तारीख: २४ डिसेंबर १९९९ वेळ दुपारी ४ वाजता.
स्थळ: त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, काठमांडू नेपाळ.
इंडियन एअरलाईन्सच्या आय सी ८१४ (एअरबस ए३००) या विमानाने नवी दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केले. प्रवासाचा अपेक्षित कालावधी होता १ तास २० मिनिटे.
एकूण प्रवासी - १७८; वैमानिकांसह एकूण कर्मचारी - १५
नेपाळची हवाईहद्द ओलांडून भारताच्या हवाईहद्दीमध्ये विमानाने अंदाजे ४:३० वाजता प्रवेश केला.
विमानाचे मुख्य वैमानिक होते कॅप्टन देवी शरण. त्यांच्या खेरीज कॉकपिटमध्ये होते सह-वैमानिक सिंग आणि फ्लाईट इंजिनियर श्री. जागिया. केबिन क्रूचे प्रमुख होते अनिल शर्मा
विमानातील बहुतांश प्रवासी नेपाळहून भारतात परतणारे पर्यटक होते. त्यामध्ये मधुचंद्राहून परतणाऱ्या रीपण व रचना कट्याल या नवदांपत्याचाही समावेश होता. विमान ठराविक उंचीवर पोचल्यावर केबिन क्रूने प्रवाशांना नाश्ता देण्यास सुरुवात केली. अनिल शर्मा यांनी कॉकपिट मध्ये जाऊन कॅ शरण व त्यांच्या सहकाऱ्यांना चहा नेऊन दिला. कॉकपिट मधून परतत असताना प्रवाशांपैकी एकजण चेहरा झाकणारी टोपी घालून त्यांच्यावर चालून आला. त्याच्या हातात पिस्तूल होते. काही क्षणांतच त्याने कॉकपिट मध्ये प्रवेश मिळवला अन कॅ शर्मा यांच्या मानेवर पिस्तूल रोखले व त्यांना धमकावत विमानाच्या अपहरणाची घोषणा केली. विमान पश्चिमेकडे उडवत राहण्याची सूचना त्याने केली.
त्याच्याखेरीज इतर चार अपहरणकर्ते प्रवाशांमध्ये होते. त्यांनी देखील शस्त्रांच्या जोरावर प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. नाश्त्यासाठी मिळालेले अन्न खाली फेकण्याची सूचना केली, रुमाल, दुपट्टा वगैरेसारख्या कापडांनी डोळ्यावर पट्टी बांधण्यास सांगितले व मान खाली झुकवून दोन्ही हातांची घडी डोक्यावर ठेवण्यास सांगितले. अर्थात या अनपेक्षित संकटाला घाबरलेल्या प्रवाशांकडून कुठलाही प्रतिकार न होता या सूचनांचे पालन करण्यात आले. तेवढ्यात कॉकपिटमधून मायक्रोफोनद्वारे कॅप्टन शरण यांनी प्रवाशांसाठी घोषणा केली की आपल्या विमानाचे अपहरण झाले आहे. संयम बाळगा व अपहरणकर्त्यांच्या सूचनांचे पालन करा.
अपहरणकर्त्यांनी काही पुरुष प्रवाशांना इकॉनॉमी क्लास मधून एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये हलवले. यामध्ये एक जण होता रिपण कट्याल. तिथे अगोदरच इतर पुरुष प्रवासी होतेच. अपहरणकर्त्यांनी या पुरुष प्रवाशांचे हात पाठीमागे वळवून नायलॉनच्या दोरीने बांधले व सिटसला पूर्ण रिक्लाइन करून सिटबेल्टस लावले. प्रतिकार करू शकतील असे जे दिसतील त्या प्रवाशांना अगोदरच प्रतिकारहीन करून टाकले.
कॉकपिटमध्ये अपहरणकार्त्यांच्या प्रमुखाने विमान लाहोरला न्यायला सांगितले. कॅ शरण यांनी उत्तर दिले की विमानामध्ये इतक्या लांब जाण्याइतपत इंधन नाहीये. यावर तो अधिकच चिडला. त्याला ठाऊक होते की या या विमानाकरीता आपात्कालीन परिस्थितीमध्ये पर्यायी विमानतळ अहमदाबाद किंवा मुंबईचे आहे. तो म्हणाला जर हे विमान मुंबईपर्यंत जाऊ शकते तर लाहोरपर्यंत जाण्याएवढे इंधन नक्कीच असणार.
मधल्या काळात कॅ शरण यांनी आपात्कलीन परिस्थितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडियो फ्रिक्वेन्सीची कळ दाबली होती. त्यामूळे एअर ट्रॅफिक कंट्रोलला कॉकपिटमधील संवाद ऐकू येऊ लागला व त्यांनी इतर यंत्रणांना या संकटाबाबत कळवले. कॅ शरण यांनी यंत्रणांना तयारीसाठी अधिक वेळ मिळावा यासाठी विमानाचा वेग बराच कमी केला. भारताच्या पश्चिम सीमेजवळ गेल्यावर लाहोर विमानतलाच्या एअर ट्रफिकला संपर्क साधला. परिस्थितीची कल्पना देवून लाहोर विमानतळावर लँडिंगची परवानगी मागितली.
पण लाहोरवाल्यांनी सरळ सरळ नकार दिला. कारगिल युद्धाला काहीच महिने झाले होते. त्यातच जनरल मुशर्र्फ यांची लष्करी राजवट येवून जेमतेम दोन महिने झाले होते. अशा परिस्थितीत भारताशी संबंधीत कुठल्याही बाबीपासून चार हात लांब राहिलेलेच बरे हा विचार त्यामागे होता. केवळ नकार देऊन ते थांबले नाही तर लाहोर विमानतळाला त्यांनी बंद केले. सर्व उड्डाणे व लँडिंग्ज बंद केली . धावपट्टीवरचे दिवेदेखील मालवले. या सर्व घडामोडींमूळे अपहरणकर्त्यांची गोची झाली. शेवटी इंधन संपत आले आहे हे पाहून त्यांनी अमृतसर विमानतळावर इंधनभरणासाठी उतरायला मान्यता दिली.
एकदाचे भारतीय भूमीवर लँड झाल्याने सर्वांना हायसे वाटले. वैमानिकांना वाटत होते की आता आपल्याला मदत मिळेल व हे प्रकरण इथेच मिटेल. मधल्या काळात केंद्रिय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटची आपात्कालीन बैठक सुरू झालेली होती. पंजाब पोलिसांचे कमांडो पथक विमानतळावर तयार होते. पण त्यांना स्वतःहून कुठलिही आगळीक न करता दिल्लीवरून येणाऱ्या एन एस जी पथकाची वाट पहायला सांगण्यात आले. विमानतळावरील एअर ट्रफिक कंट्रोलरला सांगण्यात आले की अपहरणकर्त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा. इंधन देण्यास होईल तेवढा उशीर करा.
विमानातले अपहरणकर्ते काही लहानश्या अपघातात जखमी झालेले लोक नव्हते की ज्यांना गोष्टीत गुंतवून त्यांच्यावर उपचार करता येतील. इंधन भरण्याबाबत प्रत्यक्षात काहीच घडत नाहीये हे पाहून त्यांची चिडचिड क्षणाक्षणाला वाढत होती. कॉकपिटमध्ये होणारा आरडाओरडा नियंत्रण कक्षात ऐकू जात होता. पण दिल्लीवरून मिळालेल्या आदेशांनुसार वाट पाहण्याखेरीज त्यांच्याजवळ काहीच नव्हते. आपल्या धमक्यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही हे पाहून अपहरणकर्त्यांनी निर्वाणीची कृती सुरू केली. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये हात पाठीमागे बांधून ठेवलेल्या प्रवाशांवर त्यांनी सुऱ्याने वार करणे सुरू केले. यातील जीवघेणे वार रिपाण कट्यालवर करण्यात आले.
