मिपा संपादकीय - "प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय?"

संपादक's picture
संपादक in विशेष
22 Dec 2008 - 12:07 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

"प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय?"

भारतातील आपल्याला ज्ञात असलेला प्रसारमाध्यमांचा इतिहास जर तपासायला गेले तर तो फार जुना आहे असा निष्कर्ष आपण काढु शकतो, अगदी सुरवातीस जायचे म्हटले महाभारतात संजयने जे अंध धॄतराष्ट्राला युद्धभुमीवरच्या घटनांचे जे काही वर्णन सांगितले ते आजच्या युगात "थेट-प्रसारण उर्फ आंखों देखा हाल " ठरु शकते, एकुणच घडणार्‍या घटणा प्रभावीपणे मांडण्यासाठी व त्याची उत्सुक प्रेक्षकांना शक्य तितकी जास्त माहिती देण्यासाठी "इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमांइतके" प्रभावी माध्यम दुसरे कुठलेही नाही.

भारतातील स्वातंत्रपुर्व काळात अनेकविध "वृत्तपत्रांच्या" रुपाने ह्या प्रसारमाध्यमांनी समाजीक जीवनात बाळसे धरायला सुरवात केली. त्या काळच्या नेत्यांनी , पुढार्‍यांनी लोकांसमोर आपले विचार, भावना प्रकट करुन त्यांना जागवण्याच्या कार्यासाठी ह्या उपलब्ध प्रसारमाध्यमाचा प्रभावीपणे वापर करुन घेतला. लोकमान्य टिळकांनी तर आपल्या "केसरी व मराठा " ह्या वॄत्तपत्रांमधुन अखंड जनजाग्रणाचे कार्य चालवले होते, त्यांच्या शब्दांनी व धारदार लेखणीने लोकांमधले देशभक्तीचे स्फुलिंग अक्षरशः धगधगत ठेवले. त्यांच्या "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले पण सूर्य कुठे आहे ,शिशुपाल की पशुपाल , बादशहा ब्राम्हण झाले, पुनश्च हरि ओम" सारख्या अग्रलेखांनी वेळेवेळी जनमत जागवले व त्याचा वापर विधायक कार्यांसाठी देशोद्धाराच्या विधायक कार्यासाठी करुन घेतला, या सर्व अग्रलेखांनी मराठी समाजातच नव्हे , तर समस्त भारतात विचारांच्या लाटा निर्माण केल्या. त्याची वारंवार दखल ब्रिटिश राज्यर्कत्यांना घ्यावी लागली आणि टिळक पुढील अंकात काय लिहित आहेत , याकडे वाचकांबरोबरच ब्रिटिश राज्यकतेर्ही लक्ष ठेवू लागले. याला "प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर" असे आपण म्हणु शकतो.
पुढे याच "लेखणीच्या शस्त्राचा" उपयोग आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी तितक्याच प्रभावीपणे केल्याचे उदाहरण आहे. एकंदरीतच ही "प्रसारमाध्यमे" ही समाजोद्धारासाठी एक महत्वाची व प्रभावी साधने समजली जाऊ लागली व लोक सुद्धा या माध्यमांवर विश्वास ठेऊन विचार करण्यास, चर्चा कारण्यास व आपली मते बनवण्यास पुढे सरसावु लागले.
इथपर्यंत "प्रसारमाध्यमांच्या स्थापनेमागचा उद्देश" यशस्वी झाला असाच आपण निष्कर्ष काढु शकतो.

मग टीव्हीच्या प्रसारानंतर साधारणता ९० च्या दशकात माहितीतंत्रज्ञान क्रांतीनंतर " इलेक्ट्रॉनीक मिडीया म्हणजे न्युज चॅनेल्स उर्फ वॄत्तवाहिन्या" च्या रुपाने ह्या "प्रसारमाध्यमांनी" पुन्हा एका नव्या रुपात जोशात पदार्पण केले, ह्यामुळे इथे प्रत्यक्ष घटना / परिस्थीती ही घरबसल्या आप्ल्या दिवाणखान्यात बसुन आपल्या डोळ्याने जसे चालले आहे तसेच "थेट प्रक्षेपण" पाहण्याची सोय झाली. लोकांना "प्रसारमाध्यमांचे" हे नवे रुपडे फार भावले व लोक ह्यांच्या बातम्यांची वाट पाहु लागले. आता लोकांना आवडत आहे मग "मागणी तशी पुरवठा " ह्या न्यायाने अशरशः ढीगभर नव्या "वॄत्तवाहिन्या" ह्या स्पर्धेत अवघ्या काही वर्षांच्या मुदतीत दाखल झाल्या. एकाच वेळी एकच घटना पाहण्यासाठी आपल्याला कधी नव्हे ते "१५ -२० " पर्याय उपलब्ध झाले. प्रेक्षकांसाठी ही तर पर्वणीच होती. त्यांना घरबसल्या अनेक ताज्या बातम्या, खेळाबद्दल माहिती, व्यापारातील घडामोडी, फिल्मी जगतातील हालचाली, माहिती देणारे कार्यक्रम , चर्चा ह्यांचा मनोसोक्त आस्वाद घेता येऊ लागला . इथपर्यंतसुद्धा परिस्थीती ठीकच होती आणि प्रसारमाध्यमे त्यांच्या उद्देशासारखीच "वरदान" ठरत होती.

