तां ना पि हि नि पा जां

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in दिवाळी अंक
21 Oct 2015 - 2:04 pm

.
1
.
.

तां ना पि ही नि पा जां.... फार आवडता आहे हा शब्द माझा. इंद्रधनुष्यातील हे सप्तरंग. लहानपणी इंद्रधनुष्याबद्दल वाटणारं अप्रूप आणि भाबडं प्रेम. निसर्गाची सुंदर ओळख आणि त्या पाठीमागील विज्ञान अशी ही आनंदाची, ज्ञानाची चढती भाजणी. अजूनही इंद्रधनुष्य बघितलं की मन हरखून जातं. हरवून जातं....बालपणात. इंद्रधनुष्याचे हेच विविध, मनमोहक रंग पुढच्या आयुष्यातही अनुभवले, उपभोगले आणि आंजरले-गोंजारलेही.

आमचं घर म्हणजे मुंबईतला एक जुना बंगला. त्या बंगल्याचे दोन भाग करून एका भागात आमचं कुटुंब आणि दुसर्‍या भागात आमचे शेजारी असे आम्ही दोघेही अल्पभाड्याने राहत होतो ते थेट अगदी मी मस्कतात जुनापुराणा होईपर्यंत. मोठा व्हरांडा, पुढचं-मागचं अंगण, आजूबाजूला भरपूर मोकळी जागा आणि वर स्वच्छ निरभ्र आकाश. अगदी हाताशी निसर्ग होता तो म्हणजे आंब्याची, चिकूची, पेरूची, आवळ्याची, जांभळाची, नारळाची, ताडाची, करवंदांची, चिंच-बोरांची झाडं. हे सर्व निसर्गवाण जरी कोणा ना कोणाच्या मालकीचं असलं, तरी आमचाही त्यावर अबाधित अधिकार असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरून तिखट-मीठ-साखर अशी पुरचुंडी आईला सांगून बांधून घ्यायची आणि बाहेर पडायचं. आमच्या घरी सुरी नव्हती. (आणि असती तरी आईने दिलीही नसती) घरी सर्व भाज्या चिरण्यापासून ते गूळ किसण्यापर्यंत विळीच वापरली जायची. माझ्या इतर मित्रांच्या घरी सुरीचा वापर असायचा आणि ते सुरी घेऊन यायचे. ती सुरी मला खूप आवडायची. घरी नसल्याकारणाने सुरी हाताळण्यात एक प्रकारचं थ्रिल असायचं. अशी ती सुरी आणि तिखट-मीठ-साखरेचं मिश्रण घेऊन आम्ही भर दुपारच्या उन्हात भटकायला बाहेर पडायचो. गावाबाहेर टेकड्यांवरून, डोंगरातून भटकताना मिळेल तो वानवळा चाखायचा आणि स्वच्छंद भटकंती करायची. 'दहिसर (माझं माहेर) आणि ठाणे शहर ह्यात सात डोंगर आहेत, पण ते आपल्याला पार करता येत नाहीत, कारण मध्ये वाघांची वस्ती आहे' असं माझ्या मित्राने सांगितलं होतं. त्यामुळे कधी मित्रांसमवेत डोंगरात गेलो तरी मनात वाघाची भीती घट्ट असायची. आजूबाजूला भीतियुक्त नजरेने पाहत मित्रांच्या घोळक्यात राहत मी भटकायचो. त्या डोंगरांमध्ये मन इतकं रमायचं की (आणि वाघ अजून न दिसल्यामुळे) वाघाची भीतीसुद्धा दूर पळायची. तिथे एके ठिकाणी एका झाडाच्या मुळातून थंडगार गोड पाण्याचा झरा होता. त्याचंही खूप आश्चर्य वाटायचं. झाडाच्या तळाशी एक-दीड फूट व्यासाचा खड्डा कोणीतरी केला होता. बहुतेक डोंगरातील आदिवासींनी केला असावा. आता तिथे घरच्यासारखं पेला-भांडं काही नसायचं, त्यामुळे जंगली श्वापदासारखेंगुडघे-हातावर वाकून थेट तोंडानेच ते पाणी प्यायचं आणि तृप्त व्हायचं. तो अनुभवही आपल्या नागरी जीवनापेक्षा वेगळा आणि थेट निसर्गाच्या जवळ नेणारा असायचा.

