नमस्कार मंडळी,
मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मिसळपाववर चांगली चर्चा झाली आणि होत आहे. दुर्दैवाने आपल्या हातात चर्चा करण्याशिवाय फारसे काही हातात नाही असे वाटते. एकूण सामान्य पापभीरू मंडळी एखाद्या झुरळाला मारताना सुध्दा हजारवेळा विचार करणार. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज राज्यकर्त्यांचे आणि सध्याच्या काळात दहशतवाद्यांचे रक्ताचे पाट वाहवणे आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ठराव पास करत होतो आणि सध्या चर्चा करत आहोत. एकूण काय की आपला मवाळपणा चालूच असतो.
तरीही त्यापुढे जाऊन आपल्याला काय करता येईल यावर ऋषिकेश यांच्या या चर्चेत चांगले मतप्रदर्शन झाले आहे. एकूणच काय की परिस्थिती बदलायला हवी अशी कळकळीची इच्छा असलेली पण फारसे काही करता न येणारी आपण मंडळी आहोत. आपण आता इंग्रजांच्या किंवा तत्सम कोणत्याही परकिय राजवटीच्या अंमलाखाली राहात नाही तर आपणच निवडून दिलेल्या एका लोकशाहीतून व्होटिंग मशिनच्या माध्यमातून निवडून दिलेल्या सरकारच्या अंमलाखाली राहत आहोत. ते सरकार कसेही असले आणि ते आपल्याला आवडले जरी नाही तरी ते आपणच निवडून दिले आहे. लोकशाहीत सार्वभौम सत्ता लोकांची असते त्यामुळे दरवेळी राज्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून आपण हातावर हात ठेऊन शांत बसणार ही परिस्थिती बदलायला हवी.राज्यकर्ते जर चुकत असतील तर त्यांना वठणीवर आणायची जबाबदारी लोकशाहीत लोकांचीच असते.तेव्हा मला या परिस्थितीत आपल्याला काय करता येईल याविषयी एक कल्पना आहे. ती कल्पना सांगण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे.
पार्श्वभूमी क्रमांक १: वर्ष होते १९९१. चंद्रशेखर सरकारने अंतिम उपाय म्हणून सोने गहाण टाकले आणि एकूणच अत्यंत गंभीर आर्थिक परिस्थिती देशात होती.त्या वर्षीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यात तत्कालीन राष्ट्रपती आर.वेंकटरामन हे परदेश दौर्यावर जाणार होते. वास्तविक आपल्या राज्यव्यवस्थेत राष्ट्रपतींना फारसे कार्यकारी अधिकार नसतात.त्यांच्या नावाने मंत्रीमंडळ कारभार बघत असते.तेव्हा पंतप्रधान किंवा इतर कोणा मंत्र्याच्या परदेश दौर्यात महत्वाचे निर्णय होऊ शकतात पण राष्ट्रपतींच्या दौर्यात असे काही नवे महत्वाचे निर्णय व्हायची शक्यता नव्हती. भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून कोणत्याही महत्वाच्या करारावर ते भारताच्या वतीने सही करणार नव्हते आणि त्यांचा दौरा हा एक 'सदिच्छा भेट' होता.तेव्हा अशा सदिच्छा भेटीसाठी आर्थिक संकटाच्या वेळी खर्च करणे योग्य ठरले नसते.म्हणून लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी वाचकांना आवाहन केले की वाचकांनी राष्ट्रपती भवनावर तारांचा पाऊस पाडावा की त्यांना दौरा रद्द करायची विनंती करावी. राष्ट्रपतींचे कार्यालय किती तारांकडे दुर्लक्ष करेल? इतक्या प्रचंड प्रमाणावर तारा पाठवल्या गेल्या तर राष्ट्रपतींना त्याची दखल घ्यावीच लागेल.आणि झाले तसेच. लोकसत्ताच्या वाचकांनी राष्ट्रपती भवनावर त्यांना परदेश दौरा रद्द करायची विनंती करणार्या तारांचा पाऊस पाडला आणि राष्ट्रपतींना शेवटी आपला परदेश दौरा रद्द करावा लागला. गडकरींनी त्याचे वर्णन 'लोकभावनेचा विजय' असे केले.
