल्टंटकडे , त्या लॆबोरेटरीमध्ये आणि महिन्याच्या महिन्याला कमवायचे. मजबूत धंदा आहे माहितेय? शिवाय आपल्याला टेन्शनच नाही ना काही... बाकी सारं ते बघून घेणार... " इतकं अभिमानानं सांगत होता तो ...
कॉलेजात शिकताना वैद्यकीय नीतीमत्ता आणि न्यायतत्त्वशास्त्र (medical ethics and jurisprudence) अभ्यासाला होते. त्यात पेशंटचे भले करावे, आणि जेव्हा भले होत नसेल तेव्हा निदान त्याला इजा होऊ नये इतपत तरी काळजी घ्यावी, असले मुद्दे शिकल्याचे आठवते.
त्यातले स्वत:ची आणि इतर उत्पादनांची जाहिरात करू नये, पाटीचा आकार अमुक फ़ूट x तमुक फ़ूट पेक्षा मोठा नसावा असलेही काही मुद्दे होते. ते तेव्हा थोडे वेगळे वाटले होते. आता पाटीचा आकार किती असावा यात कसली आलीय नीतीमत्ता ? आणि कोण पाळतंय ती ? इमारतीची संपूर्ण रुंदी भरून पाट्या पाहतोच की आपण. केबलटीव्हीवर जाहिराती , इंटरनेटवर जाहिराती काय कमी आहेत? ते तर जाउद्यातच..
सोशल रेलेव्हन्स :
हल्लीचं वैद्यकीय जग फ़ार आधुनिक झालेलं आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला नक्की काय अपेक्षित असतं? विविध चाचण्या एक्स रे, एम आर आय, सी टी स्कॆन किंवा ऎन्जिओप्लास्टी, बायपाससारख्या उपचारपद्धती त्यावर होणारी विविध सशोधनं इ...इ सारं तर आहेच.
डॉ.अभय बंग यांनी वापरलेला सोशल रेलेव्हन्स हा शब्द मला फ़ार महत्त्वाचा वाटतो.म्हणजे नुसती नीतीमत्ता असून उपयोग नाही तर तुमच्या कामाचा सोशल रेलेव्हन्सही हवा..... पीजीआय चंदीगढसारख्या एका नावाजलेल्या हृदयरोगोपचार केंद्रात काम करत असताना तिथलं आधुनिक संशोधनावर होणारा खर्च पाहून त्यांना जवळजवळ डिप्रेशन आलं, .. ग्रामीण आरोग्य केंद्रात औषधाला पैसे नाहीत आणि इकडे इतक्या महागड्या यंत्रणेवर पैसा खर्च करण्यात सोशल रेलेव्हन्स तो काय? प्रवेश परीक्षेला पहिलं येऊनही शेवटी त्यांनी ती संस्था सोडण्याचा निर्णय घेतला...सगळ्या स्टाफ़ला धक्का बसला.... त्यानंतर पीजीआयमध्ये थोडे आत्मचिंतन झाले आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिने ग्रामीण सेवा सक्तीची केली..... आता या प्रकारची सामाजिक जाणीव शिकवून येते का ? की सामाजिक जाणीवेची ४ लेक्चर्स ठेवली विद्यार्थ्यांना आणि त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली?
आता सेवा, सामाजिक जाणीव वगैरे जाउद्यातच...ते फ़ार थोर शब्द झाले. ...माझ्याकडे एक ज्येष्ठ जीपी डॊक्टर आलेले होते.... कुठल्यातरी मल्टिलेव्हल कंपनीचे मार्केटिंग करायला.... ....ते म्हणाले," मी यांचीच प्रोटीन पावडर घ्यायला लावतो पेशंटला".. मी म्हणालो, "अहो या डब्याची किंमत तर हजार रुपये आहे...बाजारात शंभर रुपयांत मिळते की चांगली प्रोटीन पावडर .. ".. ते म्हणाले, "तरी पेशंट आपलं ऐकतात, आपण सांगू तीच पावडर घेतात.. म्हणजे बघा केवढा बिझनेस..." मला अगदी शिसारी आली.. पेशंटच्या विश्वासाची अशी वाट लावतात हे लोक... आणि मग काही पेशंट येऊन सांगतात ," त्यांच्या प्रोटीन पावडरमुळे माझी शुगर नॊर्मलला आहे... महिन्याला हजार रुपयांची प्रोटीन पावडर घेतो.. छान आहे. "... या पेशंटची शुगर त्याच्या इतर साखररोधक औषधांमुळे योग्य पातळीत आहे हे त्याला समजत नाही...वर्षाला हा पेशंट बारा हजार रुपये उगीचच खर्च करतोय.. केवढी ही प्रचंड लुटालूट... !!!( आणि त्या पेशंटची लूट होतेय हे त्याला समजावून न सांगणारा आणि कशाला त्या जीपीबरोबरचे संबंध बिघडवा असं समजणारा मी एक घाबरट)
आरोग्यसुधारक मश्रूम्सचेसुद्धा असेच मल्टिलेव्हल मार्केटिंग करणारे पुष्कळ डॉक्टर आहेत... याला जोडधंदा म्हणावं का ?महागड्या कंपन्यांचीच औषधं रुग्णाला घ्यायला लावणारीहे खूप असतात. याचं समर्थन करावं का ?
कोणास ठाउक?
एखादा डॉक्टर फ़ी का घेतो? तर त्याने पेशंटला बरं करण्याची जी जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी ५ ते १० वर्षे केलेल्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे जी जोखीम पत्करलेली आहे, त्या प्रमाणात तो त्याचे मानधन आकारणार... पेशंटला परवडलं तर तो देणार नाहीतर दुसरा स्वस्त डॊक्टर शोधणार....पण या कट प्रॆक्टिसमध्ये होतं काय की कमीतकमी (! की शून्य) जोखमीत उगीचच रेफ़र करणारा डॊक्टर पैसे कमावणार, तेही थोडेथोडके नाहीत तर ३५ % किंवा ४० %. म्हणजे रुग्ण त्याच्या नकळत खर्या वैद्यकीय खर्चाच्या ४० % पैसे जास्त देणार....ही सगळी उपचाराच्या खर्चाला आलेली सूज आहे. पण या सुजण्याचे ऒपरेशन कोण करणार?
काही चांगले लोक इस्पितळ काढतात... सुरुवातीला असे जाहीर केले जाते की आम्ही कट देणार नाही पण नंतर कटविना परिस्थिती अवघड होत आहे हे त्यांच्या लक्षात यायला लागतं... मग हळूहळू निर्धार गळून पडतो. पुन्हापुन्हा हॊस्पिटल व्यवस्थापनाच्या मीटिंग्स होतात. आणि कट द्यायला हिरवा कंदिल मिळतो.विविध जीपींना ३५ % ते ४० % ऒफ़र करत पीआरओ पंचक्रोशीत हिंडायला लागतात...कटला रेफ़रल फ़ी हे छान नाव मिळतं..
