सिंहासन - १९७९
मराठी चित्रपटसृष्टीला वेगळं परिमाण देणार्या चित्रपटांची यादी करायची झाल्यास 'सिंहासन'ला कुणीच वगळू शकणार नाही. राजकीय अस्थिरता, त्यातून आलेला सत्तासंघर्ष, वैयक्तिक हेवेदावे हे उठून दिसावेत असा सामान्य जनतेच्या दैन्यावस्थेचा कॅनव्हास. मुख्यमंत्र्यांना धोक्याचा इशारा देणारा एक निनावी फोन, आणि त्यातून वेल्डिंगसारख्या ठिणग्या उडवत जाणारा सत्तासंघर्ष. ७०च्या दशकातील महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या, न घडलेल्या वेगवेगळ्या घटनांचा गोफ विणत चित्रपट फुलत जातो.
तसे पहायला गेले, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा कालावधी साधारणतः तीन वर्षांचा राहिला आहे. अपवाद फक्त एकच - वसंतराव नाईक (तब्बल बारा वर्षे). या पार्श्वभूमीवर चित्रपटात दाखवलेल्या 'घालमेलीचे' गांभीर्य कळावे.
चित्रपटाची कथा वगैरे इथे लिहिण्यात काहीच हशील नाही, कारण खरा चित्रपटप्रेमी सिंहासन न बघणे शक्यच नाही असे मला वाटते. पण यातले एक एक पात्र, त्याच्याशी मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे कसे वागतात-बोलतात, प्रत्येक जवळच्या माणसाला चेकमेट कसे करतात हे अनुभवणे आवश्यक आहे.
निनावी फोनवर मुख्यमंत्र्यांना सांगितले जाते की त्यांच्या जवळचे, पक्षाचे लोक त्यांच्याविरुद्ध कट करताहेत. बातमी साधीसुधी वा दुर्लक्षणीय नाही. पण नेमके कोण असेल यामागे हे कळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री दोन दिवस आजारी पडतात. संशयाची पहिली सुई असते ती अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे. पण खरेच तेच आहेत का सूत्रधार? वाटत नाही - कारण ते पक्षातले जरी असले, तरी जवळचे नक्कीच नाहीत. बातमी कुजबुजीच्या रूपात बाहेर पडली, तर मात्र ते नक्कीच हातपाय हलवणार.
आता मुख्यमंत्र्यांना भेटायला येणार्यांत पहिला नंबर त्यांचा नातलग आनंदराव टोपलेचा (श्रीकांत मोघे). तब्येतीची चौकशी करायच्या बहाण्याने निनावी फोनबद्दल विचारून माहिती काढायचा प्रयत्न लपून राहत नाही. शिवाय प्रकृती अस्वास्थ्याच्या निमित्ताने काम कमी करण्याचा, 'जबाबदारीची कामे' त्याच्याबरोबर इतर मंत्र्यांवर सोपवण्याचा सल्ला म्हणजे धोक्याचा इशाराच जणू. मुख्यमंत्रीही कोकण, विदर्भच्या आमदारांची मापे आनंदरावकडून काढायचा प्रयत्न करतात. आनंदा कितपत पाण्यात आहे हे जोखायचा प्रयत्न करतात. पण आनंदा दाद लागू देत नाही. (धोक्याची व्यक्ती क्र. १; धोका पातळी - अत्युच्च.)
विश्वासराव दाभाडे आता स्वस्थ नक्कीच बसणार नाहीत. त्यांना काही गटांचा पाठिंबा लागणारच. सुशिक्षित व नागरी वळणाचे दाभाडे व ग्राम्य व इंग्रजी न कळणारे असे कृषिमंत्री माणिकराव यांच्यात एकेकाळी विस्तवही जात नसे, पण आता मात्र गळ्यात गळे घालून फिरताहेत हे कळवणारे खबरी पत्रकार मंत्रालयात फिरतच असतात. याचा अर्थ, माणिकराव कधीही फुटू शकतात. माणिकरावांचा वीक पॉईंट काय हे मुख्यमंत्र्यांना माहीत असते. त्यामुळे माणिकराव हा काही फार मोठा धोका नाही, पण ६०च्या आसपास आमदार गट असणारा माणूस आपल्याबरोबर हवाच.
