नमस्कार मंडळी!!
"नेमेची येतो " म्हणत म्हणत पावसाने या वर्षी टांग दिली आणि पावसाळी ट्रेक करण्याचे आमचे स्वप्न हवेतच विरले .आता पावसाळी नाही तर निदान हिवाळी ट्रेक करूया असे म्हणून मागच्या विकांताला ट्रेक करायचे ठरले.चंदन-वंदन की उंबरखिंड यावर चर्चा चालू होती. पण कल्याण डोंबिवलीहुन काही जण येणार होते आणि ट्रेक वन डे करायचा होता त्यामुळे उंबरखिंड ने बाजी मारली .
मी हा ट्रेक आधी खोपोली ते लोणावळा असा उलट दिशेने केला होता. पण त्याला खूप वर्षे झाली होती आणि वाट धुसर आठवत होती. शिवाय आम्ही मध्ये कुठेतरी एक रात्र मुक्काम केला होता व दुसऱ्या दिवशी नागफणी बघुन लोणावळ्याला आलो होतो. असो.तर ट्रेक क्षितीज आणि अजून एका संस्थळावर बर्यापैकी माहिती मिळाली आणि असा बेत ठरला .
कल्याणचे लोक्स इंद्रायणी ने सकाळी ८ ला लोणावळ्याला पोचणार .पुणेकर साधारण त्याच वेळी तिथे पोचणार . सर्वजण भेटले की नाश्ता करून जीप ठरवून कुरवंडे गावी जायचे व तेथून ट्रेक सुरु करायचा. साधारण जेवायच्या वेळी उंबरखिंड गाठायची आणि ५ पर्यंत खोपोली ला पोचायचे. तेथून पुणेकर घाट मार्गाने वर येतील तर कल्याण वाले खोपोली लोकलने परत जातील.
चालण्याचे अंतर साधारण १५ कि.मी. आहे आणि मी यावेळी प्रथमच दोन्ही मुलांना (८ आणि ११) घेऊन ट्रेकला जाणार असल्याने जरा साशंक होतो. म्हणजे चालले नाहीत तर उचलून घ्यायची तयारी होती. पण उन कितपत असेल ,पाणी किती लागेल वगैरे शंका होत्या. त्यामुळे ग्लुकोन डी ,खजूर ,लिम्लेट च्या गोळ्या ,बिस्कीटे , चार लिटर पाणी अशी जय्यत तयारी घेऊनच निघालो. सकाळी पुण्याहून डेक्कन क्वीन पकडली आणि छान बसायला जागा मिळाली. प्रवासाची सुरुवात तर छान झाली.गप्पा मारता मारता लोणावळा कधी आले ते समजलेच नाही.लोणावळा स्टेशन वर पोचताच विलासला फोन केला. तो कल्याणच्या ग्रुपबरोबर होता. थोड्याच वेळात सर्वजण भेटले .सर्व मिळून १३ जणांचा ग्रुप झाला.
नमस्कार चमत्कार झाले आणि सर्वजण चौकातील उडपी हॉटेलकडे वळले. पोटभर नाश्ता चहा वगैरे साग्रसंगीत झाल्यावर मन्डळी बाहेर पडली आणि जीपची शोधाशोध सुरु झाली. लवकरच कुरवंडे ला जायला जीप मिळाली.
साधारण १५ मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही कुरवंडे गावात पोचलो.साधारण ९.३० चा सुमार होता. जी,प,शाळा कुरवंडे येथून गावकर्यांना रस्ता विचारला आणि मार्गस्थ झालो.
बहुतेक मंडळी तरुण आणि उत्साही होती त्यातून सकाळची वेळ आणि नुकताच पोटोबा झालेला असल्याने सर्वजण चालण्याच्या उत्साहात होते. उजवीकडे चढत जाणारी वाट साधारण २० मिनिटे चाललो असू आणि गावकर्यांनी सांगितलेली पहिली खुण लागली. एकाशेजारी एक असणारे तीन बोर्ड. इथून उजवीकडे वर जाणारा रस्ता नागफणीला जातो तर डावीकडे उतरणारा रस्ता छावणी गाव किंवा अम्बा नदीकडे जातो.
नागफणीला जायचा बेत नसल्याने सरळ डावीकडे उतरू लागलो.लवकरच आय एन एस शिवाजीचे पाठचे कुंपण सोबत करू लागले .ही दुसरी मोठी खुण.त्या कुंपणाच्या साथीने रस्ता खाली उतरत चालला होता.
वाटेत याने छान पोझ दिली
विविध रंग आकार आणि प्रकारची पावसाळी फुले उमलली होती.
वाटेत एक छोटासा झराही लागला. उजव्या हाताला गेल कंपनीची पाईप लाईन असल्याने खुणेचे पिवळे बोर्ड साथ करत होते.मात्र काही ठिकाणी गवत इतके माजले होते की ते बोर्ड नीट शोधून काढावे लागत होते.
हा झरा लागल्यानंतर मात्र एक वाट सरळ जात होती तर एक वाट उजवीकडे वळत होती. सर्वजण जरा बुचकळ्यात पडले पण लवकरच पाणी घेउन येणाऱ्या एक मावशी दिसल्या आणि त्यानी उजवीकडच्या वाटेवर शिक्कामोर्तब केले. सर्वांनी उजवीकडे मोर्चा वळवला .
मात्र ती वाटही सोपी नव्हती. एक तर सगळीकडे माजलेल्या गवताने पायवाट लपवून टाकली होती. आणि कुठे कुठे थोडा ओलावा तग धरून होता त्यामुळे पाय घसरत होते.तरीही रांग धरून एक एक जण उतरू लागला .लांबवर दरीत अम्बा नदीचे पात्र दिसू लागले . वाट थोडी उजवीकडे वळली आणि दरीत उतरायला लागली.
गेल कंपनीचे पिवळे बोर्ड साथ करीत असल्याने वाट बरोबर असल्याची खात्री पटत होती.
आता एक मोकळवन आले. ते पार झाले आणि एक वाहता झरा वाटेत आला. साधारण २ तास चाल झाली होती आणि पावले चालून आणि घसरून थकली होती.सर्वांनी पहिले बूट ओले होतील म्हणून दगड वगैरे बघून झरा ओलांडला . मग हात धुवू, चेहरा धुवू असे करत करत कधी सगळे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागले समजलेच नाही.उन्हात चालण्याचा सगळा शीण थंडगार पाण्याने नाहीसा झाला .
परत गवतातुन वाटचाल सुरु झाले. नागफणी आता फार वर धुक्यात लपेटलेले दिसत होते.अजून एक ओढा पार केला आणि छावणी गावात दखल झालो.दुपारचे १२.३० वाजले होते. आणि फार भुक लागली होती.पण आधी म्हटल्या प्रमाणे उंबर खिडीत जेवायचे ठरले होते. त्यामुळे सटर फटर खाऊन सर्वजण पुढे चालू लागले.आता कच्ची सडक सुरु झाली जी आम्हाला शेवट पर्यंत साथ करणार होती.
उन मी म्हणत होते .कसेतरी सर्वजण पाय ओढत चालता होते. साधारण अर्ध्या तासात रस्त्याच्या डाव्या बाजूला समरभूमी उंबर खिंड असा बोर्ड दिसला
रस्ता सोडून सगळे नदी पात्राकडे वळले.इथे नदीला भरपूर पाणी होते.त्यामुळे सगळ्यात आधी डुंबण्याचा जंगी कार्यक्रम पार पडला. इथे उंबर खिंडीच्या लढाई चे एक सुंदर स्मारक उभे केले आहे.
त्यावर एका बाजूला महाराजांचे आज्ञापत्र ,एका बाजूला त्यांचे अश्वारूढ म्युरल ,एका बाजूला उंबरखिंडीचा इतिहास लिहिला आहे.सगळे त्या स्मारकासमोर नतमस्तक झाले. मग जेवण करून पुन्हा डांबरी सडकेवरून सगळे चालू लागले.