पार्श्वभूमी क्रमांक २: ४ डिसेंबर २००८ रोजी (परवा) शनिवारवाड्यात चाणक्य मंडलचे संस्थापक आणि माजी I.A.S अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांची सभा झाली. मी धर्माधिकारींचा चाहता असल्यामुळे मी त्या सभेला आवर्जून गेलो होतो. सभेचे स्वरूप लोकांची मागणी सरकारकडे मांडण्यासाठी मागणीपत्र सादर करणे आणि दहशतवादाविरूध्द आपण काय केले पाहिजे यासाठी संकल्प करणे असे होते.धर्माधिकारी हे स्वतः प्रशासनिक अधिकारी असल्यामुळे I.P.S असलेले हेमंत करकरे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर आणि जखमी झालेले सदानंद दाते यांच्याशी त्यांचे अगदी मित्रत्वाचे संबंध होते. मारले गेलेल सर्वच पोलिस अधिकारी हे अव्वल दर्जाची रत्ने होती यावर त्यांनी आवर्जून भर दिला. त्याचप्रमाणे कसावला जिवंत पकडणार्या बहाद्दर पोलिस अधिकार्यांची अंगावर रोमांच उभे करणारी कहाणी त्यांनी सांगितली. मुंबई पोलिस हे स्कॉटलंड यार्ड पेक्षाही सरस आहेत असे त्यांनी ठासून सांगितले. तसेच मुंबई पोलिसांना राजकिय हस्तक्षेपापासून मोकळे ठेवले आणि त्यांच्या कामात कोणताही हस्तक्षेप कोणीही केला नाही, त्यांना 'ब्लँक चेक' दिला तर मुंबई पोलिस महिन्याभरात मुंबईला अतिरेक्यांपासून आणि त्यांच्या साथिदारांपासून साफ करतील असे सांगितले.धर्माधिकारींसारखा ज्येष्ठ, जबाबदार आणि प्रशासन जवळून बघितलेला मनुष्य जेव्हा एखादे विधान करतो तेव्हा ते गंभीरपणे घेतलेच पाहिजे.तेव्हा मुंबई पोलिसांना खरोखरच काहीही करायची मुभा दिली तर ते अतिरेक्यांपासून शहराला मुक्त करू शकतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. धर्माधिकारींचे चाणक्य मंडल काही मागण्यांविषयीचे सह्यांचे निवेदन १६ डिसेंबर रोजी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला देणार आहेत. त्यात अफजल गुरूला फाशीसारखे मुद्दे सामाविष्ट आहेत. त्यांचा मुद्दा एकच की हे सरकार आपले आहे आणि सनदशीर मार्गाने लोकशाहीत बदल घडवून आणता येत असेल तर तो घडवून आणायची जबाबदारी आपली आहे. आणि मुख्य मुद्दा म्हणजे हे सरकार आपणच निवडून दिलेले म्हणजे आपलेच आहे.म्हणून परकिय सरकारविरूध्द वापरलेले मार्ग आपल्या सरकारविरूध्द वापरू नयेत.
तेव्हा माझी कल्पना ही की जर आपण सगळ्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री चिदंबरम, नवे मुख्यमंत्री चव्हाण आणि नवे उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्या कार्यालयावर ई-मेल आणि पत्रांचा मारा केला आणि त्यांना आपल्या मागण्या कळवल्या तर? त्यांना दुर्लक्ष करता येणार नाहीत इतक्या प्रमाणावर पत्रे आणि ई-मेल गेले तर वेंकटरामन परदेश दौरा प्रकरणात झाले त्याप्रमाणे काही चांगला बदल होऊ शकेल का? सध्याच्या काळात राज्यकर्त्यांविरूध्द किती क्षोभ जनतेत आहे हे तर समोर दिसतच आहे. त्यामुळे अगदी जनतेचे रक्षण व्हावे या उद्दात्त हेतूने नाही तरी लोकसभा निवडणुका ४-५ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत म्हणून स्वता:ची खुर्ची वाचविण्याच्या स्वार्थी हेतूने तरी काहीतरी करावे लागेल असे आपल्याला वाटते का?
