उरलेली शिळी आमटि, दाल फ्राय किंवा दाल तडकाचा ब्येस्ट सदुपयोग!
साहित्यः
१. तुर, मसुर आणि मुग डाळ - प्रत्येकि पाव वाटि छोटि
२. तेल - ३ चमचे
३. आलं / लसूण पेस्ट - १ चमचा
४. जीरं, धणे आणि बडिशेप पावडर - १ छोटा चमचा प्रत्येकि
५. हळद / तिखट - पाव चमचा प्रत्येकि
६. बारीक चीरलेली हिरवी मिरची - चवीप्रमाणे
७. बारीक चीरलेला टोमॅटो - १
८. बारीक चीरलेले कांदे - २
९. बारीक चीरलेली कांद्याची पात (हिरवा भाग फक्त)
१०. बारीक चीरलेली कोथींबीर
११. काळे तीळ - १ चमचा
१२. ओवा - १/२ चमचा
१३. बेसन - २ चमचे
१४. कणीक
१५. चवीप्रमाणे मीठ
१६. पराठे भाजण्यासाठि साजुक तुप किंवा बटर
कृती:
१. वर म्हटल्याप्रमाणे जर शीळी आमटि, दाल फ्राय कींवा दाल तडका वापरणार असाल तर क्रं. २ ते ४ च्या पायर्या टाळा.
२. तीनहि डाळि ३-४ तास भीजत घालून कमीत कमी पाण्यात कुकरला बोटचेप्या शीजवून घ्या. वरण गार झालं कि घोटुन घ्या
३. आता मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत ३ चमचे तेल घाला. तेल तापलं कि त्यात अनुक्रमे आलं/लसूण पेस्ट, बारीक चीरलेला कांदा घाला. कांदा जरासा परतला की बारीक चीरलेला टोमॅटो घाला.
४. टोमॅटो मउ झाला की त्यात जीरं, धणे, बडिशेप पावडर, हळद, तिखट आणि मीठ घाला. मसाले परतले कि घोटलेलं वरण घालून डाळ सारखी करा. एक ५ मि. गॅस बंद करुन मिश्रण थंड होउ द्या.
५. आता एक दुसर्या भांड्यात कणीक, बेसन, हिरवी मिरची, कांद्याची पात, कोथींबीर, काळे तीळ, चवीप्रमाणे मीठ (वरणात ऑलरेडी घातलेलं आहे हे ध्यानात ठेवुन), हळद, ओवा आणि शीजवलेली डाळ घालून गोळा मळा. शक्यतो पाण्याची गरज भासत नाहि.
६. एक ५-१० मि. मळलेल्या गोळ्यातून लिंबाएवढा गोळा घेउन जाडसर पराठा लाटा. हा पराठा स्टफ्ड नाहिये म्हणून जरा जाडसरच ठेवायचा आहे. दोन्हि बाजूनी साजूक तुप किंवा बटर लावून खरपूस भाजा.
७. गरमागरम परोठे आवडत्या चटणी, सॉस, कैरीचा छुंदा किंवा वाफळत्या चहाबरोबर हादडा.
टीपा:
१. कधीहि, कोणतेही परोठे हे तव्यावरुन डायरेक्ट खाणार्याच्या पानात सर्व करणार असाल तर ठिक अन्यथा तव्यावरुन पराठा काढला कि एका छोट्या तपेली, भांड किंवा स्टिलच्या डब्यावर काढा (खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे). असं केल्याने पराठे गरम असताना खाली वाफ धरुन जे ओलसरं होतात ते टाळलं जातं आणि पराठे हे ओलसरं / लिबलिबीत झाले तर खायचा मुड जातो....स्पेशली स्टफ्ड पराठे.
२. हिरव्या कांद्याच्या पातीएवजी बारीक चीरलेला पालक किंवा मेथीही घालू शकता.
ता.क.: Last but not least म्हणतात त्या प्रमाणे कणीक मळायचं आणि पराठा लाटायचं श्रेय हे none other than...अर्धांगीनीचं.
प्रतिक्रिया
9 Aug 2015 - 3:58 pm | मुक्त विहारि
पहिला....
हुश्श.....
9 Aug 2015 - 4:00 pm | पियुशा
आव्व्व न्नो.....मी पयली चा चान्स हुकला :प
भारी दिसताहेत :)
9 Aug 2015 - 4:11 pm | अजया
तुकडे पडत नाहीत का उलटताना?
9 Aug 2015 - 4:21 pm | मुक्त विहारि
नाही पडत.....
9 Aug 2015 - 4:22 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा!!!!!
10 Aug 2015 - 7:58 am | बहुगुणी
सुरेख दिसताहेत पराठे!
(कणकेचं बेसन पीठाशी प्रमाण काय?)
10 Aug 2015 - 11:50 am | दिपक.कुवेत
बेसनाचं प्रमाण असं नाहिये. अंदाजानेच घातलयं. कसं आहे कि नुसती कणीक घातली तर गोळा सैलच राहण्याची शक्यता आहे / असते मग अश्या वेळी पराठा लाटणं हे एक दिव्य काम असतं. बेसन घातलं की मिश्रण/गोळा एकसंध राहण्यास मदत होते. अजया...म्हणून मग पराठा लाटताना तुकडे पडत नाहि. ह्या पाकृत बेसन अगदि दोन चमचे घातलय. समप्रमाणात किंवा अधीक घेतल्यास एक तर पराठा कडक होईल (मउ राहणार नाहि) आणि पराठ्यास बेसनाचा वास लागून मुळ डाळीची चवच लुप्त होईल. म्हणून बेसन फक्त बाईंडींग पुरतंच घालायचं आहे.
