रोजनिशी एका काव्यदिंडीची

दिपोटी's picture
दिपोटी in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 8:54 pm

.
.
अमृताशी पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा सकस-समृद्ध आहे हे निश्चित. मात्र एकंदरीतच जगभर लोपत चाललेल्या वाचनसंस्कृतीमुळे वाटणार्‍या काळजीचे ढग या आपल्या संपन्न मायबोलीवरही हळूहळू दाटत आहेत. वाचनाची ओढ कायम राहावी व पुढे ती वाढावी, यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सुरू केलेल्या चार दिवसांच्या या काव्यदिंडीत, सर्वस्वी भिन्न धाटणीच्या असूनही - किंबहुना असल्यामुळेच - मराठी भाषेचे सौंदर्य खुलवणार्‍या चार कवी-कवयित्रींची व त्यांच्या कवितांची ओळख येथे करून घेणार आहोत.

________________________________________________________________________________

दिवस एक :
चार दिवसांच्या या दिंडीतील जागराची नांदी ज्ञानपीठकार शिरवाडकरांशिवाय कोणाच्या कवितेने करता येईल? लहानपणी शाळेत त्यांच्या 'बिजली', 'कोलंबसाचे गर्वगीत', 'आगगाडी व जमीन', 'सागर' अशा अनेक उत्तमोत्तम कवितांनी भारल्याचे व प्रभावित झाल्याचे आठवते. चपखल शब्दांत बसवलेली त्यांची प्रत्येक कविता वाचताना संपूर्ण चित्र फक्त डोळ्यांसमोर उभे राहिल्यावाचून नव्हे, तर अनुभवल्याशिवायदेखील कवितेच्या शेवटापर्यंत कधी पोहोचलो नाही. पुढे त्यांच्या गद्य साहित्यातून त्यांच्या भाषासामर्थ्यातील वैविध्याची व प्रभुत्वाची खात्रीच पटली. दोन्ही प्रकार लीलया व समर्थपणे हाताळणारा हा एक किमयागार - नव्हे, शब्दांचा जादूगारच होय. सर्वसाधारणपणे कवितांची एक खासियत अशी की कवीला अभिप्रेत असो वा नसो - एकाच कवितेतून एकाहून अधिक अर्थ वाचकाच्या मनात उमलू-उलगडू शकतात. ऐंशीहून अधिक वर्षांपूर्वी लिहिलेल्या या खालील कवितेत आजही आपल्या आयुष्यातील - जगरहाटीतील क्षणभंगुरतेचे प्रतिबिंब उमटते काय? खरे तर मूळ-सरळ व प्रतिबिंबित-प्रतिध्वनित असे या कवितेचे दोन्ही अर्थ तेवढेच चिंतनीय व विचार करण्याजोगे आहेत. जीर्ण पालापाचोळा वार्‍याकरवी बेमुर्वतपणे उडवून देऊन नव्याने रहाटगाडगे वा जीवनचक्र चालू करण्याची निसर्गाची अफाट क्षमता व आजपर्यंत भरत जाणारी आयुष्याची पाटी कोणत्याही टप्प्यावर बेधडक पुसून टाकून पुनश्च कोरी पाटी हाती देण्याची त्या विधात्याची अमर्याद ताकद - शेवटी दोहोंत खरा फरक तो काय?

* पाचोळा *
आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगुनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास.
उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवुनिया जगासी
सूर्य गगनातुनि ओतुद्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा !
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने,
वाटसरू वा तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत !
आणि अंती दिन एक त्या वनात
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा, घेरुनी तयाते
नेई उडवुनि त्या दूर दूर कोठे !
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी !
- कुसुमाग्रज / विशाखा

