श्रीखंडाच्या वड्या

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in दिवाळी अंक
31 Oct 2015 - 6:32 pm

.
.
प्रत्येक घरात किंवा आपल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांच्यात प्रत्येक व्यक्तीची काही ना काही खास पदार्थाची खासियत असते. काकूच्या हातचे काही, मामीच्या हातचे काही, आजीचे काही.. न संपणारी यादी. बरेचदा मग सवयीने आपल्याला तो पदार्थ त्याच व्यक्तीच्या हातचा आवडतो, अशीच आमच्या समस्त गोतावळ्यात 'श्रीखंडाच्या वड्या' हा माझ्या आईच्या काही पेटंट पदार्थांपैकी एक. आता याचा शोध तिला कसा लागला आणि ती कशी शिकली, याचीही कथा रोचक आहे. घराजवळच राहणारी एक आजी, तिच्या ओळखीतल्या कुणी एक काकू या वड्या करायच्या आणि विकायच्या. त्या काही पाककृती सांगायच्या नाहीत, कारण त्याना त्यांचा कॉपीराईट वाटत असावा किंवा ते त्यांचे उत्पन्नाचे साधन असल्याने त्या सहजी देत नसाव्यात. मग आता प्रयत्न करायचा म्हणून आई आणि आजी, या दोघींनी ठरवले की हा प्रकार शिकू या. आपल्याला काही या विकायच्या नाहीत, पण यायला हव्यात. मग दोघींनी प्रयोग सुरू केले. अगदी वाटीभर चक्का आणायचा आणि करून बघायचे. मग या प्रयोगात त्या कधी सपशेल बिघडल्या. कधी थोड्या जमल्या, तर कधी परफेक्ट जमल्या. असे करत करत काही वर्षात दोघींचाही हात बसला आणि मग काही वेगळे करायचे असेल तर या वड्या करायला सुरुवात झाली. मग श्रीखंडाच्या वड्या म्हणजे आईच करणार असे आमच्या घरात समीकरण झाले. ज्यांच्यासाठी हा प्रकार नवीन असतो आणि आवडतो - विशेषतः गोडघाशी मंडळी - त्यांच्याकडून मग नेहमीच वाहवा मिळते आणि आईला समाधान. पण यात गंमत अशी की माझ्या जिभेचे आणि या वड्यांचे काही कधी जमले नाही. मी नावाला एखादी वडी खायचे फक्त. त्यामुळे घराघरात ऐकावे लागणारे "एवढ्या मेहनतीने करायचे आणि हिचे नखरे" हे मीही ऐकून घ्यायचे आणि अजूनही घेते. किंबहुना आता जास्तच ऐकावे लागते, कारण… जावयाला हा प्रकार भयंकर आवडला. तेव्हापासून तर विचारायलाच नको. त्यामुळे प्रत्येक वेळी "जावई येती घरा, श्रीखंडाच्या वड्या करा" हे कसोशीने पाळले जाते. आग्रहही केला जातो आणि येताना 'त्याला आवडतात ना, मग घेऊन जा जास्तीच्या' असे ऐकून चार वड्या जास्तच डब्यात भरल्या जातात. तर अशी ही यामागची कहाणी.

आजवर या प्रकाराच्या वाट्याला मी कधी गेले नव्हते. मुळातच वड्या, लाडू हे प्रकार अवघड वाटतात. पण रुची अंकातला 'अन्नपूर्णेचा वारसा' वाचून आई, मामी यांचे जे पदार्थ आठवले, त्यात हाही आठवला. मग ठरवले की प्रयत्न करू या, जमल्या तर देऊयात दिवाळी अंकात. आता जमले हे तुम्हाला लक्षात आले असेलच. तर बघा पुढे साहित्य आणि कृती.

साहित्य :
चक्का - १ वाटी (मला इथे चक्का मिळत नाही. दह्याचा चक्कासदृश एक प्रकार मिळतो, पण तेही तसेच्या तसे वड्यांना उपयोगी नाही. म्हणून ते आणून स्वच्छ कपड्यात बांधून ठेवले आणि सगळे पाणी काढून मग तो चक्का वापरला.)
साखर - २ वाट्या (दिवाळी आहे, जरा जास्त गोड चालतं ;) )
वेलदोडा (वेलची) पूड
थोडी पिठीसाखर, मिश्रण कोरडे होऊन वड्या थापण्यासाठी सोपी म्हणून (मी घेतली नाही, त्याऐवजी चमचाभर तूप वापरले)
सजावटीसाठी केशर, पिस्त्याचे काप, बदामाचे काप.. यातले काहीही आवडेल ते.

.

कृती:
चक्का आणि साखर एकत्र करून गरम करायला ठेवा. सतत ढवळत राहा.

.