अभ्यासात मी हुशार नव्हतो आणि अगदी 'ढ'सुद्धा नव्हतो. माझी बहीण माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठी आणि अत्यंत अभ्यासू. तिच्यात आणि तिच्या मैत्रिणीत पहिल्या नंबरासाठी चढाओढ असायची. वडील रेल्वेत असल्याकारणाने शाळेची फी रेल्वेकडून मिळायची. पण दर वर्षी पास होण्याची अट होती. नापास झाल्यास फी मिळणार नाही आणि तसं झाल्यास 'शाळेतून नाव काढून टाकीन' अशी तंबी मला मिळायची. कधी नापास झालो नाही, पण घरच्यांना सदैव टेन्शन. आई तिच्या मैत्रीणींमध्ये नेहमी ताईचं कौतुक करायची. "ही (ताई) हुशार आहे, पण आमचा हा (म्हणजे मी) निव्वळ नर्मदेतला गोटा आहे. ढकलला तेवढाच पुढे जाईल, पुन्हा गडगडत मागे." पण मी ह्या शेरेबाजीचं कधी वाईट वाटून नाही घेतलं की कधी ताईबद्दल असूयासुद्धा वाटली नाही. असतं एखाद्याचं दैव बलवत्तर, माझं नाहीये असा माझा माफक दृष्टीकोन होता. तर शाळेबाहेरील बालपण फार रम्य होतं. त्यामुळे 'रम्य ते बालपण' (शाळा वगळून) असंच मला नेहमी वाटत आलं आहे.

आमच्या घरी दारावर येणारी पाव/बिस्किटं वर्ज्य होती. पण मित्रांच्या संगतील समजलं की बिस्किटांसाठी पैसेच लागतात असं नाही. (ते कधीच माझ्या खिशात नसायचे.) शिसं आणि तांबं देऊन त्या बदल्यात तेवढ्याच वजनाची बिस्किटं मिळायची. मग काय, मिळेल तिथून रस्त्यात तांबं-शिसं शोधत फिरायचं. जमा करून ठेवायचं आणि बर्‍यापैकी जमा झालं की एक दिवस मित्रांसमवेत बिस्किट पार्टी व्हायची. पण घरापासून दूssर.

त्या काळी आमच्या इथे चित्रपटांचं शूटिंग फार व्हायचं. त्या निमित्ताने दारासिंग, मुमताज, रंधवा, तरुण बोस, देव आनंद, जयश्री गडकर वगैरे यायचे. शाळकरी वयात मुमताजपेक्षा दारासिंगचं आकर्षण आम्हाला जास्त होतं. दारासिंग नाश्त्याला ४० अंडी खातो अशी वदंता होती. तो बसला असेल तिथे जास्तीत जास्त जवळून त्याला पाहायला मिळावं म्हणून धडपडायचो. त्याची गर्दन (हो. आपली ती मान, त्याची गर्दन..), बलदंड शरीरयष्टी ह्याचं अप्रूप होतं. आपणही असंच व्हावं अशी सुप्त इच्छा मनात असायची. त्या नंतरच्या काळात (समजत्या वयात) हिरॉईन कोण आहे ह्याचा तपास करून ठरवायचं कुठलं शूटिंग बघायला जायचं ते. हो, २-३ ठिकाणी एकाच वेळी वेगवेगळी शूटिंग्ज चाललेली असायची. वहिदा रहमान, सायरा बानो, हेमा मालिनी, रेखा इत्यादी नट्यांचं आकर्षण वाटायचं. (फक्त बघण्यापुरतं). शाळेच्या उत्तरार्धात म्हणजे ८वी ते ११वी काळात शाळेच्या स्नेहसंमेलनातून नाटकांमधून काम करायची संधी आणि बक्षिसंही मिळाली. शाळेत अभ्यासात, खेळात प्रावीण्य असलेल्या मुलांना 'भाव' मिळायचा. माझ्यापासून तो नाटकात काम करणार्‍यांनाही मिळू लागला.