पण जेव्हा वाढत्या स्पर्धेबरोबर ह्यांच्यात अधिक प्रेक्षक ओढण्यासाठी "सब से तेज, सब से पेहले, खबर वही जो सच दिखायें" ह्या बातम्या देण्यांची जीवघेणी स्पर्धा सुरु झाली व ह्या वरदानाचा हळुहळु "भस्मासुर" होऊ लागला. "टी आर पी" च्या नादात ह्यांची पातळी अशी खालावली की "ह्यांच्यावर बंदी घालावी / निर्बंध आणावे" असा सुर उमटु लागला. ह्या प्रसारमाध्यमांनी स्वतःची अशी एक आचारसंहिता पाळावी अशी अपेक्षा असताना ह्यांनी "अभिव्यक्ती स्वातंत्र्या" च्या नावाखाली जो नेंगा नाच घातला त्याला पाहुन आपणाला "भीक नको पण कुत्रा आवर" म्हणायची पाळी आली हे नक्की. जसाजसा काळ गेली, ह्या वाहिन्यांचे वय वाढत गेले तसे ह्यांच्यात परिपक्वपणा, समंजसपणा वाढायच्या उलट बालीश्पणा, बाजारु वृती, उथळ व बटबटीत बातम्या देण्याचे प्रमाण वाढु लागले व सहाजीकच जे बर्‍याच सुजाण नागरीकांच्या डोकेदुखीचे कारण बनत आहे व "ह्यांना आता आवरा" ह्या मागणीला वाढता पाठिंबा मिळत आहे.

जो पर्यंत ह्या वृत्तवाहिन्या "अबक च्या विहरीत पडण्याच्या , क्ष ला थंडी वाजण्याचा, विवीध गॄहांच्या युतीच्या दुष्परीणाम, जगबुडी, पेज ३ व सिनेमाजगतातल्या उखाळ्यापाखाळ्या, फॅशन व क्रीडा जगतातल्या घडामोडी" ह्यांचे भांडवल करत होत्या तोवर परिस्थीती सहन करण्याजोगी होती पण गेल्या काळातही काही घटना जसे की "मुंबईच्या अतिरेकीहल्ल्याचे थेट प्रक्षेपण, विवीध आंदोलनात ह्यांचा एकांगी अपप्रचार, सैन्य / संरक्षणासारख्या महत्वाच्या बाबींबाबत निष्काळजी वृत्तसंकलन व मनोधैर्य खचेल असे त्यांचे प्रसारण, स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली वेठीस धरलेल्या महत्वाच्या पदावरील व्यक्ती, जनमानसात घबराट पसरेल अशा बातम्यांचे कसलीही खातरजमा न करता केले जाणारे प्रक्षेपण ... इ.इ." पाहिल्यावर हा आता "भस्मासुर" होऊ पहात आहे हे नक्की . मग ह्यांच्यावर "कायद्यानेच बंधने आणावीत" की ह्यांना "आत्मपरिक्षणाद्वारे" सुधारण्याची संधी देण्यात यावी ह्यावर सध्या बरच खल चालु आहे. कायद्याच्या परिभाषेत ह्यावर काय करता याचीही चाचपणी संबंधीत संस्थांकडुन सुरु आहे.

सध्याच्या काळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी विवीध वॄत्तवाहिन्यांवर जे सो कॉल्ड टिनपाट तज्ञ मंडळी येतात व त्यांच्या अकलेच्या दिवाळं काढणार्‍या प्रतिक्रीया / उपाय ऐकुन आता खरचं " प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे का ?" असा प्रश्न विचारावासा वाटतो.

