एक डिसेंबर २०१२ ची सकाळ. शनिवारचे दहा वाजलेले. शिकागोमध्ये निलेशने Interstate 94 Eden Expressway वरून Caldwell Ave / West Peterson Avenue चं एक्झिट घेतलं. आता उजवीकडे डीव्हॉन अॅव्हेन्यूवर वळून लिटल इंडियामधल्या नेहेमीच्या भारतीय दुकानात जायचं, हाच विचार डोक्यात. तेवढ्यात शेजारच्या लेनमधून मागून वेगात आलेली एक Audi R-8 Spyder इंडिकेटर न देता त्याच्या पुढे घुसली. केवळ आरश्यात निमिषार्धात दिसलेली वेगवान निळी पट्टी त्याच्या मेंदूने जाणली, म्हणूनच तो वेळेत ब्रेकवर पाय ठेवून त्याची Lexus कंट्रोल करू शकला!
"आवशीचा घो, तुझ्या!", निलेश उद्गारला, "इंडिकेटर दे की च्या मायला!"
कन्व्हर्टिबल R-8 मधला तुळतुळीत टक्कल पडलेला साठीच्या बराच पुढचा ड्रायव्हर मागून दिसला, आणि आणखी एक कुर्रेबाज वळण घेऊन ती गाडी दिसेनाशी झाली. तेवढ्या क्षणार्धात गाडीच्या मागच्या लायसेन्स प्लेटवरचं फ्लॉरिडा ऑरेंजचं चित्र दिसलं निलेशला, 'नो वंडर, फ्लॉरिडा रजिस्ट्रेशन, मायामीची गाडी असेल इतकी मस्तीये अंगात म्हणजे...", निलेशने शेजारी बसलेल्या उमाला म्हंटलं.
थोडं पुढे गेल्यावर त्याच्या स्वभावानुसार चटकन् शांत झालेल्या निलेशने म्हंटलं, "एनि वे, नो पॉईंट इन गेटिंग मॅड अबाऊट इट, घाईत असेल बिचारा. Who knows, a few more years, and I would be in his place...."
उमाने किंचित प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिलं. "अगं म्हणजे Audi Spyder नाही गं, पण टक्कल नक्की!" मग दोघं खळखळून हसले.
आणखी दहाच मिनिटांतच ते त्यांच्या ओळखीच्या दुकानात शिरले, उमाने उद्याच्या संकष्टी चतुर्थीसाठी तिला हवी ती खरेदी केली, आणि दोघे घराकडे परतले. वाटेत रेडिओ एन पी आर वर राजकीय विश्लेषण चालू होतंच. नुकत्याच संपलेल्या अमेरिकेच्या निवडणूकीच्या रणधुमाळीचा धुरळा खाली बसून, आता प्रेसिडेंट काय करतोय, आणि वाट लागलेल्या अर्थव्यवस्थेत कधी जीव भरेल याची चर्चा चालू होती. समांतरपणे, निलेश आणि उमा - तश्या सुस्थितीत असलेल्या आणि सूज्ञपणे बचत सांभाळून असलेल्या इतर अनेक भारतीयांप्रमाणे - आता पैसे सुरक्षित गुंतवायचे असतील तर कुठे गुंतवावेत, याच्या चर्चेत मग्न होते. "मला वाटतं तू म्हणालास तसंच करावं, इथल्या सीडीज मध्ये काही दम नाहीये अजून काही वर्षं तरी. तेंव्हा अप्पांना विचार तू आजच."
घरी पोहोचून लगेचच निलेशने अप्पांना भारतात फोन लावला. परवाच त्याचं धाकटा भाऊ जयेशशी आणि अप्पांशी याविषयी बोलणं झालं होतं. पन्नाशीला टेकलेला निलेश आणि चाळीशी पार केलेला जयेश ही अप्पांची दोन मुलं, निलेश अमेरिकेत बरीच वर्षं स्थिरावलेला तर जयेश नाशिकमध्ये नामांकित आर्किटेक्ट. भारतात काही पैसे पाठवून गुंतवणूक करावी का याची चाचपणी निलेश करीत असतांना जयेशने त्याला सांगितलं होतं, की सोन्यात पैसे गुंतवण्यात आज-काल फायदा वाटत असेल तरी भाव सध्या इतके वर आहेत की गुंतवणू़क बरीच करायला लागेल; FD हा दुसरा पर्याय, पण ५-१० वर्षं तरी लॉक-इन करायला लागतील पैसे. त्या आधी रिटर्न्स हवे असले तर जमिनीत गुंतवायचा विचार करायला हरकत नाही.
"नाशिकच्या आसपास करणार असलास, दादा, तर ओझरच्या दिशेने असलेल्या जमिनींचा विचार कर, परवाच आपले पालक मंत्री येऊन 'वर्षभरात इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल' म्हणून ग्वाही देऊन गेलेत. आता अगदी वर्षात नाही तर ५-एक वर्षात नाशिकला नक्की बिझी एअरपोर्ट असणार आहे कारण अॅग्रिकल्चरल मार्केट आणि इतरही इंडस्ट्री वाढतेय, त्यामुळे त्या भागातल्या जमिनी झपाट्याने एन ए होऊन विकायला काढताहेत लोकं. तिथे प्लॉट पहायचा असेल तर कळव, मी पहातो काय भाव आहेत ते."
"ओके, उमाशी बोलून सांगतो लवकरच तुला", म्हणाला होता निलेश.
आता आज उमाने उचल खाल्ली म्हंटल्यावर त्याने फोन लावला. आधी अप्पांशी पाच मिनिटे त्यांच्या प्रकृतीविषयी बोलून, कॉलेजकन्यका असलेल्या पुतणीशी निलेश थोडा वेळ बोलला. HSC च्या वर्षात असलेली अमृता तिच्या भाराभर कोचिंग क्लासेस मध्ये गुंतलेली असायची, सकाळी सहा वाजता आजोबा तिला स्कूटीवर घेऊन पहिल्या क्लाससाठी बस स्टॉप वर सोडायचे, ती थेट संध्याकाळी सात वाजता घरी यायची, मग मधल्या वेळच्या खाण्याचे, जेवणाचे दोन-तीन डबे घेऊन जाणं ओघानेच आलं. तिने घाई-घाईने काकाला गेल्या आठवड्यातली सगळी कसरत ऐकवली, "आज तरी कुठे शनिवारची सुट्टी आहे, खूप असाईनमेंट्स आहेत रे, पळते मी आता, बाबांशी बोल तू, ते आलेच आहेत.." म्हणाली.
"बोल रे, दादा. बोललास उमावहिनीशी?"
"हो, ती म्हणतेय चांगली आयडिया आहे, तू पाहिलंस, काय रेट आहे ते त्या भागात?"
"हो, वीस-एक लाखाची तयारी असेल तर दोन-तीन चांगले हायवेला लागून प्लॉट्स आहेत अॅव्हेलेबल, पाहीन मी जाऊन आणि डिटेल्स पाठवीन तुला फोटो वगैरेसकट. बुकिंगला २०-२५% लागतील, मग दोन तीन महिने मिळतील हातात. काय करू ते सांग."
"ठीक आहे, मी असं करतो, सध्या दहा हजार डॉलर्स ट्रान्स्फर करतो आजच. आज ५७ चा रेट आहे, म्हणजे त्याचे साडेपाच वगैरे लाख होतील. आम्ही फेब्रुवारीत येतो आहोत, तोपर्यंत इथल्या सीडीज डिझॉल्व करून आणखी तीन ट्रान्सफर्स करू शकेन. मग आपण फायनल डील करून टाकू. चालेल?"
"ओके. पाठव तू, मी सोमवारी बाकी माहिती पाठवेन तुला."
"शुअर, गुडनाईट."
"गुड डे टू यू."
फोन झाल्यावर निलेशने जेवणाची तयारी करणार्या उमाला सांगितलं, "आलोच मी दोन मिनिटांत. ताटं घेईन आलो की". Money-to-India च्या साईटवर जाऊन लॉग-ईन केलं, beneficiary च्या pull-down menu मधून अप्पांचं नाव निवडलं (डॉ. श्रीकांत जोशी), आपला बँक अकाऊंट निवडला, amount मध्ये दहा हजार डॉलर्सचा आकडा टाकला, आणि Send Money Now च्या बटनावर क्लिक केलं. "झालं गं, उमा" म्हणत स्क्रीन वर आलेली रिसीट त्याने encrypted pdf file म्हणून लॅपटॉप वर सेव्ह केली. स्वयंपाकघरात आल्यावर जेवणाची ताटं घेतली, आणि म्हणाला "या, जमिनीच्या पहिल्या हप्त्याच्या मालकीण बाई, चला घ्या वाढायला!"
*************
*************
पाच डिसेंबर, बुधवारची सकाळ. मुंबईत फोर्ट मधील व्हिक्टरी बँकेच्या दुसर्या मजल्यावरच्या NRI Relationship Manager च्या तिच्या केबिनमध्ये स्मिता पेठे २२ इंची स्क्रीन वरून नजर फिरवत सफाईने आजची इनवर्ड ट्रान्सफर्स पहात होती. Money-to-India शी व्हिक्टरी बेंकेचा tie-up असल्याने सर्व ट्रान्सफर्स त्याच कंपनीकडून होती. एकूण ११ ट्रान्सफर्स आलेली तिने पाहिली. रकमांवरून नजर फिरवतांना तिच्या लक्षात आलं की गेल्या दोन-तीन आठवड्यांत एकंदरीतच ट्रान्स्फर्सची संख्याच केवळ वाढली होती असं नव्हे तर रकमांमध्येही लक्षणीय वाढ झाली होती. बर्याचशा ट्रान्सफर्स अमेरिकेतून होत्या, तिथल्या बाजारपेठेतील मंदी हे एक कारण असलं, तरी भारतातल्या अर्थव्यवस्थेत अमेरिका तसंच युरोपातील पाश्चिमात्य देशांच्या मानाने झालेली कमी पडझड हेही कारणीभूत असावं. शहरातल्या दुसर्या एका प्रसिद्ध खाजगी बॅंकेत काम करणार्या नरेंद्रनेही स्मिताला त्यांच्याकडचा अनुभव सांगितला तोही फार वेगळा नव्हता. खरंतर इथेही तशी काही कमी लाथाळी चालू नव्हती; रोजचे पेपरात येणारे कोट्यावधींचे स्कॅम्सचे आकडे, मध्यावधी निवडणुकांचे पडघम आणि एकंदरीतच लोकांमधली सामाजिक अस्वस्थता, या सर्वाने बाजारपेठ अस्थिर असू शकणं अशक्य नव्हतं, पण तरीही ती तितकी अस्थिर somehow नव्हती. आणि बाहेर पैसे जेमतेम एक-दीड टक्क्याने अडकवून ठेवण्यापेक्षा भारतातील अर्थसंस्थांवर विश्वास ठेवणं किंवा इथे गुंतवणूक करणं परदेशस्थ भारतीयांना जास्त भावत असावं असं दिसत होतं.
स्मिताने आजच्या दिवसाचे देशांतर्गत आऊटवर्ड ट्रान्स्फर्स किती आहेत ते पाहिलं, चार लोकल खातेदार होते, म्हणजे त्यांचे पैसे इथेच अकाऊंटमध्ये राहणार होते, पैकी तिघांच्या रकमा त्या मानाने किरकोळ होत्या. बाकीचे ६ बाहेरगावी जायचे होते, पण EFT असल्याने ते आज संध्याकाळपर्यंत त्या त्या बँकांच्या खात्यात क्रेडिट व्हायला हवे होते. शिवाय त्या त्या beneficiaries ना अॅलर्टिंग इ-मेल्स पाठवणंही गरजेचं होतं. तिने घड्याळात पाहिलं, अकरा वाजत आले होते. बारा वाजता नरेंद्र यायचा होता, आज त्यांना नायर साहेबांना भेटायचं होतं साडेबाराच्या लंच ब्रेकच्या आत, आणि मग त्या दोघांचं समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणं, एकच्या आत परत येणं आणि मग उरलेल्या अडीच तासांत आजची Priority NRI Depositors ची fixed deposits ची सगळी कामं उरकणं, या सगळ्याचं गणित बसवायचं म्हणजे ती आऊटवर्ड ट्रान्स्फर्स आता सकाळीच संपवायला पाहिजेत याची तिला जाणीव झाली. तिने इंटरकॉमवरून खाली संकेतला फोन केला आणि शेजवळांना वरती पाठवून द्यायला सांगितलं. पाचच मिनिटांत बँकेच्या आतल्या जिन्याने शेजवळ थांबत थांबत वरती येतांना दिसले. 'आर्थ्रायटीसने थकलेत बिचारे,' स्मिताला दिवसातून दुसर्यांदा जाणीव झाली, 'नको वाटतं कामं सांगायला म्हातार्याला!'.
"बोला पेठेबाई, काय करू?"
"बसा जरा दोन मिनिटं, मी हा प्रिंट आऊट काढते आणि नोटेशन्स करते त्यावर, तो तेवढा घेऊन जा खाली, कॉपीयर वर २ कॉपीज काढा, एक संकेतकडे द्या, एक नायरसाहेबांना द्या आणि ओरिजिनल मला आणून द्या. सावकाश आणलीत तरी चालेल. नाहीतर असं करा, खाली संकेतकडेच ठेवा, मी लंचहून येतांना घेऊन येईन वर."
"बरं, तसं करतो" म्हणत शेजवळ खुर्चीत बसले. स्मिताने ट्रान्सफर्सच्या पेज चा प्रिंट आऊट काढला, त्यावर मार्जिनमध्ये मार्किंग्ज केले आणि खाली सही केली.
पासष्टीच्या पुढे गेलेले शेजवळ प्रायव्हेट बँक आहे म्हणून goodwill वर नोकरी टिकवून राहिले होते, पण दिवसाकाठी वाढत जाणार्या आर्थ्रायटीसने आता आणखी वर्षभरही काम करणं कठीण दिसत होतं.
"आज डब्यात काय आहे, शेजवळ?"
"आज डबा नाहीये, अमित यायचा होता नायरसाहेबांना भेटायला, तो थांबलाय खाली, आता साहेबांना भेटून झालं की मग जाऊ दोघं समोर इडली-वडा खायला गाडीवर."
अमित त्यांचा दोन मुलींपाठचा विशीतला मुलगा. कसाबसा डिप्लोमा पास झाला होता, आता आपल्या रिटायरमेंटच्या आत कुठे चिकटवता येईल हे पहाण्यासाठी म्हातार्याची धडपड चालली होती.
"साहेब काही करतील असं वाटतं का?"
"बघू काय जमतंय ते, नाही तर आहेच तो आणि त्याचं नशीब!"
"हे घ्या, आणि सावकाश उतरा जिन्यावरनं, नाहीतर पाय घसरायचा शनिवारसारखा, नशीब म्हणून संकेत होता मागे."
"हो, सावकाशच जाणार आहे, द्या इकडे. बाकी तुम्ही कधी बार उडवताय?"
"अहो कसला बार शेजवळ? आधी जागेचं पहायचंय, आज भेटणार आहोत नायर साहेबांना लोनसाठी, जागा असेल तर पुढच्या गोष्टी, खरं की नाही?"
"होईल, होईल, सर्व व्यवस्थित वेळेत होईल."
"तुमच्या तोंडात साखर पडो" गोड हसत स्मिता म्हणाली.
****************
आजाराने पिच्छा पुरवलेला, अजून दोन लग्नाच्या मुली आणि नोकरीच्या शोधात असलेलं अल्पशिक्षित शेंडेफळ, हे सारं डोळ्यासमोर असूनही हा माणूस कसा धीराने राहतो याचं स्मिताला कौतुक वाटायचं. थोडासा दिलासाही मिळायचा, आपलंही काम होईल या आशेने. तिचं आणि नरेंद्रचं लग्न जागा मिळण्यावाचून अडलेलं होतं. दोघेही मुंबईबाहेरून नोकरीसाठी आलेले आणि इतर दोन-दोन रूममेट्स बरोबर पार्ट-रेंटर म्हणून वेगवेगळ्या उपनगरांत राहायचे. पण आता नोकर्या मुंबईतच टिकवायच्या आणि लग्न करून एकत्र रहायचं तर अवाच्या-सव्वा पैसे भाड्यात घालवणं हा मार्ग दोघांनाही मान्य नव्हता, तेंव्हा मुंबईलाच कर्मभूमी करायची तर घर शोधणं ओघानंच आलं. 'घर शोधणं' या प्रक्रियेत दोन महिने घालवून त्यांना अखेर हवी तशी जागा एका दादर जवळच्या नव्या इमारतीत मिळाली, पण त्या फ्लॅटची अफाट किंमत त्यांच्या आवाक्याबाहेर होती. त्या दोघांच्या बचतीबाहेर जाऊन अधिक साठ-सत्तर लाख एका महिन्यात उभे करणं म्हणजे अनपेक्षित challenge ठरत होता. गृहकर्जासाठी नरेंद्रने इतर संस्थांप्रमाणेच त्याच्या बँकेतही विचारणा केली होती, पण जेमतेम वर्षाचाच नोकरीचा इतिहास हेच कारण सगळीकडे आडवं येत होतं. आज ते दोघे स्मिताच्या बँकेत नायरसाहेबांना भेटून पहाणार होते.
*******
शेजवळ जिन्याच्या कठड्याला धरून धरून खाली उतरले. निळी जीन्स आणि पांढरा टी शर्ट घातलेला आणि हातात त्याच्या कागदपत्रांचं एक फोल्डर घेतलेला अमित दाराच्या बाजूच्या भिंतीला टेकून उभा असलेला त्यांनी पाहिला, आणि त्याला हात करून बोलावलं, "हा प्रिंट-आऊट घे आणि त्या संकेतसरांच्या टेबलच्या बाजूचं झेरॉक्स मशिन माहितेय ना तुला, तिथे दोन कॉप्या काढ. तोवर मी नायरसाहेब आहेत का बघून येतो. जरा व्यवस्थित ठेव कागद, डाग नको पाडू."
अमितने पुढे होऊन प्रिंट-आऊट हातात घेतला आणि शेजवळ वळून खालच्या मजल्याच्या टोकाला असलेल्या नायरसाहेबांच्या ऑफीसकडे गेले. साहेबांच्या रुमच्या काचेतून मान वर करून पाहिलं तर आत कुणीतरी कस्टमर खुर्चीवरून ऊठण्याच्या बेतात असलेला दिसला त्यांना, म्हणून ते परत फिरले. तोवर अमितचं कॉपी काढणं झालेलं होतं. शेजवळांना पाहिल्यावर त्याने फोल्डर उघडून आतले कागद बाहेर काढले आणि शेजवळांना दिले.
त्यांनी कागद हातात घेतले आणि मोजले. "अरे काय रे हे? दोन म्हंटलं मी तुला, तीन कॉप्या केल्या तू..."
"अहो ते प्लसचं बटन चुकून तीनदा दाबलं गेलं, र्हाऊ द्या आता," अमित म्हणाला.
"अरे राहू दे काय, ती पेठे बाई कावेल आता माझ्यावर. असं कर, मी ही एक कॉपी नायर साहेबांना देउन येतो, दुसरी त्या संकेत साहेबांना नेऊन दे आणि तिथेच बाजूला ते श्रेडर मशिन आहे नं, तिथे या जास्तीच्या कॉपीचे तुकडे करून टाक. अन् तिकडेच ये साहेबांकडे, पुन्हा ते जेवायला हलले की भेटणं र्हायचं."
"आपल्याला लवकर निघता येईल ना? ते पक्या अन् बाकीचे दोघं थांबणारेत अहमदाबादला जायला, दीडच्या कर्णावतीनं चाललोय..."
"अरे जाशील की, आता हे महत्त्वाचं काम बघ आधी!" थोडंसं त्राग्याने शेजवळ मुलाला म्हणाले, "भटकणं तर नेहेमीचंच आहे. आणि आताशी बारा वाजतायेत, दीड वाजायला बराच वेळ आहे."
"आहे हो, पण बाँबे सेंट्रलला पोचायचंय ना."
"जाशील, ते दे तेवढं अन् मग जाऊ साहेबांकडे."
**************
नरेंद्र आलाच पंधरा मिनिटांत, त्याचा SMS आल्याने तयारीत असलेली स्मिता त्याला खालीच भेटली आणि उत्साहाने दोघे नायर साहेबांच्या केबिनकडे गेले. आतून शेजवळ आणि अमित बाहेर येतांना दिसले. अमितच्या चेहेर्यावरून काही अंदाज येत नसला तरी शेजवळांचा चेहेरा पडलेला वाटला स्मिताला, पण उशीर व्हायला नको म्हणून तिने काही विचारलं नाही आणि 'May we come in, Sir?' विचारत दोघे केबिनमध्ये शिरले.
नायर साहेबांनी उठून नरेंद्रशी हात मिळवला. बँकेतल्या शेजवळ वगैरे लोकांशी खास मल्याळी हिंदीत कसेबसे बोलणारे नायर स्मिता आणि नरेंद्रशी इंग्लिश मध्येच बोलायचे. "Have a seat, tell me what is this about" ते म्हणाले.
पुढची दहा-पंधरा मिनिटं जागेची माहिती देण्यात आणि दोघांच्या पगाराची माहिती देण्यात गेली.
हळूहळू नायर साहेबांचा चेहेरा अगतिक होत गेला, म्हणाले, "I perfectly understand your predicament, I clearly see your need to find a place quickly so you can get married. But believe me, even if I tried, I cannot justify the amount you are asking; there is just no way to furnish that loan with your limited service history." दोघांचे चेहेरे पडलेले पाहून ते पुढे म्हणाले, "Why don't you wait for some time? Get married and find some other living arrangement temporarily, and then come back for a loan after say six months or so, maybe I can help then?"