भारतीय निर्णयकर्त्यांवर दबाव वाढवण्यासाठी त्यांनी फ्लाईट इंजिनियर जागिया यांना कॉकपिटमधून एक्झिक्युटिव्ह क्लासकडे नेले. मरणासन्न अवस्थेतला रिपाण व इतर जखमी प्रवाशांची अवस्था पाहून त्यांनी बोबडीच वळली. एका अपहरणकर्त्याने सूचक कृती म्हणून रक्ताने माखलेला सुरा जागिया यांच्या शर्टाला पुसला म्हणजे रक्ताचे डाग बघून वैमानिकांची खात्री पटावी. जागिया परत कॉकपिटमध्ये आल्यावर व त्यांच्याकडून केबिनमधल्या घडामोडींची माहिती मिळाल्यावर कॅ. शरण यांनी नियंत्रण कक्षाला कळकळीची विनंती केली की आता तरी इंधन पाठवा कारण अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना जीवे मारणे सुरू केले आहे.
याउपरही काहीच हालचाल होत नाही हे पाहून अपहरणकर्त्यांच्या प्रमुखाने विमान लाहोरला नेण्यासाठी उड्डाणप्रक्रिया सुरू करण्यास वैमानिकांना भाग पाडले. इंधनाचा साठा अत्यंत धोकादायकरित्या कमी असूनसुद्धा. कॅ शरण यांनी देखील पडत्या फळाची आज्ञा म्हणून तसे केले कारण कुठलाही निर्णय घेण्यास अधिक उशीर म्हणजे प्रवाशांच्या जीवानिशी खेळणे होते.
विमान उड्डाण करत आहे हे दिल्लीमधल्या आपात्कालीन बेठकीत कळले तेव्हा उद्विग्न होऊन तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांनी फोनचा रिसिव्हर स्वतःकडे घेतला व विमानतळावरील नियंत्रणकक्षाला आदेश दिले की असेल ते मोठे वाहन उदा. ट्रक धावपट्टीवर नेवून विमानाला अडथळा करा. यावेळी इंधनाचा टँकर जो बऱ्याच वेळचा तयार होता त्याला धावपट्टीकडे कूच करण्याचे आदेश देण्यात आले. पण दुर्दैवाने काही सेकंदांच्या फरकाने ही खेळी चुकली व टँकर काही मीटर अंतरावर असताना विमान त्याच्या जवळून गेले व उड्डाण यशस्वी झाले. या टँकरमध्ये पंजाब पोलिस दलाचे कमांडो लपून बसले होते व त्यांची योजना होती की, इंधन भरण्याच्या प्रक्रियेच्यावेळी विमानाचे टायर पंक्चर करायचे. अर्थात इंधन न देण्याचे स्पष्ट आदेश असल्याने हि योजना अमलात येऊ शकली नाही. नियंत्रण कक्षाला वाटले की उड्डाण करण्याइतकेही इंधन शिल्लक नाहीये त्यामुळे काहीही झाले तरी विमान त्यांच्या दृष्टीसमोर राहणार आहे. वैमानिकाबरोबरच्या संभाषणावरून झालेला हा समज फारच महागात पडला.
संध्याकाळी ७:३० वाजता अत्यल्प इंधन घेऊन विमान लाहोरच्या दिशेने आकाशात झेपावले व भारत सरकारने हि समस्या स्वतःच्या भूमीवर सोडवण्याची शेवटची संधी गमावली.
अमृतसरवर विमानतळाहून लाहोरचे विमानतळ फक्त ५० किमीवर होते. उड्डाणानंतर लगेचच कॅ शरण यांनी तेथील विमानतळ नियंत्रकांशी संपर्क साधला व लँडिंगची परवानगी मागितली. तोवर माध्यमांतील बातम्यांद्वारे त्यांना या सर्व घडामोडींची माहिती होतीच. त्यांनी परवानगी देण्यास यावेळीही नकार दिला. कारण स्पष्टच होते, पाकिस्तानी निर्णयकर्त्यांना भारताशी संबंधित कुठल्याही अवघड बाबीपासून सुरक्षित अंतर ठेवायचे होते. पाकिस्तानी भूमीवर अपहृतांबरोबर काहीही झाले असते तरी जगभर बदनामी पाकिस्तानचीच झाली असती व अपहरणकर्त्यांना पाकिस्तानी सरकारचीच फूस होती असेच चित्र बनले असते.
कॅ शरण यांनी काकुळतीला येऊन सांगून पाहिले की आमचे इंधन संपत आलेले आहे, तुम्ही लँडिंगची परवानगी न दिल्यास विमानाचा अपघात होण्याखेरीज दुसरे काहीही होवू शकत नाही. लँड झाल्यावर आम्हाला केवळ इंधन द्या, आम्ही तुमच्या भूमीतून निघून जाऊ. हे ऐकूनही पाकिस्तानी नियंत्रकांच्या भूमिकेत तसूभरही बदल झाला नाही. तुम्ही कुठेही जा पणा आमच्या भूमीवर लँड करू नका हा संदेश त्यांनी दिला व संपर्क तोडला. एवढेच नव्हे तर लाहोर विमानतळ विमानवाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. धावपट्टीवरील दिशादर्शक दिवेही मालवण्यात आले. दोन महिन्यांअगोदरच कोलंबोहून परतणाऱ्या जनरल मुशर्रफ यांच्या विमानाच्या लँडिंगच्यवेळीही हाच प्रकार करण्यात आला होता पण त्या विमानाच्या वैमानिकाने अनुभवाचा व कौशल्याचा वापर करत त्याही परिस्थित विमान सुखरूप उतरवले होते. अन त्या घटनेच्या काही तासांनंतरच तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लष्कराने पदच्युत करून अटक केली होती.
कॅ शरण यांच्याजवळ आता मोजकेच पर्याय होते, अमृतसरला परत जाण्याइतकेही इंधन शिल्लक नव्हते. त्या क्षणी असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे, स्वकौशल्यावर लाहोर नियंत्रणकक्षाच्या कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय लाहोर विमानतळ हुडकून काढणे व विमान लँड करणे. जमिनीवरील दिव्यांची रांग दिसल्यामुळे एका ठिकाणी त्यांनी विमान बरेच खाली आणले तर तो शहरातला रहदारीचा रस्ता निघाला. सहवैमानिक ओरडलाच - सर, ये तो रोड है. अर्थात लाहोरच्या नियंत्रकांना हे सर्व रडारवर दिसत होते व यावेळी त्यांना विमानाच्या परिस्थितीची जाणीव झाली व त्यांनी वैमानिकांशी संपर्क साधून लँडिंगची परवानगी दिली व मार्गदर्शनही केले.
विमानाचे टचडाऊन झाल्यावर दोनपैकी एक इंजिन इंधन संपल्यामुळे बंद पडले. म्हणजे मृत्यूच्या अगदी समीप पोचूनच जीव वाचला होता. विमान यशस्वीपणे लँड झाल्यावर वैमानिकांना पाकिस्तानकडून मानवीय आधारावर काही मदत मिळेल अशी आशा निर्माण झाली. कॅ शरण यांनी लाहोर विमानतळाच्या नियंत्रकांना विनंती केली की काही प्रवासी जबर जखमी आहेत त्यांना वैद्यकीय मदत मिळणे अत्यावश्यक आहे अन्यथा त्यांचा मृत्यू समीप आहे; त्यामुळे जखमी प्रवासी, स्त्रिया, लहान मुले व वृद्ध प्रवासी यांना उतरू द्या. यावर पाकिस्तानी नियंत्रकांकडून उत्तर मिळाले की तुम्हाला इंधन हवे होते तर इंधन देतोय, ते घ्या अन लौकरात लौकर इथून उड्डाण करा. त्याखेरीज कसलीही अपेक्षा ठेवू नका. यावेळी दिल्ली विमानतळावर अपहृत प्रवाशांचे कुटुंबीय जमू लागले.