प्रसारमाध्यमांचे "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" हा मुद्दा महत्वाचा आहेच पण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करण्यापुर्वी तो प्रथम त्यासाठी लायक आहे का या मुद्द्याचाही विचार व्हावा. जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कसलीही सावधानी न बाळगता देशाच्या, सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेच्या मुळावर येणार्‍या व कसलाही ताळमेळ न ठेवता बिनबुडाच्या बातम्या "ब्रेकिंग न्युज" च्या नावाखाली वारंवार पब्लिकच्या माथी मारुन अनागोंदी निर्माण केल्यास ह्या "फोल ठरलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या" वेळीच मुसक्या बांध्यलास त्यात चुक ते काय ? "नाचु तंत्रज्ञानाच्या रंगी, ज्ञानदीप लावु जगी" हे ध्येय ( वरकर्णी ) तरी मनात ठेऊन निर्माण झालेल्या ह्या वृत्तवाहिन्या जेव्हा सरळसरळ वासनकांड, गैरप्रकार, गैरसमज , गैरवर्तम, प्रक्षोभक , अफवा पसरवणार्‍या , चिथावणीखोर, देशाच्या ऐक्याला धोका आणणार्‍या अशा वृत्तांना ढळढळीत प्रसिद्धी देत असतील तर "सक्तीचे बंधन" हे आवश्यक ठरत नाही का ? "लोकांना हवे ते आम्ही पुरवतो " अशा मोघम समर्थनाखाली काहीही दाखवण्याची परवानगी आहे का ? ह्यांना काही तत्वे, देशभक्ती , आचारसंहिता वगैरे आहेत का नाहीत ? प्रसारमाध्यमांनी सर्वसामान्य जनांच्या आशा, अपेक्षा , आकांशा , रोजच्या जीवनात अडचणीचे ठरणारे प्रश्न व त्यांच्यावर सखोल चर्चा करण्यार्‍या बातम्या व चर्चा प्रसारीत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे की नाही ? ही प्रसार माध्यमे "समंजस व मॅच्युअर " कधी होणार ? लाईव्ह आणि एक्स्लुझीव्ह देण्याच्या नादात ही प्रसारमाध्यमे नकळातपणे लोकांना मदत करतात की समाजकंटकांना ? एखादी दुर्दैवी घटना घडत असताना, लोक बळी पडत असताना ह्यांचा "सर्वात प्रथम आमच्याच चॅनेलवर " हा डांगोरा "प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा " प्रकार वाटत नाही का ? ह्या परदेशस्थ प्रसारमाध्यमांची कॉपी करुन हे लोक चर्चा, मुलाखती आणि थेट प्रक्षेपण घडवुन आणतात त्यांना त्याच वेळी ह्याच परसेशी वॄत्तवाहिन्यांनी "मिशन ऍन्टीबी, रशियन थेटरचे रेस्क्यु ऑपरेशन, ट्विन टॉवर्सचा प्रसंग, इराक अफगाणीस्तानचे कव्हरेज, लंडनवरचा दहशतवादी हल्ला " ह्यावेळी घेतलेली समंजस व डोके ठिकाणावर ठेऊन घेतलेली भुमीका डोळ्यासमोर येत नाही का ? आपण नेहमीच म्हणतो की " जे जे उत्तम, उदात्त ते ते घ्यावे " असे असताना ही प्रसारमाध्यमे मग तेवढ्याच गोष्टी धाब्यावर का बसवतात ?

मित्रांनो ह्याविषयावर लिहील तितके कमी आहे आणि किती उदाहरणे द्यायची ह्यालाही अंत नाही. प्रसारमाध्यमांना बातम्या प्रसारीत करताना थोडा संयम बाळगुन, समंजसपणा दाखवुन, योग्य तेच आणि तितकेच दाखवावे, स्वतःच्या पदरचे काही त्यात घुसडण्याची घोडचुक करु नये. सामान्य माणसाच्या संयमालाही सीमा असते, एक दिवस हा संयम जर संपला तर मात्र कठीण होईल, लोकांच्या कल्याणाचा दावा करत आहात तर तो सत्यात आणुन दाखवा बस एवढीच मागणी. अन्यथा "कायदेशीर बंधने" आणण्याखेरीज दुसरा मार्ग नाही, मग त्या वेळेस सो कॉल्ड "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी " झाली तर जनहितार्थ का होईना तो निर्णय घ्यावाच लागेल, वेळीत शहाणे होण्यात हीत आहे समजुन घेतल्यास आनंदच होईल ...
जनहित धाब्यावर बसवुन स्वतःची तुंबडी भरण्यासाठी "टी आर पी" च्या नादी लाहुन ते सध्या जसे "जन अ-हितार्थ" कार्य करत आहेत त्यामुळे सध्या तरी आमच्या मनात "प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे का?" हाच प्रश्न वारंवार डोक्यात येत आहे.

जाता जाता तुकोबारायांचा एक अभंग सांगतो, त्यात त्यांनी ह्याच मुद्द्यावर व्यवस्थीत भाष्य केले आहे, बघा जमले तर काही शिकवण घेता आली तर, तुकोबारायांच्या शिकवणीचा लाभ अनेकजणांनी घेतला, बघु तुमच्यात काही फरक पडतो का ?

"आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत ।
करावी फजिती चुकती ते । ।
तुका म्हणे येथे खर्‍याचा विकरा ।
न सरती येरा खोट्या परी । ।"

पाहुणा संपादक : छोटा डॉन.

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

22 Dec 2008 - 12:31 am | इनोबा म्हणे

लेख आवडला. मला तरी वाटते की, या प्रसारमाध्यमांवर एकदा तरी जबरदस्त कारवाई व्हायला हवी. त्याशिवाय यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.
प्रसारमाध्यमांची गरज आहेच पण त्यांनीही जबाबदारीने वागायला हवे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

22 Dec 2008 - 12:39 am | विसोबा खेचर

लेख आवडला. मला तरी वाटते की, या प्रसारमाध्यमांवर एकदा तरी जबरदस्त कारवाई व्हायला हवी. त्याशिवाय यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.

