झाल्या धूप दीप नीरांजन । देवासी वोगरावें भोजन ।
नानापरीचें पक्वान्न । अन्न सदन्न रसयुक्त ॥२९०॥
मांडा साकरमांडा गुळवरी । शष्कुल्या अमृतफळें क्षीरधारी ।
दुधामाजीं आळिली क्षीरी । वाढिली परी वळिवट ॥९१॥
मधुवडा कोरवडा । लाडू तिळवयांचा जोडा ।
रुची आला अंबवडा । ठायापुढां वाढिंनला ॥९२॥
पत्रशाकांची प्रभावळी । भात अरुवार जिरेसाळी ।
सूप सोलींव मुगदाळी । गोघृत परिमळी सद्यस्तप्त ॥९३॥
सांजा सडींव गुळयुक्त । एळा मिरें घालूनि आंत ।
पाक केला घृतमिश्रित । सेवितां मुखांत अरुवार ॥९४॥
कथिका तक्राची गोमटी । आम्ररसें भरली वाटी ।
शिखरणी केळांची वाढिली ताटीं । देखोनि लाळ घोंटी अमरेंद्र ॥९५॥
दधि दुग्ध साय साकर । नैवेद्या वाढिले परिकर ।
देव न पाहे उपचार । श्रद्धा श्रीधर तृप्त होय ॥९६॥
सामर्थ्य असलें करावयासी । तरी हे परवडी प्रतिदिवशीं ।
नैवेद्य अर्पावे देवासी । ना तरी पर्वविशेषीं अर्पावे ॥९७॥
-संदर्भः एकनाथी भागवतातून
खालील शब्दांचे अर्थ अथवा पदार्थ माहित करून हवेत
* अरुवार
* सूप
* जिरेसाळी
* सोलींव
* शष्कुल्या
* मधुवडा कोरवडा
* अंबवडा
* सद्यस्तप्त
* एळा
* कथिका तक्राची
प्रतिक्रिया
6 Aug 2015 - 1:40 pm | प्रचेतस
अरुवार -अलगद्/हळूवार
* सूप - वरण
* जिरेसाळी - भाताची एक जात.
* सोलींव - सोललेल्या
(सूप सोलींव मुगदाळी - सोललेल्या मुगाचे वरण)
* शष्कुल्या - माहित नै
* मधुवडा कोरवडा - गोड वडा असावा बहुधा.
* अंबवडा - माहित नै
* सद्यस्तप्त -बहुधा लोणकढे किंवा कढत तूप
* एळा - वेलदोडा
* कथिका तक्राची - ताकाचे भांडे बहुधा.
6 Aug 2015 - 2:07 pm | अत्रन्गि पाउस
गव्हले बहुतेक
6 Aug 2015 - 2:50 pm | माहितगार
शष्कुल्या म्हणजे करंजी ! खाप्रे डॉट ऑर्गावर मिळाले .
6 Aug 2015 - 3:02 pm | माहितगार
सद्यस्तप्त = गरमागरम ?
6 Aug 2015 - 3:09 pm | पैसा
आताच तापवलेले, कढवलेले म्हणजे अगदी ताजे, लोणकढे म्हणतो तसे.
6 Aug 2015 - 3:05 pm | माहितगार
तक्राची म्हणजे ताकच असावे, खाप्रे डॉट ऑर्गवर 'कथिका' म्हणजे कढी दिले आहे; म्हणजे 'ताकाची कढी' होत असावे असे दिसते.
6 Aug 2015 - 2:23 pm | पैसा
एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवरात इडल्यांचा उल्लेख "इडुरिया" असा आला आहे. तसेच मधुवडा हे मदुरवडा आणि अंबवडा हे आंबोडा याचे रूप असावे. मदुरवडा हा रवा मैदा, तांदुळाचे पीठ एकत्र मळून करतात तसेच आंबोडा हा लांबटगोल आकाराचा छोटा मेदूवडा म्हणायला हरकत नाही. कोरवडा या नावाच्या जवळ जाणारा एक दाक्षिणात्य पदार्थ आहे करुवडा. तो आपल्या तांदुळाच्या फेण्यांसारखा असतो.