"We will see, Sir, thanks for your help," म्हणत दोघे उठले. बाहेर येऊन जेवणासाठी कुठे जायचा मूडच गेला दोघांचा. बाजूच्या स्नॅक सेंटर वरून काहीतरी थातूरमातूर घेऊन दोघे आपापल्या ऑफिसात पोहोचले.
************
पाच डिसेंबरची संध्याकाळ. पंचवटी एक्स्प्रेसने तो नाशिकरोड स्टेशन वर उतरला, रात्रीचे अकरा वाजून गेले होते. स्टेशनसमोरच्याच हॉटेलात जेवून घेतांना त्याने आजूबाजूच्या लॉजिंग-बोर्डींगच्या पाट्यांवर नजर फिरवली आणि एक जागा निवडली. बिल देऊन बाहेर पडला आणि त्या ठिकाणी जाऊन रात्रीसाठी रुम रेट विचारला. कॅश पैसे काऊंटर वर टाकून किल्ली हातात घेतली आणि अर्ध्या तासात परत येतो म्हणून सांगितलं.
बाहेर येऊन हात दाखवून रिक्षा थांबवली. खिशातून कागद काढून पत्ता बघितला आणि रिक्षावाल्याला विचारलं "शिखरेवाडी, किती घेणार?"
"एकट्यानंच जायचं असंल तर पन्नास रुपये. शेअर रिक्षा करायची असंल तर पंचवीस."
"शेअर नाही. पाच मिनिटं थांबून परत स्टेशनवर यायचंय, पंच्यात्तर देईन."
"बसा."
मुंबईच्या मानाने थंडी चांगलीच होती. रिक्षात कोपर्यात बसल्या-बसल्या त्याचं विचारचक्र चालू होतं. इन्फॉर्मेशन खात्रीची होती पण काम झालं तर पुढचं खरं.
"शिखरेवाडीला कुठं?"
"MSEB ऑफीसच्या समोर," कागदावरचा पत्ता बघत त्याने उत्तर दिलं. पाच मिनिटांनी रिक्षा थांबली. उतरून तो पश्चिमेला चालत गेला. लोक बाहेरून घरी येण्याची आणि जेवणाची वेळ केंव्हाच उलटून गेली असल्याने आसपास जवळजवळ सगळीकडे अंधार आणि शांतता होती. अपेक्षित बंगला त्याला डावीकडे सापडला. मान न वळवता पाटीवरचं नाव पाहून घेत तो तसाच पाच-दहा पावलं पुढे गेला. बाहेर कुठल्याश्या मोबाईल कंपनीची पाटी मिरवणारं एक बंद किराणा दुकान दिसलं. तिथवर जाऊन तो थांबला. रिक्षावाला आरश्यातून आपल्याकडे पहातोय याची त्याला जाणीव झाली. दुकानाकडे पहात असल्यासारखं दाखवत त्याने मोबाईल काढला, काही नंबर दाबले आणि हळू आवाजात मिनिटभर बोलला. मग मोबाईल खिशात टाकून रिक्षात परतून त्याला स्टेशनवर घ्यायला सांगितलं.
"बंद झालंय दुकान, उद्याला परत यावं लागेल भेटायला."
"येव्ढ्या उशीरा कसं भेटंल खुल्लं तुम्हाला, थांबनार म्हनून सांगुन गेल्येवते काय त्ये?"
"हो ना, म्हणून तर आलो आता. जाऊ दे, उद्या भेटू म्हणा. चल."
**************
**************
डिसेंबर ६.
सकाळी साडेपाचलाच उठून तो आवरून लवकर खाली आला आणि सरळ शिखरेवाडीला रिक्षाने पोहोचला. यावेळी त्याने रिक्षा बरीच बाहेर मेन रोडवर सोडली, आणि पायी चालत शिखरेवाडीत आला. सायकली आणि मोटरसायकली काढून नोट प्रेसला जाणारे कर्मचारी, सकाळची शाळा गाठायला बाहेर पडलेले विद्यार्थी इत्यादि गर्दीची लगबग हळूहळू सुरू झाली होती.
तो रमतगमत काल पाहिलेल्या दुकानापाशी आला, दुकान नुकतंच उघडलं होतं. सकाळी सकाळी भवानीला नुसता प्रश्न नको म्हणून त्याने एक सर्फ साबणाचा पाऊच आणि दोन काड्यापेट्या मागितल्या. पैसे देता देता खिशातला कागद काढून त्यावरचं नाव वाचून दुकानदाराला विचारलं, "डॉक्टर श्रीकांत जोशी कुठे राहतात हो?"
"तो काय तो पलिकडचा बंगला समोरच्या बाजूला."
मान वळवत त्याने दुकानदाराच्या हाताच्या दिशेने बघितलं, "तो का? बरं. थोड्या वेळाने जातो, एवढ्या सकाळी नको डिस्टर्ब करायला डॉक्टरांना."
"अहो, डिश्टर्ब कुठलं करताय? डॉक्टर पडले की बाहेर मघाशीच नातीला घेऊन. बरोब्बर सहाला निघतात, तिला सोडतात मेनरोडच्या बसस्टॉपवर आणि येतात. आता दहा मिनिटांत येतील. थांबा थोडं. होईल भेट आले की."
"असं म्हणता? मी येतोच दहा-पंधरा मिनिटांत, थोडा कोपर्यावर चहा घेऊन येतो तोपर्यंत."
लगबगीने तो मेनरोडच्या दिशेने निघाला. नाशिककडे जाण्याच्या बस स्टॉपच्या दिशेने जाताजाता त्याला सत्तरीच्या आसपासचे डॉक्टर नातीबरोबर दिसले. थोड्या अंतरावर जाऊन रस्ता क्रॉस करून विरुद्ध दिशेच्या बस स्टॉपवर तो थांबला. डॉक्टरांची स्कूटी एका बाजूला लावलेली, आणि पंधरा-एक वर्षांची अप्रतिम सुंदर दिसणारी नाजूक नात स्कार्फ गुंडाळत उभी होती. तिचं बॅकपॅक आजोबांच्या हातात होतं. लांबून बस येतांना दिसली तशी तिने आजोबांकडून घाईघाईने बॅकपॅक घेतलं आणि पुढे झाली. बस थांबली तशी ती बसमध्ये चढली आणि बस चालू झाली.
ती निघता निघता त्याला आजोबांचे शब्द ऐकू आले, "अमृता, पास रिन्यू करायचाय, विसरू नकोSS." बस गेल्यावर डॉक्टर स्कूटीकडे वळले आणि ती चालू करून घराकडे वळले. ते दिसेनासे झाल्यावर त्याने डावीकडे नजर टाकली, नाशिकरोडकडे जाणारी बस येत होती. त्याने हात केला आणि बस थांबल्यावर स्टेशनचं तिकिट मागितलं.
***************
संध्याकाळी साडेसात वाजता डॉक्टर फिरून परत येतांना त्यांचा गळ्यातल्या लॅन्यार्डला अडकवलेला मोबाईल वाजला, रस्त्याच्या कडेला होऊन त्यांनी स्क्रीनकडे पाहिलं, नंबर ओळखीचा नव्हता. त्यांनी खिशातून चष्मा काढला आणि पुन्हा नंबर पाहिला, मोबाईल नंबर नव्हता, लोकल कॉल होता. त्यांनी बटन दाबून कॉल रिसीव्ह केला.
"हॅलो, डॉक्टर जोशी?"
"कोण बोलतंय?"
"नाव महत्वाचं नाही, निरोप महत्वाचा आहे, फक्त ऐका. तुमची नात अमृता सुंदर आहे, तिने नेहेमीच सुरक्षित घरी यावं असं वाटत असेल तर मी सांगतोय ते लक्ष देऊन ऐका."
डॉक्टरांना एकदम चक्कर येते आहे असं वाटलं. त्यांनी बाजूच्या खांबाचा आधार घेतला आणि म्हणाले, "कोण तुम्ही, काय हवंय तुम्हाला?"
"तेच सांगतोय, पुन्हा मध्ये बोलू नका. पोलिसांना कळवायची तसदी घेऊ नका. मी पब्लिक फोन वरून बोलतोय, तेंव्हा कॉलही ट्रेस करायची गरज नाही. लक्षात आलं? पुढचं सांगू?"
"....."
"तुम्हाला आज इ-मेल आली आहे, तुमच्या खात्यात शनिवारी अमेरिकेतून आलेले पैसे जमा होतील. अमृता नीट रहावी असं वाटत असेल तर ते पैसे तुमचे नाहीत असं समजा. ती सर्व रक्कम रविवारी रात्री आम्हाला मिळाली पाहिजे. हजाराच्या नोटांमध्ये बँकेतून काढून एका ब्राऊन पेपरच्या एन्व्हलपमध्ये ठेवा. ते कुठे पोचवायचे ते तुम्हाला शनिवारी रात्री ९ वाजता कळेल. ठीकाय?"
"अहो ते पैसे माझे नाहीत हो!" हादरलेले डॉक्टर कळवळून म्हणाले, "ते माझ्या अमेरिकेतल्या मुलाचे आहेत, त्याला मी काय-"
"सांगितलं ना? ते आमचे आहेत, आम्हाला हवे आहेत. आणि अमेरिकेतल्या मुलाचा विचार करू नका, तो कमवेल आणखी तिकडे, तुम्ही इथल्या नातीचा विचार करा! मी फोन ठेवतो आहे, पुन्हा सांगतो, आमचं तुमच्यावर लक्ष आहे, पोलिसांनाच नाही तर इतरही कुणालाच कळवू नका, नाहीतर नात हाती लागणार नाही!" फोन बंद झाला.
डॉक्टर लटपटत्या पायांनी अंधारून आलेल्या संध्याकाळी घराकडे चालत गेले आणि दार उघडताच खुर्चीत जवळजवळ कोसळलेच. आवाज ऐकून बाहेर आलेल्या धाकट्या मुलाकडे त्यांनी पाणी मागितलं. तेवढ्यात स्वयंपाकघरातून त्यांची धाकटी सूनही बाहेर आली. मुलाने आणलेलं पाणी घोटभर प्याल्यावरही त्यांना बोलण्याचं सुचेना. "काय होतंय अप्पा? छातीत दुखतंय का? गोळ्या विसरलात का?" मुलाने विचारलं.
त्यांनी खूणेने नाही म्हणून सांगितलं. "आधी अमुला फोन कर, ताबडतोब!"
आता सून घाबरली, "काय झालं?" म्हणाली.
"फोन कर म्हणतोय ना?" कधी न ओरडणार्या सासर्यांनी असा आवाज वाढवल्यावर तिने लगेच मोबाईल उचलून मुलीला फोन लावला, "हॅलो, अमृता?.."
"कुठे आहे विचार तिला? आणि तिथेच थांब म्हणावं!"
"कुठे आहेस पिल्लू?"
....
"बरं, शिल्पाकडे का? मग इथेच आहेस. काही नाही...किती वेळ आहे?...बरं बरं." तिने प्रश्नार्थक नजरेने सासर्याकडे पाहिलं.
डॉक्टरांनी जयेशकडे पाहिलं, "जा आणि तिला घेऊन ये."
"काही नाही तिथेच थांब बेटा, बाबा येतायत तुला न्यायला. काही नाही, सहजच. OK?"
हळूहळू, पुढच्या दहा मिनिटांत त्यांनी मुलाला आणि सुनेला फोनकॉलविषयी सांगितलं. मुलगा आणि सून यांचं धाबं दणाणलं.
"सध्या काहीच करू नका, आधी लेकराला घेऊन या, मी थांबतो घरी, दोघंही जा", म्हणत डॉक्टरांनी दोघांनाही गाडी काढून जायला लावलं.
************
जेवणं झाली आणि अमृता झोपी गेली. डॉक्टरांनी मुलाशी आणि सुनेशी हळू आवाजात चर्चा केली.
"तुम्ही पाहिलं का इ-मेल आलेली?" जयेशने विचारलं.
"अरे नाही पाहिली, पण आली असणार, five working days मध्ये येतात म्हणजे शनिवारी येणार आहेत हे अपेक्षित होतंच, म्हणून उद्या-परवा बघेन म्हंटलं. त्या लोकांना कसं कळलं या ट्रान्सफरचं? तरी मी नेहेमी म्हणतो तुम्हा लोकांना हे ऑनलाईन व्यवहार रिस्की असतात, जपून रहात जा, कोण आपली माहिती ट्रॅक करतंय कुणाला माहिती?"
सुनेने निक्षून सांगितलं की पोलिसांना मुळीच कळवायचं नाही आणि मुलीचा जीव धोक्यात घालायचा नाही. डॉक्टरांनीही त्याला दुजोरा दिला.
जयेश म्हणाला, "पण दादाला तर कळवायलाच हवं, साडेपाच लाख म्हणजे काही थोडी-थोडकी रक्कम नाही."
"कळवू ना," डॉक्टर म्हणाले, "पण त्यालाही स्पष्ट सांग की हे कोण गुंड आहेत कल्पना नाही, विषाची परीक्षा नको, राहता राहिला त्याच्या पैशाचा प्रश्न, माझ्या FD मधले आहेत ते देईन मी तुला, जमिनीचं काम अडणार नाही दादाचं."
जयेशने निलेशला फोन लावला. त्याच्याकडे सकाळचे साडेआठ वाजले होत, तो कामावर निघायच्या तयारीत पण उमाबरोबर घरीच होता. जयेशने त्याला स्पीकरफोनवर बोलायला सांगितलं.
थोडक्यात त्याने दोघांना अप्पांना आलेल्या फोनबद्दल सांगितलं. हबकलेल्या उमाने जावेला सांगितलं, "पैसे मरू देत, आणि अमृताला पाठवूच नका तुम्ही कुठे आठवडाभर!"
"अगं कसं शक्य आहे ते? तिचे क्लासेस बुडवणं कठीण आहे या वर्षी आणि तिला काय सांगणार?" शेवटी नाशिकला पोलिसांत रिपोर्ट करायचा नाही यावर त्यांचं एकमत झालं.
"एक करू शकतोस तू, डॉक्टर निलेशला म्हणाले, "तुझ्या त्या राजूचे वडील ACP होते ना मुंबईला, त्यांच्याशी बोलून बघ काही मदत करू शकतील का, पण जे काय करायचं ते पैसे दिल्यावरच करा. मी जयेशला म्हंटलंय की सध्या जमिनीचा व्यवहार करायचाच असेल तर मी देईन पैसे."
"अप्पा, जमिनीचं काही अडलेलं नाहीये, आधी हे अमुवरचं संकट टळू देत. मी करतो राजूला फोन आणि बघतो नाना काय म्हणतात ते."
************
***********
निलेशने मुंबईच्या त्याच्या डॉ. राजीव माने या मित्राला फोन लावला. राजूचे वडील मुंबईत ACP म्हणून दहा-एक वर्षांपूर्वी निवृत्त झाले. एक अत्यंत कर्तबगार, न वाकणारा पोलिस आधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलं होतं. भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या खात्यात 'खाणार नाही-खाऊ देणार नाही' अशा निर्धाराने वागणार्या त्यांना तीस वर्षांत वीस ठिकाणी बदल्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक अवघड गुन्ह्यांचा वेध घेतला होता. अखेरचं पोस्टिंग होतं ते मुंबई विमानतळावर. तिथला भ्रष्टाचार निपटून काढायचा खूप प्रयत्न केला होता त्यांनी वर्षभरात, पण अगदी सहन होईना तेंव्हा आपणही व्यवस्थेला बळी पडण्यापेक्षा मुदतपूर्ण सेवानिवृत्ती घेणं त्यांनी पत्करलं होतं. तीन वर्षांपूर्वी राजूच्या आई ब्रेस्ट कॅन्सरने निवर्तल्यानंतर त्यांनी स्वतःला थोडंसं समाजसेवेत पण बरचसं लिखाणात गुंतवून घेतलं होतं. त्यांनी लिहिलेली दोन पुस्तकं प्रसिद्ध झाली होती आणि बर्यापैकी वाचलीही गेली होती, एक गुन्हेगारांचं मानसशास्त्र या विषयावर तर दुसरं त्यांच्या कारकीर्दीतल्या गाजलेल्या गुन्हेगारी घटनांविषयी.
"राजू, निलेश बोलतोय, फार उशीर झालाय का?"
"नाही रे, आताच जेवणं आटपून टीव्ही वर बातम्या लावत होतो, काय विशेष?"
"अरे जरा महत्त्वाचं बोलायचं होतं, जरा नानांचा अॅडव्हाईस हवा होता, झोपले असतील तर राहू देत."
"अरे नाही, जागे आहेत, हे इथेच टीव्ही समोर आहेत. पण तू काय क्रिमिनल लफडं केलंयस का नानांचा अॅडव्हाईस मागतोयेस तो?"
"नाही रे जरा प्रॉब्लेम झालाय नाशिकला घरी, तू स्पीकरवर टाक फोन म्हणजे दोघांशी एकदम बोलेन."
नानांना बोलावून राजूने कॉल स्पीकरफोनवर टाकला. निलेशने त्याला कळलेली घटना जशीच्या तशी सांगितली. आणि पैसे देण्याचा पण नाशिकला पोलिसात तक्रार न करण्याचा कुटुंबाचा निर्णय सांगितला. "फक्त नाना, तुम्ही तुमच्या ओळखीने नंतर काही पाठपुरावा करू शकाल का हे विचारायचं होतं. निदान माहिती leak कुठून झाली हे कळलं तरी मला पुरेसं आहे."
"मुंबईतली receiving बँक कुठे आहे म्हणालास, फोर्ट मध्ये?"
"हो."
नाना दोन क्षण शांत राहिले. "बघतो मी उद्या सकाळी काय करता येईल ते. तिथले माझ्या ओळखीचे एक बावधनकर म्हणून ACP आहेत, आधी माझ्याकडे PI म्हणून होते, हुषार माणूस आहे. त्याला विचारतो. नुसतं माहिती कुठून leak झाली हे कळून उपयोग नाही, पैसे नंतर कुठे जातात ते ट्रेस करणंही अवघड नाही जर वेळेत हालचाल करता आली तर. आता वडील झोपले असतील का?"
"नाही, अप्पा जागे होते आम्ही दहाच मिनिटांपूर्वी बोललो तेंव्हा. काही विचारू का त्यांना?"
"मीच विचारेन फोन करून, राजू, तुझ्याकडे फोन नंबर आहे का त्यांचा? आहे ना, मग लाव त्यांना फोन हा झाला की. निलेश तू लाग तुझ्या कामाला, मी बघतो काय करता येईल ते."
डॉक्टरांना फोन लागल्यावर नाना म्हणाले. "पहिली गोष्ट, लोकल पोलिसांना सध्या कळवत नाही आहात ते एका दृष्टीने बरंच आहे. फक्त मला थोडी माहिती द्या. तुम्ही नाशिकमध्ये बरीच वर्षं प्रॅक्टिस केलीत ना? मग तुमच्याशी बोलणारा माणूस नाशिकचा होता असं वाटलं का त्याच्या भाषेवरून?"
थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले, "नाही, भाषा पुण्याची वगैरे वाटली, कदाचित मुंबईची, नाशिकची नक्की नाही."
"इ-मेल वाचलीत बँकेची?"
"हो, आताच पाहिली, काल दुपारी बाराला आलेली आहे."
"निलेशने पैसे एक तारखेला पाठवले असं म्हणाला मला. तो माणूस तुम्हाला पैसे बॅंकेत शनिवारी येणार आहेत म्हणाला, जर मुंबईच्या बँकेत ते काल आले असतील आणि तो तुम्हाला आज संध्याकाळी फोन करून बोलला असेल तर शक्यता आहे की तो नाशिकमध्ये काल संध्याकाळी आला. त्याने तुम्हाला आणि अमृताला एकत्र काल संध्याकाळी किंवा आज कधी पाहिलं असेल?"
थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले, "आज सकाळीच शक्य आहे, पण सहा वाजता, इतक्या सकाळी कोण पहाणार आम्हाला?"
"असू देत, I was just trying to narrow down the time frame of possibilities of your encounter. तुम्ही शांत झोपा आता. आणि त्या माणसाचा फोन आला की लगेच मला कळवा काय सूचना आहेत त्या, ठीक आहे?"
************
७ डिसेंबर, शुक्रवार.
नाना सवयीने सकाळी सात वाजता सर्व आवरून तयार होते, पण ठाण्यातून वीक डे ची मुंबईकडे जाणारी सकाळच्या लोकलची मरणगर्दी लक्षात घेऊन त्यांनी दहाच्या पुढे बाहेर पडायचं ठरवलं. मधल्या वेळात डायरी काढून साडेसातच्या सुमारास बावधनकरांना फोन केला. मोबाईल उचलला गेला नाही म्हणून आठ वाजता त्यांच्या ऑफीस मध्ये फोन केला.
"बावधनकर आहेत का? त्यांना म्हणावं मी नाना माने बोलतोय."
"काय काम आहे? साहेब आता अॅव्हेलेबल नाहीयेत," गेल्या दहा वर्षांनंतरच्या भरतीचा कुणी PSI वगैरे असावा, नाना माने या नावावरून त्याला काही बोध होणं शक्य नव्हतं. आणि साहेबांना आलेला फोन त्यांना डायरेक्ट न देणं ही पोलीस खात्याची खासियत नानांना चांगलीच माहीत होती.
"ठीक आहे, त्यांना म्हणावं माने सरांचा फोन होता, वेळ मिळाला की फोन करा म्हणावं." 'माने सर' ऐकल्यावर हा फोन साहेबांना दिलेला बरा असं बहुधा वाटलं असावं म्हणून पलिकडच्या व्यक्तीने म्हंटलं, "थांबा, पहातो मोकळे झाले का ते."