अखेर निराश मनाने कॅ शरण यांनी इंधन भरून झाल्यावर पुन्हा उड्डाण केले. आता अपहरणकर्त्यांनी विमान काबूल ला न्यायला सांगितले. तेव्हा अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर तालीबानची लष्करी राजवट होती. तिथे अपहरणकर्त्यांना कसलीही आडकाठी येण्याची शक्यता नव्हती. वैमानिकांनी विमान काबूलच्या दिशेने वळविल्यावर तेथील नियंत्रकांशी संपर्क साधला. त्यावर त्यांना उत्तर मिळाले की काबूल विमानतळावर नाइट लँडिंगची सोयच नाहीये. यावर अखेरचा तोडगा म्हणून विमान दुबईकडे वळविण्यात आले. या प्रवासादरम्यान जबर जखमी असलेल्या रिपण कट्यालने शेवटचा श्वास घेतला. त्यापूर्वी तो बराच वेळ पापा पानी, पापा पानी असे पुटपुटत होता. त्याच्या शरीरावर सुऱ्याचे जवळ जवळ १५ वार होते असा उल्लेख त्याच्या शवचिकित्सा अहवालामध्ये आहे.
यावेळी भारत सरकारने युनायटेड अरब अमिरातींच्या सरकारबरोबर संपर्क साधला व दुबई विमानतळावर भारतीय कमांडोजद्वारे कारवाई करू देण्याची विनंती केली. युएइच्या सरकारने ती फेटाळून लावली. मात्र अपहरणकर्त्यांकडून इंधन व अन्नाच्या बदल्यात काही प्रवाशांना विमानातून उतरू देण्यास तयार केले. याचे फलित म्हणून काही जखमी प्रवासी, काही स्त्री प्रवासी व लहान मुले यांना विमानातून उतरू देण्यात आले. सर्वात शेवटी केबिन क्रूला रिपणचे शव विमानाला जोडलेल्या जिन्यावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले. हे दृश्य तेव्हा बातम्यांमध्ये दाखवण्यात येत होते.
या प्रवाशांना आणायला तत्कालीन विमान वाहतूक मंत्री शरद यादव अधिकाऱ्यांबरोबर गेले होते. त्या वेळेस त्यांच्याकडे पारपत्रही नव्हते. ऐनवेळी अधिकाऱ्यांना धावाधाव करून पारपत्र बनवावे लागले व युएईच्या भारतीय वकिलातीच्या सौजन्याने डिप्लोमॅटस साठी असलेला विशेष व्हिसा लगेच मिळाला.
जखमी प्रवासी उतरल्यावर १० मिनिटांतच विमानाने पुन्हा उड्डाण घेतले व ते उत्तरेकडे जाऊ लागले.
२५ डिसेंबरची पहाट - विमानात अजूनही एकूण १६२ लोक होते, बहुतांश प्रवासी निद्राधीन असताना विमानाने कंदहार विमानतळावर लँड केले. कंदहार विमानतळाची धावपट्टी एवढ्या मोठ्या विमानांसाठी पुरेशी नव्हती तरीही वैमानिकांनी कौशल्याने तेथे लँड केले. अपहरणाला १८ तास उलटून गेल्यानंतरही भारताच्या गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्यांना या अपहरणकर्त्यांबद्दल काहीच माहिती मिळू शकली नव्हती. दुबईला उतरलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीवरून ते लष्करी प्रशिक्षण मिळालेले, जिहादसाठी जीव द्यायलाही तयार असलेले अतिरेकी होते याची त्यांना पूर्ण कल्पना आली. इकडे कंदहारमध्ये अपहरणकर्त्यांनी विमानाच्या कार्गोमध्ये प्रवेश मिळवून एका मोठ्या बॅगेत लपवून ठेवलेली शस्त्रे विमानात आणली. त्यात पिस्तुले, ग्रेनेड्स वगैरेचा समावेश होता.
२५ डिसेंबरच्या दुपारी रिपण कट्यालचा अंत्यविधी झाला. त्याची दृश्ये जगभरातील वृत्तवाहिन्यांवर दाखवली गेली. ते पाहून भारतातील जनमानसात संताप उसळला व सरकारवर काहीतरी ठोस करण्याचा दबाव वाढला. भारत सरकारचे तत्कालीन तालीबान राजवटीबरोबर कुठलेही राजनैतिक संबंध नव्हते त्यामुळे त्यांच्याद्वारे वाटाघाटी करणेही अवघड होते. त्यातच २६ डिसेंबरला जसवंत सिंह यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अपहृत प्रवाशांच्या नागरिकांनी जोरदार निषेध नोंदवला. काहीही करा पण आमच्या नातलगांना सुखरूप परत आणा. या सर्व गोष्टींचे भारतात नव्यानेच सुरू झालेल्या २४ x ७ वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले.
शेवटी २७ तारखेला अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक कंदहारला रवाना झाले.
अपहरणकर्त्यांनी विमानाच्या कॉकपिटचा ताबा घेतला व वैमानिकांना केबिनमध्ये प्रवाशांसोबत बसवले.
या पथकामध्ये काही कमांडोजचादेखील समावेश होता. म्हणजे भारत सरकारने कमांडो कारवाईचा पर्याय अजूनही बंद केलेला नव्हता. या गोष्टीची तालिबान्यांना कल्पना दिली गेलेली नव्हती. असे काही घडण्याची शंका येताच तालीबानच्या सैनिकांनी आय सी ८१४ भोवती रणगाड्यांचे व लष्करी वाहनांचे कोंडाळे केले. त्यामुळे भारताच्या अचानकपणे कमांडो कारवाई करण्याच्या मनसुब्यांवर पाणी ओतले गेले.
आता शेवटचा पर्याय शिल्लक होता तो म्हणजे वाटाघाटी. आय सी ८१४ च्या कॉकपिटमध्ये बसून अपहरणकर्त्यांनी भारतीय पथकाबरोबर चर्चा सुरू केली. भारतीय पथक विमानतळावरील एका कक्षात होते. याद्वारे प्रथमच त्यांचा उद्देश भारत सरकारला कळला. त्यांचे प्रमुख लक्ष होते जम्मू येथील तुरुंगात बंदिस्त असलेल्या मौलाना मसूद अझहर याला सोडवणे. जवळ जवळ तीस तासांच्या वाटाघाटींनंतर त्यांच्या सर्व मागण्या स्पष्ट झाल्या, त्या खालीलप्रमाणे
मौलाना मसूद अझहर व ३५ इतर अतिरेक्यांची भारतीय तुरुंगांतून सुटका व त्या सर्वांना कंदहारला पोचवले जाणे
काही महिन्यांपूर्वी मसूद अझहरला जम्मूच्या तुरुंगातून सोडवण्यासाठी केल्या गेलेल्या हल्यात तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांकडून सज्जाद अफगाणी नावाचा एक अतिरेकी मारला गेला होता; त्याच्या शवाची मागणी.
त्याखेरीज २०० मिलियन अमेरिकन डॉलर्सची रोख रक्कम
दरम्यानच्या काळात भारतीय गुप्तहेर खात्याला माहिती मिळाली की अपहरणकर्त्यांचा प्रमुख इब्राहिम अझहर हा मौलाना मसूद अझहरचा धाकटा भाऊ आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मसूदच्या सुटकेखेरीज अपहरणकर्ते जुमानणार नव्हते हे स्पष्ट झाले. त्याखेरीज आश्चर्यकारकरीत्या तालिबान्यांनी वाटाघाटींत भाग घेऊन अपहरणकर्त्यांना त्यांच्या काही मागण्या मागे घेण्यास भाग पाडले. त्या मागण्या होत्या सज्जाद अफगाणी याचे शव व २०० मिलियन डॉलर्सची रोख रक्कम. अन त्यामागचे कारण म्हणजे त्या मागण्या गैरइस्लामी होत्या.
२८ डिसेंबर - अपहरण सुरू झाल्यापासूनचा हा पाचवा दिवस. विमानाच्या केबिनची अवस्था अत्यंत घाण झालेली होती. टॉयलेट्सची अवस्था तर पाय ठेवण्यालायकही नव्हती. अनेक प्रवाशांनी विशेष काही खाल्लेही नव्हते. अन वाटाघाटींमध्ये ठोस अशी कुठलीही प्रगती होत नव्हती.