सोलीव मूगडाळ म्हणजे बिनसालाची मूगडाळ. मूगडाळ सालासकट आणि बिनसालाची अशा दोन प्रकारात मिळते.
शष्कुल्या हे गव्हले, नखुल्या, मालत्या यांच्यापैकी वाटते आहे कारण पुढे क्षीरधारी असा उल्लेख आहे.
6 Aug 2015 - 2:45 pm | माहितगार
तांदुळाच्या फेण्यां ?
आम्हाला स्वीट शॉप मध्ये मिळतेती सूरतफेणी का काय माहिती आहे. तांदुळ फेणी चे स्वरुप कसे असते ?
6 Aug 2015 - 2:49 pm | पैसा
http://rohinivinayak.blogspot.in/2011/06/blog-post.html
यातल्या उकडलेल्या गरम फेण्या खायलाही अतिशय उत्तम लागतात.
6 Aug 2015 - 3:00 pm | माहितगार
ओके हे बहुधा माहित आहे पापड टैप दिसते. बादवे अमृतफळे म्हणजे सर्वसाधारण कोणतेही फळ असेल का नारळ असण्याची शक्यता असेल ?
6 Aug 2015 - 3:04 pm | पैसा
अमृता हे आवळ्याचे नाव आहे. पण आपल्याकडे जेवणात लिंबू आणि कोशिंबीर वगळता कच्चे पदार्थ ठेवत नाहीत. पक्वान्न म्हणजे तर शिजवलेले अन्न.
6 Aug 2015 - 3:29 pm | सूड
वरणफळे/चकोल्या/डाळढोकळी??
6 Aug 2015 - 3:31 pm | माहितगार
ओह ओके शक्य वाटतेय
8 Aug 2015 - 4:58 pm | चैदजा
अमृतफळें क्षीरधारी = बहुतेक अंगुरमलई / रसमलई असावी.
8 Aug 2015 - 5:29 pm | माहितगार
एक बंगाली पदार्थ १६ व्या शतकात ते ही पैठणच्या नियमीत नैवेद्यात ! अगदीच अशक्य नाही पण तरीही.. अजून साशंकता वाटते आहे. कुणी दुजोरा देऊ शकेल ?
8 Aug 2015 - 9:15 pm | चैदजा
क्षीरधारी = आटीव दुधातील.
फळांप्रमाणे दिसणारे दुधातील हे दोनच पदार्थ माहित आहेत.
8 Aug 2015 - 9:33 pm | चैदजा
मधुवडा = कदाचित भोपळ्याच्या गोड पुर्या असतील. आपल्याकडे पुर्यांना वडे म्हणतात, जे श्राद्धाला करतात, किंवा तुम्ही कोंबडी वडे खातात त्यातील वडे.
10 Aug 2015 - 4:37 pm | पामर
आंबवडा,आंबोडा,आंबोडे म्हणजे चणा दाळीचे वडे, कर्नाट्कात हे वडे फार प्रसिद्ध आहेत, आज ही बेंगलुर च्या रस्त्यांवर आंबवड्याचे ठेले दिसतात
10 Aug 2015 - 9:59 pm | पैसा
मी मंगलोरी सारस्वतांकडून करायला शिकले. त्याप्रमाणे ते मेदूवड्याच्याच पिठाचे करतात. फक्त गोल आणि मधे छिद्र असे करत नाहीत तर आंबाड्याच्या फळाप्रमाणे लांबटगोल आणि लहानसे करतात.
6 Aug 2015 - 3:23 pm | माहितगार
साखरमांडा वर गुळ; गुळयुक्त वेलदोडे (मिरे?) घातलेला शिरा, केळांचे शिक्रण, दही-दूध-साय-साखर यांचे मिश्रण, आंब्याच्या रसाने भरलेली वाटी, ताकाची कढी, करंज्या, अमृतफळें क्षीरधारी, वळवटाची खीर, मधुवडा, कोरवडा, अंबवडा, तीळाच्या लाडूंची जोडी जिरेसाळी भात, सोललेल्या मुगदाळीचे वरण , नुकतेच कढवलेल्या (गाईच्या) तुपाचा घमघमाट.