थोड्या शांततेनंतर एक्सायटेड बावधनकर फोनवर आले, "नमस्कार सर! आज बर्याच दिवसांनी फोन? कसे आहात सर?"
नानांनी त्यांना सांगितलं एका परिचिताची economic offense ची केस आहे.
"बहुधा EOW-II केस असणार आहे, तुम्ही South Division ला आहात ना, युनिट 1?" सर्वच ज्यूनिअर्सशी कायमच 'अहो-जाहो' च्या भाषेत बोलणारे नाना बदलले नाहीत, हे बावधनकरांच्या लक्षात आलं.
"हो सर."
"ठीक आहे, मी येतो अकरापर्यंत भेटायला, असाल ना?"
"नक्की सर, थांबतो मी इथेच, तोपर्यंत काही माहिती काढून ठेवू का?"
नानांनी त्यांना बँकेचं नाव सांगितलं, 'आपल्याला तिकडे जावं लागेल बहुतेक' म्हणाले. 'बाकी आता फोन वर बोलत नाही फक्त extortion ची केस आहे आणि आपल्याला नाशिक मध्ये माग काढायला लागेल एवढं सध्या लक्षात ठेवा."
"सर, .....नाशिक म्हणजे jurisdiction वेगळं पडेल ना सर, तिथे कुणाला involve करू का?"
"नको, केस मूळ मुंबईतच सुरू होतेय, तपासासाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता, you will be well within your rights, don't worry, सध्या कुणाला सांगू नका. मग लागेल तशी मदत मागा."
अकरा वाजता नाना फोर्टमधल्या, पाटीवर 'EOW-II (Banking and Medical - Unit 1)' असं लिहिलेल्या ऑफिसात पोहोचले. बावधनकर थांबलेच होते. त्यांच्या केबिनमध्ये त्यांचे बॉस, डिचोलकर, Additional CP, येऊन थांबले होते, नानांना भेटायला. ही सगळी मंडळी नानांच्या हाताखालून गेलेली, त्यांच्या नजरेतला आणि वागण्या-बोलण्यातला आदर इतर कर्मचार्यांच्याही लक्षात आलाच, त्यामुळे रूमच्या बाहेर पाळीपाळीने लोक येऊन, पाहून आणि नानांशी नजरानजर झालीच तर सॅल्यूट ठोकून जात होती. डिचोलकर म्हणाले "बावधनकर करतीलच काम सर, पण काही लागलं तर जरूर सांगा मला."
ते गेल्यावर नानांनी आपल्याला ज्ञात असलेले सर्व डिटेल्स बावधनकरांना सांगितले. "आधी बँकेत जाऊया, मग पुढचा अॅक्शन प्लॅन ठरवू, शनिवारी-रविवारी काही काम नाही ना घरी वगैरे? आपल्याला नाशिकच्या प्रवासाची तयारी ठेवायला लागेल."
"आपल्याला? तुम्ही येणार सर?" आश्चर्याने बावधनकर म्हणाले.
हसत नाना म्हणाले, "अहोSS, खूप वर्षांनी कसल्यातरी वासावर जायला मिळतंय, ते सुख मिळू द्या जरा!"
"जरूर सर, ड्रायव्हर आणि जीप तयार ठेवतो. चला, निघू या आपण."
********
बँकेत शिरण्याआधी बावधनकर नानांना म्हणाले, "सर, introduction करून दिल्यावर मी तुम्हालाच लीड घेऊन बोलू देणार आहे, आज मी शिकायची संधी सोडणार नाही!" :OK, if you say so." नाना हसत म्हणाले. बँकेत पोहोचल्यावर आधी नायर साहेबांच्या केबिनमध्ये त्यांच्याशी आणि मग स्मिता पेठे, शेजवळ, संकेत अशा सर्व जणांशी नाना आणि बावधनकर बोलले. नानांनी त्या प्रिंट आऊटची कॉपी मागितली. ती पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की ज्या सात जणांना EFTने पैसे ट्रान्सफर व्हायचे होते त्या सर्वांचे घरचे डिटेल पत्ते, नाव, इ-मेल अॅड्रेस आणि मोबाईल नंबर त्या कागदावर होते.
शेजवळांना एक्स्ट्रा कॉपी झालेली आठवली, "पण अमितने ती श्रेड केली असायला हवी होती..."
"तुम्ही स्वतः नाही केलंत ते काम?" त्यांच्याकडे रोखून पहात नाना म्हणाले.
"नाही सर," शेजवळांना AC केबिन मध्ये घाम फुटला, "पण मी इथेच होतो ना, सर..."
"तुम्ही त्याला श्रेड करतांना पाहिलं का?"
"नाही, पण संकेतसरांनी पाहिलं असेल ना सर, त्यांच्या बाजूलाच आहे श्रेडर..." संकेतकडे वळून शेजवळ म्हणाले
"वेल...मला आठवत नाही त्याने श्रेड केल्याचं.." संकेत म्हणाला.
"आता कुठेय मुलगा?"
शेजवळांनी तो मित्रांबरोबर फिरायला अहमदाबादला गेल्याचं सांगितलं गाडीचे डिटेल्स दिले, 'कुठे उतरणार आहे ते माहीत नाही', म्हणाले.
"त्याला मोबाईलवर फोन करा आता, बाकी काही सांगू नका," नाना म्हणाले, "फक्त कुठे उतरला आहे आणि कधी यायचा आहे ते विचारा." शेजवळांनी फोन केला, अमितने दिलेलं हॉटेलचं नाव बावधनकरांनी लिहून घेतलं, अजून दोन दिवसांनी येतो म्हणाला.
"स्मिता मॅडम, तुमच्याकडची कॉपी आहे?"
"हो सर, आणू?"
"सध्या राहू द्या. तुमच्याकडची कॉपी कोणी पाहिली असण्याची शक्यता आहे? कोणी आलं होतं तुम्हाला भेटायला त्या सुमारास?"
"नाही सर...फक्त नरेंद्र..", ती रडायचीच बाकी होती.
"Her fiancé, Sir," नायर म्हणाले, "He was here to meet with me in connection with a home loan, he works in another bank close by." त्यांनी बँकेचं नाव सांगितलं.
"ठीक आहे, तुम्ही जा आपापल्या ठिकाणी, आम्ही जरा नायरसाहेबांशी बोलतो, आणि मग लागेल तर तुम्हाला बोलावू. इथे नाही तर चौकीवर, कामाची वेळ संपेपर्यंत बाहेर कुठे जाऊ नका आणि यासंदर्भात कोणालाही फोन करू नका. खास करून तुम्ही, शेजवळ." शेजवळ मानेनेच 'हो' म्हणाले.
बाकीचे सर्व गेल्यावर नानांनी नायरना स्मिता-नरेंद्र, संकेत आणि शेजवळ यांच्या सांपत्तिक स्थितीविषयी खोदून-खोदून विचारलं, "I am trying to find a motive here, who has the most need?"
नायर साहेबांनी माहिती दिली पण तिघांच्याही हेतूंबद्दल आपल्याला मुळीच शंका नसल्याचं सांगितलं. "I can vouch for them with confidence," म्हणाले.
बावधनकरांनी विचारलं, "What about Amit? How well do you know him?"
नायरांनी सांगितलं की तो यायचा अधून-मधून बँकेत वडिलांना भेटायला आणि स्टाफची छोटी-मोठी कामं करायचा कागदपत्रं या टेबलावरून त्या टेबलावर नेऊन द्यायला, विशेषतः शेजवळांच्या आर्थ्रायटीसमुळे कोणाला त्यात काही गैर वाटत नसे, परवाही तो आला होता ते नोकरीच्या संदर्भात भेटायला.
"Were you able to help?"
"I could not, told them so."
"So he could have a motive?"
"He could, but didn't look the criminal type to me."
"Thanks, Mr. Nair, we will need a copy of that print-out. And thanks for all your help. But please remember, nobody is off the hook yet, including you!"
"I understand, "कॉपी काढून देत नायर म्हणाले, "And we will do everything to help. But I will need to speak to bank's lawyer to keep a record of this, OK to do that?"
'चालेल, पण कमीत कमी आवश्यक माहिती द्या' "And document it.." असं नायरांना सांगून, त्यांचा निरोप घेऊन दोघे निघाले.
"बावधनकर," बाहेर आल्यावर नाना म्हणाले, "तुमच्या अहमदाबादच्या counterpart ला फोन करून माणसं पाठवा त्या अमितच्या पत्त्यावर आणि उचला त्याला आणि त्याच्या तिन्ही मित्रांना. संध्याकाळपर्यंत इथे आला पाहिजे. त्यांचे मोबाईल ताब्यात घ्यायला सांगा आधी." बावधनकरांनी फोन करून व्यवस्था केली.
"सर, यादीत सात जणं आहेत बेनिफिशिअरीज मध्ये..."
"हो, मीही तोच विचार करतोय. एक मुंबईचा आहे बाकीचे बाहेरगावचे आहेत....we need to follow all."
फोर्ट्च्या ऑफिसात पोहोचेपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. नानांनी राजूला आणि सुनेला फोन करून पूर्ण दिवस लागेल म्हणून सांगितलं, 'जेवण बावधनकरांबरोबर घेतोय' म्हणूनही सांगितलं.
***************
जेवण झाल्यावर बावधनकर आणि नानांनी त्या यादीतल्या मुंबईच्या बेनिफिशियरीचा नाव-पत्ता घेतला. ऑफिस पासून फार लांबचा पत्ता नव्हता. बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेजपासून दहा मिनिटांवर असलेली सहा मजली बिल्डिंग, पाचव्या मजल्यावर राहणारे दाबके म्हणून कुटुंब होते. नानांनी बावधनकरांना सिव्हिलियन ड्रेसमध्ये यायला लावलं आणि गाडी काढून दोघे सरळ त्या पत्त्यावर गेले. ड्रायव्हरला गाडी थोडी दूर पार्क करायला सांगून दोघे बिल्डींगपाशी चालत गेले आणि लिफ्टने वरती गेले. घराचं दार बंद असल्याने बेल वाजवून दोघे थांबले. आतून कोणीतरी दारापाशी आल्याचा आवाज आला आणि की होल चा फ्लॅप उघडला. साठीच्या बर्याच पुढच्या गृहस्थांनी डोळा लावून बाहेर पाहिलं. बावधनकरांनी ID card की होल समोर धरलं आणि म्हणाले, "नमस्कार, मी ACP बावधनकर, Economic Offenses Wingच्या ऑफीस मधून आलोय, थोडीशी चौकशी करायची होती, हे माझे साहेब, माने सर, आत येऊ का?"
आतून एका स्त्रीचा दबका आवाज ऐकू आला..."..."
"आम्ही काही तक्रार केलेली नाही,..." त्या माणसाने विचारले "काय पाहिजे?"
"दाबके साहेब, आम्ही आत येऊन बोललो तर आधिक बरं होईल, व्हिक्टरी बेंकेच्या संदर्भात चौकशी करायची आहे, तुमचा अकाऊंट आहे ना तिथे?"
काही क्षण गेल्यावर दाबक्यांनी दार उघडले. दोघांकडे व्यवस्थित पाहून झाल्यावर त्यांनी अनिच्छेनेच त्यांना आत येऊ दिलं.
"बसा, काय काम आहे?" मुळात क्षीण प्रकृतीच्या मिसेस दाबक्यांचा चेहेरा तणावग्रस्त वाटत होता. काही खातेदारांना परदेशातून आलेल्या रकमेसंबंधात धमकी आल्याचा संशय आला आहे हे बावधनकरांनी त्या दोघांना थोडक्यात सांगितलं आणि त्यांना कुणी फोन केला होता का ते विचारलं. दोघा दाबके पती-पत्नींनी एकमेकांकडे पाहिलं.
"घाबरू नका," बावधनकरांनी आपलं पाकिट बाहेर काढून त्यांना बिझिनेस कार्ड दिलं, "हा माझ्या ऑफिसचा पत्ता आणि फोन नंबर. तुमच्यावर त्यांची पाळत असेल असा आम्हाला संशय होता म्हणून सिव्हिलियन कपड्यांत आलो आहोत. त्या नंबरवर फोन करून तुम्ही माझ्याविषयी खात्री करून घेऊ शकता."
मग काही क्षण अवघड शांततेत गेल्यावर काहीतरी निर्णय घेतल्यासारखे दाबके म्हणाले, "ठीक आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावर. आला होता फोन काल एक. मुलाने लॉस एंजेलिसहून पैसे पाठवले होते, चार लाख. फोन करणार्याने आम्हाला जीवाची धमकी दिली आणि पोलिसांना सांगू नका म्हणून सांगितलं. पैसे उद्या शनिवारी बँकेतून काढून आणून रविवारी संध्याकाळी व्हीटी स्टेशनवर ठेवायचे आहेत, सात वाजता." एका दमात दाबके बोलून गेले आणि त्यांच्या पत्नीचा चेहेरा आशेने एकदम उजळला, "आता काही काळजी नाही ना? तुम्ही कराल ना मदत? पैसे नको ना ठेवायला?"
"आम्ही नक्कीच मदत करणार आहोत पण पैसे तयार ठेवा आणि ठरल्या वेळी सांगितलेल्या ठिकाणी ठेवा. पुढचं आम्ही पाहून घेऊ. कुठे आणि कसे ठेवायचे आहेत पैसे?" - बावधनकर
"ब्राऊन पेपरच्या एन्व्हलपमध्ये, प्लॅटफॉर्म नंबर अठराच्या कचरापेटीत सात वाजता टाकायला सांगितलं आहे, एक्झॅक्टली सात वाजता टाका म्हणाला तो."
"हजाराच्या नोटांमध्ये?" नानांनी विचारलं.
"हो."
"ठीक आहे, काळजी करू नका, मी साध्या वेषातले पोलिस आसपास ठेवीन, माझं कार्ड राहू द्या, पण शक्यतो मला ऑफिसात फोन करू नका. बघू कार्ड ते.." बावधनकरांनी दिलेलं कार्ड परत मागून घेतलं, पेन काढून मागे स्वतःचा मोबाईल नंबर लिहिला. "वाटलंच तर मला मोबाईलवर फोन करा. निघू?"
दाबके जोडप्याला सोडून दोघे गाडीत परतले. बावधनकरांनी ऑफिसात परतताच साध्या वेषातले तिघे हवालदार दाबक्यांच्या बिल्डींगच्या आसपास ८-८ तासांच्या शिफ्ट मध्ये असतील अशी व्यवस्था केली.
"बावधनकर," नाना म्हणाले, "This is getting more intricate than I thought. जरा स्टेट मॅप असेल तर बघू."
बावधनकरांनी आणलेला महाराष्ट्राचा मोठा नकाशा घडी उलगडून टेबलावर ठेवत नानांनी बँकेतल्या कागदाची कॉपीही मागितली. एक ठळक पेन्सिल घेऊन त्यांनी बेनिफिशिअरीजच्या गावांची नावं mark करायला सुरूवात केली...अकोला, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव, मुंबई, नागपूर, नाशिक, शेगाव. प्रथमदर्शनी काही पॅटर्न दिसेना.
"सर, या यादीतली नावं अल्फाबेटिकली आहेत, तसा sequence नसेल तर?"
"यू आर राईट. मुंबई सुरूवातीला आहे या ट्रान्स्फर्सच्या. तिथून सुरूवात केली पाहिजे...पण नंतर काय? Let us call the Nagpur number."
यादीत पाहून बावधनकरांनी नागपूरच्या recipient चं नाव पाहिलं: 'पाध्ये', आणि नंबर पंच केला ऑफिसच्या फोनवर. थोड्याफार फरकाने दाबक्यांचीच पुनरावृत्ती, पण पाध्यांनाही कॉल आला होता, साडे तीन लाखांसाठी आणि हजाराच्या नोटांचं ब्राऊन पेपरचं एन्व्हलप, नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या बाहेर द्यायचं होतं, सकाळी साडेअकरा वाजता, कुणाला ते नंतर कळणार होतं. पाध्यांनाही बावधनकरांनी पैसे तयार ठेवायला सांगितलं आणि साध्या वेषातल्या पोलिसांच्या प्रोटेक्शनची व्यवस्था केली.
"बावधनकर, I am sure you got the obvious connection..ट्रेन स्टेशन्स. बाकीचे बेनिफिशिअरीज कन्फर्म करायचीही गरज वाटत नाही मला, पण तरीही करा तुम्ही ते in parallel. आधी हे पहा," पेन्सिल हातात घेत, नकाशाकडे वळत नाना म्हणाले, "मुंबईहून रविवारी ८ तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास प्लॅटफॉर्म १८ वरून निघून नाशिकरोड मार्गे नागपूरकडे ला जाणारी आणि सोमवारी ९ तारखेला सकाळी ११ च्या सुमारास नागपुरात पोहोचणारी ट्रेन कोणती आहे?" त्यांनी नकाशावर पेन्सिलीने 'मुंबई - नाशिकरोड - चाळीसगाव - जळगाव - भुसावळ - शेगाव - अकोला - नागपूर' हा रूट ट्रेस केला.
बावधनकरांनी त्यांचा लॅपटॉप उघडून रेल्वेची एक बुकमार्क्ड साईट सर्च केली.
थोडयाच वेळात त्यांनी सांगितलं, "सर, 12105 Mumbai-Gondia Vidarbha Express जाते त्या रूटने त्या वेळात. पण नागपुरातून पुढे गोंदियाला जातेय ती."
"ओक्केS!" नाना उत्तेजित होऊन म्हणाले, "सांगा मला काय वेळा आहेत डिपार्चरच्या त्या त्या गावात?"
बावधनकरांनी सांगितलेल्या वेळा त्यांनी पेन्सिलीने नकाशात त्या त्या गावांपुढे लिहायला सुरूवात केली.
मुंबई - ०७.१०
नाशिकरोड - १०.४२
चाळीसगाव - १२.३५
जळगाव - १.३५
भुसावळ - २.२५
शेगाव - ४.००
अकोला - ४.३०
नागपूर - ९.२०
"Interesting! नागपूरचा पिक-अप साडेअकराचा आहे, गाडी ९.२० ला डिपार्ट होते, येते किती वाजता?"
"८.५५ चं arrival आहे."
"अगदी उशीर झाला तरी तासभर लेट. म्हणजे बहुतेक शेवटच्या पिक-अपच्या आधी गाडी निघणार आहे. म्हाणजे या कलेक्शनचं फायनल डेस्टिनेशन नागपूर असावं, गोंदिया नव्हे."
"शक्य आहे."
"फील्डिंग लावा तिकडे नागपुरात. पण आधी Let's go for the other folks. उरलेल्या बेनिफिशिअरीजना फोन करून आणखी काही माहिती मिळते का ते पहा. किती वाजलेत?"
"चार वाजलेत, सर."
"ते अहमदाबादवाले कधी पोहोचताहेत, काही फोन झाला का?" बावधनकरांनी फोन करून चौकशी केली. थोडं बोलणं झाल्यावर ते वळले. "घेतलंय सर चौघांना, तीन तासांपूर्वी निघालेत, दोन-एक तासांत पोहोचतील. पण print-out त्या अमितच्या फाईलमध्येच मिळाला, चुकून राहिला म्हणतोय. त्याला काही माहिती नसावी असं दिसतंय."
"We will see. बरं, if you don't mind, मी जरा चेंज रूम मध्ये पडतो आडवा, दुपारचं अर्धा तास पडायची वाईट खोड लागलीये शरीराला, चालेल? आणि हो, माझ्या गोळ्या राहिल्या जेवणानंतरच्या. जरा पाणी तेवढं द्या."
"Sure, Sir!" म्हणत बावधनकरांनी बिसलेरीची नवीन बाटली काढून दिली आणि त्यांना आतल्या रेस्ट-रूममध्ये नेऊन पोहोचवलं. "तुम्ही पडा सर, मी तोपर्यंत हे बाकीचे कॉल्स करून घेतो."
**************
**************
नानांची अर्ध्या तासाचीच डुलकी होईपर्यंत बावधनकरांनी चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, शेगाव आणि अकोल्याला फोन करून घेतले. चाळीसगाव आणि जळगावचे फोन लागले पण विशिष्ट व्यक्ति भेटल्या नाहीत फोनवर. भुसावळच्या शर्मा नावाच्या बेनिफिशिअरीने आपल्याला काही फोन वगैरे आला नसल्याचं सांगितलं, पण त्याचा मुळी आपल्याला खरोखरीच्या मुंबईच्या पोलिस आधिकार्याचा फोन आला आहे यावरच विश्वास नव्हता असं वाटलं बावधनकरांना, त्याला खरंच धमकीचा फोन आला असेल तर हा दुसरा फोन त्यांचाच ट्रॅप असेल असंही वाटलं असणं शक्य होतं. तेंव्हा बावधनकरांनी 'भुसावळच्या पोलिसांकडूनही कुणीतरी घरी येईल' असा निरोप दिला, "आलं की बघू," म्हणाला. शेगाव आणि अकोल्याला मात्र माहिती मिळाली आणि तिथल्या पैसे पिक-अप करण्याच्या वेळा गाडीच्या डिपार्चरच्या वेळेच्या अर्धा-अर्धा तास आधीच्या निघाल्या. बावधनकरांनी प्रिंट-आऊट कडे पाहत एकूण रकमेची बेरीज केली, सर्व मिळून २८ लाखांची रक्कम गोळा होणार होती. इतक्या थोड्या वेळात इतकं जबरदस्त प्लॅनिंग करणारे कोण असावेत याचा विचार करता-करता त्यांनी आजच्या दिवसाची इतर कामं आणि फायली निपटायला सुरूवात केली. सकाळी माने सरांचा फोन आला तेंव्हा या केस मध्ये पूर्ण दिवस जाईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती! त्यांची आजची जमतील तितकी कामं त्यांनी आटोपून घेतली, तर आजची बाकीची कामं आणि पुढचे दोन-तीन दिवस आणखी या प्रकरणात जातील हे गृहीत धरून त्या दिवसांची कामं, हाताखालच्या एका PI आणि दोघा PSI ना delegate केली. तोपर्यंत नाना उठून बाहेर आलेच फ्रेश होऊन. डायाबेटिसचा किंचित त्रास आणि सहा वर्षांपूर्वी पेसमेकर लावलेला, तेंव्हापासून -आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून - स्वतःच्या प्रकृतीची ते काटेकोरपणे काळजी घ्यायचे.