तिसरा गट म्हणजे समाजकल्याण मंत्री बुधाजीरावचा, दलित आमदारांचा. विश्वासराव बुधाजीशी संधान बांधणार, पण हे आपल्याला कळावे म्हणून त्याचे फोन टॅप केले जात असतात. नेमके विश्वासरावांशी त्यांना पाठिंबा देण्याबद्दल बोलताना बुधाजी सापडतो, आणि अलगद मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अडकतो. इथे कॅमेरा भिंतीवर फोनचा रिसीव्हर कानाला लावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या तसबिरीकडे अल्लाद जातो. दिग्दर्शनाचा एक अप्रतिम नमुना जब्बार पटेल दाखवतात. फोन टॅप झाल्यानंतर लगेचच दर्यापूरच्या नगरपालिकेतल्या अफरातफरीबद्दल सभागृहात प्रश्न येतो, यामागे राजकारण नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल.
सभागृहात सहजासहजी प्रश्न येत नसतो. प्रश्न दाखल करून घेण्याचे अधिकार सभापतींना असतात. योगायोग असा की सभापती नाना गुप्तेंनीच बुधाजीला राजकारणात पुढे आणलेले आहे. त्यामुळे नानांवर दबाव टाकल्यास प्रश्न सभेत येण्याचा मार्ग मोकळा होईल. इथला नाना-मुख्यमंत्री यांच्यातला फोनवरचा संवाद रोचक आहे.
मुख्यमंत्री - एक विनंती होती. ते बुधाजीरावचं प्रकरण - दर्यापूरच्या नगरपालिकेतलं. ती १८-१९ लाखाची अफरातफर.
नाना गुप्ते - (चाचरत) हं.. बरं बरं
लक्षात घ्या, सत्तरीच्या दशकात १८-१९ लाखाची अफरातफर म्हणजे नगरपालिकेच्या मानाने प्रचंड मोठ्या रकमेचा घोटाळा. पण मुख्यमंत्री इतक्या सहजी हा आकडा बोलून जातात की फार रुटीन गोष्ट आहे. भ्रष्टाचाराबद्दलची बेफिकिरी यापेक्षा वेगळ्या प्रकारे कशी बरे दाखवता येईल?
प्रश्न दाखल करून घ्यायला नियम व संसदीय परंपरेचे कारण नाना पुढे करताच मुख्यमंत्री एकाच वाक्यात ("परंपरेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगणार..") त्यांना गप्प करतात. फोन संपताच फ्लॅशबॅकमध्ये नानांचा भूतकाळ. राधाक्काचा विषय काढल्यानंतर पत्नी समुद्रात बुडत असताना धावता धावता नानांची थबकणारी आणि मागे वळणारी पावले, ते प्रकरण दाबून टाकण्याची जिवाजीराव शिंदेंनी घेतलेली जबाबदारी. पण याचा परंपरेशी काय संबंध असे वाटेल एक क्षणभर. याचा उलगडा होण्यासाठी पुढच्या काही फ्रेम्स नीट बघाव्या लागतील. राधाक्का बुधाजीसाठी चहा घेऊन येताना नीट लक्ष द्या. राधाक्काच्या कपाळावर कुंकू नाही. ज्या विधवा राधाक्काच्या ओढीने नानांची पावले थबकली, तिचा फॉर्मल स्वीकारही नानांनी केलेला नाही. याचा विचार करता "परंपरेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगणार" या वाक्याची दाहकता, बोच कळून यावी.
विश्वासराव दाभाडे उद्योगपती व कामगारांचा सपोर्ट एकाच वेळी मिळवण्यासाठी कामगार पुढारी डिकास्टाला (सतीश दुभाषी) चर्चेला बोलावतात. उद्योग जगतातले अशांत वातावरण (टाळेबंदी, संप इ.) जर कंट्रोलमध्ये आणले, तर पक्षश्रेष्ठी आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवू शकतील ही अटकळ. तोंडाने फटकळ डिकास्टाला विकतही घ्यायचा प्रयत्न कोसळतो. इतकेच नव्हे, तर "आपल्या मागण्या लेखी असू शकत नाहीत म्हणून जर त्या पुर्या झाल्या नाहीत, तर नव्या मुख्यमंत्र्याला मी सचिवालयासमोर जोड्यानं मारेन" अशी धमकी ऐकून घ्यावी लागते. अर्थातच ही बैठक निष्फळ होते. या संवादातली जुगलबंदी उच्चच. शब्दात पकडायची एकही संधी डिकास्टा दवडत नाही, इथेही आणि नंतर मुख्यमंत्र्यांशी होणार्या चर्चेतही.