________________________________________________________________________________

दिवस दोन :
'कोलटकरांच्या कविता' हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यांच्या सर्व कविता संपूर्ण वा शंभर टक्के उमजल्या असा दावा जरी न करता आला, तरी 'त्यातील बर्‍याचशा समजल्या व पुष्कळशा आवडल्या' असे म्हणता येईल अशा त्यांच्या कविता आधुनिक, प्रायोगिक वा ऑफबीट सदरात मोडतील. रूढ अर्थाने मिळणार्‍या यशापयशाची वा नावलौकिकाची फिकीर न करता नवनवे प्रयोग करीत राहणे हे जसे चित्रकला, नाट्यकला, छायाचित्रकला, गायनकला या वा कलेच्या इतर कोणत्याही शाखेत जिवंतपणाचे व जागतेपणाचे लक्षण मानले जाते-जावे, तसेच ते साहित्यालादेखील लागू होईल-व्हावे. गेयता, छंद-वृत्त-मीटर, भावपूर्ण अर्थ, अचूक शब्दयोजना हे सारे कवितेचे सर्वमान्य पारंपरिक संकेतच नव्हे, तर भाषेची-सभ्यतेची एकेकाळी प्रमाण मानली जाणारी बंधनेदेखील झुगारून देणारी मोकळी-ढाकळी वा 'खुलीआम' म्हणता येईल अशी अभिव्यक्ती हा विशेष त्यांच्या कवितांमध्ये पदोपदी दिसून येतो. (तप्त-दग्ध विषय असूनही खालील कविता मात्र त्यांच्या इतर काही कवितांतील निर्भीड शब्दयोजनांच्या मानाने सौम्यच म्हणायला हवी.) प्रयोगासाठी चौकटीची मोडतोड करणार्‍या अशा समांतर कलाकृतींची निर्मितीदेखील साहित्याच्या - व पर्यायाने त्याच्या दर्जाच्या - वाढीसाठी पोषक, पूरक व (म्हणून) आवश्यक ठरते, मग भले तो प्रयोग अयशस्वी ठरला तरी.

'A picture is worth thousand words' असा सर्वसाधारण समज आहे व तो बव्हंशी खराही आहे. मात्र क्वचित काही प्रसंगी शेकडो वा हजारो रेखाचित्रांचा-छायाचित्रांचा परिणाम एखाद्या प्रतिभावंताच्या लेखणीतून उतरलेले काही मोजके शब्द साधून जातात. दुसर्‍या महायुद्धाअखेरीस केलेल्या अणुबाँबस्फोटामुळे एका शहरातील रहिवाशांच्या जीवनाची झालेली राखरांगोळी या खालील सात कडव्यांत नेमकी चितारली आहे. 'खाचेतून बाहेर फेकला गेलेला डोळा' वा 'तोंडातून उगवलेलं किंकाळ्यांचं झाड' ही कवितेतील दृश्ये चार भिंतींतील पांढरपेशा मनाला कितीही अघोरी वा भयानक वाटली, तरी हिरोशिमा शहरातील लाखो लोकांसाठी या प्रसंगातील वास्तव याहून कितीतरी पट अधिक भयाण होते, ही वस्तुस्थिती शेवटी उरतेच. ही वस्तुस्थिती कागदावर उतरवायची झाली, तर त्यातील दाहकता वाचकाला जाणवणे व भेडसावणे हे साहजिक - किंबहुना अपरिहार्य - व गरजेचेसुद्धा आहे. शेवटचे कडवे तर प्रचंड बोलके, उपरोधिक व उपहासपूर्ण आहे. जिच्या तोंडातून उगवलेल्या झाडावरील असंख्य किंकाळ्या ऐकूसुद्धा येत नसतील, त्या मुलीला - प्रत्यक्षात पाहिल्या गेलेल्या व कॅमेर्‍याने फिल्मवरदेखील पकडलेल्या त्या अभागी मुलीला - खरेच 'पाहिले' आहे का कुणी? तिच्या व तिच्यासारख्या अगणित इतर निरपराध रहिवाशांच्या भवितव्याची काळजी कुणी आधीच पाहिली-वाहिली असती, तर हा भयंकर प्रसंग ओढवला तरी असता का? काळाच्या ओघात दृष्टिआड होण्याची शक्यता असलेल्या या भकास-उदास सृष्टीला कोलटकर एका पानात शब्दबद्ध करून हे असे अस्वस्थ होण्यासाठी कायमस्वरूपी समोर आणून सोडतात.