२९ डिसेंबर - वाटाघाटींमध्ये एक सकारात्मक संदेश जावा म्हणून विमानातील ३५ प्रवाशांची विमानातून सुटका करून विमानतळाच्या इमारतीमध्ये रवानगी करण्यात आली. या प्रवाशांमध्ये स्त्रिया व त्यांच्या मुलामुलींचा समावेश होता.
३० डिसेंबर - अचानक विमानतळावर पाठवलेल्या ३५ प्रवाशांना पुन्हा विमानात परत आणण्यात आले. वाटाघाटी संपूर्णपणे फिसकटल्याचा हा परिणाम होता. काही अपहृत प्रवाशांनी आता जिवंतपणे सुटका व्हायची आशा सोडून दिली होती.
३० डिसेंबर - भारतीय अधिकाऱ्यांच्या आठमुड्या धोरणामुळे अपहरणकर्ते सगळा संताप प्रवाशांवर काढू लागले. मारहाण करणे, अंगावर पिस्तुले रोखून जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. आधीच नैराश्याचा परमोच्च सीमेवर असलेले प्रवासी आता असहायपणे मृत्यूची वाट पाहू लागले अन ज्यांच्या आशा जिवंत असलेले मनोमन देवाची प्रार्थना करू लागले.
अचानक काही तासांनी अपहरणकर्त्यांनी घोषणा केली की तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तुमच्या सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत, तुमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. तिकडे दिल्लीमध्ये तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र यांनी पत्रकारांना माहिती दिली की अपहरणकर्त्यांबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत व भारत सरकारने अपहृत भारतीय नागरिकांच्या बदल्यात भारतीय तुरुंगात असणाऱ्या तीन अतिरेक्यांना सोडायचे ठरवले आहे. त्यांची नावे
•मौलाना मसूद अझहर
•अहमद ओमर सईद शेख
•मुश्ताक अहमद झरगर
३६ अतिरेक्यांना सोडायच्या मागणीवरून अपहरणकर्त्यांना ३ वर आणले हि गोष्ट हे खूप मोठे यश आहे असे तत्कालीन राज्यकर्त्यांनी दाखवले. प्रत्यक्षात भारत सरकारकडून याबद्दल निर्णय होऊन जाहीर घोषणाही केली गेली असली तरी हा निर्णय जम्मू काश्मीरच्या सरकारवर आदेश म्हणून लादण्यात आला नाही. वरील तिघांपैकी मसूद अझहर व मुश्ताक अहमद झरगर तेव्हा अनुक्रमे श्रीनगरच्या व जम्मूजवळील उधमपूरच्या तुरुंगात होते. ३० डिसेंबरला संध्याकाळी रॉचे (रिसर्च ऍनालिसिस अँड विंग - भारताचे गुप्तहेर संस्था) प्रमुख जम्मूला पोचले व तेथील मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्याबरोबर तातडीची बैठक सुरू झाली. फारूख अब्दुल्ला मसूद अझहरची सुटका करायला अजिबात तयार नव्हते. त्यांचे मन वळवायला रॉच्या प्रमुखांनी सर्व युक्त्याप्रयुक्त्या वापरल्या. अखेर नाईलाजाने का होईना फारूख यांनी मसूद अझहर ची सुटका करायला होकार दिला. हे होईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती.
३१ डिसेंबर - पहाटे चार वाजता उधमपूर येथील तुरुंगात बंदिस्त असलेल्या मुश्ताक अहमद झरगर याला घेऊन उडालेले हेलिकॉप्टर जम्मू विमानतळावर पोचले तेव्हा श्रीनगरवरून मसूद अझहर अगोदरच पोचला होता. दोघांना घेऊन रॉच्या प्रमुखांचे विमान दिल्लीकडे निघाले. ओमर सईद शेख याची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. तिघांनाही दिल्ली विमानतळावर पोचवण्यात आले. कंदहारला जाण्यासाठी विशेष विमान तयार होतेच. परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हे स्वतः इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर या विमानाने सुटका करण्यात आलेल्या अतिरेक्यांना घेऊन कंदहारकडे निघाले.
कंदहार विमानतळावर या तिघांना सोडल्यावर अपहरणकर्ते आय सी ८१४ मधून खाली उतरले व तालीबानने पुरवलेल्या एका जीपमधून अज्ञात स्थळी रवाना झाले. विमानाच्या आतील प्रवाशांनी एकमेकांना मिठी मारून, हस्तांदोलन करून सुटकेचा क्षण साजरा केला. आठवडाभरापूर्वी अपरिचित असलेले अनेकजण आता जवळचे मित्र बनलेले होते. विमानतळाच्या इमारतीमध्ये जसवंत सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालिबानी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
३१ डिसेंबरच्या संध्याकाळी विशेष विमानाने सर्व लोक दिल्लीला परतले. दिल्ली विमानतळावर हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. आय सी ८१४ ला परत आणण्यासाठी जसवंत सिंह यांच्याबरोबर गेलेले काही इंजिनियर व वैमानिक त्या विमानाला घेऊन दुसऱ्या दिवशी परत आले. तालीबानने आठवडाभरात झालेला खर्च वसूल करण्यासाठी मोठे बिल भारत सरकारला पाठवले.
या अपहरणामागची पार्श्वभूमी व इतर तपशील
हे सर्व करण्यामागे पाकिस्तानी अतिरेक्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते मौलाना मसूद अझहर याची सुटका करणे. १९६८ मध्ये जन्मलेला अझहर हरकत उल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा एक महत्त्वाचा नेता होता. त्याला अफगाणिस्तानातील सोव्हियत युनियनविरुद्धच्या युद्धाचा व सोमालियातील यादवी युद्धाचा अनुभव होता. १९९४ मध्ये तो श्रीनगर मध्ये पोचला, त्याचे उद्दिष्ट होते त्याच्या संघटनेतील विविध गटांचे तंटे सोडवून त्यांना एकत्र आणणे. पण काही आठवड्यांतच तो भारतीय सुरक्षा संस्थांच्या हाती सापडला अन या अपहरणामुळे सुटका होईपर्यंत तो बंदिस्त होता. फार प्रभावी वक्तृत्व लाभलेल्या अझहरमुळे अतिरेकी संघटनांना अनेक फायदे होत असत जसे नवी भरती करणे, भरती झालेल्यांना जिहादसाठी जीवाची बाजी लावण्यासाठी प्रेरित करणे. थोडक्यात सांगायचे तर लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगायला हवा अशी त्याची प्रतिमा होती. त्याच्या सुटकेसाठी पूर्वीही जोरदार प्रयत्न करण्यात आले होते जे अयशस्वी झाले होते.
या योजनेच्या पूर्वतयारी बऱ्याच काळापासून सुरू होती. नेपाळहून भारतात यायला भारतीय नागरिकांना पारपत्राची गरज नसे, कुठलेही सरकारी ओळखपत्र चालत असे. अपहरणकर्त्यांची ओळखपत्रे हिंदू व्यक्तींची नावे वापरून मुंबईतून बनविली गेली होती. पैशासाठी या कामात मदत करणाऱ्या एका व्यक्तीला अपहरणकांडाच्या खटल्यात मोठी शिक्षा देखील झाली.
काठमांडू विमानतळावरील ढिसाळ सुरक्षा तपासणी अपहरणकर्त्यांच्या पथ्यावरच पडली. एवढी सारी शस्त्रे व दारुगोळा केबिन बॅग्ज व चेक इन बॅग्जद्वारे विमानात नेमका कसा पोचला हे कधीच उघड करण्यात आले नाही. विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या सढळ सहयोगाखेरीज हे शक्यच नव्हते. या घटनेच्या काही दिवस अगोदरच हे अपहरणकर्ते पाकिस्तानी पारपत्र वापरून पाकिस्तान इंट्रनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाने काठमांडू विमानतळावर पोचले होते. भ्रष्टाचाराचा मार्ग वापरून हे सर्व घडले असावे असे मानण्यास पुरेपूर वाव आहे.
