घरापसुन लांब राहायला लागल कि आयत मिळणार जेवण आपोआप बंद होत आणि मग मेस किंवा कधी परवडेल तसे हॉटेल हा दिनक्रम मागे लागतो. काही दिवसांनी या सगळ्याचाही कंटाळा येऊ लागतो आणि शेवटी, बास झाल! आता आपण स्वतः जेवण बनवायचं हा विचार डोक्यात येतो. पण लागणार सामान आणि कष्ट बघून मग बरेच दिवस तो नुसता डोक्यातच राहतो!
पण जे लोक या विचाराला प्रत्यक्षात आणू इच्छितात त्यांच्यासाठी पाककृती वरदानच असतात. त्यामुळे हे भले काम आपण पण करावे असा विचार डोक्यात आला. इथे मी कमीत कमी सामानात बनू शकणार्या आणि बनवायला सोप्या असणाऱ्या (मला पण तेवढ्याच येतात!) पाककृती देण्याचा प्रयत्न करेन...
तर सुरुवात अशा गोष्टीपासून करूया ज्या पदार्थाने अनेकांचे संसार थाटायला मदती केली आणि अजूनही करत आहे!
कांदे पोहे...
लागणारे साहित्य:
१. जाड पोहे: शक्यतो वाटीने पोहे मोजताना अंदाज येत नाही त्यामुळे सरळ ताटात घेऊन पाहावेत कि आपल्याला किती पुरतील. इथे मी एका माणसाला पुरतील इतके घेणार आहे. (पोह्यांचे बरेच प्रकार मिळतात बर्यापैकी जाड पोहे निवडावेत, खास करून दक्षिण भारतात शक्यतो पातळ पोहे मिळतात त्यामुळे आधीच तपासून घ्यावे)
२. कांदे: एक कांदा पुरेसा आहे
३. २-३ मिरच्या
४. मुठभर शेंगदाणे
५. हळद (एक छोटा चमचा)
६. जिरे, मोहरी : (प्रत्येकी एक छोटा चमचा)
७. मीठ (एक छोटा चमचा)
८.कोथिम्बिर (नसली तरी चालू शकेल)
९. लिंबू (नसले तरी चालू शकेल)
१०. कडीपत्त्याची पाने (असली तर उत्तम)
कृती:
१.पोहे पाण्यात भिजवा. आता आपल्याकडे चाळणी असेलच असे नाही त्यामुळे पोहे भिजवताना त्याचा चिखल होऊ नये म्हणून थोडे थोडे पाणी त्याच्यावर टाकून सावकाश भिजवा. ५-१० मिनिट भिजू द्या.
२. कांदा आणि मिरची कापून ठेवा. आता छोटे काप कि मोठे काप तुम्हीच ठरवा, कसेही चालेल!
३. एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्या. भाजल्यानंतर त्यांना एका डिशमध्ये काढून ठेवा.
४. त्याच कढईमध्ये तेल ओता, खूप तेल ओतण्याची गरज नाही.
५. तेल जरा गरम होऊ द्या, फोडणी देण्यासाठी जिरे मोहरी त्यात टाकायची आहे. तेल पुरेसे गरम झालाय का बघायला उगीच एक मोहरी त्यात टाकून बघा. तडतडू लागली तर तेल व्यवस्थित तापले आहे.
६. आता प्रत्येकी एक छोटा चमचा अशी जिरे, मोहरी तेलात टाका आणि होणारा तडतड आवाज एन्जोय करा!
७. त्यातच कडीपत्ता आणि भाजलेले शेंगदाणे टाका.
८. चिरलेला कांदा कढईमध्ये टाका.
९. त्याच्यामध्ये चमचाभर मीठ टाका. कांद्याला हळूहळू पाणी सुटू लागेल आणि मग त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत परतून घ्या.
१०. आता त्यात हळद टाका आणि व्यवस्थित सगळे मिश्रण एक दोन मिनिट ढवळत रहा.
११. आता कढईमध्ये भिजवलेले पोहे टाका आणि व्यवस्थितपणे परतून घ्या.
१२. पोह्यांचा रंग बदलून तो हलका पिवळसर होऊ लागेल. एक दोन मिनिट गरम करत रहा आणि तुमचे पोहे तयार!
१३. याच्यावर तुम्ही चिरलेली कोथिम्बिर टाकू शकता आणि लिंबू हि पिळू शकता(उप्लब्ध असेल तर)
शेगडी जरी बंद केली असली तरी तुम्ही ज्या भांड्यात पोहे तयार केले आहेत ते गरमच असते त्यामुळे तळाचे पोहे खरपूस होऊ नयेत म्हणून सगळे पोहे दुसर्या भांड्यात काढलेले उत्तम!