मग हॊस्पिटल त्यांचे चार्जेस अजून वाढवतं. एक मोठे हॊस्पिटल १० % सरसकट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्ज लावतं. ( कोणत्याही इन्शुरन्समध्ये तो समाविष्ट होत नाही).हॊस्पिटलच्या ज्येष्ठ डॊक्टरांच्या मीटिंग्जमध्ये या महिन्यात फ़ार कमी इन्व्हेस्टिगेशन्स का झाल्या , इतके कमी सी टी स्कॆन का झाले ? अशा चर्चा घडतात आणि टार्गेट्स फ़िक्स होतात... गरज असो वा नसो ऒपरेशन्स आणि इन्व्हेस्टिगेशन्स होतात.
संपूर्ण वैद्यकजगताने हे कट प्रॆक्टिसचे वास्तव स्वीकारले आहे. पण या कटला विरोध न करणं म्हणजेसुद्धा आधीच आजारानं त्रासलेल्या पेशंटला रेफ़र करणारा जीपी आणि ते महागडं हॊस्पिटल यांच्यातल्या दलालीला उत्तेजन इतकंच.पण एकटा पेशंट हे कितपत थांबवू शकतो मला कल्पना नाही. पेशंट शक्य तेवढा जास्त मेडिक्लेम घेऊन बोटांची फ़ुली करून बसू शकतो. अजूनतरी आपल्या जीपीला हे विचारण्याची पद्धत नाही की "तुम्ही मला रेफ़र करणार असलात तर त्या इस्पितळाकडून तुम्ही कट घेता का? घेतला तर किती कट घेता? तेवढी रक्कम प्लीज माझ्यासाठी त्या इस्पितळाला जरा कमी करायला सांगता का?" अजून आपल्याकडे ही स्थिती आलेली नाही पण यायला फ़ार वेळ आहे असंही वाटत नाही.
सगळेच जीपी कट घेत नाहीत. नियमाने वागणारे सर्व पॆथींचे खूप चांगले जीपी मला ठाउक आहेत.पण त्यांना जम बसवायला वेळ लागतो हेही खरे...
काही चांगले जीपी लॆबोरेटोरीला किंवा डायग्नोस्टिक सेंटरला सरळ विनंती करतात की तुम्ही माझा कट न देता सरळ माझ्या पेशंटची तेवढी फ़ी कमी करा. माझ्या पेशंटला रास्त रकमेत योग्य उपचार मिळायला हवेत, म्हणजे झाले....
रेफ़रल फ़ी या शब्दावर थोडं गूगलून पाहिलं असता वकिलांच्या आणि डॊक्टरांच्या अशा दोन प्रकारच्या रेफ़रल फ़ीची उदाहरणे दिसतात... वकिलांच्या बाबतीत कायदेशीर रेफ़रल फ़ी आहे म्हणे. आणि डॊक्टरांच्या कटला अनएथिकल समजतात , त्याबद्दल नाके मुरडतात पण जितक्या पातळीचा गुन्हा तो मानायला हवा तेवढा तो मानत नाहीत....
याबद्दल मी एकदा तावातावाने बोलत असताना एका व्यवस्थापन शिकणार्या माझ्या मित्राने मला सुनावले ," तुझी अडचण ही आहे की तू अजूनही डॊक्टरी पेशाला उदात्त व्यवसाय समजतोस. तो तसा नाहीये, हे एकदा समजलास की तुझ्या जीवाला कटकट होणार नाही... रुग्ण हा ग्राहकाचे सर्व हक्क घेतो , त्याच्या हाती सीपीए ( ग्राहक संरक्षण कायदा ) चे हत्यार आहे मग त्याला सेवा देणारा डॊक्टर व्यापार्यासारखाच वागणार ना? कापड , तेल विकतो तसं आरोग्य विकायचं... आम्ही बेस्ट ट्रीटमेंट देतो आणि पैसे वसूल करतो असं कोणी म्हटलं तर यात चूक काय आहे? कमिशन आजकाल कोणत्या धंद्यात खात नाहीत? जो ग्राहकाच्या सर्वात जवळचा माणूस असतो तो कमिशन खाणारच. उदाहरणच द्यायचं तर आजकाल पुस्तकांच्या किंमती वाढलेल्या आहेत . पुस्तक प्रकाशन म्हणतं की आजकाल मोठ्या विक्रेत्यांना ४० % कमिशन लागतं , न देणार्या प्रकाशनाची पुस्तकंच बाहेर दिसत नाहीत. त्यामुळं साहजिकच प्रकाशनांनी किंमती भयानक वाढवलेल्या आहेत. शेवटी भोगतो तो वाचकच ना... तसंच इकडं आहे...सीपीए सुद्धा लावायचा आणि उदात्त व्यवसाय म्हणायचं हे डबल स्टॆंडर्ड्स नाहीत का?
त्यात आता सरकारला मेडिकल कॊलेजेस काढणं परवडेनासं झालंय त्यामुळे सरकार स्वस्तात शिक्षण देणारी नवीन मेडिकल कॊलेजेस काढणार नाही... मग जास्तीतजास्त खासगी मेडिकल कॊलेजेस निघत राहणार. इतकं महाग शिक्षण घेऊन जम बसण्यासाठी लागणारा वेळ द्यायला आज कोणाला परवडतंय ? "..
त्यावर मी इतकंच म्हणालो, " मान्यय, दोन्हीही व्यवसाय आहेत.. पण बाकीच्या सेवा वैद्यकीय सेवांसारख्या अपरिहार्य नसतात... पुस्तक महाग वाटते म्हणून मी पुस्तक घ्यायचे टाळू शकतो पण उपचार महाग वाटतो म्हणून मी तो टाळून मरण्याची जोखीम पत्करू शकत नाही. म्हणूनच डॊक्टरांची नैतिक जबाबदारी महत्त्वाची आहे. ते ती कोणतेही ( ग्राहक संरक्षण कायद्यासारखे ) कारण देऊन टाळू शकत नाहीत..."
शेवटी डॉ. अमोल अन्नदाते यांनी म्हटल्याप्रमाणे इतकेच म्हणतो की डॉक्टरांना आपल्या पेशंटपासून काही लपवण्याची वेळ येऊ नये... प्रत्येक डॉक्टरने असा निर्धार केला तरच हे फोफावणारे कटचे अर्थकारण थांबेल.
पाहुणा संपादक : भडकमकर मास्तर.