त्यासाठी प्रभावी शब्दात आणि मुद्देसूद पध्दतीने आपले म्हणणे मांडायला हवे. कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही आणि भारतीय राज्यघटनेचे पालन होईल याची काळजी आपल्या मजकुरात असायला हवी. मिसळपाववर मराठी- इंग्रजीवर प्रभुत्व असलेले अनेक गावकरी आहेत याची खात्री आहे. तेव्हा मराठी आणि इंग्रजीत (मराठी समजणार्या लोकांसाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना पाठवायला मराठीतून आणि पंतप्रधान आणि केंद्रिय गृहमंत्री कार्यालयाला पाठवायला आणि अमराठी बांधवांसाठी सर्वांना पाठवायला इंग्रजीतून) मजकूर तयार करून देणारा कोणीतरी गावकरी मिसळपाववर असेलच. तसेच या सर्व कार्यालयांचे पत्ते मिळवायला हवेत. पत्ते मिळवायचे काम फारसे कठिण जाऊ नये.
सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुणेरी पाट्या सारख्या हलक्या फुलक्या विषयांवर अनेक ई-मेल फॉरवर्ड आपल्याला येत असतात. तेव्हा आपण आपल्या मित्रमंडळींना ही कल्पना फॉरवर्ड केली , वर्तमानपत्रात पत्रे लिहिली तरी काही दिवसात अनेक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. त्यासाठी फारफार तर २०-२५ रूपयांचा खर्च आपल्यापैकी प्रत्येकाला येईल. बाकी काही नाही तर पोस्टाच्या ५० पैशाच्या कार्डावर जरूर पत्र लिहिता येईल. अशाप्रकारे प्रयत्न करून जर पत्रांचा पाऊस पाडला तर काही चांगले घडेल असे वाटते का?पूर्वी सुरभीसारख्या दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये ३ बक्षिसे मिळत असताना हजारो पत्रे लोक पाठवतच होते. तेव्हा आपल्या पत्राला बक्षिस मिळायची शक्यता अतिशय कमी आहे हे माहित असूनही लोक पत्रे पाठवतच होते ना. मग आपलेच संरक्षण व्हावे अशी पूर्णपणे सनदशीर मागणी केली तर त्यात यश यायची शक्यता जरी कमी दिसत असली तरी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
उठल्यासुटल्या कोणी असा पत्रांचा पाऊस पाडत नाही आणि पाडूही नये. पण परिस्थितीचे गांभीर्य आपल्या सगळ्यांना कळते. जे छत्रपती शिवाजी टर्मिनसवर झाले ते उद्या कोणत्याही ठिकाणी होईल ही जबरदस्त भिती आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. ते होऊ नये असे वाटत असेल तर आपल्याला शक्य आहे ते तरी केलेच पाहिजे.आणि कमांडो प्रशिक्षण घेणे मिसळपाववरील बहुतेकांच्या 'बसची बात' असेल असे वाटत नाही.तेव्हा राज्यकर्त्यांवर जनमताचा प्रचंड दबाव आणून का होई ना आपला कार्यभाग साध्य होऊ शकतो का हे निदान बघायला तरी काय हरकत आहे? आणि त्यातही सरकारला शक्य असेल अशाच गोष्टींचा समावेश पत्रात असावा. उगाच भावनेच्या भरात जाऊन पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकावा किंवा तत्सम गोष्टींची मागणी करू नये असे वाटते.
आणि माझ्या कल्पनेपेक्षा अधिक चांगल्या आणि अंमलात आणायला शक्य असलेल्या कल्पना जर कोणी गावकर्याने मांडल्या तर त्याचे स्वागतच आहे. तेव्हा जर आपल्याला ही कल्पना मान्य नसेल तर त्यात सुधारणा किंवा अजून चांगली कल्पना सुचवणे अशा स्वरूपाची सशक्त चर्चा व्हावी आणि मुख्य म्हणजे त्यातून काहीतरी कृती व्हावी अशी अपेक्षा.मुख्य मुद्दा म्हणजे नुसत्या चर्चा न करता आपल्या परिने जे काही शक्य आहे ते तरी आपण केले पाहिजे कारण ही हातावर हात ठेऊन शांत बसायची वेळ नाही.
