पंढरपूर गोंदवले माहुली

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
6 Jul 2015 - 11:28 am

प्रस्तावना :
जुलै २०११ मध्ये पंढरपूर आणि गोंदवले येथे गेलो होतो. त्या सहलीचे वर्णन या अधिक महिन्याच्या निमित्ताने देत आहे ..( या अगोदर वर्डप्रेसमध्ये आणि इतर ठिकाणी प्रकाशित केले आहे.) त्यावेळेस फोटो काढले नव्हते परंतू वर्णनातून ती कमतरता भरून निघेल अशी आशा करतो. पंढरपूर - गोंदवले रेल्वेने पर्यटन: -दोन रात्री एक दिवस. -:

गाभा :-
पंढरपूर ठिकाणे : सर्वसाधारण नकाशा.

११ जुलैला (२०११)आषाढी एकादशी होती. वारीच्या बातम्या पेपरात जूनपासून येत होत्या. आपण दुसय्रा राज्यांत जाऊन देवळे पाहात फिरतो आणि आपले पंढरपूरच पाहात नाही असा एक विचार मनात आला. हजार वर्षांपेक्षा अधिक याचे ऐतिहासीक उल्लेख आहेत. आम्ही काही चालत आळंदीच्या पालखीत अथवा आमच्या डोंबिवलीच्या वारीत जाणार नव्हतो. बस अथवा रेल्वेनेच जाणार होतो. पंढरपुरात दर्शनासाठी बराच वेळ लागतो हे ऐकून होतो.येथे धर्मशाळेत राहाणे जमेल का हापण एक प्रश्न होता .त्याप्रमाणे आयोजन करणे गरजेचे होते. सातारा,पुणे आणि सोलापूर या तिन्ही ठिकाणाची चाचपणी केली. वाचनालयातून काही पुस्तके आणली. ( माहितीस्रोत : "सचित्र पंढरपूर"- यशवंत रामकृष्ण ,१९६८.) वेळापत्रक आणि गाड्यांचे आरक्षण तपासले. जवळची ठिकाणे कोणती करता येतील याचा अंदाज घेतला.पंढरपूर थेट गाडीचे (५१०२७)आरक्षण संपले होते ,विजापुर गाडीचे (५१०२९)कुर्डुवाडीचे मिळाले.येताना गोंदवले मार्गे साताय्राला येऊन तिसय्रा दिवशी कोयना गाडी(११०३०) मिळणार होती.

.

आताचे २०१५चे कुर्डुवाडी ते पंढरपूर रेलवे टाइमटेबल-

.

पंढरपूर थेट गाडीचे वेळापत्रक-

.

कुर्डुवाडीस सकाळी जाणाय्रा गाड्या-

.