प्रतिक्रिया
29 Dec 2008 - 1:03 am | घाटावरचे भट
एका वेगळ्या वास्तवाची सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. सामन्य माणूस हॉस्पिटलाची पायरी चढल्याशिवाय त्याला हे अनुभव येत नाहीत. आणि हॉस्पिटलात जायचे म्हटल्यानेच अर्धी लोकं धीर सोडतात त्यामुळे त्यांना या मुद्द्यांवर विचार करायला सवड अथवा तसे करायची इच्छा होत असेल की नाही शंकाच आहे. एकूणच महागडे उपचार म्हणजेच चांगले उपचार (त्यात 'सुई टोचल्याशिवाय माणूस बरा होत नाही' हा समज पण आला), हा जो काही गैरसमज लोकांच्या मनात आहे तो जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता धूसरच दिसते. परंतु आपल्या लेखाने आपण या प्रबोधनास सुरुवात केली आहे, याबद्दल आपले आभार.
29 Dec 2008 - 11:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकूणच महागडे उपचार म्हणजेच चांगले उपचार (त्यात 'सुई टोचल्याशिवाय माणूस बरा होत नाही' हा समज पण आला), हा जो काही गैरसमज लोकांच्या मनात आहे तो जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता धूसरच दिसते.
मुलांना इंजेक्शनची भीती घालणारे पालक आणि त्याला मुलाने औषध घ्यावं म्हणून त्याला हो हो म्हणणारे प्रामाणिक डॉक्टर हे मात्र मला नीटसं पचलेलं नाही.
"काहीही झालेलं नाही आहे तुला, थोडी काळजी घे, आणि अगदी फारच त्रास झाला तर ये परत!" असं सांगणारे डॉक्टर जास्त विश्वासार्ह वाटतात, अगदी गाडीचा मेकॅनिकही. अर्थात "परीस्थिती गंभीर होत आहे, पुढे काहीतरी करायला पाहिजे" हे पण तेच डॉक्टर क्वचित सांगतात आणि आपल्या शरीराकडून तसाच फीडबॅक येत असतो, तेव्हा विश्वास खोटा नाही याची खात्री पटते.
आजचे संपादकही "काही झालेलं नाही तुला" या प्रकारातलेच डेंटीस्ट असल्याचा स्वानुभव!
29 Dec 2008 - 1:21 am | रेवती
हे सगळं ऐकून बघून माहीत झालं आहे आता, पण त्या माहितीचं एकत्रिकरण आवडलं.
सुदैवानं बरेचसे डॉ. घरातलेच असल्याने फारशी पिळवणूक वाट्याला आली नाही तरी
तसे नेहमीच होईल असे सांगता येत नाही. माझ्या मुलाच्या बालदम्यासाठी मात्र दिलेली औषधे
आम्हाला पटले नसतानाही दोन वर्षे दिली (नेब्युलायझर वगैरे चांगले वाटले). मुलांच्याबाबतीत
डॉ. म्हणतात तसे न करणे ही रिस्क घ्यायला नको वाटते (त्यावेळी डॉ.नी काही औषधांची
जाहिरात केल्याचे आठवते.) बाकीची औषधे हळूहळू कमी करत नेऊन
(हे मुलाच्या डॉ. ना सांगितले होते) आता दोन वर्षापासून आयुर्वेदीक औषधे देत आहोत.
बराच गुण आला आहे, अर्थात मुलगा मोठा झाल्यावरच हा बदल केला होता.
रेवती
29 Dec 2008 - 1:39 am | बन्ड्या
माझ्या एका मित्राची लॅब आहे. प्रत्येक डॉक्टरचा कट तो वेळ्च्या वेळी पोहचवतो हे मला माहित होते. पण परवा दुसर्याएका मित्राने (याचा औषधांचा व्यापार आहे )एक नवीन मोबाईल आणला होता.चांगला महागातला. त्या मोबईलच्या बॉक्स कडे पाहुन त्याला विचारले काय रे नवीन मोबाईल. तो म्हनाला हो पण माझ्यासाठी नाही एका डॉक्टरला द्यायचा आहे. त्यावर त्याने जी माहीती दिली ती एकुण वाईट वाटले. आजकाल औषधे कोणती रेफर करायची यासाठी सुधा डॉक्टर पैसे घेतात हे एकुन खरेच वाईट वाटले.
.....व्यथीत बन्ड्या
29 Dec 2008 - 2:02 am | चतुरंग
'कट प्रॅक्टिसचं' हे भूत आता संपूर्ण जगच गिळंकृत करु पहात आहे. अमेरिकेतलंच आत्ता नजरेसमोर असलेले वास्तव हेच आहे. गरज नसताना महागडी औषधे, कॅट स्कॅन, एमाराय, तपासण्या मग त्यांचे अवाढव्य खर्च भागवण्या करता मेडिकल इन्श्योरन्स आणि त्या इन्शोरन्सचे पगारातून कापून घेतले जाणारे भरमसाठ मासिक हप्ते अशा दुष्ट चक्रात अमेरिकेतले सर्व नोकरदार अडकलेले आहेत. अमेरिकेत पेशंट्स्नी डॉक्टरांना विविध केसेस मधे 'सू' करण्याचं (खटला भरण्याचं) प्रमाण इतकं जास्त आहे की डॉक्टर्स हे 'डिफेन्सिव प्रॅक्टिस' करतात. अमेरिकेतल्या वार्षिक हेल्थकेअर खर्चात १०० ते १७८ बिलियन डॉलर्स इतका अतिरिक्त खर्च ह्या डिफेन्सिव मेडिसीन वर होत असतात (हा दुवा पहा - हे आकडे २००५ मधले आहेत).
डॉक्टरांकडून नाडले गेलेले/किंवा त्यांच्या चुकांचे बळी ठरलेले पेशंट्स, त्यांना आपल्या जाळ्यात खेचून जास्तितजास्त भरपाई मिळवून द्यायला बसलेले लॉयर्स आणि हे सगळे झेंगट टाळण्यासाठी आपल्यावरची जबाबदारी टाळून पेशंट्सना तपासण्यांसाठी दारोदार फिरवणारे डॉक्टर्स हे अगदी सर्रास दिसणारे चक्र आहे. किंबहुना ती एक व्यवस्थाच बनलेली आहे. अमेरिकन हेल्थकेअर साठी वार्षिक किती खर्च होतो ह्यासंबंधी हा दुवा पहा, भारताच्या वार्षिक राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ दुप्पट ती रक्कम आहे हे पाहून डोळे फिरतात!!
हेच लोण आता आपल्याकडेही हातपाय पसरत आहे.
फॅमिली डॉक्टर ही संकल्पना हळूहळू लोप पावत गेल्याने आपला तोटा झालाय/होतोय ह्यात वाद नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबाला 'अंतर्बाह्य' ओळखणारा/री डॉक्टर काका किंवा काकू ही संकल्पना आपल्याला मानसिक आधार देणारी होती. त्यात असलेला विश्वास, आत्मियता ह्याची जागा कोरड्या व्यवहाराने कधी घेतली हे कळलेच नाही. ग्राहक संरक्षण कायदा लागू केल्याने डॉक्टर्स असुरक्षित होणारच.