* किंकाळी *
अगदी आत्ताआत्तापर्यंत जिथं
हिरोशिमा होतं
त्या दिशेनं येणार्‍या
व मियुकी पुलावरून वाहणार्‍या
सावल्यांच्या लोंढ्यात
पाहिली आहे का कुणी
एक शाळकरी मुलगी
रक्ताचा किमोनो घातलेली
दग्धकेशा
गालावर लोंबतोय खाली
तिचा उजवा डोळा
खाचेतून बाहेर फेकला गेलेला
तिच्या तोंडातून उगवलंय एक झाड
किंकाळ्यांचं
कुणालाही ऐकू न येणार्‍या
तिची शाळा बुडालेली आहे कायमची
आगीच्या समुद्रात
तिच्या घरादारासकट गावासकट
ती दिसलेली आहे का कुणाला
किंवा कॅमेर्‍याला कुणाच्या
आणि तिचं काय झालं पुढं
- अरुण कोलटकर / भिजकी वही
---------------------------------
अवांतर : ऑफिसच्या कामानिमित्त हिरोशिमाला बर्‍याच वेळा जाणे झाले. प्रत्येक भेटीत तेथील Hiroshima Peace Memorialला म्हणजेच हिरोशिमा शांती स्मारकाला कटाक्षाने भेट व्हायची. सत्तर वर्षांपूर्वीच्या या भीषण बाँबहल्ल्यामुळे बेचिराख झालेल्या अनेक इमारतींपैकी एका इमारतीचे आजपर्यंत जतन केलेले भग्न अवशेष, हल्ल्यातून बचावलेल्या - पण नंतर पडलेल्या काळ्या-विषारी पावसात सापडल्यामुळे कालांतराने मृत्युमुखी गेलेल्या - सडाको ससाकी या जपानी मुलीच्या स्मृत्यर्थ जगभरातून आजही येणार्‍या रंगीबेरंगी ओरिगामी 'क्रेन्स'चा तेथे केलेला संग्रह, शेजारील एक प्रचंड मोठे म्युझियम, गर्द हिरवळ, पार्क, शेजारून संथ वाहणारी ओटा नदी - सार्‍या मानवजातीला मान शरमेने खाली घालायला लावेल अशा त्या बाँबहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अगदी विरोधाभास होईल असे वाटण्याइतपत पूर्ण मनःशांती लाभेल असे हे अत्यंत शांत ठिकाण. जपानला भेट देणार्‍या प्रत्येकाने नक्की आवर्जून पाहावे असे हे स्मारक आहे. यातील एका भेटीची आठवण सांगितल्यावाचून राहवत नाही. एका खेपेस पूर्ण शनिवार तेथे घालवून संध्याकाळी हॉटेलला परतत असताना अचानक आकाशात कडकडाट झाला. चमकून वर पाहिले, तर वर फटाक्यांची भलीमोठी आतषबाजी चालली होती. मात्र त्या फटाक्यांतून निघणारा धूर चक्क संपूर्ण काळा होता. तब्बल सात-आठ मिनिटे चाललेल्या त्या आतषबाजीने आसपासचा संपूर्ण आसमंत जसजसा त्या काळ्याकुट्ट धुराने भरत गेला, तसतसा माझ्या अंगावरील शहारा वाढत गेला. ऑगस्ट १९४५मध्ये हाच आसमंत असाच धुराने कसा व्यापून गेला असेल, याचा एका झटक्यात हादरवून टाकणारा प्रत्यय आला. 'जपानने आजवर केलेल्या व फटाके फोडून साजरी करण्याजोग्या लक्षणीय प्रगतीला ही कृष्ण-करडी किनार आहे हे विसरू नका' असा काहीसा अर्थ मी त्यातून काढला व परतलो.

________________________________________________________________________________

दिवस तीन :
नामदेव लक्ष्मण ढसाळ ... आपणच शोधून काढलेल्या मळवाटेवर आपल्या बांधवांच्या अस्तित्वाची लढाई लढणारा एक अनवट कवी. ढसाळ तर कोलटकरांच्याही पुढे जाऊन कवितेच्या बंध-रूपाच्याच नव्हे, तर साहित्याच्या व्याख्यांच्यादेखील तथाकथित चौकटी निर्दयपणे तोडून-फोडून त्यांच्या चिरफळ्या दूरवर भिरकावून देतात. 'गोलपिठा'तील सर्वच कविता, एका मर्यादेबाहेर न धजणार्‍या व श्लीलाश्लील शब्दांचे कोश - व कोष - सांभाळत बसणार्‍या आपल्या मध्यमवर्गीय पोटाच्या-स्वास्थ्याच्या पचनी पडतील असे नाही, मात्र भोगणार्‍या व दडपलेल्या शोषितांच्या जगातल्या वेदनेची धग-होरपळ त्या प्रत्येक कवितेत स्पष्टपणे जाणवते-बोचते हे खचित. गुन्हेगार, भिकारी, देहविक्रय करणार्‍या स्त्रिया, महारोगी, भुकेलेले-तहानलेले ... अशा सर्वांच्या एकत्रित वेदनांनी-यातनांनी भरलेले व वेढलेले असे हे गोलपिठ्याचे असह्य जग आहे. येथे या दिंडीत शिव्यांचे समर्थन निश्चितच नाही, पण असा हा खचलेला-पिचलेला भोवताल वाट्याला आलेल्यांच्या कवितेत अशिष्ट शब्दांनी गर्दी नाही केली तरच नवल. समाजातील अभागी वंचितांनी 'आभाळमुका घेणार्‍या हवेल्यां'तील प्रस्थापितांविरुद्ध घोषित केलेले युद्ध पेटून व रेटून लढण्याची उमेद-ताकद ढसाळांच्या कवितांमध्ये दिसते. हा लढा वर्ण-वर्ग-जात-पात-धर्म-प्रांत या नेहमीच्या यशस्वी सीमा-मर्यादा ओलांडून थेट समाजातील 'नाही रे' (have-nots) थराने 'आहे रे' (haves) थराविरुद्ध - म्हणजेच आर्थिक विषमतेविरुद्ध - पुकारलेल्या बंडापर्यंत पोहोचतो. खालील कवितेतील एकेका शब्दात विद्रोहाचा दारुगोळा ठासून भरला आहे. फक्त एका ठिणगीची काय ती कमतरता आहे. क्रांतीचा भडका 'आत्ता' उडवू अशी इशारावजा धमकी त्यात गर्भित आहे. रांगडी-राकट-बंडखोर-राजकीय-रोखठोक-छातीठोक... ढसाळांच्या कविता कशाही वाटल्या, तरी त्यांचा पिंड वा आत्मा अस्सल व मनस्वी आहे हे नाकारता येत नाही. ही कविता प्रथम प्रकाशित झाल्यानंतर आता चौतीस वर्षे लोटली. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दीड पिढीच्या या कालावधीत शोषितांच्या स्थितीत प्रचंड बदल-सुधारणा झाली आहे अशातला भाग दुर्दैवाने नाही, पण तळहातावर पोट घेऊन आला दिवस कसाबसा कंठणार्‍या या एका त्रस्त-संतप्त जगाच्या अस्तित्वाचे किमान भान सीमेपलीकडील त्या आरामखुर्चीत वामकुक्षी घेणार्‍या अर्धनिद्रिस्त पांढरपेशा जगापर्यंत पोहोचले, हेही नसे थोडके.