सहमत आहे! एकदा तरी मजबूत कायदेशीर बडगा दाखवून दोनचार उथळ अन् गल्लाभरू वाहिन्या साफ बंद पाडल्या पाहिजेत..!

असो,

छोट्या, लेख आवडला रे!

तात्या.

आनंदयात्री's picture

22 Dec 2008 - 9:41 am | आनंदयात्री

इनोबा व तात्यांशी सहमत आहे.
यां वाहिन्यांना बातम्या देण्याचे निकष लावले पाहिजेत. काही असे,

१. एकच बातमी किती वेळा दाखवणार याचे तारतम्य असावे. (नवीन बातम्या मिळत नसतील तर २४ तास चालवु नका)
२. कोणतेही चित्रीकरण दाखवण्यासाठी काही नियम असावेत, ज्यातुन देशहिताचा तसेच जनसामान्यांच्या मनःस्वास्थाचा विचार व्हावा. एक्साईज इन्स्पेक्टर जसा कंपन्यात जाउन बसतो तसा या वाहिन्यांसाठीच्या सेन्सॉर बोर्डातला एक मेंबर तिथे हजर असावा, त्याच्या परवानगीनेच कार्यक्रम (व्हिडीओ चित्रीकरणे) प्रक्षेपित व्हावेत.
३. या वाहिन्यांसाठी एखादे कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल असावे, ज्याचे सर्टिफिकेशन/ लायसन दर ठराविक काळाने प्राप्त करणे या वाहिन्यांसाठी बंधनकारक असेल.

अजुन असे बरेच मुद्दे यावेत.
डॉनचा लेख आवडला, संयत आहे कुठेही वहावत गेलेला नाहीये. मुंबईच्या हल्ल्यांनंतर आता जरा संकेतस्थळांवरचाही जनक्षोभ शमल्यासारखा आहे तेव्हा शांत डोक्याने अशा चर्चा फ्रुटफुल होतील. या कारणामुळे विषयाची निवड आवडली असे म्हणावे वाटते.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2008 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार

आनंदयात्री यांच्याशी पुर्णपणे सहमत !
तसेच दाखवण्यात येणारे प्रत्येक स्थिरचित्र अथवा चलचित्र हे कधी / कोणत्यावेळी / किती तारखेला व कुठे संग्रहीत वा संकलीत केले आहे हे दाखवणे बंधनकारक असावे.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

मैत्र's picture

22 Dec 2008 - 5:19 pm | मैत्र

पहिला मुद्दा विशेष पटला! किती वेळा त्याच त्याच बातम्या. २४ तास चालवण्यासाठी काहिही करतात.
२६/११ च्या वेळी तर वेगवेगळ्या वेळी दुसरे टायटल्स देउन राजदीप/ बरखा / प्रणव रॉय हे तीच वाक्यं जशीच्या तशी परत परत बोलत होते.
बाकी वाहिन्यांच्या आधी इंडिया टी व्ही वर बंदी घातली पाहिजे.

आता केबल वर चांगले चित्रपट पहायला मिळत नाहीत, क च्या आणि तत्सम मालिकांनी वैताग आला आहे.
असंख्य न्यूज चॅनेल्स आणि शेकडो रिऍलिटी शोज बस्स...
लाइव्ह, रिअऍलिटी, एक्स्लुजिव, याचं वेड लागलं आहे ...

मैत्र भाऊ,

कृपया टी.वी. पाहू नका.
मी कित्येक आठवडे टि.वी. पहात नाही.

आंतरजाल, पुस्तक वाचन इ. छंद जोपासा. भले होईल.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

22 Dec 2008 - 11:26 pm | चतुरंग

आमच्याकडे टीव्हीच घेतलेला नाही त्यामुळे पहाण्याचा प्रश्नच येत नाही!
टीव्ही आणि इंटरनेटमुळे पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे इतर छंद जोपासणे आपण विसरुन गेलोय!

तरी मी इंटरनेटचे महत्त्व मान्य करतो. निदान तुम्ही काय बघायचे हे तरी तुम्ही बर्‍यापैकी ठरवू शकता!
तुम्हाला जवळजवळ सर्व वाहिन्या आजकाल इंटरनेटवर उपलब्ध असतात हव्या त्या बातम्या पाहू शकता. सिनेमे बघायचे असतील तर नेटफ्लिक्स सारखे अकाऊंट उघडून जालावरुनही बघता येतात.
(चकटफू बघायचे असले तर हिंदी सिनेमे 'भेजाफ्राय.नेट' सारख्या ठिकाणी उपलब्ध आहेत ;))
अगदी क्रिकेटचे सामनेसुद्धा उपलब्ध असतात. काहीच अडत नाही.