त्याचा वापर तारतम्याने व्हावा, त्यातली कलमे ही मानवी संबंधांना समजून घेणारी असावीत आणि डॉक्टर हा सुद्धा एक माणूस आहे आणि तो चुका करु शकतो हे जाणून त्याभोवती विचारपूर्वक गुंफलेली असावीत अशी अपेक्षा चूक ठरु नये. तसेच पेशंट हा आपल्याकडे आलेला बकरा आहे आणि ह्याला पुढल्या सहा महिन्यात व्यवस्थित कापून त्याचा बँकबॅलन्स काही हजारांनी हलका केला नाही तर आपण चुकलो असे डॉक्टरांनीही समजू नये. परस्परविश्वास हा मूलभूत असतो त्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात हे समजून घेणारे पेशंट्स आणि डॉक्टर्स असतील तर ती सर्वांसाठीच सामाजिक आरोग्याची बाब ठरेल.
चतुरंग
29 Dec 2008 - 2:16 am | सुक्या
वैद्यकी हा आजकाल एक व्यवसाय झाला आहे. त्यामुळे इतर व्यवसायात रुढ असलेल्या गोष्टी, फसवणुक, चुकीची माहीती वगेरे या आल्याच. वास्तवीक मेडीकल ला प्रवेश घेतानाच त्यामागाचा उद्देश 'बक्कळ पैसा कमावणे' एवढाच असतो. नंतर मग डॉक्टर, स्पेशालिस्ट, लॅब असे नेटवर्क जमले की नको असनार्या किंवा गरज नसताना काही टेस्ट करायला रुग्णाला भाग पाडले जाते. लोकांनाही ह्या गोष्टीची जाणीव असते परंतु 'अडला नारायण ...' उक्ती प्रमाणे लोकही तो खर्च करतात. त्या रिपोर्ट चा नंतर काय उपयोग होतो ते देवालाच ठाउक.
एखादा डॉक्टर फ़ी का घेतो? तर त्याने पेशंटला बरं करण्याची जी जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी ५ ते १० वर्षे केलेल्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे जी जोखीम पत्करलेली आहे, त्या प्रमाणात तो त्याचे मानधन आकारणार
या आपल्या विधानाशी मी असहमत आहे. माझ्या मते कुठलाही डॉक्टर पेशंट ला बरे करण्याची जबाबदारी घेत नाही. पेशंट चे काहीही झाले तरी त्यात डॉक्टरांच्या मते त्यांची काहीही चुक नसते. अगदीच निष्काळजी पणा झाला तरी कायद्याच्या कचाटयात कुठलाही डॉक्टर सापडल्याचे मी तरी पाहीलेले नाही. वकील जसे केस लढायचे पैसे फी म्हनुण घेतो, केसचा निकाल काय लागेल याचे त्याला काहीही घेणे नसते तसेच डॊक्टर रुग्णाला बरे करण्यासाठी जे करतो त्याचे पैसे घेतो. पेशंट बरा होइल की नाही, कधी बरा होइल याचे त्याला काहीही सोयरसुतक नसते. डॊक्टरी पेशा हा उदात्त व्यवसाय आहे हे कधीच कालबाह्य झाले आहे. आज तो एक व्यवसाय आहे. फक्त व्यवसाय.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
29 Dec 2008 - 3:34 am | प्राजु
लेखाचा विषय अगदी आपल्या जवळचा आहे.
भारतात असे पर्यंत जे जे काही डॉक्टरांचे अनुभव आले ते तरी चांगले होते. पुण्यामध्ये मात्र गांव भागात एक आयुर्वेदीक डॉक्टर आहेत. अतिशय नामांकित आहेत. २००४ साली त्यांच्याकडे एकदा औषध घ्यायला गेले तर माझ्या १५ दिवसाच्या औषधांची फी ७५० रू. लावली त्यांनी. मी एकदम आवाकच झाले होते. पण त्याच डॉक्टरांकडे काही काळ शिकाऊ म्हणून काम केलेल्या डॉक्टरांनी मात्र उत्तम उपचार कमी खर्चात दिले...
इथे अमेरिकेत गेल्या महिन्यात थ्रोट इन्फेक्शन होऊन ताप आला होता. तेव्हा इथल्या डॉक्टरांनी ८०० मिग्रॅ. ची एक या प्रमाणात आयब्युप्रोफेन दिवसातून ३ वेळा घ्यायला सांगितले. २ गोळ्या पोटात गेल्यावर माझी जी काही अवस्था झाली होती.. त्यानंतर मी त्या गोळ्यांना हातही नाही लावला. कारण ऍडव्हिल च्या डबीवर २०० एम्जी च्या गोळ्या २४ तासात जास्तीत जास्त ६ च घ्या असं लिहिलेलं असतं. .. ते वाचलं मी. आणि त्या प्रोस्क्राइब करणार्या डॉक्टरची किव आली.
मास्तर, डॉक्टरी पेशातला प्रामाणिकपणा संपत आला आहे का.. अशीच शंका आली आपला हे लेख वाचून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Dec 2008 - 8:44 am | सहज
एकंदर अग्रलेखावरुन वाटते आहे की डॉक्टरमंडळींनी मनावर घेतले तरच काही तरी फरक पडू शकतो. औषधकंपन्या, विमाकंपन्या यांनी आरोग्यव्यवस्था जवळजवळ हातात घेतली आहे म्हणायला हरकत नाही. [निदान परदेशात/पाश्चात्य देशात] किंचीत आशा आहे असे वाटते.
निदान डॉक्टरांनी रुग्णाला उपलब्ध पर्याय [स्वस्त ते खर्चीक] सांगीतले पाहीजेत. मग भले त्यांचे मत एका विशिष्ट पारड्यात टाकले तरी.
तसेच आरोग्य खात्याने / म्युनिसीपाल्टीने / सेवाभावी संस्थेने प्रत्येक शहरातील प्रमुख इस्पीतळातील [सरकारी, खाजगी], लॅब मधील विशिष्ट चाचण्यांचे दर दिले पाहीजेत. उदा. एका वेबसाईटवर अशी माहीती असली तर रुग्ण स्व:ता ठरवु शकतील कुठल्या ठिकाणी जायचे.
सामान्य लोकांना लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट म्हणजे किमान ह्या कारणावरुन तरी प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत जागरुक होउन कमीतकमी वेळा डॉक्टरकडे जायची वेळ आणावी. अलोपाथी बरोबर इतर वैद्यकिय शाखातील उपचारांचा वापर करुन पहावा.
मास्तर अग्रलेख महत्वाच्या विषयावर आहे म्हणुन आवडला देखील व सामान्य लोकांच्या हातात फारसे काही नाही हे वाचुन वाईटही वाटले :-(
29 Dec 2008 - 9:24 am | मराठी_माणूस
अलोपाथी बरोबर इतर वैद्यकिय शाखातील उपचारांचा वापर करुन पहावा.