बावधनकरांनी त्यांना फोन कॉल्स विषयी आणि रकमेविषयी ब्रीफ केलं. ती रक्कम ऐकली आणि नानांना एकदम काहीतरी आठवलं, "अहो, जरा मला ती टाईम्स ऑफ इंडियाची साईट उघडून द्या बरं". IIT ला आणि IIM ला शिकणार्या राजूच्या मुलांनी आजोबांना एक्दम net-savvy करून टाकलं होतं! दहा-पंधरा मिनिटे सर्च केल्यावर त्यांना हवी होती ती बातमी सापडली आणि एकदम एक्साईट होत ते म्हणाले, "बावधनकर, this is possibly above your pay grade! I think we ought to involve ATS!!"
"ATS?" anti-terrorism squad च्या उल्लेखाने बावधनकर हबकलेच!
'"कोण बारिया आहेत ना तिथे आता?"
"हो सर, दिनेश बारिया. पण.."
"त्यांना फोन लावा आणि ते सध्या नेमके कशाच्या ट्रेल वर आहेत ते विचारा. मला खात्री आहे हे प्रकरण आणि ATS चं टार्गेट यांचा नक्की संबंध असणार. हे वाचा...."
डिसेंबर १५, २०१२ ला नागपुरात महाराष्ट्र विधानपरिषदेचं हीरकमहोत्सवी अधिवेशन होणार होतं, आणि त्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मनमोहन सिंह प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते.
"गाडी आणि पैसे ९ तारखेला पोहोचताहेत नागपुरात, अधिवेशन १५चं आहे, what is going to happen in a week that needs big cash?"
बावधनकरांच्या अंगावर काटा आला, त्यांनी बारियांना शोधून काढून फोन लावला आणि भेटीसाठी वेळ मागितली. एक तासाने या म्हणाले. अर्ध्या तासाने निघावं लागणार होतं. तेवढ्यात अमित आणि त्याच्या मित्रांना घेऊन येणारी टीम आलीच.
सगळ्यांना इंटरॉगेशनसाठी नेल्यावर बाकीचे तर गळाठलेच, पण आधी टफ वाटणारा आणि 'मला काही माहीत नाही' म्हणणारा पक्या २० मिनिटांत कोलमडला. त्याच्याकडून कळलं ते असं: पक्याला मुंबईत माहित असलेल्या एका भाईने त्याला सांगून ठेवलं होतं की काही मोठा हात मारण्याचा चान्स असेल तर ताबडतोब फोन करून माहिती द्यायची, त्या खबरीच्या बदल्यात त्याला भरपूर पैसे मिळतील. अमितने फुशारकी मारत बाकीच्यांना त्याचे वडिल कसे लाखा-लाखाचे डील्स करणार्या बॅंकेत काम करतात हे पटवण्यासाठी त्याच्या फाईलमध्ये खरोखरीच चुकून श्रेड करण्याचा राहिलेला कागद दाखवला होता. रात्री अमित झोपल्यावर पक्याने तो काढून त्याची xerox copy काढली, मूळ कागद अमितच्या फाईलमध्ये ठेवला, आणि 'भाई'ला फोन करून तो कागद फॅक्स केला होता. त्याबद्दल २० हजार रुपये मिळणार होते मुंबईत आल्यावर.
बावधनकरांनी पक्याकडून त्या 'भाई'ची माहिती 'घेतली'. प्रदीप रेळे, रेकॉर्ड वरचा माणूस होता. त्याचा फोटो त्यांनी मागवून घेतला. आधी नावावरून नानांना काही बोध झाला नाही, पण फोटो पाहिल्यावर त्यांना बारा-एक वर्षांपूर्वीची केस आठवली. "I know this face, कुठे पाहिलंय त्याला?" बावधनकर त्याचं पूर्वीचं रेकॉर्ड चाळत असतांना थांबले, २००० साली नानांचं चंद्रपूरला पोस्टिंग असतानांची ती नोंद होती.
"सर, यू वुड हॅव नो आयडिया!!" ..."हा रेळे कोणाशी linked आहे माहितीये, तुमचा जुना दोस्त, अविनाश!"
"अविनाश? चंद्रपूर?"
"येस सर! The very same!"
"I'll be damned!"
स्टेशन डायरीत नोंद करून घेऊन, FIR नोंदवून अमित आणि त्याच्या मित्रांना तात्पुरतं लॉक अप मध्ये ठेवून बावधनकर नानांबरोबर बारियांना भेटायला निघाले. वाटेत त्यांनी राजूला फोन केला. "मी रात्री ९ पर्यंत येईन घरी, काळजी करू नका. .....हो, जेवायला घरीच आहे....बघतो, बावधनकर सोडतील मला" त्यांच्याकडे वळून बघत म्हणाले, "जमेल?" "Of course, Sir. मी तर म्हणत होतो आज माझ्याकडेच रहा रात्री." "राहिलो असतो, some other time, पण आज मला घरी जाऊन कपडे, औषधं वगैरे पॅक केली पाहिजेत." पलिकडून राजूने विचारलं असणार, "हो रे, जरा investigative भूत संचारलंय अंगात बर्याच वर्षांनी अंगात, बावधनकर आणि मी परवा रात्रीच्या ट्रेनने नागपूरला जाऊ बहुतेक....नाही...काळजी कसली करतोस? I will be just fine! ..अं...नाही, तीन-चार दिवसांत परत येईन, घरी आलो की बोलतो सविस्तर. OK? चल, बाय."
************
बारियांकडे भेटायला जातांना वाटेत नानांनी बावधनकरांना विचारलं, "तुमच्याकडे ते फोटॉन, नेट-कनेक्ट वगैरे आहे का लॅपटॉप बरोबर?"
"आहे ना सर, बर्यापैकी स्पीड आहे, चालू करू?"
"लावा, काही आठवलंय, ते पहातो..." पुढची पाच-दहा मिनिटे जीप ट्रॅफिकमधून निघत असतांना नाना काही सर्च करण्यात गुंगून गेले होते. त्यांच्या सफाईचं बावधनकरांना प्रचंड कौतुक वाटलं. नानांनी "Found it!" म्हंटलं, आणि एक बातमी बावधनकरांना दाखवली.
बावधनकरांनी भराभर नजर फिरवून ती वाचली, "हो मला चांगलं आठवतंय हे प्रकरण, पण पुढे काही झाल्याचं आठवत नाही.." २० टन अमोनियम नायट्रेटच्या गोण्या भरलेला ट्रक मे २०१२ मध्ये गायब झाला होता. नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव एजन्सी (NIA) त्याच्या मागावर होती, पण तपास अजूनही अपुरा होता.
"कसं आठवेल? कारण पुढे काही झालंच नाही! तो ट्र्क शेवटचा कुठे गायब झालाय ते पहा."
"सतना, छत्तीसगढच्या बॉर्डरवर."
"अविनाश कुठेय सध्या, माहितीये?"
खजील होत बावधनकर म्हणाले, "नाही, सर, या EOW च्या रगाड्यात इतर फारसं फॉलो नाही करू शकलो..."
"नॉट टू वरी, अहो मी रिकामटेकडा आहे म्हणून फॉलो करू शकतो, इतकंच! असो, तो आहे गोंदियाच्या जंगलात. नाऊ, गेट इट?"
आता चकित होण्याची पाळी बावधनकरांची होती. "Fascinating!"
ते पेज नानांनी बुकमार्क केलं आणि लॅपटॉप बंद केला. ते बारियांच्या ऑफिसबाहेर पोहोचले होते.
बारिया नानांना ओळखत होतेच, त्यांनी genuine आनंद व्यक्त केला, बावधनकरांनी EOW च्या केसचं सांगितलेलं सगळं त्यांनी ऐकून घेतलं. आपलं target सांगायला ते तयार नव्हते. "PM's security is of course our priority, so we will be there in full force. तुम्ही दिलेला लीड आम्ही नक्की फॉलो करू, थँक्स!"
"बारिया, You can do better than follow our lead," नाना म्हणाले. त्यांनी लॅपटॉप उघडून बूकमार्क केलेलं पेज दाखवलं. बारियांनी बातमी वाचली आणि वरती पाहिलं.
नाना म्हणाले, "You must agree that the two investigations are converging, we have the same target, will you please work with us?"
"मी काय करायला हवंय तुम्हाला?"
"काही खास वेगळं नाही, तुम्हाला ट्रक मोबिलाइझ झालेला कळला की कळवा इतकंच फक्त. मला वाटतं हे पैसे त्या ट्रकचं पेमेंट आहे...."
"ओके, यू डेफिनेटली हॅव अ व्हेरी सॉलिड केस, मला कळवत चला, हवी ती मदतही देईनच. थँक्स अगेन! मनापासून!"
***************
***************
घरी ठाण्याला गाडीतून जातांना नाना म्हणाले, "बावधनकर, I have changed my mind, मला वाटतं आपण उद्या सकाळीच नाशिकरोडला जाऊ. त्या डॉ. जोशींना कॉल यायच्या आत त्यांना फोन करणारा ट्रॅक करता आला तर पाहू. We will join the train from there, what do you say?"
"ठीक आहे सर, सकाळी किती वाजता पिक अप करू तुम्हाला?"
"आठच्या सुमारास या. म्हणजे मला बॅग वगैरे आवरायला मिळेल. आणि हो, तो प्रदीप रेळेचा फोटो विसरू नका."
"Sure. आणखी काही लागेल?"
"भरपूर ट्रॅव्हल व्हाऊचर्स ठेवा जवळ, पुढच्या आठवड्यात कुठे कुठे उतरायला आणि रहायला-जेवायला लागेल, सांगता येत नाही. आणि हो, लॅपटॉप आणि मोबाईलचे चार्जर्स विसरू नका. सिव्हिलियन ड्रेसही ठेवा चार-सहा बरोबर बॅगेत."
रात्री साडेआठला नानांना घरी सोडून, राजूशी आणि नानांच्या सुनेशी थोड्या गप्पा मारून, बावधनकर परतले.
************
८ डिसेंबर, शनिवार. दुपारचा १ वाजलेला होता.
अनमार्क्ड पोलीस कारने नाशिकरोडला पोहोचून नाना आणि बावधनकर डॉ. जोशींच्या घराच्या दिशेने निघाले. नाशिकरोड ते नाशिक या पुणे-नाशिक मेन रोडवर शिखरेवाडीच्या तोंडाशी आल्यावर समोरासमोरचे दोन बस स्टॉप दिसल्यावर नानांनी ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवली. रस्त्याच्या बाजूला पार्क करून खिडकीतून त्यांनी नाशिकच्या दिशेने जाणारा बस स्टॉप आणि त्याच्या आसपासचा भाग न्याहाळला आणि 'चला' म्हणाले. डॉ. जोशींच्या घरापाशी पोहोचल्यावर त्यांनी उतरून आसपासची वस्ती न्याहाळली, जवळजवळ सगळीच राहती घरं, एक दोन दुकानं, त्यांपैकी एक घराच्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पण अगदी समोरच. बावधनकरांनी ड्रायव्हरला पैसे दिले आणि 'गाडी घेऊन जाऊन जेवून ये' म्हंटलं.
आधी फोन करून सांगितल्यामुळे डॉक्टर आणि कुटुंबिय वाटच पहात होते. शनिवारची दुपार असल्याने अमृताचा क्लास नव्हता, पण तिला असाईनमेंट्स पूर्ण करायच्या होत्या, 'त्या शिल्पाकडे केल्यास तरी चालतील, बाबा सोडतील तुला' असं आईने म्हंटल्यावर जेवण झाल्यावर ती खुषीतच शिल्पाकडे गेली होती.
"या, नानासाहेब, नमस्कार!" डॉक्टर म्हणाले. बावधनकरांची ओळख झाल्यावर सुनेने म्हंटलं, "हातपाय धुवून घ्या, ताटं घेते आधी, मग बोलू आपण."
"पैसे आणलेले आहेत?" नानांनी विचारलं.
"होय, सांगितलं तसं पाकीटात ठेवले आहेत..." डॉक्टर म्हणाले.
"Good, चला जेवून घेऊया." नाना म्हणाले. इतर जुजबी गप्पांमध्ये जेवणं झाली तरी जोशी कुटुंबाच्या मनावरचा ताण palpable होता.
हात धुवून बाहेरच्या खोलीत सर्व बसल्यावर नानांनी बावधनकरांकडून रेळेचा फोटो घेतला आणि डॉक्टरांना दाखवला, "हा रेकॉर्डवरचा रेळे म्हणून हिस्टरी शीटर आहे, या माणसाला गेल्या दोन-तीन दिवसांत तुमच्यापैकी कुणी पाहिलंय का, especially डॉक्टर गुरूवारी सकाळी तुम्ही अमृताला सोडायला गेलात तेंव्हा?" तिघांनी फोटो पाहून 'नाही' म्हणून सांगितलं.
"पण गुरूवारी सकाळीच का म्हणताय तुम्ही?" डॉक्टरांनी विचारलं.
"त्याने फोनवर specifically अमृताचं नाव घेतलं, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या गुंडाला किंवा गुंडांना तुमच्याविषयी मिळालेली माहिती फक्त तुमचं नाव, घराचा पत्ता, इ-मेल अॅड्रेस आणि तुमचा मोबाईल फोन नंबर इतकीच मर्यादित होती, तुम्हाला दोघांना एकत्र बोलतांना पाहिल्याशिवाय त्याला अमृताचं नाव माहिती असायचं काहीच कारण नव्हतं, म्हणून."
"On second thoughts," डॉक्टर म्ह्णाले, " पलिकडच्या बस स्टॉप वर कुणीतरी माणूस उभा असल्याचं मी स्कूटी वळवतांना माझ्या लक्षात आलं होतं, पण तो हाच होता की नाही ते मला आठवत नाही."
"Never mind, पण तो जर तोच असेल, तर त्याला तुम्ही नेमके चेहेर्याने कोण आहात हे कळण्यासाठी इथल्या local इतर कुणाची तरी मदत घ्यावी लागली असणार.....इतक्या सकाळी तशी मदत करणारं दुसरं कोण असेल?"
"काही कल्पना नाही," डॉक्टर मुलाकडे आणि सुनेकडे पहात म्हणाले.
"ते समोरचं किराणा दुकान कधी उघडतं?"
'तो सकाळीच सहाला आलेला असतो, आम्ही बाहेर पडतांना उघडलेलं असतं ते दुकान."
"चला, आमच्याबरोबर या, आपण भेटू जरा त्याला."
दुकानात दोन गिर्हाईकं होती, पण दुकानदार एकटा नव्हता, त्याची बायकोही होती. डॉक्टरांनी त्याला बाहेर बोलावल्यावर बायकोला गिर्हाईकं बघायला सांगून तो बाहेर आला.
दुकानापासून लांब अंतरावर चौघे चालत गेल्यावर डॉक्टर त्याला म्हणाले, "रतिलाल, आमच्या ओळखीचे हे पोलीस आधिकारी मुंबईहून एका गुन्ह्याच्या तपासासाठी नाशिकरोडला आले आहेत, त्यांना एक संशयित माणूस बुधवार-गुरूवारी या भागात आला होता असं वाटतं, त्याचा फोटो आहे त्यांच्याकडे, तुला आठवतंय का त्याला पाहिल्याचं?"
फोटो पाहिल्यावर लगेचच रतिलाल म्हणाला, "संशयित? अहो हा तुम्हाला भेटायला आलावता नं गुरुवारी सकाळी?" हळूहळू आवाजाची पट्टी वाढवत रतिलाल पुढे म्हणाला, "अहो मीच त्याला सांगितलं तुम्ही अमुला सोडायला स्टॉप वर गेलेले, म्हणून चहा घेऊन येतो भेटायला म्हणाला. नाय आला का? काय लफडंय काय डॉक्टर?"
"हे पहा," बावधनकर पोलिसी आवाजात म्हणाले, "आम्ही चौकशी करतोय हे कुणाला कळायला नकोय, नसत्या गोत्यात याल, कळलं?"
"हो, हो, मी कशाला बोलतोय हो साहेब?" आवाज एकदम खालच्या पट्टीत आणत रतिलाल म्हणाला.
"नीट आठवा," नानांनी विचारलं, "तुम्ही 'अमुला सोडायला स्टॉप वर गेलेले' म्हणालात, त्याला अमृताचं नाव तुम्ही सांगितलं का?"
"नाही हो, मी कशाला नाव सांगेन? मी 'नातीला घेऊन गेले' बोललो."
"OK, thank you! तुम्ही फार महत्त्वाची मदत केलीत आम्हाला," बावधनकर म्हणाले, "तो पुन्हा या भागात कुठे दिसला तर लगेच मला फोन करा, काय?" त्यांनी आपल्या कार्डवर मागे आपला मोबाईल नंबर लिहून देत म्हंटलं. "आणि हो, तुमच्या एका चुकीने पोरीचा जीव धोक्यात येईल याची जाणीव ठेवा आणि कुणाशी बोलू नका, काय?"
"नक्की, नक्की, साहेब!"
घरी परत आल्यावर नाना म्हणाले, "म्हणजे स्टॉप वर तुम्हाला दिसलेला हा रेळेच, आता आम्हाला ट्रॅक करायला चांगलीच मदत होणार. मला वाटतं आता संध्याकाळी ९ वाजता तुम्हाला फोन करून उद्या पैसे घ्यायलाही हाच येईल किंवा आसपास असेल. आम्ही नजर ठेवू. तुम्ही निश्चिंत रहा, OK?"
जाणवण्याइतके relax झालेले डॉक्टर म्हणाले, "थँक्स, पण तुम्ही आता कुठे उतरणार आहात, इथेच का रहात नाही, दोघेही? आम्हालाही तेवढाच आधार वाटेल..."
"माझी काही हरकत नाही तुमची गैरसोय होणार नसेल तर.." नानांनी बावधनकरांकडे पाहिलं.
"मला प्रॉब्लेम नाही, पण आमचा ड्रायव्हर आहे बरोबर."
"आपल्याला गरज आहे का गाडीची, आपल्या प्लॅनप्रमाणे उद्या रात्री पुढे जायचं असेल तर?" नाना म्हणाले, "नाहीतर जाऊ दे त्याला गाडी घेऊन परत."
"हो. आणि उद्यापर्यंत गाडी लागलीच तरी मी आहेच की!" जयेश म्हणाला.
"OK, तसं करू, मग तो आता जेवून आला की बॅग्ज ठेवून घेऊ आणि दिवसाच निघू दे त्याला, रात्रीच्या आत पोहोचेल मुंबईत." बावधनकर म्हणाले.
"बावधनकर, त्या दाबक्यांना फोन करून कन्फर्म कारून घ्या, पैसे काढून आणले असले पाहीजेत त्यांनी एव्हाना."
बावधनकरांनी फोन केला, दाबक्यांनी पैसे तयार ठेवलेले होते. साध्या वेषातल्या हवालदारांनाही फोन करून त्यांचं काम व्यवस्थित चालू आहे याचीही त्यांनी खात्री करून घेतली.
"आणखी एक काम आहे, बावधनकर," नाना त्या दोघांना दिलेल्या खोलीत गेल्यावर म्हणाले, "मला गेल्या दहा वर्षांतली अविनाशच्या रेकॉर्डची सगळी माहिती हवी आहे, SID च्या database मध्ये असायली हवी, मिळेल? Electronically तासाभरात मिळाली तर फार बरं होईल."
"हो, शक्य आहे, SID च्या Internal Security मध्ये मिळेल," बावधनकर जरा विचार करून म्हणाले, "तासाभरात म्हणताय म्हणजे बारियांना मध्ये घातलं तरच शक्य आहे, करतो त्यांना फोन." त्यांनी बारियांना फोन करून State Intelligence Department मधून माहिती मिळवून पाठवण्याची गळ घातली.
नानांनी त्यांची आवश्यक अशी दुपारची वामकुक्षी पूर्ण केली आणि औषधं घेतली. तोपर्यंत बारियांनी promise केल्याप्रमाणे चार वाजेपर्यंत सर्व माहिती पाठवली होती. पुढचा तासभर एकाग्रपणे नानांनी सगळी माहिती अथ ते इति वाचून काढली. पाच वाजता डॉक्टरांच्या सुनेने सर्वांना चहासाठी बोलावलं. नाना चहा घेतांना डॉक्टरांना आणि जयेशला म्हणाले, "मला बरेच वर्षांपासून इथल्या त्या देवळाली कँपातल्या बार्न्स स्कूलला भेट द्यायची फार इच्छा आहे, आता जाऊ शकू का? तिथल्या मुख्याधापकांना भेटायलाही आवडेल."
"अरे जमेल का काय म्हणता, लगेच निघू, आमच्या जयेशने त्यांचं नुकतंच एका लायब्ररीचं डिझाईन केलंय, तो करेल फोन डॉ. परेरांना आणि विचारेल." जयेशने चहा घेतानाच फोन केला, डॉ. परेरा 'जरूर या, मी थांबतो' म्हणाले. पाचच मिनिटांत जयेशने गाडी काढली. डॉक्टर आणि जयेश गाडी काढायला पुढे गेले तेंव्हा नाना मागे घुटमळले, बावधनकरांना म्हणाले, "एक पत्ता देतो तुम्हाला, त्या पत्त्यावर माणसं पाठवून एक महत्त्वाचं काम करायचंय."