आनंदराव टोपलेंचे काका व मुख्यमंत्र्यांचे साडू - रावसाहेब टोपले. हे साखर संघाचेही अध्यक्ष. जवळपास संपूर्ण साखरपट्ट्यातील आमदार व सहकारी संस्थांवर यांचा वचक. मुख्यमंत्री रावसाहेब टोपलेंच्या माध्यमातून या भागातली पकड मजबूत करायला सांगतात. पण टोपले कुटुंबीयांवर वचक कसा ठेवायचा? याची एक संधी अनायासेच मिळते ती रावसाहेब टोपलेंच्या ५७व्या वाढदिवशी झालेल्या एका हरिजन कुटुंबाच्या हत्येने. हत्या करून त्यांना भूकबळी ठरवले जाते. भूकबळी असो वा दलित हत्या, मुख्यमंत्री अडचणीत येणार हे निश्चित. शिवाय, एकीकडे रावसाहेब टोपलेंच्या वाढदिवसाचा जंगी कार्यक्रम चालू असताना गावात भूकबळी पडताहेत यावरून विधानसभेत गदारोळ करायची संधी विरोधक सोडणार नाहीत. या हत्येत अशोक (रावसाहेब टोपलेंचा मुलगा) गुंतला असल्याने आनंदरावला चेपायला मुख्यमंत्र्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळते. कारण आनंदा मुख्यमंत्र्यांचा नातलग, कधी कोकण, विदर्भ इ. भागातल्या आमदारांच्यात, तर कधी दाभाड्यांच्या घरातील पार्टीत. याचा अर्थ आधी म्हटल्याप्रमाणे धोकाच. एके दिवशी मुंबईहून गावाकडे जाताना रावसाहेब टोपलेंवर हल्ला करून त्यांची धिंड काढली जाते. हल्लेखोर डॉ. आंबेडकरांच्या नावाने घोषणा देत जातात. या प्रसंगानंतर विधानसभेत मुख्यमंत्री आनंदाला विचारतात की "तपास करायला सांगितलाय, पण ठोस असं हाती आलेलं नाही. अजून काही करता येईल का?" आणि तपास आनंदरावच्या कन्सेंटनेच बंद करायला सांगतात. कारण जर प्रकरणाची चौकशी केली, तर भूकबळी पडलेल्या लोकांची हत्या झाल्याचे व त्यात अशोक टोपले गुंतल्याचे उघड झाले असते. टोपलेंची बेअब्रू होत असली तरी मुख्यमंत्र्यांची इमेज उजळायचा मोठा चान्स असतो.
इथे आनंदराव व मुख्यमंत्री हे ज्या प्रकारे एकमेकांकडे बघतात, त्यांची बॉडी लँग्वेज बघण्यासारखी आहे. वाक्यावाक्यागणिक चेहर्यावरचे बदलणारे हावभाव अभिनयक्षमतेचा कस बघणारे आहेत. दोन्ही कलाकार त्या कसोटीवर खरे उतरलेत.
मुख्यमंत्र्यांना मदत करू शकणारा एक महत्त्वाचा साथीदार म्हणजे पत्रकार दिगू टिपणीस. दिगू टिपणीस हा नि:स्पृह पत्रकार. पक्षाध्यक्ष ते इतर सर्व नेत्यांशी अगदी जवळचे संबंध असणारा. त्यांना विविध इनपुट्स देणारा हा पत्रकार. मुख्यमंत्र्यांच्याही मर्जीतला आणि विश्वासरावांच्याही. एकंदरीत चाललेल्या सगळ्या 'घालमेलीत' दिगूचा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना असतो, हे चित्रपटात दिसून येते.