मी आणि ताई शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेतही भाग घ्यायचो. आई दामटून पाठवायचीच. तिचं म्हणणे होतं, "केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येत असे फार!" माझ्या बाबतीत हा क्रम जरा उलटा झाला. आधी शाळेत सभेत संचार झाला, पुढे कॉलेजात पंडित नावाचा माझा मित्र होता (पण वरील उक्तीतील 'पंडितमैत्री'चा संदर्भ वेगळा आहे, हे उशिरा आलेलं शहाणपण होतं.) आणि फार उशिराने देशाटन घडलं. असो. पण आईचे संस्कार कामी आले. व्यावसायिक बालनाट्यात काम केलं. वर्तमानपत्रात नावही झळकलं. (धन्य धन्य तो दिवस!) दूरदर्शनवरील (तेव्हा फक्त तेवढंच होतं) मालिकेत काम मिळता मिळता राहिलं, कारण मी नोकरी-व्यवसायानिमित्त मस्कतला आलो. नाहीतर आज 'का रे दुरावा'सारखीच 'ह्याला धरावा, मारावा, झोडावा आणि पुरावा' अशी एखादी मालिका तुमच्या माथी आली असती. असो.

तां ना पि हि नि पा जां च्या सप्तरंगातील बालपणाचा हा कोवळा रंग संपता संपता आणखी एक आठवण जागी झाली, ती म्हणजे आमच्या मोहल्ल्यातील एक आजीबाई. गोर्‍यापान, अखंड सुरकुत्यांनी भरलेला त्यांचा चेहरा आणि मऊ सायीसारखा हात. संध्याकाळच्या वेळी आम्ही त्या आजीबाईंच्या व्हरांड्यावर जमायचो. एकट्याच होत्या त्या. त्यांचं नाव 'गुलाबताई'. त्या आम्हांला गोष्टी सांगायच्या आणि आम्ही त्यात हरवून जायचो.

जगजीत सिंग ह्यांची गझल पहिल्यांदा ऐकली..

मुहल्ले की सबसे निशानी पुरानी
वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी
वो नानी की बातों में परियों का डेरा
वो चेहरे की झुरिर्यों में सदियों का फेरा
भुलाए नहीं भूल सकता है कोई
वो छोटी सी रातें वो लंबी कहानी

..तेव्हा मला त्यांचीच आठवण झाली होती. अशा त्या 'गुलाबताई' माझ्या बालपणीचा एक कोपरा व्यापून राहिल्या आहेत.

रंगीबेरंगी बालपण संपून तारुण्याचा अरुणोदय झाला आणि गणितंच बदलून गेली. चिंचा, आवळे, बोरं, आणि परियोंका डेरा यामधून मन बाहेर पडलं होतं. आजूबाजूच्या खर्‍या पर्‍या दिसायला लागल्या होत्या. तो काळ होता कॉलेजचा. पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेत गटांगळी खाल्ल्यावर कॉलेज सोडून थेट नोकरीच पत्करली. शिक्षणाचं महत्त्व कळलंच नव्हतं. पण नोकरी लागल्यावर तिथलं वातावरण, आजूबाजूचा स्टाफ आणि त्यातही एकदोन चांगल्या मित्रांच्या संगतीमुळे पुन्हा कॉलेज जॉईन केलं. ह्या वेळेला तत्कालीन गरजेनुसार कॉमर्सला प्रवेश घेऊन बी.कॉम.ची पदवी मिळवली. ह्या चार वर्षांत नाटकंही चालू होती आणि 'काहीतरी बनण्यासाठी' धडपडही सुरू होती. इतका संघर्षमय काळ होता की तारुण्याचा 'गुलाबी रंग' वाटेत कुठे लागलाच नाही. पदवीच्या शेवटच्या दोन वर्षांत कॉलेजात नाही, पण ओळखीतच गुलाबी रंगाची छटा दिसू लागली. सुरवंटाचं फुलपाखरू झालं. मग त्या भेटीगाठी, ती हुरहुर, ते बागेत बसून 'I love you...I love you' म्हणून झालं आणि मग लग्नही झालं.