6 Aug 2015 - 3:30 pm | माहितगार
संत एकनाथ परवडत असेल तर रोज हा नैवेद्य करा म्हणताहेत, गाइ गुरे असलेल्या तत्कालीन मध्यमवर्गीय शेतकर्यासाठी ह्यातील बहुसंख्य पदार्थ रोजच्या जेवणात कठीण नसतील, केवळ साखर ह्या प्रकाराची मात्र त्या काळात तौलनीक किंमत बरीच असू शकेल म्हणून संत एकनाथ परवडण्याबद्दल बोलत असावेत ?
6 Aug 2015 - 3:36 pm | सूड
साखरमांडा आणि वर गूळ नव्हे...गुळवरी/गुळोरी
बहुतेक साखरमांड्यासारखा गुळाचं सारण भरलेला मांडा असावा.
6 Aug 2015 - 3:43 pm | सूड
पक्षी: गु़ळपोळी
वळिवट=गव्हले
शष्कुल्या= करंज्या
दुधामाजि आळिली क्षीरी= आळण्याच्या प्रक्रियेवरुन बासुंदी/खीर वाटली
6 Aug 2015 - 3:45 pm | सूड
इथे तंबीटाच्या लाडवांची शंका आली, पुस्तकी माहितीप्रमाणे तीळाचे लाडू तंबीटाच्या लाडवासोबत देतात. इथे लाडू तिळवयांचा जोडा म्हटलंय.
6 Aug 2015 - 3:54 pm | माहितगार
तंबीट म्हणजे ?
-(बर्याच गोष्टी माहित नसलेला माहितगार :)
6 Aug 2015 - 3:59 pm | सूड
हे आणि हे वाचा.
6 Aug 2015 - 4:09 pm | माहितगार
हम्म हे माहित नव्हते आणि तीळाचे लाडू रोजच्या पंक्तीला म्हणजे एकुण मजाच !
6 Aug 2015 - 4:05 pm | सूड
हे लोकसत्तामधल्या एका लेखावरुन कळतंय.
7 Aug 2015 - 3:34 pm | gogglya
गुळवणी तर नसेल ना? गुळ पाण्यात टाकुन उकळी आणतात आणी पुरणपोळीवर ओतुन खातात.
6 Aug 2015 - 4:04 pm | पैसा
वेलदोडा म्हणजे वेलची.
6 Aug 2015 - 4:15 pm | माहितगार
ते माहित आहे, पण सांजा सडींव गुळयुक्त । एळा मिरें घालूनि आंत । या ओळीत वेलचीच्या सांजात मिरे असा उल्लेख खटकतो ? सांजात मिरेपूड वगैरे घालतात ?
7 Aug 2015 - 2:54 pm | राही
काही शतकांपूर्वी स्वयंपाकात मिर्याचा वापर सढळपणे होत असे. मिर्याबरोबरच सुंठ, आले, पिंपरी, त्रिफळे, ओवा यांचाही वापर तिखटपणासाठी होत असे. यातले मिरीं, आले, सुंठ आणि पिंपरी हे औषधी पदार्थही आहेत. मिरीं तर पाचकही. शिवाय प्रिज़र्वेटिव. त्यामुळे बहुतेक सर्व पदार्थांत मिर्याचा वापर होत असे. अगदी शिकरण, आमरस यातही कित्येक लोक मिरें घालतात. कारवार-केरळपर्यंतच्या कोंकणपट्ट्यात मिरीं सर्वत्र विपुल प्रमाणात वापरतात. मिर्यावरून युद्धे झाली. मुख्यतः मसाल्याच्या पदार्थांसाठी युरोपीय व्यापारी कंपन्या भारतात आल्या. तत्पूर्वी युरोपात मिरें सोन्याच्या भावाने विकले जात असे. दस्तुरखुद्द आमच्याही घरात विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पोह्यांमध्ये मिरच्यांऐवजी सुंठमिरे वापरत असत असे वाडवडिलांकडून ऐकले आहे.
7 Aug 2015 - 3:11 pm | माहितगार
ग्रेट माहिती! मागच्या पिढ्यांमधील महारष्ट्रीय जेवणात मिर्यांच एवढे प्रमाण होते, ह्याची (मला) कल्पनाच नव्हती.