चतुरंग

फकीरा's picture

24 Dec 2008 - 4:55 pm | फकीरा

mhanje tumhi internet cha vapar sudhaa tv sarkhach karnar mag tya peksha tv paha.

चतुरंग's picture

24 Dec 2008 - 11:10 pm | चतुरंग

टीव्हीवरची चॅनल्स हवी असली तर तोही पर्याय नेटच्या माध्यमातून उपलब्ध आहे एवढंच सांगायचं होतं. येताजाता टीव्ही चालू करुन चॅनल सर्फिंग जसं सहज शक्य होतं तसं नेटचं होत नाही हा एक मुद्दा टीव्हीची आवड/व्यसन कमी करत न्यायला उपयोगी पडतो. (नेटचंही व्यसन लागू शकतं हा मुद्दा आहेच पण मग कुठेतरी तारतम्य हवंच हे ही मुळात खरंच आहे.)

चतुरंग

लिखाळ's picture

22 Dec 2008 - 10:20 pm | लिखाळ

छोटे डॉन,
संपादकीय छान आहे. शीर्षक आणि विचार आवडले.

आनंदयात्री आणि प.रा. च्या मतांशी सहमत.
अजून एका प्रतिसादात अदिती म्हणते की समांतर माध्यमांचा लोकांनी जास्त वापर करावा जसे इंटरनेट, वृत्तपत्रे इ. हे सुद्धा बरोबर आहे.

आपल्याकडची प्रसारमाध्यमे पोक्त होण्याची फार गरज आहे. लोकांच्या मनावर काय संस्कार होत आहे याचा त्यांनी विचार करावा.

-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विष्णुसूत's picture

22 Dec 2008 - 1:19 am | विष्णुसूत

तुमच्या विचारांशी सहमत आहे.
लवकरात लवकर काहितरी ठोस कार्यवाई करण्याची गरज आहे. काहि चॅनल्स तर अतिशय कहर आहेत !
वागळे नावाचा जो एक प्राणि मराठि लोकमत चॅनल चालवतो त्याला कोणी तरी आवरायला हवं.

शितल's picture

22 Dec 2008 - 1:34 am | शितल

डॉन्या,
मस्त लिहिले आहेस.
लेखाचे नाव ही छान ठेवले आहेस.:)
सध्या अनेक प्रश्ना पैकी हा प्रश्न ही उग्र रूप धारण करत आहे.:(
वेळीच आवर घातला पाहिजे.

प्राजु's picture

22 Dec 2008 - 3:36 am | प्राजु

"प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय?"

हा प्रश्न विचारतानाही, तू तुझं डोकं शांत ठेवलं आहेस आणि अतिशय संयमित भाषा वापरून लेख लिहिला आहेस. त्याबद्दल अभिनंदन.
या प्रसारमाध्यमांची लायकी कशी आणि काय असते याचं "फिर भी दिल है हिंदुस्थानी" या चित्रपटात अतिशय मस्त चित्रण केलं आहे. कोणत्या गोष्टीचा बाऊ किती करायचा आणि कशाला जास्ती महत्व द्यायचं याच ताळतंत्र कसं सोडलं जातं हे या चित्रपटात दाखवलं आहे.
"डी एस पी च्या कुत्र्याला विंचू चावला.." अशा प्रकारच्या बातम्या संध्यानंद सारख्या पेपरमधून वाचताना .. हा पेपर केवळ भेळ खाण्याच्याच लायकीचा आहे ही भावना होते. त्याचप्रमाणे "अभिताभ को सर्दी लगी" अशी बातमी न्युज चॅनेल वर पाहिली कि, हे चॅनेल केवळ कॉमेडीशो साठीच आहे असे वाटते.
सरकारने, या न्युज चॅनेलसाठी काही पॅरामिटर्स ठरवून ठेवलेले असावेत किंवा नसतील तर ते ठेवावेत. अति तिथं माती म्हणतात तसे.. त्या वाहीन्यांच्याही लक्षात येणार नाही की, कधी आपला गाशा गुंडाळला गेला.
असो.. लेख उत्तम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

22 Dec 2008 - 4:56 am | मदनबाण

माझ्या मते प्रसारमाध्यमे म्हणजे आपल्याकडे असलेल एक ब्रम्हास्त्रच आहे...त्याचा योग्य वापर झाल्यास योग्य परिणाम साधता येऊ शकतो...पण हे अस्त्र दुधारी आहे त्यामुळे त्याचा योग्य वापर महत्वाचा नाहीतर ते स्वतःवरच उलटुन येऊ शकते!!
डॉनराव मस्त लिहले आहेस...

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

अनिल हटेला's picture

22 Dec 2008 - 9:06 am | अनिल हटेला

बाणाशी सहमत....