मध्यंतरी मी हातची नोकरी सोडून गल्फात नोकरीसाठी गेलो. तेव्हाही घरच्यांच्या मनात धस्स झालं होतं. चांगली आयती मिळालेली (मीच मिळवली होती) सोन्यासारखी नोकरी सोडून दिली? कारण पहिल्यापासून माझं घरातलं रेप्यूटेशन हे 'नर्मदेतला गोटा' असंच होतं त्यामुळे 'घेतला ह्याने पायावर धोंडा मारून' अशा चेहर्‍याने मला निरोप दिला गेला. मस्कतला आलो, तोपर्यंत इंद्रधनुष्यातील अर्धेअधिक रंग संपून गेले होते आणि देशाटनानिमित्त 'बाहेरच्या जगातील आपले स्थान' ह्या गंभीर पर्वाला सुरुवात झाली होती. कंपनीमध्ये दाक्षिणात्यांचं वर्चस्व होतं. एकदम मलबार महासागरात आपण येऊन पडलो आहोत हे जाणवलं. नवीन संघर्ष सुरू झाला.

तिथे एक मलबारी माझा फ्लॅटमेट होता. तो स्वतः आणि त्याचे इतर मलबारी मित्र त्याला फार हुशार मानायचे. त्याने सहज बोलतो आहे असं भासवून एकदा मला एक गुगली टाकला. "बंबईमे साऊथ इंडियन्सको शिवसेना तकलीफ देती है। कहते है बंबई तुम्हारा नही है, तुम भाग जाओ तुम्हारे केरला मे। अब तुमको अगर इधरका लोग बोलेगा भाग जाओ वापस तो क्या करोगे?" मी हसून त्याला म्हटलं, "जानाही पडेगा। ये मेरा देश नही है। मै जाऊंगा। इसके लिये मै मन बनाकरही आया हूं। मगर बंबईमे तुम लोग और इधर मैं ये दो अलग बात है। बंबईमे तुम्हे किसीने बुलाया नही है, तुम खुद जबरदस्ती आये हो। इधर यहाँही सरकारने मुझे व्हिसा देके आमंत्रित किया है। मै जबरदस्ती आया नही हूं।" तो गार पडला. "लेकिन मल्याळी लोग स्मार्ट है, दुनियामे किधरभी जाओ एक मलबारी तो वहाँ जरूर मिलेगा. ऐसा तुम्हारा मराठी आदमी कितना है बाहर? कुछ भी नही।" मी त्याला म्हणालो, "देखो पणीकर, मच्छर दुनियाभरमे मिलते है, शेर नही।" तिथून पुढे माझ्या वाट्याला न जाण्याचा संदेश सर्व मलबारी बांधवांमध्ये पसरला. अंतस्थ कारवाया सुरू होत्या, पण मी त्यांना पुरून उरलो.

नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संघर्षाचं स्वरूप बदललं. माझा माझ्याशीच संघर्ष सुरू झाला. माझ्यातल्या गैरसमजुतींना, दुर्गुणांना, आळसाला आणि परखडपणाला जिंकावं लागलं. नव्या गोष्टी शिकण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवावी लागली. सुरुवातीला निराश करणार्‍या घटना, व्यवसायात अपयश वगैरे आलं, पण उपाहारगृह व्यवसाय कसा असावा ह्याबद्दलच्या माझ्या ठाम भूमिकेला लवकरच फळं येऊ लागली आणि नैराश्य जाऊन हुरूप येऊ लागला. तरीपण यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवरच ठेवण्याचं कष्टप्रद धोरण अवलंबावं लागलं. आज मागे वळून बघता अनेक संघर्ष केले, अनेक अपयशांना सामोरा गेलो, पण त्याचं वाईट वाटत नाही.