त्यांनी हलकेच बोलत पाचच मिनिटांत काय करायचं ते सांगितलं. बावधनकर म्हणाले,
"सर, are you very sure? This might precipitate an early disaster..."
"काही होणार नाही, just do it very quietly. आम्ही त्या परेरांना भेटायला गेलो की तुम्ही अॅरेंजमेंट्स करा. Let's go."
पुढचे दोन तास नानांनी बार्न्स रेसिडेन्शिअल स्कूलचा विस्तीर्ण कँपस पहाण्यात आणि परेरांबरोबर बोलण्यात घालवले. शेवटी निघतांना ते म्हणाले "डॉ. परेरा, फार वर्षांची इच्छा होती माझी इथे यायची, I am very impressed with the school, मला कुणाला recommend करायचं झालं तर admit करू शकाल?"
"Anything for you, Sir, अगदी शैक्षणिक वर्षाच्या मध्येही सांगा, just let me know or send a note and I will take care of it, OK?"
आठपर्यंत सर्व जण घरी परतले. नऊच्या फोनचं टेन्शन जोशी कुटुंबियांना आलेलं स्पष्ट होतं. मैत्रिणीकडून घरी आलेल्या अमृताला तिच्या आईने लवकर जेवायला घालून झोपायला लावलं. ती झोपायला गेल्यावर थोड्याच वेळात डॉक्टरांचा मोबाईल वाजला. अपेक्षेप्रमाणे लोकल कॉल होता.
"डॉक्टर जोशी, उद्या रात्री साडेदहा वाजता नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या समोरच्या पायर्यांवर एक Nike चा लाल टी शर्ट घातलेला माणूस उभा असेल, त्याच्या हातात पाकीट द्या आणि वळून परत जा. तुमच्याखेरीज घरातला इतर माणूस आसपास दिसला तर अमृता उद्यानंतर दिसणार नाही. रात्री साडेदहा." फोन बंद झाला.
शहारलेल्या डॉक्टरांनी फोन ठेवला. नानांनी पाठीवर हात ठेवला, "Don't worry, everything will work out just fine."
जेवणाआधी खोलीत गेल्यावर नानांनी बावधनकरांकडे प्रश्नार्थक पाहिलं. "Done! झालं काम," बावधनकर पुटपुटले. इतरांबरोबर शांततेत जेवणं झाल्यावर दोघे झोपायला आपल्या खोलीत गेले.
*************
८ डिसेंबर: रविवारी सकाळी ११ वाजता बावधनकरांनी परत दाबक्यांना आणि त्यांच्या साध्या वेषातल्या माणसांना वेगवेगळे फोन केले, दाबक्यांना कुणाचाही फोन आला नव्हता आणि पोलीसांना कुणी संशयास्पद व्यक्ती आसपास आढळून आलेल्या नव्हत्या. संध्याकाळी चार वाजल्यापासून बावधनकरांनी depute केलेले इन्स्पेक्टर अन्सारी आणि त्यांच्या बरोबर २० पोलीस साध्या वेषात CST च्या प्लॅटफॉर्म क्रमांक अठरावर विखरून उभे होते. गाडी लागायला वेळ असूनही प्लॅट्फॉर्मवरची गर्दी क्षणाक्षणाने वाढत होती. पाच वाजता दोन तीन गणवेषातले TC येऊन रिझर्वेशन्सच्या print-outs चे कागद काचेच्या बोर्डांमध्ये लावून गेल्याबरोबर प्रवाशांची त्या बोर्डांभोवती गर्दी झाली. ज्यांना आयत्या वेळचं रिझर्वेशन हवं होतं असे प्रवासी TCs च्या मागे मागे फिरू लागले, तेंव्हा TC नी त्यांना पिटाळून प्लॅटफॉर्मच्या सुरूवातीच्या बूथ वर जायला सांगितलं. ते प्रवासी तिथे रांग लावायला धावेपर्यंत गाडी प्लॅटफॉर्मवर लागली.
इन्स्पेक्टर अन्सारी स्वतः मध्यावर असलेल्या मोठ्या कचरापेटीपाशी उभे होते. त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना नेमकं काय करायचं याच्या स्पष्ट सूचना बावधनकरांनी दिलेल्या होत्या. अन्सारी सकाळीच साध्या वेषात दाबक्यांना भेटून आले होते आणि येतांना त्यांचा फोटो घेऊन आले होते. त्या फोटोच्या प्रती सर्व पोलिसांना वाटलेल्या होत्या. बरोबर ६.५० ला दाबके हातात एक चामडी पिशवी घेऊन प्लॅटफॉर्म १८ वर आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्लॅटफॉर्म टोकापर्यंत चालत पालथा घातला. ६.५५ ला प्लॅटफॉर्मच्या सुरूवातीकडून दोन TC हातात रेल्वेने दिलेल्या अॅल्युमिनियमच्या बॅगा आणि पॅडवर लावलेले रिझर्वेशन चार्ट्स हातात घेऊन चालत आले. एका TC च्या खांद्यावर आणखी एक रेक्झिनची बॅगही होती. मध्यावर असलेल्या S4 डब्यापाशी थांबून दोघांनी मिनिटभर गप्पा मारल्या, आणि दोघांपैकी एक जण घाईने सर्वात पुढच्या S10 कंपार्टमेंटकडे चालत गेला. रेक्झिनची बॅगवाल्या S4 जवऴच्या TC ने हातातला चार्ट दरवाजावर चिकटवला आणि तो डब्यात गेला. एव्हाना दाबके, परत येतांना वाटेत दिसलेल्या अन्सारींना ओळख न दाखवता, त्यांच्या थोडंच पुढे असलेल्या कचरापेटीशी जाऊन थांबले. त्यांनी चामडी पिशवी उघडून आतलं ब्राऊन पेपरचं बंद एन्व्हलप पेटीत टाकलं आणि मागे-पुढे न बघता ते प्लॅटफॉर्मच्या सुरूवातीकडे चालत गेले.
गाडीची शिट्टी झाली. प्रवाशांची डब्यांत शिरण्यासाठी आणि सोडायला आलेल्या लोकांची डब्यांबाहेर पडण्यासाठी धावपळ सुरू झाली. अन्सारींचं कचरापेटीवर बारकाईने लक्ष होतं. गाडी हलायला लागण्याची मिनिटभर आधी S4 मधला TC त्याची अॅल्युमिनियमची बॅग घेऊन बाहेर पडला. त्याने हातातली बॅग उघडली आणि आतलं एक ब्राऊन पेपरचं एन्व्हलप जाऊन कचरापेटीत टाकलं. अन्सारी पुढे सरकले. पुढच्याच क्षणाला चालू झालेल्या गाडीकडे पहात घाईत मन बदलल्यासारखं दाखवत त्या TC ने कचरापेटीतलंच पण दुसरं एन्व्हलप उचललं आणि बॅगेत टाकून बॅग बंद केली. अन्सारी जागचे हलेपर्यंत तो चपळाईने डब्यात शिरला. गाडीने वेग पकडला. अन्सारी धावतच S4 मध्ये चढले. त्यांच्या पाठोपाठ आणखी एक साध्या वेषातला हवालदारही डब्यात शिरला. दोघांनी TC ला डब्यात पुढे जातांना पाहिलं. अन्सारी घाईघाईने हवालदाराच्या कानात बोलले, "मी गाडीबरोबर जातोय, साहेबांना कळवतो. त्या दाबक्यांना घरी नेऊन सोडा आणि तुम्ही सर्व जण परत जा...." हवालदार मानेने हो म्हणून चालत्या गाडीतून उतरला. अन्सारींनी त्याला वेगाचा तोल सांभाळत गाडीबरोबर काही क्षण पळतांना पाहिलं, मग तो हळूहळू मागे पडला आणि गाडी CST च्या बाहेर पडली.
डब्यातले प्रवासी हळूहळू सामान लावता लावता आपापल्या जागांवर स्थानापन्न होत होते. अन्सारी चालत चालत पुढे गेले. मधल्या एका खिडकीजवळच्या सीटवर TC बसलेला होता. त्याने त्याची अॅल्युमिनियमची बॅग कुलूप लावून पायापाशी ठेवली होती तर रेक्झिनची बॅग काढून त्यातला चार्ट बाहेर काढला होता. त्याच्या थोडं पुढे जातांना खाली पहात अन्सारींनी त्याच्या नेमटॅगवरचं नाव वाचून घेतलं आणि पुढे गेले. दारापाशी जाऊन त्यांनी मोबाईल बाहेर काढला आणि नंबर पंच केला. पलिकडून बावधनकरांनी उचलताच हळू आवाजात म्हंटलं, "सर, अन्सारी बोलतोय. पिक अप झाला, पार्टी S4 चा TC निघाली. नाव एस. पी. तिवारी आहे. मी त्याच डब्यात आहे. काय करू?"
बावधनकर म्हणाले, "Stay with him, तिकिट काढलेलंय?"
"हो सर, S10 मध्ये रिझर्वेशन आहे, मनमाड पर्यंतचं."
"OK, good, मी पंधरा मिनिटांत फोन करतो."
ट्रेनशी असलेला केसचा संबंध लक्षात घेऊन बावधनकरांनी मुंबईतून निघतांनाच ACP RAILWAY (CRIME) शिंदे यांना contact केलं होतं. त्यांनी डायरी काढून त्यांचा नंबर डायल केला: 022-23759182. शिंद्यांनी फोन उचलल्यावर बावधनकर म्हणाले, "शिंदे साहेब, बावधनकर. पार्सल निघालंय. माणूस रेल्वेचा निघाला. S4 चा TC, एस. पी. तिवारी. What's the deal?"
"पंधरा मिनिटं द्या, फोन करतो."
इकडे अन्सारी वाकून बंद दाराच्या पण उघड्या काचेच्या खिडकीच्या बार्स मधून उलटी पळणारी मुंबई बघत होते, पण एक डोळा तिवारीवर होता. त्यांच्या खांद्यावर हाताने टॅप करून TC ने विचारलं, "रिझर्वेशन आहे?" पाठीमागे वळतांना अन्सारींनी पाहिलं, अॅल्युमिनियमची बॅग हातात होती तिवारीच्या, म्हणजे डब्यात कुणाला ट्रान्स्फर होणार आहे की काय?....
"हो," खिश्यात हात घालून तिकिट बाहेर काढत अन्सारी म्हणाले, "S10 चं आहे, गाडी निघाली म्हणून धावत इथे शिरलो."
तिवारीने तिकिट पाहिलं, "OK, कल्याण पर्यंत थांबावं लागणार तुम्हाला, मध्ये S7च्या पुढे कनेक्टेड नाहीये."
"No problem. थांबतो मी. Thanks."
तिवारी परत फिरला. बाकीचे पॅसेंजर्स चेक करत करत आपल्या जागी पोहोचला. दहा मिनिटांनी त्याने मोबाईल काढला आणि मिनिटभर कोणाशी बोलला. मग फोन पँटच्या खिशात ठेवून त्याने कोट काढला, वरच्या बर्थवर चादर पसरली, कोटाची घडी करून तो उशाशी ठेवला. आधी त्याने अॅल्युमिनियमची बॅग वर टाकली आणि नंतर रेक्झिनच्या बॅगेतून inflatable उशी काढून ती फुगवली. बॅग आणि उशी वर ठेवून बाजूच्या सीटच्या कडेने तो वरती चढला आणि आडवा झाला.
वीस-पंचवीस मिनिटे अन्सारी कुणाच्या डोळ्यात येणार नाही अशा सहजपणे तिवारीवर नजर ठेवून होते. त्यांचा मोबाईल वाजला आणि त्यांनी तो पहिल्याच रिंगमध्ये उचलला.
"सर."
बावधनकर पुढचे दहा-एक मिनिटं त्यांना शिंद्यांकदून मिळालेली माहिती अन्सारींना देत होते. तिवारी ट्रेन सोडून कुठे जाण्याची शक्यता नव्हती, त्याने extra-long over-time मागून नागपूरपर्यंतची ड्यूटी मागून घेतली होती. माणूस नागपूरचाच राहणारा होता. "कल्याणपर्यंत तुम्ही त्या डब्यात लक्ष ठेवा, कुणाला ट्रान्सफर करत नाही ना पहा. मी कल्याणपासून बनकरला पाठवतो आहे, त्याला S4 चं रिझर्वेशन मिळवून दिलंय शिंद्यांनी. नाशिकरोडपर्यंत तो येईल. पुढे मी आणि माने सर जाऊ."
*************
८ डिसेंबर रविवारची रात्र, नऊ वाजल्यापासून डॉक्टर, जयेश, नाना आणि बावधनकर नाशिकरोड स्टेशनपासून ५०० मीटर्स वर गाडी पार्क करून गाडीतच थांबले होते. नाना आणि बावधनकर त्यांच्या overnight प्रवासी बॅगा घेऊन आले होते. डॉक्टरांनी हातातलं एन्व्हलप घट्ट धरून ठेवलं होतं. बावधनकरांनी अखेरच्या क्षणाला त्यांचे contacts वापरून नाशिकरोडचे तीन साध्या वेषातले पोलीस मिळवले होते, ते तिघे जण त्यांच्या विशिष्ट सूचनांसह स्टेशनच्या दोन कोपर्यांत एक-एक आणि मध्यभागी एक असे उभे होते. त्यांना रेळेचे फोटो आणि वर्णन मिळालेलं होतं. नाना आणि बावधनकर आपापले रेल्वे रिझर्वेशन खिशात ठेऊन तयार होते.
पावणेदहा वाजता डॉक्टर गाडीतून उतरले. स्टेशनच्या उलट्या दिशेने चालत गेले आणि नाशिकरोड एस. टी. स्टँडला वळसा घालून रेल्वे स्टेशनकडे चालत आले.
मधल्या वेळात नाना आणि बावधनकर गाडीतून उतरून सरळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालत आले आणि कुठेही न थांबता, एकमेकांशी casually बोलत प्लॅटफॉर्मवर गेले. आत पन्नास-एक पावलं जाऊन ते दोघे थबकले. बावधनकरांनी मोबाईल बाहेर काढला आणि बोलायला सुरूवात केली. नाना वळले आणि त्यांनी स्टेशनच्या बाहेर दृष्टी वळवली.
"काय दिसतंय?" बावधनकरांनी फोनवर विचारलं.
नाना ओठ कमीत कमी हालवत म्हणाले, "डॉक्टर येताहेत,..I see him...रे़ळेच आहे...लाल टी शर्ट मध्ये. त्याने डॉक्टरांकडून पाकीट घेतलंय, आत येतोय..looks like he has no back up.....डॉक्टर परतलेत.."
"Our tails?"
"They are walking in behind Rele, let's go!"
बावधनकरांनी फोन बंद करून पँटच्या खिशात टाकला. दोघे प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या दिशेने जिन्याकडे चालू लागले. विदर्भ एक्सप्रेस नुकतीच लागलेली होती. जिन्यावरून पलिकडे उतरून दोघेजण S4 च्या दिशेने चालत गेले. डब्यापाशी पोहोचल्यावर बावधनकरांना साध्या वेषातले इन्स्पेक्टर बनकर उतरतांना दिसले. त्यांच्या पुढ्यातच अॅल्युमिनियमची बॅग घेऊन TC तिवारीही उतरला. बावधनकरांना ओलांडून थोडं पुढे गेला. तोपर्यंत तिथे आलेल्या रेळेला पाहून त्याने हात पुढे केला. रेळेने हातातलं पाकीट तिवारीला दिलं. तिवारीने बॅग उघडून पाकीट आत टाकलं आणि परत फिरला. रेळेही पाठ फिरवून जिन्याकडे गेला. तिवारी डब्यात शिरल्या-शिरल्या नाना आणि बावधनकरही आत गेले. क्रॉस करतांना दाराबाहेरच्या बनकरांनी हळूच सांगितलं, "No transfer, good luck!" बावधनकरांनी किंचित मान हलवली आणि ते आत चालत राहिले.
प्लॅटफॉर्मवरच्या कोपर्यापाशी रेळेने मोबाईल काढला आणि नंबर लावला. आसपासच्या गर्दीच्या आड त्याने कोणाला तरी फोनवर काही निरोप दिला, फोन बंद केला आणि तो जिना चढू लागला. गाडी हलायला लागली. दारात उभं राहून बावधनकरांनी रेळेच्या आसपास पांगलेल्या तिघा पोलिसांना thumbs-up ची खूण केली, तिघांनी झपाट्याने रेळेला वेढून त्याचे हात धरले आणि गर्दीतून बाजूला घेतले. गाडीने वेग घेण्याआधी बावधनकरांना दिसलं की रेळेचे खिसे तपासून त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेतला गेला होता. 'Phase One complete', ते वळून नानांना म्हणाले. "Let's go find our berths."
***********
***********
पहिल्या पंधरा मिनिटांतच तिवारी सर्व प्रवाश्यांचे रिझर्वेशन्स चेक करून गेला. नाना आणि बावधनकर समोरासमोरच्या बर्थवर होते. त्यांनी मोबाईल्स वरती अलार्म्स लावून पुढच्या पाच स्टेशन्सच्या वेळा सेट केल्या, बावधनकर 'मी पूर्ण रात्रभर जागा राहतो, तुम्ही झोपा' असं म्हणाल्यावर नाना म्हणाले, "Why should you have all the fun alone?" अखेर त्यांनी आळीपाळीने दीड-दीड तास झोपायचं ठरवलं. झोपण्याआधी नानांनी राजूला फोन करून थोडक्यात ते कुठे आहेत आणि कुठे निघाले आहेत ते सांगितलं. "हो, बावधनकर आहेतच बरोबर...घेतो, घेतो, सर्व गोळ्या घेतो....हो, करेन, पण दहाच्या पुढे करेन फोन, OK? Good Night!"
"बावधनकर, नागपूरची फील्डिंग लागलीय?"
"हो सर."
"गूड नाईट!"
रात्रीतून ठरल्या वेळी स्टेशनं येत गेली, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, शेगाव आणि अकोला. प्रत्येक स्टेशनवर चित्रपटातल्यासारखे निरनिराळे लाल टी शर्ट घातलेले तरूण ब्राऊन पेपरची पाकीटं घेऊन येत गेले, तिवारी सगळी पाकिटं जमा करत गेला आणि बॅगेला कुलूप लावत गेला. तिवारीच्या अपरोक्ष, प्रत्येक स्टेशनवरून गाडी निघाल्यानंतर टी शर्टवाल्या तरूणांनी फोन केले आणि मग त्यांना साध्या वेषातल्या पोलीसांनी ताब्यात घेतलं.
साडेचार वाजता बावधनकरांना इन्स्पेक्टर बनकरांचा फोन आला. ते बराच वेळ त्यांच्याशी हळू आवाजात बोलले.
फोन झाल्यावर त्यांनी नानांना सांगितलं, "सर, तुमचा अंदाज बरोबर आहे, सगळे फोन एकाच नंबरला जातायत, सेल टॉवर triangulate करून सायबर सेलच्या लोकांनी location दिलंय, बालाघाट फॉरेस्ट रेंजमध्ये कुठेतरी महाराष्ट्र-छत्तीसगढ बॉर्डर वर आहे. Right where you placed Avinash on the map."
सकाळी ८ वाजता नाना आणि बावधनकरांनी आळीपाळीने उठून आन्हिकं आवरून घेतली. तिवारी अकोल्यानंतर त्याच्या बर्थवर बॅग साखळीने हाताला बांधून गाढ झोपी गेलेला होता. साडेआठ वाजता तो मोबाईलच्या अलार्मच्या आवाजाने उठला. पाच मिनिटांनी त्याने एक फोन केला आणि मग पुन्हा एकदा डब्यात चक्कर मारून नागपूर स्टेशन येण्याच्या तयारीत आवरून बसला.
नानांनी बावधनकरांना विचारलं, "माझं काम झालं?" बावधनकरांनी एक फोन केला आणि सांगितलं, "हो, रस्त्यात आहे, दहा वाजता पोहोचेल."
"Great!" नानांनी डायरी काढून एक नंबर शोधला आणि फोन कडे पाहिलं. "अरेच्चा, या स्मार्ट फोनचं असंच आहे, चार्ज करायला विसरलो, तुमचा फोन द्या पाहू."
बावधनकरांनी आपला फोन दिल्यावर नानांनी हवा तो नंबर डायल केला, "Good Morning, Dr. Pareira! Mane Here. Ready to make good on your promise?" पुढची पाच मिनिटं ते हळू आवाजात काही बोलले आणि फोन बंद करण्याआधी म्हणाले, Many thanks, much appreciated." ते बावधनकरांकडे वळले आणि म्हणाले, "Good luck to us! Let the fun roll." दोघे बर्थवरचं सामान आवरून खाली उतरले आणि बॅगा घेऊन इतर प्रवाश्यांच्या बरोबरीने दाराकडे निघाले.
तासभर लेट झालेली गाडी बरोबर दहा वाजता नागपूर स्टेशनात शिरली आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनवर लागली. तिवारी शांतपणे गर्दीच्या मागे राहतो आहे हे लक्षात आल्यावर बावधनकर नानांना खूण करून मागे थांबले. नाना पुढे दारापाशी जाऊन खाली उतरले. ते उतरल्याबरोबर क्षणभर बॅग घेऊन गर्दीच्या कडेला थांबले. गर्दी आजूबाजूने सरकत असतांना कुणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. नाना वळल्यावर पांढरा फुलशर्ट आणि निळ्या पॅंटमधल्या एका पन्नाशीच्या गृहस्थाने त्यांना हळू आवाजात म्हंटलं, "माने सर, मी PI गोसावी, नागपूर SID." नानांनी त्याच्याकडे पाहिलं, जुनी ओळख पटली, चंद्रपूरला असतानाची. "अरे वा, कसे आहात, गोसावी?" "छान सर, नंतर बोलू. बाहेर ग्रे कलरची इंडिका उभी आहे, ड्रायव्हर आत आहे. बावधनकर सर आले की जाऊन बसा, तो टारगेट follow करेल." इतकं बोलून गोसावी निघून गेले.