मुख्यमंत्र्यांच्याच पक्षातले एक सदस्य, जे सरकारच्या धोरणांवर टीका करतात, ते म्हणजे आमदार श्रीपतराव शिंदे. दुष्काळी व खेड्यातील लोकांच्या व्यथा मांडणारे म्हणून त्यांची ख्याती. श्रीपतरावांची समजूत काढण्याचा प्रयत्न दिगू करताना दिसतो. एकंदरीत परिस्थितीवर श्रीपतराव ज्या वक्रोक्तीने प्रहार करतात, ते संवाद खासच. ("होळी पेटलीये, होळी! पोळ्या भाजणं चाललंय. खाणारे खातायत, आमच्या पोटात दुखतं. आम्ही पक्षातले बोंबर आहे ना", "गळेकापूंच्या राज्यात खिसेकापूंना छद्मभूषण!", "गाठा, उच्चांक गाठा. आम्ही दुष्काळी भागातली माणसं, उपाशी पोटांचे नगारे बडवीत तुमचे उच्चांक बघतो.) इथे श्रीपतरावांना कन्व्हिन्स करण्यासाठी अन्नधान्याच्या आघाडीवरच्या प्रगतीबद्दल सांगताना उदाहरण मात्र साखरेच्या उत्पादनाचे देतो. साखर हा अन्नधान्याला पर्याय कसा काय असू शकेल? आणि, साखर उत्पादन पाण्याची विपुलता असलेल्या भागात होत असताना दुष्काळी भागासाठी त्याचा काय उपयोग, या बाबींचा दिगू कसा काय विचार करत नाही हे न उलगडलेले कोडेच. म्हणूनच हीसुद्धा मुख्यमंत्र्यांची खेळी असावी, असा दाट संशय येतो
दिगू बातम्या 'एन्कॅश' करत नसल्याने मुख्यमंत्री गोड बोलून, जनतेच्या हितासाठी, त्याला डिकास्टाची भेट घडवून आणण्याची गळ घालतात.
प्रसंग - एका उंच गच्चीवर मुख्यमंत्री व डिकास्टा मुंबई शहराकडे बघताहेत. चर्चा चालू होते शहरावरच्या सत्तेची. वाक्चातुर्याने डिकास्टा स्मगलिंगच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी करतोय. कम्युनिस्ट विचाराने सत्तेचा प्रतिवाद करतोय. अखेर मुख्यमंत्री त्यांचा डाव टाकतात. डिकास्टाला सत्तेत कामगारमंत्री म्हणून सहभागी होण्याची ऑफर करतात. या अनपेक्षित खेळीने डिकास्टा गोंधळतो. डिकास्टाच्या कोणत्याही निर्णयानंतर मुख्यमंत्री कावेबाजपणे कात्रीत पकडणार हे नक्की असते. (दिल्लीत काँग्रेसने अरविंद केजरीवालवर असाच डाव टाकला, पण नेमकी काँग्रेसच त्यात नको इतकी फसली.) ऑफर देतानाची मुख्यमंत्र्यांची देहबोली व डिकास्टा बुचकळ्यात पडल्यानंतर असणारी निर्धास्तपणाची देहबोली प्रेक्षकाला अचंबित केल्याशिवाय राहत नाही.
संयुक्त महाराष्ट्र ही महाराष्ट्राची आजही दुखरी नस. नेमका तोच प्रश्न घेऊन भीष्माचार्य, देशभक्त जोशी आमरण उपोषणाला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बसतात. संयुक्त महाराष्ट्रावर एकही आश्वासन न देता, अत्यंत बेरकीपणे देशभक्त जोशींना आपल्या बंगल्यात उपोषणासाठी जागा देऊन त्यातली हवाच काढून घेतात. क्षणाक्षणाला बदलणारे चेहर्यावरचे भाव, संवादफेक यात मुद्दा बाजूला टाकण्याचे कसब वाखाणण्याजोगेच.
दाभाडे गटाची जुळवाजुळव सत्यनारायणाच्या निमित्ताने नक्की होत असताना मध्येच दत्ताजी पिक्चरमध्ये येतात. आमदारांची गटसंख्या, खातेवाटप, दिलेली आश्वासने यातून गडबड उडवत माणिकराव व विश्वासराव यांच्या जवळिकीत खोडा घालतात. सर्व परिचितांत दत्ताजीच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असतात, हे इथे स्पष्ट होते.