आयुष्य असतंच रंगीबेरंगी इंद्रधनुष्यासारखं. प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेला, भावनेला एक एक रंग आहे असं मला वाटत नाही. बालपणाचा सरसकट एक रंग असला, तरी जाणत्या वयात वेगवेगळे अनुभव, सुखाचे, दु:खाचे, यशाचे आणि अपयशाचेही असे विविध रंग आयुष्यात असल्यामुळे इंद्रधनुष्याची कल्पना मांडली आहे. नाटक आहे, कविता आहेत, लेखन आहे, पाककला आहे, 'काका'पदाला पोहोचल्यापासून इतरांच्या संसारातील व्यथांचं कौन्सेलिंगसुद्धा आहे. आज अनेकदा भारतवारी केली असली, तरी गेली ३४ वर्षं घरापासून दूर आखातात आहे मी. आयुष्यात हाही एक नावडता गहिरा रंग आहेच, पण प्रत्येक रंग वेगवेगळा नसून एकमेकात सरमिसळ आहे. काही रंग आवडणारे, तर काही न आवडणारेही आहेत, पण सरसकट एकूण अनुभव हा इंद्रधनुषी आहे. तां ना पि हि नी पा जां ह्यातले सगळेच रंग आपल्याला आवडणारे नसले, तरी सर्व रंगांचा एकूण परिणाम फार मोहक असतो. तो तसाच राहावा, एवढीच इच्छा आहे.
.

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 12:07 pm | नूतन सावंत

लहानपणी?मला तर आतासुद्धा, इंद्रधनुष्याबद्दलअप्रूप आणि भाबडं प्रेम वाटतं

त्यामुळे 'रम्य ते बालपण' (शाळा वगळून) असंच मला नेहमी वाटत आलं आहे.

नाहीतर आज 'का रे दुरावा'सारखीच 'ह्याला धरावा, मारावा, झोडावा आणि पुरावा' अशी एखादी मालिका तुमच्या माथी आली असती. असो.

हाहा.

तां ना पि हि नी पा जां ह्यातले सगळेच रंग आपल्याला आवडणारे नसले, तरी सर्व रंगांचा एकूण परिणाम फार मोहक असतो. तो तसाच राहावा, एवढीच इच्छा आहे.

तथास्तु.

खटपट्या's picture

10 Nov 2015 - 1:12 pm | खटपट्या

मच्छर दुनियाभरमे मिलते है, शेर नही।

क्या बात

सर्वसाक्षी's picture

10 Nov 2015 - 2:23 pm | सर्वसाक्षी

आवडले. अगदी प्रवाही आणि सरळ कथन. सुंदर.

व्वा!! काय बाणेदार उत्तर आहे!! आवडलं मला. :)

दिपक.कुवेत's picture

10 Nov 2015 - 3:31 pm | दिपक.कुवेत

लिखाणाच्या ह्या सप्तरंगी छटा आवडल्यात.

आयुष्य असतंच रंगीबेरंगी इंद्रधनुष्यासारखं. प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेला, भावनेला एक एक रंग आहे असं मला वाटत नाही. बालपणाचा सरसकट एक रंग असला, तरी जाणत्या वयात वेगवेगळे अनुभव, सुखाचे, दु:खाचे, यशाचे आणि अपयशाचेही असे विविध रंग आयुष्यात असल्यामुळे इंद्रधनुष्याची कल्पना मांडली आहे. नाटक आहे, कविता आहेत, लेखन आहे, पाककला आहे, 'काका'पदाला पोहोचल्यापासून इतरांच्या संसारातील व्यथांचं कौन्सेलिंगसुद्धा आहे. आज अनेकदा भारतवारी केली असली, तरी गेली ३४ वर्षं घरापासून दूर आखातात आहे मी. आयुष्यात हाही एक नावडता गहिरा रंग आहेच, पण प्रत्येक रंग वेगवेगळा नसून एकमेकात सरमिसळ आहे. काही रंग आवडणारे, तर काही न आवडणारेही आहेत, पण सरसकट एकूण अनुभव हा इंद्रधनुषी आहे. तां ना पि हि नी पा जां ह्यातले सगळेच रंग आपल्याला आवडणारे नसले, तरी सर्व रंगांचा एकूण परिणाम फार मोहक असतो. तो तसाच राहावा, एवढीच इच्छा आहे.