दर्शनाला वेळ लागला तर गोंदवले न करता साताय्राहून परत असं ठरलं. पत्नी आणि मी असे दोघेच जाणार होतो. २७जून २०११(ज्येष्ठ कृ एकादशी) रात्री पावणे बाराला कल्याणला गाडीत बसलो. ही जोडगाडी आहे. पुढचे बारा डबे विजापूर/पंढरपूर ५१०२९/५१०२७ चार /तीन दिवस जाणाऱ्या गाडीलाच मागचे सहा डबे शिर्डी ५१०३३ रोज जाण्यासाठी जोडलेले असतात. दौंडला गाड्या वेगळ्या करतात.त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ ठरलेलाच.
कुर्डुवाडीला गाडी दोन तास उशीरा पोहोचली.८.५०ची सोलापूर-कोल्हापूर इक्स०निघून गेली होती.पावणे दहा वाजले होते.बाहेर पडून पंधरा मिनीटे चालत डेपो गाठला. सवा दहाला पंढरपूर बस मिळाली आणि सवा अकराला उतरलो. पंढरपुरचा हा नवा डेपो छान आणि प्रशस्त आहे.सुलभची सोय आहे.प्रभु अण्णांच्या हॉटेलात भरपूर खाऊन घेतले. पोटोबा झाला आता विठोबा करायला निघालो. देऊळ येथून पंधरा वीस मिनीटांवर आहे असे कळले.बॅगज घेऊन चालत निघालो.सावरकर चौकाजवळून धर्मशाळा बघत चाललो. एकदा सामान आणि मोबाईल ठेवले की देवळात जाणे सोपे होणार होते.कैकाडी महाराज मठातले पुतळे आम्हाला पाहायचे नव्हते.एका धर्मशाळेत गेलो.बय्राच खोल्या दिसल्या दारापाशी चारपाच जण रांग पकडू न बसले होते.खोल्या एक तारखेपासून प्रतिपदेपासून देणार होते! ती रांग त्यासाठी होती! मग दुसय्रा एका ठिकाणी हेच उत्तर मिळाले.विचार केला अजून एका ठिकाणी पाहू. तिसय्रा ठिकाणी ‘शंकर महाराज वंजारी धर्मशाळे’त मात्र अगोदरच आम्हाला बॅगा ठेवायच्या आहेत खोली नकोय हे सांगितले.तिथल्या बाईंनी लगेच एक भिंतीतले कपाट उघडून दिले आणि वीस रुपयांची पावतीपण दिली.बॅगा, पर्स मोबाईलसकट ठेऊन त्याला आमच्याकडचे कुलूप लावल्यावर आम्ही मोकळे झालो. तिकडे सर्व धर्मशाळांची यात्रेच्या काळात खोल्या देण्याची तारीख ठरलेली असते. येथून चालत पश्चिमेकडून पूर्व दरवाजावरून येथे प्रवेश आहे. (प्रथम देवळात न जाता )समोरच्या चंद्रभागेच्या महाद्वार घाटावर आलो. जर तुम्ही बस डेपोकडून रिक्षाने आलात तर तुम्हाला येथे घाटाकडे जाणाय्रा चौकात (चार रस्ता,कमान) सोडतात.’येथे प्रथम चंद्रभागेत पाय धुवून पुंडलिकाचे समाधि दर्शन घ्या नंतर देवळात जा ‘ सांगेल.आम्ही तिकडेच निघालो.चौकातून उताराने पुढे गेले की चंद्रभागा नदी आणि थोडे पाण्यातच पुंडलिकाचे मंदिर,शंकराचे मंदिर आहे.बाजूला एक दगडी होडी आहे तिथे समाधि आहे. बस मधून येताना चंद्रभागेच्या पुलावरून नदीत भरपूर पाणी दिसते कारण तिकडे एक बंधारा बांधून पाणी अडवून ठेवले आहे.यात्रेच्यावेळी घाण झाली की पाणी सोडतात. हल्ली रोज दोन हजार,एकादशीला दहा हजार आणि आषाढीला आठ लाखतरी भाविक येतात.गावाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर ताण पडतो.त्यामुळे या दृष्टीने आणि निव्वळ भक्तीनेच नदीकडे,गावाकडे पाहाण्याचे ठरवले.वाळवंटातला एक कुत्रा भाकरी घेऊन पळतोय आणि नामदेव लोण्याची वाटी घेऊन त्याच्यामागे धावतांना दिसले. पुंडलिक आईवडिलांची सेवा करताहेत,पैलतिरावर रुक्मिणीचा रुसवा काढायला निघालेले देव पुंडलिकाच्या दारात फेकलेल्या विटेवर कमरेवर हात ठेऊन वाट पाहात थांबले आहेत हे चित्रही डोळयासमोर आणायचा प्रयत्न केला. आता मात्र नाकाला दुर्गंधि जाणवू लागली होती. दर्शनाला किती वेळ लागणार याची चिंता वाटू लागली.
