आरसा आणि फूल

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in दिवाळी अंक
15 Oct 2015 - 2:56 pm

.
.
सानिकाची शाळेची तयारी चालू होती. सानिकाच्या आईला, म्हणजेच नेत्रालाही बॅंकेत वेळेवर पोहोचायचं होतं. आज बॅंकेत पूजा होती. "हेअर बॅंड लावलास का सानिका?" नेत्रा पर्समधला छोटा आरसा काढत ओरडली. एकीकडे नेत्रा आपले केस विंचरत होती. "हो आई, तूच तर लावलास." सानिका खोलीत येत म्हणाली. "एवढी वेणी घातलीय आज, पण फूल नाहीये माळायला. जाऊ दे, आता कोण बघतंय! आम्हाला तसंही कोण फुलं आणून देतं?" नेत्रा स्वत:शीच पुटपुटत होती. "सानिका, चल बूट घाल. स्टॉपवर वेळेत पोहोचलो नाही, तर बसही जाईल" म्हणत नेत्राने आरसा पर्समध्ये टाकला आणि पर्स उचलली.

स्कूलबसच्या स्टॉपवर नेत्राने सानिकाला उतरवलं. सोबत तिच्या दोन मैत्रिणीही होत्या. "मी जाऊ मग सानू? जाशील नं नीट?" नेत्राने विचारलं. "हो!" मैत्रिणीशी गप्पा मारता मारताच सानिका म्हणाली. नेत्रा निघून गेली. स्टॉपपासून काही पावलांच्या अंतरावर एक लहान मुलगी टोपलीत भरून गुलाबाची फुलं विकत होती. तिथे एक स्कूटर येऊन थांबली. "कितनेका दिया?" "दस का एक साब" "पाच का एक देती है तो दे" हो-नाही करत त्या स्कूटरवरून आलेल्या माणसाने दोन गुलाब विकत घेतले. "साब, वो दिखाओ ना" स्कूटरच्या आरशाकडे बोट करत ती मुलगी म्हणाली. "तुम्हे क्या करना है?" असं तुसडेपणाने म्हणत तो माणूस चालता झाला. सानिका हे सगळं बघत होती. इतक्यात स्कूलबस आली आणि स्टॉपवरची बच्चे कंपनी शाळेकडे रवाना झाली.

अगदी नेहमीसारखाच तो दिवस गेला. दुसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे बाबा लवकर ऑफिसला निघून गेलेले. सानिकाची शाळेत जायची तयारी, नेत्राची बॅंकेत जायची लगबग चालू होती. "तुझं दूध गरम करतेय मी. अवरून झालं की नीट प्यायचंय सगळं हं" नेत्राने सानिकाला बजावलं. नेत्रा स्वयंपाकघरात गेली. सानिकाने हेअर बॅंड लावला आणि काही गोष्टींचं तिच्या डोक्यात चालू असलेलं कसलंतरी चक्र वेगात फिरलं. नेत्रा खोलीत येताच सानिका म्हणाली "आई, तुझा हा आरसा मी घेऊ?" "कशाला??" नेत्राने जरा त्रासतच विचारलं. सानिकाने उत्तर दिलं, "अगं खेळून झालं मधल्या सुट्टीत की केस विस्कटतात ना.. मग बघायला." "हो का?" नेत्राने प्रश्न केला, "पण बाई ओरडल्या तर?" "नाही गं ओरडणार" सानिका म्हणाली. "बरं, चल घे. आटप आता." नेत्राची नेहमीप्रमाणेच घाईगडबड चालू होती.

सानिकाने तो आरसा फ्रॉकच्या खिशात घातला. तिला स्टॉपवर सोडून नेत्रा गेल्यावर सानिका त्या मुलीजवळ गेली. तिने खिशातून तो आरसा काढला. तिला म्हणाली, "हे घे". त्या मुलीला काही कळेना. ते कळून घ्यायची इच्छाही तिला नव्हती. तिने तो आरसा सानिकाच्या हातातून घेतला आणि आपला चेहरा त्यात बघू लागली. तिच्या चेहर्‍यावर आनंद, आश्चर्य, तेज सगळं एकवटून आलं होतं. तिची तंद्री मोडत सानिका म्हणाली "मला एक गुलाब देशील?" दोन मिनिटं टोपली आणि सानिकाकडे आलटून पालटून बघितल्यावर ती मुलगी "घे हवी तेवढी" असं म्हणून पुन्हा आरशात बघायला लागली. सानिकाने एक फूल उचललं आणि दप्तरात टाकलं.

संध्याकाळी घरी नेत्रा खोलीत काहीतरी आवरत होती. ती नुकतीच ऑफिसातून आली होती. सानिका खोलीत आली आणि तिने नेत्राला हात लावून हाक मारली. "आई, आई..." "ओ!..." नेत्रा न बघताच म्हणाली. "इकडे बघ ना" "काय सानू... नंतर बोलू ना, आत्ताच आलेय गं मी.." सानिका म्हणाली. "हे बघ मी तुला फूल आणलंय. तुला हवं होतं ना...." सानिकाने गुलाबाचं फूल पुढे केलं. नेत्राला काही क्षण काय बोलावं कळलं नाही, तिने ते फूल केसात माळलं आणि सानिकाला जवळ घेतलं. नेत्राचा चेहरा उजळला होता.