अगदी बरोबर.
29 Dec 2008 - 9:12 am | अनामिक
याच महिन्यातली गोष्टं... माझा मित्र त्याच्या आईची सर्जरी आहे म्हणून पुण्याला गेलाय. सर्जरी झाल्यावर एक आठवडा आय.सी. यु. मधे ठेवलं होतं.. त्यानंतर प्रोग्रेस बघुन रूम मधे हालवणार होते. आठवड्याच्या शेवटी प्रोग्रेस पॉझीटीव होता, पण रूम अवेलेबल नाही या कारणाने पुढचे आठ दिवस पेशंट आय. सी. यु. मधेच. नंतर कळलं कि हे लोक रूम अवेलेबल असली तरी आय. सी. यु मधुन पेशंटला हालवायला डिले करतात... आय. सी. यु.ची फी लै जास्त असते ना... जेवढे दिवस पेशंट तिथे जास्तं तेवढाच हॉस्पीटलचा फायदा. या लोकांना आपल्या हॉस्पीटलची कपॅसीटी माहीत नसते का? मग असलेल्या जागेपे़क्षा जास्त पेशंट का दाखल केले जातात?
*******
रेफरल फी सारखंच मेडीसीन प्रिस्क्राईब करायलासुद्धा डॉक्टरांना मेडिकल कंपन्यांकडून प्रलोभनं दिली जातात (नेहमीच पैशांच्या स्वरूपात असते असे नाही... कधी गिफ्ट्स तर कधी काही...)... एम. आर. लोकांचे महिण्याचे टारगेट पुर्ण व्हायला नको? .... मग डॉक्टर कमी किमतीत मिळणारे (सेम केमीकल्स असले तरी) सोडून महागडे औषधं प्रिस्क्राईब करतात. आणि आपण प्राणांशी गाठ असल्याने पैशासारख्या शुल्लक गोष्टीचा विचार करत नाही (हे त्यांनाही ठाऊक असतं आणि म्हणूनच त्यांच फावतं).
*******
सगळं दिसतं हो समोर होताना... पण करणार काय? ज्या टेस्ट करायला सांगितल्यात त्या केल्याशिवाय पेशंटला काय झालंय त्याच निदान डॉक्टर लोक करतच नाहीत. कोणत्या टेस्ट खरंच गरजेच्या आहेत ते कसं कळणार, आणि कळून तरी काय फायदा, जर टेस्ट केल्याशिवाय निदानच होणार नसेल तर?
-अनामिक
29 Dec 2008 - 10:00 am | धनंजय
आणि माझ्या मनाच्या जवळचा.
पण या समस्येवर तोडगा अनेक दिशांनी यावा लागेल, असे वाटते.
रुग्णाने सुजाण ग्राहक व्हावे हे एका बाजूने महत्त्वाचे आहेच.
पण वैद्यकाची बाजारपेठ ही मुक्त बाजारतत्त्वाला मात करणारी आहे (मार्केट फेल्युअर). अशा बाबतीत रुग्ण आणि डॉक्टर यांच्या दोघांपेक्षा वेगळा, तटस्थ पण सद्-इच्छुक नियंत्रक (रेग्युलेशन) असणे जरुरीचे आहे. हा तृतीय पक्षी नियंत्रक म्हणजे मुक्त बाजारपेठेतील विमा कंपन्या असण्याचा प्रयोग काही देशांत (मुख्यतः अमेरिकेत) झाला आहे, पण त्याचा हवा तसा फायदा झालेला दिसून येत नाही. (आप-बचावात्मक वैद्यकव्यवसाय [डिफेन्सिव्ह मेडिसिन] अमेरिकेत एक समस्या बनला आहे, त्याची विस्तृत चर्चा वर चतुरंग यांनी केलेली आहे.) नियंत्रक सरकारी असण्याचे प्रयोग काही देशांत (उदाहरणार्थ : भारत) सपशेल फसले आहेत, तर काही देशांत काही प्रमाणात कामचलाऊ आहेत (उदाहरणार्थ : कॅनडा).
डॉक्टरांच्या प्रशिक्षणात सामाजिक जाणीव असायला हवी हेसुद्धा धोरण संपादकीयात सांगितल्याप्रमाणे राबवायला हवे.
पण कुठलेही एकच धोरण राबवल्यास हवा तो फरक पडणार नाही, असे वाटते.
बारावीमधली मुले अभियांत्रिकीला जावोत, व्यापारक्षेत्रात जावोत, किंवा वैद्यकक्षेत्रात जावोत - सामान्यपणे भविष्यातील उदरनिर्वाह/लाभ या दृष्टीने विचार करून निवड करणार. अभियांत्रिकीचा विचार करताना त्या व्यवसायातील लाभाचा विचार करतील, पाच मिनिटांनी वैद्यकाचा विचार करताना मात्र सामाजिक जाणीव जागृत होईल, अशी अपेक्षा कशी करावी? अवघ्या समाजातच सामाजिक जाणीव पेरली तर बरे.
फक्त ग्राहक सुजाण होऊन चालणार नाही, कारण कित्येक गावांत पर्याय काय असतो?
फक्त नियंत्रण कडक करून चालणार नाही, कारण ग्राहक/व्यावसायिक बाजार सुजाणपणे/सचोटीने करणार नसतील तर नियंत्रक भ्रष्ट होण्यास ते आमंत्रणच आहे.
ग्राहक-व्यावसायिक-नियंत्रक तीन्ही बदलायला पाहिजेत.
- - -
आता सैद्धांतिक मुद्दा :
"रिफरल फी" या प्रकाराला माझा सैद्धांतिक विरोध नाही. सामान्य-चिकित्सक (जनरल प्रॅक्टिस) डॉक्टर हा रुग्णांची वाहातुक सुरळित करतो - ज्यांना विशेषज्ञाकडे जायची गरज नाही, त्यांना तसे सांगतो, ज्यांना विशेषज्ञाकडे जायची गरज आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. या सेवेत जो वेळ खर्च होतो, त्याचा मोबदला कुठल्या तरी प्रकारे मिळायला पाहिजे. माझ्या मते तो रुग्णाने थेट द्यावा - म्हणजे या वाटाड्याचे आर्थिक कंत्राट-कर्तव्य रुग्णाच्यासाठी राहील. पण अशा बाबतीत रुग्णाला सेवा पुरेशी वाटत नाही - जो डॉक्टर खुद्द उपचार (तोही जालिम हवा! - म्हणजे खेड्यामध्ये इंजेक्शन, सलाईन...) करत नाही, तो काही मूल्य देण्यासारखी सेवा करतो असे कित्येक रुग्णांना पटत नाही. (असा माझा तरी अनुभव होता. पण मला सरकारी पगार होता, म्हणून करदाता मला त्या सेवेसाठी मोबदला देत होता.) अशा परिस्थितीत खाजगी दवाखान्यांत हा मोबदला रुग्णाने आडमार्गाने देण्याशिवाय पर्याय राहात नाही. (म्हणजे अंतिम उपचार करणार्या, किंवा लॅबटेस्ट करणार्या डॉक्टराच्या फीवरचा अधिभार=रिफरल फी.) यात तोटा असा होतो, की वाटाड्या डॉक्टरचे प्राथमिक कंत्राट-कर्तव्य रिफरल फी देणार्या विशेषज्ञाकडे असते, रुग्णाकडे नाही.