प्रसारमाध्यमे ही खरच दुधारी अस्त्र आहेत...
काही आचारसंहीता असायलाच हवी...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

यशोधरा's picture

22 Dec 2008 - 9:10 am | यशोधरा

संपादकीय आवडले. प्रसार माध्यमांसाठी काही आचार संहिता लागू होइल आणि कोणत्याही पळवाटा न शोधता तिचे पालन होईल, तो सुदिन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Dec 2008 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोट्या !
संपादकीय चांगले लिहिले. आता सरकारने प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणले आहे, त्याचेही काही मुद्दे इथे आले असते तर
संपादकीय अजून बहरले असते असे वाटते.

अर्थात प्रसारमाध्यमांबद्दल जे विचार मांडले आहे ते उत्तमच !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्यातरी प्रसारमाध्यमे व आपण म्हणजे तुझ माझं जमेना, तुझ्यावाचुन करमेना झालं आहे.

होईल हळू हळू सुधारणा. पाश्चात्य देशातील प्रसारमाध्यमे देखील काही सर्वगुणसपंन्न नाहीत. एकतर आपल्या आदर्श, नैतिकतेच्या व्याख्या अजुन सेट होत आहेत. चालायचेच. कुठलीही गोष्ट पारखुन घेणे इतकेच. एकच माध्यम असण्यापेक्षा अनेक बरी. प्रत्येक प्रसारमाध्यमांचा अजेंडा काय आहे हे तपासुन पाहीले पाहीजे.

आणी अर्थातच रिमोटकंट्रोलचा वापर करण्यास कचरु नये :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Dec 2008 - 10:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणी अर्थातच रिमोटकंट्रोलचा वापर करण्यास कचरु नये
या वाक्याशीतर अगदी १००% सहमत; तसंच आंद्या आणि तात्यांशीही!

शिवाय हल्ली इंटरनेटमुळे बातम्या पहाण्यासाठी टी.व्ही.च पाहिजे अशीही सक्ती नसते. तेव्हा पर्यायी माध्यमांचाही वापर वाढावा.

डॉन्या, उत्तम, संयत आणि समयोचित लेख.
आणखी एक थोडासा गौण मुद्दा सुटला असं वाटतं: बातम्या वाचणारे आणि घटनास्थळी असणारे बरेचसे पत्रकार उगाच तारसप्तकात बोंबलून बातम्या देत असतात ते फारच डोक्यात जातं. शांत आणि सौम्य बातम्या वाचल्या तर ऐकतानाही ते बरं वाटतं. चर्चा होतानाही तेच जाणवतं, दोन बाजूचे लोकं ओरडायला लागले तर मधल्या पत्रकाराने त्यांना शांत करावं का स्वतःचा आवाज टिपेला न्यावा?

चेतन's picture

22 Dec 2008 - 12:17 pm | चेतन

जबरदस्त !!!
अग्रलेख खरचं मस्त झालाय अगदी प्रसारमाध्य्मामध्ये छापुन येण्यासारखा.
अभिनंदन
एक प्रश्नः प्रसारमाध्यम याचा अर्थ फक्त बातम्या देणारे असा होतो का?

अवांतरः प्रसार माध्य्मांप्रमाणे वर्षोनवर्षे चालणार्‍या सासु-सुनांच्या मालिकांवर सुध्दा बंदी आणावि क? ;)

सुक्या's picture

22 Dec 2008 - 12:43 pm | सुक्या

अतिशय संयमी संपादकीय.

आजकालच्या वृत्तवाहिन्या अन् त्यांचे वार्ताहर पाहीले की यांना पत्रकारीता येते का हा प्रश्न पडतो. प्रसारमाध्यमे वा वृत्तवाहिन्या यांचा समाजावर वचक असायला हवा परंतु आज वृत्तवाहिन्यांचे रुपडे पाहील्यावर यांना वृत्तवाहिन्या म्हणावे की करमनुकीचे कार्यक्रम देनार्‍या वाहीन्या हा प्रश्न पडतो. सकारत्मक पत्रकारीतेपेक्षा अगदीच तारतम्य न बाळगता कुठल्याही भिकार बातमीला 'ब्रेकींग न्युज' म्हनुन देताना किंवा भसाड्या आवाजात विचीत्र अंगविक्षेप करत काहीतरी बरळ्ताना हे लोक बातमीचा मुळ हेतुच दुर करतात. नंतर उरतो तो केवळ पांचट्पना. तोच आजकाल चालु आहे.

अशा या वाहीण्यांवर बंधने यायलाच हवी. नाहीतर लोकांना प्रबोधना ऐवजी तमाशा पहावा लागेल.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

अवलिया's picture

22 Dec 2008 - 2:56 pm | अवलिया

उत्तम लेख. आवडला, असेच लिहित रहा.