मस्त लिहिले आहे काका..

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 1:14 pm | अभ्या..

+१
मस्त लिहिलेत खरेच.
मराठीत तानापिहिनिपाजा असायचे. विन्ग्लिशात विब्ग्योर व्हायचे. क्रम कसा बदलला जायचा कुणास ठौक.
रंगात रंगूनी सार्‍या, रंग माझा वेगळा हे सिध्द केलेत तुम्ही. साष्टांग नमस्कार.

सुबोध खरे's picture

10 Nov 2015 - 7:17 pm | सुबोध खरे

झकास लेख
पेठकर साहेब

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2015 - 9:57 pm | स्वाती दिनेश

खूप छान इंद्रधनुषी लेख!
दिवाळी अंकाच्या निमित्ताने खूप दिवसांनी लिहिते झालात, छान वाटले.
स्वाती

मी-सौरभ's picture

11 Nov 2015 - 12:20 am | मी-सौरभ

मस्त लेखन काका

शुभ दीपावली _/\_

तुमचा एक पुतण्या..

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 8:30 am | प्रीत-मोहर

Mast lihile ahe kaka

मितान's picture

11 Nov 2015 - 9:00 am | मितान

वा ! खूप छान लिहिलंय काका तुम्ही !

शशिकांत ओक's picture

11 Nov 2015 - 10:42 am | शशिकांत ओक

पेठकर काका,
जीवनाकडे त्रयस्थपणे पहायला व त्यावर सौंदर्यपूर्ण भाषेत सादर केलेल्या आत्मकथनाने दिवाळी अंकात इंद्रधनुष्यी उठाव आलाय.

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:45 am | टवाळ कार्टा

लय भारी

सतिश गावडे's picture

11 Nov 2015 - 10:46 am | सतिश गावडे

छान लिहिलं आहे काका. आवडलं.

नेहमीप्रमाणेच मस्त लेख! ते शेर नहीं वालं बाणेदार उत्तर जबरदस्त आवडलंय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2015 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे

वाह् ! नेहमीप्रमाणेच रोचक भाषेतले सुंदर लेखन !

पेठकरकाका, लेख अतिशय आवडला.

पद्मावति's picture

11 Nov 2015 - 12:00 pm | पद्मावति

अतिशय सहज सुंदर लेख. खूप आवडला.

शेखरमोघे's picture

11 Nov 2015 - 12:07 pm | शेखरमोघे

बालपणाचा सरसकट एक रंग असला, तरी जाणत्या वयात वेगवेगळे अनुभव, सुखाचे, दु:खाचे, यशाचे आणि अपयशाचेही असे विविध रंग आयुष्यात असल्यामुळे इंद्रधनुष्याची कल्पना मांडली आहे.

सुन्दर कल्पना आणि अप्रतिम लेख ! आवडला !!

नंदन's picture

11 Nov 2015 - 12:10 pm | नंदन

लेख अतिशय आवडला. सहजसुंदर आणि नेमका!

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 12:24 pm | बोका-ए-आझम

नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संघर्षाचं स्वरूप बदललं. माझा माझ्याशीच संघर्ष सुरू झाला. माझ्यातल्या गैरसमजुतींना, दुर्गुणांना, आळसाला आणि परखडपणाला जिंकावं लागलं. नव्या गोष्टी शिकण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवावी लागली. सुरुवातीला निराश करणार्‍या घटना, व्यवसायात अपयश वगैरे आलं, पण उपाहारगृह व्यवसाय कसा असावा ह्याबद्दलच्या माझ्या ठाम भूमिकेला लवकरच फळं येऊ लागली आणि नैराश्य जाऊन हुरूप येऊ लागला. तरीपण यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवरच ठेवण्याचं कष्टप्रद धोरण अवलंबावं लागलं. आज मागे वळून बघता अनेक संघर्ष केले, अनेक अपयशांना सामोरा गेलो, पण त्याचं वाईट वाटत नाही.