दहा एक मिनिटांनी एका दाराने तिवारी आणि दुसर्या दाराने बावधनकर उतरले. तिवारीने इकडे तिकडे पहात आळोखे-पिळोखे दिले. एका खांद्यावर रेक्झिनची बॅग आणि दुसर्या हातात अॅल्युमिनियमची बॅग घेऊन तो प्लॅट्फॉर्म नं. १ च्या स्टेशनमास्टरच्या ऑफिसकडे चालू लागला. ड्यूटी संपल्यामुळे त्याला चार्ज हँड-ओव्हर करायचा असणार हे बावधनकर आणि नानांना अपेक्षितच होतं. पुढचा तासाहून आधिक वेळ त्याने स्टेशनमास्टरच्या ऑफिसात कागदपत्र पूर्ण करण्यात आणि इतर टीसींशी गप्पा मारण्यात घालवला. नानांनी बावधनकरांना गोसावींचा निरोप सांगितला. नाना आणि बावधनकर आळीपाळीने पण अंतर ठेवून लक्ष ठेवून होते. मध्ये बावधनकरांनी काही फोन रिसीव्ह केले तर काही कॉल्स केले. साडेदहा वाजता बावधनकर प्लॅटफॉर्म नं. दोन वर गेले. त्यांना फोनवरच्या माहितीनुसार ठराविक कपड्यांत आलेले पाध्ये आणि खुणेच्या साध्या वेषातले दोन लोकल हवालदार दिसले. सव्वाअकरा वाजता तिवारी स्टेशनमास्टरच्या ऑफिसातून बाहेर पडला. त्याने कोट काढून सिव्हिलियन कपडे चढवले होते. फिकट निळी जीन्स आणि लाल Nike चा टी शर्ट. दोन्ही बॅगा हातात होत्याच. सावकाश जिन्याकडे चालत चढून तो प्लॅटफॉर्म नं. १ वरून नं. २ वर उतरला. बरोबर साडेअकरा वाजता पाध्ये पुढे झाले, तिवारीच्या शेजारी उभे राहून त्यांनी काखेतल्या शबनम मधून ब्राऊन पेपरचं पाकिट त्याच्या हातात दिलं आणि न बोलता ते प्लॅटफॉर्म नं. ३ च्या दिशेने चालत गेले. आजुबाजूला सफाईने नजर टाकून तिवारीने ते पाकीट अॅल्युमिनियमच्या बॅगेत टाकलं आणि तो पुन्हा प्लॅटफॉर्म नं. १ च्या दिशेने चालू लागला. जिन्यावरून उतरून तो बाहेरच्या दाराकडे चालू लागला तसे नाना आणि बावधनकर अंतर ठेवून त्याच्या मागे चालत गेले. स्टेशनबाहेर पडल्यावर बावधनकर तिवारीच्या जवळून पण मध्ये माणासांची गर्दी ठेवून चालत राहिले. नानांनी सावकाश चालत ग्रे इंडिकाचा नजरेने वेध घेतला आणि गाडी दिसल्यावर त्या दिशेने गेले. तिवारीने टॅक्सी स्टँडपाशी जाऊन मोकळी दिसली त्या टॅक्सीचं मागचं दार उघडलं आणि ड्रायव्हरला सांगितलं, "एअरपोर्ट चलो". बावधनकरांनी ते ऐकलं आणि ते रस्त्यावर आले. टॅक्सी निघेपर्यंत मागून इंडिका घेऊन नाना आलेले होते. बावधनकरांनी टॅक्सीला पुढे निघू दिलं आणि मग ते इंडिकाचं दार उघडून आत बसले आणि ड्रायव्हरला म्हणाले, "एअरपोर्टला चाललाय तो, चला."
दर दोन चौकांमागे जाणवेल इतका पोलिस बंदोबस्त पाहून नानांनी विचारले, "बावधनकर, ही सगळी तुमची फिल्डींग?"
"नाही हो, मी फक्त..." बावधनकर म्हणेपर्यंत त्यांचा फोन वाजला. त्यांनी स्क्रीनकडे पहात नानांना म्हंटलं, "बारिया सर..." आणि कॉल रिसीव्ह केला. ते चांगले दहा मिनिटे ऐकत होते. फोनवर त्यांनी बारियांना थोडक्यात तिवारीविषयी, आणि ते एअरपोर्ट्च्या दिशेने तिवारीला फॉलो करीत असल्याचं सांगितलं. फोन झाल्यावर म्हणाले, "सर, मी तुम्हाला म्हणत होतो की मी फक्त गोसावींना कॉन्टॅक्ट केलं होतं तुम्हाला व्यक्तिशः ओळखणारा जुना माणूस म्हणून. पण बाकी हे सारं बारिया सरांचं काम आहे, आणि एस आय डी च्या शिंद्यांचं. दोघांनाही मी आपण नागपूरला निघालो आहोत हे कळवलं होतंच. बारिया सरांनी आत्ता सांगितलं की त्यांना छत्तिसगढमध्ये ट्रकच्या मूव्हमेंटचा चॅटर मिळाला, त्यामुळे त्यांची टीम तिकडे आणि इथे दोन्हीकडे वावर वाढवतेय. बारिया सर स्वतः सकाळच्या फ्लाईटने नागपुरात आले आहेत. एअरपोर्ट पासून अर्ध्या किलोमीटरवर हॉटेल प्राईड म्हणून आहे, तिथे उतरले आहेत, आणि शिंद्यांनी म्हणे दोन कंपनीज आणून ठेवल्या आहेत गोंदियाच्या भागात."
"दॅट्स इंप्रेसिव्ह! म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत. पण हा एअरपोर्टला का चाललाय? इथून सगळ्या डोमेस्टिक फ्लाईट्सच आहेत ना?" नानांनी ड्रायव्हरकडे पहात विचारलं, "इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत का हो इथून?"
"एक रविवारची एअर अरेबियाची शारजाह्ची आहे सर, पण तेवढीच. आणि आजची फ्लाईट गेली दहा वाजता," ड्रायव्हर उत्तरला. इतक्यात त्याचा मोबाईल फोन वाजला. रस्त्यावरून नजर न हटू देता त्याने कॉल रिसीव्ह केला, "हो सर, देतो.." नानांकडे पहात त्याने फोन पुढे केला, "गोसावी साहेब, तुमच्याशी बोलताहेत."
नानांनी फोन घेतला. गोसावी म्हणाले, "माने सर, आमची डिपार्ट्मेंटची जीप तुमच्या मागे आहे ५ गाड्या सोडून. मी आणि बरोबरचे दोघे जण सिव्हिलियन ड्रेस मध्ये आहोत. बट ऑल ऑफ अस आर कॅरींग, लागलंच तर. सांगून ठेवतो. बाकी काही करायचंय?"
नाना म्हणाले, "गुड थिंकिंग, गोसावी! गाडीत वायरलेस असेल ना?..छान. मला वाटतंय एकतर एअरपोर्टच्या बाहेर, किंवा आतमध्ये लगेचच, बॅग ट्रान्सफर होईल. बाहेर झाली तर तुम्ही बॅग घेणार्या माणसाला होल्ड करा, आणि आम्ही तिवारीला होल्ड करू. पण तो आत जातो आहे असं दिसलं तर आम्हाला आत यावं लागेल. पण माझ्याकडे काही आयडी नाही. तेंव्हा तुम्ही असं करा, पुढे एअरपोर्ट सिक्युरिटीला वायरलेसनं कळवता आलं तर पहा. मी आणि बावधनकरांना तिवारीच्या पाठोपाठ शक्य तितक्या गुपचुप दाराच्या आत जाता आलं पाहिजे. कुठलंही कमोशन नको. जमेल?"
"जमेल सर, आम्ही ओव्हरटेक करून पुढे जातो मग, निघू?"
"निघा, भेटूच पुढे, आणि हे पहा, शक्यतो आर्म्ड एन्काऊंटर नको, पॅसेंजर्स असणार आजूबाजूला. ओके? टेक केअर!" नानांनी ड्रायव्हरला त्याचा फोन परत केला, थोड्याच सेकंदात मागून एक पोलिस जीप आधी इंडिकाला आणि मग पुढच्या टॅक्सीला मागे टाकून पुढे गेली.
"अहो, बावधनकर, माझा फोन करायचा राहिला राजूला, तुमच्या फोन वरून करू का? माझा चार्ज अगदीच संपत आलाय.."
"ऑफ कोर्स, सर, लावून देऊ?" नानांनी सांगितलेला नंबर कनेक्ट करून त्यांनी फोन नानांच्या हातात दिला. नाना पाच-एक मिनिटं बोलले मुलाशी, आपली खुशाली सांगितली, घरी सगळं व्यवस्थित आहे ना विचारलं. त्याने केस विषयी विचारलं असणार कारण त्याला म्हणे निलेशचा फोन आला होता. "सांग निलेशला की वी आर क्लोज, दुपारपर्यंत अपडेट देईन मी तुला. बाय."
नागपूर शहराच्या नैॠत्येला ६-७ किलोमीटर गेल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाच्या पाट्या दिसायला लागल्या. आणखी मैलभरात एअरपोर्टच्या रस्त्याला पुढची टॅक्सी वळली. त्यामागे इंडिकाही वळली.
"ड्रायव्हर, गाडीत बीकन आहे?"
ड्रायव्हरने सांगितले की आहे.
"आणि तुम्ही आर्म्ड आहात?," नानांनी ड्रायव्हरला विचारलं.
"नाही सर, पण आय डी आहे माझ्याकडे. आणि गाडीत वायरलेसही आहे..."
"गुड. आम्ही आमच्या बॅगा गाडीतच ठेवू, आम्ही उतरलो की लगेचच गाडी पार्क करून बीकन गाडीवर ठेवा आणि चालू करा, आणि लॉक करून किल्ल्या घेऊन आमच्यामागे या. एकदा आम्ही काही अॅक्शन घेतो आहे असं दिसलं की पुढे व्हा आणि बावधनकर सर सांगतील त्याला ताब्यात घ्या. आत जातो आहोत असं दिसलं तर बाहेरच थांबा, ओके?" ड्रायव्हरने 'ठीक आहे' म्हंटलं.
टर्मिनलच्या मेन गेटपाशी टॅक्सी थांबल्यावर तिच्या मागे ४ गाड्या सोडून इंडिका थांबली. तिवारीने उतरून भाड्याचे पैसे दिले आणि बॅगा घेऊन प्रवेशद्वाराकडे निघाला, त्याच्या हातात बहुधा पासपोर्ट आणि तिकिटाचे प्रिंट आऊट असावेत. लगेचच नाना आणि बावधनकरही उतरले आणि फूटपाथवरून त्याच्या मागे गेले. प्रवेशद्वारापाशी पोहोचून त्याने दरवाजापासच्या सिक्युरिटी हवालदाराला पासपोर्ट आणि तिकिटाचे प्रिंट आऊट दाखवून आत प्रवेश केला. तिवारी आपल्याला ओळखू शकेल हे लक्षात घेऊन नाना आणि बावधनकर मागे घुटमळले आणि मधल्या काही प्रवाश्यांनंतर बावधनकर पुढे झाले, त्यांनी आय डी काढून हवालदाराला दाखवला. समोरच गोसावी दिसले, त्यांनी काम केलेलं होतं, एअरपोर्ट सिक्युरिटीच्या दुसर्या जवानाने हाताने 'जा' म्हंटल्यावर ते दोघे आत गेले. पाठोपाठ गोसावीही आत आले.
पुढे गेलेला तिवारी उजवीकडे वळला. चेक इन काऊंटरकडे न जाता त्याने मोहोरा वळवला तो आतल्या एका दुकानाकडे. 'राज इंटरनॅशनल' नावाच्या टर्मिनलवरच्या झगझगीत दुकानावरच्या निऑन बोर्डवर तिथे मिळणार्या बर्याच वस्तूंची यादी सरकत होती.'बुक्स, टॉईज, सन ग्लासेस, चॉकोलेट्स,' वगैरे. तिवारी सरळ आत गेला. पुस्तकं आणि मॅगेझिन्स ठेवलेल्या भागापाशी त्याने बॅगा खाली ठेवल्या आणि एका मासिकाला हात घातला. त्याच्या पाठीमागेच दुकानात शिरलेल्या नाना आणि बावधनकरांना थोड्याच अंतरावर असलेला एक तरूण हातात तिवारीच्याच रेक्झिन बॅगसारखी बॅग हातात घेऊन पुढे सरकतांना दिसला. नानांनी बावधनकरांना आणी गोसावींना नेत्रपल्लवी केली.
दारातच उंच टाचांचे बूट घालून कॅरी-ऑन बॅगला टेकून उभे राहिलेल्या एका तरुणीला आणि विमानतळावर दुकानांचे आणि इतर चकचकीत अंतर्भागाचे फोटो काढणार्या एका दाढीधारी हौशी तरूणाला वळसा घालून नाना आणि बावधनकर दुकानात शिरले. बहुतेक सर्व डोमेस्टिक उड्डाणं दिवसाच असल्याने प्रवाश्यांची गर्दी दुकानातही बर्यापैकी होती. त्या गर्दीत आपण आणि तिवारी यात अंतर ठेवून दोघे मधोमध असलेल्या काऊंटरच्या दोन विरुद्ध दिशांना वळले. गोसावी दुकानाबाहेरच थांबले.
दुसर्या तरुणाने हातातली रेक्झिनची बॅग तिवारीच्या तशाच बॅगशेजारी ठेवली, आणि वरच्या एका फिक्शनच्या पुस्तकाला हात घातला. तिवारीने त्याच्या हातातलं मॅगेझिन परत जागेवर ठेवलं, शेजारचं एक वर्तमानपत्र उचललं आणि सहजपणे खाली वाकत डावीकडची अॅल्युमिनियमची पेटी आणि उजवीकडची, पण त्या तरुणाने ठेवलेली रेक्झिनची बॅग उचलली आणि मॅगेझिनचे पैसे द्यायला काऊंटरकडे वळला. पुढच्याच क्षणाला त्या तरुणानेही खाली वाकून उरलेली बॅग उचलली आणि हातातल्या पुस्तकाचे पैसे देण्यासाठी वळला. नानांनी खुणेने बावधनकरांना आणि गोसावींना सबूरीची खूण केली. दोघांचे पैसे देऊन झाले तसे दोघेही दुकानाच्या बाहेर पडू लागले. गोसावी दोघांपैकी पुढे असलेल्या तरुणाच्या वाटेत सरकले, आणि त्यांनी हातात धरलेलं पोलिस आय डी त्याच्या चेहेर्यासमोर धरलं, आणि शांत पण कठोर आवाजात त्याला सांगितलं, "दुकानाच्या भिंतीजवळ उभे रहा, हातातली बॅग खाली ठेवा. यू आर अंडर अॅरेस्ट." त्याने तोंड उघडून काही हालचाल करण्याच्या आत आतापर्यंत दृष्टीआड उभे असणारे दोन साध्या वेषातले पोलिस पुढे आले. त्यांनी तिवारी आणि तो तरूण या दोघांचाही मार्ग रोखला. तोवर मागून आलेल्या बावधनकरांनी आपलं आय डी दाखवत तिवारीला सांगितलं, "मिस्टर तिवारी, द गेम इज ओव्हर. यू आर अंडर अॅरेस्ट टू. स्टेप टू द साईड!" या वेळेपर्यंत दुकानातील काही लोकांना या दोघांना अटक केली जाते आहे हे लक्षात आलं, त्यासरशी लोक बाजूला सरकले. इतक्या वेळ फोटो काढणारा तरूणही कॅमेरा खाली घेऊन आ वासून वाटेतच थांबला. नानांनी त्याला बाजूला व्हायला सांगितलं, आणि बावधनकर, गोसावी आणि इतर दोघा पोलिसांना सांगितलं, "एअरपोर्ट सिक्युरिटी ऑफिसमध्ये घ्या दोघांना, इथे चर्चा नको." आतापर्यंत त्या तरुणाचा आणि तिवारीचा क्षीण विरोध झुगारून बावधनकर आणि गोसावींनी त्या दोघांच्या बॅगा ताब्यात घेतल्या होत्या. त्या दोघांना पुढ्यात घेऊन वरात एअरपोर्ट सिक्युरिटी ऑफिसकडे निघाली. एअरपोर्ट सिक्युरिटी ऑफिसमध्ये गेल्यावर आधी तिवारी आणि त्या बॅगवाल्या तरुणाला हातकड्या घालण्यात आल्या. त्या तरुणाने आपलं नाव शेख अब्बास म्हणून सांगितलं. त्याच्या हातातून घेतलेल्या बॅगमध्ये सर्व ब्राऊन पेपरची पाकिटं सापडली. पैसे जसेच्या तसे होते.
सगळेजण एका टेबलभोवती बसल्यावर नानांनी दोघांकडे पाहून म्हंटलं, "लेट मी गेस, तुम्ही दोघेही - निदान तिवारी तुम्ही- कुठेही फ्लाईटने जाणार नव्हता, राईट?" तिवारीने मान हलवली, क्षणभराने अब्बासनेही मान हलवली.
बावधनकरांनी नानांकडे पाहिल्यावर ते म्हणाले, "दिस हॅज बीन अ नोन व्हल्नरॅबिलिटी इन द एअरपोर्ट सिक्युरिटी नेशनवाईड; भारतात इ-टिकेट अस्तित्वात आल्यापासून मी आणि इतर अनेकांनी सूचना करुनही विमानतळावर आत येतांना बहुतेक ठिकाणी फक्त पासपोर्ट आणि इ-टिकेटचा प्रिंट आऊट पाहून प्रवाश्यांना आत सोडलं जातं. आय कॅन गॅरंटी यू, या दोघांनी काढलेली तिकिटं प्रिंट आऊट काढल्यानंतर कॅन्सल केलेली असणार. दॅट वे, यांच्यासारखे समाजकंटक विमानतळावर सहज प्रवेश करू शकतात. आणि आत येऊन भेट झाल्यावर राजरोसपणे, काही विसरलो आहे असं सांगून बाहेर जाऊ शकतात! आज आपल्या नशिबाने हे दोघे कॅश घेऊन आले आहेत, त्या जागी एक्स्प्लोझिव्ज असती तर?"
हे ऐकून क्षणभर सुन्न झालेल्या बावधनकरांनी लगेचच बाजूला उभं राहून बारियांना आणि शिंद्यांना फोन करून अपडेट दिले. बारियांनी 'त्या दोघांसह नाना आणि तुम्ही बंदोबस्तात प्राईड हॉटेलवर घेऊन या' असा निरोप दिला. पुढच्या पाचच मिनिटांत सर्व जण दोन गाड्यांतून प्राईड हॉटेलच्या रस्त्यावर निघाले होते.
****************
****************
प्राईड हॉटेल मध्ये पोहोचल्याबरोबर बारियांनी स्वतः बाहेर येऊन नानांचं आणि बावधनकरांचं हार्दिक अभिनंदन केलं. नानांनी बावधनकरांकडे पहात सांगितलं, "थँक्स, पण खरं तर मी यांचे आभार मानायला हवेत, इतक्या वर्षांनंतर असा अॅड्रिनालिन रश एन्जॉय करू दिला म्हणून. वेल, तुम्ही दोघं आता बाकीचे सोपस्कार पूर्ण करा, मी जरा घरी फोन करून घेतो."
बावधनकर आणि बारिया इतर आधिकार्यांबरोबर दोघा गुन्हेगारांना घेऊन डाव्या बाजूच्या कॉन्फरन्स रूममध्ये गेल्यावर नानांनी हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटर वरच्या तरुणीला त्यांचा स्मार्टफोन कुठे चार्ज करता येईल का ते विचारलं. तिने थोडं दूर उजव्या कोपर्यात असलेल्या बिझिनेस सेंटरमध्ये तशी सोय असल्याचं सांगितलं. नाना आत गेले तर आत असलेला एक हॉटेलचा पाहुणा त्याला आलेला फॅक्स घेऊन बाहेर येत होता. आत रिकाम्या असलेल्या बिझिनेस सेंटरमध्ये एका कोपर्यात नानांना फोन चार्जर्स सापडले. तिथे चालत जाऊन त्यांनी त्यांना हव्या त्या चार्जरची केबल निवडली आणि फोन जोडला. चार्जिंग सुरू झाल्याची खात्री करून एकीकडे राजूचा नंबर डायल केला. त्याला बातमी सांगतांना त्यांना मनापासून आनंद झाला होता. त्यांनी त्याला सांगितलं की ते बहुतेक गोसावींबरोबर थोड्या गप्पा मारून, जेवणही घेऊन इतक्या वर्षांनंतरचा कालावधी कॅच अप करतील, आणि जर आज बावधनकरांनी हॉटेलातच रहायचं ठरवलं तर पुढचा फोन आता दुपारची झोप काढून मगच करतील. राजूशी बोलणं संपल्यावर त्यांनी चार्जरला लावलेला फोन काढला आणि ते मागे वळले. त्यांची जवळजवळ टक्करच झाली बाजुलाच असलेल्या एका तरुणाशी. आवाज न करता आत आलेल्या त्या दाढीधारी तरुणाने नानांना बोलण्याची संधीच दिली नाही, त्याने नानांच्या डाव्या बरगडीत छोट्या रिव्हॉल्व्हरची थंड नळी खुपसली, आणि म्हणाला, "चुपचाप कसलाही आवाज न करता माझ्या बाजूने चालत रहा, सरळ हॉटेलबाहेर जायचं आहे, समोर मी बसेन त्या गाडीत बसायचं. थोडाही मूर्खपणा केलात तर मी गोळी झाडेन. नानांनी त्याच्या हाताकडे पाहिलं, 'नो नॉनसेन्स' स्मिथ अँड वेसन पीसमेकर दिसलं. विरोध न करण्यातच शहाणपणा आहे हे त्यांनी जाणलं, आणि त्याच्या बरोबर बिझिनेस सेंटरच्या आणि हॉटेलच्या बाहेर गेले. समोरच्या एंजिन चालू असलेल्या आणि ड्रायव्हर बसलेल्या क्झायलो गाडीत ते दोघे बसल्यावर दार बंद झालं आणि गाडी वेगाने बाहेर पडली. मागच्या काळ्या काचा वरती झाल्या, आणि नानांना कळायच्या आत त्या दाढीधारी तरुणाने त्यांच्या तोडावर क्लोरोफॉर्मचा बोळा दाबला.