अझहरखेरीज इतर दोन अतिरेक्यांची सुटका होणे हा अपहरणकर्त्यांसाठी बोनसच होता. या सर्व घडामोडींमध्ये स्पष्ट झालेली गोष्ट म्हणजे आपल्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापासून विविध सुरक्षा संस्थांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी धडाडीचे निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव. १९९९ साली लाहोर अमृतसर बसवाहतूक खुली करून तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी शांततेसाठी गंभीर प्रयत्न करणारा नेता अशी जोरदार प्रतिमा बनविली होती पण प्रथम कारगिल युद्ध व नंतर हे अपहरण या घटनांमुळे पाकिस्तानला झुकते माप देण्याची अतिघाई त्यांना नडल्याचे स्पष्ट झाले.
यापूर्वीही भारतात विमानाच्या अपहरणाचे लहानसहान, अर्धवट यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न झालेच होते. पंजाबमध्ये व काश्मीरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या व पर्यटकांच्या अपहरणांच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यापैकी काहींचा बीमोड करण्यात सुरक्षा संस्थाना यश आले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना तोंड देण्याची हि काही पहिलीच वेळ नव्हती. तरीही या गोष्टीची पहिली माहिती मिळाल्यापासून सुरुवातीच्या काळात अत्यंत ढिलाई दाखवल्या गेली. पंतप्रधान त्यावेळी पाटण्याहून दिल्लीला परतत होतो. त्यांना हि बातमी दिल्ली विमानतळावर देण्यात आली अन मग त्यांनी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले. हेच काम केंद्र सरकारच्या मुख्य सचिवांना तासाभरापूर्वीच करता आले असते.
पहिली बातमी कळल्यावर कुठलीही ठोस उपाययोजना न बनवता (जसे विमान भारतातील ज्या विमानतळांवर उतरू शकते तिथे स्थानिक कमांडोजना तैनात करणे व स्थानिक पातळीवरचे निर्णय घेण्यासाठी मोठ्या हुद्द्यावरच्या पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देणे) केवळ पुढे काय होणार याची वाट पाहण्यात वेळ दवडला गेला.
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत इतकी आणीबाणीची परिस्थिती असूनही भारतीय लष्कर व हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना या बैठकींमध्ये पाचारणही करण्यात आले नाही. नेहमीपेक्षा हळू चालवण्यात आलेले नागरी विमान नेपाळ भारत सीमेवरून लाहोरकडे पोचून परत अमृतसरला पोचल्यावरही दिल्लीहून एन एस जी कमांडोजचे पथक तेथे पोचू शकले नाही यापेक्षा अधिक गलथानपणा असू शकत नाही.
अपहरण झाल्यापासून कितीतरी वेळापर्यंत भारतीय बाजूने प्रत्यक्ष निर्णय घेणे व अपहरणकर्त्यांना उत्तर देणे हि जबाबदारी विमानाच्या प्रमुख वैमानिकासच पार पाडावी लागली हि देखील एका मोठ्या राष्ट्राच्या व्यवस्थेस लाजिरवाणी बाब होती.
या सर्व घडामोडींमध्ये अपहरणकर्त्यांचे वागणे आंतरराष्ट्रीय स्तरांवर घडलेल्या इतर अपहरणांसारखेच होते. विमान उडवण्याची व प्रवासी अन वैमानिकांना मारण्याची धमकी देणे, काही प्रवाशांना जखमी करणे, धमकीचे गांभीर्य कमी होऊ नये म्हणून एखाद्या प्रवाशाला जीवे मारणे हे सगळे अगदी नेहमीप्रमाणेच होते. अपहरण झाल्यावर दुसऱ्या देशाच्या भूमीवर जाऊन यशस्वीरीत्या कमांडो कारवाईची उदाहरणे फारच विरळा (यात एक इस्राईलचे आहे) पण १००% निर्विवाद यश कधीच मिळालेले नाही. कमांडो कारवाईदरम्यान काही अपहृतांना जीव गमवावा लागलेलाच आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा संस्थांद्वारा कुठलीही आगळीक न करणे हे एका अर्थाने बरेच झाले कारण एका दुर्दैवी जीवाखेरीज इतर सर्वांचे जीव तर वाचले.
भारताच्या व जगाच्याही दुर्दैवाने सोडलेल्या अतिरेक्यांना दहशतवादी कार्यात उदंड यश मिळाले. अझहर ने जैश ए मोहम्मद स्थापन करून भारतात भारता सरकारचे नाक कापणाऱ्या कारवाया घडवल्या. मूळचा ब्रिटिश नागरिक असणाऱ्या ओमर सईदने तर सप्टेंबर ११ च्या हल्ल्यासाठी पतपुरवठा मिळवून देण्याची भूमिका पार पाडली. नंतर वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनियल पर्ल याच्या पाकिस्तानातील अपहरण व हत्येच्या प्रकरणात त्याला पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली; जी अजूनही प्रलंबितच आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर तर त्याने तुरुंगातून भ्रमणध्वनीद्वारे पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांचा आवाज काढून फोन करून आक्रमणाची धमकी दिली. एवढेच नव्हे तर मुखर्जींच्या कार्यालयातही फोन लावायचा प्रयत्न केला जो अयशस्वी झाला. भारत पाक युद्ध सुरू करायचा त्याने प्रयत्न करून पाहिला.
राजकीय कवित्व - हे सर्व प्रकरण हाताळण्यात तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह व पंतप्रधानांचे तत्कालीन सचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर असणाऱ्या ब्रजेश मिश्र यांचा वाजपेयी सरकारमधले थिंक टँक म्हणून उदय झाला व मे २००४ मध्ये रालोआचा पराभव होईपर्यंत दोघांवरही वाजपेयींनी मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या. परराष्ट्रमंत्री यासारख्या पदावर असूनही अपहृतांना कंदहारहून परत आणणाऱ्या पथकाबरोबर जाण्याची त्यांची कृती भारतीय सुरक्षा संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी होती. कारण तोवर सगळी उदाहरणे केवळ तोंडाने बोलणारीच होती. प्रत्यक्षात अश्या प्रकरणांच्या वेळी पोलिस अथवा सैनिकांनाच जीवावर उदार व्हावे लागत असे. तालीबानी राजवट भारताची शत्रू नसली तरी भारताच्या शत्रूंशी तिचे मित्रत्वाचे संबंध होते.
मात्र याच कृतीला काही काळानंतर विरोधी पक्षांनी व रालोआतील काही शुक्राचार्यांनी असे रूप दिले की जसवंत सिंह यांनी स्वखुशीने तुरुंगात असणाऱ्या अतिरेक्यांना अफगाणिस्तानात नेऊन सोडले. जसे भारताने काही केले नसते तरीही काही १९२ भारतीय नागरिकांना तालीबानने किंवा पाकिस्तानने सुखरूप भारतात पोचविले असते. रालोआच्या राजवटीत जसवंत सिंह यांनी संरक्षणमंत्रीपदापासून अर्थमंत्रीपदापर्यंत विविध खाती लीलया सांभाळली. मोठमोठ्या गप्पा हाणून सर्वोच्च पदावर डोळा ठेवणाऱ्यांपेक्षा ते नक्कीच विशेष होते.
सुरक्षा व्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल - या घटनेनंतर भारतीय विमानतळांवरील सुरक्षेत क्रांतिकारी बदल झाले. नेपाळनेही काठमांडू विमानतळाच्या सुरक्षेत बऱ्याच सुधारणा केल्या. घटनेनंतर पहिले ६ महिने इंडियन एअरलाइन्सने नेपाळची हवाईसेवा बंद केली व नंतर काठमांडू विमानतळावर स्वतःची वेगळी सुरक्षा तपासणी व्यवस्था उभारून हवाईसेवा पुन्हा सुरू केली. या सर्व गोष्टींचे यश म्हणजे त्यानंतर आजवर अतिरेकी कारवायांसाठी विमान अपहरणाचा प्रयत्नही भारतीय भूमीवर होऊ शकला नाही.