29 Dec 2008 - 10:33 am | सहज
हा फार गुंतागुंत असलेला प्रकार आहे व शहरी विभागात बाजारभावाप्रमाणे इतर सेवा-धंदा प्रमाणे याची रक्कम ठरली जाणार. हळुहळू विमाकंपन्या, कामगार कायदा अश्या साधनातुन एक आरोग्य व्यवस्था येणार. [जशी आता दिसते आहेच]
राहता राहीली ती गरीब लोकांकरता, ग्रामीण लोकांकरता वेगळी योजना बनणे [फुकट नाही पण जरा स्वस्त]. यात सरकार /करदाता व विमाकंपन्या या हातभार लावणार. औषधकंपन्यांना कडून सवलतीच्या दरात औषधे घेणे व देशातील सर्व खाजगी डॉक्टरांना [वर्षातुन एक महीना असे] या विशिष्ट आरोग्य केंद्र व इस्पीतळात सक्तीची सेवा [जशी नॅशनल सर्व्हीस - Conscription] करायला लावणे. किंवा आहे त्या इस्पीतळात , क्लीनिकमधे तेच डॉक्टर हीच सेवा उपलब्ध करुन देणार.
थोडक्यात काही लोकांकडून जास्त पैसे, काही लोकांकडून कमी. एकंदर विमाकंपन्या यात आल्याशिवाय खरे नाही.
हा एक सामाजीक प्रश्न आहे व सगळ्यांनी [रुग्ण, डॉक्टर, विमाकंपन्या, सरकार, औषधकंपन्या] जबाबदारी वाटून घेतल्याशिवाय इतर उपाय नाही.
29 Dec 2008 - 11:00 am | चित्रा
यात तोटा असा होतो, की वाटाड्या डॉक्टरचे प्राथमिक कंत्राट-कर्तव्य रिफरल फी देणार्या विशेषज्ञाकडे असते, रुग्णाकडे नाही.
अगदी खरे. यामुळेच तर हळूहळू संपूर्ण व्यवसायाचे नाव बदनाम होते.
चांगल्या विषयावरचा लेख, आवडला.
29 Dec 2008 - 10:34 am | अमोल केळकर
संपादकीय विचार करायला लावणारे
भरमसाठ डोनेशन भरुन वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या या तरुण डॉक्टरांकडून वैद्यकीय क्षेत्राचा धंदा न केल्यास नवल !
दुर्दैवाने फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट ही इतिहासजमा होत आहे.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
29 Dec 2008 - 12:35 pm | सुनील
सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील अग्रलेख.
खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात लाखो रुपये भरून घेतलेल्या शिक्षणाचा व्यापार हा होणारच. केवळ अभ्यासक्रमात नीतीमत्तेचे चार धडे घालून फारसा फायदा नाही. वर धनंजय यांनी सुचवल्याप्रमाणे, रुग्ण आणि डॉक्टर यांतील नियंत्रकाचे काम करणार्या संस्थेवरील जबाबदारी फार मोठी आहे. आणि ही जबाबदारी केवळ सरकारच (फक्त जबरदस्त इच्छाशक्ती तेवढी हवी) समर्थपणे पार पाडू शकेल. बराक ओबामा यांच्या निवडणूक प्रचारात हा एक फार मोठा मुद्दा होता, हे आठवत असेलच. अमेरीकेत विमा कंपन्यांनी वैद्यकीय व्यवसायाची पार वाट लावली आहे त्यामानाने ब्रिटनमध्ये (सरकारी नियंत्रणामुळे) परिस्थिती इतकी आटोक्याबाहेर गेलेली नाही.
तात्विकदृष्ट्या रेफरल फीमध्ये गैर काही नाही. मात्र वारंवार एखाद्या डॉक्टरकडून, रुग्णांना "तुम्हाला काही झाले नाही" हे सांगण्यासाठी भरमसाठ खर्चाच्या तपसण्या करण्यासाठी रेफरन्स जात असतील, तर ते नक्कीच अयोग्य आहे.
सामान्यतः लागणार्या जवळपास सत्तर (चुभुद्याघ्या) औषधांची एक यादी सरकारने बनवली होती. आणि ती औषधे जेनेरीक नावांनीच विकावीत असा आदेशही निघणार होता. मात्र झारीतील शुक्राचार्यांमुळे तो अद्याप निघाला नाही, असे समजते. बांगलादेशसारखा देशही जे करू शकतो, ते आपल्याला का जमू नये?
उत्तम अग्रलेखाबद्दल भडकमकर मास्तरांचे आभार!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Dec 2008 - 9:36 pm | भडकमकर मास्तर
अमेरीकेत विमा कंपन्यांनी वैद्यकीय व्यवसायाची पार वाट लावली आहे त्यामानाने ब्रिटनमध्ये (सरकारी नियंत्रणामुळे) परिस्थिती इतकी आटोक्याबाहेर गेलेली नाही.
एका अमेरिकेतल्या मित्राकडून कळाले की त्याच्या डेन्टिस्टच्या दुकानाच्या आतच एक वकील केबिन मांडून बसलेला असतो आणि डेन्टिस्टाकडे जायच्या आधीच वकिलाच्या खोलीत जाऊन जर डेन्टिस्टाने माझी वाट लावली त्यावर कोणते खटले दाखल करता येतील आणि कशी भरपाई मिळवता येइल त्यावर चर्चा होते म्हणे...
... काय ऐकावे ते नवलच...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
29 Dec 2008 - 1:46 pm | मनस्वी
ऍट दी एंड ऑफ दी डे मनाने विचारलेल्या प्रश्नांची समाधान वाटेल अशी उत्तरे देणे आणि मनाने प्रश्नच विचारायचे टाळणे.
29 Dec 2008 - 2:20 pm | चेतन
सुंदर अग्रलेख.
मास्तर तुम्ही म्हणताय ते पटतयं खरं. पण हा प्रकार फक्त तेव्हाच लक्षात येतो जेव्हा बिल बरेच... होते. बाकी वेळा हे कळत ही नाही. शिवाय आज काल डॉक्टर रिस्कही कमी घेतात त्यामुळे बर्याच टेस्ट कराव्या लागत असाव्यात.
तरी पेशंट आपलं ऐकतात, आपण सांगू तीच पावडर घेतात.. म्हणजे बघा केवढा बिझनेस या लोकांना मात्र फाट्यावर मारलं पाहिजे.