एकादशीला अजून सतरा दिवस होते आणि गर्दी अजिबात नव्हती. आपण जे आता पुंडलिक मंदिरा पलिकडच्या तीरावर गाव पाहातो ते जुने पंढरपूर गाव.तिथेच पूर्वीचे मिटरगेज रे० स्टेशन होते. भाविक तिकडे उतरून नावेने इकडे यायचे.नावेचा धंधा महादेव कोळयांकडे होता.पुंडलिक त्यापैकी एक. पुढे शेठ हिराचंद यांनी १९२६ मध्ये नदीवर पुल बांधल्यावर नावाड्यांचा धंधा बुडाला. सात आठ वर्षांपूर्वी मिरज-कुर्डुवाडी ब्रॉडगेज रेल्वे आणि नवीन जागी स्टेशन झाले. भीमा नदी उगम पावते भीमाशंकराच्या डोंगरात पुणे जिल्हयात. पुढे तिला भामा,इंद्रायणी,कुकडी,मुळा मुठा,घोड आणि नीरा नद्या भेटतात तीच ही पंढरपूराची चंद्रभागा. येथे एकूण चौदा घाट आहेत.
१)लखुबाई
२)दिवटे
३)खिस्ते
४)कबीर
५)उध्दव
६)दत्त
७)कुंभार
८)अमळनेर
९)अहिल्याबाई
१०) महाद्वार येथे पुंडलिक मंदिर आहे
११)कासार
१२)चंद्रभागा
१३)मढे आणि
१४)खाका पुंडलिक मंदिर पाहून आता चौकाकडे चढून जातांना उजवीकडे अहिल्याबाईनी बांधलेला वाडा आणि आत राम मंदिर आहे ते पाहिले. समोरच एक द्वारकाधिश मंदिर आहे. हे बांधले शिंदेसरदारांनी. तिथून चौकात आलो. समोर गेलो तर देऊळ,डावीकडचा रस्ता जातो जुन्या वस्तीत आणि पुढे जनाबाईच्या गोपाळपूरला. इकडे नंतर जाणार होतो.या रस्त्यावर दुसय्रा बोळात(बारीक रस्ता)लाड पेढेवाल्यानंतर आहे संत नामदेव मंदिर. पुढच्या धर्मशाळेमुळे झाकले गेले आहे.मंदिर खरेतर केशवराजाचे आहे. याठिकाणची व्यवस्था नामदेव समाज पाहातो. नामदेवाचे मूळ घर गावात दुसरीकडे आहे. पंढरपूरच्या विठठलाचे महत्व वाढले ते त्याची भक्ती करणाय्रा संतांमुळे. हा देव आहे भावाचा भुकेला. त्याला भक्ताचे मन मोडवत नाही.रुक्मिणीची समजूत काढायला जातांना वाटेत पुंडलिकासाठी तिकडेच थांबला. पुंडलिक,नामदेव,ज्ञानेश्वर, एकनाथ,तुकाराम,जनाबाई,चोखामेळा,सावतामाळी, दामाजी आणि पुरंदरदास या सर्व संतांचे विठठलाशी नाते आहे.कुणासाठी माऊली,तर कुणासाठी मायबाप, बा ईट्टल,पाडुरंग, पुंडरिक,भगवंत ,श्रीहरी झाला आहे.
म्हणून संतांच्या दर्शनानंतर आता विठ्ठलाला भेटायचे. चौकातून परत देवळाच्या पूर्व प्रवेशाकडे निघालो.रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेढे ,लाह्या,फुले,तुळशीमाळेची दुकाने आहेत.दुकानदारांनी सांगितले की फक्त तुळशीचा हार आत नेऊ देतात बाकी आल्यावर घ्या.यात्रेवेळी पाच लाखांवर भाविक कसे काय इथे मावतात?बरेच दुरून केवळ कळस पाहून माघारी जातात. आता देवळापाशी आलो.डावीकडे एक चार मजली नवीन उंच इमारत आहे.तिचे खालचे फाटक बंद होते! गर्दी झाली की यातूनच फिरत फिरत जावे लागते ते थेट चौखांबी मंडपातून चरणस्पर्श करता येतो.दोन अडीच तासांची निश्चिती.अथवा तुम्हाला मुख्य दारातूनही ‘मुखदर्शना’साठी दहा मिनीटांत फक्त सोळाखांबी मंडपापर्यंतच जाता येते, मूर्तीचे मुख लांबूनच पाहाता येते.आज अनपेक्षित धक्का होता मुख्य दारातूनच चरणस्पर्शला आत जायला सांगितले.संतांची कृपा.काल एकादशीला खूप गर्दी होती असे कळले. पहिली पायरी नामदेवाची.नामदेवाची इच्छा होती की समाधी नंतर त्याची पायरी बनवावी म्हणजे भक्तांचे पाय लागतील. नामदेवाबरोबरच चौदा जणांनी समाधी घेतली. चौदा पायय्रा आहेत .नामदेवाची इच्छा अपूरीच ठेवण्याची पूर्ण काळजी घेतली आहे -पायरीला पाय लावू देत नाहीत.बाजूने वर चढलो. दोन महिला पोलीसांनी पत्नीचे स्वागत केले ‘माउली इकडे या’, पुरुष पोलीसांनी मला ‘मामा इकडे या’. आम्ही अगोदरच मोबाईल,पर्स बैगा ठेवून आलो होतो.