आणि सावरकरांना मानणारा आणि गांधींच्या नामोच्चाराने तळपायाची आग मस्तकात जाणार्या क्लिंटनला अचानक वरकरणी गांधीवादी दिसणार्या मार्गाचा पुरस्कार कसा करावासा वाटला असा प्रश्न उभा राहू शकतो.त्यावर माझे उत्तर म्हणजे दहशतवादी आणि परकिय राज्यकर्त्यांविरूध्द वापरायचे मार्ग आणि लोकशाहीत आपल्या सरकारला कृती करायला भाग पाडायचे मार्ग भिन्न असावेत याचे भान मला आहे. आणि ही पत्रे दहशतवाद्यांना शांततेचे महत्व समजावून द्यायला पाठवायची नसून आपणच निवडून दिलेल्या आपल्याच राज्यकर्त्यांना दहशतवाद्यांविरूध्द कारवाई करा याविषयी दबाव आणण्यासाठी पाठवायची अशी माझी कल्पना आहे.
आपले काय मत आहे?
(सावरकर भक्त आणि सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने शक्य होईल ते करावे असे आवर्जून वाटणारा) क्लिंटन
प्रतिक्रिया
6 Dec 2008 - 9:03 pm | कलंत्री
पत्र तर पाठवावीच. आपल्या जवळच्या लोकप्रतिनिधीनाही तो कोणत्याही पक्षाचा असो त्यांना भेटावे व आपलए विचार सांगावे.
असा कोणी पुढाकार घेणार असल्यास मी त्यात येण्यसाठी तयार आहे.
6 Dec 2008 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रभावी शब्दात मराठी आणि इंग्रजी भाषेत कोणी तरी मसूदा तयार करावा.
३१ डिसेंबरच्या आत सर्वांनी ती पत्र, पोष्टाच्या डब्यात टाकायची.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
7 Dec 2008 - 8:07 am | रामदास
चांगली कल्पना आहे.सहमत आहे.सुरुवात करू या.
7 Dec 2008 - 8:17 pm | चित्रा
कल्पना चांगली आहे. काही नाही तरी या लोकांना थोडी जाग येईल. पत्र लिहीण्यात मी मदत करू शकेन. मिपाकरांना जे काही मुद्दे या पत्रात यावेत असे वाटत असेल ते या धाग्यावर लिहावे.
7 Dec 2008 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) पकडलेल्या दहशतवाद्यांवर जलदगती न्यायालयात कार्यवाही करुन फाशीची शिक्षा द्यावी.
२)पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांच्या छावण्या उद्ध्वस्त कराव्यात.
३)दहशतवादी, त्यांच्या अतिरेकी कृत्याची माहिती देणार्यास पाच लाख रु.बक्षीस देण्यात यावे, दहशतवाद्यास मदत करणार्या कुटूंबास आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात यावी.
४)शासनातील नेते/प्रशासकीय अधिकारी दहशतवद्यांना मदत करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु करावी.
५) सामान्य माणसाच्या भावनांची योग्य दखल घेण्यासाठी सर्व पातळींवर केंद्रे उघडावीत व त्याचा पाठपुरावा करावा.
हे फक्त उदाहरण आहेत,योग्य बदल सुचवावेत !
8 Dec 2008 - 2:59 am | भडकमकर मास्तर
पत्राचा अंतिम मसुदा तयार झाला की मी स्वतः हे पत्र लिहिणारच पण आजूबाजूच्यांनासुद्धा लिहायला लावणार...
पोलीस रिफॉर्मसंदर्भात अजून काही मुद्दे...
( कालच्या आय्बीएन लोकमतवरील माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या मुलाखतीतले काही संदर्भ घेऊन... गेले अनेक दशके ह्या मागण्या पेंडिंग आहेत आणि रडणार्या सावत्र पोराकडे जसं कोणी लक्ष देऊ नये तसे अर्थखाते पैसे नाहीत म्हणून या सार्या मागण्या फेटाळत आलं आहे असे उद्गार त्यांनी काढले.))
१. पोलीसांना शस्त्रास्त्रे आणि उत्तम बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि हेल्मेट्स मिळावीत.
२.पोलीसांचा पगार महसूल खात्याच्या लोकांच्या पगाराप्रमाणे असावा.
३.पोलीस महासंचालकाला खर्च करण्याच्या पॉवर्स असाव्यात.
४.राज्याचा पोलीस मुख्य हा गृहसचिव नसावा तर एक सक्षम पोलीस अधिकारीच असावा.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
7 Dec 2008 - 8:22 pm | विकास
माझा देखील या चांगल्या कल्पनेस सक्रीय पाठींबा राहील.