* आत्ता *
सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला
आत्ता अंधारयात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे
हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला
आत्ता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे
या वैभवनगरीसाठी आपलाच खून सांडला
आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला
आत्ता आभाळमुका घेणार्‍या हवेल्यांना सुरुंग लावलाच पाहिजे
सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला
आत्ता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे
- नामदेव लक्ष्मण ढसाळ / गोलपिठा

________________________________________________________________________________

दिवस चार :
गेल्या चार दिवसांच्या या दिंडीच्या प्रवासाची सांगता, गतकाळातील कुसुमाग्रज-कोलटकर-ढसाळ या व सरस्वतीच्या दरबारातील अशा इतर अनेक दिग्गजांच्या पश्चात मराठी कविता आजही समर्थ हाती आहे हे सिद्ध करणार्‍या, आजच्या तरुण पिढीच्या एका प्रतिभाशाली प्रतिनिधीच्या काही कवितांनी करतो. काही व्यक्ती भरपूर ऊर्जा उरी घेऊनच या दुनियेत येतात, त्यांतीलच एक अशी कवयित्री स्पृहा जोशी. प्रचंड चैतन्य व अमाप संवेदनशीलता जवळी असल्यावर ती कागदावर तिच्या कवितेत सहज उतरणे हे मग फक्त अपरिहार्य व औपचारिक ठरते. तिच्या कविता व विशेषतः, लेख वाचल्यावर एवढ्या तरुण वयात कित्येक वर्षांच्या अनुभवांची भलीमोठी शिदोरी हिच्या गाठी कशी काय बुवा हे एक कुतूहलच आहे. सजग सर्जनशीलता आणि तिच्या जोडीला विचारांची भरभक्कम बैठक असल्याशिवाय हे शक्य नाही. अशा अनुभवांपाठोपाठ येणार्‍या रूक्षपणाला मात्र तिच्याकडे अजिबात थारा न मिळता संपूर्ण फाटा मिळतो. तारुण्यसुलभ अशी एक अनामिक हुरहुर व स्त्रीसुलभ अशा नाजूक-कोमल-हळूवार भावना तिच्या काव्यामध्ये अलगद जागोजागी डोकावून जातात. तिच्या अनुभवांची पोतडी जशी अजून विस्तारत जाईल, तशी आताच समृद्ध असलेली तिची लेखनप्रतिभा आणखी टोकदार होत जाईल, यात शंका नाही.
माझ्या एका मित्राच्या मते या दिंडीत आजपावेतो आलेल्या तिन्ही कविता भलत्याच स्फोटक आहेत. पण मग मृत्यूचे कायम असणारे मळभ-सावट असो, मानवाने मानवाचा केलेला अमानवी संहार असो वा वाढतच जाणारी प्रचंड आर्थिक विषमता असो ... जगातील वास्तवाचे पडसाद साहित्यात उमटल्याशिवाय कसे राहतील? मात्र या पार्श्वभूमीवर स्पृहाच्या सकारात्मक व एखाद्या खळखळत्या झर्‍यासारख्या प्रसन्न अशा कवितांमुळे वाचकाला चांगलाच थंडावा-दिलासा व एक counterpointदेखील मिळावा. दिंडीच्या अखेरीस, या नव्या ताज्या दमाच्या कवयित्रीच्या कवितांची केवळ एक झलक वा ओळख म्हणून, नियम थोडे शिथिल करुन तिच्या एकाऐवजी थेट सहा छोटेखानी कविता येथे डकवत आहे.
* *
तुला वाचून काढावे जरासे पुस्तका ऐसे
हळव्या खुणेचे कोपरे दुमडून ठेवावे,
निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी
मग त्या सरावुन अक्षरांनी श्वास माळावे..!!
* *
आनंदाचा कंद विठ्ठल सावळा | वैजयंती माळा शोभे कंठी ||
जिवालागी जीव ऐसा गा जडला | वेडापिसा झाला तुझ्या पायी ||
संसाराची वाट अनवट जरी | हात तुझा शिरी असो द्यावा ||
मनातच वारी मनात गजर | मनात पाझर चंद्रभागा ||
देहाचेच आता जाहले मंदिर | आतला अंधार लोपलासे ||
* *
अशी ओली सांजवेळ
तुझ्या मिठीत रुजावी,
जशी पहाटदवात
उगा कळी मोहरावी
