गेल्या आठवड्यात लेकाच्या हाऊसमेटने बनवलेली चिली लेकाला फार आवडली. लेकाने चिली हाणली कळल्यापासून नवर्याची भुणभुण सुरु होती, आपण पण करुया म्हणून. तेव्हा या विकेंडला चिली आणि कॉर्नब्रेड असा बेत केला. आमच्याकडे नेहमी व्हाईट चिकन चिली केली जाते. हाऊसमेटची रेसीपी बीफवाली आणि बेताच्या मसाल्याची. तेव्हा त्यात आमच्या चवीला रुचणारे बदल करुन टर्की चिली बनवली. मस्त झाली म्हणून इथे रेसीपी टाकतेय.
टर्की चिली
साहित्य
१ पाउंड टर्की खीमा
३/४ कप राजमा रात्रभर पाण्यात भिजवून कुकरमधे शिजवून घेतलेला ( साधारण १५ औस कॅन्ड किडनी बिन्स )
१ मोठा कांदा बारीक चिरुन
१ मोठी बेलपेपर बारीक चिरुन
५-६ पाकळ्या लसूण बारीक चिरुन
१ १/२ टे स्पून तेल
डाईस्ड टोमॅटोचे दोन कॅन,१४.५ औस वाले ( साधारण ३ कप बारीक चिरलेले टोमॅटो )
१/२ टी स्पून मीठ
तिखट चवी नुसार
चेडर चीज वरुन भुरभुरवण्यासाठी ( वापरले नाही तरी चालेल)
मसाला:
१ हलापिनो पेपर बीया काढून चिरुन (नसल्यास तिखट्/कायान पेपर १ टीस्पून)
१ टे स्पून वुस्टरशायर सॉस
१ टी स्पून पाप्रिका
१ टेस्पून ड्राइड ओरॅगानो
१ टे स्पून जीरे पावडर
१/२ टी स्पून पोल्ट्री सिझनिंग (नसले तरी चालेल)
१/२ टी स्पून भरड मिरे पावडर
१/२ टीस्पून कोको पावडर(नसल्यास चालेल )
कृती
मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. तेल तापले की बारीक चिरलेला कांदा घालून परतायला लागा. दोन मिनीटे परतून मीठ घाला आणि अजून २-३ मिनिटे परता. कांद्याचा रंग थोडा बदलू लागला की त्यात चिरलेली बेलपेपर आणि लसूण घालून परता. लसूण करपू नये म्हणून सतत ढवळत रहा. २-३ मिनीटे परतून मिश्रण पातेल्यातच एका बाजूला सारून त्यात टर्कीचा खीमा घाला. टर्कीचा रंग लगेच बदलायला लागेल. खीमा साधारण ३-४ मिनीटे मोडून परता आणि कांद्याचे मिश्रण त्यात नीट मिसळून घ्या. आता त्यात मसाल्याचे सर्व घटक घालून परता. कॅन्ड टोमॅटो घाला. ताजे टोमॅटो घालणार असाल तर जोडीला साधारण १ कप पाणी घाला. नीट ढवळून आच वाढवा. मिश्रणाला उकळी आली की त्यात शिजवलेला राजमा घालून ढवळा. झाकण ठेवून ३०-४० मिनीटे मंद आचेवर ठेवा. झाकण उघडून ढवळा आणि चव बघा. आता त्यात चवीप्रमाणे तिखट घाला आणि गरज वाटल्यास अजून थोडे मीठ घाला. झाकण लावून अजून ५ मिनीटे स्वाद मुरला की आच बंद करा.
बोलमधे गरम गरम चिली वाढून त्यावर आवडत असल्यास वरुन चमचाभर चीज घाला. सोबत कॉर्नब्रेड. यम्मी!
प्रतिक्रिया
5 Oct 2015 - 9:30 pm | कविता१९७८
वाह छानच
5 Oct 2015 - 10:03 pm | पद्मावति
वाह, मस्तं पाककृती.
5 Oct 2015 - 10:11 pm | सायकलस्वार
नावावरून मला वाटलं दोन देशांचं प्रवासवर्णन आहे ;)
5 Oct 2015 - 10:54 pm | राघवेंद्र
+१ सलाम
5 Oct 2015 - 10:53 pm | सूड
वाचून गेलो आहे.