7 Dec 2008 - 8:24 pm | गणा मास्तर
क्लिंटननी चांगला विचार मांडला आहे.
माझे काही विचार पुढीलप्रमाणे
१. मिपावरील सभासदांनी मिळुन यावर मराठी आणि इंग्रजीत एक मसुदा तयार करावा.
मसुदा तयार करण्यासाठी एक वेगळा काथ्याकुट धागा चालु करावा.
२. प्रत्येकाने वैयक्तिकरित्या या पत्राची प्रत पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गॄहमंत्री आणि स्थानिक खासदार व आमदारांना पाठवावी.
प्रमुख विरोधी पक्षांनापण पाठवता येइल.
३. सध्या ऑनलाईन पेटिशनपण पाठवता येते, पण त्याऐवजी पत्र पाठवणे जास्त चांगले. सर्वसामान्य माणसाने स्वतः पत्र लिहिणे आणि नुसते कुठेतरी
जाउन टिचकी मारणे यात फरक आहे असे वाटते. (इथे कोणाचाही अवमान करण्याचा हेतु नाही. मी पण ऑनलाईन पेटीशन साइन केली आहेत पण प्रचंड संख्येने आलेल्या
लिखित पत्रांचा परिणाम जास्त होईल असे वाटते.)
४. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गॄहमंत्री यांचे कार्यालयीन पत्ते मिपावर प्रसिद्ध करावेत.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
8 Dec 2008 - 10:07 am | यशोधरा
अतिशय चांगली कल्पना. असे पत्र तयार करुन मिपावर दुवा दिल्यास हे पत्र सरकारला पाठवण्यात माझा सहभाग राहील. अजूनही काही जणांना देखील हे पत्र पाठवण्यास मी उद्युक्त करु शकेन असे वाटते.
8 Dec 2008 - 11:25 am | ऋषिकेश
छान आयडीयाची कल्पना! :)
माझाही या चांगल्या कल्पनेस सक्रीय पाठींबा असेल.
-(गोंधळलेला) ऋषिकेश
8 Dec 2008 - 11:36 am | धम्मकलाडू
प्रश्न: आपल्याला काय करता येईल?
उत्तर: हा दहशतवादी हल्ला केवळ हिंदूंवर आहे आणि मुसलमानांनी केलेला आहे, अशी सोयिस्कर समजूत करून घेऊ नका. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ५० मुसलमानही प्राणाला मुकले आहेत. ज्यांना आग विझवता येत नाही, ज्यांना केवळ आग लावता येते त्यांनी गप्प बसायला हवे! विशेषतः त्यांनी "काय करता येईल"टाइप चर्चा घडवणे म्हणजे दांभिकपणाचा कळस आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
8 Dec 2008 - 12:16 pm | ऋषिकेश
अरेच्या आता वरच्याच प्रतिसादात एक उगाच टाकलेली ठिणगी दिसली.. कोण बरं लावतंय आग? :(
-(गोंधळलेला) ऋषिकेश
9 Dec 2008 - 9:56 am | मैत्र
काथ्याकूटावर टाकून एक चर्चासत्र घ्यायला हवे :>
8 Dec 2008 - 12:19 pm | स्वप्निल..
सक्रिय पाठींबा असेन..पत्र तयार झाल्यावर सांगा..मी नक्कीच तयार आहे.
स्वप्निल
9 Dec 2008 - 12:33 am | भास्कर केन्डे
चांगला उपक्रम आहे. आपला सक्रीय पाठिंबा.
8 Dec 2008 - 1:52 pm | यशोधरा
धम्मक भाऊ, तुम्ही काही मदतपर केलेत का? केले असेल तर तुमचे खरेच कौतुक, पण स्वतः काही न करता जर तुम्ही येथे असले प्रतिसाद टंकत असाल, तर मग मात्र हा खरा दांभिकपणाचा कळस.
8 Dec 2008 - 2:49 pm | धम्मकलाडू
यशोधराताई, दांभिकपणा उघडकीस आणणे हेच आमचे जीवनध्येय. हेच आमचे मदतपर कार्य!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
9 Dec 2008 - 2:15 am | वेलदोडा
क्लिंटन साहेब , छान उपक्रम. माझा पाठिंबा आहे.
>>दांभिकपणा उघडकीस आणणे हेच आमचे जीवनध्येय. हेच आमचे मदतपर कार्य! - धम्मकलाडू
चक्क !!! छान छान. आम्हाला वाटले ठिणग्या लावण्यातच तुम्हाला रस आहे.