अखेर दाभाडेंचा राजीनामा, डिकास्टावर झालेला खुनी हल्ला, स्मगलर्सच्या लिस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याचे नाव, मग हार्ट अॅटॅक वगैरे इतर नाट्य होऊन मुख्यमंत्रीच पुन्हा खुर्चीत राहतात. भ्रष्ट मंत्र्यांना मिळालेली बढती, माणिकरावांना दिलेले उपमुख्यमंत्रिपद हे सर्व बघून दिगूसारखा पत्रकारही अखेर भ्रमिष्ट होऊन जातो व चित्रपट संपतो.
या सर्व घटनाक्रमात थोडाच वेळ पडद्यावर राहून जास्त लक्षात राहण्यासारखी पात्रे दोनच - डिकास्टा व श्रीपतराव. कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय न सोडता विचार करणारी ही दोन पात्रे. कोणत्याही दबावाखाली न येणारी, सर्वसामान्यांची कड घेणारी.
आजही तळागाळातल्या जनतेची कड घेणार्या नेतृत्वाची पोकळी महाराष्ट्राला जाणवतेय. तात्पुरती आंदोलने करणारे हजार मिळतील, आहेत. पण त्यांच्यावर किती जण विश्वास ठेवतात हे कोडेच आहे. सत्तेत बसताच टोपी फिरवणारेही दिसतात. सत्ता न सोडता येणारेही दिसतात. त्या पार्श्वभूमीवर डिकास्टा व श्रीपतराव या दोन कॅरॅक्टर्सची उणीव ठळकपणे जाणवत राहील.
एकंदर महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती पाहता, श्रीपतराव-डिकास्टा यांच्यासारख्या नेतृत्वाचा अभाव पाहता प्रत्येक क्षणाला फुलबाजीसारखे तडतडणारे संवाद असणारा, मुख्यमंत्र्यांच्या धमाकेदार खेळ्या दाखवणारा हा चित्रपट स्मरणात नाही राहिला तरच नवल!
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 9:12 am | विशाल कुलकर्णी
झकास्स्, मस्त लेख !
अतिशय आवडता चित्रपट आहे हां.
10 Nov 2015 - 4:32 pm | कविता१९७८
मस्त लेख
10 Nov 2015 - 10:55 pm | मी-सौरभ
मी अजुन हां चित्रपट पहिला नाही आता बघेन
12 Nov 2015 - 12:00 am | प्रचेतस
उत्तम लेखन.
सिंहासन पाहिला नाही असा माणूस विरळाच. जब्बार पटेलांनी एकाहून एक दिग्गज कलाकार ह्या चित्रपटात एकत्र आणलेत. दिग्गजांची इतकी मांदियाळी असूनही प्रत्येक कलाकार चित्रपट संपल्यावरही लक्षात राहतो हे या चित्रपटाचे यशच. इतर चित्रपटांमधे एकूण एक पात्र लक्षात राहण्याचा पराक्रम फ़क्त शोलेनेच केला असावा.
अर्थात सिंहासनपेक्षा सामना मला किंचित अधिक सरस वाटतो. तेही कदाचित सामनाचे कथानक दोन मुख्य पात्रांभोवती सिमित असल्यामुळेच.
12 Nov 2015 - 12:09 am | एस
लेख आवडला. हा चित्रपट आजही समयोचित वाटतो. फक्त आता कोणीही डिकास्टा अथवा श्रीपतराव उरलेले नाहीत हाच काय तो फरक.
12 Nov 2015 - 3:06 pm | sagarpdy
+१
13 Nov 2015 - 6:55 pm | DEADPOOL
अर्थात सिंहासनपेक्षा सामना मला किंचित अधिक सरस वाटतो.
तेही कदाचित सामनाचे कथानक दोन मुख्य
पात्रांभोवती सिमित असल्यामुळेच. +1
12 Nov 2015 - 10:54 am | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे, आवडलं.
12 Nov 2015 - 12:46 pm | बिपिन कार्यकर्ते
सिंहासन शाळकरी वयात पाहिला होता. नंतरही पाहिला. तेव्हा आवडला होता. पण नंतर कादंबरी वाचली आणि चित्रपट त्या मानाने काहीच नाही असं वाटू लागलं. मला सामना हा अधिक उत्तम आहे असे वाटते.
अर्थात, सिंहासनमध्ये निळू फुले, अरुण सरनाईक, दत्ता भट, सतिश दुभाषी, श्रीराम लागू, श्रीकांत मोघे अशा अनेकांनी अगदी उत्तम काम केले आहे.