7 Aug 2015 - 3:36 pm | gogglya
ही म्हण त्यावरुन तर आली नसावी ना ?
7 Aug 2015 - 4:03 pm | माहितगार
म्हणीचा आधीचा अर्थ मिरच्या झोंबणे तून व्यक्त होणार्या अर्थछटे प्रमाणे असेल का ?
6 Aug 2015 - 4:39 pm | प्यारे१
एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी देखील श्रीमंत म्हणून गणले जात त्यामुळे पदार्थांचं, वस्तूचं वैविध्य हा प्रकार
त्यांच्या सगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये आढळतो. अगदी रेलचेल आहे. अर्थात सूक्ष्म निरीक्षण शक्ती जोडीला हवीच्
6 Aug 2015 - 4:39 pm | प्यारे१
एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी देखील श्रीमंत म्हणून गणले जात त्यामुळे पदार्थांचं, वस्तूचं वैविध्य हा प्रकार
त्यांच्या सगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये आढळतो. अगदी रेलचेल आहे. अर्थात सूक्ष्म निरीक्षण शक्ती जोडीला हवीच्
7 Aug 2015 - 7:28 am | माहितगार
मराठी विकिपीडियावर नैवेद्य थाळी या लेखात समर्थ रामदास स्वामींच्या साहित्यात रामनवमीच्या दिवशी श्रीप्रभुरामचंद्राला अर्पण करायच्या नैवेद्याबाबतचे साग्र संगित वर्णनही रोचक आहे. एकुण १६ व्या १७व्या शतकातील महाराष्ट्रातील शाकाहारी भोजनाची पुरेशी माहिती मिळते आहे.
7 Aug 2015 - 8:02 pm | प्यारे१
कुठेतरी वाचल्यावरून, एकनाथ महाराजांच्या बायको ची बहिण म्हणजे रामदास स्वामींच्या आई.
थोडक्यात एकनाथ महाराज समर्थ रामदासांच्या मावशीचे यजमान.
7 Aug 2015 - 9:05 pm | माहितगार
विश्वासार्ह संदर्भ मिळाल्यास जरुर द्यावा. कीर्तनकारांची अद्वैती कल्पना असेल तर सोडून द्यावे लागेल. जांब आणि पैठण फारसे दूरही नाही हे खरे असले तरी तसे असते तर १) समर्थ किंवा त्यांच्या बंधूंनी पैठणचा प्रवास करण्याची आणि एकनाथांचे वर्णन त्यांच्या साहित्यात येण्याची शक्यता राहीली असती २) सहसा समर्थांनी किंवा त्यांच्या शिष्यांपैकी कुणीतरी त्याचा उल्लेख करण्याची शक्यता असू शकली असती. मला वाटते समर्थांचे बंधुही अभंग रचना करीत त्यांच्या साहित्यात तसा उल्लेख असेल तर संदर्भ स्विकार्ह ठरावेत असे वाटते.
बाकी समर्थांच्या लेखनावर एकनाथांच्या लेखनाचा काही प्रभाव राहीला आहे का ?
7 Aug 2015 - 9:26 pm | प्यारे१
समर्थ रामदासांच्या साहित्याचे अभ्यासक सुनीलजी चिंचोलकर यांच्या पुस्तकात असा सन्दर्भ वाचल्याचे स्मरते.
पुस्तकाचे नाव लक्षात नाही.
एकनाथी भागवत आणि दासबोधामध्ये बऱ्याच ओव्या समान्तर आहेत. काही कल्पना अगदी सारख्या मांडलेल्या आढळतात. त्या दृष्टीनं समर्थांवर नाथ महाराजांचा प्रभाव जाणवतो. आत्ता लगेच उदाहरण देऊ शकत नाही. हाताशी सन्दर्भ ग्रन्थ नाहीयेत. शोधून देता येतील.
7 Aug 2015 - 9:29 pm | माहितगार
माहिती द्यावी उपयूक्त असेल.
