पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग २

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
30 Jun 2015 - 3:31 am

पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग १

बर्फ पडल्याने सक्तीची विश्रांती घेण्यात एक दिवस गेल्यानंतर आता कुठे जायचे ही महत्वाची चर्चा चालू झाली. हवामान खात्याने हिरवा सिग्नल दिला आणि लेक जिनेव्हा हे ठिकाण पक्के झाले. पण स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या दोन्ही देशात लांबवर पसरलेल्या या लेकच्या कुठल्या भागात जायचे हा प्रश्न होता. पहिला पर्याय होता जिनेव्हा शहर. आमच्याकडे एकच दिवस होता, कारण उर्वरीत दोन दिवसांचा बेत नक्की होता. त्यात मोठ्या शहरात जायचे असेल तर तेथील सार्वजनिक वाहतूक वापरणे हा सर्वोत्तम पर्याय, मग कुठेतरी गाडी पार्क करायची आणि तिथून फिरायचे हा नेहमीचा पर्याय. पण जिनेव्हा मधली अगदी प्रमुख स्थलदर्शन करायचे म्हटले असते तरीही एक दिवस कमी होता. मग जिनेव्हा तूर्तास बाजूला ठेवून जवळच्या इतर ठिकाणांना भेट द्यावी यावर शिक्का मोर्तब झाले. गुगल नकाशात शोध घेताना Yvoire हे एक नाव दिसले, त्यावर मग अजून शोधाशोध केली, कसे जायचे, काय बघता येईल हे बघून ठिकाण नक्की झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा नाश्ता केला आणि शामोनिहून Yvoire कडे निघालो. रस्त्यात हा एक प्रचंड उंचीचा पूल दिसला. गाडीच्या वेगामुळे आणि वळणांमुळे त्यातल्या त्यात जमेल तसे फोटो काढले.

.

.

उंच पर्वत आणि त्यावर उतरलेले ढग सोबतीला होते त्यामुळे प्रवास आनंददायी होता.

.

दोन तासात Yvoire ला पोहोचलो आणि बघताक्षणी या गावाच्या प्रेमात पडलो. गावाच्या बाहेर पार्किंगची मुबलक सोय होती, तिथे पार्क करून पायी पुढे निघालो. गर्दी बरीच दिसत होती. Yvoire ची एक ओळख म्हणजे तिथल्या मध्ययुगीन दगडी वास्तू. याशिवाय फ्रान्स मध्ये "The most beautiful villages of France" अशी एक संघटना आहे. या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे की छोटी फ्रेंच खेडी अधिकाधिक सुंदर आणि नयनरम्य पद्धतीने जतन करून पर्यटनासाठी विकसित करायची. यात सहभागी होण्यासाठी त्यांचे काही नियम आहेत. २००८ पासून आजवर १५२ खेडी या संघटनेचा एक भाग आहेत. Yvoire हे त्यातलेच एक. १९५९ साली या खेड्याला फ्रान्समधील सर्वाधिक सुंदर गाव हा किताब मिळाला होता आणि त्यानंतर पुढे बरीच वर्षे तो वारसा या गावाने कायम ठेवला. २००२ साली या गावाने युरोपियन स्तरावरील स्पर्धेत देखील International Trophy for Landscape and Horticulture हे पारितोषिक मिळवले आणि आपले नाव अजून उंच केले. हे सगळे जे आम्ही जाण्यापूर्वी वाचले होते, ते या गावात फिरताना तंतोतंत अनुभवले.

गावाच्या प्रवेशाजवळच असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये बसून लोक वाईन पीत, गप्पा मारत जेवत होते.

.