12 Nov 2015 - 1:19 pm | असंका
काय सुरेख लिहिलंयत!!! फारच भारी!!
धन्यवाद..!
12 Nov 2015 - 7:09 pm | मित्रहो
सिंहासनचे छान रसग्रहण. चित्रपट मस्तच आहे. त्यातले एकेक पात्र वस्ताद आहे. डिकास्टाची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी केलेल्या संपामुळे निर्माण झालेली बेकारी. दिग्दर्शकाने अजून एक गोष्ट फार कमी संवादातून बेमालूम दाखविली ती म्हणजे रीमा लागू आणि तिच्या नवऱ्याचे संबंध. केवळ त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा नेल्याने कळते तिने असे राजकरारणात पुढाकार घेणे त्याला फारसे पटले नसते. मला न आवडलेल्या दोन गोष्टी म्हणजे
१. चित्रपटाचा शेवट सत्तरीच्या दशकात निराशावादी शेवटाची पद्धत होती. त्याकाळातले चित्रपट, नाटक हे सत्य उभे करीत पण शेवट फार निराशावादी असायचा. यात पण डिकॉस्टावर खुनी हल्ला होणे आणि मुख्यमंत्र्यांना आलेला हार्ट अॅटक का कुणास ठाउक नाही आवडला.
२. रवींद्र महाजनीचे पात्र उगाच कारुण्य दाखवायला आणले की मध्यमवर्गीय ही यातून सुटला नाही हे दाखवायला आणले हे कळले नाही. सतत वाटत उगाच मारल त्याला.
खरच आजसुद्धा समाजाला श्रीपतराव शिंदे आणि डिकॉस्टाची गरज आहे.
12 Nov 2015 - 7:59 pm | अभ्या..
मस्त लिहिलेयस रे अन्या.
चित्रपट अजून नाही पाहिला पण कादंबरीची पारायणं झालीत. मला अरुण साधूंचे लेखन आवडायचे खूप. त्यांचा कॅन्व्हास जबरदस्त असायचा. आता चित्रपट अवश्य पाहीन.
12 Nov 2015 - 10:37 pm | पगला गजोधर
हवे आहेत मिपावर असे आणखी अन्या दातार ....
13 Nov 2015 - 4:07 pm | अन्या दातार
सिंहासनचा विषय आला की त्याची तुलना 'सामना'बरोबर होणार याची कल्पना होतीच. दोन्ही चित्रपट अत्युच्च कलाकारीचे, दिग्दर्शनाचे नमुने असल्यानेमुळेच हे शक्य आहे. तरी, सामनामधील पात्रे फक्त दोन. त्यांचे चलनही ठरलेल्या वळणाचे. सिंहासनमध्ये याच्या बरोबर उलट परिस्थिती. पात्रे भरपूर. कोण कधी पलटी मारेल कुणालाच अंदाज नाही. त्यामुळे सगळा पट थोडा सिंबॉलिक जेस्चर्सनी दाखवत पुढे जाणे, अनपेक्षित कलाटणी देणे याचा विचार करता मला सिंहासनच जास्त भावतो.
@पगला गजोधर - कसचं कसचं
@ मित्रहो -
रिमा लागूचे सासर्याशी व नवर्याशी असलेले संबंध अधिक स्पष्ट होतात ते डिकास्टाची एंट्री होण्याच्या सीनच्या आधी. निराशावदी शेवटाबद्दल सहमत. आता येऊ तुम्हाला चित्रपटात न आवडलेल्या २ प्रसंगांकडे.
थोडा गोंधळ होतोय. पानिटकर हे पात्र रवींद्र महाजनीने नाही तर जयराम हर्डीकरने साकारले आहे. बेकारी वाढण्यासाठी फक्त डिकास्टा जबाबदार आहे का नाही हे ठरवणे चित्रपटाच्या स्कोपमध्ये अवघड आहे. पण हेच बेकार तरुण स्मगलिंगच्या धंद्याला लागत आहेत याची डिकास्टाला कल्पना आहे. म्हणूनच स्मगलिंगच्या विरोधातही लढा देताना डिकास्टा दिसतो. स्मगलर्सबरोबर काम करतानाच जागल्याची (व्हिसलब्लोअर) भूमिका पानिटकर करत असतो. मनाविरुद्ध. पानिटकर आणि डिकास्टा एकमेकाला ओळखतात हे फक्त नाना पाटेकरला माहित असते. एकामागून एक धाडी पडल्यावर मग एके दिवशी पानिटकरला मारले जाते. उगाच नाही.