अजून साधारण ५ कि. मी. चालायचे होते. दुपारचे २ वाजून गेले होते.उन्हाने बेजार होऊन मन्डळी पाय ओढत होती.मधेच ग्लुकोन डी मधेच गोळ्या असा खुराक चालू होताच.
नदीचे पात्र डाव्या हाताला सोबत होते. पण ते आता दूर जात होते. ट्रेक चा हा टप्पा फार कंटाळवाणा होता.सकाळची रानाची मजा जाऊन या डांबरी रस्त्याने चालायचा हा कसला ट्रेक , असे वाटू लागले होते. त्यातच माझ्या लहान मुलाने दमून आता चालणार नाही असे घोषित केल्याने त्याला पाठीवर घेऊन मी चालत होतो. थोडे चालत बसत अशी वाटचाल सुरु असताना दुरून वाहनांचे आवाज यायला लागले.पायात जीव आणून पुढे चालू लागलो आणि लवकरच गेल कंपनीचा प्लांट लागला. आम्ही खोपोली -पाली रस्त्याला आलो होतो.
एक एक करत सगळेजण आले आणि दोन टमटम करून आम्ही खोपोलीला आलो.रमाकांतकडे वडे खाता खाता ट्रेक कसा झाला यावर चर्चा सुरु झाली आणि तेव्हढ्यात दिवसभर गायब असलेला पाऊस तडतड कोसळू लागला .कोणाकडेच छत्री वगैरे नव्हती. आणि आत्ता भिजायची कोणाची इच्छा पण नव्हती.१०-१५ मिनिटे झाली पण पाउस काही थांबेना.शेवटी उशीर होइल म्हणून निघालो. कल्याणकरांचा निरोप घेतला आणि आम्ही खोपोली एस टी डेपो कडे निघालो ते पुढचा ट्रेक कोणता करायचा याचे बेत करतच.
प्रतिक्रिया
19 Oct 2015 - 6:58 am | प्रचेतस
छान लिहिलंय.
तुम्ही उतरलात तो आंबेनळी घाट का?
19 Oct 2015 - 11:31 am | स्वच्छंदी_मनोज
वल्ली हा आंबेनळी नाही. आंबेनळी थोडासा बाजूला आहे. हे उतरले ते उंबरखिंडच.
19 Oct 2015 - 12:06 pm | प्रचेतस
अरे पण उंबरखिंड घाटमाथ्यावर नसून घाट उतरल्यावर खाली नदीच्या पात्रात आहे ना?
19 Oct 2015 - 12:23 pm | स्वच्छंदी_मनोज
उंबरखिंडीचे जे स्मारक म्हणून सध्या आहे ते चावणी गावापासून पुढे १.५ किमी नदीत आहे.
19 Oct 2015 - 1:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
वल्लीजी हा आम्बेनळी घाट नाही.
19 Oct 2015 - 8:02 am | वेल्लाभट
अरे वा मस्त लिहिलंय !
आम्ही गेलो होतो पण गाडीने थेट.. खोपोली कडून.
19 Oct 2015 - 8:18 am | एस
छान ट्रेक.
19 Oct 2015 - 8:55 am | कंजूस
जरा नवीन ठिकाण वाटतंय बघायला पाहिजे.
19 Oct 2015 - 1:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
जरुर जा. मस्त वन डे ट्रेक आहे. नदीला पाणी आहे तोवर म्हणजे डिसेम्बर पर्यंत गेलात तर मजा येइल. नंतर उन फार आणि पाण्याची वानवा होईल.
19 Oct 2015 - 11:22 am | पद्मावति
मस्तं भटकंती.
19 Oct 2015 - 11:36 am | स्वच्छंदी_मनोज
राजेंद्र मस्तच. वर्णन आणी फोटो सही. समरभुमीचे स्मारक ओलांडल्यानंतर पुढचे अंतर रस्त्यावरून जायला जिवावर येते. आम्ही दोनदा केलाय हा रूट.
नागफणी फाटा सोडला की पुढच्या धनगर वाड्यावरून उजवीकडे जायच्या ऐवजी सरळ गेले की अजून एक घाट आहे फल्याणघाट. हा कोकणातल्या फल्याण गावात उतरतो (मृगगडाच्या पायथ्याचे गांव). हा घाटपण आम्ही मार्चच्या कडक उन्हात केला होता.