प्रत्येक घर नटलेलं होतं, अन महत्वाचे हे की ही सजावट कुठलीही अत्याधुनिक उंची वस्तू वगैरे वापरून केलेली नसून नैसर्गिक जास्त होती. सुंदर टुमदार घरं आणि फुलं, बागांमध्ये कल्पकतेने केलेली सजावट हे मागच्या स्विस भेटीत खूप ठिकाणी पाहिले होते. जर्मनीतही कमी प्रमाणात असले तरीही असे काही दिसतेच. हे सगळे बघून प्रत्येक वेळी अजून सुंदर आणि कलात्मक आता काय असणार यावर जे काही कल्पनेत रंगत नाही, असे काहीतरी दाखवून Yvoire सारखी गावं पुन्हा पुन्हा धक्के देतात. सुंदर गुलाबी रंगाच्या कुंड्यांमधून डोकावणारी फुले अजूनच सुंदर वाटत होती, तर एका ठिकाणी आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या या छत्र्या सहजच सगळ्यांच्या फोटोत स्थान मिळवत होत्या.

.

.

वेलीचे केलेले हे नैसर्गिक तोरण या घरावर सजले होते.

.

जवळच या गावातले चर्च दिसत होते

.

आता भूक लागली होती, बसून खाण्याऐवजी सोबत घेऊन पुढे जाऊ असा विचार करून एका ठिकाणी थांबलो. सँडविच ऑर्डर केले. ते तयार होईपर्यंत दुसऱ्या एका ग्राहकाचे एक्स्ट्रा आईस्क्रीम त्याच्याकडे उरले होते आणि दुकानदाराने ते आग्रहाने आम्हाला दिले. असा अनुभव इथे अजून घेतला नसल्याने आम्ही काय करावे अशा संभ्रमात होतो तेवढ्यात तो "घ्या हो, फुकटात आहे" अशा आविर्भावात काहीतरी इंग्रजी फ्रेंच पुटपुटला. मग आम्ही लगेच फुकट ते पौष्टिक म्हणत ते घेतले. ;) तोवर सँडविच तयार झाले आणि लेककडे निघालो. अचानक एका कोपऱ्यातून लेकचे पहिले दर्शन झाले. याच लेकवरच्या अजून दोन गावांमध्ये परतीच्या दिवशी देखील थांबलो. त्यामुळे तेव्हा याबद्दल अधिक येईलच.

.

असेच चालत तळ्याकाठी आलो, तिथेच एका बाकावर बसून खाल्ले आणि मग पुढचा फेरफटका मारायला निघालो. निळे आकाश, निळे पाणी, हिरवा निसर्ग, काठावर विश्रांती घेत असलेल्या या होड्या आणि याचा मनसोक्त आस्वाद घेत जवळच्या प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये बसलेले लोक.

.

.

.

.

.

.

तेवढ्यात सगळे लोक एकाच बाजूला का बघत आहेत असे वाटले, पाहिले तर कुठेतरी मोठी आग लागली होती, आकाशात सगळीकडे धुराने साम्राज्य केले होते. अग्निशामक दलाच्या गाड्यांचे आवाज आले, हळूहळू आग आटोक्यात आली, पण इतरत्र सगळे व्यवहार सुरळीत चालू होते. बराच वेळ इथे फोटो कशाला घ्यायचा असा विचार करूनही शेवटी आम्हीही एक फोटो काढला आणि पुढे निघालो.

.

हे गाव एवढं लहान की सगळीकडे फिरायला फार तर चार तास लागतील. प्रत्येक गल्ली बोळातून या गावाचे वेगळे रूप दिसते. पुढचे दोन तीन तास शक्य तेवढे फिरून अनेक गोष्टी नजरेत आणि कॅमेर्‍यात साठवायचा प्रयत्न केला.

.

.

.

.

.

ही एक आजी नातवंडाना बोटीवर सोडायला आली होती. तीन तीनदा सूचना देऊन, बोटीच्या कप्तानाला काळजी घे, लक्ष दे असे वदवून, ती बोट दूर जाईपर्यंत आजी हात हलवत होती. आमच्यापासून बरंच दूर अंतरावर हे सगळं घडत होतं, जवळ असतो तरीही भाषा कळली नसती. पण शब्दावाचून आजीची काळजी आमच्यापर्यंत पोचली होती.