तुझ्या गहिऱ्या डोळ्यांत
खोल आभाळाची माया
तुझ्या कुशीत शिरता
भासे उन्हातही छाया
माझ्या कपाळी टेकता
तुझे साखरेचे ओठ
होती सरळ वळणे
अशी अनवट वाट
व्हावे शांत आसमंत
अशा कलत्या सांजेला
सारे सरावे बोलणे,
उरताना स्पर्श खुणा...!!!
* *
का कळेना दाटते डोळ्यात पाणी
मी खरे म्हणजे तशी दु:खात नाही..
तेवढ्या ओल्या सरींनी घात केला,
नाहि तर माझी तशी तक्रार नाही..!
नाकळे केला कुणी बभ्रा विखारी,
त्या निळ्या दंशापुढे पर्याय नाही..!
सोबतीला फक्त उरले वेड माझ्या
जाणिवांचे गंजणे, उपचार नाही !!
* *
उगाच शब्द सांडणे, नकोच खेळ मांडणे
नकोच व्यर्थ हे आता स्वतः स्वतःत भांडणे..
नकोच कालचा पुन्हा अबोध कोवळा गुन्हा
नकोच वादळाकडे जुनेच वेड मागणे..
नकोच वाट पाहणे, तसाच जा निवांत तू ,
उगाच हे पुन्हा नको जिवास घोर लागणे..
का पुन्हा पुन्हा हव्या मिठ्या उगाच कोरडया
कशास हे अतां हवे कसेतरीच सांधणे..?
तुलाच शोधते पुन्हा, अजून वाट पाहते
नको नको म्हणूनही हवे तुझ्यात बांधणे !!
* *
स्वप्नात स्वप्न.. भासात भास
सुवर्ण मृग.. अलगद फास
नाटकात नाटक.. तळ्यात चंद्र
वारा झपताल.. सप्तक मंद्र
पायी पैंजण.. भवताल कुंपण
तुझ्यात मी.. माझ्यात तू
...अमर्याद एकटेपण.. !!
- स्पृहा जोशी / लोपामुद्रा व इतर
---------------------------------
दिंडीच्या केंद्रस्थानी असलेल्या कवितेच्या विषयापासून थोडे अवांतर होत आहे हे खरे, तरीही ... स्पृहाच्या काव्यप्रतिभेबरोबरच तिच्या आणखी एका तेवढ्याच तोलाच्या गुणविशेषाविषयी थोडेसे... कागदावरील व रंगमंचावरील - दोन्ही माध्यमांतील (उत्तम कवी-लेखक फक्त उत्तम लेखनच करतात या कल्पनेला छेद देणारा) स्पृहाचा वावर तेवढाच आश्वासक व वाचण्या-पाहण्याजोगा आहे. तिची कवितेची जाण जेवढी अफाट, तेवढीच परिपक्व तिची अभिनयाची समजदेखील आहे. गुणांचा असा दुहेरी संगम विरळाच. 'नांदी' नाटकात थोडीफार हलकी-फुलकी व किंचित अवखळ अशी माधवी ही सूत्रधाराची भूमिका तिने जेवढी जीव ओतून व तरीही ते अजिबात न जाणवण्याइतपत अगदी सहजतेने साकारली, तेवढ्याच तीव्र उत्कटतेने 'समुद्र' या नाट्यपूर्ण नाटकातील ताणतणावग्रस्त नंदिनी हे पात्र तिने अतिशय गंभीरपणे व विचारपूर्वक मंचावर उभे केले आहे. मुंबईत गेल्या जानेवारीमध्ये एकाच दिवशी ही दोन प्रभावी नाटके बघण्याचा योग मला लाभला हे माझे नशीब. कित्येक वर्षांपूर्वी एका आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत पाहिलेल्या, मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' कादंबरीवर आधारित 'गमभन' या रुईया महाविद्यालयाच्या भन्नाट व पारितोषिक-विजेत्या एकांकिकेत शिरोडकर या शालेय विद्यार्थिनीच्या भूमिकेत तिने तिच्या अभिनयाची चांगलीच चुणूक दाखवली होती. माझ्या वैयक्तिक मते, स्पृहाच्या रूपाने मराठी रंग-चित्रसृष्टीला स्मितानंतर कित्येक वर्षांनंतर परत एकदा सहज व अकृत्रिम अभिनय करण्याची अफाट क्षमता व असामान्य ताकद असणारी अभिनेत्री लाभली आहे. आज नाटके, चित्रपट, मालिका, जाहिराती यांच्या व्यापातून वेळ काढून लेखनातही सातत्य व दर्जा राखणे हे ती कशी काय साधते हे एक न उलगडणारे कोडेच आहे. ही गुणी कवयित्री-अभिनेत्री, चंदेरी व/वा छोट्या पडद्याच्या ग्लॅमरची भुरळ न पडली तर, लेखन व अभिनय अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये टोकाचे शिखर गाठून स्पृहणीय यश मिळवेल हे नक्की. तिला भरपूर शुभेच्छा!