कुणाच्या हातात आरसा होता आणि चेहर्‍यावर हसू; कुणाच्या केसात फूल होतं आणि चेहर्‍यावर हसू; आणि कुणाच्या डोळ्यात आपण एका कृतीतून या दोन चेहर्‍यांवर हसू आणलं याचं समाधान होतं आणि चेहर्‍यावर हसू!

-----------------------------

1
(चित्रः नीलमोहर)
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 10:15 am | कविता१९७८

मस्त कथा

पैसा's picture

10 Nov 2015 - 9:54 pm | पैसा

निरागस कथा! आवडलीच! नीलमोहरचं चित्रही छान!

प्रभाकर पेठकर's picture

12 Nov 2015 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर

आटोपशीर पण एक महत्त्वाचा संदेश देणारी कथा. समाजातील दोन वर्ग एकमेकांपासून एव्हढे दूर दूर का असतात? कधी जवळकीचा विचार डोक्यात आला तरी हातून पटकन कृती होत नाही. संकोच का वाटतो? शहरात राहून मोठे होता होता आपण आपल्यातली 'मुलांची निरागसता' हरवून बसलो आहोत ही अत्यंत दु:खाची गोष्ट आहे.

मुक्त विहारि's picture

13 Nov 2015 - 6:06 pm | मुक्त विहारि

"शहरात राहून मोठे होता होता आपण आपल्यातली 'मुलांची निरागसता' हरवून बसलो आहोत ही अत्यंत दु:खाची गोष्ट आहे."

+१

पद्मावति's picture

12 Nov 2015 - 2:28 pm | पद्मावति

फारच गोड कथा. खूप आवडली.
निलमोहोर चे चित्रही मस्तं.

मधुरा देशपांडे's picture

12 Nov 2015 - 2:29 pm | मधुरा देशपांडे

गोड निरागस कथा. आवडली. चित्रही छान.

एस's picture

12 Nov 2015 - 6:25 pm | एस

साधीसरळ कथा आवडली!

कथा आणि चित्र दोन्ही छान.

प्रीत-मोहर's picture

12 Nov 2015 - 6:38 pm | प्रीत-मोहर

सुरेखच

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 6:54 pm | सानिकास्वप्निल

गोड कथा.
चित्रही आवडले.

यशोधरा's picture

12 Nov 2015 - 7:02 pm | यशोधरा

छान कथा.

मितान's picture

12 Nov 2015 - 8:35 pm | मितान

गोड गोष्ट!

एक एकटा एकटाच's picture

12 Nov 2015 - 9:22 pm | एक एकटा एकटाच

कथा आणि त्याला साजेसं चित्र

दोन्ही अगदी सुरेख

इडली डोसा's picture

12 Nov 2015 - 9:36 pm | इडली डोसा

दोन्ही मस्त.

मोगा's picture

13 Nov 2015 - 6:09 pm | मोगा

छान

नाखु's picture

14 Nov 2015 - 2:44 pm | नाखु

आमची दाद मन दर्पण >

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 11:13 am | वेल्लाभट

सर्व वाचक व प्रतिसादकांचे मनापासून आभार
आणि संपादक व अंकाशी संबंधित सगळ्यांचेही. :)

जगप्रवासी's picture

18 Nov 2015 - 1:20 pm | जगप्रवासी

सुरेख कथा

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2015 - 9:59 pm | स्वाती दिनेश

छान गोष्ट, आवडली.
स्वाती

तुमचा अभिषेक's picture

18 Nov 2015 - 10:17 pm | तुमचा अभिषेक

मस्त. आवडली :)

सूड's picture

18 Nov 2015 - 10:31 pm | सूड

सुंदर!!

अभिजीत अवलिया's picture

21 Nov 2015 - 10:40 pm | अभिजीत अवलिया

मस्त ....

दमामि's picture

25 Nov 2015 - 4:26 pm | दमामि

छान,निरागस कथा!

वेल्लाभट's picture

25 Nov 2015 - 5:10 pm | वेल्लाभट

प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद :)
जगप्रवासी, स्वाती दिनेश, अभिषेक, अभिजीत, सूड, दमामि.. सगळे.

कपिलमुनी's picture

25 Nov 2015 - 5:14 pm | कपिलमुनी

कथा आवडली !

नीलमोहर's picture

25 Nov 2015 - 5:26 pm | नीलमोहर

कथा आवडली हे लिहायचं राहूनच गेलं होतं.

भानिम's picture

25 Nov 2015 - 6:33 pm | भानिम

निर्मळसुंदर!

साधी सोबर कथा पण किती मोलाचा संदेश :))