डिकास्टावर खुनी हल्ला होण्याबद्दल असा तर्क केला जाऊ शकतो की तो मुख्यमंत्र्यानेच करवला असावा. प्रेस कॉन्फरन्सबद्दल डिकास्टा दिगु टिपणीसशी फोनवर बोलतो आणि स्मगलर्सची नावे जाहिर करणार असल्याचे सांगतो. त्यावर दिगुचा चेहरा चिंतेत दिसतो. फार काही न बोलता प्रेस कॉन्फरन्सला येतो असे म्हणून फोन बंद करतो. त्यामुळे कदाचित दिगुला मुख्यमंत्र्यांचे मेहुणे स्मगलिंगच्या धंद्यात आहेत याची कल्पना असल्याचा तर्क बाद ठरवणे अवघड आहे.
हार्ट अॅटॅक खरा की खोटा असा प्रश्न जेंव्हा पत्रकार विचारतात तेंव्हा मुख्यमंत्री फारच गोलमोल उत्तर देतात. त्यावरुन तो बनावच असावा, कोणालाही काही खेळी करु न देण्यासाठी व आपले मोहरे नीट वापरुन घेण्यासाठी घेतलेला वेळ असावा असे वाटते.
एकंदरीत या चित्रपटात कोणतीच गोष्ट 'उगीचच' घडत नाही. त्यामागे काहीतरी हेतू आहे; राजकारण आहे. चित्रपटास असलेल्या लांबीच्या कन्स्ट्रेंटमुळे सगळ्या गोष्टी विस्कटून दाखवण्याची सोय नाही. तेंव्हा देहबोली, आवाजातील चढ-उतार, चेहर्यावरील हावभाव याकडे बारकाईने बघणे क्रमप्राप्त आहे.
13 Nov 2015 - 5:23 pm | मित्रहो
१. चुक दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
२. डिकॉस्टावर खुनी हल्ला हा मुख्यमंत्र्यानेच केला असावा हे जाणवते कारण तो बरीच माहीती उघड करनार असतो तसेच मुख्यमंत्र्याला आलेला हार्ट अॅटक हा सुद्धा बनाव आहे हेही जाणवते. मला आवडले नाही ते या क्लृप्ती करुन मुख्यमंत्रानी साऱ्यातून सहीसलामत सुटतात ते. शेवटी सारे चांगले मारल्या जाते आणि बनाव जिंकतो, मला हेच आवडले नाही.
13 Nov 2015 - 4:35 pm | सुमीत भातखंडे
छान लेख. आता माझे दोन पैसे:
१) मला वाटतं पनिटकर हे पात्र "मुंबई दिनांक" यातून घेतलं आहे. सिंहासनची पटकथा ही "सिंहासन" आणि "मुंबई दिनांक" या दोन्हीवरून बेतलेली होती.
२) डिकास्टा हे पात्र "जॉर्ज फर्नांडीस" यांच्यावर बेतलं असावं असं वाटतं.
३) दिगू वर सुद्ध्हा "मुंबई दिनांक" च्या ऐय्यर चा प्रभाव असावा असं वाटतय. ऐय्यर हे पात्र "बी. एस. व्ही. राव", जे इंडियन एक्सप्रेसचे चीफ रिपोर्टर होते, यांच्यावर बेतलेलं होतं.
काही अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी असलेला हा चित्रपट आहे.
धन्यवाद.
13 Nov 2015 - 6:12 pm | पगला गजोधर
मुख्यामंत्रांचे पत्र कोन्ग्रेस चे वसंतराव नाईक यावरून प्रेरित होते का ?
(हेच वसंतराव शिवसेनेच्या निर्मितीमागचा ब्रेन होते, असेहि ऐकिवात आहे, कृष्णा देसाईची शप्पत.
25 Nov 2015 - 1:59 am | गामा पैलवान
सुमीत भातखंडे,
मला वाटतं की दिगू टिपणीस हे पात्र महान पत्रकार जगन फडणीस यांच्यावर बेतलं होतं.
