काही पारंपारिक झटपट तोंडीलावणी

Maharani's picture
Maharani in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:33 pm

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात इन्स्टंट फूडला खूप महत्त्व आले आहे. बाजारात अनेक प्रकारची इन्स्टंट फूड्स मिळतात. पण आपल्या काही पारंपरिक पाककृती पण आहेत ज्या एकदा बनवून ठेवल्यावर हवे तेव्हा हव्या त्या प्रकारे झटपट वापरता येतात. आज मी पाककृती देत आहे आपल्या काही पारंपरिक कोरड्या तोंडीलावण्यांच्या ज्या भरपूर पौष्टिक तर आहेतच पण एकदा बनवून ठेवल्यावर झटपट वापरता येण्याजोग्या आहेत.

डांगर:

डांगर च्या प्रत्येक ठिकाणच्या करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काहीजण पोह्याचे डांगर बनवतात, काही उडदाचे तर काही मटकीचे. मला स्वतःला मिश्रडाळींचे जास्त आवडते.

Dangar

साहित्य

१ वाटी अख्खी मटकी
पाऊण वाटी सालासकट मूग
पाऊण वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी हरभरा डाळ
अर्धी वाटी अख्खे मसूर
पाव वाटी मूग डाळ
२ मोठे चमचे जिरे
२ मोठे चमचे धने

कृती :

कढईत हे सर्व जिन्नस वेगवेगळे भाजून घेणे. एकत्र करून मिक्सरवर किंचित भरड पीठ करून घ्या. घट्ट झाकणाच्या डब्यात/बरणीत भरून ठेवा.

२ चमचे डांगर पीठ घेऊन अर्धी वाटी ताकात एकत्र करून पंधरा/वीस मिनिटे ठेवून द्या. परत अर्धी वाटी ताक घाला कारण मिश्रण आळलेले असेल.

त्यात अर्धा कांदा बारीक चिरून घालावा.

तिखट, मीठ, गोडा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

वरून तेल, मोहरी, हिंग, हळद फोडणी गार करून घालावी.

हे चटपटीत डांगर पोळी, भात, भाकरी कशाहीबरोबर तोंडीलावणे म्हणून झकांस लागते.

टीप :

डांगर मध्ये असलेल्या डाळी उपलब्धी प्रमाणे/आवडी प्रमाणे कमी जास्त करू शकता.

मेतकूट :

पावसाळ्यात रात्री नुकता कुकर मधून काढलेला गरमागरम वाफाळता भात, त्यावर तुपाची धार, मीठ, लिंबू आणि मेतकूट...अहाहा स्वर्ग सुख....मेतकुटात दही, मीठ, तिखट कालवून तोंडीलावणे पण बऱ्याच जणांना आवडते. चुरमुरे+कच्चे तेल+मीठ+मेतकूट असा खाऊ सगळ्यांनीच लहानपणी खाल्ला असेल. मेतकुटात कांदा, कोथिंबीर घालून थालीपीठ पण छान होते. आजारपणात तोंडाला चव नसेल तर मेतकूट म्हणजे हमखास उपाय.

अजून एक मला आवडणारा प्रकार

शिजवलेल्या ३ वाट्या गार भातात ३ चमचे मेतकूट, मीठ, ३/४ चमचे ओले खोबरे, अर्धा चमचा साखर, २ लहान चमचे लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घ्यावे. यात तेल + मोहरी + जिरे + हिंग + हळद + हिरवी मिरची अशी फोडणी देऊन एकत्र कालवून घ्यायचे. अप्रतिम लागतो हा भात.

तर असे बहुउपयोगी मेतकूट घरी बनवण्यासाठी -

Metkut

साहित्य :

१) हरभरा डाळ - २ वाट्या
२) तांदूळ - अर्धी वाटी
३) गहू - पाव वाटी
४) उडीद डाळ - अर्धी वाटी
५) मूग डाळ - पाव वाटी
६) मोहरी - १ मोठा चमचा
७) धने - २ मोठे चमचे
८) जिरे - १ मोठा चमचा
९) मेथ्या - १ लहान चमचा
१०) लवंग - ४
११) साधे वेलदोडे - ५
१२) दालचिनी - १ इंच तुकडा
१३) जायफळ - अर्धे
१४) सुंठ - १ कुडी
१५) लाल तिखट - २ लहान चमचे
१६) हळद - १ चमचा
१७) हिंग - १ लहान चमचा

कृती :

क्रमांक १ ते ५ चे साहित्य खमंग भाजून घ्यावे. क्रमांक ६ ते १२ चे साहित्य किंचित भाजून घ्यावे. बाकी साहित्य तसेच घ्यावे.