तपासणी करून आत सोडले. खरं म्हणजे हे देऊळ नवव्या शतकात पांडुरंगपल्ली नावाचे शंकराचे होते.त्याच्या खुणा आजही जोत्यावर दिसतात.अकराव्या शतकात मुसलमानी सुलतानांचे हल्ले देवळांतील मूर्तींवर होऊ लागले त्यावेळी मूर्ती लपवून ठेवायचे अथवा दुसरीकडे पाठवायचे.इथेही हेच झाले.शंकराचे देऊळ झाले विठ्ठलाचे.आताच्या मूर्तीच्या जागी दुसरी होती.असो. रांगेत कानडी भक्त बरेच होते.पाउण वाजला होता.रांग भराभर सरकली.मुक्ती मंडप,मोठा चौक पार करून सोळाखांबी मंडपात आलो.आजुबाजूची चित्रे रांगेतूनच पाहून समाधान मानले. चौकात गरूड आणि मारूती आहेत. एक खांब चांदीने मढवला आहे याला गरूड खांब म्हणतात. कर्नाटकातल्या हम्पिची विठ्ठलमंदिरातली मूर्ती सोळाव्या शतकांत मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी इथे आणल्यावर तिकडचा एक भक्त आणि संतकवी पुरंदरदास इथे आला आणि याच गरूड खांबाला टेकून बसायचा.या मंडपातून आतल्या मंडपात जाण्याच्या दारावरच्या पितळी पट्टीवर एक लेख आहे. आतमध्ये चौखांबी मंडपात कर कटावरी ठेवूनिया विठ्ठल उभा दिसला.एका आडव्या पितळी मढवलेल्या लाकडी तुळईखालून वाकून पुढे जावे लागते (सर्व विठ्ठल मंदिरात असतेच). भक्तांनी मूर्तीकडे पाहात फार वेळ घालवू नये म्हणून एक महिला पोलीस प्रत्येक ‘माउली’चे आणि पुरूष पोलीस ‘मामा’चे डोके श्रीचरणावर लगेच टेकायला लावतात. तिथे जागापण चिंचोळी पाच सात फुटांचीच आहे.त्यामुळे पुढे सरकावे लागले.मला मूर्ती नीट पाहायची होती,कवचकुंडले आणि वीट. दहा सेकंदात काही शक्य नव्हते.शीरावर मुकुट असला तरी टिव्हिवर महापुजा दाखवतात त्यावेळी पाहिले होते की गुराखी अथवा गवळी कापडी टोपडे घालतात तशी आहे.कृष्णावतारात देव गुराखी झाला होता नं. बाहेर उजवीकडे जाताना रुक्मिणीचे देऊळ आहे. इथे जरा सावकाश दर्शन करता येते. पौराणिक कथेप्रमाणे रुक्मिणी पैलतिरावरच्या ‘दिँडिकारण्या’तच रुसलेली आहे तिकडे खरंच एक मूर्ती आहे म्हणतात.इकडची कृत्रिम आणि देवळाला न साजेशी आहे.रुक्मिणीच्या मंडपाशेजारी दोन देवघरे आहेत सत्यभामा आणि राही (?)चे आणि एक शेजघर देवीचे आहे.विठ्ठलाला आणि रुक्मिणीला सरदारांनी खूप दागिने दान केले आहेत. हे रोज बदलून मूर्तीवर घालतात.[हे सर्व दागिने २०११साली आषाढी एकादशीच्या अगोदर स्टार माझावर दाखवण्यात आले होते,यावर्षी २०१३ जूनमध्ये देवस्थान समितीनी सांगितले की सर्व चोरीला गेले आहेत ??!!] रुक्मिणी मंदिरातून घाईने बाहेर पडलो पण नंतर आठवले की तिथल्या काही गोष्टी पाहायच्या राहून गेल्या.त्यागोष्टी म्हणजे ‘चौऱ्यांशी’चा शिलालेख,नवग्रहांची शिळा, आणि कान्होपात्रा गुप्त होऊन तिचे झाड झाले ते दगडातील झाड.रुक्मिणीचा थाट नवरात्रांत अश्विन महिन्यात आणि कार्तिकात असतो.हिचे पुजेचे हक्कदार अथवा वहिवाटदार ‘उत्पात’ तर विठ्ठलाचे ‘बडवे’ आहेत . .
पंढरपूर हे एक नवीन क्षेत्र आहे.पुराणांत सप्त पुय्रांचा आणि काही नगरे,तलाव,कुंडांचा उल्लेख आहे त्यात पंढरपूर नाही.अकराव्या शतकात केव्हातरी विठ्ठलाची मूर्ती आल्यावर गावाचे महत्व वाढू लागले असावे.वैकुंठ,दक्षिण काशी आणि पुढे ज्ञानोबांच्या नंतर संतांचे माहेर झाले. आंध्रचे लोक पंडरिपुर म्हणतात. इकडे चार मोठया वाय्राअथवा यात्रा होतात आषाढी,कार्तिकी,माघी आणि चैत्री.शिवाय इतर सणावारीही भाविक श्रीमुख पाहाण्यास गर्दी करतात .इतर देवळांप्रमाणेच इथेपण हरिजनांना प्रवेश नव्हता. साने गुरुजींनी हे बदलायला लावले.देवळाला उत्पन्न रोख आणि वस्तु रुपाने बरेच येते.रोख रोज मोजून घेण्याऐवजी बडवे आदल्या दिवशी संध्याकाळी दुसय्रा दिवसाची बोली लावून तेवढी रक्कम जमा करतात.