एक आठवण : साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी पाहिलेली 'गमभन' एकांकिका अतोनात आवडली असली, तरी त्या एकांकिकेतील टीमवर्कमधून अभिनयाची एक उंचच उंच पातळी गाठणार्‍या त्यातील डझनभर रुईया-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची नावे मात्र - पात्रपरिचयाचे निवेदन ऐकूनही - नंतर लक्षात काही राहिली नाहीत. त्यातील शिरोडकर हे मध्यवर्ती पात्र उभे करणारी अभिनेत्री ही स्पृहा जोशी होती हे मला हल्ली पाच-सहा महिन्यांपूर्वीच कळले. तर गेल्या २५ जानेवारीपर्यंत 'स्पृहा जोशी कोण' याबद्दल मला ओ की ठो माहीत नव्हते. त्याआधीच्या भारतभेटीत भद्रकाली प्रॉडक्शनचे 'नांदी' नाटक पाहण्याची संधी हुकली असल्यामुळे या नाटकाच्या २६ जानेवारीच्या शिवाजी मंदिरमधील सकाळच्या प्रयोगासाठी दुसर्‍या रांगेतील एका तिकिटाचे आगाऊ आरक्षण - सुट्टीचा दिवस असल्यामुळे - चार दिवस आधीच करून ठेवले होते. स्पृहासह दहा सशक्त कलाकारांनी उभ्या केलेल्या या प्रेक्षणीय नाटकाचा प्रयोग आटोपल्यावर दुपारी माझ्या वहिनीच्या घरी पोहोचलो व माझ्या पुतणीचा वाढदिवस मस्त साजरा करून व जेवून मग थोडे लवंडण्याआधी मटा हाती घेतला. दुसर्‍याच पानावर भद्रकालीच्या दुसर्‍या एका नाटकाच्या - स्पृहा व चिन्मय मांडलेकर यांच्या 'समुद्र'च्या - प्रयोगाची जाहिरात होती. प्रयोग अर्ध्या तासात सुरू होणार होता. पुढली खेळी आता स्पष्ट होती. माझे नाटकवेड माहीत असल्यामुळे वहिनी-पुतणीची परवानगी घेणे सुदैवाने सोपे गेले. तडक उठून टॅक्सी केली व यशवंत नाट्यगृह गाठले. आयत्या वेळेस पोहोचूनदेखील नशिबाने साथ दिली. परत दुसर्‍या रांगेत एक सीट रिकामी होती. स्वर्ग-स्वर्ग म्हणतात तो हाच काय? जेमतेम तिसरी घंटा होता-होता नाट्यगृहात जाऊन बसलो. केवळ दोन समर्थ कलाकारांनी दमदारपणे उभा केलेला हा अतिशय देखणा प्रयोग पाहिला. चिन्मय एक गुणी व प्रयोगशील अभिनेता-दिग्दर्शक आहे हे माहीत होतेच, पण या दोन नाटकांमुळे एकाच दिवसात मी स्पृहाच्या अभिनयाचादेखील चाहता झालो. तिचे काव्यगुण मग नंतर कळले. हा तर बोनस होता. तिचे कौतुक करावे या एकाच कारणास्तव या आठवणीला उजाळा देत आहे.
.