आ.न.,
-गा.पै.
13 Nov 2015 - 6:53 pm | DEADPOOL
निळूभाऊंनी अजरामर केलेला चित्रपट.
त्यांचा मूक पत्रकार बरच काही बोलतो.
13 Nov 2015 - 7:56 pm | प्रचेतस
दिगू टिपणीसची मोलकरीण सुद्धा एक दोन दृश्यात भाव खाऊन जाते.
13 Nov 2015 - 8:08 pm | पैसा
छान लिहिलंय. डिकॉस्टा हे पात्र निर्विवादपणे जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बेतलेलं होतं. स्मगलिंग वगैरे ला आणि मुख्यमंत्र्याच्या भूमेकेला अनेक राजकारण्यांचा आधार घेतला असावा.
पानिटकर साकारणारा उमदा जयराम हर्डीकर बस अपघातात अकाली गेला. नाहीतर अजून अशा अनेक भूमिका आपल्याला बघायला मिळाल्या असत्या.
हा सिनेमा आणीबाणीमधे सेन्सॉरमधे अडकला असावा आणि मग बरीच काटछाट करून प्रदर्शित केला, किंवा सुचवलेले कट घ्यायला नकार देऊन जब्बार पटेलांनी सिनेमा डब्यात ठेवला आणि आणीबाणी संपून गेल्यानंतर प्रदर्शित केला असे काहीसे आठवते आहे. ही फार जुनी गोष्ट आहे आणि तेव्हा राजकारण कळण्याचे माझे वय नव्हते, त्यामुळे नक्की सांगू शकत नाही. पण या सिनेमाला आणिबाणीशी संबंधित काहीतरी इतिहास आहे असे पुसट आठवत आहे. चुभूदेघे.
13 Nov 2015 - 10:13 pm | ऋतुराज चित्रे
'मंतरलेली चैत्रवेल' च्या बसला लागलेल्या आगीत शांता जोग, जयराम हर्डीकर व मीनल जोशींचा मृत्यु झाला व मराठी नाट्यसृष्टीचे न भरून येणारे नुकसान झाले. आपल्या जिवाची पर्वा न करता शांताबाई जोगांना वाचविण्याच्या प्रयत्नात ह्या देखण्या व उमद्या कलाकाराने मृत्युला कवटाळले. 'सिंहासन' मधील पत्नी व मुलाचा निरोप घेतानाचा प्रसंग व ट्विंकल ट्विंकल चे स्वर आठवले की आजही मन गलबलते.
13 Nov 2015 - 10:31 pm | पैसा
मीनल जोशी वाचली होती.
14 Nov 2015 - 11:04 am | ऋतुराज चित्रे
माझ्या स्मरणशक्तीने धोका दिला
14 Nov 2015 - 12:35 pm | पैसा
लग्नानंतर ती मीनल परांजपे बहुतेक.
25 Nov 2015 - 1:57 am | गामा पैलवान
अरुण सरनाईकही एका अपघातात गेले! :-(
13 Nov 2015 - 11:10 pm | बॅटमॅन
लयच मस्त लेख. हा पिच्चर अता पाहणे आलेच. लै ऐकून होतो याबद्दल.
14 Nov 2015 - 12:10 am | स्वाती दिनेश
आवडत्या चित्रपटाचे सुरेख रसग्रहण!
स्वाती
14 Nov 2015 - 3:45 am | रातराणी
कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली!
आवडता चित्रपट आहे हा. मस्त लिहलय परीक्षण.
14 Nov 2015 - 2:19 pm | नाखु
कृष्ण धवल मध्ये संध्या-प्रकाश काय खेळ करतो त्या साठी मी मराठीत सिंहासन आणि हिंदीत कोहरा सिनेमाला प्राधान्य देईल. संवाद लेखन नाटककाराचे असल्याने खटकेबाज आणि बिनतोड अस्णारच होते पण छायाचित्रणातही कमाल केली आहे.
मस्त रे अन्या भौ...
25 Nov 2015 - 5:39 am | अत्रुप्त आत्मा
क्लासिक वन!
25 Nov 2015 - 9:13 am | मुक्त विहारि
इतक्या सुंदर लेखावर आम्ही काय घंटा प्रतिक्रिया देणार?