दीड वाजला होता.पटकन चौकातून नामदेवमंदिरापाशी आलो.ऑटोरिक्षा करून(तीस रु)गोपाळपूरला आलो.हे गाव चंद्रभागेकाठीच तीन किमीवर मंगळवेढा रस्त्यावर आहे.वाटेत जातांना यात्रेसाठी रांगेकरता बांबूचे कुंपण बांधतांना दिसले.दर्शनरांग चार पाच किमी लांबते असे रिक्षावालाने सांगितले. मंगळवेढा(वीस किमि) संत दामाजीमुळे (आणि माडगुळकर बंधु)तर गोपाळपूर संत जनाबाईचे स्थान म्हणून प्रसिध्द झाले.ही एक किल्लेवजा जरा उंच अशी गढी आहे.येथे जनाबाईचे दगडी जाते(?),रांजण,रवी या वस्तु आहेत.एक कृष्णाचे देऊळ आहे.शुकशुकाट होता.मंगळवेढ्याकडून येणाय्रा एका बसने परत आलो .हा रस्ता विठठलमंदिराच्या मागून सावरकरचौकाकडे जातो .बरीच नर्सींग होम्स,हॉस्पिटल्स इकडे दिसली.हवीच ना एवढे यात्रेकरू येणार तर.कंडक्टरने आम्हाला धर्मशाळेच्या मागच्या बाजूस जवळ उतरवले.आमचे लॉकरमधले सामान ताब्यात घेतले आणि लगेच बस डेपो गाठला.
तीन वाजलेले.चहा वडा खाऊन गोंदवले बसची वाट पाहात थांबलो. साडेतीनला बस सुटली.म्हसवडमार्गे ८०किमी आहे. वाटेत दोन तीनच गावे लागली.वाहने,रहदारी फार नाही.मोकळा माळरानाचा मैदानी फार झाडी नसलेला ओसाड भाग आहे.थोडा पाऊस झालेला असल्यामुळे प्रवास जाणवला नाही.सवापाचला गोंदवले आले. गोंदवले मोठे गाव आहे.रस्त्याच्या उजवीकडे एक कमान दिसते.’ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज संस्थान’येथून आत गेल्यावर मोठ्या आवारात रामाचे देऊळ,कार्यालय आणि लहान मोठे भक्त निवास आहेत. प्रथम कार्यालयात खोलीसाठी नोंदणी केली.नि:शुल्क आहे .”इथले नियम काय आहेत?” “काही नाहीत फक्त रामनाम घ्या. रामाच्या देवळातला नित्य कार्यक्रम फलकावर आहे .चहा,नाश्ता,भोजनाच्या वेळा लक्षात ठेवा.” खोलीत सामान टाकून आंघोळ करून तयार झालो.खोली साधी पण नीटनेटकी होती.शांत वातावरण.रामाच्या देवळात गेलो.छान देऊळ.काही भजन वगैरे होते.दर्शन घेऊन बाहेर आलो.
चहाची वेळ निघून गेल्यामुळे रस्ता ओलांडून समोरच्या एका हॉटेलात गेलो.मालक फार बोलका आणि अगत्यशील होता.लगबगीने भजी चहा आणला.डबल चहा पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं. नाक्यावर आलो आणि तिथे लावलेला नकाशा पाहिला. जून महिना असल्यामुळे सात वाजले तरी अंधार झाला नव्हता.नकाशात दाखवल्याप्रमाणे दहिवडीच्या रस्त्याने पुढे उजवीकडे एक रस्ता गावात जातो तिकडे गेलो.चार दोन घरांनंतर एक देऊळ आले. ते पाहून पुढे काही दिसेना म्हणून मागे फिरलो तर एका घरातून आवाज आला ‘दादा मागे कशाला फिरताय? असेच पुढे जा आणि गोल वळसा घेऊन तिकडेच मोठ्या रस्त्याला लागाल. भाऊंचे आभार मानून पुढे निघालो.बैठी घरे आहेत आणि छान गावचे वातावरण आहे.कडुनिंबाची झाडे आहेत.गोंदवले महाराज संसारी संत होते.त्यांचे सर्व आयुष्य या गावात गेले.त्यांचे कुटुंब थोडे सधन होते.तरुणपणी त्यांना घरातल्या जिन्यावर रामाचे दर्शन झाले असे म्हणतात.रामनाम,भक्ती आणि सोपी प्रवचने यामार्गे ते भक्तांच्या स्मरणात राहिले आहेत.त्यानी चमत्कारांनी लोकांना देवाचे महत्व पटवले नाही. पुढे धाकटे राम मंदिर,मठ,मारुती,थोरले राम मंदिर,महाराजांचे घर आणि संग्रहालय पाहून परत आलो.