.

याशिवाय या गावात एक खास गोष्ट होती. खरेदीसाठी या गावात एकदम हटके दुकानं होती. इतरत्र नेहमी न दिसणाऱ्या वस्तू, विशेष करून घर सजावटीच्या दृष्टीने आणि त्याही तुलनेने कमी किमतीत दिसत होत्या. त्यामुळे कधी नव्हे ते इथे खरेदीला उत आला. भरपूर पिशव्या हातात धरून आणि या स्वप्नवत गावाच्या आठवणी घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. अजून थोडा वेळ होता म्हणून तिथल्याच पर्यटन केंद्रात चौकशी केली. परतीच्या वाटेवरच Nernier नावाचे असेच अजून एक गाव होते, तिथे पुन्हा ब्रेक घेतला, फोटो काढले.

.

.

.

इथल्याच एका कॅफेत बसून कॉफी घेतली आणि शामोनिकडे निघालो. हा दिवस फक्त अनुभवण्यासारखा होता. तसं बघायला गेलं तर आपल्या नेहमीच्या बघण्यात जी खेडी असतील, तशीच ही सुद्धा. फक्त अत्यंत स्वच्छ, आखीव रेखीव, कुठल्याही मॉडर्न गोष्टींची शाल न पांघरता देखील सजलेले आणि सजवलेले हे गाव. निसर्गावर प्रेम करणारे हे लोक, त्यांची संस्कृती, त्यांच्या पुरातन वास्तू या सगळ्यालाच मनापासून जपतात आणि यात तेवढेच सहकार्य करणारे त्यांचे सरकार सोबतीला असते तेव्हा संघटितपणे अशी उत्तम आनंददायी पर्यटनस्थळे विकसित होतात. जर कधी जिनेव्हाच्या जवळपास आलात, विशेषतः उन्हाळ्यात, तर इथे अवश्य भेट द्यावीच.

शामोनीत परतलो, हवामान चांगले होते आणि थकवा अजिबातच नव्हता, म्हणून तिथेच फेरफटका मारायला आणि सोबतच खायला बाहेर पडलो. फ्रेंच खाद्य संस्कृतीतील ठळक पदार्थांपैकी क्रेप्स (Crêpe)
हा एक आवडणारा प्रकार. क्रेप्सचे रेस्टॉरंट बघून बाहेरून मेन्युचा अंदाज घेतला आणि आत शिरलो. जर्मनीत सगळीकडे पाणी विकत घ्यावे लागते. इथे अगत्याने पाणी आणून ठेवले गेले. कालपर्यंत फ्रेंच कारभाराला दिलेल्या काही शिव्या या पाण्यात लग्गेच विरघळल्या. ;) शिवाय अत्यंत चविष्ट असे क्रेप्स खायला मिळाले. हे पदार्थ बाहेर कितीही खाल्ले तरी मूळ देशात जे खायला मिळते, त्याची सर इतरत्र नाही हे खाल्ल्यावर जाणवले.

.

त्याचबरोबर मॅकॅरोन्स ही देखील एक फ्रेंच खासियत. यापुर्वी मी जेव्हा हा प्रकार पहिल्यांदा खाल्ला होता तेव्हा 'एक बार खाओगे तो खाते रह जाओगे' याचा अनुभव घेतला होता. शामोनीत फिरताना ठिकठीकाणी ही दुकाने दिसली त्यामुळे तिथे जाणे अनिवार्य होते. शिवाय काही फ्रेंच बेकरीचे प्रकार होते. काय घेऊ आणि काय नको असे झाले होते. वेगवेगळे फ्लेवर ट्राय करूयात म्हणून बरीच खरेदी झाली, एकूण हा दिवसच खरेदीचा होता. :)

.

.