गेल्या दशकात जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांत लक्षणीय घट झाली तरी देशाच्या इतर भागांत त्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. या सर्व गोष्टींना शत्रुराष्ट्रांची अदृश्य फूस असली तरी आपल्या व्यवस्थेतील दोषांमुळे भारतातील विविध प्रदेशांत लोकशाहीचे अनेक लाभ मिळालेले नागरिकच अशा देशविघातक कार्यांमध्ये भाग घेत असतील तर एक व्यवस्था म्हणून ६५ वर्षांनंतरही आपण कमकुवतच आहोत. दहशतवाद्यांना सहजपणे उपलब्ध होत राहणाऱ्या कारणांबद्दलही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री स्व. वसंत साठे यांचे एका चर्चेतले विधान आठवते. ते भारत व पाक यांच्या संबंधांवर होते. ते म्हणाले होते, 'पाकिस्तान छुरा हैं, और भारत तरबुजा, अब चाहे छुरा तरबुजे पर चले या तरबुजा छुरे पर, कटना तो तरबुजे को ही हैं...
कट्टरवादावर आधारित असलेल्या दहशतवाद व भारतीय लोकशाही व्यवस्था यालाही हेच लागू होते.
प्रतिक्रिया
13 Nov 2012 - 9:55 pm | पैसा
अगदी अगदी!
14 Nov 2012 - 3:39 pm | लाल टोपी
माझ्या मते हा एकुणच घटनाक्रम स्वतंत्र भारताच्या ईतिहासातील सर्वात लाजिरवाणा घटनाक्रम आहे. सरकार नातेवाईक आणि प्रसार माध्यमे या सर्वांचेच अतिशय बेजबाबदार वर्तन हे या प्रसंगाचे वर्णन करण्यास उत्तम उदाहरण आहे एक राष्ट्र म्हणुन आपण सर्वच जण या प्रसंगी कमी पडलो. गवि ना या प्रसंगा बाबत काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
14 Nov 2012 - 8:26 pm | सुधीर काळे
सुरेख लेख! या एका घटनेने NDA सरकारचे वस्त्रहरण झाले. काश्मीरमध्ये जिचा फौजी पती धारातीर्थी पडला होता त्या वीरपत्नीने खूप जोरदार निदर्शनेही केली. यांना सोडले तर माझ्या पतीचे बलिदान व्यर्थच ठरेल तरी असे करू नका याबद्दलही कळकळीने सरकारला आग्रही निवेदन दिले पण त्याचा कांहींही उपयोग न होता मौ. अझर मसूद सुटलाच.
याच्या पार्श्वभूमीवर रेगन सरकारचे "No negotiations with terrorists" हे धोरण फारच उज्ज्वलपणे दिसते. या धोरणापायी भूमध्यसमुद्रात एक-दोन अमेरिकन प्रवासी प्राणाला मुकले पण रेगन आपल्या निर्णयापासून ढळले नाहींत. आपल्या नेतृत्वातही अशी दृढता यायला हवी!
14 Nov 2012 - 8:37 pm | श्रीरंग_जोशी
या घटनेच्या वेळी अपहृतांपैकी केवळ एका अपहृताच्या कुटूंबीयांनी भूमिका घेतली होती की, आमच्या माणसाचे प्राण गेले तरी चालतील पण कुठल्याही अतिरेक्यांची सुटका करू नका. याउलट इतर सर्वांची भुमिका होती.
सरकारने अधिक चालढकल केली असती अन अधिक अपहृतांचे प्राण गेले असते तर देशात काय प्रतिक्रिया उसळली असती त्याची कल्पना करवत नाही.
14 Nov 2012 - 10:08 pm | आनंदी गोपाळ
~मोठा फटाका पेटवून कानात बोटे घातलेला स्मायली इम्याजिन करा~
(पळत जाऊन झाडावर चढून आनंदी झालेला पॉपकॉर्नयुक्त) गोपाळ
14 Nov 2012 - 10:45 pm | रेवती
नको ती आठवण.
15 Nov 2012 - 9:09 am | सुधीर काळे
आता अफझल गुरू (कुणाचा?) किंवा कसाबला सोडविण्यासाठी असेच नाट्य घडले तर आपण इतिहासाची पुनरावृत्ती घडवणार काय? आधी सुरक्षिततेबाबत ढिसाळपणा करायचा आणि मग कुणी असे अपहरण केले त्या आतंकवाद्यांना शरण जायचे हे कांहीं बरोबर नाहीं. आपण असे 'पोकळ' आहोत हे एकदा कळल्यावर असे प्रसंग पुन्हा-पुन्हा घडतीलच.
याला दुसरा उपाय म्हणजे अतिरेक्यांवरचे खटले fast track कोर्टांत चालवायचे व शिक्षा झाली रे झाली कीं ती लगेच अमलात आणायची! भिजत घोंगडे अजीबात बंद!
पण आपण यातले कांहींच करणार नाहीं.
16 Nov 2012 - 10:36 am | जुइ
लेख उत्तम लिहिला आहे. कथेचा फ्लोव हि शेव्तपर्येन्त चन्ग्ल आहे. शेव्ति लिहिले विश्लेशन अथिक भवले, तरि हे प्रकरन सरकारने कचखव व्रुति मुले लक्शत रहवे असे वतते नहि.
16 Nov 2012 - 10:52 am | श्रीरंग_जोशी
टंकलेखन सहाय्य
प्रतिक्रियेचे शुद्धीकरण करायचा माझा प्रयत्न...
कथेचा फ्लोही शेवटापर्यंत चांगला आहे. शेवटी लिहिलेले विश्लेषण अधिक भावले, तरी हे प्रकरण सरकारच्या कचखाऊ वृत्ती मुळे लक्षात राहावे असे वाटत नाही.
16 Nov 2012 - 11:11 am | गवि
सरकारने अशा वेळी काय करायला हवे होते हा खूप विवादास्पद मुद्दा आहे.
अतिरेक्यांना न सोडता सर्व अपहृतांचे प्राण धोक्यात घालायचे..
अतिरेक्यांना सोडून प्राण वाचवायचे..
अन्य काही (काय ते माहीत नाही)
सर्व बाजूंना आपापले अधिक आणि उणे मुद्दे आहेत. प्रत्येक वेळी असा निर्णय कचखाऊ, चुकीचा, डरपोक असंच म्हणणं योग्य नव्हे.
ज्या देशात विमान आहे तिथली परिस्थिती, कोणत्याही धाडसी कारवाईसाठी तिथल्या सत्तेची अनुकूलता, सोडलेल्या अतिरेक्यांचं भविष्यातलं उपद्रवमूल्य, घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर देशात उसळू शकणारी प्रतिक्रिया, त्यातून देशात आणि देशाबाहेर जाणारा (कदाचित वेगवेगळा)संदेश असे अनेक फॅक्टर्स नीट विचारात घ्यावे लागले असणार. यातले काही उपाय क्र. १ ला सपोर्ट करत असतील तर काही २ ला..
आपल्याला म्हणणं सोपं आहे, पण इतक्या लोकांच्या जिवाचा निर्णय घेणं सत्तास्थानी बसून सोपं नाही.
मलाही एकेकाळी असं वाटलं होतं की पायलट इन कमांडने फ्युएल शिवाय उड्डाण केलंच कसं? मी तिथे असतो तर इंधनाशिवाय टेकऑफ करायला साफ नकार दिला असता. मला मारुन ते काय साध्य करणार? शिवाय इंधनाशिवाय उड्डाण म्हणजे असा ना तसा मृत्यू आहेच ठरलेला.
हे सर्व घरी बसून तर्कशुद्ध वाटेल, पण तिथे कॉकपिटमधे प्रत्यक्ष परिस्थिती पाहून पायलटने घेतलेला निर्णय शेवटी सर्व निरपराधांचे जीव वाचवणारा ठरला.
ते सर्व मेले असते तर देशासाठी मेले असते असं म्हणता येईल, पण देशभक्ती अशी काही दुर्दैवी जिवांवर परस्पर लादता येत नाही..
आपल्या घरातलं कोणी त्या विमानात असतं तर "नका त्या अतिरेक्याला सोडू, माझी प्रिय व्यक्ती यात बळी गेली तरी चालेल.." असं आपल्यापैकी कोणी म्हटलं असतं हे इथे नाही तर मनात तरी एकदा स्वतःशी सांगून पहा..