10 Aug 2015 - 9:41 pm | कालिंदी
एकनाथ महाराजांनी येथे वर्णन केलेले पदार्थ माहित नाहित पण तुम्हि जी समर्थ रामदासांच्या नैवेद्या संबंधी लिंक दिलिय तिथल्या राब्-भाताबद्दल हा प्रतिसाद देतेय. विदर्भातली माझी आजी राब हा शब्द काकवी ह्या शब्दासाठी समानार्थी म्हणुन वापरायची. राब आणि भात किंवा राब आणि पोळी खाण्याचा ती लहान असताना हट्ट करायची अस काहितरी तिने म्हंटल्याच आठवतय.
तिथे ह्याचा उल्लेख 'तुप आणि मध ह्यांच्या मिश्रणापासुन बनलेला पदार्थ कदाचित असावा' असा केलेला आढळला. शक्य असल्यास हा उल्लेख दुरुस्त व्हावा अस वाटतय. पण ही माहिती नक्कि कुणापर्यन्त पोचवायची (आणि कशी) ते माहित नाहि म्हणुन इथे प्रतिसाद देतेय.
7 Aug 2015 - 8:40 am | अर्धवटराव
:)
यथसांग अनुष्ठान झालं. तल्लीन होऊन धूप, आरती झाली. आता भोजन प्रसाद :)
असला भारी बेत हवा जेवणाचा.
7 Aug 2015 - 1:36 pm | माहितगार
तुमचा प्रतिसाद पाहून खाली पंगतीची तयारी केली आहे :) या पंगतीला !
7 Aug 2015 - 10:06 am | अदि
धागा...
7 Aug 2015 - 1:35 pm | माहितगार
मंडळी, नैवेद्य म्हटले की पंगतही आलीच, तर या निमीत्ताने पंगत या विषयावरही माहिती दिल्यास विकिपीडियावर भरता येईल.
* पंगत म्हणजे काय ?
* पंगतीची मांडणी कुठे केली जाते ?
* पंगतीची मांडणी कशी केली जाते ?
* पंगतीची सजावट कशी करतात ?
* पंगतीत कोणकोणत्या प्रकारची ताटे वाट्या वापरली जातात ?
* पंगत कोण वाढते ?
* पंगतीस कोण कोण बसते ?
* नैवेद्याची ताटे कुणास दिली जातात ?
* जेवण सुरु करण्यापुर्वी कोण कोणत्या गोष्टी केल्या जातात ?
* कोण कोणते श्लोक म्हटले जातात ?
* जेवण संपल्या नंतर काय केले जाते ?
7 Aug 2015 - 4:30 pm | माम्लेदारचा पन्खा
* पंगत म्हणजे काय ?
>>>> सगळे भुकेजलेले लोक एकत्र जेवणावर तुटून पडतात त्याला पंगत म्हणतात.
* पंगतीची मांडणी कुठे केली जाते ?
>>>> पूर्वी जमिनीवर बसायचे पण सध्या "उदरवृद्धीमुळे " मेजावर जेवतात.
* पंगतीची मांडणी कशी केली जाते ?
>>>> जशी जेवणार्याला आवडेल तशी आणि वाढप्याला सोयीची असेल तशी....
* पंगतीची सजावट कशी करतात ?
>>>>>> पोटात कावळे ओरडत असल्याने सजावट बघायला वेळ नसतो त्याला फाटा दिला तरी चालतो !
* पंगतीत कोणकोणत्या प्रकारची ताटे वाट्या वापरली जातात ?
>>>>> आधी केळीची पाने असायची पण त्यात पंचनद्यांचा संगम
होत होता म्हणून स्टीलची ताटं आणली पण आळसुटक्यांना घासायचाही कंटाळा म्हणून मग थर्माकॉल !
* पंगत कोण वाढते ?
>>>> घरातल्या उत्साही बायका आणि वेठबिगारीसाठी पकडून आणलेल्या आजच्या मुली आणि भावी वधू.....
* पंगतीस कोण कोण बसते ?
>>>> घरातले ज्येष्ठ पितामह आणी पिलावळ पहिल्यांदा आणी बायका नंतर...
* नैवेद्याची ताटे कुणास दिली जातात ?