संपूर्ण लेख सुंदरच आहे पण त्यातला हा भाग सर्वात छान आहे.

पैसा's picture

11 Nov 2015 - 1:09 pm | पैसा

खूप छान! आयुष्य म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य खरंच!!

इंद्रधनूसारखाच सुरेख लेख !

मंजूताई's picture

11 Nov 2015 - 2:48 pm | मंजूताई

प्रांजळपणे लिहीलेला लेख आवडला!

ऐसा तुम्हारा मराठी आदमी कितना है बाहर? कुछ भी नही।" मी त्याला म्हणालो, "देखो पणीकर, मच्छर दुनियाभरमे मिलते है, शेर नही।" तिथून पुढे माझ्या वाट्याला न जाण्याचा संदेश सर्व मलबारी बांधवांमध्ये पसरला. अंतस्थ कारवाया सुरू होत्या, पण मी त्यांना पुरून उरलो.
काका लेख तर आवडलाच पण या षटकाराबद्दल खूप खूप धन्यवाद!!!!!

आठवणींचे, अनुभवांचे इंद्रधनु छान रेखाटले आहे.

तां ना पि हि नी पा जां ह्यातले सगळेच रंग आपल्याला आवडणारे नसले, तरी सर्व रंगांचा एकूण परिणाम फार मोहक असतो. .

अगदी खरय .

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2015 - 5:22 pm | प्रभाकर पेठकर

सुरन्गी, खटपट्या, सर्वसाक्षी, अदि, दिपक.कुवेत, मोदक, अभ्या.., सुबोध खरे, स्वाती दिनेश, मी-सौरभ, प्रीत-मोहर, मितान, शशिकांत ओक, टवाळ कार्टा, सतिश गावडे, एस, डॉ सुहास म्हात्रे, यशोधरा, पद्मावति, शेखरमोघे, नंदन, बोका-ए-आझम, पैसा, स्नेहांकिता, मंजु, मांत्रिक आणि मनीषा.

सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद.

पेटकर साहेब नेहमी प्रमाणेच सिक्सर. आत्मविश्वास हेच (इंद्र) धनुष्य. प्राप्त परिस्थिती हाच खरा मार्गदर्शक . नुसता लेख नाही तर शिकण्या सारखे बरेच कांहीं, ते पण सत्य अनुभवातून. क्या बात है।

स्रुजा's picture

12 Nov 2015 - 4:52 am | स्रुजा

वाह, भावनांचा कोलाज सुरेख उमटलाय. लहानपणीच्या आठवणी तर खास च. गणपती लेखमाले पासून तुमच्या व्यवसायातील तुमच्या लढाऊ आणि विजिगिषु प्रवृत्तीचं कौतुक ही वाटतं आणि प्रेरणादायी तर आहेच !! इतक्या सुंदर इंद्रधनुष्याच्या रेखाटना बद्दल धन्यवाद.

असंका's picture

12 Nov 2015 - 10:26 am | असंका

सुरेख!!

धन्यवाद!

कोमल's picture

12 Nov 2015 - 10:40 am | कोमल

मस्तच काका. आवडलं

बाजीगर's picture

12 Nov 2015 - 2:18 pm | बाजीगर

सुंदर आणि प्रांजळ लेखन.आवडलं

विशाल कुलकर्णी's picture

12 Nov 2015 - 2:59 pm | विशाल कुलकर्णी

सुरेख लेख...
आवडला !

जव्हेरगंज's picture

12 Nov 2015 - 4:05 pm | जव्हेरगंज

मस्तच लेखन!!!

तां ना पि ही नि पा जां.... फार आवडता आहे हा शब्द माझा. इंद्रधनुष्यातील हे सप्तरंग.>>>>>>>>

आमच्या वेळी ते असं होतं,

जा ता ना ही पा णी पी (जातानाही पाणी पी) लक्षात ठेवायला सोपे!!! :)

नाखु's picture

14 Nov 2015 - 9:59 am | नाखु

तरीपण यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवरच ठेवण्याचं कष्टप्रद धोरण अवलंबावं लागलं. आज मागे वळून बघता अनेक संघर्ष केले, अनेक अपयशांना सामोरा गेलो, पण त्याचं वाईट वाटत नाही.