असेच अजून ट्रेक करा आणी इथे वृत्तांत टाका.
19 Oct 2015 - 12:35 pm | अजया
मस्त भटकंती.आमच्या जवळच्या भागातली दिसते आहे.
19 Oct 2015 - 1:34 pm | जगप्रवासी
वाह नवीन जागा आता इथे ही जाव लागेल, छान लिहिलंय
19 Oct 2015 - 1:36 pm | चाणक्य
मस्त झालेला दिसतोय वन डे
19 Oct 2015 - 1:38 pm | मांत्रिक
अगदी छान लिहिलंय. फोटो पण क्लासच!
19 Oct 2015 - 2:04 pm | बॅटमॅन
अरे वा! उंबरखिंडीच्या लढाईबद्दल वाचले होते पण प्रत्यक्ष पाहण्याचा योग इथे प्रथमच आला. स्मारकही देखणे केलेले दिसतेय. आवडले.
20 Oct 2015 - 9:30 am | चाणक्य
या लढाईची कोणी थोडक्यात माहिती देऊ शकेल काय?
20 Oct 2015 - 12:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
लढाईची माहीती इथे वाचा
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Umberkhind-Trek-U-Alpha.html
19 Oct 2015 - 2:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्व वाचकांचे धन्यवाद!
19 Oct 2015 - 9:40 pm | जव्हेरगंज
वा! बसल्याबसल्या आम्ही पण ट्रेक करून आलो.
मस्तच!
20 Oct 2015 - 2:40 pm | वेल्लाभट
आम्ही गेलो होतो त्याचा वृत्तांत.
[ उगीच झैरात :) ]
www.misalpav.com/node/27266
www.misalpav.com/node/27278
20 Oct 2015 - 3:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त आहेत दोन्ही भाग
20 Oct 2015 - 4:59 pm | पैसा
खूप छान लिहिलंय आणि फोटोही आवडले.
20 Oct 2015 - 5:09 pm | नाखु
एक डाव मुलाम्ना घेऊन करायचा का हा ट्रेक.
साधे सोपे ट्रेक हौशी नाखु
20 Oct 2015 - 8:11 pm | कंजूस
मुलान्साठी चांगला ट्रेक -कामशोतवरून जांभूली जांभवली जाणाय्रा रस्त्याने ( बस असते )शेवटी उतरा.कोंडेश्वरचे देऊळ ( इथपर्यंत कार नेता येते)चालत अर्धा तास-मागे एक ओहोळ ओलांडला की माथ्यावरून खाली एक गाव ( सांडशी ) दिसते. थोडे पुढे ढाकच्या खिंडीपर्यंत जाऊन परत येता येईल.खाली अजिबात जाऊ नका.दाट झाडी ,गारवा आहे. जांभिवलीत चहा मिळतो.
20 Oct 2015 - 10:52 pm | प्रचेतस
जबराट आहे तो ट्रेक. खिंडीअलीकडे सह्याद्रीचं सदाहरित वन आहे.
20 Oct 2015 - 11:03 pm | कंजूस
प्रचेतसना खूप चांगले ट्रेक माहिती आहेत पण ते कुणा खाससाठी ठेवले आहेत.आपल्यासाठी फक्त भुलेश्वर,भाजे आणि कारले.गेला बाजार एलापूर.
7 Jun 2018 - 9:28 pm | शशिकांत ओक
दुर्ग विहारी, आणि अन्य गिरीप्रेमींनो,
वरील वर्णनातून कुरवंडे कडून घाटमाथ्यावर येऊन एकदम १५शे फूट खोल जायला लागते. व त्या मुळे संपूर्ण २० हजार सैन्याला परत ती चढण सर्व साहित्यानिशी चढणे अशक्य आहे असे लक्षात येऊन हात हलवत परतायला लागले त्या चढणी बद्द्ल फोटो आणि माहिती मिळाली तर आवडेल.