16 Nov 2012 - 12:17 pm | लाल टोपी
मात्र ही परीस्थिती अधिक संवेद्नशीलतेने हाताळता आली असती असे वाटते विशेषतः सरकारी आणि प्रसार माध्यमांकडून
19 Nov 2015 - 4:07 am | स्रुजा
मान्य आहे. परस्पर त्या लोकांवर अशी देशभक्ती लादणे चुकीचेच आहे. आणि शेवटी एव्हरीवन मॅटर्स ! त्यांना वाचवणे ही पहिली प्रायोरिटी असायलाच हवी होती. दुसरी , अतिरेक्यांना न सोडणे. अतिरेक्यांना न सोडणे मग भले आमचे १६५ लोकं मेले तरी चालतील असा विचार आपल्या सरकारने केला नाही हेच योग्य वाटते पण धडाडीने कारवाई करुन मागण्या कमी करायला हव्या होत्या. न पक्षी अतिरेक्यांना न सोडता काही करता आलं असतं तर अमृतसरमध्येच करायला हवं होतं. सरकारने अमृतसर मध्ये असताना काही कारवाई करायची एकमेव संधी दवडली आणि पुढचं रामायण घडलं. लांछनास्पद प्रकार ! वाजपेयींसारख्या नेत्याकडुन ही चुक झाली नसती तर फार बरं झालं असतं. मेडियाने सुद्धा , ते शव सतत दाखवणं हा अत्यंत लाजिरवाणा आणि संतापजनक प्रकार आहे. एक प्रकारची विटंबनाच आहे ती मृतदेहाची. आणि नातेवाईकांच्या मनाशी कृर खेळ !
लेख उत्तम जमलाय पंत. आणि आता तुम्ही मला याल नियम समजावायला पण तरी खव मध्ये न टाकता वर आणतेच लेख ;)
19 Nov 2015 - 8:47 am | पगला गजोधर
सध्याचे धडाकेबाज पंप्र, त्यावेळी पंप्र असते, तर त्यांनी काहीतरी साहसी देशभक्तीपूर्ण कार्यवाही (इस्रायेल सारखी ) नक्कीच केली असती (जर ते भारतात हजर असते तर ), असे वाटत तर नाही ना, इथल्या भक्तांना ?
19 Nov 2015 - 9:03 am | स्रुजा
अजित डोवल चा सहभाग तेंव्हा ही होता आणि आता ही काही झालं तर असेल च. त्यामुळे अशी काही परिस्थिती आली तर निभावणं जास्त सोपं असेल. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ९९ पेक्षा भारताची जागतिक पातळीवर पोझिशन आणि पत दोन्ही जास्त सशक्त आहे. आणि ती आताच्या पंप्र नी विचारपूर्वक बनवायला सुरुवात केली आहे. त्या "इनफेमस" परदेश दौर्यामागे काही विचार नक्कीच आहे.
तुम्ही "भक्तांना " असा शब्द माझ्या प्रतिसादावर का वापरला आहे कोण जाणे. कारण माझ्या प्रतिसादात मोदींचा उल्लेख ही नाहीये. त्यांच्या भक्तांपेक्षा ही त्यांचे विरोधक च त्यांचा जप जास्त करतात.. पॅरॉनॉईया म्हणतात तो हाच असावा.
19 Nov 2015 - 9:40 pm | श्रीरंग_जोशी
अमृतसरमध्ये कमांडो कारवाई करून विमान देशाबाहेर जाऊ न देणे हा आपल्यासाठी सर्वोत्तम उपाय होता. पण अशा बाबी हाताळणार्या सर्वच यंत्रणा या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ नव्हत्या असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
स्थानिक पोलिस प्रमुखांना त्यांच्या नेतृत्वाखालील कमांडो कारवाई करताना काही नकारात्मक घडल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही असे आश्वासन देऊन कारवाईचे अधिकार दिले असते तरच काही शक्यता होती.
असे करण्याची प्राथमिक जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची होती. या गोष्टीला तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींचे चूक म्हणणे पटत नाही.
19 Nov 2015 - 9:53 pm | स्रुजा
असं नाही, नेत्याची जबाबदारी असतेच. आपत्कालिन परिस्थितीत त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोकं गोळा करणे ही पण नेत्याचीच जबाबदारी. त्या परिस्थितीत गोंधळुन न जाता एका कार्यप्रणालीने काही बेसिक गोष्टी जरी करायच्या म्हणल्या तरी तशी प्रणाली आधी तयार हवी. प्रयत्न कमी पडले असं म्हणणं योग्य ठरेल. एवढाली शस्त्रात्रं विमानात येतात, खोटी ओळखपत्रं बनतात आणि आपल्याला ते ओळखता येत नाही ही तरी चूक आहेच. शिवाय याचं इंटेल मिळालं नाही की मिळुन ही दुर्लक्ष झालं हे पण महत्त्वाचं आहे. नंतर गोष्टी खुप बदलल्या पण जर अमृतसर हुन विमान बाहेर पडलं नसतं तर यश वाजपेयी सरकारचं झालं असतं, तशी चुकीची जबाबदारी पण पंतप्रधान म्हणुन त्यांचीच आहे.
19 Nov 2015 - 10:02 pm | श्रीरंग_जोशी
हे प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाची (चुकीची) जबाबदारी केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींची आहेच. पण 'वाजपेयींसारख्या नेत्याकडुन ही चुक झाली नसती' या वाक्यातून वेगळा अर्थ निघतो.
जर केंद्रीय गृहमंत्रालयाने आपण कमांडो कारवाईसाठी तयार आहोत, तुम्ही परवानगी द्यावी असा प्रस्ताव पंतप्रधानांना दिला असता अन पंतप्रधानांनी अपहॄतांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परवानगी देण्यास नकार दिला असता तर ती थेट त्यांची चूक म्हणता आली असती.
19 Nov 2015 - 10:24 pm | स्रुजा
असं कसं म्हणुन चालेल. थेट चूक विरुद्ध एक टीम म्हणुन केलेली चुक यात जबाबदारी नेत्याचीच सगळ्यत जास्त. त्यांनी सांगितलं नाही तसं यांनी पण विचारलं नाही ना, म्हणुन च म्हणलं एक प्रणाली हवी. आपत्कालीन परिस्थितीत विचार करायला वेळ नसतो, डोकं पण प्रेशर खाली असतं म्हणुन आधीच प्रणाली करुन ठेवायला हवी. मोदक यांच्या लेखात उल्लेख वाचला की जवळ जवळ पावणे दोन तास पंप्रधानांना बातमी दिलीच गेली नाही. ही गृहमंत्रालयाची थेट चूक पण ती द्यायलाच हवी होती अशी प्रणाली तयार न करणे ही अख्ख्या टीम ची चूक.
19 Nov 2015 - 10:30 pm | श्रीरंग_जोशी
प्रणाली (स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ही पूर्वीपासून ठरलेली असते अन वेळोवेळी आलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष (काही वेळा इतरांच्या) अनुभवांनुसार त्यात बदल केले जातात. ही प्रणाली काही त्याच सरकारने बनवली नसणार.
वाजपेयी यांनी निर्णयकर्ता म्हणून थेट चूक केली असे उपलब्ध माहितीनुसार दिसत नाही. या प्रकरणात आलेल्या अपयशाची सर्वोच्च जबाबदारी मात्र पंतप्रधान म्हणून त्यांचीच याबाबत दुमत नाही.
19 Nov 2015 - 10:39 pm | स्रुजा
२ प्रणाल्या असणार. एक तर डीफेन्स ची , जी भारतात कुणाचं सरकार आहे यावर निर्धारीत नसते. सरकार आलं की मोहरे ठरतात, थोडक्यात त्या जबाबदारीला किंवा उत्तरदायित्वाला एक चेहरा मिळतो. एक प्रणाली सरकारची अंतर्गत असते ज्यात प्रत्येकाची किती स्वायत्तता आणि सरकारच्या अंतर्गत नियमांची किंवा एस ओ पी शी बांधिलकी किती हे ठरत असणार. यात सर्वसाधारण नियम नाहीत, सरकारला घटनेने घालुन दिलेले रुल्स नाहीत. पण प्रत्येक गृप चं एक डायनॅमिक असतं, ते सुरुवातीपासून कसं आहे यावर बर्याच गोष्टी नकळत घडुन जातात. ते थोडं अपुरं ठरलं. वाजपेयी सरकारकडुन चूक झाली काही प्रमाणात असं म्हणु हवं तर.