अवांतरः मी असेही काही लोक पाहिलेत की ज्यांना मुद्दामुन काहितरी छोटमोठ अजारपण हवं असतं
चेतन
29 Dec 2008 - 3:49 pm | बापु देवकर
सुंदर अग्रलेख........ भडकमकर मास्तरांचे आभार!
"अवांतरः मी असेही काही लोक पाहिलेत की ज्यांना मुद्दामुन काहितरी छोटमोठ अजारपण हवं असतं"
== अश्या लोकांना नक्किच सुख टोचत असणार..
29 Dec 2008 - 3:51 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो.
हा कट कायम शिजणार.
29 Dec 2008 - 5:27 pm | मैत्र
मास्तर तुमची तळमळ आणि काहीही कारणाशिवाय फक्त गल्ला भरण्यासाठी कट याबद्दलची चीड स्पष्ट जाणवते आहे.
पण हा समाजातल्या इतर सर्व क्षेत्रासारखाच भ्रष्टाचार आहे जो पकडता ही येत नाही आणि तितका उघडही नाही.
काही इतर प्रतिक्रियांप्रमाणे केलेला खर्च परत मिळवण्याचाही प्रकार आहे. पण तो सरळ चार्ज न करता गैरमार्गाने घेतला जातो आहे.
हे राजकीय पद मिळवताना पैसे खर्च करणे आणि ते मिळवण्यासाठी कंत्राटे / उद्योगपती यांच्या मार्गाने वसूल करणे इतकेच गंभीर मात्र आहे.
एक प्रश्नः यु के मध्ये सरकारी दवाखाने (एन एच एस) मध्ये औषध द्यायला प्रचंड टाळाटाळ करतात. सर्दी / ताप / डोकेदुखी/ उलट्या / जुलाब ( डायरिया सदृश) काही व्हायरल ताप ज्याला भारतातले आपले अगदी फॅमिलि डॉक्टर सुद्धा अँटिबायोटिक्स देतात त्याला ते काहीही औषधच देत नाहीत. तीन तीन ताप असताना लहान दोन तीन वर्षाच्या मुलांनाही काही उपचार करत नाहीत. यामागे काही शास्त्र आणि आपल्याकडे अवास्तव औषधांचा मारा होतो की ते काही परिणाम होउ नये म्हणून एक प्रकारची डिफेंन्सिव ट्रीटमेंट आहे की काहीच उपचार करायचे नाहीत. माझा स्वतःचा आणि अनेक मित्र मैत्रिणिंचा अनुभव आहे. आणि यु के मध्येच हे फार घडतं.. माहितगारांनी प्रकाश टाकावा...
29 Dec 2008 - 9:42 pm | भडकमकर मास्तर
यामागे काही शास्त्र आणि आपल्याकडे अवास्तव औषधांचा मारा होतो की ते काही परिणाम होउ नये म्हणून एक प्रकारची डिफेंन्सिव ट्रीटमेंट आहे की काहीच उपचार करायचे नाहीत.
हे वाक्य कळाले नाही,...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
30 Dec 2008 - 10:35 am | मैत्र
यामागे काही शास्त्र आणि आपल्याकडे अवास्तव औषधांचा मारा होतो की ते काही परिणाम होउ नये म्हणून एक प्रकारची डिफेंन्सिव ट्रीटमेंट आहे की काहीच उपचार करायचे नाहीत.
मला असं म्हणायचं होतं की औषधे न देण्यामागे काही शास्त्र आहे का? माझ्या मित्राच्या मुलाला खूप ताप होता सर्दी होती. (वय -२ वर्षे) पण त्यांनी औषध दिले नाही. लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते असं त्या एन एच एस मधल्या डॉक्टर / नर्सेस ने सांगितलं. हे खरं आहे का? मग त्याचा अर्थ भारतात औषधांचा अवास्तव मारा होतो का?
असं कधीच होत नाही की काही छोटं मोठं दुखणं आहे आणि तुम्ही औषध घेणं टाळता. आपल्या कडे केमिस्ट सुद्धा बिनधास्त औषधे देतात. काहीही होत असेल तरी साधे उपाय करा ऍलोपॅथीचं औषध घेऊ नका असं कोणीच सांगत नाही. काही ना काही औषध हे दिलंच जातं.
डिफेंन्सिव्ह ट्रीटमेंट - काही इतर परिणाम होऊ नयेत म्हणून लहान आजार, जास्त ताप किंवा अशा कारणांसाठी काहीच औषध द्यायचे नाहीत. जबाबदारी टाळण्याचा प्रकार.
30 Dec 2008 - 1:05 am | चतुरंग
एक प्रश्नः यु के मध्ये सरकारी दवाखाने (एन एच एस) मध्ये औषध द्यायला प्रचंड टाळाटाळ करतात. सर्दी / ताप / डोकेदुखी/ उलट्या / जुलाब ( डायरिया सदृश) काही व्हायरल ताप ज्याला भारतातले आपले अगदी फॅमिलि डॉक्टर सुद्धा अँटिबायोटिक्स देतात त्याला ते काहीही औषधच देत नाहीत. तीन तीन ताप असताना लहान दोन तीन वर्षाच्या मुलांनाही काही उपचार करत नाहीत. यामागे काही शास्त्र आणि आपल्याकडे अवास्तव औषधांचा मारा होतो की ते काही परिणाम होउ नये म्हणून एक प्रकारची डिफेंन्सिव ट्रीटमेंट आहे की काहीच उपचार करायचे नाहीत. माझा माझा स्वतःचा आणि अनेक मित्र मैत्रिणिंचा अनुभव आहे. आणि यु के मध्येच हे फार घडतं.. माहितगारांनी प्रकाश टाकावा...
»
सर्दी/ताप/डोकेदुखी/जुलाब/उलट्या ह्यावर लागलीच औषध न देणे हे योग्य वाटते. सर्दीला तसेही रामबाण औषध नसतेच.
अतिशय जुनाट वारंवार होणारी सर्दी असेल तर डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणे उत्तम अन्यथा सर्वसामान्य स्वरुपाची सर्दी आपोआपच आठवड्याभरात आटोक्यात येते.
ताप आलेला असला तर फक्त ताप कमी करण्यासाठी टायलेनॉल्/ऍडविल अशी ओवर दि काऊंटर औषधे असतात. त्यानेही ताप रहात नसेल तर मात्र पुढील उपचार करणे योग्य. मुलांचा ताप वाढला की आई-वडील घाबरुन जातात आणि डॉक्टरांनी लगोलग औषधे दिली नाहीत तर त्यांना अस्वस्थपणा येतो.
फार जास्त ताप येऊन मूल ग्लानीत जात असेल तर ताप उतरवण्यासाठी चक्क थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवाव्यात (आम्ही हा उपाय आमच्या मुलाबाबत तो लहान असताना बर्याचवेळा केलाय).