>>>>> कोणतातरी बाळ्या किंवा बंड्या ज्याच्यावर देवाची कृपा व्हावी असं सगळ्यांना वाटत असतं त्याला....
* जेवण सुरु करण्यापुर्वी कोण कोणत्या गोष्टी केल्या जातात ?
>>>>>> आपल्या ताटातील पदार्थ बघणे....दुसर्याच्या ताटात काय जास्त आहे ते बघणे आणि तो आपल्या पानात पडेप्र्यंत चुळबुळत राहणे !
* कोण कोणते श्लोक म्हटले जातात ?
>>>>> जेवताना आपण पहिला घास उचलल्याबरोबर अगदीच कोणी सुरूवात केली तर "वदनी कवळ घेता" होईपर्यंत भूक आवरणे क्रमप्राप्त...
* जेवण संपल्या नंतर काय केले जाते
>>>>> जे जमेल आणि झेपेल ते.... बरेचसे लोक ताट सरकवून तिथेच लवंडू इच्छितात....
7 Aug 2015 - 5:38 pm | जडभरत
मस्तच मामलेदार साहेब!!!
7 Aug 2015 - 8:03 pm | प्यारे१
ही माहिती विकिपीडिया वर टाकणार का ?
छान!
7 Aug 2015 - 8:43 pm | माहितगार
:) पंगत इथे पहावे :)
7 Aug 2015 - 8:57 pm | प्यारे१
प्रश्न तुम्हाला नाही ओ साहेब.
तुम्ही करताय त्या कामासाठी सलाम!
ते मापं चं माप त्यांच्या शर्टात टाकलं होतं. ;)
7 Aug 2015 - 9:47 pm | माम्लेदारचा पन्खा
हवं असल्यास आमच्या शिंपी बुवांना विचारा !!
7 Aug 2015 - 4:44 pm | माहितगार
=))
8 Aug 2015 - 9:54 am | जेपी
माहितगार जी सदरील प्रतिसाद जाहिरात आहे.
पंगत
कृ.ह घ्या.
8 Aug 2015 - 10:57 am | माहितगार
=)) जोरदार ! लय भारी पंगत वृत्तांत लिहिलाय की जेपीराव, तुम्ही पंगतीतील आमच्या उपस्थितीची (आणि आमच्या विकि जाहीरातींची) आपण दखल घेतली होती आणि आम्हाला खबरच नव्हती आत्ता पर्यंत, स्वारी स्वारी, बाकी तुम्ही आम्ही पंगत मांडली आणि आपले पंगत संशोधक एक्कांसाहेब आहेत कुठे आहेत ? कॉलींग एक्कासाहेब :)
8 Aug 2015 - 11:23 am | माहितगार
मापच्या वरच्या अनुभवाचे बोल प्रतिसादाला त्या पंगतीचा संदर्भ असू शकतो हे माहितच नव्हते, स्वारी हं माप ;)
8 Aug 2015 - 3:20 pm | माहितगार
संत नामदेव हे चौदाव्या शतकातले कवी होते, त्याच्या नंतरच्या संत एकनाथ, समर्थ रामदास, संत तुकाराम प्रभृतींच्या अबंगातील सर्व शब्द समजणे कठीण जाते पण संत नामदेवांची एक गवळण (क्रमांक ३) "यशोदे घराकडे चाल मला जेऊ घाल' खाप्रे डॉट ऑर्ग वर दिसते आहे पण या गवळणीतील मराठी बरेच आधूनिक कालीन वाटते आहे. हि गवळण संत नामदेवांनीच लिहिली असण्याबद्दल खात्री करता येण्याची शक्यता असू शकेल काय ?
बादवे सर्वसाधारण वाचना साठीही गवळण रोचक आहे.
10 Aug 2015 - 1:55 pm | राही
अमृतफळ म्हणजे हिंदी अमरूद म्हणजे आपला पेरू तर नसावा? पेरू चा 'एक फळ' या अर्थी उल्लेख चारपाच शतकांआधीच्या मराठी साहित्यात कुणी वाचला आहे का? किंवा गेला बाजार दोनशे वर्षांपूर्वी?