वेन्जोय! :)
प्रतिक्रिया
9 Nov 2015 - 12:10 am | बाबा योगिराज
वो मामा,
मी पैला.
बस इतकंच.
9 Nov 2015 - 1:05 am | रेवती
ही पाकृ मालिका असणार आहे का? कृपया फोटू द्यावेत.
हा पदार्थ आवडला, नेहमीच आवडतो.
9 Nov 2015 - 3:16 am | शब्दबम्बाळ
फोटो दिसत नाहीत हे सांगितल्याबद्दल आभार!
फोटो शिवाय पाककृतीचा लेख अळणीच!
विचार आहे साध्या सोप्या पाकृची मालिका करण्याचा, बघूया... :)
9 Nov 2015 - 3:11 am | शब्दबम्बाळ
फोटोच्या लिंक कुठेतरी गडबडल्या वाटत... इथे देण्याचा प्रयत्न करतो...
संपादकांना शक्य असल्यास हे फोटो लेखामध्ये टाकण्याचा प्रयत्न करावा.
साहित्य
पोहे
9 Nov 2015 - 5:04 am | चित्रगुप्त
आम्हा इन्दौरकरांना वरतून रतलामी शेव (आणि जिरावण) टाकल्याशिवाय पोहे, ही कल्पनाही करवत नाही .
9 Nov 2015 - 6:58 am | मुक्त विहारि
प्रचंड जळजळ होते.
झाले बहू आणि होतील बहू...पण इंदुरी पोहे ते इंदूरी पोहे.
9 Nov 2015 - 8:09 am | मितान
उपयुक्त टिप्स ! चाळणी वगैरे...
9 Nov 2015 - 8:23 am | मांत्रिक
वा कांदेपोहे! एव्हरग्रीन पदार्थ. कधीही बनवा. अगदी आवडता. वर खोबरं, कोथिंबीर, बारीक शेव/फरसाण/भडंग असेल तर मस्तच!
9 Nov 2015 - 8:25 am | चांदणे संदीप
शेवटी पोहे तयार झाले हे महत्वाचे! ;-)
9 Nov 2015 - 8:46 am | अजया
छान झालेले दिसताहेत पोहे.किप इट अप!
9 Nov 2015 - 10:17 am | मनीषा
हे काय एव्हढेस्से पोहे कुणाच्या नाकाला पुरणार?
आणि पिवळी मिर्ची कशाला? हिर्वी नाही का मिळाली?
अय्या प्लस्टीकचा डाव ? काय तरी बाई एक एक स्टायली..
बाकी लाकडी कटींग बोर्ड बरा आहे .
-- इती एक सिनीयर महिला ( म्हणजे मीच .. उगीच संशय नको)
अवांतरः पोहे चांगले झालेले दिस्तायत . मलाही पोहे आवडतात.
9 Nov 2015 - 1:54 pm | शब्दबम्बाळ
हाहा!
बच्चे कि जान लोगे क्या?! ;)
सध्या भारतात नसल्यामुळे ज्या प्रकारच्या आणि रंगाच्या भाज्या मिळतील त्या घेतो. जास्त शोधत बसत नाही.
इकडे भाज्या पण काय चकाचक दिसतात! :)
सिनिअर लोकांकडून स्तुती झालेली पाहून धन्य झालो!
अवांतर: जुनिअरला थोडे सांभाळून घ्या! ;)
4 Jan 2016 - 7:13 pm | सप्तरंगी
अरे वा कांदे पोह्यांची पाककृती, मी विचार पण नव्हता केला कि १३ steps असतील, फार अवघड आहे हो, बाकी १st स्टेप वाचुन " तुमच्याकडे mixer आहे का mixer, मग प्रश्नच मिटला हे आठवले "
jokes apart, तुम्ही शिकत असाल हे नक्कीच समजू शकते , keep it up
9 Nov 2015 - 2:39 pm | पद्मावति
मस्तं दिसताहेत पोहे.
9 Nov 2015 - 2:43 pm | उगा काहितरीच
जवळजवळ अशाच पद्धतीने बनवत होतो . पण कमीत कमी १ किलो पोहे. व त्यात अर्धा किलो किंवा असेल तितके फरसान व त्याच पातेल्यात १०-१२ जण मिळून खात होतो .
9 Nov 2015 - 9:37 pm | नूतन सावंत
छान दिसताहेत पोहे.भिजवाण्याबद्दलची सुचवणी वाचून रुची विशेषांकातील कांदेपोहे आठवले.