प्रतिक्रिया

वाह! दिंडीची ही भेट फारच आवडली. तुम्ही निवडलेल्या चारपैकी पहिले तीन कवी अर्थातच ओळखीचे. स्पृहा जोशी ह्यांच्या कवितांचा परिचयही आवडला आणि तुम्ही म्हणता तसे काव्यक्षेत्रातील त्यांच्या संचाराचा विस्मय वाटला.

कुसुमाग्रजांच्या कवितेत भव्यदिव्य आणि श्रीमंत शब्दकळा आढळते. 'पृथ्वीचे प्रेमगीत' असो वा 'चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती - कथा ह्या खुळ्या सागराला' ह्या 'कोलंबसाचे गर्वगीत' मधल्या ओळी असोत. कुसुमाग्रजांची कविता वाचणे-ऐकणे हा एक भारावून टाकणारा अनुभव असतो. एक प्रकारची गेयता असणारी कुसुमाग्रजांची कविता नंतरनंतर मुक्तछंदाकडे वळाली आणि तरीही स्वतःची एक वेगळी अदब टिकवून राहिली.

अरुण कोलटकर यांच्या मराठी-इंग्रजी कविता तत्कालीन मराठी नवकवितेस एक नवीन आयाम देणारी ठरली. 'जेजुरी' असो वा 'कोलटकरांच्या कविता' वा 'कवितेनंतरच्या कविता'. त्यांच्या संख्येने तशा कमी पण आशयसमृद्ध आणि बंडखोर कवितांनी त्यांचा एक खास चाहतावर्ग निर्माण केला. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीप्रसंगाचे वर्णन असो वा 'ताशबाजी'त भोगल्या जाणार्‍या कोवळ्या तरुणाची व्यथा असो, कोलटकरांची कविता अल्प शब्दांमध्ये त्या प्रसंगावर स्वतः काही भाष्य न करताही वाचकांना तसा विचार करण्यास भाग पाडते.

नामदेव ढसाळ यांच्या रूपाने अभिजन सारस्वतांच्या कोंडाळ्यात मश्गुल मराठी कवितेला मोठाच हादरा बसला. तसा तो इतरही समकालीन विद्रोही कवींच्या रूपाने बसत होताच. पण ढसाळांचे महत्त्व अशाकरता की धृव तार्‍याप्रमाणे मराठी साहित्यविश्वात त्यांनी स्वतःची एक अमीट ओळख निर्माण केली. 'गोलपिठा' मधली कविता असो वा 'सूर्याची लेकरे', केवळ दलित अथवा विद्रोही साहित्यच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्याच्याच तत्कालीन मर्यादा धुडकावत त्यांची कविता मराठीची क्षितिजे पार करून गेली. खुद्द कुसुमाग्रजांनी ढसाळांना लिहिलेल्या पत्रात त्यांना 'गाववाले' अशी आत्मीयतेने हाक मारावी इतपत.

उत्तम लेख. अशाच प्रकारे दया पवार, नारायण सुर्वे, ना. धों. महानोर, प्रतिमा इंगोले, शांताबाई शेळके, इंदिरा संत आदींच्या कवितांचीही ओळख स्वतंत्र लेखांद्वारे करून द्यावी ही विनंती.

*(प्रतिसादात काही संदर्भ चुकलेले असण्याची शक्यता आहे. तरी जाणकारांनी ते दुरुस्त करावेत अशी विनंती!)

दिपोटी's picture

16 Nov 2015 - 2:55 pm | दिपोटी

एस,

एकदम वाचनीय प्रतिसाद!

जमेल तेव्हा आणखी काही कवी-कवयित्रींच्या कवितांबद्दल थोडं काही लिहिण्याचा प्रयत्न करतो.

- दिपोटी

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 12:17 pm | बोका-ए-आझम

स्पृहा जोशींविषयी माहित नव्हतं. बाकीचे तिघे तर दिग्गज आहेत अाणि आपल्या लेखणीने अमर आहेत.

पैसा's picture

12 Nov 2015 - 1:43 pm | पैसा

पाचोळा ची पारायणे झाली. तरी त्याबद्दल अजून काही वाचावे असे वाटतेच. कोलटकर आणि ढसाळ हे मला न मानवणारे कवी. पण त्यांच्या कवितांची ओळखही आवडली. स्पृहा जोशी उत्तम कवयित्री आहे हे माहीत नव्हते.