मिश्रण जरा घट्ट झाले किंवा बुडबुडे येऊ लागले की चमच्यावर घेऊन हाताने अंदाज घ्या. ते हाताला कोरडे लागले पाहिजे किंवा कढईच्या कडा कोरड्या होताना दिसल्या पाहिजे. हे झाले की गॅस बंद करा आणि बाजूला घेऊन पुन्हा तेवढ्याच पेशन्सने ढवळत राहा. हे फार महत्त्वाचे, कारण जर जास्त वेळ गॅसवर राहिले, तर जास्त कडक होतात. त्यापेक्षा गॅस थोडा आधी बंद करून नंतर जास्त वेळ ढवळले तर चालते किंवा थोडे कमी झाले तर एकवेळ मऊ वड्या खाता येतात. वेलदोडा (वेलची) पूड घाला. आता घट्ट गोळा होईल असे वाटले की एका ताटलीत पिठीसाखर भुरभुरवा किंवा तूप लावा. त्यावर हे मिश्रण ओतून सेट होऊ द्या. वरूनही थोडी पिठीसाखर लावू शकता, म्हणजे त्या पटकन कोरड्या होतात.

.

व्यवस्थित गार झाले की वड्या पाडा. आपल्या आवडीप्रमाणे सजवा. श्रीखंडाच्या वड्या तयार आहेत.

.

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!!

फोटो सौजन्य - नवरा
.

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

10 Nov 2015 - 2:45 am | स्रुजा

क्या बात, वाहवा !! आधीचं वर्णन पण अगदी साजेसं. या वड्यांबद्दल मी श्यामची आई मध्ये वाचलं होतं, पण कधी खाण्याचा योग नाही आला.. नक्की करुन बघेन.. शेवटचा फोटो तर कमाल आलाय.

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 6:43 am | कविता१९७८

वाह मस्तच, आवडता पदार्थ

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 6:55 am | नूतन सावंत

हं,श्यामच्या आईची आठवण झाली.मधुरा,आता जेव्हा श्यामच्या आईची आठवण येईल तेव्हा मधुराची आईही आठवेल.बाकी आठवणी आणि सदरीकरण झक्कासच.

श्रीरंग_जोशी's picture

10 Nov 2015 - 6:58 am | श्रीरंग_जोशी

या पाककृतीमागची कहाणी, तपशीलवार कृती अन फोटोज खूप आवडले.

श्रीखंडाच्या वड्या लहानपणी खाल्या आहेत. पण गेल्या अनेक वर्षांत त्याबाबत ऐकलंही नाही :-( .

या पदार्थाचीही पाककृती वाचायला मिळू शकते हा माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्काच आहे :-) .

श्रीखंडाच्या वड्या अगदी आवडीच्या.गोळ्या पण!
पाकृ खूप आवडली.

पियुशा's picture

10 Nov 2015 - 10:30 am | पियुशा

मस्त !! शेवटचा सादरिकरणाचा फोटु तर एकदम कातील आहे :)

झकास सादरिकरण.करणार..

दिपक.कुवेत's picture

10 Nov 2015 - 2:41 pm | दिपक.कुवेत

वड्या तर कातील दिसतच आहेत पण त्यामागची कथा अधीक खुमासदार आहे. एक मात्र जागतीक सत्य आहे कि जावयाचे मुलीपेक्षा काकणभर लाड जास्तच होतात. मला त्या लहाणपणी खायचो त्या वड्या वाटल्या. अर्थात त्या अजीबात आवडत नसत/अजूनहि नाहित. छोट्या पाकिटातून २५ पै. विकत मिळायच्या. पण ह्या टेम्टींग दिसत आहेत. एकदा ट्राय करुन बघेन.

पारंपारिक रेशिपी दिल्याबद्दल आभार. आता करुन बघायलाच पाह्यजेत. ;)

श्रीखंड उरल्यावर याच पद्धतीने होतील का वड्या?

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2015 - 8:37 pm | स्वाती दिनेश

आवडती वडी!
वड्यांमागची गोष्टही आवडली.
स्वाती

भारी दिसतायत वड्या. मी कधी ह्या वड्या खल्ल्या नाहियेत. श्रीखंडाच्या गोळ्या माहित आहेत.
आता ह्या वद्या करुनच बघायला लागतील किंवा तुझ्याकडे यायला लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Nov 2015 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! आमच श्रीवर्धन आठवल.जुन्या यष्टि ष्टयांड जवळ एका प्राचीन हाटीलात या फक्कड़ गोड वड्या मिळायाच्या.

विशाखा पाटील's picture

11 Nov 2015 - 2:38 pm | विशाखा पाटील

वा! खुमासदार वर्णन वाचून आणि फोटो बघून करून बघायला हव्यात, असं वाटतंय.