हे उमजेपर्यंत बरेचदा अर्ध आयुष्य खर्ची पडते आणि पाय पुन्हा जमीनीवर टेकवताना हमखास अडखळतातच म्हणून जुन्या दिवसांकडे तरी मी "धाक्+आठवण" म्हणून बघतो. (त्याने गरजा आपोआप सीमीत होतात असा रोकडा अनुभव आहे)

उघड्या शाळेतला विद्यार्थी नाखु

मित्रहो's picture

14 Nov 2015 - 12:54 pm | मित्रहो

पेठकर काका. आयुष्यातील इंद्रधनुषी रंगांच्या अनुभवाचे छान वर्णन केले.

जगप्रवासी's picture

14 Nov 2015 - 2:31 pm | जगप्रवासी

त्या 'गुलाबताई' माझ्या बालपणीचा एक कोपरा व्यापून राहिल्या आहेत.>>>> यावर वाचायला आवडेल, येऊ द्या त्यापण आठवणी..

"देखो पणीकर, मच्छर दुनियाभरमे मिलते है, शेर नही।">>> षटकार खेचलात

अरुण मनोहर's picture

15 Nov 2015 - 2:14 pm | अरुण मनोहर

सहज सुंदर वर्णन!

इशा१२३'s picture

15 Nov 2015 - 3:39 pm | इशा१२३

सुंदर लेख.मस्त वर्णन.
बालपणीचे इंद्रधनुषी रंग आठवले.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2015 - 5:38 pm | मुक्त विहारि

अगदी इंद्रधनुष्या सारखा.

बॅटमॅन's picture

15 Nov 2015 - 7:02 pm | बॅटमॅन

लेख एक नंबर आवडला. बाकी गोष्टींसोबतच (चक्क) मुंबैजवळच्या निसर्गाचं वर्णन फार आवडलं. त्याबद्दलही कधी विस्ताराने लिहावे, अशी विनंती.

तुमचा अभिषेक's picture

15 Nov 2015 - 7:15 pm | तुमचा अभिषेक

हायला ते मच्छर शेर बोलण्याची डेअरींग भारी आहे.
लेखही तितकाच भारी

छान लिहिलं आहे काका. आवडलं.

दीपा माने's picture

16 Nov 2015 - 5:53 am | दीपा माने

तुमच्या लिखाणातून तुमचे व्यक्तिमत्व डोकावते. जसे की 'हिम्मत मर्दा तो मदद खुदा' ,

चतुरंग's picture

16 Nov 2015 - 7:33 am | चतुरंग

सात रंगांची उपमा चपखल. मुंबईजवळ बंगला, बाग वगैरे म्हणजे स्वप्नवतच वाटते ऐकायला सुद्धा!
भारतापासून दूर ३४ वर्षे म्हणजे मनात खूप आठवणी दाटून असणार. एका डोळ्यात आसू आणि दुसर्‍यात हासू अशी अवस्था. मी समजू शकतो.
वेळ मिळेल आणि धुन लागेल तसे कधीतरी गुलाबताईंबद्द्दलही लिहा...

-रंगा

मृत्युन्जय's picture

16 Nov 2015 - 11:11 am | मृत्युन्जय

नेहमीप्रमाणेच सुंदर लेख

पियुशा's picture

17 Nov 2015 - 3:30 pm | पियुशा

जियो !!! काकाश्री काय डायलॉग मारलाय, रजनीकान्तचा डायलॉग आठवला :)
असो लेखाबद्द्ल
अतिशय आवड्ला , मनापासुन लिहिलेल सगळ सुरेखच असत :)

सूड's picture

17 Nov 2015 - 6:57 pm | सूड

सुंदर लिहीलंय आणि हजरजबाबीपणातलं उत्तर तर एकदम आवडेश!!

रुपी's picture

18 Aug 2016 - 12:42 am | रुपी

सुंदर लेख.. फार आवडला!