का कळेना दाटते डोळ्यात पाणी
मी खरे म्हणजे तशी दु:खात नाही..
तेवढ्या ओल्या सरींनी घात केला,
नाहि तर माझी तशी तक्रार नाही..!
नाकळे केला कुणी बभ्रा विखारी,
त्या निळ्या दंशापुढे पर्याय नाही..!
सोबतीला फक्त उरले वेड माझ्या
जाणिवांचे गंजणे, उपचार नाही !!

ही कविता खासच! फार आवडली.

सवड होईल तशी ही दिंडी जरूर चालू राहू दे! आम्ही वारकरी आहोतच पाठीमागे.

दिपोटी's picture

14 Nov 2015 - 10:56 am | दिपोटी

एस, बोका-ए-आझम व पैसा, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

- दिपोटी

रातराणी's picture

14 Nov 2015 - 12:36 pm | रातराणी

काव्यदिंडीची कल्पना आवडली! इतक्यात थांबवू नका ही दिंडी. अशीच अजून कवी आणि त्यांच्या कवितांची ओळख वाचायला आवडेल. :)

नाखु's picture

14 Nov 2015 - 3:37 pm | नाखु

आणि धीटपणांन सांगायचं म्हणजे बरेचदा नव कवीता रसग्रहणानेच कळते मला. पण रसग्रहण करतानाचा आपला लेखणी फटकारा ताकदीने चित्र चितारतो त्याला तोड नाही. दिपोटी तुमचं मन नुसतं गुणग्राही रसिकच नाही तर इतरांना रसिक करण्याचा सोस असलेलं आहे हेच फार सुंदर आणि विलक्षण आहे.

दिपोटी
तुमची संवेदनशीलता व कवितेची समज फार भावली.
विशेषतः कोलटकरांवरचा लेख फारच आवडला.
वरील कोलटकरांच्या लेखाला जोड म्हणुन खालील या लिंका अगोदर नसतील बघितल्या तर एकवार अवश्य बघा असे सुचवतो.
१-http://ekregh.blogspot.in/2013/06/blog-post_8.html
२-http://ekregh.blogspot.in/2013/09/blog-post_21.html
पुनश्च या सुंदर संग्राह्य लेखासाठी मनापासुन धन्यवाद.

दिपोटी's picture

18 Nov 2015 - 11:15 am | दिपोटी

मारवाजी,

तुम्ही दिलेल्या दोन्ही लिंक्सबद्दल धन्यवाद! आज वेळ काढून दोन्ही लेख वाचून काढले. दोन्ही लेख चांगलेच वाचनीय आहेत हे निश्चित.

- दिपोटी

यशोधरा's picture

14 Nov 2015 - 8:39 pm | यशोधरा

काव्यदिंडी आवडली.

मित्रहो's picture

15 Nov 2015 - 6:45 pm | मित्रहो

कुसुमाग्रज, कोलटकर आणि नामदेव ढसाळ यां तिघांनी मराठी कविता अधिकाधिक समृद्ध केली. बऱ्याच वर्षानंतर अरुण कोलटकरांची किंकाळी कविता वाचली. परत ते मानवी संहाराचे भयावह दृष्य डोळ्यासमोर उभे झाले. दुःखाची गोष्ट म्हणजे हा संहार अजून ही थांबलेला नाही.
स्पृहा जोशी कविता वाचनाचे कार्यक्रम करते हे वाचले होते ती स्वतः उत्तम कविता लिहिते हे माहीत नव्हते. काही महीन्यापूर्वी आलेल्या डबल सीट या चित्रपटातील गाणे किती सांगायचेय मला तुला हे तिनेच लिहिले होते.

अनुप ढेरे's picture

15 Nov 2015 - 6:56 pm | अनुप ढेरे

ढसाळांबद्दल हा धागा वाचनीय आहे.
http://www.misalpav.com/node/376

दिपोटी's picture

21 Nov 2015 - 11:18 am | दिपोटी

अनुप ढेरे,

तुम्ही दिलेल्या लिंकबद्दल धन्यवाद! त्या लिंकवरचा लेख व त्याखालील प्रतिसादसुध्दा अत्यंत वाचनीय आहेत.

- दिपोटी

असेच म्हणतो. पण तशा स्वरूपाचा लेख आजच्या मिपावर कुणी लिहिल्यास त्यावर सोवळ्याओवळ्याचे औचित्यप्रश्नचिन्ह लागल्यावाचून राहणार नाही.

ढसाळांच्या कवितेतला विद्रोह पचवण्याची क्षमता असणार्‍यांनी मात्र धोंडोपंतांचा हा लेख आवर्जून वाचलाच पाहिजे.

लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद!

दिपोटी's picture

26 Nov 2015 - 4:56 pm | दिपोटी

सर्व प्रतिसादकर्त्यांना प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद!

- दिपोटी