त्यानंतर डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात ती द्यावीत.
अँटीबायोटिक हे व्हायरल इन्फेक्शनवर देत नाहीत ते फक्त बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर देतात.
जुलाबावरही लगेच औषध लागू पडत नाही पोटातले इन्फेक्शन जाईपर्यंत जुलाब होत रहातात. वरुन सतत साखर-पाणी, चहा, मेडीकेटेड पॉप्सिकल्स (बर्फाच्या कांड्या असतात - सीवीएस फार्मसी सारख्या दुकानात मिळतात - जुलाबातून जाणारी विटामिन्स आणि मिनरल्स त्यातून मिळतात आणि पाणीही मिळते मुलांना त्या आवडतातही). पोटातले इन्फेक्शन गेले की जुलाब आटोक्यात येतात. फार जास्ती जुलाब असतील तर औषधाबरोबरच मुलांच्या कपाळावर थंड दुधात भिजवलेल्या कापडाच्या घड्या ठेवाव्यात त्याने उत्तम उपचार होतो.
(डिसक्लेमर - वर सांगितलेले काही उपचार हे आम्ही आमच्या मुलाबाबत आम्ही यशस्वीरीत्या कोणताही अपाय न होता वापरलेले आहेत. तरीही आपापल्या जबाबदारीवरच ह्याचा वापर करावा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात टाळाटाळ करु नये.)
चतुरंग
30 Dec 2008 - 10:40 am | मैत्र
या माहिती साठी खूप आभार.
पण याचा अर्थ हा की या गोष्टींसाठी आपण जसं भारतात डॉक्टर कडे धाव घेतो आणि ते चार औषधे देतात ते बरोबर नाही.
अँटीबायोटिक हे व्हायरल इन्फेक्शनवर देत नाहीत ते फक्त बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर देतात. हे अनवधानाने आणि थोडी माहिती नसल्याने लिहिलं. पण व्हायरल इन्फेक्शन ने ताप आला असेल तरी लवकर औषधोपचार केले जात नाहीत. तुम्ही सांगितल्या प्रमाणे काही औषधे चार दिवस घेऊन जर ताप /आजार कमी होत नसेल तर पाहू असं एन एच एस मध्ये सांगतात. लहान मुलाला तीन तीन ताप असेल तरी चार दिवस औषध न देणं हे न समजण्या सारखं वाटलं.
31 Dec 2008 - 5:14 am | चतुरंग
समजुतीतून आपण तापावर औषध अपेक्षितो पण ताप हे शरीरात काहीतरी चुकीचे घडते आहे हे दर्शविणारे लक्षण आहे. उपचार लक्षणावर होऊन फारसा उपयोग नसतो. मूळ दुखण्याचे कारण सापडायला थोडा वेळ लागतोच आणि त्याप्रमाणे उपचार केले जाऊ शकतात. दरम्यानच्या काळात ताप अतिशय जास्त (जसे २ किंवा ३ किंवा अधिक) होऊ नये म्हणून उपचार गरजेचे असतात आणि ते सर्वसाधारणपणे कोणतेही डॉक्टर्स सांगतातच. कितीही ताप असला तरी काहीच करु नका असे कोणी सांगत असेल असे वाटत नाही, जर असेल तर दुसर्या डॉक्टरांकडे जाणे उत्तम!
चतुरंग
29 Dec 2008 - 7:38 pm | लिखाळ
चांगले संपादकीय.
समाजातल्या नैतिकतेची दरडोई साधारण घट सर्व व्यवसायात परावर्तीत होते आहे तशी वैद्यक क्षेत्रातही. शिक्षण आणि वैद्यक-सुशृषा हे व्यवसाय उदात्त आहेत अशी समाजाची धारणा असावीच असे मला वाटते.
सकाळ मधील फॅमिली डॉक्टर अंकात गरज फॅमिली डॉक्टरची या लेखात अनेक सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांना लेखिकेने स्पर्ष केलेला दिसतो.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
30 Dec 2008 - 2:59 am | संदीप चित्रे
मास्तर... उत्तम संपादकीय लेखाबद्दल अभिनंदन...
कट प्रॅक्टिस, अनावश्यक टेस्ट इ. मुळे उपचारांचा खर्च भरमसाठ वाढला आहे अगदी नक्की.
आमच्या एक स्नेही इथे अमेरिकेत डॉक्टर आहेत. त्यांच्याकडून ह्याची दुसरी बाजू समजते ....''वकील' ह्या प्राण्याने इथल्या डॉक्टरांना अक्षरशः हैराण करून सोडलंय !!
30 Dec 2008 - 4:01 am | शितल
मास्तर,
संपादकिय लेख अशा विषयावर लिहिला आहात की, प्रत्येकाला ह्या गोष्टीचा थोड्या फार प्रमाणावर अनुभव आलेला असतोच.
डॉक्टरांवर विश्वास ठेवुनच पेशंट सर्व टेस्ट करतो, आपला खिशा कापला जात आहोत याची त्यावेळी कदाचित जाणीव ही नसते कारण मानसिकता वेगळी असते.
डॉक्टर आणि पेशंट हे नाते अजुन सुदृढ व्हावे ही देखिल एक गरज आहे. :)
2 Jan 2009 - 1:47 pm | झकासराव
चांगला आहे अग्रलेख.
कट प्रॅक्टिस कशी आणि किती चालते हे माझ्यासारख्या सामान्य लोकाना कस कळणार??
ते कळत नाही म्हणुन मग पैसे एक्स्ट्रा जाणारच की. :(
2 Jan 2009 - 3:03 pm | ऋषिकेश
अग्रलेख आवडला.. बराचसा पटला
यानिमित्ताने मी उपक्रमावर सुरु केलेल्या चर्चेची आठवण झाली
-ऋषिकेश
2 Jan 2009 - 8:59 pm | कलंत्री
सरकारी दवाखाने बंद होत गेले आणि खाजगी दवाखानेवाल्यांचे खरे स्वरुप समोर यायला लागले.
पूर्वी (५० वर्षापूर्वी) जन्म दवाखान्यात होत असत आणि मृत्यु मात्र घरीच होत असत. आज ८० वर्षाच्या रुग्णास ही जगवण्याच्या सबबीखाली २/३ महिने उपचार करुन शक्य तितके जास्त पैसे उकळले जातात.
कोठेही औषधाचे / तपासणीचे बील मागितले असता जास्त बिल करुन हवे का असेही विचारले जाते.
सर्वच व्यावसायिकांना एका रात्रीतच श्रीमंत व्हायचे असल्याकारणे हे प्रकार होत आहेत आणि होत राहतील.
पूर्वी जसे न्यायालयाची पायरी चढु नये असे म्हणत तसे कालांतराने दवाखान्याची पायरी चढु नये असे शिकविले जाईल.