नानांना शुद्ध आली तेंव्हा गाडी शहराबाहेर पडून कोणत्याश्या तुरळक रहदारीच्या रस्त्याने चालली होती, त्यांना भूक लागल्याची जाणीव झाली. नाना शुद्धीवर येऊन बाहेर बघताहेत हे लक्षात आल्याबरोबर शेजारच्या तरुणाने तयार ठेवलेली लांब काळी पट्टी करकचून त्यांच्या डोळ्यांवरून बांधली आणि त्यांच्या चेहेर्यावर पुन्हा एकदा क्लोरोफॉर्मचा बोळा दाबला.
****************
हॉटेलच्या कॉन्फरन्स रूम मधली बैठक संपवून आणि दोघा कैद्यांना एस आय डी पोलिसांच्या ताब्यात देऊन बारिया, बावधनकर आणि गोसावी बाहेर आले. नाना दिसत नाहीत हे पाहिल्यावर बावधनकरांनी नानांना फोन करून पाहिला, तो उचलला गेला नाही.
त्यांनी रिसेप्शन काऊंटरवरच्या तरुणीला विचारल्यावर तिने ते फोन चार्ज करून बाहेर आल्यानंतर एका क्झायलो मध्ये बसून बाहेर गेल्याचं सांगितलं. त्यांच्याबरोबरच्या व्यक्तिचं वर्णन विचारल्यावर तिने दाढीधारी तरुणाचं साधारण वर्णन सांगितलं. बावधनकर आणि गोसावी दोघांनाही तो तरुण विमानतळावर पाहिल्याचं आठवलं आणि नानांना दगाफटका झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
गोसावींनी शहराची नाकेबंदी करायच्या सूचना दिल्या, आणि तातडीने बावधनकर आणि गोसावी यांनी तिवारी आणि अब्बास यांना फैलावर घेतलं, पण तासाभराच्या कसून उलटतपासणीनंतरही त्या दोघांपैकी कुणालाच ती व्यक्ति माहीत नव्हती असं लक्षात आलं. अब्बासच्या इनक्वायरीनंतर तो इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असल्याचं, आणि मिळालेले पैसे छत्तिसगढ मध्ये एका सभासदाला देण्यासाठी जाणार असल्याचं त्याने कबुल केलं. तिवारीने त्याला फक्त पैसे गोळा करून देऊन अब्बासकडे देण्यासाठी प्रदीप रेळे या माणसाने सांगितल्याचं, आणि त्या बदल्यात पन्नास हजार रुपये मुंबईत मिळणार असल्याचं सांगितलं. अविनाश कोण आहे, याची माहिती अब्बास आणि तिवारी दोघांनाही नव्हती, असं कसून केलेल्या चौकशीत निष्पन्न झालं. रेळेची चौकशी करणं हा मार्ग होता, पण त्याची रवानगी नाशिकहून मुंबईला झाली होती. बारियांनी शिंदेंना फोन करून कल्पना दिली आणि अॅलर्ट रहायला सांगितलं.
*******************
नानांना शुद्ध आली तेंव्हा ते एका शांत बंगलीवजा घरातल्या बैठकीच्या खोलीत, खुर्चीवर हात मागे बांधलेल्या अवस्थेत बसलेले होते. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. त्या आवाजाने बाजूला बसलेली व्यक्ति उठून समोर आली. त्यांनी डोळे फोकस केले, काही क्षणात त्यांना समोरचा रुपेरी केसांचा सहा फुटी माणूस दिसला. "ओळखलं का, प्रोफेसर साहेब?" त्याने विचारलं.
मध्ये दहा-एक वर्षं उलटून गेली असली तरी नानांनी त्याला लगेच ओळखलं. "अविनाश, फायनली, वी मीट! मला कल्पना होतीच तूच यामागे आहेस म्हणून."
"पण तुम्ही या केसमध्ये गुंतलेले असाल याची मला माहिती नव्हती. इट वॉज अ ह्यूज सरप्राईझ व्हेन आय फाऊंड दॅट. लेट मी इंट्रोड्यूस माय कलिग्ज हिअर." त्यांचं लक्ष खोलीतल्या इतर दोघांकडे वेधत अविनाश म्हणाला, "हा कॉम्रेड प्रबीरकुमार, माझा बिनीचा शिलेदार." राकट पण पाणीदार डोळ्यांचा, बुद्धीमान वाटणारा बहुधा ओडिया असावा असा चाळिशीचा माणूस डावीकडे होता. "आणि या कॉम्रेड शिवकुमारला तुम्ही चेहेर्याने ओळखता, एअरपोर्ट वर बॅग एक्सचेंज झाल्याचा पुरावा हवा म्हणून आज मी त्याला फोटो काढायला पाठवलं होतं. यू शॉक मी द वे यू स्लिप्ड, खरेच म्हातारे झालात! तुम्ही बाकी सगळ्या शक्यता कव्हर केल्या, पण इतकं मोठं ऑपरेशन मी बॅक-अप शिवाय करेन असं कसं वाटलं तुम्हाला? शिवकुमारने मला ते फोटो इ-मेलने पाठवले आणि मी तुम्हाला लगेच ओळखलं. आणि हो, मलाही इथे इंटरनेट मिळतं!" नानांनी मनातल्या मनात स्वतःलाच गलथानपणाबद्दल दोष दिला.
"आता मलाच तुमची ओळख या दोघांना करून द्यायला हवी... " अविनाश म्हणाला, "हे रिटायर्ड एसीपी नानासाहेब माने. अत्यंत हुषार आणि कर्तबगार आधिकारी, पण सिस्टीमचाच हिस्सा. त्यांचं चंद्रपूरला पोस्टिंग असतांना मी त्यांच्या हाताखाली
पीएसआय म्हणून लागलो. अतिशय सुसंस्कृत पण करारी आधिकारी, पण चुकीच्या सिस्टीमच्या विरुद्ध उभं रहायची तयारी नव्हती."
"अलावू मी टू कंटिन्यू, मे आय?" इतर दोघांकडे पहात नाना म्हणाले. "हा तुमचा कॉम्रेड अविनाश आहे ना, ही वॉज अॅन इंटेलिजेन्ट ऑफिसर हिमसेल्फ, पण तो एक 'रोग ऑफिसर' होता, वन हू वॉन्टेड तू बी अ सिस्टीम अन्टू हिमसेल्फ, त्याला सत्तेची हाव होती आणि अंगात मस्ती." अविनाश कडे वळून पहात नाना म्हणाले, "ती मस्ती जिरवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी तू पोलिस खातं सोडून नक्षलवादी लीडर झालास."
"च् च् च्! आजही लेक्चर्सच देताय, प्रोफेसर! आता जीवाला धोका आहे तेंव्हा तरी शहाणे व्हा!" आपल्या सहकार्यांकडे पाहत अविनाश म्हणाला, "पोलिसात असतंनाही यांनी माझं बौद्धिक घ्यायची संधी कधी सोडली नाही. सिस्टीमच्या विरूद्ध मी तक्रार केली, हे हरामखोर राजकारणी कधी बदलणार नाहीत आणि बिनडोक जनता कधी सुधारणार नाही असं एकदा म्हंटलं, तेंव्हा यांनी मला लेक्चर झोडलं होतं, एक एक करून समाज बदलता येतो म्हणून ऐकवलं होतं, आठवतंय नानासाहेब?"
"व्हेगली आठवतंय, पण तू ऐकल्याचं काही आठवत नाही." नाना म्हणाले.
"कसा ऐकणार, तुम्ही चक्क नीतिकथा सांगायचात, एकदा तर ती इंग्रजीतल्या समुद्रावर फिरायला जाणार्या लेखकाची गोष्ट सांगितलीत, सेव्हिंग द ओशन वन फिश अॅट अ टाईम, अजून आठवतेय. लेखक नाही आठवत..."
"हं, लॉरेन आइस्ली ची गोष्ट आहे, तुला बरी आठवतेय.."
"मला आठवतेय कारण पटली नव्हती तेंव्हाही, आणि आजही त्यात फोलपणा ठासून भरला आहे असं वाटतं.."
"सांग तुझ्या या सहकार्यांना, बघू आठवतेय का."
"ओके, लेट मी एन्टर्टेन यू. हिअर गोज. बरं का कॉम्रेड्स, तो लेखक एकदा पहाटे समुद्रावर जातो आणि त्याला असंख्य स्टारफिश मासे भरतीबरोबर वाहून आलेले, पण ओहोटीमुळे किनार्यावर अडकून पडलेले दिसतात, कारण या माश्यांना पोहोता येत नाही. दूरवरून एक किरकोळ माणूस त्याच्या दिशेने चालत येतांना एक एक मासा समुद्रात फेकतांना दिसतो. त्याच्या जवळ जाऊन हा लेखक त्याला विचारतो, 'हा काय मूर्खपणा आहे, इथे हजारो मासे विखरून पडले आहेत, तू हे असे चार दोन मासे उचलून समुद्रात फेकल्याने समुद्राला किंवा त्या माशांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का तुला?' तेंव्हा तो माणूस पुन्हा वाकतो एक तडफडणारा मासा उचलतो आणि त्याला समुद्रात फेकतो, म्हणतो..."
"मेड अ डिफरन्स टू दॅट वन," नानांनी त्याचं वाक्य पूर्ण केलं, "त्या एका माश्याला पडला फरक!"
"व्हॉट अ यार्न! असा फरक पडत नसतो, आणि अशा तळागाळातल्या एक-एक व्यक्तीला जीवन देण्याच्या गोष्टी सांगणं राजकारणी लोकांना बरोबर जमतं! ऑल हम्बग! एनि वे, त्या गोष्टीचं जाऊ द्यात नानासाहेब, मी सांगतो तुम्हाला आता काय होणार आहे ते..."
"नंतर सांग," नाना त्याला तोडत म्हणाले "आधी मला सांग, मला तू नागपुरपासून दोन-तीन तासांवर कुठेतरी आणलंयस, चार वगैरे वाजले असतील, हो ना?"
'कशावरून?"
"बाहेर ऊन उतरलेलं दिसतंय, मी हॉटेलात होतो तेंव्हा एक वाजत आला होता..."
"कशावरून ते आजच घडलं?"
"भूकेवरून माझ्या पोटातल्या! आणि तू मघाशी 'आज मी त्याला फोटो काढायला पाठवलं' म्हणालास...."
"गुड कॅच! स्टिल स्मार्ट अॅज अ व्हिप! असो, तर चार वाजण्याचा काय संबंध आहे?"
"मला माझ्या डायाबेटिसच्या आणि हार्टच्या गोळ्या घ्यायला हव्यायेत, माझ्या पॅंटच्या डाव्या खिशात आहेत त्या घेऊ देणार का?"
अविनाश म्हणाला, "जरूर, शिव, सोड त्यांचे हात आणि दे पाणी त्यांना गोळ्या घ्यायला."
शिवकुमारने बांधलेले हात सोडले आणि पाण्याचा पेला नानांच्या हातात दिला, त्यांनी खांदे वर खाली करत डाव्या खिशात हात घातला, आधी फोन आणि मग गोळ्यांचं पाकिट वरती आलं. शिवकुमारने झडप घालून फोन ताब्यात घेतला आणि अविनाशकडे दिला. नानांनी गोळ्या घेतल्या, आणि अविनाशकडे पहात म्हणाले, " हं, आता सांग मला काय होणार आहे ते?"
"तुम्ही माझा प्लॅन उद्ध्वस्त केला असं तुम्हाला वाटत असेल, पण पैसे तुमच्या हाती लागले म्हणजे माझे पत्ते संपले असं नाही, आय स्टिल हॅव अॅन एस अप माय स्लीव्ह, आणि आता तुम्हाला ओलीस ठेवून मी माझे पैसेही वसूल करीन. काय म्हणता?"
"मी सांगतो तुला मला काय वाटतं ते," नाना म्हणाले, "पण आधी मला माझ्या नातवाला दोन मिनिटं फोन करू दे, कारण मी चारच्या सुमाराला फोन करतो म्हणून त्याला प्रॉमिस केलं होतं, मे आय? मी त्याला मी कशा परिस्थितीत आहे वगैरे काहीही सांगणार नाही."
थोडा विचार करून अविनाश म्हणाला, "गो अहेड, करा फोन." त्याने नानांना हातातला फोन दिला.
नानांनी राजूचा नंबर फिरवला. दोन रिंगमध्ये राजूने फोन उचलला, "अरे कोण राजू का? अमेय नाहीयेका, .....नाही मी दुपारी चारच्या सुमारास फोन करतो म्हणून म्हंटलं होतं, म्हणून केला, काम काही नाही, मी मजेत आहे, अमेय ला सांग की त्याने गेल्या आठवड्यात इन्स्टॉल केलेलं ते अॅप उत्तम चालतंय. बाकी ठीक. हो, हो, गोळ्या वगैरे घेतोय मी व्यवस्थित, काळजी नको करूस, तेवढा निरोप अमेयला नक्की सांग, ठेवतो." नानांनी घाईने फोन बंद केला, आणि अविनाशला दिला,
"थँक्स! आता सांगतो मी तुला मला काय वाटतं ते. पहिली गोष्ट, तुझा तो 'एस अप द स्लीव्ह' फार दिवस राहणार नाही. एटीसी ला सुगावा लागलाय, ते तो एक्स्प्लोझिव्ह्ज चा ट्रक नागपूरपर्यंत येऊ देणार नाहीत."
अविनाशने चमकून त्यांच्याकडे पाहिलं, "ट्रक?"
"हो, ट्रक, आणि पंधरा तारखेचा कार्यक्रम उधळण्याचं स्वप्न सोडून दे, वोन्ट वर्क!"
अविनाशने मुठी वळल्या आणि त्याच्या कपाळावरची शीर तटतटून फुगली, चांगले पंधरा-एक सेकंद काहीच घडलं नाही, मग प्रबीर आणि शिवकुमार आपल्याकडे पहाताहेत हे त्याच्या लक्षात आलं, आणि तो म्हणाला, "एक नाही तर अशी दुसरी संधी मिळेल, ...आणि तुम्ही अजून माझ्या ताब्यात आहात! मला तुमचा जीव घ्यायला कसलाही विधीनिषेध नसला तरी सरकार तुमच्यासाठी नक्कीच वाकेल. तुम्ही थोड्या वेळाने फोन करून माझ्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहात."
"दॅट वॉज माय अदर पॉईंट, अविनाश," नाना म्हणाले, "मी फोन करणार नाही. मला मरणाची भीती आहे असं तुला वाटायचं कारण नाही. तुला माझी पत्नी आठवतेय, नलिनी?"
अविनाशला संभाषणाची गाडी कुठे चाललीय ते कळेना, पण नानांच्या पत्नीचा उल्लेख झाल्यावर त्याचा चेहेरा बदलला. "मॅडमचं काय?"
"काही वर्षांपूर्वी, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला, आधी ट्रीटमेंटला दाद देतेय असं वाटलं, अतोनात हाल झाले तिचे कीमोथेरपीच्या साईड इफेक्ट्सने, मी माझ्या पोलिसी कामात नको इतका गुंतलेलो होतो, पण तशा त्रासात ती कुटुंबाला खंबीरपणे सांभाळून होती. अगदी स्वतःच्या मुला-नातवंडांचीच नव्हे तर एका अनाथ मुलीचीही खूप काळजी घेतली तिने. मग तो कॅन्सर पसरत पसरत शरीरात इतरत्र वाढला. आधी तिचं लिव्हर, मग हाडं आणि अखेरीस मेंदू, हे सगळं सगळं पोखरत पोखरत त्या व्याधीने तिचा जीव घेतला..."
"आय अॅम सॉरी!'" अविनाश म्हणाला, "मला आयुष्यात खूप आदराने वागवलं अशा मोजक्या व्यक्तिंपैकी मॅडम होत्या."
"तिच्या त्या दुखण्यात, तिच्या प्रत्येक अवयवाच्या बंद होण्यात, मी माझं एक एक मरण सहन करत गेलो, अविनाश. ती गेल्यानंतरचा प्रत्येक दिवस मी तिचं राहिलेलं जगणं जगतो आहे, तिला ज्या गोष्टींनी आनंद दिला असता अशाच गोष्टी करतो. मला स्वतःला आता मरणाचीच नव्हे तर कसलीच भीती नाही....तेंव्हा मला भीति दाखवून सरकारवर दडपण आणण्याचा वगैरे विचार करू नकोस. मी कधीही मरायला तयार आहे. यू कॅन किल मी एनिटाईम!"
आपल्या सहकार्यांकडे पाहत अविनाश म्हणाला, "व्हेरी गॅलन्ट ऑफ यू, नानासाहेब, पण त्या सरकारला तुमची ही जगण्याविषयीची अनिच्छा कुठे माहीत आहे? मला माहितीये मी वाकवेन त्यांना. आणि तुम्ही करणार नसाल फोन तर मी करेन, शेवटी डिमांड्स मलाच सांगायच्या आहेत."
"मी नाही करणार फोन, तू खुशाल कर," नाना म्हणाले.
"ऑल इन गुड टाईम, आणखी तासाभराने करु फोन. शिव, हात बांध परत आणि माझ्याबरोबर या दोघेही पुढच्या खोलीत."
*******************
******************
दुपारचे चार वाजून गेले, गोसावींनी खूप प्रयत्न करूनही त्या क्झायलो गाडीचा काहीच सुगावा लागू शकला नव्हता. बावधनकरांना राहून राहून आपल्या गाफीलपणाचा संताप येत होता.
साडे चार वाजता बारिया सर म्हणाले, "बावधनकर, मानेसरांना अविनाशने उचलले असेल तर मला खात्री आहे त्याचा रॅन्सम कॉल लवकरच येईल, आपण सरांच्या फॅमिलीला निदान कळवलं तरी पाहिजे असा गोंधळ झाल्याचं, दे मस्ट नॉट गेट इट फ्रॉम द मेडिया."
बावधनकरांना बारियांचं म्हणणं पटलं, त्यांनी बारियांच्या हॉटेल रुममधून स्पीकर फोन वापरून राजूला फोन केला, हेतू हा की एटीसी चे प्रमुख उपस्थित आहेत म्हंटल्यावर त्याला कंफर्टिंग वाटावं, आणि शक्य तितक्या शांत आवाजात त्याला सांगितलं की एकच्या सुमाराला काही संशयित नक्षलवाद्यांनी नानांना पळवून नेलं होतं, आणि पोलिस तपास जारीने चालू आहे. बारियांनीही आपल्या खात्याच्या मदतीची ग्वाही दिली.
"एक वाजता?" राजू म्हणाला, "कसं शक्य आहे? नानांचा मला आत्ता चार वाजता फोन आला होता...आणि मला त्यांचा निरोप नीटसा कळलाही नाही." त्याने अमेयसाठी आजोबांनी दिलेला निरोप शब्दशः सांगितला.
"बावधनकर," बारिया म्हणाले, "ही वॉझ ट्राईंग टू कन्व्हे अस समथिंग क्रिटिकल! मिस्टर राजीव, तुम्ही प्लीज अमेयाला आजोबांना त्याने कुठलं अॅप डाऊनलोड करून दिलं होतं ते विचारता का? आम्ही थांबतो."
"तो इथे नसतो, अहमदाबादला आय आय एम ला आहे, मोबाईल नंबर देतो त्याचा."
पुढच्या पाचच मिनिटांत अमेयाचा संपर्क झाला, त्याने माहिती दिली आणि बारियांनी बावधनकरांना टाळी मागितली, "मी काय म्हणालो? द ओल्ड चॅप इज फुल ऑफ इंटेलेक्ट! चला शिंद्यांना कॉल करू आणि कामाला लागू!"
*************
सहा वाजता अविनाशने बावधनकरांचा नंबर नानांच्या मोबाईल मध्ये शोधून त्यांना आपल्या मोबाईलवरून फोन लावला, आणि ते फोन वर आल्यावर त्यांना नानांच्या सुटकेची किंमत म्हणून तीस लाख रुपये तयार ठेवण्याची आणि तुरुंगातून त्याच्या पाच सहकार्यांची सुटका करण्याची मागणी केली. बावधनकरांनी 'सी एम ना निरोप कळवतो, दोन दिवसांची मुदत द्या' म्हणून सांगितलं. अविनाशने दोन दिवस नव्हे तर चार तासांनी फोन करतो म्हणून सांगितलं.
"तर काय मग प्रोफेसर, काय वाटतं तुम्हाला, तीस लाख आणि पाच नक्षलवादी ही पुरेशी किंमत आहे तुमच्या जीवाची?"
