सफर आडवळणावरील खेड्यांची....२

मेघनाद's picture
मेघनाद in भटकंती
19 Sep 2015 - 6:35 pm

त्यातील काही छायाचित्र पुढे देत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हुश्श....केवढे ते मनमोहक नजारे म्हणून सांगू? जितकी छायाचित्र काढावीत तितकी कमी होती, शेवटी मोह आवरला आणि घरी परत आलो कारण दुपारचा १ वाजला होता आणि भावाच्या पोटात कावळ्यांनी ओरडून थकल्यावर शेवटी संप पुकारला होता.
गावचं घर आणि जेवण म्हणजे तर स्वर्गच जणू.

आमच गावचं घर हे माझ्या मावशीच्या घराच्या भिंतीला चिकटून बांधलेलं आहे सेकंड होम सारखं, घरी सर्व सोयी करून ठेवलेल्या आहेत. मावशीच घर आणि परिसर बराच मोठा आहे, त्यात मोठी आंब्याची बाग आहे, आंब्याच्या रोपांची नर्सरी आहे, मोठी विहीर आणि पाण्याची टाकी आहे. घराच्या बाजूने लाल मातीचा रस्ता आणि पावसाळ्यात तर रस्त्याच्या दुतर्फा मस्त पाण्याचे पाट वाहत असतात. समोरच मोकळ मैदान आहे तर मागील बाजूला मध्यम आकाराचा ओढा सुद्धा आहे. खरंतर हे घर आमचं मूळ घर नव्हे, आमच मूळ घर आहे आधी उल्लेख केलेल्या गिर्ये ह्या गावात त्याबद्दल तपशीलवार माहिती पुढे देईनच.

बर तर अश्याप्रकारे घरी आल्यावर गरमागरम वरण-भात, भाजी-पोळी आणि ताज्या आंब्यांच लोणच असा मेन्यू आईने तयार करून ठेवला होता, त्यावर चांगलाच आडवा हात मारून फुगलेलं पोट घेऊन छान ताणून दिली. झोप झाल्यावर प्रवासाचा शीण आणि जेवणाची गुंगी दोन्ही ओसरली होती. मग काय संध्याकाळचा चहा घेतल्यावर परत भटकंतीला बाहेर पडलो अर्थातच कॅमेरा पण आला आमच्या बरोबर. बाहेर आलो आणि ठरलं कि काजूच्या कारखान्यात जाऊन ताजे काजू घ्यावेत, जाता जाता रस्त्यात दोन-तीन देवळ आहेत ती पण बघून घ्यावीत.

पहिलं देऊळ आहे मुंबई-गोवा महामार्गावरच हनुमान मंदिर, हे आधी अगदी घुमटीवजा मंदिर होते. गावकर्यांनी देणगी जमा करून ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला. देवळात खोलगट भागात मारुतीची मूर्ती आहे. मंदिराच्या कठड्यावर बसलो कि अगदी चिकटून महामार्ग आहे. त्यामुळे संध्याकाळची झुळझुळ हवा खात आणि रस्त्यावरच्या गाड्या बघण्यात अर्धा तास कधी उलटला ते कळलच नाही.

मारुतीची मूर्ती
मारुतीची मूर्ती

माझ्या भावाचा मुलगा देवळात बसलेला असताना
माझ्या भावाचा मुलगा देवळात बसलेला असताना

मी स्वतः
मी स्वतः

मग पुढे गेलो काजू कारखान्यात, नेमके मसाला आणि खारे काजू नाही मिळाले मग साध्या काजुंवरच भागवल आणि पुढे निघालो. इथून पुढे महामार्गावरून आतल्या रस्त्यावर दुसर एक देऊळ आहे, हे देऊळ गच्च झाडीत आहे. चारही बाजूनी मोकळ असून आठ खांबांवर कौलारू छप्पर उभारलेल आहे. आजूबाजूच्या वनराईमुळे भरदुपारी सुद्धा इथे छान गार वारा सुटलेला असतो. आतमध्ये काळ्या पाषाणातील विष्णूची आणि अजून एक कुठल्याश्या देवाची मूर्ती आहे. (जाणकारांनी मूर्ती बघून कोणता देव आहे हे सांगितल्यास बरे पडेल.)

रस्त्यातील देऊळ
रस्त्यातील देऊळ

देवाची मूर्ती
देवाची मूर्ती

ह्या देवच दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका सरडे महाशयांनी खास छायाचित्रासाठी पोझ दिली होती मग काय त्यांना पण खुश करून टाकल आणि पुढील रस्ता धरला.

सरडा
सरडा

गावातील देवी नीनु नवलादेवीच देऊळ पुढेच आहे, देवळात जाण्यासाठी हिरव्यागार शेतमळ्यातून चालत जाव लागत.