सर्व साहित्य एकत्र करून दळून आणावे व घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावे.

जवस मिक्स चटणी :

सध्या आहारतज्ज्ञामुळे जवसाला म्हणजेच फ्लाक्स सीड्सना चांगले दिवस आले आहेत. त्यात असणार्‍या ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसीड मुळे अत्यंत पौष्टिक आहेत. घाईच्या वेळेला ही चटणी तुपाबरोबर पोळीला लावून रोल खाणे म्हणजे टेस्ट भी और हेल्थ भी. पोळी लाटल्यावर त्यावर बटर लावून त्यावर ही चटणी भुरभुरायची. रोल करून गुंडाळी करायची. परत लाटायचे. आणी हा चटणी पराठा तव्यावर बटर/तुपावर खरपूस भाजून लग्गेच गट्टम करायचा. नावडत्या भाजीवर ही चटणी भुरभुरायची. सगळी भाजी संपते.

Jawas

साहित्य

१) जवस - १ वाटी
२) शेंगदाणे - पाऊण वाटी
३) डाळे - पाव वाटी
४) तीळ - अर्धा चमचा
५) धने - १ चमचा
६) जिरे - १ चमचा
७) कढीपत्ता - पाव वाटी
८) सुके खोबरे - पाव वाटी
९) लसूण - ४ पाकळ्या
१०) लाल तिखट - २ चमचे
११) आमचूर पावडर - २ चिमूट
१२) मीठ

कृती :

कढईत क्रमांक १ ते ७ च्या वस्तू वेगवेगळ्या कोरड्या भाजून घ्याव्यात. सुक्या खोबऱ्याचे तुकडे बर्नरवर भाजून घ्यावेत.

सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरवर वाटावे चटणी तयार.

अशीच अजून चटणी म्हणजे चटणीपूड/पुडी.

साहित्य :

१) हरभरा डाळ : १ वाटी
२) उडीद डाळ : १ वाटी
३) भाजलेले शेंगदाणे : अर्धी वाटी
४) डाळे : अर्धी वाटी
५) तिळाचे कूट : पाव वाटी
६) सुके खोबरे : अर्धी वाटी
७) कढीलिंब : अर्धी वाटी
८) एक चिंचेचे बुटुक
९) लाल तिखट : २/३ चमचे
१०) हिंग : अर्धा चमचा
११) तेल : २ चमचे
१२) मीठ

कृती :

१ ते ४ क्रमांकाचे साहित्य थोड्याश्या तेलावर खमंग भाजून घ्यावे.
५ ते ८ क्रमांकाचे साहित्य कोरडेच खमंग भाजून घ्यावे.
सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरवर चटणी वाटावी.

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Oct 2015 - 11:19 am | पैसा

तयार मिळालं की २/४ दिवसात फन्ना! जवस चटणी फार करत नाही. आता तुझ्या कृतीने करून बघेन.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 2:08 pm | प्रीत-मोहर

नवरोबाचे आवडते पदार्थ. आता करुन घालावे लागेल

इशा१२३'s picture

16 Oct 2015 - 3:08 pm | इशा१२३

माझेहि आवडते पदार्थ.भाज्यांपेक्षा या तोंडिलावण्यांवर माझे प्रेम अंमळ जास्त आहे.त्यामुळे करुन बघेन.

डांगर हा शब्द वाचुन फसले आधी, आमच्याकडे लाल भोपळ्याला डांगर म्हणतात
तुझ डांगर पाहील तर भलतच पण चविष्ट प्रकरण दिसतय ,जवस चटणी मस्त लागते अगदी कशाशी ही खाउ शकता :)

मेतकूट रेसिपी दिलीस बरं झालं.डांगर नाही खाल्लं कधीच.खाऊन पाहीन आता.