अर्थात अमरूद हा उर्दू शब्द आहे आणि त्याचे मूळ कदाचित अर्मूट(त) या अरेबिक शब्दात असावे, आणि अरमूट म्हणजे अरबी आणि तुर्कीक भाषांमध्ये पेअर(पेर), आणि ह्या पेअर (पेर)वरूनच आपला पेरू शब्द आला असावा असे विकीबाबा सांगतो.
10 Aug 2015 - 2:22 pm | राही
ताट वाढण्याचेही नियम होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी आणि समाजात ते वेगवेगळे होते. ताटातले कमी खाल्ले जाणारे पदार्थ अगदी डावीकडे वाढले जात कारण उजव्या हाताने जेवताना तो हात वारंवार ताटावरून अॅक्रॉस उलट्या बाजूला म्हणजे डावीकडे न्यावा लागू नये हे असावे. म्हणून लोणची, चटण्या, कोशिंबिरी हे पदार्थ डाव्या बाजूला. तिखट खाणार्या समाजांत गोड पदार्थ डाव्या बाजूला असतात. ब्राह्मणांमध्ये मीठ ताटाच्या परिघाच्या मध्यबिंदूवर वाढण्याची पद्धत आहे. पण कित्येक समाज असे मानाचे स्थान मिठाला देत नाहीत. त्यांच्यामध्ये मीठ सगळ्यात खाली डावीकडून पहिले असते. कारण स्वयंपाक असा असावा की वारंवार मीठ घेण्याची जरूरच पडू नये. नाही तर तो घरातल्या सुगरिणीचा कमीपणा. म्हणजे 'आमच्या गृहिणी असा बिनचूक स्वयंपाक करतात की तुम्हाला त्यात मीठ कधीच कमी पडणार नाही.' वगैरे.
दुर्दैवाने आपल्याकडे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने या छोट्याछोट्या प्रथांचे संशोधन आणि दस्त-ऐवजीकरण झालेले नाही. शिवाय पेशवाईनंतर अखिल महाराष्ट्रातल्या खाण्या-पिण्या-नेसण्याबाबतच्या बहुतेक रीतींचे प्रमाणरूपच बदलले. 'मानसोल्लास' किंवा 'अभिलषितार्थ चिंतामणि' या सोमेश्वर तिसरा या राजाने बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिलेल्या ग्रंथात अन्न, भोजन, पाकसिद्धी याविषयी पुष्कळ माहिती आहे आणि या पुस्तकाचा उत्तम परिचय मायबोलीवरच्या www.maayboli.com/node/15408 अन्नं वै प्राणा:' या उत्कृष्ट संदर्भमूल्य असलेल्या वाणि वाचनीय अशा लेख मालिकेत आहे.
10 Aug 2015 - 3:55 pm | राही
वरील प्रतिसादात 'बहुतेक रीतींचे प्रमाणरूपच बदलले' असे वाक्य आहे. त्याऐवजी 'जनमनातली प्रमाणरूपांची कल्पना बदलली' असे सुधारित वाक्य पाहिजे. म्हणजे कशाला प्रमाण समजावे त्याची संकल्पना बदलली.
11 Aug 2015 - 10:09 am | माहितगार
छोट्याछोट्या प्रथांचे संशोधन आणि दस्त-ऐवजीकरण व्हायला हवे याच्याशी पूर्ण सहमत. तिखट खाणार्या समाजांत गोड पदार्थ डाव्या बाजूला असतात. अशी बारकावे टिपणारी निरीक्षणे दस्तएवजीकरणासाठी उपयूक्त वाटतात.
अन्नं वै प्राणा: लेखमाला छान आहे वाचतो आहे. दुव्यासाठी आणि माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी आभार
10 Aug 2015 - 2:46 pm | राही
पाकशास्त्रावरच्या कुठल्यातरी पुस्तकात (कदाचित मोहसिनाबाई मुकादम यांच्या लेखात किंवा अन्नपूर्णामध्ये) गुरोळ्या ह्या पदार्थाची माहिती वाचली होती. त्यात गूळ वापरत होते इतकेच आठवते. नावाव्यतिरिक्त बाकी माहिती आठवत नाही.