उद्धव

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in विशेष
14 Dec 2008 - 9:37 pm
छंदशास्त्र

लोकहो,

छंदशास्त्राच्या सदरात आज नवीन वृत्त घेऊन येत आहोत. ते म्हणजे उद्धव.

हे मात्रा वृत्त आहे. मात्रावृत्ताला जाती असेही म्हणतात. आजपर्यंत जे छंद पाहिले त्यात अक्षरांची संख्या पाहिली. अक्षर लघु आहे की गुरू याला छंदात महत्व नाही.

मात्रावृत्तांमध्ये अक्षरसंख्या कमी जास्त असली तरी चालते पण मात्रा मात्र नेमक्या व्हायला हव्यात.

लघु अक्षराची एक मात्रा आणि गुरू अक्षराच्या दोन मात्रा. हा नियम सर्वत्र लागू.

जेव्हा एखाद्या अक्षराच्या आघात हा त्याच्या आधीच्या अक्षरावर येतो तेव्हा ते लघु असले तरी गुरू धरले जाते हे लक्षात ठेवायचे. उच्चारणानुसार मात्रा मोजल्या जातात.

उदाहरणार्थ

झिमझिमले अंगांगाला..... रक्ताच्या मागुन कोणी??

इथे रक्ताच्या मधला र जरी र्‍हस्व असला तरी क्ताचा आघात त्यावर येतो म्हणून रक्ताच्या या शब्दाच्या मात्रा ५ नसून ६ होतात.

उद्धव हे वृत्त फार मोहक आहे. आणि सोपे देखील. छंदशास्त्राचा प्रवास हा छंद -- जाती -- वृत्त असा झाल्यास एक एक पायरी वर जाता येते. म्हणून छंदांनंतर आज जाती सुरू केली आहे.

उद्धव वृत्तात एका ओळीत १४ मात्रा असतात. चार ओळींच्या चरणात यमक दुसर्‍या व चौथ्या ओळीचा

याचे गण असे आहेत

- | प | - + = १४

- म्हणजे २ मात्रा + म्हणजे २ मात्रा आणि प म्हणजे पद्मावर्तनी म्हणजे ८ मात्रा.

२+ ८ + २ + २ = १४ मात्रा

उदाहरण - कविवर्य ग्रेस यांची ही रचना

मी अशी बहरले होते
खडकातुन फूल उगवता
खडकात वितळली होती
खडकाची शुभ्र अहंता

पाऊस मोगरा सजणा
सनईचे रंगित पाणी
झिमझिमले अंगांगाला
रक्ताच्या मागुन कोणी

भासात देउळे सारी
ये नीज धर्मशाळांना
येतांना दिसते कोण
डोहात कृष्णकमळांना?

हे दु:ख कुण्या जन्माचे
क्षितिजाला बिलगुन आले
स्वप्नात पुन्हा सापडले
मेघांचे भगवे शेले

मन गगन सघन लहरींचे
हलकासा फूलपिसारा
स्तन झाकुन समईपाशी
मी गोंदण मिटली तारा

मी अशी बहरले होते.....

आपला,
(छंदवेडा) धोंडोपंत

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

14 Dec 2008 - 10:02 pm | लिखाळ

छान... हा छंद मस्त आहे. ग्रेसची कविता सुद्धा छान.

दुसर्‍या आणि चौथ्या ओळीचे यमक सांभाळायचे असा नियम आहे का?
-- लिखाळ.

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 10:07 pm | धोंडोपंत

नमस्कार लिखाळपंत,

दुसर्‍या आणि चौथ्या ओळीचाच यमक हवा. त्याला काहीच पर्याय नाही. आणि हा छंद नसून जाती आहे. मात्रावृत्त आहे.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

घाटावरचे भट's picture

15 Dec 2008 - 7:48 am | घाटावरचे भट

मस्त छंद आहे. जरा नीट पाहायला हवा.

--(सध्या घाईत) घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

शशिधर केळकर's picture

17 Dec 2008 - 12:32 am | शशिधर केळकर

आधीचे फार वाचलेले नाही. म्हणून विचारताना धाकधूक आहे. तरीपण...
पुळणीत टेकले माथे शांत अधीर
दर्यावर होता वाहत मंद समीर

या ओळी कोणत्या छंद व्रुत्तात बसतात?

राघव's picture

17 Dec 2008 - 10:11 am | राघव

छान माहिती. मात्रांच्या बाबतीतला गोंधळ कमी झाला जरा.
पण गण म्हटले कि अजुनही समजत नाही नीट.. काय करावे.. :(
प्रयत्न करून बघायला हवा आता!
मुमुक्षु

पर्नल नेने मराठे's picture

4 Jan 2009 - 1:49 pm | पर्नल नेने मराठे

धोन्डो मला शिकव कविता............. :S
चुचु

आचरट कार्टा's picture

27 Jan 2009 - 9:29 am | आचरट कार्टा

मी मोर्चा नेला नाही... मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा कधि नोंदवलेला नाही

गीत : संदीप खरे
संगीत : सलिल कुळकर्णी

-------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !