साहित्यः २ वाट्या काकडीचा कीस, २ वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, हळद चिमुटभर, मीठ, वेलची पावडर, रवाळ तांदूळ पीठ २ वाट्या, हळदीची पाने ७/८
कृती:हळदीची पाने स्वच्छ धुवावीत. पुसून घ्यावीत. तवसं म्हणजेच जून काकडी किसून घ्यावी. नारळ खवून घ्यावा. जेवढा कीस असेल तेवढा गूळ घ्यावा. तांदुळाचे रवाळ पीठ घ्यावे. रवाळ पीठ नसल्यास त्यात चार चमचे रवा मिसळावा. कीस आणि गूळ कढईत एकत्र करून गॅसवर ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ. हळद घालावी. गूळ विरघळला की त्यात मावेल तेवढे तांदळाचे पीठ मिसळावे. वाफ काढावी. मिश्रण असे दिसेल. वेलची पावडर घेतलीय पण खरं तर याला हळदीचाच छान स्वाद येतो.
मिश्रण गार करण्यास ठेवावे. हळदीची पाने अर्ध्यावर दुमडून घ्यावीत. त्याच्या पाठच्या बाजूला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर एका बाजूला तयार मिश्रण थापावे. पुढीलप्रमाणे
एका पातेल्यात पाणी घ्यावे. त्यात एक पसरट डबा ठेवावा. त्यातही पाणी घ्यावे. त्यावर चाळण ठेवावी. चाळणीत एखादी वाटी ठेवावी. वाटी भोवती तयार पाने उभी करावीत.
त्यावर झाकण ठेवावे. पंधरा मिनिटे वाफ काढावी. पातोळे तयार आहेत. साजूक तूपाबरोबर खावे.
प्रतिक्रिया
27 Sep 2015 - 1:08 pm | एस
अरे वा! पातोळ्यांच्या पाककृतीचे दोन धागे लागोपाठ आले! झकास.
पातोळ्यांना हळदीच्या पानांचा छान स्वाद येतो.
27 Sep 2015 - 1:09 pm | पैसा
कृती व्यवस्थित दिली आहेस अन फोटो खासच आलेत!! कधी येऊ?
27 Sep 2015 - 1:18 pm | प्रभाकर पेठकर
हे मोदकांसारखं सारण आणि आवरण वेगवेगळे न घेता दोन्ही एकत्र कालवून कालवून मोदकाचेच चुलत भावंड वाटते आहे.
हळदीच्या पानामुळेही सुंदर स्वाद येत असणार.
साखर-गूळ वर्ज आहे, नाहीतर नक्कीच करून पाहिले असते.
27 Sep 2015 - 3:01 pm | पैसा
आणि असेच तांदुळच्या रव्याचे उकडून केलेले प्रकार म्हणजे तांदुळाच्या रव्यात फणसाचा/आंब्याचा रस घालून उकडलेली सांदणे किंवा नुसते तांदुळाच्या रव्यात खोबरे-गूळ घालून उक्डलेली खांडवी. या दोन्हीच्या ताटात थापून मोठ्या वड्या कापून खायच्या.
28 Sep 2015 - 11:30 am | अदि
पानगी काय असते??
28 Sep 2015 - 12:01 pm | पैसा
28 Sep 2015 - 12:26 pm | सस्नेह
पाकृ पाकृ....!
28 Sep 2015 - 1:20 pm | पैसा
तांदुळाचं पीठ गूळ आणि किंचित मीठ घालून पातळसर भिजवायचं. भाकरीच्या पिठापेक्षा सैल पण भज्याच्या पिठापेक्षा घट्ट. ते पीठ केळीच्या पानात सारवायचं (लिंपायचं). वरून पानाची घडी घालून/दुसरे पान ठेवून झाकायचं. मग पानाची घडी तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजायची. तेल बिल काही नको. खरपूस भाजले की उतरवून पाने सोडवून गरम गरम पानगी लोणी/तुपाबरोबर गट्टम करायची. मला हळदीची पाने संपवायची होती म्हणून हळदीच्या पानात केल्या. केळीच्या पानात पण करतात.
28 Sep 2015 - 3:27 pm | पूर्वाविवेक
आमच्याकडे पण करतात गौरीला. पण पिठात केळ कुस्करून घालतात
6 Oct 2015 - 11:15 am | नाखु
हळदीच्या पानात केल्या तर हळदीचा वास नाही लागणार का?
27 Sep 2015 - 2:50 pm | प्रचेतस
ह्या पातोळ्या पण सुंदर झाल्यात.
27 Sep 2015 - 3:33 pm | स्वाती दिनेश
छानच दिसत आहेत ग,
स्वाती
28 Sep 2015 - 5:03 am | रेवती
पाकृ व फोटो आवडले. हळदीची पाने मिळतील असे वाटत नाही पण केळीची मिळाली तरी हा पदार्थ करण्याची तयारी आहे.
28 Sep 2015 - 7:40 am | कविता१९७८
छान रेसिपी, फोटो झक्कास
28 Sep 2015 - 8:10 am | सुहास झेले
मस्तच... :) :)
28 Sep 2015 - 9:12 am | अनन्न्या
पैताई, कधीही ये...फक्त पाने आहेत तोपर्यंत!
28 Sep 2015 - 12:00 pm | पैसा
नक्की! पण आता ते पुढच्या वर्षी गौरींबरोबर!
28 Sep 2015 - 10:57 am | पद्मावति
छानच दिसताहेत. मस्तं पाककृती आणि फोटो.
28 Sep 2015 - 11:31 am | अदि
पाककृती
28 Sep 2015 - 12:26 pm | सस्नेह
सुंदर दिसताहेत. तोंपासू.
28 Sep 2015 - 1:20 pm | सूड
अरे का पातोळ्यांची आठवण काढताय!!
28 Sep 2015 - 3:28 pm | पूर्वाविवेक
पातोळ्या आणि पानग्या दोन्ही मस्त !
28 Sep 2015 - 4:04 pm | सानिकास्वप्निल
अरे बास ना !! किती छळता गं ;)
दुष्ट आहेस तू आणि पैताई, पातोळ्यांसाठी हळदीची पाने कुठून आणु गं बाई...
काय देखणे फोटो आहेत गं, झक्कास!!
28 Sep 2015 - 4:15 pm | अनन्न्या
आता तुला कुणाकडे यायला जमतेय बघ.
7 Oct 2015 - 2:34 pm | दिपक.कुवेत
काय तोंपासू कलर आलाय. द्या ईकडे पाठवून
7 Oct 2015 - 2:57 pm | जागु
छानच पाककृती.