6 Oct 2015 - 1:02 am | रेवती
कालच व्हेज. चिलीची आठवण आली आली होती. मला काही तो प्रकार करता येत नाही पण सानिकेच्या कृतीनं रिफ्राईड बीन्स टाकोज साठी राजमा भिजत घातला आहे. तुमची कृती व फोटू दोन्ही आवडले. कॉर्न ब्रेड मी एकदाच खाल्लाय.
अवांतर- २ दिवसांपूर्वी ४ मोठे टर्कीज इथे आसपास भटकून परत जंगलात निघून गेले.
6 Oct 2015 - 9:05 am | कैलासवासी सोन्याबापु
ह्या रेसिपी आम्हाला सत्यनारायण कथे सारख्या असतात, समुग्री ते विधी कळत शष्प नाही पण खवैय्ये असल्यामुळे भक्तिभाव पुर्ण असतो! असा हा आमचा बिन शिर्याचा खाद्यनारायण आउटलुक
6 Oct 2015 - 1:49 pm | नूतन सावंत
करून पाहण्याजोगी सुरेख पाककृती दिसतेय.
6 Oct 2015 - 1:49 pm | नूतन सावंत
करून पाहण्याजोगी सुरेख पाककृती दिसतेय.
6 Oct 2015 - 4:19 pm | सानिकास्वप्निल
छान आहे पाककृती, चिकन वापरुन ट्राय करेन.
6 Oct 2015 - 4:55 pm | स्वाती२
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार.
या पाकृत चिकन वापरणार असाल तर -
बोनलेस, स्किनलेस चिकनचे तुकडे राजमा घालतो त्या स्टेजला घालायचे. किंवा बोनइन, स्किनवाले चिकन ब्रेस्ट अर्धा तास ओवनमधे बेक करुन मग त्याचे बोस, स्किन काढून तुकडे राजमा बरोबर घालायचे. ग्राउंड चिकन वापरणार असाल तर नुसत्या बोनलेस ब्रेस्टचे नको, खूप ड्राय होते. मला स्वतःला चिकनची व्हाइट चिली आवडते.
6 Oct 2015 - 8:20 pm | स्वाती दिनेश
छान दिसतेय टर्की चिली.. करून पाहते.
स्वाती
7 Oct 2015 - 2:29 pm | दिपक.कुवेत
करणं अवघड दिसतयं.
7 Oct 2015 - 2:41 pm | टवाळ कार्टा
टर्की कुठे सापडेल?
7 Oct 2015 - 2:54 pm | दिपक.कुवेत
लगेच करणारचं आहेस!! आता तुझी टर्की आणायची वेळ झाली आहे....ह्या काय पकडत बसलायसं..
7 Oct 2015 - 2:58 pm | टवाळ कार्टा
खिक्क....रच्याकने मी टर्की एकदा खाल्ली आहे...सबवे मध्ये मिळते पण त्यात चव समजत नाही
7 Oct 2015 - 3:04 pm | दिपक.कुवेत
पण खायचा आणि करायचा अनुभव शुन्य असल्याने एका गोवन मित्राला दिली. त्याचा ख्रिसमस जोरदार झाला.
7 Oct 2015 - 3:14 pm | प्यारे१
माई मोड .....
टर्की कशाला? नाकी डोळी नीटस सुबक ठेंगणी आण हो टक्कूमक्कूशोनू.
माई मोड .....
7 Oct 2015 - 3:19 pm | दिपक.कुवेत
तुच टक्याची टर्की मोहिम हाती घेउन शोध ना... टक्या काय तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाहि. खात्री आहे मला. काय टक्या?
7 Oct 2015 - 3:23 pm | टवाळ कार्टा
त्याबाबतीत "टर्की म्हणजे तुर्कस्थानातील", ती चालेल ;)
7 Oct 2015 - 3:31 pm | दिपक.कुवेत
उस गोड लागला म्हणून मुळापासून खाउ नये....तुर्कस्थानातील टर्की तुला झेपेल काय??
7 Oct 2015 - 3:33 pm | टवाळ कार्टा
never underestimate me
ल्ल्ल्लूऊल्ल्ल्लूऊ
7 Oct 2015 - 8:32 pm | वैभव.पुणे
वेज तुर्की चिल्ली कशी करायची हो? आमचे कड़े नॉन वेज चालत नाही ना~~||
8 Oct 2015 - 6:36 pm | रॉजरमूर
टर्की ची रिप्लेसमेंट …
पाककृतीत जिथे म्हणून टर्की चा उल्लेख येईल तिथे "दुधी भोपळा " वापरून बघा.