अर्थात जोपर्यंत मिडीयाला बाहेरुन मदत आहे... तोपर्यंत सुधारणा होणे जरा अवघडच आहे.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

22 Dec 2008 - 3:00 pm | विनायक प्रभू

तज्ञ म्हणुन महेश भट्ट ला बोलवतात कुठल्याही विषयावर. आणि बोलताना हे बेण सारखे काहीना काही तर खाजवत असते. न बरे होणारे गजकरण असावे.
छान लेख

सोहम_व's picture

22 Dec 2008 - 5:38 pm | सोहम_व

छान लेख,
२४ x ७ न्युज वाहिन्याचि खरच गरज आहे का?दिवसातुन फक्त दोन तास न्युज वहिन्याना दिले तरि चालतिल.४/५ वर्षापुर्वि न्युज वहिन्या नव्ह्त्या तरि आपण आन्न्दने जगत होओच ना?मला असे वाटते कि ह्या वहिन्यावर आता थोडे दिवस पुर्ण बन्दि घातलि पाहिजे.

विनायक पाचलग's picture

22 Dec 2008 - 5:41 pm | विनायक पाचलग

छान लिखाण
योग्य मुद्दे आणि योग्य शब्द.
आणि हो पण सगळेच असे नाहीत.
काही सन्माननीय कार्य्क्रम अपवाद आहेत.
ते कार्यक्रम या लढाइत बंद पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
आणि मुळात म्हणजे बदल स्वतःत करायला हवा.
आपण बघतो म्हणून वाहिन्या चालतात ना
मग आपण का बघायचे
एक कलर्स आले जरा वेगळे केले ६ महिन्यात आले ना टोपवर
आणि हळुहळू क्रेझ कमी होतीय क मालिकांची
मग आपण बदलु ना स्वतःला
आपण काही म्हणले तरी इंडीया टीव्ही बघणारी माणसे आहेत म्हणुन ती चालते ना
आणि हो अतातायीपणे पत्रकारिता केली तरी बरखा दत्त ला आपण चांगले म्हणतोच ना
माझे म्हणणे आहे आप्ण स्वतःबदलु या आणि हो आपण बदललो की पत्रकारिता नक्की बदलेल
कार्‍अन तो एक धंदा आहे आणि धंद्यात्र फक्त नफा बघतात
त्यांचा नफा आपल्या हातात आहे मग आपण का करु द्यायचा त्याना
जरा विचार करा
आणि हो अशी खरमरीत टिका करणारा हा ब्लॉग
http://www.batamidar.blogspot.com
आणि मीडीयाची पाठराकण करणारा हा लेख
http://www.loksatta.com/lokprabha/20081219/cover.htm

संदीप चित्रे's picture

22 Dec 2008 - 7:28 pm | संदीप चित्रे

डॉन... लेख आवडला.
२६/११ च्यावेळी प्रसारमाध्यमांनी जे काही मांडलं होतं त्याला उच्छादशिवाय दुसरा शब्द नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2008 - 10:48 pm | llपुण्याचे पेशवेll

अगदी योग्य शब्दात मांडले आहेस तुझे विचार. अतिशय आवडले.

पुण्याचे पेशवे
Since 1984

भास्कर केन्डे's picture

22 Dec 2008 - 10:49 pm | भास्कर केन्डे

डॉन साहेब,

अतिशय घणाघाती पण संयमीत संपादकीय. आम्हा "मुकी बिचारी कुणी हाका" जनतेच्या भावनांना वाचा फोडल्याबद्दल आभार!

आपण नेहमीच म्हणतो की " जे जे उत्तम, उदात्त ते ते घ्यावे " असे असताना ही प्रसारमाध्यमे मग तेवढ्याच गोष्टी धाब्यावर का बसवतात ?
आपण ही उक्ती येथेच केवळ विसरतो असे नाही. कपडे, खाण्या-पिण्याच्या सवयी, दैनंदिन वागणूक, स्वच्छता, अशा अनेकानेक बाबीत आपण पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी न शिकता वाईट सवयींचे केवळ अंधानुकरण करत आहोत. आता हेच पहा ना... पाश्चात्य देशांत जंक फूड विरोधात सरकार कडून केवढे जनजागरण केले जाते, शाळांच्या अवारात जंक फूड विकायला बंदी असते, पिझ्झासारख्या चीजवाल्या खाद्यपदार्थांपासून दूर रहायचे उपदेश डॉक्टर लोकांसोबत सरकारी यंत्रणा सुद्धा करत असतात. मुलांना लवकर झोपून लवकर उठण्याच्या सवयी तर हमखास लावल्या जातात. आपल्याकडे मात्र या सगळ्या गोष्टीत वेगळे चित्र दिसत आहे. फॅशनच्या नावाखाली नको त्या सवयी आपण पाश्चात्यांकडून उचलत आहोत. याच समाजाचा भाग असणारे अनिर्बंध प्रसारमाध्यमे सुद्धा तेच करत आहेत असे वाटते. अशा उच्छादाला पायबंद घालायलाच हवा.

आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

धनंजय's picture

23 Dec 2008 - 3:52 am | धनंजय

त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये झालेला फरक दररोज जाणवत नाही.