छान ठेवले आहे.इथल्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनाशी निगडीत आहेत. आज पंढरपुरातल्या भक्तिमय गजबजलेल्या वातावरणातून आता गोंदवल्याच्या शांत, रामनाम भरलेल्या परिसरांत आलो होतो. इथे वर्षभर सतत भक्तगण येत असतात. आवारातले भक्तनिवास, स्वच्छता आपल्या मनावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी व्यक्तिपुजा, मठ याचे स्तोम वाढवले नाही. आपण येथे येतो रामाच्या मंदिरात. हे फारच आवडले. रात्री साडे आठला भोजनशाळेत गेलो. उत्कृष्ट व्यवस्था, सुग्रास भोजन, सेवेकऱ्यांचा नम्रपणा इथे लगेच जाणवतो. राहाणे, खाणे, पाणी, वीज सर्व खर्च संस्थानाकडून आणि देणगीदारांच्या अव्याहत पाठिंब्याने होतो. जरा कुठे अहंपणाचा लवलेश असेल तर तो इथे आल्यावर राहाणारच नाही. दिवसभर फिरल्यामुळे रात्री छान झोप लागली .
पहाटे उठून तयार होऊन (प्रत्येक मजल्यावर गरम पाण्याचे नळ आहेत) रामाच्या मंदिरात जाऊन आलो. आज आमचे सातारा स्टेचे कोयना एक्सप्रेस (११०३०)चे रेझ0न होते त्यामुळे निघणे गरजेचे होते पटकन समोरच्या हॉटेलात चहा वडे खाऊन खोलीतले सामान काढले. एका सेवेकऱ्याने अडवले. “का निघालात? आता नाश्ता चहा तयार आहे तो नाही का घेणार ?” “आमचे कोयनाचे तिकीट आहे .” आणि निरोप घेतला . रस्त्यावर कालरात्री पासून एक मुक्कामी दादर बस उभी होती ती साडेआठला निघाली त्याने चार किमिवरच्या दहिवडीला उतरलो . ही बस इंदापूर फलटण पुणेमार्गे दादरला जाते . दहीवडी डेपोला फलटणमार्गे पुणे जाणाय्रा बस खूप आहेत .सातारा सटे जाणाय्रा ( निढळ मार्गे ६५किमी ) कमी आहेत . नऊला इंदापूर सातारा बस आली . त्याने निघालो .तिकीट स्टेशन (माहुली स्टॉपचे) मिळाले नाही ,साताय्राचे दिले . वाटेत एक छानसा किल्ला(?) दिसतो . साडेदहाला कोरेगाव आणि कोरेगाव सटे स्टॉप आला . अगदी जवळ स्टे येते. कोयना गाडी येथेही (११.४५)थांबते. अकरा वाजता रेल्वेपूल, नदीचापूल गेल्यावर माहुली स्टॉप(=क्षेत्र माहूली )ला उतरलो. डावीकडे सात आठ मिनीटावर सातारा स्टे आहे.उजवीकडे माहुली गाव आणि नदी आहे.
अजून गाडीला तासभर अवकाश होता विचार केला नदीवर जाऊन येऊ. बॅगा घेऊन गावात घुसलो. “अहो तुम्हाला कुठे जायचे आहे?” “कुठे नाही, जरा वेळ आहे तर नदीवर जायचे आहे.” गावकय्रांनी रस्ता दाखवला. दहा मिनीटांत घाटावर आलो. दगडी पायय्रांचा सुरेख घाट, छानसे शंकराचे देऊळ होते. कोणीच नव्हते. पलीकडच्या तिरावरही एक मोठे शंकराचे देऊळ होते. थोडे दूरवरही नदीच्या वरच्या अंगाला एकसारखीच उंच कळस असलेली देवळे दिसत होती. पायय्रांवर बायका कपडे धूत होत्या.त्यांना माहूलीबद्दल विचारले. माहूली गाव साताय्रापासून दहा किमी आहे. हे ‘क्षेत्र माहूली’ आहे . इकडे कोणी फिरकत नाही. गावाचा थोडा भाग वर अगोदर आहे ते ‘संगम माहुली’. तिथे कृष्णा वेण्णा नद्यांचा संगम आहे. नंतर ती कृष्णा इथे येते. संगम ही खरी रम्य जागा असायला हवी पण तो घाट बनलाय मढं जाळायचा घाट. सातारा शहरात स्मशानच नाही. ते सर्व संगमावर जातात! क्षेत्र माहूली स्टेशन जवळआहे आणि चांगले आहे.भराभर पावले उचलून पावणेबाराला स्टेशनला आलो. बाराच्या कोयनाने सातला
दोन दिवस त्या भक्तिमय वातावरणातून वावरल्यावर आपल्याला पटतं की वारी करणारेनि का वारंवार जातात.आषाढ आला की दरवर्षी मनानेच तिथे पोहोचतो.