19 Nov 2015 - 10:42 pm | श्रीरंग_जोशी
या बरोबर सहमत.
हेच अपहरण भारतीय काठमांडूऐवजी भारतातल्या विमानतळावरून झालं असतं तर ती आपल्यासाठी खूपच नामुष्कीची बाब असती.
19 Nov 2015 - 10:48 pm | स्रुजा
ही आपल्यासाठी नामुष्कीचीच बाब आहे की एवढ्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल ओळखपत्रांमध्ये आणि आपल्याला कळलं नाही. पण असो .
19 Nov 2015 - 11:01 pm | पगला गजोधर
श्रीरंगसर, कल्पनाविलास म्हणा हवं तर,
जर आजच्याघडीला (देव न करो पण), भारतीय विमान भारतीय नागरिकांसमवेत भारतातून अपहृत झाले तर, आज केंद्रीय सत्तेत इस्रायेल प्रमाणे कारवाही करण्यासची धमक आहे का ? याविषयी पूर्वीच्या सरकारवर, ' कचखाऊ धोरण ठेवणारे', (आठवा: 26/11 हल्ला, दौलतबेग ओल्डी ) अशी टीका करणारे, आज काय अपेक्षा ठेवून असावेत ?
19 Nov 2015 - 11:13 pm | श्रीरंग_जोशी
कुणाच्या काय अपेक्षा असतील त्याबाबत काही कल्पना करणे अवघड आहे.
माझ्या मते असे पुन्हा घडले तर सरकारने अपहृतांच्या प्राणांचे रक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य असे धोरण राबवावे अन ते राबवले जाईलच असा विश्वास वाटतो.
देशापुढचे संकट पक्षीय राजकारणातून पाहिले जाऊ नये असे मला वाटते.
बादवे सर? मला एकेरित संबोधावे ही विनंती.
19 Nov 2012 - 6:46 am | स्पंदना
कशाला हवी ती आठवण, जळजळीत अपमानाची, मुर्ख राजकारण्यांची अन उद्द्दाम दहशतवाद्यांची.
19 Nov 2012 - 11:00 am | श्रीरंग_जोशी
पराभव, माघार या गोष्टींच्या आठवणी नकोशा वाटत असल्या तरी व्यक्तिगत पातळीवर अथवा समाज / देश पातळी वरही नक्कीच स्मरणात राहाव्यात. एकदा झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको असेल तर या गोष्टींना कधीही विसरू नये.
प्रगती करायची असेल तर जयापेक्षा पराजयांचा अभ्यास अधिक काटेकोरपणे व्हायला हवा.
गेल्या काही वर्षांत विमान प्रवाशांनी संशय आल्यावर नेहमीच संबंधितांच्या लक्षात आणून दिले आहे. बरेचदा प्रत्यक्षात धोकादायक नसले तरीही.
या अपहरणापूर्वी व अमेरिकेतील ९-११ च्या हल्ल्यांपूर्वी या गोष्टीचे प्रमाण नक्कीच कमी होते.
माँक हू सोल्ड हिज फेरारी या पुस्तकातले एक वाक्य - "डोंट फिल एंब्रेस्ड अबाऊट युर पास्ट, बी ग्रेटफुल फॉर द टिचर इट इज."
9 Dec 2012 - 3:22 pm | रणजित चितळे
प्रतिसाद द्यायला जरा वेळा लागला - क्षमस्व.
ह्या घटनेची त्यांच्या त्यांच्या चष्म्यातून दोन पुस्तकात लिहिले गेले आहे - माय नेशन माय लाईफ - अडवाणी ह्यांचे व कॉल ऑफ दे नेशन - जसवंत सिंग ह्यांचे.
त्यात पण साधारण पणे हेच लिहिले आहे. जसवंत सिंगांनी ते अफघाणिस्तानला का गेले ते सांगितले - आपली एम्बसी अफघाणिस्तानला नव्हती त्या मुळे दळण वळण नव्हते. निर्णय घ्यायची वेळ आली तर कोण घेणार जर ते दिल्लीलाच राहिले असते तर अजूनच वेळ गेला असता. म्हणून ते स्वतः गेले. परत त्यांनी विमानातल्या प्रवाश्यांनी त्यांच्यावर राग कसा काढला ते पण लिहिले आहे. वाचण्या सारखे आहे.
मला असे कळले की निर्णय घ्यायला वेळ लागला कारण त्या विमानात एक व्यक्ती अशी होती (स्विस राज्याची) जी जगातल्या मोठाल्या सगळ्या देशांची पैसे छापून देणारी होती. त्यामुळे त्या व्यक्तीला सुखरुप वाचवायचे होते. हा अजून एक सिक्रेट एन्गल होता ह्या गोष्टीला.................सुधीर काळे साहेब ह्यावर काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते.
लेख खूप छान आहे.
आपल्याला सलाम.
13 Jan 2013 - 10:41 pm | आदूबाळ
हा काय अँगल आहे?
6 Feb 2013 - 2:26 am | श्रीरंग_जोशी
त्या विमानात काही परदेशी प्रवासी होते. त्यापैकी एक सदर व्यक्ती असण्याची शक्यता आहे.
जी माहिती जालावर ती फारच वरवरची असल्याने मी त्याचा उल्लेख टाळला.
एकंदरित घटनाक्रमावरून तरी असे वाटते की ती व्यक्ति अपहृतांमध्ये नसती तरीही भारत सरकारसाठी घटनेचे गांभिर्य तेवढेच राहीले असते.
8 Apr 2013 - 11:20 pm | श्रीरंग_जोशी
या घटनेवर नुकतीच घडलेली चर्चा खालिल दुव्यावर वाचता येईल.
काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814
19 Nov 2015 - 10:21 pm | कविता१९७८
वाचुनच अन्गावर काटा येतो, त्यावेळी लाईव प्रक्षेपण पाहीले होते.
19 Nov 2015 - 10:32 pm | पद्मावति
अगदी, अगदी. खरंच अंगावर काटा आलाय....
लेख अतिशय प्रभावी झाला आहे हे वेगळं सांगायला नकोच.
29 Jan 2022 - 1:20 pm | चौथा कोनाडा
थरारक लेख. त्यावेळी या बातम्या टिव्ही, वृत्तपत्रे यातून वाचली होतीच. लेख वाचताना सर्व डोळ्यांसमोर आले.
चुकांचे कसे परिणाम भोगायला लागतात हे अनुभवास आले !
31 Jan 2022 - 7:52 am | श्रीरंग_जोशी
लेखानंतरच्या ९ वर्षांतल्या घडामोडी पाहता सुरक्षेची परिस्थिती तोवरच्या तुलनेत बरीच सुधारली आहे असे वाटते.
भटकळ मोड्युल उध्वस्त झाल्यानंतर गेल्या दशकात वर्षांत भारताच्या बहुतांश भागात बॉम्बस्फोटांसारखे हल्ले होऊ शकले नाहीत. या घटनेनंतर भारतात किंवा भारताबाहेर भारतीय विमानाच्या अपहरणाचा प्रयत्नही होऊ शकला नाही. ९/११ च्या हल्ल्यांनतर जगात सगळीकडेच विमानतळांच्या सुरक्षेचा दर्जा इतका वाढला की विमान अपहरण होणे ही जवळजवळ अशक्य होणारी गोष्ट बनली.
ही परिस्थिती याहूनही सुधरावी अशी सदीच्छा!!
2 Feb 2022 - 5:55 pm | चौथा कोनाडा
अत्यंत दिलासा देणारी गोष्ट आहे ही, नाही तर असल्या घटना पाचवीला पुजल्या होत्या !