माध्यमांकडून वृत्त मिळवून मत बनवणे, हे विचारी सुशिक्षित माणसाला कठिण आहे. पु. ल. देशपांडे यांच्या "अंतू बरवा" मध्ये "हे जे काय अमेरिकेचे आणि रशियेचे चालले आहे..." रत्नांग्रीच्या पेपरातील अग्रलेखाची खिल्ली उडवली आहे. आजकालच्या टिनपाट तज्ञांचे बहुधा असेच आहे.

टिळकांचे, अत्र्यांचे अग्रलेख उत्तम होते, म्हणून इतिहासाने त्यांची खातर घेतली. म्हणून तेच आपल्याला लक्षात आहेत. आमच्या जुन्या वाड्याच्या माळ्यावर मला "जगद्धितेच्छू" वर्तमानपत्राची एक प्रत (१८८०-१८९० काळातली तारीख होती) मिळाली होती. त्यात (त्या दिवशी तरी) सनसनाटी बातम्यांशिवाय काहीच नव्हते. १०० वर्षांनी आजचे बहुतेक वार्ताहार "जगद्धितेच्छू" सारखे विसरले जातील, पण काही चांगले वार्ताहार, अग्रलेखक "केसरी"सारखे लक्षात राहातील.

बहुधा पूर्वीच्या काळातही लोकांना पाखडून पाखडून धान्य वेचावे लागत असे. आजही आपण तसेच वेचावे, हे तत्त्व छोटा डॉन यांचा उत्तम अग्रलेख वाचून पुन्हा पटते. छोटा डॉन यांचे अग्रलेखाबद्दल अभिनंदन.

लिखाळ's picture

24 Dec 2008 - 11:00 pm | लिखाळ

पूर्वीच्याकाळी लोक धान्य पाखडुन खडे वेचत असत.. आता पाखडून पाखडून धान्य वेचायची वेळ आली आहे ;)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

सुनील's picture

23 Dec 2008 - 6:36 am | सुनील

अग्रलेख चांगला आहे.

मात्र, प्रसारमाध्यमांना बातम्या प्रसारीत करताना थोडा संयम बाळगुन, समंजसपणा दाखवुन, योग्य तेच आणि तितकेच दाखवावे, स्वतःच्या पदरचे काही त्यात घुसडण्याची घोडचुक करु नये, ही अपेक्षा प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता धूसरच!

मी बातम्यांसाठी टीही पहात नाही. छापील वृत्तपत्रेदेखिल सहसा नाही. त्यापेक्षा इंटरनेटवर विरुद्ध मते असलेली अनेक वर्तमानपत्रे वाचणे अधिक सोयिस्कर पडते. कारण असे म्हणतात की, कोणत्याही गोष्टीला तीन बाजू असतात - एक तुमची बाजू, एक माझी बाजू आणि एक खरी बाजू.

म्हणूनच, विरुद्ध मते असलेली वृत्तपत्रे वाचलीत, तर सत्य त्यादोघांमध्ये कोठेतरी असते याची जाणीव होऊ लागते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग's picture

24 Dec 2008 - 11:26 pm | चतुरंग

अग्रलेख आवडला होताच. आज पुन्हा वाचला अधिक निवांतपणे.
प्रसारमाध्यमे ही दिवसेंदिवस अधिकाधिक उथळ होत चालली आहेत ह्यात शंका नाही. लोकशाहीचा मनसोक्त गैरवापर कसा करावा ह्याची अहमहमिका चालू असावी अशा थराला हे चाळे पोचलेले दिसतात.
सूज्ञ लोकांनी जनमताचा रेटा वाढवून प्रसारमाध्यमांवर निर्बंध आणले पाहीजेत
http://mib.nic.in/ हा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा दुवा.
इथे संपर्क करुन आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचवता येतील. सुरुवात करायलाच हवी.

चतुरंग

चित्रादेव's picture

11 Feb 2009 - 11:02 am | चित्रादेव

लेख छान आहे. पण शेवटी फक्त लेख लिहूनच नी चर्चा करूनच आपण नी आपल्यासारखे(ह्यात मीही आलेच) गप्प बसतो.
एक म्हणजे प्रसारमाध्यमे आणि प्रसार वाहीनी ह्याना कायदेशीर नियम सरकारने लागू केले पाहीजेत.
पेपर असो वा टीवी टाळक्यात सणक जाते ११/२६ नंतर विचार केला की ज्या पद्धतीने त्यांनी मुर्खपणा केला. टीवीची सोयच नाही. वेळकाळ नसताना नको ते कार्यक्रम, लहानांच्या प्रोग्रॅममध्ये ऑब्जेकशनल विषय नी प्रकार. आणि सतत वहाण्यार्‍या टाकावू मालीका. अरे काय दर्जा आहे ह्या गोष्टींचा? काय ज्ञान वा संदेश देता/पाजळता तुम्ही?
मग आमच्यासारखे काय करू शकतो, योग्य त्या व्याक्तीला पत्रे लिहून सामूहीक निषेध करून तो कार्यक्रम बंदच पाडायचे प्रयत्न ठीक राहील असे मला वाटते.