शेतमळा
शेतमळा

हे देऊळ बर्यापैकी मोठे असून सभामंडप आणि गाभारा अशी ठेवणीतली रचना आहे. सर्व देऊळ दगडी भिंतींवर आणि आतील बाजुनी लाकडी खांबांवर तोललेले आहे. आतमध्ये मोकळ्या गाभार्यात काळ्या पाषाणातील सुंदर अशी देवीची मूर्ती आहे.

शेतमळ्यातील देवीच देऊळ
शेतमळ्यातील देवीच देऊळ

नीनु नवलादेवीची मूर्ती
नीनु नवलादेवीची मूर्ती

देवळाचा सभामंडप
देवळाचा सभामंडप

कोकणातील देवळांमध्ये आढळणारी धीरगंभीर शांतता आणि जाणवणारे पावित्र्य मला आजपर्यंत कुठल्याही प्रसिद्ध आणि गजबजलेल्या देवळात जाणवलेल नाही. “शांततेत देवाचा आवाज ऐकू येतो” हे वाक्य मी गगनगडावर वाचल आणि मला तंतोतंत पटलं देखील.

देवीच्या देवळातून पुढे दुसर्या शेतमळ्यात असलेल्या ब्रम्हदेवाच्या मंदिराकडे आपसूकच पावले वळली. क्वचितच आढळणार देऊळ म्हणजे ब्रम्हदेवाच देऊळ.
पुढील शेतमळ्यातील ब्रम्हदेवाच देऊळ
पुढील शेतमळ्यातील ब्रम्हदेवाच देऊळ

हे देऊळ अलीकडेच गावकर्यांनी नव्याने बांधल आहे. देवळाच्या एका बाजूला खळखळणारा छोटासा ओढा आहे तर बाकी तीन बाजूला हिरवागार शेतमळा. देवळाच दार उघडल कि लगेचच समोर उंचावर ब्रम्हदेवाच दर्शन होत. गोलाकार जांभ्या दगडातील ब्रम्हदेवाच रूप बघून मनाला शांतता प्राप्त होते.

ब्रम्हदेवाच पाषाण रूप
ब्रम्हदेवाच पाषाण रूप

खळाळणारा ओढा
खळाळणारा ओढा

खळाळणारा ओढा १
खळाळणारा ओढा १

कोकणातील बहुसंख्य देवालयांचे व्यापारीकरण न झाल्यामुळे कुठेही “फोटो काढण्यास सक्त मनाई” असले फालतू फलक दिसत नाहीत, त्यामुळे त्या देवांचे/देवालयांचे रूप हृदयासोबत कॅमेरामध्ये पण सहजच साठवता येते.
सर्व देवांचे यथासांग दर्शन घेऊन दिवस मावळताना परतीचा मार्ग धरला, दुसर्या दिवशी परत पुढच्या गावी प्रस्थान करायचे होते नां!

रानफुल
रानफुल

रानफूल १
रानफूल १

क्रमश:

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

19 Sep 2015 - 6:57 pm | सिरुसेरि

छान फोटो आणि मस्त वर्णन . रविन्द्र पिंगे यांच्या "कोकणातील दिवस" लेखांची आठवण झाली .

पद्मावति's picture

19 Sep 2015 - 7:12 pm | पद्मावति

फार सुंदर सफर चाललीय. अशी रमत गमत काहीही प्लान्स न ठरवता केलेली भटकंती मस्तं वाटतेय. शेतमळा, देवळाचा सभामंडप, ओढा सगळेच फोटो छान आले आहेत. फोटो पाहूनच छान प्रसन्न वाटलं.
ब्रह्मदेवाचे मंदिर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐकले. पण फोटोत ब्रह्मदेवाची मूर्ती शंकराच्या पिंडी सारखीच दिसतेय का मी चुकीचा फोटो पाहतेय?

मेघनाद's picture

21 Sep 2015 - 1:27 am | मेघनाद

तुम्ही बरोबरच फोटो बघताय…ब्रम्ह्देवच पिंडीरुपात स्थापन झाले आहेत.

छान लेख! पिंडीच्या रूपातील ब्रह्मदेव प्रथमच पाहतोय.

एक एकटा एकटाच's picture

19 Sep 2015 - 7:47 pm | एक एकटा एकटाच

मस्तच

खुप मस्त

मेघनाद,

मस्त वर्णन केलंय. वाचल्यावर जणू आताच जाऊन आलो असं वाटतंय.

देवळातल्या मूर्त्यांपैकी एकही विष्णूची वाटंत नाही. मुख्य मूर्ती दुर्गेची आहे. पण पायाखाली रेडा नाही. मात्र हातात आयुधे दिसताहेत. ही दुर्गेचा वेगळा अवतार असावी. त्यामुळे देऊळ दुर्गेचं असावं. डावीकडची मूर्ती भैरवाची वाटंतेय. हातात शस्त्रे दिसतात त्यावरून अदमास बांधलाय. उजवीकडे तांदळा दिसतो आहे. ती बहुधा स्थानदेवता असावी.