मितान's picture

11 Nov 2015 - 7:29 pm | मितान

चवदार,बहारदार रेसिपी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2015 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है एकदम झकास....!!! आभार.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

11 Nov 2015 - 7:42 pm | यशोधरा

मस्त, मस्त!!

पद्मावति's picture

12 Nov 2015 - 12:11 pm | पद्मावति

वाह, मस्तं यम्मी वड्या. पाककृती आणि सादरीकरण दोन्हीही टॉपक्लास.

पैसा's picture

12 Nov 2015 - 1:47 pm | पैसा

लिहिलंस छान आणि फोटो आवडले. माझी आई अशा प्रकारात दहीदुधाच्या वड्या करायची त्याची आठवण झाली.

सुमीत भातखंडे's picture

12 Nov 2015 - 1:50 pm | सुमीत भातखंडे

छान आहे पाकृ.
हे वाचून लहानपणी खायचो त्या श्रीखंडाच्या गोळ्यांची आठवण झाली.

Shrikhand Goli
Shrikhand Goli

रातराणी's picture

14 Nov 2015 - 11:43 am | रातराणी

खूप आवडायच्या या गोळ्या!
श्रीखंड वडी मस्त आयडीया.

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 5:00 pm | सानिकास्वप्निल

आई गं!! खत्री दिसतायेत वड्या.
बालपणीची आठवण आली, प्रत्येक सुट्टीत मावशीकडे रहायला जात असे त्यावेळी मावशी या वड्या करायची. गेली अनेक वर्ष मी तिच्या हातच्या या वड्या खाल्ल्या नाहियेत :(

फोटो एक नंबर +१११११११

एस's picture

12 Nov 2015 - 5:11 pm | एस

तोंपासु!

मित्रहो's picture

12 Nov 2015 - 6:21 pm | मित्रहो

आणि त्यामागची कहाणी आवडली. श्रीखंडाच्या वड्या कधी खाल्या नाहीत फक्त गोळ्या खाल्या.आज कळले की या वड्या गरम करुन बनवितात. आजवर समजत होतो श्रीखंड करायचे, त्याला उन्हात वाळवायचे झाल्या वड्या. तसे नाही मेहनतीचे आणि कौशल्याचे काम दिसते.

मदनबाण's picture

12 Nov 2015 - 6:35 pm | मदनबाण

माझी श्रीखंडाच्या गोळ्यांशी पटकन गल्लत झाली... खोबर्‍याच्या वड्या खाल्ल्या आहेत, या पाकॄ बद्धक ठावूक नव्हते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam

इशा१२३'s picture

13 Nov 2015 - 12:50 am | इशा१२३

मस्त दिसताहेत वड्या.करुन पाहिन.

नीलमोहर's picture

13 Nov 2015 - 4:32 pm | नीलमोहर

श्रीखंडाच्या वड्या आणि गोळ्या दोन्ही खूप आवडते प्रकार,
अजूनही दुकानात दिसले की घेत असते. आता करून बघेन.
शेवटचा फोटो अप्रतिम आलाय..
धन्यवाद.

मधुरा देशपांडे's picture

14 Nov 2015 - 2:26 am | मधुरा देशपांडे

वाचक आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. @भुमी श्रीखंड उरल्यावर कधी आईने केल्याचे आठवत नाही. त्यामुळे सांगता येणार नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Nov 2015 - 10:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पाकृ आवडली. माझ्या एका मित्राची आई खुप सुंदर करते ह्या वड्या. त्यांच्याकडे दोन तीन पद्धतीने करतात ह्या वड्या. एका प्रकारामधे थोडासा गुलकंद घालतात. एका प्रकारामधे चवीपुरता मध वरुन सोडतात गरम करुन आणि तसाच्या तसा खातात.

रच्याकने शेवटचा फोटो जब्राट आलाय. :)

मधुरा देशपांडे's picture

14 Nov 2015 - 12:20 pm | मधुरा देशपांडे

धन्यवाद. नवीन प्रकार कळले. पुढच्या वेळी करुन बघेन असे, भारी वाटतेय कल्पना.

सस्नेह's picture

14 Nov 2015 - 10:03 am | सस्नेह

फोटो बघून तोंडात वडी विरघळल्याचा फील आला!

मिहिर's picture

14 Nov 2015 - 11:19 am | मिहिर

फोटोंवरचे वॉटरमार्क असे बटबटीतपणे मध्ये देण्यापेक्षा कोपऱ्यात कुठे दिले असते तर बरे झाले असते!

हासिनी's picture

19 Nov 2015 - 10:51 am | हासिनी

वाह!! करून पहायला हव्यात.

सुहास झेले's picture

19 Nov 2015 - 3:42 pm | सुहास झेले

जबरा !!!!

रुपी's picture

15 Jun 2017 - 3:30 am | रुपी

छान लिहिलंय. शेवटचा फोटो फारच भारी :)