"पैशाची गोष्ट अलग, अविनाश, पण तुला त्या पाच नक्षलवादींच्या जगण्याशी काहीही घेणं देणं नाहीये, मान्य कर." नाना म्हणाले, "इन फॅक्ट, तुला पैसे आणि सत्ता सोडून कशाचंच, कधीच महत्व वाटलं नव्हतं."
"व्हॉट डू यू मीन?" चिडून अविनाशने विचारलं.
"म्हणजे असं," नाना शिवकुमार आणि प्रबीरकडे पाहत म्हणाले, "की तू तुझ्या निष्ठा कायम बदलत राहिलास, आधी सरकारी नोकरीत, आणि मग दलम् मध्ये जाऊन उठावाच्या नावाखाली अडाणी, निष्पाप आदिवासीची फसवणू़क करत. दहशतीच्या मार्गाने त्यांची आणि अगदी या प्रबीर-शिव सारख्या सहकार्यांचीही कायम फसगत करीत राहिलास. यांपैकी कुणावरही तू कधीही विश्वास ही ठेवू शकला नाहीस. स्वार्थ आणि भीति यांचं मिश्रण असलं ना स्वभावात, की असंच होतं!"
"नानासाहेब," चिडून अविनाश म्हणाला, "तुम्ही माझ्या सहनशीलतेचा गैरफायदा घेताय! स्टॉप इट!"
"रिअली? अरे तुझा वाळूत डोकं खुपसणारा शहामृग झालाय, आधी पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर तू भोळ्या सहकार्यांना मार्क्सवादाची, आयडियालॉजीची, तत्वांची भूल दाखवलीस. राजकारणी लोकांनी ती तत्वं हायजॅक केल्यावर तू जगभरातल्या कॉन्फ्लिक्ट जनरेशनच्या दुसर्या कुबडीची मदत घेतलीस, क्रांतीची. अशी क्रांती की जी तुला स्वतःलाच कधी झेपली नाही. ज्यांच्यासाठी तू या क्रांतीचे नारे लावलेस, त्या आदिवासींच्या परिस्थितीत काय फरक पडला तुझ्यामुळे? त्यांना दहशतीत ठेवणारे आणि अज्ञानाचा फायदा घेऊन लुटणारे बदलून त्यांच्या जागी तुझ्यासारखे आले!"
"खोटंय हे, हा असाच प्रोपॅगंडा करतात तुमच्यासारखे बुद्धीभेदी."
"प्रोपॅगंडा नाही, डोळे उघडून जगभरात बघ, नायजेरिया, सुदान, एरिट्रिया, इथिओपिया, मध्य-पूर्वेतले देश, सगळीकडे तुला एकच दिसेल, जुने तंटे सोडवण्यासाठी आता तत्ववादाची किंवा सशस्त्र क्रांतीची गरज नाहीये, लोकांना महत्व कळतंय ते रिसोर्सेसचं - नैसर्गिक संपत्ती सांभाळण्याचं. तुला आदिवासीचं खरंच भलं करायची इच्छा असेल तर त्यांच्या नैसर्गिक संपत्तीची लुटालुट थांबेल असं बघ. आहे हिंमत ते नेतृत्व देण्याची?"
"मी ते केल्याने हे असे जीवाला जीव देणारे सहकारी मिळतील?" शिव आणि प्रबीरक्डे पहात अविनाश म्हणाला.
"जीवाला जीव देणारे? पोलिसी हिसका बसल्यावर दहा मिनिटांत पोपटासारखे बोलणारा रेळे तुझाच सहकारी ना? मी खरं तेच सांगतो, तुझ्या आयुष्यात आलेल्या नीता सोडून तू कुणाशीही नातं जुळवू शकलेला नाहीस, खोटंय का हे?"
"नीता?" अविनाश चपापला.
"हो, तुला वाटलं की मला माहीत नाहीये? दहा वर्षांपूर्वी नऊ महिन्यांची ती गर्भारशी पोर तुझ्या तत्वज्ञानावर विश्वास टाकून रानावनात फिरली बंदुक हातात घेऊन, बाळंतपणात देखील तू तिची धड काळजी घेतली नाहीस, जीव गेला पोरीचा तुझ्या महत्वाकांक्षेपायी!"
"नानासाहेब!"
"का? ऐकवत नाहीये सत्य?"
"मी घेतली काळजी तिची, आणि इतरांचीही..."
"नाही, तिची नाही घेतलीस, तिच्या बाळाची घेतलीस, अनिलची."
"अनिल??"
"हुं, अनिल, अविनाश आणि नीताचा अनिल."
"तुम्हाला काय माहितीये?" अविनाशचा आवाज घोगरा झाला.
"मला सगळं माहितीये, त्याला तू पुण्याला कुठल्या घरात ठेवलंयस आणि तो कुठल्या शाळेत जातो ते..."
"नाना!" अविनाश ओरडला. "काय केलंत तुम्ही अनिलला? कुठे आहे तो?"
"किंचाळू नकोस! इट वॉज आयरॉनिकल यू ब्रॉट अप दॅट स्टोरी ऑफ सेव्हिंग वन फिश अॅट अ टाईम! अनिल तुझ्याच छायेत वाढला असता तर तसाच स्वार्थी आणि तत्वहीन झाला असता तुझ्यासारखा, मोकळ्या समुद्रापासून दूर तडफडणारा आणखी एक मासा, बट नो मोअर! आय सेव्ह्ड दॅट वन!"
"तुम्ही थापा मारताय."
"कॉल माय ब्लफ, कर चौकशी," नाना म्हणाले.
पुढचे पंधरा मिनिटे अविनाश वेड्यासारखा फोनवर फोन करून खात्री करून घेत होता. शेवटी हताश होऊन नानांना म्हणाला, "मी सोडेन तुम्हाला, अनिलला परत करा."
"अच्छा, म्हणजे माझ्या जीवाची किंमत पाच नक्षलवादी बदलून स्वतःचं पोर अशी झाली तर आता!"
शिव आणि प्रबीर अविनाशकडे पहात होते.
"निदान कुठे आहे ते सांगा."
"नॉट गोइंग टू हॅपन! तो आहे तिथे सुरक्षित आहे, आणि सूज्ञ नागरिक म्हणून वाढेल."
"तो कुणाकडे आहे त्यांचा फोन नंबर द्या, फक्त बोलतो त्याच्याशी!"
"सॉरी, प्रामाणिकपणे सांगतो, माझ्याकडे तो फोन नंबरही नाही, तुला त्याला भेटण्याचा एकच मार्ग आहे... एसीपी बावधनकरांना फोन कर."
इतक्यात प्रबीरच्या हातातला फोन वाजला. त्याने मिनिटभर ऐकलं आणि फोन ठेवला, "कॉम्रेड, मानेगाव, लांजी आणि खैरागढचे रस्ते ब्लॉक करून एस आय डी च्या कंपन्या जंगलात येतायेत. आपलं लोकेशन कळलंय असा मेसेज आहे!"
"लोकेशन कळलं? कसं?" अविनाशने विचारलं "माझा सिम ट्रेस होणं शक्य नाही!"
नाना हसले, "तुझा नाही, माझा!"
"तुम्ही मुलाला फोन केलात...."
"येस! आणि त्या फोनमधल्या गूगलच्या लॅटिट्यूड अॅपवरून पोलिसांना या जागेचं एक्झॅक्ट लोकेशन मिळालंय! इंटरनेट झिंदाबाद!"
अविनाशने प्रबीर आणि शिवकडे पाहिलं. प्रबीरने म्हंटलं, "कॉम्रेड, या कंपन्या महाराष्ट्रातून येतायत, बैहर पास ओपन असेल छत्तिसगढचा, तिथून जाऊ शकू आपण."
"आय वुडंट टेक अ चान्स," नाना म्हणाले, मी ऐकलं की एटीएसचे कमांडोज नॉर्थ कडूनही येतील, बट इट्स युअर कॉल!"
अविनाशने सर्वांकडे एकदा पाहिलं, आणि काहीतरी मनाशी निर्णय घेतला. दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, "नानासाहेब, तुमच्या आयुष्याच्या या वळणावर तरी, यू डिझर्व् सम ऑनेस्टी फ्रॉम मी. लेट्स से यू मे हॅव सेव्ह्ड अनदर फिश टुडे.
कॉम्रेड शिव...,कॉम्रेड प्रबीर, मला वाटतं माझ्या जगण्यातला फोलपणा मला जाणवला आहे. पण तुम्ही दोघे आणि इतर जण मोकळे आहात तुम्हाला हवा तो विचार करायला आणि हवं त्या रूटने निघायला. मी थांबणार आहे इथेच, नानासाहेबांबरोबर. गुड बाय!"
प्रतिक्रिया
12 Nov 2012 - 3:54 pm | चौकटराजा
फेडरिक फोर्सिथ यानी मिपावर आयडी घेतली का काय ?
12 Nov 2012 - 6:02 pm | श्रावण मोडक
बारकावे, तपशिलांचा नेमकेपणा, कथनाची शैली... कथा सलग वाचली.
13 Nov 2012 - 10:54 am | तुषार काळभोर
अगदी!
कथेची लांबी पाहून आधीच वाटलं वाचावी की नाही, पण २-३ मिनिटातच कथेनं पकड घेतली आणि मग स्टार्ट टू फिनिश संपवली.
मस्स्त!!
13 Nov 2012 - 3:34 pm | शैलेन्द्र
स्टार्ट टु फिनिश.. वन गो.. मस्त...
13 Nov 2012 - 3:41 pm | तिमा
एकदा वाचायला घेतल्यावर कधी संपली ते कळलंच नाही. तुम्ही पोलिस खात्यात होता का हो ?
एक उत्तम सिनेमा निघू शकेल याच्यावर!
13 Nov 2012 - 7:19 pm | स्मिता.
लेखकाचं नाव वाचूनच उत्साहाने कथा वाचायला घेतली आणि पूर्ण वाचूनच संपवली. खरं तर कथा खूप मोठी होती पण कथानकाने असा काही मनाचा ताबा घेतला होता की किती उरलीये हेसुद्धा बघायचं भान उरले नाही. मस्तच!
14 Nov 2012 - 12:46 am | इष्टुर फाकडा
खंग्री, खतरनाक, चाबूक, जबरी, झिन्गो. दंडवत घ्या हो मास्तर !! डोळ्यासमोर जसाच्या तसा सर्व पट उभा राहिला आहे. आलरेडी दहा तास काम करून पोटात भुकेचा डोंब उसळलेला असतानाही या कथेने मला अजूनही थांबून ठेवलंय !!
तूळणा नसे तूळणा नसे.
14 Nov 2012 - 7:52 am | ५० फक्त
मस्त लिहिलंय, खुप दिवसांनी असं काही वाचलं, धन्यवाद.
14 Nov 2012 - 8:49 am | नगरीनिरंजन
उत्तम रोमांचकथा!
14 Nov 2012 - 12:31 pm | एकुजाधव
जबरदस्त कथा
15 Nov 2012 - 8:10 am | इन्दुसुता
कथा आवडली.
तपशीलांचा नेमकेपणा, ओघवती शैली, भाषेतला स्वच्छ नेमकेपणा ( सुरुवातीच्या शिव्या सोडल्यास) आणि शुद्धलेखन यामुळे ही आंतर्जालीय कथा दीर्घ असून देखील अतिशय वाचनीय झाली आहे.
15 Nov 2012 - 8:44 am | आजानुकर्ण
मस्त रंगलेली रोमांचक कथा
15 Nov 2012 - 9:30 pm | रेवती
थरारक कथा. डोळ्यासमोर सगळं येत गेलं आणि मध्येच असलेल्या छायाचित्रांमुळे छान वाटलं. एखाद्या साध्या, सोप्या वाटणार्या गोष्टीचा कुठल्या कुठे संबंध असतो म्हणून आश्चर्य वाटले. खर्या पोलिसांकडे अश्या कितीतरी थरारक गोष्टी असतील याची कल्पना केलेलीच बरी. एका बैठकीत धागा वाचून काढला. फोटोग्राफरकडे दुर्लक्ष केल्याक्षणी थोडी कुणकुण लागली आणि ही गोष्ट नानांच्या नजरेतून कशी सुटली असे मनात आलेच.
16 Nov 2012 - 12:16 pm | बॅटमॅन
थरारक, ढिंचांग, खत्तर्नाक, नादखुळा, लै भारी, जबरा, जिकलेला, एक नंबर, माहोल, इ.इ.इ. अस्सल मराठी विशेषणे कमीच पडतील अशी कथा. वर म्हटल्याप्रमाणे फेडेरिक फोरसीथ यांनी मिपावर आयडी घेतलेला दिसतोय.
17 Nov 2012 - 12:39 am | चतुरंग
अशा रेकमेंडेशननुसार काल संध्याकाळी हापिसातून घरी येताच कथा वाचायला बसलो आणि ४५ मिनिटं कशी संपली समजलंही नाही! कथानकाची अतिशय घट्ट आणि सुसूत्र बांधणी, पकड घेणारा वेग, अतिशय बारकाईने लिहिलेली प्रसंगाची वर्णने, व्यक्तिरेखा उभ्या करण्याचे कसब अशा अनेक वैशिष्ठ्यांनी नटलेली ही कथा बराच काळ मनात रेंगाळली. छोट्या वाटणार्या गोष्टी किती मोठ्या पटाचा भाग असतात हे अधोरेखित झाले. अभिनंदन बहुगुणी!
-चतुरंग
17 Nov 2012 - 3:55 am | बहुगुणी
ही कथा लिहायला सुरूवात केली तेंव्हा डोक्यात कथानक आणि घटना पक्क्या होत्या, पण ती इतकी दीSSर्घ होईल अशी अपेक्षा नव्हती! ;-) तुम्ही अखेरपर्यंत धीर टिकवून कथा वाचलीत यातच सर्व आलं, धन्यवाद!
(तुमचं कौतुक वाचून एका जवळच्या स्नेह्याने मी ' या कथाविषयाशी सुतरामही संबंध नसणारा सध्याचा पोटा-पाण्याचा व्यवसाय सोडून यापुढे लेखनातच करियर करावं ' असाही सल्ला दिला! तो मानण्याची अर्थातच माझी हिंमत नाही माझी कुवत ओळखून, पण तरीही आपल्या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार!)
कथाविषयाची निवड करतांना मी स्वतःला नेहेमीचेच दोन प्रश्न विचारले होते: मुख्य कथासूत्र अर्थातच काल्पनिक असलं तरी यातली प्रत्येक लहान-सहान घटना सहज घडणं शक्य आहे का? दिलेले तपशील वास्तविक आहेत का? उत्तर 'हो' असं आलं तरच लिखाण करायचं हे ठरलं होतं. त्याच्याशी किती प्रामाणिक राहिलो ते तुम्ही ठरवायचं.
जाता जाता: या कथेतील सर्व पात्रं आणि प्रत्यक्ष कथानक हे काल्पनिक असले तरीही कथेचे नायक असलेले नानासाहेब हे व्यक्तिमत्व मात्र खरे आहे, कधी तरी त्यांची आपल्याला भेट घडवेन.
आणि एक डिसक्लेमरः १५ डिसेंबरला होऊ घातलेला नागपूरचा पंतप्रधानांचा कार्यक्रमही खरा आहे, या कथालेखनानंतर कोणा माथेफिरूने तो उधळण्याची दु:स्वप्न पाहू नयेत हीच सदिच्छा!
18 Nov 2012 - 9:17 pm | सस्नेह
जबरदस्त चातुर्यकथा !
सुरुवात वाचून मनाची पकड घेतली. पण मोठी असल्याने सलग वाचायला जमले नव्हते. आता वाचून झाली.
अतिशय वेधक अन उत्कंठावर्धक वाटली.
19 Nov 2012 - 12:30 am | सुनाम
तुमच्या अप्रतिम कविता, नात्यान्मधुन फुलणारी कथा,विज्ञान कथा, सामाजिक बान्धिलकी जपणारे वैचारिक ललित लेख ,कधी कधी अभिनव पाककृती देखील वाचल्या.आता चक्क "दक्षता" च्या धर्तीवरची कथा! तुमच्या "क्राउनिंग ग्लोरी" खाली दडलय काय?
19 Nov 2012 - 6:23 am | स्पंदना
देवा शप्पथ खर बोलेन, खोट बोलणार नाही. आज जर डोक्यावर हॅट असती तर हातात घेउन दहादा लवुन कुर्निसात केला असता. अर्थात हॅट नसली तर काय झाल? मी जेव्हढे आहेत तेव्हडे केस हातात धरुन (डोक्याला चिकटलेलेच) मी कुर्निसात करतेय अस कल्पावे!
किती बारकावे? किती चोख लेखन? कितिदा एडीट केल असेल तुम्ही स्वतः? सुरेख! दिवाळी अंकाला अगदी चार चाँद लागले बहुगुणी . मेन म्हणजे दिवाळीच्या गदारोळात न वाचता आता अगदी निवांत वाचुन कथेचा आनंद घेतला.
24 Nov 2012 - 2:00 pm | नाखु
व कृ नंतर तश्याच दमाची एक मस्त दी$$$$$$$$$$र्घ कथा....
24 Nov 2012 - 5:01 pm | पैसा
अगदी पकड घेणारी कथा!
25 Nov 2012 - 1:25 pm | चेतन
मस्तच झालीय कथा
हॅट्स ऑफ टु यु,,
बाकी तो एअरपोर्टवरचा प्रसंग खास (एक अडाणि प्रश्न. हे काम इतर कुठल्याही ठीकाणी करता आलं असतं एअरपोर्टच का? )
चेतन
27 Nov 2012 - 12:05 pm | घाशीराम कोतवाल १.२
खुप दीवसांनी एव्हडी मस्त कथा वाचली मजा आली
29 Nov 2012 - 9:31 pm | कवितानागेश
मस्तच आहे कथा. खूप आवडली. :)
16 Dec 2012 - 12:46 am | एस
पण जेव्हा वाचला तेव्हा दिवाळी अंकात सगळ्यात शेवटी का वाचला ह्याबद्दल कितीदा पश्चाताप झाला असेल मलाच माहीत. इतकी अप्रतीम थरारकथा मराठीत तरी बर्याच दिवसांत वाचली नव्हती. लिहीत रहा ही विनंती..
1 Jan 2013 - 7:24 pm | यशोधरा
कथा एकदम आवडली, एखाद्या सणसणत येणार्या गोळीसारखी आहे!
फक्त अविनाशचं अचानक झालेलं मतपरिवर्तन फारसं पटलं नाहीं :)
13 Jan 2013 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
एवढी मोठी गोष्ट मी कधीच सलग वाचत नाही... अशा कथेचा फार्फार कमी अपवाद वगळता. शेवट जरा वास्तवापासून दूर वाटला... पण तुमची लेखनशैली जबरदस्त आहे.
तुमच्या स्नेह्याचा लेखनात करियर करण्याच्या पर्यायाचा गंभीरपणे विचार करायला अजिबात हरकत नाही.
6 Feb 2013 - 2:32 am | श्रीरंग_जोशी
या कथेतील बहुतांश ठिकाणी मी गेलेलो असल्याने मला तर प्रत्यक्ष चित्रपट पाहत असल्यासारखे वाटले.
शिकागो आय - ९४, नागपूर रेल्वे स्टेशन, प्राईड हॉटेल व विमानतळ इत्यादी.
14 Feb 2015 - 1:51 am | रुपी
शेवटपर्यंत खिळवून ठेवलं!
7 Oct 2015 - 10:57 pm | बोका-ए-आझम
टोपी काढण्यात आलेली आहे! __/\___
8 Oct 2015 - 12:46 pm | vishal jawale
जबराकूच आहे कथा. आवडली.
9 Oct 2015 - 1:29 pm | ब़जरबट्टू
हा धागा वर आणल्याबद्दल आभार बोका... :)
जबरी कथा..
9 Oct 2015 - 3:01 pm | प्यारे१
मस्त कथा.
आणि सुन्दर तपशीलवार पटकथा. नानांच्या रोल साठी अनुपम खेर चालेल.
16 Oct 2015 - 9:32 am | बोका-ए-आझम
अविनाश - आशिष विद्यार्थी.
9 Oct 2015 - 6:21 pm | बाबा योगिराज
भेष्ट
9 Oct 2015 - 7:02 pm | चुकलामाकला
शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा!
10 Oct 2015 - 1:03 am | अनिरुद्ध.वैद्य
मस्त!
15 Oct 2015 - 1:39 pm | स्नेहल महेश
अप्रतिम
शेवटपर्यंत खिळवून ठेवलं!
15 Oct 2015 - 4:48 pm | पिलीयन रायडर
एक नंबर!! एका दमात वाचुन काढली.. ते पण ऑफिसमध्ये चोरुन चोरुन!!
16 Oct 2015 - 8:47 am | अभिजितमोहोळकर
असेच म्हणतो.
16 Oct 2015 - 11:01 am | अनामिक२४१०
वा...अप्रतिम
एका दमात पूर्ण वाचली …
कथेमधली लोकेशन्स डोळ्यासमोर आली
12 Nov 2015 - 6:39 pm | मुक्त विहारि
ये वाचनेका रह गयेला था...
कथे कु सेव्ह करके रख दिया हय...
वाखूसा का नाही?
14 Nov 2015 - 3:03 am | अस्वस्थामा
अप्रतिम बहुगुणी राव.. मजा आली वाचून.. :)
14 Nov 2015 - 9:23 pm | नूतन सावंत
अप्रतिम थरारकथा.वाचायला मजा आली.एसीपी बावधनकर आणि नानासाहेब माने यांच्या आणखी कथा आहेत का? असल्यास दुवे मिळू शकतील का? सं.मं.ला विनंती,सदस्याचे इतर लेखन ही सुविधा सुरू होऊ शकेल का?