आ.न.,
-गा.पै.

पैलवान साहेब …. प्रतिसाद आणि माहितीबद्दल धन्यवाद.

गावाची सफर मस्त चाललिये.
फोटू छान आहे. त्या हिरव्या शेताच्या फोटूमध्ये जलचिन्ह आहे की मलाच काहीतरी दिसतय?
देऊळ नव्याने बांधणे/जिर्णोद्धार वगैरे गोष्टींचा गावकर्‍यांना नेहमी अभिमान वाटत आलेला अनुभवलाय.

बोका-ए-आझम's picture

19 Sep 2015 - 10:35 pm | बोका-ए-आझम

ब्लॅक अँड व्हाईट फोटो फारच सुंदर आलाय.

पैसा's picture

19 Sep 2015 - 11:59 pm | पैसा

सुंदर फोटो आणि लिखाण!

बाबा योगिराज's picture

20 Sep 2015 - 2:55 pm | बाबा योगिराज

फोटो सुंदर आलेत. मस्तच....
और दिखाओ और दिखाओ...

सुंदर फोटो आणि लिखाण.हिरवागार शेतमळा पाहून डोळे निवले!

मेघनाद's picture

21 Sep 2015 - 1:28 am | मेघनाद

वाचक मित्रहो! सर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मांत्रिक's picture

21 Sep 2015 - 1:10 pm | मांत्रिक

मेघनाद भौ! सफर मस्तच चाललीये! कोकणी पाहुणचार फार आवडला! भोजनाच्या वर्णनाने तर तों.पा.सु! मी देखील कोकणात भर पावसाळ्यांत एका परिचिताकडे जेवायला गेलतो. बाहेर प्रचंड कोसळणारा पाऊस, आत मिट्ट अंधार, थंड वातावरण. असंच साधं जेवण होतं. चपाती, वाटाणा-बटाटा रस्सा, पोह्याचे नाचणीचे पापड, घरचं लोणचं, वाफाळणारा वरणभात! वा! परत तो दिवस आठवला!
छायाचित्रेही सुंदर, अप्रतिम! देवालयांची ओळख ही आवडली!
भारतात या प्रकारचं ब्रह्मदेवाचं एकमेव देवालय असावं.
पु.भा.ल.टा.

त्या त्या देवालयांशी संबंधित कथा, परंपरा, इतिहास यांची थोडक्यात माहिती दिलीत तर अजून आवडेल.

त्या त्या देवालयांशी संबंधित कथा, परंपरा, इतिहास यांची थोडक्यात माहिती दिलीत तर अजून आवडेल.

राजे, ते नवलाईदेवीचं देऊळ फार फार सुंदर आहे. असं वाटतंय, सूर्योदयाचे वेळी देवळात पोहोचावं, जगदंबेला नमस्कार करावा, शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा, अगरबत्ती लावावी आणि शांतपणे देवीसूक्ताचे पाठ करत बसावे!
हा एक दिवससुद्धा वर्षभर प्रेरणा द्यायला पुरेसा आहे.
जरा संपूर्ण माहिती: कसं जायचं(सातारा मार्गे), मुक्कामाची सोय आहे का? व्यनी कराल?

सौंदाळा's picture

21 Sep 2015 - 6:33 pm | सौंदाळा

डोळे निवले.
पट्पट टाका पुढचे भाग. कोकणाबद्दल कितीही लिहिले तरी मला ते थोडसं आणि अपुरच वाटेल.

प्रदीप's picture

21 Sep 2015 - 7:54 pm | प्रदीप

दोन्ही लेख व फोटो अतिशय आवडले.

मुक्त विहारि's picture

22 Sep 2015 - 11:26 am | मुक्त विहारि

एखादा कट्टा तुमच्या गावात पण करायचा का?

(कट्टेकरी) मुवि

नीलमोहर's picture

22 Sep 2015 - 12:41 pm | नीलमोहर

ब्रम्हदेवाचे असे वेगळे रूप प्रथमच पहायला मिळाले,
धन्यवाद..

वेल्लाभट's picture

22 Sep 2015 - 4:13 pm | वेल्लाभट

चित्रसुंदर सफर ! मजा आली वाचताना, फोटो बघताना

अजित@१२३'s picture

28 Sep 2015 - 8:06 pm | अजित@१२३

खुप सुंदर फोटो आणि लिखाण!

बोलघेवडा's picture

12 Jul 2020 - 11:29 am | बोलघेवडा

फार सुंदर!!!
अगदी हेवा वाटला तुमचा. भाग्यवान आहात!!