हे खाउन रसना तृप्त झाली होती. फ्रेंच लोकांना उत्तम खाद्यपदार्थांसाठी दुवा देतच पुढे गेलो.
शामोनितही अनेक आकर्षक इमारती होत्या, सगळीकडे सुंदर फुलांनी सजलेली दुकाने होती. फ्रेंच लोक हे त्यांच्या निवांतपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे रात्री बराच वेळ लोक रेस्टॉरंट्समध्ये दिसत होते.

.

.

.

.

बरीच भटकंती झाली होती. आता मों ब्ला चे शिखर खुणावत होते. फक्त त्याला कुठून बघायचे यावर निर्णय होत नव्हता. एक पर्याय होता रोपवेने वर जाण्याचा आणि एक होता थोडा विरुद्ध बाजूने गाडीने घाट चढत जाण्याचा. त्याबद्दल आता पुढच्या भागात.
क्रमशः

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

30 Jun 2015 - 5:13 am | श्रीरंग_जोशी

काय ते फोटोज काय ते वर्णन. एकदम स्वर्गीय ठिकाण वाटत आहे.
खाऊगिरी पण छानच. हे क्रेपे थोडेबहुत दोशासारखे वाटत आहे.

स्थानिक ग्रामिण नगररचना व स्थापत्य सौंदर्य यांचे संवर्धन करून त्याचा उपयोग पर्यटनाला चालना देण्यासाठी करण्याचे धोरण खूप भावले.

लेक जिनिव्हा (स्थानिक उच्चार 'जिनेव्हा' असा आहे का) बरोबर आमचाही ऋणानुबंध जुळलेला आहे. पण आमचे लेक जिनिव्हा अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात आहे. शिकागोपासून दीड दोन तास अंतरावर. आजवर तीनदा तिथली सहल केली आहे :-) .
Lake Geneva, WI
दोन वर्षांपूर्वी अमेरिकन स्वातंत्र्यदिनाची आतषबाजी तिथे पाहिली होती. ती सुरु होण्यापूर्वीचा हा फोटो.

मधुरा देशपांडे's picture

30 Jun 2015 - 1:31 pm | मधुरा देशपांडे

वाह! सुंदर फोटो.
क्रेपे किंवा क्रेप हा पॅनकेक, डोसा यातलाच प्रकार. जर्मनीत ख्रिसमस मार्केट्स मध्ये क्रेप्सची दुकाने असतात. पण त्या गाड्यांवर मिळणारे आणि फ्रान्स मध्ये मिळणारे क्रेप यात फरक जाणवतो. वरच्या फोटोतल्या क्रेपला जी जाळी पडली आहे, तशी इतरत्र दिसली नाही. बहुधा पिठाचा परिणाम असावा असे वाटते.
जिनेव्हा हाच उच्चार नेहमी ऐकला आहे त्यामुळे तोच लेखात वापरला. स्थानिक उच्चार गेम्फ (Genf/Gämf) असा होतो.

उमलाव्ट्स कसे देता? की कळफलकावरच आहेत?

मधुरा देशपांडे's picture

30 Jun 2015 - 2:50 pm | मधुरा देशपांडे

जर्मन कळफलकावर आहेत. पण हे इथे आंजावरुन चोप्य पस्ते केलंय.

काय सुंदर गावं.आपल्या गावावर ही माणसं मनापासून प्रेम करत असणार यात शंकाच नाही!
सुंदर फोटो आणि वर्णन.पुभाप्र.

पद्मावति's picture

30 Jun 2015 - 11:15 am | पद्मावति

सुंदर वर्णन आणि फोटोसुद्धा. हा भाग पण खूप आवड़ला

मदनबाण's picture

30 Jun 2015 - 11:22 am | मदनबाण

फोटू पाहुनच समाधान झाले ! त्या संपूर्ण हिरव्या गार घरात आतुन किती गार वाटत असेल नै ? :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2015 - 11:31 am | स्वाती दिनेश

'त्या तरुतळी' परत एकदा मनाने फिरून आले.
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2015 - 11:46 am | डॉ सुहास म्हात्रे

निसर्गावर प्रेम करणारे हे लोक, त्यांची संस्कृती, त्यांच्या पुरातन वास्तू या सगळ्यालाच मनापासून जपतात आणि यात तेवढेच सहकार्य करणारे त्यांचे सरकार सोबतीला असते तेव्हा संघटितपणे अशी उत्तम आनंददायी पर्यटनस्थळे विकसित होतात.