स्रुजा's picture

17 Oct 2015 - 12:51 am | स्रुजा

अगं मेतकुट - भाताची फोडणी रेसिपी काय एक नंबर आहे ! आधी करुन खाल्ली आणि मग प्रतिसाद द्यायला आले, एक से एक पदार्थ निवडले आहेस. फार च छान कल्पना आणि उत्तम लेख. अगदी मनापासुन तों. पा. सु.

मधुरा देशपांडे's picture

17 Oct 2015 - 7:05 pm | मधुरा देशपांडे

मस्त आहेत पाकृ आणि फोटो. जवसाची चटणी विशेष आवडली, नक्की करेन

प्यारे१'s picture

18 Oct 2015 - 2:58 pm | प्यारे१

मस्त आहेत पाकृ आणि फोटो.

याच पठडीतले सांडगे नाहीत काय यात?

सांडगे माझ्या लेखात आहेत काका.

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 11:04 am | वेल्लाभट

सुरेखच

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2015 - 4:22 pm | पिलीयन रायडर

खमंग!

वाह! डांगर फार म्हणजे फारच आवडते तोंडीलावणे आहे. खासकरून हिवाळ्यात जेंव्हा गार कोशिंबिरी खायला नको वाटते तेंव्हा झटपट होणारा प्रकार आहे. मेतकुटाची माझ्याकडील जिनसांचे प्रमाण गडबडले होते. आता तुझ्या दिलेल्या प्रमाणानुसार मेतकूट करून पाहीन. धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

19 Oct 2015 - 8:06 pm | सानिकास्वप्निल

मस्तं मस्तं पाकृ, मला तुझी डांगरची आणि जवसाच्या चटणीची पाकृ आवडली, वेगळी आहे त्यामुळे नक्कीच करुन बघणार :)
फोटो पण छान आहे, खमंग अगदी :)

बिन्नी's picture

20 Oct 2015 - 7:24 am | बिन्नी

जवसची चटणी नवीन्च आहे

भुमी's picture

21 Oct 2015 - 1:12 pm | भुमी

मेतकुट , डांगर आवडती तोंडीलावणी..जवस चटणी खासच दिसतेय..

जवसाची चटणी विशेष आवडली. नक्की करुन बघेल. मला एक ती कारळ्याची चटणी पण खुप आवडते.

स्वाती दिनेश's picture

21 Oct 2015 - 8:29 pm | स्वाती दिनेश

पोह्याच्या डांगराच्या लाट्या तेलात बुडवून खायला आतोनात आवडते. पण भारतवारीशिवाय ते शक्य नाही.. अंमळ हळवी झाले.
सगळीच तोंडीलावणी छानच आहेत.
स्वाती

मितान's picture

24 Oct 2015 - 7:58 pm | मितान

डांगर नक्की करणार!
बाकी आवरता का घेतला लेख ?

चैत्रबन's picture

25 Oct 2015 - 2:01 am | चैत्रबन

जवस चटणी खूप आवडते... नक्की करून बघणार

मेतकूट पाककृती पाहिली आणि हर्षवायू व्हायचा बाकी राहिला होता! बरेच दिवस शोधत होतो ही पाकृ.

फारच छान लेख!

आरोही's picture

25 Oct 2015 - 12:10 pm | आरोही

सगळे पदार्थ आवडले !!

अनन्न्या's picture

26 Oct 2015 - 5:07 pm | अनन्न्या

जवसाची चटणी मात्र नाही केली जात विशेष. अशी तोंडीलावणी असली की जेवण जास्तच जाते! मस्त लेख!

मस्तं खमंग पाककृती. मेतकूट तर खूपच सही आहे.

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:28 pm | कविता१९७८

मस्त प्रकार, आवडले.

उमा @ मिपा's picture

30 Oct 2015 - 11:12 am | उमा @ मिपा

वा राणी, अगदी उपयुक्त रेसिपीज दिल्यास, म्हणजे हे पदार्थ माहिती असतात पण नेमकं प्रमाण कशाचं, किती घ्यायचं ते नीट समजत नसतं म्हणून केलं जात नाही असं होतं बऱ्याचदा. आता हे तू अगदी छान समजावून सांगितल्याने नक्की करणार.