प्रतिक्रिया

एस's picture

6 Jul 2015 - 11:39 am | एस

सविस्तर वर्णन आहे. बर्‍याचजणांना फायदा होईल.

कोण गेले होते ? नामदेव की एकनाथ ?

त्रिवेणी's picture

6 Jul 2015 - 3:38 pm | त्रिवेणी

मस्त वर्णन केले आहे.

प्रचेतस's picture

6 Jul 2015 - 4:15 pm | प्रचेतस

तपशीलवार आणि सहजसुंदर वर्णन.

खरं म्हणजे हे देऊळ नवव्या शतकात पांडुरंगपल्ली नावाचे शंकराचे होते

हे शंकराचेच कशावरुन? आणि तेथे शिवमंदिराच्या कुठल्या खुणा दिसतात?
शके ४३८ च्या एका ताम्रपटात पाण्डरंगपल्ली, जयदिठ्ठ व पंडराद्रिशेन असे काही शब्द डॉ. ग. ह. खरे यांनी निदर्शनास आणून दिले होते. शिवाय भागवदधर्म त्याही आधीपासून प्रचलित होताच. अर्थात तत्कालीन काळात विठ्ठलाची मूर्त भक्ती चालू होती का अमूर्त याबाबाबत नक्की सांगता येत नाही.

डॉ. शं गो. तुळपुळे यांना शके ११११ चा एक शिलालेख विठ्ठलाच्या पश्चिम द्वारासमोरील सार्वजनिक मुतारीच्या पायरीच्या दगडावर मिळाला. सध्या ह्या शिलालेखाची शिळा डायरेक्टर ऑफ अर्काइव्ह्ज यांच्या मुंबई येथील कचेरीत ठेवलेली आहे.

शिलालेखाचे वाचन असे.

सालवण सुरि ११११ सौ-
म्ये दिव | सुक्रे सम-
स्तचक्रवर्ति | मा -
हाजनिं | देवपरि -
वारे | मुद्रहस्तेहि अवघावें ला विठ -
लदेउनायकें || ए -
हि अवघावें लान
मडु ऐसा | कोठारीं
वाढसि जें | जा ती वी -
चंद्रु || हे क -
वणई न ठावें | स-
प्त | मुख्य संप्रति |
कवणु अतिसो देई तेआ-
सी विठलाची आण
ए काज जो फेडि
तो धात्रुद्रोहि |
--| कर्म |

आशय-
शालिवाहन सौर शक ११११ सौम्य संवत्सरी, शुक्रवारी समस्तचक्रवर्ति (पाचवा भिल्लम), महाजन, देवपरिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ (लान मडु) स्पातिले. ते कोठारांतून वाढवावे. चंद्र जात विचारतो हे कोणासही ठाऊक नाही. (त्याप्रमाणे हे देऊळ लहान असले तरी त्याचा प्रतिपाळ सर्वांनी करावा. सांप्रत देवळाअचे मुख्य सात जण आहेत.. जो कोणी ह्या देवळास पिडा देईल (अतिसो) तो धात्रुद्रोही.