8 Dec 2008 - 5:10 pm | क्लिंटन
नमस्कार मंडळी,
माझी सूचना योग्य आणि व्यवहार्य वाटल्याबद्द्ल सर्वांचे आभार.
माझा पंतप्रधानांना पाठवायच्या पत्राचा कच्चा मसुदा तयार आहे. हे पत्र पंतप्रधानांना पाठवायचे असल्यामुळे इंग्रजीतून आहे. त्यात अनेक सुधारणांना आणि इतर काही मुद्दे समाविष्ट करायला बराच वाव आहे. मिसळपावच्या सर्व गावकर्यांनो, आपण पत्रात सुधारणा सुचवावी ही विनंती. सर्वांचे नाव लिहित नाही तरीही त्याचा कोणी राग मानू नये ही कळकळीची विनंती.
'तिकडे' १०% हून अधिक इंग्रजी शब्दांचा समावेश करणे 'बेकायदा' होते. मिसळपाववर इंग्रजी शब्दांचा वापर बेकायदा आहे की नाही मला कल्पना नाही.पण मराठी संकेतस्थळावर पूर्ण प्रतिसाद इंग्रजीतून असल्यास तो थोडा वेगळा दिसेल हे नक्की. म्हणून मी माझा पत्राचा मसूदा इथे लिहिला आहे. सरपंचांची मान्यता असेल तर तो मसूदा मिसळपावर आणण्यास माझी काहीही हरकत नाही. पुढील ३-४ दिवसांमध्ये मसूदा सर्वानुमते ठरवून पत्रे पेटीत पडली तर बरे होईल.तसेच लवकरात लवकर मसूदा तयार करून आपल्या सर्व मित्रमंडळींना ई-मेलद्वारे संपर्क साधला पाहिजे असे वाटते.
त्यादृष्टीने काय करता येईल?आपल्या सूचनांची वाट बघत आहे.
क्लिंटन
8 Dec 2008 - 8:07 pm | सुनील
पहिल्या वाचनात मसुदा योग्य वाटला. सुचल्यास अजून काही लिहिनच.
अवांतर - मिपावर १०% ची अट नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Dec 2008 - 9:03 pm | चित्रा
मसुदा भरभर वाचला. अजून नीट विचार करून लवकरच काही सुचवण्या असल्यास लिहीन.
8 Dec 2008 - 5:25 pm | यशोधरा
पत्राचा मसुदा वाचला. त्यात पक्षांतर्गत राजकारण देशापुढे वरचढ ठरु नये असे काही नाही का म्हणता येणार?
8 Dec 2008 - 8:50 pm | मुक्तसुनीत
योजनेत सामील आहे. मसुदा पूर्ण झाला की सहभाग घेईनच.
ता क : क्लिंटन यांचे सर्व विचार मला पटतात असे नाही. पण काही चांगले घडत असेल तर त्यात सहभाग घ्यावा असे मी समजतो. निदान कोलदांडा तरी घालू नये अशा मताचा मी आहे. अर्थात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती , हे खरेच.
8 Dec 2008 - 10:27 pm | नन्या
dear meepa members,
as per request of one of the member, i tried to find out the official address of president of india, prime minister of india etc. the same are as follows:
1)President of India
Rashtrapati Bhavan,
New Delhi, India – 110 004.
2)Vice-President's House,
6, Maulana Azad Road,
New Delhi - 110 011
3)The Prime Minister's Office
South Block, Raisina Hill,
New Delhi, India-110 011
request all of you, not to misuse the information.
9 Dec 2008 - 3:08 am | केदार
लोकसभेची मार्गददर्शिका
http://loksabha.nic.in/
लोकसभा अध्य्क्ष, विरोधी पक्षनेते, फोटो वर टिचकी मारल्यावर सर्व संपर्काची माहिती मिळेल.
http://164.100.47.134/newls/sittingmember.aspx
येथे महाराष्ट्रावर टिचकी मारल्यावर आपले ४८ प्रतिनिधी दिसतील
http://164.100.47.134/newls/Statewiselist.aspx
येथे आपले ४८ खासदार, त्यांच्या नावावर टिचकी मारल्यावर तुम्हाला संपर्काची माहिती मिळेल.
http://164.100.47.134/newls/statedetail.aspx?state_name=Maharashtra
पंतप्रधान कार्यालय
http://pmindia.nic.in/
पंतप्रधानांची वेबसाइट, संपर्कासाठी पत्ता
http://pmindia.nic.in/pmo.htm
The Prime Minister's Office
South Block, Raisina Hill,
New Delhi,
India-110 011.
