साहित्य-
१ वाटी हिरवे वाटाणे, १ मोठा चमचा धने, १ छोटा चमचा जिरे, ५-७ लवन्गा, ८-१० मिरी, १ वाटी सुके/ओले खोबरे, १ इन्च आले, १०-१२ पाकळ्या लसूण, ५-६ कान्दे, तेल, हळद, तिखट, डाळीचे पीठ, भावनगरी, बारीक शेव, पाणी, मीठ, ७-८ कढीपत्त्याची पाने, पाव
कृती-
आदल्या दिवशी वाटाणे भिजत घालावेत. मिसळ करतेवेळी ते उकडून घ्यावेत. ४ कान्दे उभे चिरून घ्यावेत. खोबरे किसून घ्यावे. मग धने, जिरे, लवन्गा, मिरी, कान्दा, खोबरे भाजून वाटून घ्यावे. आले-लसणीची पेस्ट करून घ्यावी. एका कढईत तेल टाकून त्यात आले-लसणीची पेस्ट व वाटलेला मसाला घालावा व परतून घ्यावे. थोडी हळद घालून त्यात वाटाणे घालावेत. पाणी घालावे. आवडीनुसार मीठ व तिखट घालावे. डाळीच्या पिठात पाणी घालून त्याची गुळगुळीत पेस्ट करून कढईत घालावी. कढीपत्त्याची पाने घालून १ उकळी आणावी.
तर्री-
एका कढल्यात तेल घालून ते तापल्यावर त्यात थोडी हळद व आवडीप्रमाणे तिखट घालून ग्यास लगेच बन्द करावा. ही तर्री कढईतल्या मिसळीवर ओतावी.
एका बोल मधे मिसळ घालून त्यावर भावनगरी, बारीक शेव, बारीक चिरलेला कान्दा घालून पावाबरोबर गरम गरम खावयास द्यावी.
प्रतिक्रिया
17 Dec 2008 - 11:57 am | पांथस्थ
या रविवारी नक्कि करणार.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 1:01 pm | विसोबा खेचर
सह्ही! :)
तात्या.
17 Dec 2008 - 1:23 pm | परिकथेतील राजकुमार
एक नवी पा.क्रु. कळाली. धन्यवाद
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
17 Dec 2008 - 9:00 pm | सखाराम_गटणे™
वाह वाह, छानच आहे,
आवडले
पुले शु
----
सखाराम गटणे
18 Dec 2008 - 10:07 am | पिवळा डांबिस
या रेसेपीची मिसळ कदाचित छान होईलही....
पण "मामलेदारची"म्हणून ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीची म्हणून ही रेसेपी दिली असेल तर शंका वाटते....
कारण ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीत खोबरे नसते आणि कढीपत्ता नाहीच नाही.....
(मग खवय्या तात्या कितीही सह्ही म्हणो...:))
अर्थात अलिकडे मामलेदारच्या मिसळीची रेसेपी बदलली असल्यास बोलणेच खूंटले.....
चूक भूल द्यावी घ्यावी......
आपला,
चवीसाठीच जगणारा,
पिवळा डांबिस
18 Dec 2008 - 12:31 pm | वृंदा
बरोबर आहे. पण ही मिसळ मामलेदारच्या मिसळीच्या जवळपास जाते म्हणून आम्ही तिला असे म्हणतो.
19 Dec 2008 - 9:51 am | पिवळा डांबिस
बरोबर आहे. पण ही मिसळ मामलेदारच्या मिसळीच्या जवळपास जाते म्हणून आम्ही तिला असे म्हणतो.
थँक्यू वृंदाताई, हे असं प्रांजळपणे लिहायला धैर्य लागतं. ते तुम्ही दाखवलंत याबद्दल अभिनंदन!!!
आता मामलेदारच्या मिसळीची रेसेपीच हवी असेल तर याच संस्थळावर असलेली स्वाती राजेश यांनी दिलेली आनि पेठकरकाकांनी प्रतिक्रिया जोडलेली रेसेपी बघा....
आम्ही ती करून पाहिली आहे, एकदम परफेक्ट मामलेदारची मिसळ!!!
(बाय द वे, पेठकर काका हे प्रोफेशनल शेफच्या तोडीचे आहेत, स्वातीताईही तशाच!!!)
मिपावर तुमचे मनःपूर्व स्वागत!!!
18 Jan 2009 - 12:52 am | प्रभाकर पेठकर
पेठकर काका हे प्रोफेशनल शेफच्या तोडीचे आहेत
कसचे...कसचे...
आयला, ह्या वयात लाजायलाही जाम धमाल येते.
धन्यवाद.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
19 Dec 2008 - 12:57 am | विसोबा खेचर
(मग खवय्या तात्या कितीही सह्ही म्हणो...
च्च! तुलासुद्ध लेका कळत नाही डांबिसा! अरे बाबा मला संस्थळ चालवायचंय. नवीन मंडळींना प्रोत्साहन द्यावं लागतं.
वृंदाने जी पाकृ दिली आह ती मिसळीचीच आहे ना? मग झालं तर! तपशीलात कशाला शिरा?
छ्या, तुला कळत नाही डांबिसा! :)
आपला,
शरदतात्या पवार.
19 Dec 2008 - 9:22 am | वृंदा
सूचना - वर दिलेली पाकृ मिसळीचीच आहे. कोणाला ती दुसर्या कुठ्च्या पदार्थाची वाटली तर लेखिका त्यास जबाबदार नाही.
नवीन मंडळींना प्रोत्साहन द्यावं लागतं.
इतकी काही वाईट नाहीए हं ही पाकृ [(
तपशीलात कशाला शिरा?
अरे, तू तरी मिसळ म्हण!
19 Dec 2008 - 9:56 am | पिवळा डांबिस
छ्या, तुला कळत नाही डांबिसा!
सॉरी, सॉरी, असं आहे काय!!!
आमचा गुन्हा पोटात घाला तात्याराव....
:)
18 Dec 2008 - 10:12 am | टारझन
बादलीभर लाळ गळाली !!
पाकृ के व ळ अ प्र ति म !!
तोडलंस गं!! जियो !!
चला विकांताचा बेत फिक्स झाला
- टारझन
19 Dec 2008 - 9:07 am | प्राजु
मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Jan 2009 - 1:37 pm | priya
ही मिसळ चांगली लागत असेल पण ही मामि नव्हे. मामि साठी ही लिंक पहा.
पिवळा डांबिस, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
फक्त स्वाती दिनेश आणि स्वाती राजेश मध्ये तुम्ही थोडा गोंधळ केलात,ती रेसिपी स्वाती दिनेश ह्यांनी दिलेली आहे.
मामि एकदा खाऊन चव रिफ्रेश कराच तुम्ही वृंदाताई..
17 Jan 2009 - 10:27 pm | पिवळा डांबिस
फक्त स्वाती दिनेश आणि स्वाती राजेश मध्ये तुम्ही थोडा गोंधळ केलात,ती रेसिपी स्वाती दिनेश ह्यांनी दिलेली आहे.
अरेच्चा, खरंच घोळ घातला की मी!!!
सॉरी, सॉरी!!!
एकाच नांवाच्या पसाभर काकू मिळाल्या ना की असंच होतं माणसाचं!!!! या स्वात्यांना आता नंबर दिले पाहिजेत!!!!:)
आपली,
स्वाती डांबिश
(आयला, मस्त!! काय आयडिया सुचलीय!! मिपाच्या या स्वयंपाकघरात आपण यापुढे याच नांवाने वावरणार!!!!!!!)