10 Aug 2015 - 8:53 am | प्रचेतस
लै भारी
10 Aug 2015 - 8:57 am | कंजूस
ये कुछ काम है हमारे। टीप क्र १) बरोब्बर आहे.चित्रे फारच छान आली आहेत.
तव्यावरून काढल्यावर लगेच अॅल्युमिनिअम फॅाइलमध्ये गुंडाळून ठेवल्यास प्रवासाला नेता येतात आणि वातड होत नाहीत.यावेळी मिरच्या आत न घालता मिरचीचा ठेचा वगैरे वेगळा नेतो.
10 Aug 2015 - 9:15 am | इशा१२३
मस्त दिसताहेत.
मी थालीपीठ करते अशीच.छान होतात.
11 Aug 2015 - 4:55 am | स्रुजा
+ १, थालिपीठं करते अशीच. पराठे पण छान आयडिया , तुमचे झालेत पण छान :)
10 Aug 2015 - 10:06 am | टवाळ कार्टा
ब्यॅचलर स्पेशल डिश आहे....प्रयोग करून बघायला हवा
10 Aug 2015 - 10:18 am | अत्रुप्त आत्मा
10 Aug 2015 - 11:06 am | नितिन५८८
मस्तच
10 Aug 2015 - 2:34 pm | gogglya
आणी ती पण चक्क पनीर न वापरता ? :)
10 Aug 2015 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
तोंपासू पाकृ ! मधून मधून चरायला उत्तम !
10 Aug 2015 - 3:24 pm | सस्नेह
फारच देखणा दिसतोय पराठा (की थालीपीठ ?) !!
11 Aug 2015 - 5:14 am | स्पंदना
चला!! काहीतरी खंमंग अन सोप्प आल बाबा!!
11 Aug 2015 - 9:18 am | पिलीयन रायडर
आज दणदणीत लसुणी दाल उरवली आहे!!
उद्या सकाळी तुझी आठवण काढुन दाल पराठा करण्यात येईल!
(ऑफिस मध्ये रुम वर रहाणार्या मित्रांनी एक नेपाळी शेफ घरात ठेवला होता. रहाण्याच्या बदल्यात स्वयंपाक करायचा तो. रात्री दणकुन दाल आणि सकाळी दाल पराठे हा नित्याचा मेन्यु होता त्यांचा!)
11 Aug 2015 - 12:27 pm | दिपक.कुवेत
होउन जाउ दे मग!! लसणाचा फ्लेवर पण छान लागेल...फोटो नक्कि टाक.
12 Aug 2015 - 6:55 pm | अनन्न्या
चांगला वाटतोय प्रकार
12 Aug 2015 - 7:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सदर लेख फाउल समजला जावा. ह्यामधे काही "इंग्रेडियंट्स" नाहीत. =))
12 Aug 2015 - 8:42 pm | प्यारे१
दीपकची न वाटणारी पण छान घरगुती पाकृ.
बाकी उरलेली अथवा 'मार्गा'ला लागलेली आमटी अथवा वरण (डाळ/ दाल हे भय्या लोकांचे शब्द्प्रयोग आहेत. आपल्याकडे डाळ म्हणजे कच्ची डाळ.) अशा प्रकारे पराठे/ थालिपीठ बनवून सत्कारणी लावण्याचं कार्य महाराष्ट्रातल्या सुगरणी बर्याच वर्षांपासून करत आहेत की!
13 Aug 2015 - 12:16 pm | दिपक.कुवेत
"अशा प्रकारे पराठे/ थालिपीठ बनवून सत्कारणी लावण्याचं कार्य महाराष्ट्रातल्या सुगरणी बर्याच वर्षांपासून करत आहेत की!" - हे गुपित ईथे खुले केल्याबद्दल. ह्या तुझ्या भरीव कामगीरीबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या सुगरणींकडून एक खास पुस्पगुच्छ!!
13 Aug 2015 - 12:46 pm | प्यारे१
अखिलमहाराष्ट्रकोंडयाचेमांडेकरुनवाढेन सुगरण मंडळाच्या सचिवांचे हार्दिक आभार! ;)
12 Aug 2015 - 10:03 pm | सूड
तवा बीडाचा आहे का?
12 Aug 2015 - 10:06 pm | पैसा
मस्त प्रकार! आमटी उरली तर करून बघायला हरकत नाही.
13 Aug 2015 - 12:43 am | तीरूपुत्र
माझी आई पण असे पराठे बनवते.मला खूप आवडते.
13 Aug 2015 - 12:17 pm | दिपक.कुवेत
सर्व प्रदिसादकांचे आभर्स!
17 Aug 2015 - 10:32 pm | सानिकास्वप्निल
दाल पराठ्याची पाककृती आवडली दिपक, फोटो पण छान आहेत :)
8 Oct 2015 - 10:01 am | बी
नमस्कार, तुमची ही पाककृती फार आवडली. मी येत्या शनवारी करुन पाहीन. धन्यवाद. तुमचे आणि तुमच्या सौ दोघांचे.
8 Oct 2015 - 10:53 am | हेमंत लाटकर
फोटो पाहून खावे वाटले.
9 Oct 2015 - 2:51 am | पद्मावति
मस्तं दिसताहेत दाल पराठे. पाककृती आणि फोटो दोन्हीही छानच.