यातच सगळं आलं !!!

आपण भारतिय चराचरात, प्राणी-वनस्पतींत परमेश्वर भरून राहिला आहे असे म्हणतो आणि मग त्याच क्षणी त्याच परमेश्वराची मोड-तोड-कचरा करून विटंबना करायला मागे पाहत नाही :(

अशी भरपूर सौंदर्याने भरलेली गावे बघताना "किती पाहशील दोन डोळ्यांनी... " असेच होते.

सुंदर फोटोंची रेलचेल असलेला हा भाग प्रचंड आवडला हेवेसांन.

अर्धवटराव's picture

30 Jun 2015 - 10:25 pm | अर्धवटराव

अशी भरपूर सौंदर्याने भरलेली गावे बघताना "किती पाहशील दोन डोळ्यांनी... " असेच होते.

अगदी अगदी.

कुठलाही आधुनीक बडेजाव न करता नैसर्गीक पद्धतीन सजावट करण्याचा आणखी एक फयदा म्हणजे व्हेरी लो इन्व्हेस्ट्मेण्ट :) काहि कारणाने पर्यटन व्यवसाय मंदीत आला तरी मेण्टनन्स खर्चाची पर्वा नाहि. परसबागेतली, जवळपास डोंगरावरची फुलं, वेलींनी केलेली सजावट. सगळं कसं मस्त जमुन आअं इथे.

या सौंदर्याला जपण्याची, खुलवण्याची अणि आस्वाद घेण्याची रसीक मानसीकता आपल्या लोकांमधे उतरली तर काय बहार येईल.

पिलीयन रायडर's picture

30 Jun 2015 - 2:16 pm | पिलीयन रायडर

येणार ग येणार.. हे सगळं बघयला नक्की येणार!!!
तू अशीच लिहीत रहा. मी लिस्ट बनवत राहीन!

उदय के'सागर's picture

30 Jun 2015 - 2:26 pm | उदय के'सागर

हेवा, हेवा आणि केवळ भरगच्च हेवा....

खुप अप्रतिम भाग आणि पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

सूड's picture

30 Jun 2015 - 2:45 pm | सूड

सुंदर लेख!!

कविता१९७८'s picture

30 Jun 2015 - 3:40 pm | कविता१९७८

मस्त लेखन

स्नेहल महेश's picture

30 Jun 2015 - 3:51 pm | स्नेहल महेश

वर्णन आणि फोटों मस्त पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

सर्वसाक्षी's picture

30 Jun 2015 - 4:09 pm | सर्वसाक्षी

निवांत भ्रमंती आवडली. चित्रातही सगळं शांत, निरामय जाणवतय.

जुइ's picture

30 Jun 2015 - 8:45 pm | जुइ

एकूणच गावं चांगली सुशोभित ठेवून पर्यटकांना आकर्षीत करायची कल्पना छानच आहे. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फोटोही छान आले आहेत.

यानिमित्याने अनेक वेळा केलेल्या लेक जिनेव्हाच्या(विस्कॉनसिन)सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.

वेल्लाभट's picture

1 Jul 2015 - 7:05 am | वेल्लाभट

त्या खिडक्या, गॅल-या, त्याबाहेरच्या त्या छोटेखानी कुंड्या....

टेकिंग मी बॅक टू माय १० डेज इन दॅट ब्यूटिफुल प्लेस

वाह !डोळ्ञाचे पारणे फिटले :) इतके लाजवाब देखणी गाव जगात आहेत, कधी पहयला मिळ्नार देव जाणे :(