Telephone: 91-11-23012312.
Fax: 91-11-23019545 / 91-11-23016857.
येथे तुम्हाला पंतप्रधानांना (कार्यालयाल) e-mail पण करता येतो, विषयानुसार वर्गवारी आहे.
http://pmindia.nic.in/write.htm
राष्ट्रपतींशी संपर्क
http://presidentofindia.nic.in/
E-mail: presidentofindia@rb.nic.in
भारत सरकारची मार्गदर्शिका
http://goidirectory.nic.in/
राष्ट्रिय मानवी हक्क आयोग
http://nhrc.nic.in/
माझा मित्र उदयने हे संकलन मला दुसर्या एका मराठी साईटवर दिले होते. ते कामाला येईन कदाचित.
9 Dec 2008 - 9:18 am | ऋषिकेश
वा! अत्यंत उपयुक्त व एकत्र संकलित माहिती.
धन्यु! केदार :)
-(गोंधळलेला) ऋषिकेश
9 Dec 2008 - 2:40 pm | धम्मकलाडू
हापिसातला एसी, हापिसातला पीसी आणि ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन यांचा वापर अशा खुर्चीतल्या गप्पा करण्यासाठी करणे बंद करायला हवे :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
9 Dec 2008 - 4:25 pm | क्लिंटन
नमस्कार,
सर्वप्रथम पत्ते दिल्याबद्दल नन्या आणि केदार यांना धन्यवाद. आपल्या सर्वांची मते आणि सूचना ध्यानात घेऊन मी मसुद्यात थोडा बदल केला आहे. तरीही काही मुद्दे कसे समाविष्ट करावेत हे मात्र समजलेले नाही. उदाहरणार्थ यशोधरा यांचा मुद्दा-- पक्षांतर्गत राजकराणापेक्षा देशाचे हित महत्वाचे आहे हा मुद्दा कसा लिहावे हे मला strike झाले नाही. त्याचप्रमाणे प्रा.बिरूटे यांचा पाकव्याप्त काश्मीरातील प्रशिक्षण छावण्यांवरील हल्ल्याचा मुद्दा मी जरा broad शब्दात लिहिला आहे. पत्राचा मसुदा इथे वाचता येईल.
शक्य झाल्यास सर्वांनी आपल्या सूचना द्याव्यात ही विनंती. त्यायोगे लवकरात लवकर मसुदा नक्की करून पत्रे रवाना होऊ शकतील. त्यातून १० तारखेला मिसळपाव दिवसा बंद असल्यामुळे आपल्या हातात अजून कमी वेळ आहे. आणि या गोष्टीला जास्त उशीर करू नये असे वाटते.
माझी मते बर्याच अंशी वेगळी असतात हे मान्य. हजारातील ९९९ जण ज्याला विरोध करतात त्या गोष्टीचे मी अनेकदा समर्थन करतो. तेव्हा माझी मते मान्य नाहीत असे होणे सहज शक्य आहे. अनेकांना ती मते दांभिकही वाटू शकतील. पण मुद्दा आहे की अतिरेकी गोळ्या झाडताना तू कोण, तुझी मते काय अशाप्रकारचे प्रश्न विचारणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी या परिस्थितीत जे जे काही शक्य असेल ते ते केले पाहिजे असे वाटते. कमांडो प्रशिक्षण घेऊन स्वतः अतिरेक्यांचा खातमा करता आला असता तर फारच उत्तम पण ते करता येणे माझ्या आवाक्यातील गोष्ट नसल्यामुळेच इतर काही करता येऊ शकेल का हे चाचपून बघणे भाग आहे. म्हणूनच हा प्रपंच
---विल्यम जेफरसन क्लिंटन
(डिस्क्लेमरः माझ्या कंपनीतील वरिष्ठांची या काथ्याकूटासाठी कंपनीचा एसी, पीसी आणि इतर गोष्टी वापरायची पूर्ण परवानगी आहे.)