ह्याचा नंतरचा दुसरा शिलालेख येतो तो पंढरपूरचा प्रसिद्ध असा ८४ चा शिलालेख. हा शिलालेख शके ११९५ साली कोरला गेला जो ह्या मंदिराच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त होता म्हणूनच त्याचे नाव चौर्‍याऐंशीचा शिलालेख असे पडले. हा लेख रामदेवराव व त्याचा श्रीकरणाधिप हेमाद्रीपण्डित याने कोरविला. रामदेरायाने लान मडुची वाढ करुन मंदिराचा जीर्णोद्धार केला.

यादव राजवट संपुष्टात आल्यावर १३ व्या शतकात मलिक काफूरचा घाला इकडील मंदिरावर पडला व मंदिराचे स्वरूप नष्ट झाले. आज आपण जे मंदिर बघतो ते शिवकाळ व किंवा त्यानंतरचे आहे.

शिलालेख आणि इतर माहिती बद्दल धन्यवाद प्रचेतस.
कोणाकडे काही चांगले फोटो असले तर डकवावेत.

प्यारे१'s picture

6 Jul 2015 - 11:14 pm | प्यारे१

दहिवडी सातारा रस्त्यावर (पुसेगाव पासून सातारा बाजूला उजव्या हाताला) वर्धनगड़ आहे.
छान लेख कंजूसकाका.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

7 Jul 2015 - 5:53 am | अरवीन्द नरहर जोशि.

वर्णन जुने आहे . आता त्यातले बरेच काही नाही .

कोणता भाग बदलला आहे ?कृपया उल्लेख करा .मुंबईतून जाणाय्रास उपयोगी पडेल अशी माहिती असावी हा हेतू आहे.
किमी अंतरे ,थोडा इतिहास,ठिकाणे बदलणार नाहीत. रेलवे वेळापत्रक ५ जुलै २०१५ चे दिले आहे .

आषाढ शुक्ल एकादशी या दिवशी पंढरपुरात पोहोचेल या अंदाजाने गावोगावच्या वाय्रा निघतात ( उदाहरणार्थ देहुची ज्येष्ट कृ एकादशीस ) .

कंजूस's picture

7 Jul 2015 - 11:02 am | कंजूस

>>>वर्णन जुने आहे . आता त्यातले बरेच काही नाही .>>>>>

कोणता भाग बदलला आहे ?कृपया उल्लेख करा .इतर ठिकाणांहून ,स्वत:च्या वाहनाने वगैरे जाणाय्रांसाठी फरक करावा लागेल. मुंबईतून जाणाय्रास उपयोगी पडेल अशी माहिती असावी हा हेतू आहे.
किमी अंतरे ,थोडा इतिहास,ठिकाणे बदलणार नाहीत. रेलवे वेळापत्रक ५ जुलै २०१५ चे दिले आहे .

आषाढ /निज आषाढ शुक्ल एकादशी या दिवशी पंढरपुरात पोहोचेल या अंदाजाने गावोगावच्या वाय्रा निघतात ( उदाहरणार्थ देहुची ज्येष्ट कृ एकादशीस ) .
बदलेल्या गोष्टी प्रतिसादांत दिल्यास पुढे कोणी जाईल त्यास उपयोग होइल.

रेवती's picture

7 Jul 2015 - 6:14 am | रेवती

वर्णन आवडले.

पद्मावति's picture

11 Jul 2015 - 1:48 pm | पद्मावति

खूप छान तपशीलवार वर्णन. फार आवडले.

यशोधरा's picture

12 Jul 2015 - 6:13 am | यशोधरा

मस्त लिहिले आहे. गोंदवल्याबाबत अगदी सहमत. :)

प्रशु's picture

13 Jul 2015 - 12:30 pm | प्रशु

रुक्मीणीच्या मुर्ती बद्दल सहमत.. ती अगदीच अलिकडची वाटते.
गजानन महाराजांच्या मठात गेलात का? आत गेल्या वर आपण नक्कि पंढरपूरातच आहोत क ह्यावर विश्वास बसत नाहि.

नाही गेलो गजानन महाराज मठात.पुढच्या वेळेस जुन्या पंढरपुरातले रुक्मिणीचे देऊळ,नामदेवाचे घर शोधायचे आहे.हंपि येथील विठ्ठल मंदिरात नंतर गेलो होतो आणि तिथले { मुर्ती विरहित } मंदिर जसे शांतपणे पाहता येते तसे पंढरपुरातले मंदिर गर्दीमुळे पाहता येत नाही.शिवाय फोटोही { जमेल तितके }काढून आणायचे आहेत.

पैसा's picture

13 Jul 2015 - 5:15 pm | पैसा

खूप छान, तपशीलवार लिहिले आहे.