10 Dec 2008 - 6:01 am | स्वप्निल..
आजच म.टा. मध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा ई-मेल मिळाला. तो इथे देत आहे. कदाचित उपयोगी पडेल.
ashokchavanmind@rediffmail.com
बातमीचा दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3815831.cms
स्वप्निल
10 Dec 2008 - 7:35 am | एकलव्य
क्लिंटनसाहेब - आपल्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा!
इंग्रजी पत्राचा मसुदा थोड्या वेळापूर्वी वाचला. अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीने एक सांगावेसे वाटले - इफ आय वेअर यू देन... कदाचित पत्र थोडे छोटेखानी आणि दोन-चारच मुद्यांना स्पर्श करणारे लिहिले असते. तसेच आणखी थोडेसे डिमांडिंगही मांडले असते.
(घटनाप्रिय) एकलव्य
11 Dec 2008 - 1:13 am | केदार
मलाही तसेच वाटते.आशय महत्वाचा आहेच पण लांबी थोडी कमी करा. जास्त मोठा लेख वा पत्र लिहीले की लोक वाचत नाहीत वा भरभर वाचून, न आकलन करता त्यावर प्रतिक्रिया देतात असा अनूभव आहे.
11 Dec 2008 - 10:13 pm | क्लिंटन
नमस्कार मंडळी,
एकलव्य, केदार आणि इतर अनेकांच्या व्य. नि आणि खरडीतून आलेल्या सूचनांप्रमाणे पत्राची लांबी कमी केली आहे आणि सध्या मी ते पत्र मिसळपावच्या एका सदस्यांबरोबर अधिक रिफाईन करत आहे. भा.प्र.वे प्रमाणे उद्यापर्यंत ते नक्की व्हायला हवे. ते नक्की होताच मी दुवा देईनच. तो एक 'ढांचा' असेल. त्यात आपल्या मताप्रमाणे पाहिजे ते बदल करून इच्छुकांनी पाठवावेत ही विनंती.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
12 Dec 2008 - 2:46 pm | क्लिंटन
नमस्कार,
पत्राचा मसुदा इथे वाचता येईल. सर्व मसुदा एका पानात बसवला आहे.
सर्वांना विनंती आहे की त्या मसुद्यात आपल्याला योग्य वाटतील ते बदल करून पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवावे. तसेच आपल्या सर्व मित्रमंडळींना पत्र पाठवायची विनंती करावी ही विनंती. कारण मोठ्या प्रमाणावर पत्रांचा वर्षाव झाला तरच काहीतरी चांगला बदल घडून येईल असे वाटते. ५०-१०० पत्रांचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.
सर्वांच्या सहकार्याबद्दल आणि विधायक सूचनांबद्दल धन्यवाद.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
12 Dec 2008 - 5:45 pm | विकास
आपण घेतलेल्या पुढाकाराबद्दल धन्यवाद. अनिवासी भारतीयांनी काय करावे असे वाटते? पोस्टाने पत्र पाठवावे की फॅक्स करावे? दोन्हीचे कमी-अधिक परीणाम असू शकतात.
12 Dec 2008 - 6:05 pm | क्लिंटन
मी स्वतः पत्र भा.प्र.वे प्रमाणे उद्या पाठवणार आहे. माझ्या मित्रमंडळींना पण मी ही कल्पना सांगितली आहे आणि सर्वांनी त्यास पाठिंबा दिला आहे. तेव्हा कल्पना फॉरवर्ड होऊन एक्-दोन दिवसांत अनेकांपर्यंत पोहोचेल.अर्थात त्यापैकी किती पत्रे पाठवतील हे सांगता येत नाही. पण एकाकडून दुसर्याकडे फॉरवर्ड होत पुढील १५ दिवस तरी ही कल्पना वेबजगतात चालू राहावी असा प्रयत्न असेल.तेव्हा लगेच पाठवल्यास अनिवासी भारतीयांची पत्रे सुध्दा वेळेत पोहोचू शकतील.जर उशीर झाला तर मात्र फॅक्स पाठ्वावा ही विनंती.
मुख्य म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी पत्रे पाठवावीत यासाठी प्रयत्न केला नाही तर ५०-१०० पत्रे किंवा फॅक्स यांचा फारसा काही उपयोग होणार नाही.
---विल्यम जेफरसन क्लिंटन